व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!

कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!

कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!

आज देवाच्या लोकांचे एक मोठे कुटुंब अस्तित्वात आहे. या कुटुंबातील आध्यात्मिक बंधुभगिनी शमुवेल, दावीद, शमशोन, राहाब, मोशे, अब्राहाम, सारा, नोहा आणि हाबेल यांसारख्या देवाच्या पुरातन काळातील सेवकांकडून मिळालेला वारसा पुढे चालवत आहेत. यहोवाच्या या विश्‍वासू सेवकांमध्ये अनेक कर्णबधिर देखील आहेत. उदाहरणार्थ, मंगोलियात सर्वात प्रथम यहोवाचे साक्षीदार बनलेले एक कर्णबधिर जोडपेच होते. तर रशियातील आपल्या प्रिय कर्णबधिर बंधुभगिनींच्या एकनिष्ठेमुळे मानवी हक्कांच्या युरोपीय न्यायालयात आपल्याला एक न्यायालयीन विजय देखील प्राप्त झाला.

अलीकडच्या काळात, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ संकेत भाषेत अनेक प्रकाशने उपलब्ध केली आहेत. तसेच, मंडळीच्या सभा, संमेलने व अधिवेशने देखील संकेत भाषेत आयोजित केली आहेत. (मत्त. २४:४५) कर्णबधिरांसाठी केलेल्या या तरतुदींचा त्यांना नक्कीच खूप फायदा झाला आहे. * पण, या तरतुदी उपलब्ध नव्हत्या तेव्हा कर्णबधिरांना खऱ्‍या देवाविषयी शिकणे आणि सत्यात प्रगती करत राहणे किती कठीण गेले असेल याचा कधी तुम्ही विचार केला का? तुमच्या क्षेत्रात भेटणाऱ्‍या कर्णबधिरांना मदत करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे का?

आधुनिक तरतुदी उपलब्ध होण्यापूर्वी . . .

कर्णबधिर असलेल्या काही वयस्कांना देवाची ओळख कशी झाली हे विचारून पाहा. कदाचित ते तुम्हाला सांगतील, की देवाला एक विशिष्ट नाव आहे हे पहिल्यांदाच त्यांना माहीत झाले तेव्हा त्यांना कसे वाटले. बायबलचे गहन सत्य समजून घेण्यास संकेत भाषेतील व्हीडिओ कार्यक्रम किंवा डीव्हीडी उपलब्ध होण्याआधी या एकाच सत्यामुळे त्यांचे जीवन पार बदलून गेले आणि इतकी वर्षे विश्‍वासात टिकून राहण्यास याच सत्यामुळे त्यांना मदत मिळाली. मंडळीच्या सभा संकेत भाषेत चालवल्या जात नव्हत्या किंवा या भाषेत त्यांचा अनुवाद केला जात नव्हता तेव्हाचे अनुभव ते तुम्हाला सांगतील. त्या वेळी, व्यासपीठावरून जे काही सांगितले जायचे ते समजावे म्हणून एक जण त्यांच्या बाजूला बसून भाषणातील मुद्दे कागदावर लिहित असे. एका बांधवाने सात वर्षे याच पद्धतीने बायबमधील सत्ये शिकून घेतली. पुढे त्यांच्या मंडळीत संकेत भाषेचा अनुवादक उपलब्ध झाला.

मंडळीतील इतरांसोबत क्षेत्रसेवेत, “ऐकू येणाऱ्‍या” लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्याचा अनुभवही कर्णबधिर साक्षीदार आठवून सांगतात. एका हातात साधीशी प्रस्तावना लिहिलेले इंडेक्स कार्ड आणि दुसऱ्‍या हातात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांचे नवीन अंक घेऊन ते प्रचार कार्य करायचे. तसेच, छापील साहित्यातून एका कर्णबधिर व्यक्‍तीसोबत अभ्यास करणेसुद्धा त्यांच्यासाठी एक संघर्ष होता. कारण जे काही छापले होते ते दोघांनाही फारसे समजत नसे. वयस्क कर्णबधिर प्रचारक हेसुद्धा आठवून सांगतात की त्यांना जे काही सांगायचे होते ते क्षेत्रातील लोकांना न समजल्यामुळे पुढे बायबलची सत्ये सांगणे अशक्य व्हायचे आणि अशा वेळी अतिशय वैफल्यग्रस्त वाटायचे. तसेच, यहोवावर मनस्वी प्रेम असूनही विशिष्ट गोष्टींबद्दल आपली समज योग्य आहे की नाही याविषयी आत्मविश्‍वास नसल्यामुळे काही ठोस पाऊल उचलता येत नाही तेव्हा कसे वाटते हेही त्यांना चांगले ठाऊक आहे.

इतके सगळे अडथळे असूनसुद्धा आपले कर्णबधिर बांधव अजूनही सत्याला कवटाळून आहेत. (ईयो. २:३) त्यांनी मोठ्या धीराने यहोवाची प्रतीक्षा केली आहे. (स्तो. ३७:७) परिणामस्वरूप, त्यांनी अपेक्षाही केली नसेल इतके आज यहोवा त्यांना आशीर्वादित करत आहे.

