व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे

देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे

देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे

‘देवाचे अनुकरण करणारे व्हा.’—इफिस. ५:१.

१, २. (क) सभ्यपणे वागणे का महत्त्वाचे आहे? (ख) या लेखात कशाबद्दल चर्चा केली जाईल?

आदरपूर्वक आचरणाविषयी सू फॉक्स या लेखिकेने असे लिहिले: “शिष्टाचाराचे नियम केव्हा पाळावेत व केव्हा पाळू नयेत ही वैयक्‍तिक निवडीची बाब नाही. आपण ते नेहमीच पाळले पाहिजेत. सभ्यतेने वागल्याने केव्हाही चांगलेच परिणाम घडून येतात.” लोक सभ्यपणे वागण्याची स्वतःला सवय लावून घेतात, तेव्हा इतरांसोबतच्या समस्या कमी होतात आणि कधीकधी तर पूर्णपणे नाहीशाही होतात. या उलट, असभ्यपणे वागल्यास मतभेद, संताप व नाराजी निर्माण होते.

खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीचे सदस्य सहसा उत्तम शिष्टाचार पाळतात. पण आज जगात मात्र असभ्य, बेशिस्त वागणूक सर्रास पाहायला मिळते. त्यामुळे, आपल्यामध्ये या वाईट सवयी येऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. सौजन्याने वागण्याच्या बाबतीत बायबलमधील तत्त्वे लागू केल्याने कशा प्रकारे आपले संरक्षण होते आणि खऱ्‍या उपासनेकडे लोक आकर्षित होतात ते आपण पाहू या. सभ्यपणे वागणे म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी यहोवा देवाचे आणि त्याच्या पुत्राचे उदाहरण विचारात घ्या.

यहोवा आणि त्याचा पुत्र —सौजन्याची उत्तम उदाहरणे

३. सौजन्याच्या बाबतीत यहोवा देवाने कोणते उदाहरण मांडले?

यहोवा देव सौजन्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सबंध विश्‍वाचा सार्वभौम अधिपती असूनही तो मानवांशी अतिशय प्रेमळपणे व आदराने वागतो. बायबलच्या मूळ लेखांनुसार, यहोवा देवाने अब्राहाम आणि मोशे या दोघांशी बोलताना “कृपया” या अर्थाचा एक इब्री शब्द वापरला होता. (उत्प. १३:१४; निर्ग. ४:६) यहोवा ‘सदय व कृपाळू; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्‍न आहे.’ त्याचे सेवक चुका करतात तेव्हा तो त्यांच्याशी दयाळूपणे व्यवहार करतो. (स्तो. ८६:१५) इतर जण आपल्या अपेक्षेप्रमाणे न वागल्यास काही जण रागाने भडकतात. पण यहोवा अशा लोकांपेक्षा फार वेगळा आहे.

४. इतर जण आपल्याशी बोलतात तेव्हा आपण कशा प्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतो?

देव ज्या प्रकारे मानवांचे ऐकतो त्यातूनसुद्धा त्याचा सभ्यपणा दिसून येतो. सदोमच्या लोकांबद्दल अब्राहामाने देवाला प्रश्‍न विचारले, तेव्हा यहोवाने त्याच्या एकेक प्रश्‍नाचे अगदी धीराने उत्तर दिले. (उत्प. १८:२३-३२) अब्राहाम उगाच माझा वेळ वाया घालवत आहे असा यहोवाने विचार केला नाही. यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि पश्‍चात्तापी जनांच्या कळकळीच्या याचनांकडे तो कान लावतो. (स्तोत्र ५१:११, १७ वाचा.) तर मग, इतर जण आपल्याशी बोलतात तेव्हा आपणही यहोवाप्रमाणेच त्यांचे ऐकून घेण्यास तयार असू नये का?

५. येशूने दाखवलेल्या सौजन्याचे अनुकरण केल्याने कशा प्रकारे इतरांसोबतचे आपले नातेसंबंध सुधारतात?

