व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “मुळावलेले व पाया घातलेले” आहात का?

तुम्ही “मुळावलेले व पाया घातलेले” आहात का?

तुम्ही “मुळावलेले व पाया घातलेले” आहात का?

वादळात एखादा मोठा वृक्ष कधी तुम्ही पाहिला आहे का? प्रचंड वादळ-वाऱ्‍यातही तो तग धरून राहतो. का? कारण त्याची मुळे मजबूत असून अगदी खोलवर रुजलेली असतात. आपणही त्या वृक्षाप्रमाणे होऊ शकतो. आपण “मुळावलेले व पाया घातलेले” असे असल्यास, जीवनात वादळरूपी संकटे येतात तेव्हा आपणही तग धरून राहू शकतो. (इफिस. ३:१४-१७) हा पाया काय आहे?

बायबल म्हणते, की “स्वतः ख्रिस्त येशू” ख्रिस्ती मंडळीची “मुख्य कोनशिला आहे.” (इफिस. २:२०; १ करिंथ. ३:११) आपण ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे आपल्याला असे प्रोत्साहन देण्यात आले आहे: “त्याच्यामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, . . . विश्‍वासात दृढ” असे व्हा. या सल्ल्याचे पालन केल्यास आपल्या विश्‍वासावर घाला घालणाऱ्‍या कोणत्याही संकटाचा—ज्यांपैकी काही ‘पोकळ भुलथापांवर’ आधारलेल्या ‘लाघवी भाषणांच्या’ रूपात येतात—सामना करणे आपल्याला शक्य होईल.—कलस्सै. २:४-८.

“रुंदी, लांबी, उंची व खोली”

पण, आपण विश्‍वासात “मुळावलेले” व “दृढ” कसे होऊ शकतो? आपल्या विश्‍वासाची मुळे खोलवर रुजवण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे देवाच्या प्रेरित वचनाचा सखोल अभ्यास करणे. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण सत्याची ‘रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावे.’ (इफिस. ३:१८, १९) म्हणून, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने देवाच्या वचनाची वरवरची समज मिळवण्यातच म्हणजे देवाच्या वचनाची “मुळाक्षरे” समजून घेण्यातच समाधान मानू नये. (इब्री ५:१२; ६:२) तर, देवाच्या वचनातील गहन सत्ये शिकून घेण्यासही उत्सुक असले पाहिजे.—नीति. २:१-५.

अर्थात, केवळ अफाट ज्ञानाच्या बळावरच आपण सत्यात “मुळावलेले” व स्थिरावलेले होऊ शकतो असे नाही. कारण तसे पाहिले तर, बायबलमध्ये काय म्हटले आहे हे सैतानाला देखील ठाऊक आहे. तेव्हा, केवळ ज्ञान असणे पुरेसे नाही. तर ‘बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेणे’ देखील गरजेचे आहे. (इफिस. ३:१९) यहोवावर व सत्यावर आपले प्रेम असल्यामुळे आपण त्याच्या वचनाचा अभ्यास करतो, तेव्हा बायबलच्या सत्यांविषयीची आपली समज आणखी गहन होते व आपला विश्‍वास आणखी दृढ होतो.—कलस्सै. २:२.

तुमचे ज्ञान अजमावून पाहा

बायबलमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण सत्यांपैकी काहींची तुम्हाला कितपत समज आहे हे तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता का? असे केल्याने वैयक्‍तिक बायबल अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या पत्रातील सुरुवातीची वचने वाचा. (“इफिसकरांस” असे शीर्षक असलेली चौकट पाहा.) ही वचने वाचल्यानंतर स्वतःला विचारा: ‘चौकटीत दिलेल्या बायबलच्या या उताऱ्‍यात जे वाक्यांश तिरप्या वळणात आहेत त्यांचा अर्थ मला माहीत आहे का?’ या प्रत्येक वाक्यांशाचा आपण एकेक करून विचार करू या.

