व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे

प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे

प्रेमरहित जगात मैत्री टिकवून ठेवणे

“तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून मी तुम्हाला ह्‍या आज्ञा करितो.”—योहा. १५:१७.

१. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना आपसांतील घनिष्ठ मैत्री टिकवून ठेवणे का आवश्‍यक होते?

पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री येशूने त्याच्या एकनिष्ठ शिष्यांना आपसांतील मैत्री टिकवून ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. काही वेळापूर्वी त्याच संध्याकाळी, त्याने त्यांना सांगितले होते, की त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यास ते त्याचे अनुयायी आहेत हे लोकांना दिसून येईल. (योहा. १३:३५) पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा धीराने सामना करण्यासाठी आणि लवकरच येशू त्यांच्यावर सोपवणार असलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकमेकांसोबत घनिष्ठ मैत्री टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे होते. आणि खरोखरच, पहिल्या शतकातील ख्रिस्ती देवाशी व एकमेकांशी अढळ निष्ठा राखणारे म्हणून ओळखले गेले.

२. (क) काय करण्याचा आपला पक्का निर्धार आहे आणि का? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आज आपण पहिल्या शतकातील त्या ख्रिश्‍चनांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करणाऱ्‍या लोकांच्या एका जागतिक संघटनेचे भाग आहोत ही खरोखरच किती आनंदाची गोष्ट आहे! एकमेकांबद्दल निःस्वार्थ प्रेम दाखवण्याच्या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याचा आपला पक्का निर्धार आहे. पण, या शेवटल्या काळात लोकांमध्ये निष्ठा व माणुसकीसारखे गुण सहसा पाहायला मिळत नाहीत. (२ तीम. ३:१, ३) त्यांनी इतरांशी मैत्री केली तरीसुद्धा ती फक्‍त स्वार्थ साधण्यासाठी केलेली नावापुरती मैत्री असते. पण, खरे ख्रिस्ती म्हणून आपली ओळख टिकवून ठेवायची असल्यास आपण अशा प्रवृत्तींवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी, आपण आता पुढील प्रश्‍नांवर चर्चा करू या: अतूट मैत्री कशावर आधारलेली असते? आपण चांगले मित्र कसे जोडू शकतो? एखाद्याशी मैत्री तोडून टाकण्याची गरज केव्हा निर्माण होऊ शकते? आणि आपल्यावर चांगला प्रभाव पाडणारी मैत्री आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?

अतूट मैत्री कशावर आधारलेली असते?

३, ४. सर्वात घनिष्ठ मैत्रीचा आधार काय आहे आणि का?

सर्वात घनिष्ठ मैत्री म्हणजे यहोवाच्या प्रेमावर आधारलेली मैत्री. शलमोन राजाने लिहिले: “जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.” (उप. ४:१२) मैत्रीच्या दोरीतला तिसरा धागा यहोवा असल्यास, ती मैत्री टिकून राहील यात शंका नाही.

तसे पाहिल्यास, ज्यांचे यहोवावर प्रेम नाही, त्यांच्यातही चांगले मैत्रीसंबंध असू शकतात. पण, जेव्हा मैत्रीसंबंधांत एकत्र येणाऱ्‍या व्यक्‍तींचे देवावर प्रेम असते तेव्हा त्यांची मैत्री सहजासहजी तुटत नाही. गैरसमज उद्‌भवले तरी हे खरे मित्र यहोवाला आवडेल अशाच प्रकारे एकमेकांशी वागतात. शिवाय, देवाच्या विरोधकांनी त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास, खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील मैत्रीसंबंध अतूट असतात हे त्या विरोधकांनाही कळून चुकते. सबंध इतिहासात, यहोवाच्या कितीतरी सेवकांनी मरण पत्करले पण एकमेकांचा विश्‍वासघात केला नाही!१ योहान ३:१६ वाचा.

५. रूथ व नामी यांच्यातील मैत्री इतकी मजबूत का होती?

ज्यांचे यहोवावर प्रेम आहे त्यांच्याशीच आपण सर्वात समाधानदायक मैत्रीसंबंध अनुभवू शकतो यात काहीही शंका नाही. रूथ व नामी यांचे उदाहरण पाहा. त्या दोघींची मैत्री बायबलमध्ये नमूद असलेल्या सगळ्यात उल्लेखनीय मैत्रींपैकी एक आहे. त्यांच्या या अतूट मैत्रीचे रहस्य काय होते? रूथने नामीला जे म्हटले त्यातून या प्रश्‍नाचे उत्तर मिळते: “तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; . . . मृत्यु खेरीज करून तुमचा-माझा कशानेहि वियोग झाला तर परमेश्‍वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” (रूथ १:१६, १७) यावरून दिसून येते, की दोघींचेही देवावर मनस्वी प्रेम होते आणि याच प्रेमाने प्रेरित होऊन त्या एकमेकींशी प्रेमळपणे वागल्या. आणि म्हणूनच या दोन्ही स्त्रियांना यहोवाने अनेक आशीर्वाद दिले.