कुटुंबात पती आणि पित्याची भूमिका निभावणाऱ्‍या एका कर्णबधिर बांधवाला पूर्वी किती प्रयास करावे लागायचे ते विचारात घ्या. संकेत भाषेतील व्हीडिओ उपलब्ध होण्याआधी ते प्रामाणिकपणे कौटुंबिक बायबल अभ्यास घ्यायचे. त्यांचा मुलगा आठवून सांगतो: “कौटुंबिक अभ्यास चालवणं बाबांना नेहमीच खूप कठीण जायचं. कारण त्यांना आम्हाला केवळ प्रकाशनांतून शिकवावं लागायचं. बरेचदा, जे काही लिहिलं होतं ते त्यांना नीटसं समजायचं नाही. शिवाय, आम्ही मुलं समजूतदारपणा दाखवण्याऐवजी त्यांना आणखीनच अडचणीत टाकायचो. एखाद्या गोष्टीचं त्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलं नाही तर आम्ही लगेच त्यांना टोकायचो. इतकं असूनही ते अगदी न चुकता कौटुंबिक अभ्यास चालवायचे. आपल्याला इंग्लिश नीट समजत नसल्यामुळे अधूनमधून मुलांसमोर आपलं थोडं हसू झालं तरी चालेल, पण मुलांना यहोवाबद्दल थोडंफार तरी शिकायला मिळालंच पाहिजे असं त्यांचं मत होतं.”

आता सत्तरीत असलेल्या रिचर्ड नावाच्या एका बांधवाचे उदाहरण विचारात घेऊ. अमेरिकेतील न्यू यॉर्क, ब्रुक्लिन येथे राहणाऱ्‍या या बांधवाला ऐकू तर येतच नाही पण त्यासोबतच ते अंधळेही आहेत. असे असले तरी ते कधीच ख्रिस्ती सभा चुकवत नाहीत. सभांना जाण्यासाठी ते भुयारी रेल्वेने प्रवास करतात. एकट्यानेच प्रवास करत असल्यामुळे ते स्टेशन मोजत जातात, जेणेकरून नेमके कोठे उतरायचे हे त्यांना समजते. थंडीच्या दिवसांत एकदा जोराचे हिमवादळ सुरू झाल्यामुळे सभा रद्द करण्यात आली होती. याबद्दल मंडळीतील सर्व सदस्यांना कळवण्यात आले होते. पण, बंधू रिचर्डला सांगायचे राहूनच गेले. ही गोष्ट बांधवांच्या लक्षात आली तेव्हा ते लागलीच त्यांना शोधू लागले, तर बंधू रिचर्ड राज्य सभागृहासमोर उभे असलेले दिसले. कोणीतरी येऊन दार उघडेल या आशेने ते तेथे थांबले होते. इतक्या भयंकर वादळात ते घराबाहेर का पडले असे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले: “कारण यहोवावर माझं खूप प्रेम आहे.”

तुम्हाला काय करता येईल?

तुम्ही राहता त्या ठिकाणी कर्णबधिर लोक आहेत का? त्यांच्याशी संभाषण करता यावे म्हणून तुम्हाला संकेत भाषा शिकता येईल का? इतरांना आपली भाषा शिकवताना कर्णबधिर लोक सहसा फार सहनशील व समजूतदार मनोवृत्ती दाखवतात. अनौपचारिक रीत्या किंवा घरोघरचे साक्ष कार्य करताना तुम्हाला एखादी कर्णबधिर व्यक्‍ती भेटल्यास तुम्ही काय करू शकता? हावभाव किंवा हातवारे करून, कागदावर लिहून, चित्रे दाखवून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तिला सत्यात आस्था नाही असे तिने सूचित केले तरी एखाद्या कर्णबधिर किंवा संकेत भाषा येत असलेल्या साक्षीदाराला या भेटीविषयी सांगा. कर्णबधिर व्यक्‍तीला संकेत भाषेत राज्याचा संदेश सांगितल्यास तो ऐकून घेण्यास ती व्यक्‍ती अधिक इच्छुक असेल.

तुम्ही कदाचित संकेत भाषा शिकत असाल किंवा एका संकेत भाषिक मंडळीचे सदस्य असाल. मग, या भाषेत अधिक कुशल होण्यासाठी व ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तुमच्या मंडळीत कर्णबधिर प्रचारकांव्यतिरिक्‍त इतर प्रचारक असल्यास त्यांच्याशी देखील तुम्हाला संकेत भाषेतूनच बोलता येईल का? याचा फायदा असा होईल की तुम्हाला संकेत भाषेत विचार करणे शक्य होईल. काही वेळा, संकेत भाषेपेक्षा प्रत्यक्षपणे बोलणे जास्त सोपे असल्यामुळे तुम्ही कदाचित तोच मार्ग अनुसराल. पण, कोणतीही नवीन भाषा सफाईदारपणे बोलण्यासाठी सुरुवातीला थोडाफार त्रास होतोच हे नेहमी लक्षात असू द्या.