“जगाच्या स्थापनेपूर्वी” नेमले

आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिताना पौलाने म्हटले: ‘देवाने आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वत:चे दत्तक होण्याकरिता पूर्वीच नेमिले होते.’ होय, यहोवाने आपल्या परिपूर्ण स्वर्गीय कुटुंबाचा भाग बनण्यासाठी काही मनुष्यांना दत्तक घेण्याचे ठरवले होते. देवाचे हे दत्तक पुत्र भविष्यात ख्रिस्तासोबत राजे व याजक या नात्याने कार्य करणार होते. (रोम. ८:१९-२३; प्रकटी. ५:९, १०) सैतानाने सर्वात प्रथम यहोवाच्या आधिपत्याविषयी सवाल उपस्थित केला तेव्हा देवाच्या मानव सृष्टीत दोष असल्याचे त्याने सुचवले. तेव्हा, याच मानवी कुटुंबातून काहींची निवड करून अखिल विश्‍वातून दुष्टाईचा व दुष्टाईचा उगम असलेल्या सैतानाचा कायमचा अंत करण्यात यांनाही सहभागी करण्याचे देवाने जे ठरवले ते किती उचित आहे! पण, मनुष्यांपैकी नेमके कोण त्याचे दत्तक पुत्र होतील हे त्याने पूर्वीच ठरवले नव्हते. तर, मानवांचा एक समूह किंवा गट स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करेल हे देवाने आधीपासून ठरवले होते.—प्रकटी. १४:३, ४.

आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिताना पौलाने म्हटले, की त्यांना एक गट या नात्याने “जगाच्या स्थापनेपूर्वी” निवडण्यात आले होते. या ठिकाणी पौल कोणत्या ‘जगाविषयी’ बोलत होता? मानवजातीला निर्माण केले गेले त्या आधीच्या काळासंबंधी तो बोलत नव्हता. तसे असते तर न्यायीपणाच्या मूळ तत्त्वाचेच उल्लंघन झाले असते. आदाम आणि हव्वा चुकतील हे देवाने त्यांची निर्मिती करण्याआधीच ठरवले असते तर त्यांच्या चुकीबद्दल त्यांना दोषी ठरवणे योग्य असते का? तर मग, देवाच्या आधिपत्याविरुद्ध बंड करण्यात आदाम आणि हव्वेने सैतानाला साथ दिल्यामुळे जी वाईट परिस्थिती उद्‌भवली ती सुधारण्याचे देवाने नेमके केव्हा ठरवले? आपल्या मूळ पालकांनी बंड केल्यानंतर, पण तारण होण्याजोग्या अपरिपूर्ण मानवजातीचे जग अस्तित्वात येण्याआधी देवाने हे ठरवले.

“त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे”

इफिसकरांस पत्रातील सुरुवातीच्या वचनांत ज्या तरतुदींविषयी सांगितले आहे त्या “[देवाच्या] कृपेच्या समृद्धीप्रमाणे” घडून आल्या असे पौलाने का म्हटले? पाप केल्यामुळे अपरिपूर्ण ठरलेल्या मानवजातीचे तारण करण्यास खरेतर यहोवा बांधील नव्हता हे ठासून सांगण्यासाठी पौलाने असे म्हटले.

तसे पाहिले तर आपल्यापैकी कोणीही या तारणासाठी पात्र ठरण्याजोगे काहीही केले नाही. पण, मानवी कुटुंबावरील अपार प्रेमापोटी यहोवाने आपले तारण करण्यासाठी काही खास तरतुदी केल्या. आपण अपरिपूर्ण, पापी असूनही त्याने आपल्या सुटकेची व्यवस्था केली ही पौलाने म्हटल्याप्रमाणे, खरोखर देवाची आपल्यावरील कृपाच आहे.