चांगले मित्र कसे जोडावेत?

६-८. (क) घनिष्ठ मैत्री जोडण्याकरता काय आवश्‍यक आहे? (ख) मैत्री करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पुढाकार घेऊ शकता?

रूथ व नामी यांच्या उदाहरणावरून दिसून येते, की चांगली मैत्री ही आपोआप जुळत नाही. यहोवावरील प्रेम या मैत्रीचा पाया आहे. पण त्यासोबतच, मैत्री घनिष्ठ करण्यासाठी खूप प्रयत्न व स्वार्थत्याग करणेही आवश्‍यक आहे. ख्रिस्ती कुटुंबांत यहोवाची उपासना करणाऱ्‍या भावंडांमध्येही घनिष्ठ मैत्री निर्माण होण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करणे जरुरीचे आहे. तर मग, चांगले मित्र जोडण्याकरता तुम्हाला काय करावे लागेल?

पुढाकार घ्या. प्रेषित पौलाने रोममधील मंडळीत असलेल्या आपल्या स्नेह्‍यांना ‘आतिथ्य करण्यात तत्पर असण्याचा’ सल्ला दिला. (रोम. १२:१३) कोणत्याही ध्येयापर्यंत पोचण्यासाठी छोटी छोटी अनेक पावले उचलावी लागतात. त्याच प्रमाणे आतिथ्य करण्यात तत्पर असण्यासाठीही नियमित स्वरूपाने काही छोट्या छोट्या कृती करण्याची गरज आहे. आणि आतिथ्य करण्याची ही जबाबदारी तुम्ही दुसऱ्‍या कोणावरही टाकू शकत नाही. (नीतिसूत्रे ३:२७ वाचा.) आतिथ्य करण्याचा एक मार्ग म्हणजे, मंडळीतील निरनिराळ्या व्यक्‍तींना आपल्या घरी साध्याशा जेवणाचे आमंत्रण देणे. असे नियमित स्वरूपाने करण्याद्वारे तुम्हाला तुमच्या मंडळीतील बांधवांना आतिथ्य दाखवता येईल का?

मैत्री करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मंडळीतील निरनिराळ्या व्यक्‍तींना आपल्यासोबत प्रचार कार्याला बोलावणे. आपल्या ख्रिस्ती बांधवाला जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्‍तीशी यहोवाबद्दल व त्याच्या गुणांबद्दल मनापासून बोलताना पाहता तेव्हा साहजिकच तुम्हाला त्या बांधवाबद्दल आपुलकी वाटू लागते.

९, १०. मैत्री करण्याबाबत पौलाने कोणते उदाहरण मांडले आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

आपले अंतःकरण विशाल करा. (२ करिंथकर ६:१२, १३ वाचा.) मैत्री करण्यालायक आपल्या मंडळीत कोणीच नाही, असे कधीकधी तुम्हाला वाटते का? असे असल्यास, कदाचित तुम्ही संकोचित दृष्टिकोनाने विचार करत आहात, असे तर नाही? आपले अंतःकरण विशाल करण्याच्या बाबतीत प्रेषित पौलाचे आपल्यासमोर अतिशय सुरेख उदाहरण आहे. एक अशी वेळ होती जेव्हा त्याने यहुदीतर लोकांसोबत उठण्या-बसण्याची कल्पनाही केली नसेल. पण नंतर तोच पौल “परराष्ट्रीयांचा प्रेषित” बनला.—रोम. ११:१३.