येशू आपल्या पित्याकडून बऱ्‍याच गोष्टी शिकला. त्यांपैकी एक आहे सौजन्यशील असणे. येशूला त्याच्या सेवा कार्यात बराच वेळ व शक्‍ती खर्च करावी लागत असली, तरी तो नेहमी इतरांशी अत्यंत धीराने व प्रेमाने वागला. लकवा मारलेल्यांना, भीक मागण्याची वेळ आलेल्या अंधळ्यांना आणि इतर गरजू लोकांना मदत करण्यास तो नेहमी उत्सुक होता. लोक त्याच्याकडे पूर्वानुमती न घेता आले, तरी त्याने कधीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही. दुःखी, लाचार व्यक्‍तींना मदत करण्यासाठी कधीकधी तो हातातले काम बाजूला ठेवायचा. त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांची त्याने विशेष दखल घेतली. (मार्क ५:३०-३४; लूक १८:३५-४१) ख्रिस्ती या नात्याने, प्रेमळ असण्याद्वारे व इतर लोकांना साहाय्य करण्याद्वारे आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. अशा प्रकारची वागणूक आपल्या नातेवाइकांच्या, शेजाऱ्‍यांच्या आणि इतर लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. शिवाय, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे यहोवाची स्तुती तर होतेच, पण आपल्यालाही आनंद होतो.

६. आपुलकी आणि मैत्रीभाव दाखवण्याच्या बाबतीत येशूने कोणते उदाहरण मांडले?

तसेच, येशूने लोकांना त्यांच्या नावाने संबोधून त्यांच्याबद्दल आदर दाखवला. पण, यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी लोकांना अशा प्रकारे आदर दिला का? नाही. उलट, नियमशास्त्र माहीत नसलेल्या लोकांना “शापित” समजून त्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली. (योहा. ७:४९) देवाच्या पुत्राने मात्र लोकांना अशा प्रकारची वागणूक दिली नाही. मार्था, मरीया, जक्कय आणि इतर कित्येकांना त्याने नावाने हाक मारली. (लूक १०:४१, ४२; १९:५) संस्कृती व परिस्थितीनुसार लोकांना संबोधण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली, तरी यहोवाचे सेवक इतरांशी आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करतात. * उच्च-नीच असा भेदभाव न करता, ते आपल्या सहविश्‍वासू बांधवांना व इतरांना योग्य आदर देतात.याकोब २:१-४ वाचा.

७. सर्व संस्कृतींतील लोकांशी सौजन्याने वागण्यास बायबलची तत्त्वे कशा प्रकारे आपल्याला साहाय्यक ठरू शकतात?

देव आणि त्याचा पुत्र सर्व राष्ट्रांच्या व संस्कृतींच्या लोकांना ज्या प्रकारे सभ्यतेने वागवतात त्यातून त्या सर्वांप्रती त्यांना आदर आहे हे दिसून येते. आणि त्यामुळे योग्य मनोवृत्ती असलेले लोक सत्याकडे आकर्षित होतात. अर्थातच, शिष्टाचाराचे नियम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे, आपण याबाबतीत कोणत्याही काटेकोर नियमांचे पालन करत नाही. उलट, बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून आपण सर्वच संस्कृतींतील लोकांना आदर दाखवण्याचा प्रयत्न करतो. लोकांशी सौजन्याने वागल्याने, सेवा कार्यात आपण कशा प्रकारे अधिक परिणामकारक होऊ शकतो हे आता आपण पाहू या.

लोकांना अभिवादन करणे आणि त्यांच्याशी बोलणे

८, ९. (क) कशा प्रकारची सवय असभ्यतेचे लक्षण आहे? (ख) इतरांशी वागताना आपण मत्तय ५:४७ मधील येशूचा सल्ला का लक्षात ठेवला पाहिजे?

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, बरेचदा दोन व्यक्‍ती एकमेकांच्या जवळून जातात, पण एकमेकांना “हॅलो,” “नमस्ते” किंवा “कसं काय?” देखील म्हणत नाहीत. अर्थातच, वर्दळीच्या रस्त्यावरून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येकाशी आपण बोलावे अशी साहजिकच कोणी अपेक्षा करणार नाही. पण, अनेक प्रसंगी इतरांना अभिवादन करणे उचित आणि चांगले समजले जाते. लोकांना अभिवादन करण्याची तुम्हाला सवय आहे का? की स्मितहास्य न करता किंवा साधा शब्दही न बोलता तुम्ही निघून जाता? वाईट हेतू नसतानाही, एका व्यक्‍तीला नकळत अशा प्रकारची सवय लागू शकते जी खरेतर असभ्यतेचे लक्षण आहे.