आपण संकेत भाषेचा उपयोग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो तेव्हा आपल्या कर्णबधिर बंधुभगिनींविषयी आपल्याला प्रेम व आदर असल्याचे दाखवून देतो. दररोज कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत इतरांचे बोलणे समजत नसल्यामुळे कर्णबधिर व्यक्‍तींना किती वैताग येत असेल याची कल्पना करू शकता का तुम्ही? एक कर्णबधिर बांधव म्हणतो: “माझ्या अवतीभोवती दररोज लोक एकमेकांशी बोलत असतात. त्यांच्यात मला एकटं पडल्यासारखं वाटतं. कधीकधी तर सहन न झाल्यामुळे मी अक्षरशः रागावतो देखील. मला नेमकं कसं वाटतं हे मी शब्दांत मांडू शकत नाही.” मंडळीच्या सभा तजेला देणाऱ्‍या असाव्यात जेथे येऊन आपल्या कर्णबधिर बंधुभगिनींना आध्यात्मिक अन्‍नाचा, सुसंवादाचा व प्रोत्साहनदायक सहवासाचा आनंद घेता येईल.—योहा. १३:३४, ३५.

त्याचप्रमाणे, निरनिराळ्या मंडळ्यांसोबत एकत्र येणाऱ्‍या कर्णबधिर व्यक्‍तींच्या अनेक लहान गटांचीसुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. या व्यक्‍तींसाठी सभांमधील कार्यक्रमाचा संकेत भाषेतून अनुवाद केला जातो. व्यासपीठावरून जे काही सादर केले जाते ते पूर्णपणे समजावे म्हणून सहसा ते राज्य सभागृहात अगदी पुढे बसतात. यामुळे कोणत्याही अडचणीविना त्यांना एकाच वेळी अनुवादक आणि वक्‍ता या दोघांकडे पाहता येते. अनुभवावरून असे दिसते, की मंडळीतील इतर बंधुभगिनींना लवकरच याची सवय होते आणि त्यांचे लक्ष विचलित होत नाही. संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्येही संकेत भाषेत अनुवाद केला जात असल्यामुळे तेथेही अशीच व्यवस्था केली जाते. कर्णबधिर व्यक्‍तींना समजेल अशा पद्धतीने अर्थपूर्ण रीतीने व स्वाभाविकपणे अनुवाद करणारे मंडळीतील परिश्रमी बंधुभगिनी निश्‍चितच प्रशंसेस पात्र आहेत.

तुमच्या मंडळीतर्फे कदाचित संकेत भाषेचा गट चालवला जात असेल किंवा तुमच्या मंडळीतील काही कर्णबधिर व्यक्‍तींसाठी सभांमध्ये अनुवाद केला जात असेल. या कर्णबधिर बंधुभगिनींविषयी वैयक्‍तिक आस्था दाखवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यांना आपल्या घरी बोलवा. त्यांच्याशी संवाद करता यावा म्हणून शक्य असल्यास काही संकेत शिकून घ्या. संभाषण करणे शक्यच नाही असे समजून माघार घेऊ नका. त्यांच्याशी संवाद साधण्याचा कोणता ना कोणता मार्ग तुम्हाला जरूर सापडेल. आणि अशा प्रकारे त्यांच्याप्रती प्रेम दाखवल्याने तुम्हाला अनेक आनंददायक अनुभव येतील. (१ योहा. ४:८) कर्णबधिर बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्यात उत्तम संभाषणकला, विचारशक्‍ती व विनोदबुद्धी असते. आपल्या कर्णबधिर पालकांविषयी सांगताना एक बांधव म्हणतो: “ऐकू न येणाऱ्‍या लोकांमध्ये माझं उभं आयुष्य गेलं आणि अनुभवावरून मी सांगू शकतो की त्यांच्याकडून मला जे काही शिकायला मिळालं त्याबद्दल त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. खरंच, आपल्या कर्णबधिर बंधुभगिनींकडून आपण खूप काही शिकू शकतो.”

यहोवा आपल्या इतर उपासकांइतकेच आपल्या कर्णबधिर उपासकांवरही प्रेम करतो. या बांधवांच्या विश्‍वासामुळे व चिकाटीमुळे यहोवाच्या संघटनेची शोभा आणखीनच वाढते. तेव्हा, आपल्या कर्णबधिर बंधुभगिनींवर आपण मनापासून प्रेम करू या!

[तळटीप]

^ परि. 3 टेहळणी बुरूज, ऑगस्ट १५, २००९ या अंकातील “यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’” हा लेख पाहा.

[३१ पानांवरील चित्र]

कर्णबधिर व्यक्‍तीला संकेत भाषेत राज्याचा संदेश सांगितल्यास तो ऐकून घेण्यास ती व्यक्‍ती अधिक इच्छुक असेल

[३२ पानांवरील चित्रे]

आपल्या मंडळीच्या सभा तजेला देणाऱ्‍या असाव्यात ज्या ठिकाणी येऊन आपल्या कर्णबधिर बंधुभगिनींना आध्यात्मिक प्रोत्साहन मिळेल