१० शिवाय, पौलाने आपली मैत्री केवळ आपल्या वयाच्या लोकांपुरतीच मर्यादित ठेवली नाही. उदाहरणार्थ, वय व पार्श्‍वभूमी वेगवेगळी असूनही पौल व तीमथ्य एकमेकांचे जिवलग मित्र बनले. आज अनेक तरुण मंडळीतील त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्‍तींशी मैत्री करतात आणि या मैत्रीची मनापासून कदर करतात. विशीत असलेली वनेस्सा म्हणते, “माझी एक अतिशय जिवाभावाची मैत्रीण आहे. तिचं वय पन्‍नासच्या आसपास असेल. पण स्वतःच्या वयाच्या मित्रांशी मी जितक्या मोकळेपणानं बोलते, तितक्याच मोकळेपणानं मी तिच्याशीही बोलू शकते. आणि तिचाही माझ्यावर फार जीव आहे.” अशी मैत्री कशामुळे निर्माण होते? वनेस्सा सांगते: “माझी ही मैत्री आपोआप जुळली नाही. मला त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागला.” तुम्ही आपल्या वयोगटाबाहेरील व्यक्‍तींसोबत मैत्री करण्यास उत्सुक असता का? असल्यास, यहोवा नक्कीच तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल.

११. योनाथान व दावीद यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

११एकनिष्ठ राहा. शलमोनाने लिहिले, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीति. १७:१७) शलमोनाने कदाचित आपला पिता दावीद आणि योनाथान यांची मैत्री लक्षात ठेवून हे शब्द लिहिले असावेत. (१ शमु. १८:१) शौल राजाला आपला पुत्र योनाथान इस्राएलच्या सिंहासनावर बसावा अशी इच्छा होती. पण, राजा होण्यासाठी यहोवाने दाविदाची निवड केली आहे ही वस्तुस्थिती योनाथानाने मान्य केली. शौलाप्रमाणे त्याने दाविदाचा मत्सर केला नाही. लोकांनी दाविदाची स्तुती केली तेव्हा त्याला त्याचा हेवा वाटला नाही. तसेच, शौलाने दाविदाविषयी खोटे सांगितले तेव्हा योनाथानाने डोळे मिटून त्यावर विश्‍वास ठेवला नाही. (१ शमु. २०:२४-३४) आपण योनाथानासारखे आहोत का? आपल्या मित्रांना काही विशेषाधिकार मिळाल्यास आपल्याला आनंद होतो का? त्यांच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण त्यांना सांत्वन व आधार देतो का? कोणी आपल्या मित्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास आपण लगेच त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवतो का? की योनाथानाप्रमाणे आपण एकनिष्ठपणे आपल्या मित्राचे समर्थन करतो?

मैत्री तोडून टाकणे आवश्‍यक बनते तेव्हा

१२-१४. काही बायबल विद्यार्थ्यांना कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते आणि आपण त्यांची मदत कशी करू शकतो?

१२ एखादा बायबल विद्यार्थी आपल्या जीवनशैलीत बदल करू लागतो, तसतसे त्याला मैत्रीच्या संबंधात काही आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्याला आपल्या मित्रांची सोबत हवीहवीशी वाटत असेल, पण त्याचे हे मित्र कदाचित बायबलच्या तत्त्वांनुसार वागत नसतील. पूर्वी, कदाचित तो नियमितपणे त्यांच्यासोबत ऊठ-बस करत असेल. पण आता मात्र त्याला जाणीव झाली असेल की हे मित्र आपल्यावर वाईट प्रभाव पाडू शकतात आणि त्यामुळे त्यांच्यासोबत उठणे बसणे कमी केले पाहिजे. (१ करिंथ. १५:३३) पण, असे करणे मित्रांचा विश्‍वासघात करण्यासारखे आहे असेही कदाचित त्याला वाटत असेल.

१३ तुम्ही एक बायबल विद्यार्थी असाल आणि तुमच्यापुढेही असेच आव्हान असेल तर हे लक्षात ठेवा की ते जर खरे मित्र असतील तर तुम्ही सुधरण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल. तुमच्याकडे पाहून कदाचित त्यांनाही यहोवाविषयी शिकून घ्यावेसे वाटू शकते. दुसरीकडे पाहता, जे फक्‍त नावापुरते मित्र आहेत, ते ‘त्यांच्या बेतालपणात [तुम्ही] सामील होत नाही’ म्हणून ‘तुमची निंदा करतील.’ (१ पेत्र ४:३, ४) खरे पाहता, तुम्ही नव्हे तर हे मित्रच तुमच्याशी अविश्‍वासूपणे वागत आहेत असे म्हणता येईल.

१४ देवाबद्दल प्रेम नसलेले बायबल विद्यार्थ्यांचे जुने मित्र त्यांना सोडून देतात तेव्हा मंडळीतील सदस्य ही कमी भरून काढू शकतात. (गलती. ६:१०) तुमच्या मंडळीच्या सभांना येऊ लागलेल्या बायबल विद्यार्थ्यांशी तुम्ही ओळख करून घेतली आहे का? तुम्ही अधूनमधून त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांना प्रोत्साहन देता का?