येशूने एका महत्त्वाच्या तथ्याची आपल्याला आठवण करून दिली. त्याने म्हटले: “तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयहि तसेच करितात ना?” (मत्त. ५:४७) या बाबतीत डॉनल्ड वाईस या सल्लागाराने असे लिहिले: “एखाद्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केल्यास त्यास चीड येते. अशा प्रकारे दुर्लक्ष झालेल्यांना कसलीही सबब दिली तरी त्यांची समजूत काढता येणार नाही. यावर साधासोपा उपाय म्हणजे लोकांना अभिवादन करा. त्यांच्याशी बोला.” आपल्या तुटक वागणुकीचा किंवा उदासीन वृत्तीचा इतरांसोबतच्या आपल्या संबंधावर प्रभाव पडू न दिल्यास, इतरांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यास आपल्याला मदत होईल.

१०. सेवा कार्यात यशस्वी होण्यास सभ्य वर्तन कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकते? (“हसतमुखाने संभाषण सुरू करा,” असे शीर्षक असलेली चौकट पाहा.)

१० उत्तर अमेरिकेतील एका मोठ्या शहरात राहणाऱ्‍या टॉम आणि कॅरल या ख्रिस्ती जोडप्याचे उदाहरण पाहा. आपल्या शेजाऱ्‍यांशी मैत्रीपूर्ण संभाषण करणे हा त्यांच्या सेवा कार्याचा एक भागच बनला आहे. त्यांना हे कसे जमते? याकोब ३:१८ चा उल्लेख करून टॉम म्हणतो: “आम्ही लोकांशी मैत्रीपूर्ण व शांतीपूर्ण असण्याचा प्रयत्न करतो. जे लोक आपल्या घराबाहेर उभे असलेले दिसतात त्यांच्याशी आणि आसपास काम करणाऱ्‍या इतर लोकांशी आम्ही बोलतो. आम्ही त्यांना हसून अभिवादन करतो. त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आम्ही त्यांच्याशी बोलतो, जसे की त्यांची मुले, त्यांची कुत्री, त्यांचे घर, नोकरी इत्यादी. काही काळाने आमची मैत्री वाढते.” पुढे कॅरल म्हणते: “नंतरच्या भेटीत आम्ही नाव सांगून एकमेकांची ओळख करून घेतो. आमच्या कार्याविषयी त्यांना थोडक्यात सांगतो. कालांतराने, त्यांना साक्ष देणे आम्हाला शक्य होते.” टॉम व कॅरल यांनी अशा प्रकारे अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांनी बायबल आधारित प्रकाशने स्वीकारली आहेत आणि सत्याविषयी शिकण्याबद्दल काही जणांनी आवड दाखवली आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही सौजन्याने वागणे

११, १२. सुवार्तेचा प्रचार करते वेळी आपण वाईट वागणुकीची अपेक्षा का करू शकतो आणि आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

११ सुवार्तेचा प्रचार करताना कधीकधी आपल्याला लोकांच्या असभ्य वागणुकीला तोंड द्यावे लागते. हे अपेक्षितच आहे, कारण येशूने आपल्या शिष्यांना याची पूर्वसूचना दिली होती. त्याने म्हटले: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहा. १५:२०) लोक आपल्याशी अपमानास्पद रीतीने बोलतात तेव्हा आपणही त्यांच्याशी तशाच प्रकारे बोलल्यास त्यातून काहीही चांगले निष्पन्‍न होणार नाही. मग, अशा वेळी आपण कशा प्रकारे वागले पाहिजे? प्रेषित पेत्राने असे लिहिले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) आपण सौजन्याने—सौम्यतेने आणि आदराने वागल्यास—आपला अपमान करणाऱ्‍यांच्या मनोवृत्तीत बदल घडून येऊ शकतो.—तीत २:७, ८.

१२ लोक आपला अपमान करतात, तेव्हा देखील देवाला आवडेल अशा प्रकारे त्यास तोंड देण्यास आपण आधीपासूनच स्वतःला तयार करू शकतो का? हो, निश्‍चितच करू शकतो. पौलाने असा सल्ला दिला: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सै. ४:६) आपण कुटुंबातील सदस्यांशी, शाळासोबत्यांशी, सहकर्मींशी, मंडळीतील बंधूभगिनींशी आणि शेजाऱ्‍यांशी नेहमी सौजन्याने वागल्यास, आपली थट्टा किंवा अपमान केला जातो तेव्हा एका ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभेल अशा प्रकारे आपल्याला त्यास तोंड देता येईल.रोमकर १२:१७-२१ वाचा.

