व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नीतिसूत्रे २४:२७ मधून कोणता धडा शिकायला मिळतो?

नीतिसूत्रांचा लेखक एका तरुण व्यक्‍तीला असा सल्ला देतो: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” या ईश्‍वरप्रेरित नीतिसूत्राचा नेमका काय अर्थ होतो? हाच की, लग्नाचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने, लग्नाच्या वचनबद्धतेसोबत जबाबदारीही येते ही गोष्ट ओळखून आधी त्यासाठी पुरेशी तयारी केली पाहिजे.

यापूर्वी काही वेळा या वचनाचे स्पष्टीकरण काहीसे असे देण्यात आले होते: कुटुंबात पतीने व पित्याने केवळ कर्ता पुरुष या नात्याने आपली कर्तव्ये पार पाडणे पुरेसे नाही, तर त्यासोबतच त्याने कुटुंबाला देवाविषयीचे शिक्षण देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. असे करणे उचित व शास्त्रवचनांवर आधारित असले, तरीही या वचनाचा मुख्य मुद्दा हा नाही. का बरे? त्याची दोन कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे, या वचनात घर बांधण्याविषयी जो सल्ला दिला आहे त्याचा अर्थ आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कुटुंबाला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणे असा होत नाही. तर त्याचा शब्दशः अर्थ घर बांधणे असा होतो. ‘बांधणे’ या शब्दाचा लाक्षणिक अर्थही असू शकतो आणि तो म्हणजे लग्न करून स्वतःचा संसार थाटणे व मुलाबाळांचे संगोपन करणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, आधी काय केले पाहिजे व नंतर काय केले पाहिजे यावर हे वचन भर देते. जणू काय, “आधी हे करा, मग ते करा,” असे ते सांगते. तर मग, आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांपेक्षा प्रापंचिक जबाबदाऱ्‍यांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे असे हे नीतिसूत्र सुचवते का? निश्‍चितच नाही!

बायबलच्या काळात, एखाद्या मनुष्याला आपले ‘घर बांधायचे’ किंवा लग्न करून स्वतःचा संसार थाटायचा असल्यास त्याने स्वतःला हा प्रश्‍न विचारणे जरुरीचे होते: ‘पत्नीची व भविष्यात मुले झाली तर या सगळ्यांची जबाबदारी पेलण्याची माझी तयारी आहे का?’ लग्न करण्याआधी त्याला आपल्या शेतातली कामे करायची होती अर्थात उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला काम करायचे होते. म्हणूनच, टुडेज इंग्लिश व्हर्शन अगदी सरळ व स्पष्टपणे या वचनाचा अनुवाद असा करते: “तुझी शेते कापणीसाठी तयार आहेत व तुझा उदरनिर्वाह होईल याची खातरी झाल्याशिवाय तू आपले घर बांधू नको आणि संसार थाटू नको.” हे तत्त्व आजही लागू होते का?

होय. लग्नाचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने लग्नासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी आधी पुरेशी तयारी केली पाहिजे. धडधाकट असल्यास त्याने काम करणे जरुरीचे आहे. अर्थात, कुटुंबाचे पालनपोषण करण्यामध्ये केवळ भौतिक गरजा तृप्त करणे इतकेच समाविष्ट नाही. तर जो मनुष्य आपल्या कुटुंबाच्या भौतिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा तृप्त करत नाही तो विश्‍वास न ठेवणाऱ्‍या मनुष्यापेक्षा वाईट आहे असे बायबल म्हणते. (१ तीम. ५:८) तेव्हा, लग्न करून स्वतःचा संसार थाटण्याचा विचार करणाऱ्‍या मनुष्याने प्रथम स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास मी खरोखर तयार आहे का? कुटुंबात आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत पुढाकार घेण्यास मी तयार आहे का? माझ्या पत्नी व मुलांसह नियमितपणे बायबल अभ्यास करण्याची जबाबदारी मी पूर्ण करू शकेन का?’ या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे बायबल सांगते.—अनु. ६:६-८; इफिस. ६:४.

तर मग, लग्नाचा विचार करणाऱ्‍या तरुणाने नीतिसूत्रे २४:२७ मध्ये दिलेल्या तत्त्वाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे, लग्नाचा विचार करणाऱ्‍या तरुणीनेसुद्धा, एक पत्नी व आई होण्याची जबाबदारी पेलण्यास मी तयार आहे का हा प्रश्‍न स्वतःला विचारणे जरुरीचे आहे. तसेच, लग्नानंतर मुलांचा विचार करणाऱ्‍या तरुण दांपत्यानेही वरील प्रश्‍नांचा विचार करावा. (लूक १४:२८) बायबलमध्ये दिलेल्या या सल्ल्याचे पालन केल्यास देवाचे लोक अनेक दुःखद परिणाम टाळू शकतात व समृद्ध कौटुंबिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतात.

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

लग्नाचा विचार करणाऱ्‍या तरुणाने स्वतःला कोणते प्रश्‍न विचारणे जरुरीचे आहे?