१५, १६. (क) एखाद्या मित्राने यहोवाची सेवा करण्याचे सोडून दिल्यास आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे? (ख) देवावर आपले खरे प्रेम आहे हे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो?

१५ पण, मंडळीचा सदस्य असलेला तुमचा एखादा मित्र यहोवाकडे पाठ फिरवतो, आणि अशा व्यक्‍तीला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा काय? अशा वेळी साहजिकच खूप दुःख होते. एका बहिणीच्या जवळच्या मैत्रिणीने यहोवाची सेवा करण्याचे सोडून दिले तेव्हा तिला कसे वाटले याविषयी ती सांगते: “मला धक्काच बसला. माझी मैत्रीण सत्यात अगदी पक्की आहे असं मला नेहमी वाटायचं, पण मुळात तसं नव्हतं. केवळ आपल्या घरच्यांना खूष करण्यासाठी ती यहोवाची सेवा करत होती की काय असं मला वाटू लागलं. आणि मग मी स्वतःचं परीक्षण करू लागले. यहोवाची सेवा करण्यामागे माझा स्वतःचा हेतू काय आहे याचा फेरविचार करायला मी सुरुवात केली.” या बहिणीने त्या कठीण प्रसंगाला कसे तोंड दिले? ती सांगते, “मी यहोवाजवळ माझं मन मोकळं केलं. मी यहोवाला दाखवू इच्छिते, की माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. फक्‍त त्याच्या संघटनेत अनेक चांगले सोबती मिळतात म्हणून मी त्याच्यावर प्रेम करत नाही.”

१६ जगाचे मित्र होऊ इच्छिणाऱ्‍यांचे समर्थन केल्यास देवाबरोबरील आपली मैत्री टिकून राहील अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. शिष्य याकोबाने लिहिले: “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याको. ४:४) आपल्याला आपला मित्र गमवावा लागला, तरीसुद्धा आपण यहोवाशी एकनिष्ठ राहिल्यास तो या दुःखद परिस्थितीला तोंड देण्यास आपली मदत करेल असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. त्याद्वारे आपले देवावर खरे प्रेम आहे हे आपण दाखवू शकतो. (स्तोत्र १८:२५ वाचा.) याआधी जिचे शब्द आपण वाचले ती बहीण शेवटी म्हणते: “एखाद्या व्यक्‍तीला यहोवावर किंवा आपल्यावर प्रेम करण्यास आपण बळजबरी करू शकत नाही हे मला कळून चुकलं आहे. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक निर्णय आहे.” पण, जे अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत त्यांच्याशी आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

चांगली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी

१७. चांगले मित्र एकमेकांशी कशा प्रकारे बोलतात?

१७ उत्तम संवादामुळे मैत्रीचे संबंध बहरतात. रूथ व नामी, दावीद व योनाथान तसेच, पौल व तीमथ्य यांच्याविषयीचे अहवाल वाचताना तुमच्या लक्षात येईल, की चांगले मित्र एकमेकांशी मनमोकळेपणाने पण आदरभावाने बोलतात. आपण इतरांशी कशा प्रकारे बोलावे याविषयी पौल लिहितो: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे.” पौल येथे “बाहेरच्या लोकांबरोबर,” म्हणजेच जे आपले ख्रिस्ती बांधव नाहीत अशांशी बोलण्याविषयी सांगत होता. (कलस्सै. ४:५, ६) पण विचार करा, जर विश्‍वासात नसलेल्यांशी आदराने बोलणे गरजेचे आहे, तर मग मंडळीतील आपल्या मित्रांशी आदरपूर्वक बोलणे आणखीनच महत्त्वाचे नाही का?

१८, १९. मंडळीतील एखाद्या मित्राकडून मिळणाऱ्‍या सल्ल्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे आणि इफिससमधील वडिलांनी आपल्याकरता कोणते उदाहरण मांडले?

१८ चांगले मित्र सहसा एकमेकांच्या मतांना महत्त्व देतात. त्यामुळे, त्यांच्यातील संवाद नेहमी प्रेमळ आणि मनमोकळा असावा. बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले: “तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्‍या मित्राचे माधुर्य होय.” (नीति. २७:९) तुमच्या मित्राकडून मिळणाऱ्‍या सल्ल्याकडे तुम्हीही याच दृष्टीने पाहता का? (स्तोत्र १४१:५ वाचा.) तुमच्या एखाद्या कृतीबद्दल तुमच्या मित्राने काळजी व्यक्‍त केल्यास तुमची प्रतिक्रिया काय असते? त्याने दिलेला प्रेमळ सल्ला आपल्या हितासाठी आहे असे तुम्ही मानता का, की त्याचे बोलणे लगेच मनाला लावून घेता?