देवाच्या उद्देशाचे रहस्य

सैतानामुळे घडून आलेले नुकसान कशा प्रकारे भरून काढले जाईल हे सुरुवातीला देवाने सांगितले नव्हते. त्या अर्थी हे एक “रहस्य” होते. (इफिस. ३:४, ५) पुढे ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यावर यहोवाने मानव आणि पृथ्वी यांसंबंधी असलेला आपला मूळ उद्देश कशा प्रकारे पूर्ण होईल याविषयी अधिक माहिती प्रकट केली. पौल म्हणतो, की नियुक्‍त ‘कालखंडाची पूर्णता’ झाल्यावर देवाने एक “व्यवस्था” अंमलात आणली, जिच्याद्वारे कालांतराने देवाच्या स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व उपासकांना एकत्र केले जाणार होते.

या एकत्रीकरणाचा पहिला टप्पा सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून सुरू झाला जेव्हा यहोवाने ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणाऱ्‍यांना एकत्र करण्यास सुरुवात केली. (प्रे. कृत्ये १:१३-१५; २:१-४) एकत्रीकरणाच्या दुसऱ्‍या टप्प्यात ख्रिस्ताच्या मशीही राज्याधीन जे लोक पृथ्वीवरील नंदनवनात राहतील अशांना एकत्र केले जाणार होते. (प्रकटी. ७:१४-१७; २१:१-५) “व्यवस्था” हा शब्द मशीही राज्याला सूचित करत नाही कारण १९१४ पर्यंत या राज्याची स्थापना झाली नव्हती. तर विश्‍वव्यापी एकता पुनर्स्थापित करण्याचा आपला उद्देश देव ज्या पद्धतीने पूर्णत्वास नेतो व त्यासाठी तो ज्या काही कार्यहालचाली करतो त्यांस हा शब्द सूचित करतो.

“समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा”

हे खरे आहे की, वैयक्‍तिक अभ्यास करण्याच्या चांगल्या सवयीमुळे तुम्हाला सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” पूर्णपणे समजू शकेल. पण, सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे सैतान आपल्या या चांगल्या सवयी सहज कमकुवत करू शकतो किंवा त्या पूर्णपणे मोडू शकतो हेही तितकेच खरे. तेव्हा, सैतानाला असे करण्याची संधी देऊ नका. तर देवाने दिलेल्या ‘बुद्धिचा’ उपयोग करून “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ योहा. ५:२०; १ करिंथ. १४:२०) बायबलच्या ज्या काही शिकवणी तुम्ही मानता त्यांमागचे कारण तुम्हाला माहीत असले पाहिजे. तसेच, ‘तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी [तुम्हाला] उत्तर’ देता आले पाहिजे.—१ पेत्र ३:१५.

पौलाने इफिसकरांस लिहिलेले पत्र त्या मंडळीत प्रथम वाचण्यात आले तेव्हा तुम्हीसुद्धा तेथे होता अशी कल्पना करा. त्याच्या शब्दांमुळे ‘देवाच्या पुत्राच्या परिपूर्ण ज्ञानात’ प्रगती करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली नसती का? (इफिस. ४:१३, १४) निश्‍चितच मिळाली असती! मग, पौलाच्या त्या शब्दांमुळे आजही तुम्हाला असेच करण्याची प्रेरणा मिळो. यहोवावर तुमचे मनस्वी प्रेम असल्यास व त्याच्या वचनाचे तुम्हाला अचूक ज्ञान असल्यास ख्रिस्ताच्या ठायी “मुळावलेले व पाया घातलेले” असे होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. आणि यामुळे या दुष्ट जगाचा अंत येण्यापूर्वी सैतानाने तुमच्या जीवनात कितीही व कोणतीही वादळरूपी संकटे आणली तरीही तुम्ही तग धरून राहू शकाल.—स्तो. १:१-३; यिर्म. १७:७, ८.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

“इफिसकरांस”

“आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले, त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वत:चे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुति व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकरच्या ठायी विपुलतेने केली आहे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे, सर्व ज्ञान व बुद्धि ह्‍यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे, ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वत:च्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.”—इफिस. १:३-१०.