१३. सभ्यपणे वागल्याने कशा प्रकारे विरोधकांच्या मनोवृत्तीत बदल घडून येतो याचे एक उदाहरण द्या.

१३ प्रतिकूल परिस्थितीतही सभ्यतेने वागल्यास, चांगले परिणाम घडून येतात. उदाहरणार्थ, जपानमध्ये एका घरमालकाने व त्याच्या पाहुण्याने एका बांधवाची थट्टा केली. तो बांधव विनम्रपणे तेथून निघून गेला. त्याच क्षेत्रात प्रचार करत असताना, त्या घरमालकाचा पाहुणा काही अंतरावरून आपल्याला पाहत असल्याचे बांधवाच्या लक्षात आले. बांधव त्याच्याजवळ गेला, तेव्हा त्या माणसाने म्हटले: “मघाशी जे घडलं त्याबद्दल क्षमा करा. आम्ही तुम्हाला नको ते बोललो तरी तुम्ही चेहऱ्‍यावर जराही राग येऊ दिला नाही. मलाही तुमच्यासारखं व्हायला आवडेल. यासाठी मला काय करावं लागेल?” त्या माणसाची नोकरी गेल्यामुळे आणि अलीकडेच त्याची आई मरण पावल्यामुळे तो अतिशय निराश झाला होता. बांधवाने त्याला बायबल अभ्यासाविषयी सांगितले, तेव्हा त्याने तो लगेच स्वीकारला. लवकरच तो आठवड्यातून दोनदा अभ्यास करू लागला.

सभ्यपणा विकसित करण्याचा उत्तम मार्ग

१४, १५. बायबल काळातील यहोवाच्या सेवकांनी आपल्या मुलांना कशा प्रकारचे शिक्षण दिले?

१४ बायबल काळातील देवभीरू आईवडील आपल्या मुलांना घरातच शिष्टाचाराचे साधे नियम पाळण्याची सवय लावायचे. उत्पत्ति २२:७ मध्ये, अब्राहाम व त्याचा पुत्र इसहाक एकमेकांशी कशा प्रकारे प्रेमळ, विनयशील पद्धतीने बोलले याकडे लक्ष द्या. योसेफावरही त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते. म्हणूनच, तुरुंगात असताना तो इतर कैद्यांशीही सौजन्याने वागला. (उत्प. ४०:१४) योसेफाने फारोला संबोधलेल्या शब्दांतून दिसून येते, की उच्च पदावर असलेल्या व्यक्‍तीला उचित रीत्या कसे संबोधावे हे त्याला माहीत होते.—उत्प. ४१:१६, ३३, ३४.

१५ इस्राएल लोकांना देण्यात आलेल्या दहा आज्ञांत या आज्ञेचा समावेश होता: “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्‍वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.” (निर्ग. २०:१२) मुलांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणजे घरात सभ्यपणे वागणे. इफ्ताहाच्या मुलीने अतिशय कठीण परिस्थितीतही आपल्या वडिलाने केलेल्या नवसाचे पालन करण्याद्वारे त्यांच्याबद्दल तिला किती आदर होता हे दाखवले.—शास्ते ११:३५-४०.

१६-१८. (क) मुलांना सभ्यतेने वागण्यास शिकवण्यासाठी काय करता येईल? (ख) मुलांना सभ्यतेने वागण्यास शिकवण्याचे कोणकोणते फायदे आहेत?

१६ मुलांना सभ्यपणे वागायला शिकवणे किती महत्त्वाचे आहे यावर कितीही भर दिला तरी तो कमीच आहे. घरी आलेल्या पाहुण्यांशी कसे बोलावे, फोनवर दुसऱ्‍यांशी कसे बोलावे, तसेच इतरांसोबत बसून जेवताना कसे वागावे हे मुलांना शिकवले पाहिजे. या सर्व गोष्टींचा भविष्यातही मुलांना फायदा होईल. नेहमी स्वतःच पुढे जाण्याची घाई न करता इतरांसाठी थांबणे, वृद्ध आणि आजारी लोकांसोबत प्रेमळपणे वागणे, जड सामान उचलण्यासाठी इतरांना मदत करणे का महत्त्वाचे आहे हे आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. तसेच, “कृपा करून,” “आभारी आहे,” “मी काही मदत करू का?” आणि “क्षमा करा” असे मनापासून म्हणणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना समजणे अत्यंत आवश्‍यक आहे.