१९ प्रेषित पौलाचा इफिसस येथील मंडळीच्या वडिलांशी अतिशय घनिष्ठ नातेसंबंध होता. त्यांच्यापैकी काही जणांनी ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला तेव्हापासून कदाचित पौल त्यांना ओळखत असावा. त्यांच्यासोबतच्या शेवटल्या भेटीत पौलाने त्यांना अगदी सडेतोड शब्दांत सल्ला दिला. या सल्ल्याप्रती त्या वडिलांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? पौलाचे हे मित्र नाराज झाले नाहीत. उलट, पौलाला आपल्याबद्दल किती कळकळ आहे याची त्यांनी कदर केली. पौलाची पुन्हा भेट होणार नाही हे जाणून ते अक्षरशः रडले.—प्रे. कृत्ये २०:१७, २९, ३०, ३६-३८.

२०. एक खरा मित्र काय करेल?

२० चांगले मित्र सुज्ञ सल्ला केवळ स्वीकारतच नाहीत तर तो देतातही. अर्थात, इतरांच्या खासगी जीवनात लुडबूड न करण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. (१ थेस्सलनी. ४:११, १२) तसेच, “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल” हेही आपण आठवणीत ठेवले पाहिजे. (रोम. १४:१२) पण आवश्‍यकता असते तेव्हा, एक खरा मित्र आपल्या सोबत्याला यहोवाच्या तत्त्वांची प्रेमळपणे आठवण करून देण्यास मागेपुढे पाहणार नाही. (१ करिंथ. ७:३९) उदाहरणार्थ, एखादा अविवाहित मित्र विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी जवळीक करत आहे असे दिसल्यास तुम्ही काय कराल? तुमची मैत्री तुटेल या भीतीने तुम्ही याबाबतीत त्याच्याशी बोलायचे टाळाल का? किंवा, तुमच्या मित्राने तुमच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही काय कराल? एक चांगला मित्र मंडळीतील प्रेमळ मेंढपाळांची मदत घेऊन, चुकीचे पाऊल उचलत असलेल्या आपल्या मित्राला साहाय्य करण्याचा प्रयत्न करेल. अर्थात, असे करण्यासाठी धाडस लागते. पण, जी मैत्री यहोवावरील प्रेमाच्या पायावर आधारित आहे, अशा मैत्रीला कोणतेही कायमस्वरूपी नुकसान पोचणार नाही.

२१. कधीकधी काय घडण्याची शक्यता आहे, पण मंडळीत आपण घनिष्ठ मैत्री टिकवून ठेवणे का आवश्‍यक आहे?

२१कलस्सैकर ३:१३, १४ वाचा. कधीकधी आपल्या वागणुकीमुळे आपल्या मित्रांना ‘आपल्याविरुद्ध गाऱ्‍हाणे’ असू शकते आणि कधीकधी आपल्यालाही त्यांच्या वागण्याबोलण्यामुळे चीड येऊ शकते. कारण याकोबाने लिहिल्याप्रमाणे, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याको. ३:२) पण आपण किती वेळा चुका करतो यावरून नव्हे, तर एकमेकांच्या चुकांची किती पूर्णपणे क्षमा करतो यावरून खऱ्‍या मैत्रीची पारख होते. खरोखर, मनमोकळेपणाने संवाद करण्याद्वारे व मनाचा मोठेपणा दाखवून एकमेकांना क्षमा करण्याद्वारे घनिष्ठ मैत्रीसंबंध जोपासणे किती महत्त्वाचे आहे! अशा प्रकारचे प्रेम आपल्या मैत्रीसंबंधांत “पूर्णता करणारे बंधन” ठरेल.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपण चांगले मित्र कसे बनवू शकतो?

• एखाद्याशी मैत्री तोडण्याची गरज केव्हा निर्माण होऊ शकते?

• घनिष्ठ मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

रूथ आणि नामी यांची घनिष्ठ मैत्री कोणत्या गोष्टीवर आधारित होती?

[१९ पानांवरील चित्र]

तुम्ही नियमितपणे इतरांना आपल्या घरी बोलवता का?