१७ मुलांना सौजन्याने वागण्यास शिकवणे कठीण नाही. असे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यापुढे चांगले उदाहरण मांडणे. पंचवीस वर्षांचा कर्ट व त्याचे तीन भाऊ कशा प्रकारे सभ्यपणे वागण्यास शिकले याबद्दल कर्ट असे सांगतो: “आईबाबा एकमेकांशी किती प्रेमळपणे बोलायचे आणि इतरांशीही किती सहनशीलतेने व विचारपूर्वक वागायचे हे आम्ही पाहायचो, ऐकायचो. राज्य सभागृहात सभांच्या आधी व नंतर बाबा मला सोबत घेऊन वयस्क बंधुभगिनींजवळ जायचे व त्यांच्याशी बोलायचे. ते कशा प्रकारे त्यांना अभिवादन करायचे आणि त्यांच्याशी आदरपूर्वक बोलायचे हे मी ऐकलं व पाहिलं होतं.” कर्ट पुढे म्हणतो: “त्यांचे हे गुण आपोआपच माझ्यात येत गेले. हळूहळू, सौजन्याने वागणं हे आपल्याला अगदी सहजासहजी जमू लागतं. मग आपण केवळ आपल्याकडून अपेक्षित आहे म्हणून नव्हे, तर आपली मनापासून इच्छा असल्यामुळे सभ्यपणे वागू लागतो.”

१८ आईवडिलांनी आपल्या मुलांना सभ्यपणे वागण्यास शिकवल्यास काय परिणाम होऊ शकतो? यामुळे मुलांना इतरांशी मैत्री करणे आणि शांतीपूर्ण संबंध कायम राखणे शक्य होईल. आपल्या मालकांशी व सोबत काम करणाऱ्‍यांशीही चांगले संबंध राखणे त्यांना शक्य होईल. शिवाय, सौजन्याने व सरळतेने वागणाऱ्‍या मुलांमुळे आईवडिलांना आनंद व समाधान प्राप्त होईल.नीतिसूत्रे २३:२४, २५ वाचा.

सौजन्याने वागल्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरतो

१९, २०. आपण आपला सौजन्यशील देव यहोवा आणि त्याचा पुत्र यांचे अनुकरण करण्याचा निर्धार का केला पाहिजे?

१९ पौलाने असे लिहिले: “देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिस. ५:१) यहोवा देव आणि त्याच्या पुत्राचे अनुकरण करण्यात बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचा समावेश होतो. त्यांपैकी काही तत्त्वे काय आहेत हे आपण या लेखात पाहिले आहे. त्यांचे पालन केल्यास, केवळ अधिकार पदावर असलेल्या लोकांना खूष करण्यासाठी किंवा स्वार्थी हेतू साधण्यासाठी सौजन्याने वागण्याचा ढोंगीपणा आपण करणार नाही.—यहू. १६.

२० सभ्यपणे वागण्याबद्दल यहोवाने स्थापित केलेल्या स्तरांना मिटवून टाकण्यासाठी सैतान आपल्या दुष्ट शासनाच्या शेवटल्या काळात हरतऱ्‍हेने प्रयत्न करत आहे. पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सभ्यतेने वागण्यापासून परावृत्त करण्यात त्याला यश येणार नाही. तर मग, आपण सर्व जण आपल्या सौजन्यशील यहोवा देवाचे आणि त्याच्या पुत्राचे अनुकरण करण्याचा निर्धार करू या. असे केल्यास, आपले वागणे-बोलणे जगातील असभ्य आचारविचारांनुसार वागणाऱ्‍यांपेक्षा नेहमीच वेगळे असेल. यामुळे, आपला सौजन्यशील देव यहोवा, याच्या नावाची स्तुती होईल आणि प्रामाणिक लोक खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित होतील.

[तळटीप]

^ परि. 6 काही संस्कृतींमध्ये, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांना त्यांच्या परवानगीशिवाय नावाने संबोधित करणे असभ्यतेचे लक्षण मानले जाते. ख्रिश्‍चनांनी अशा प्रकारच्या रीतीरिवाजांचा आदर केला पाहिजे.

तुम्हाला आठवते का?

• सौजन्याने वागण्याबद्दल यहोवाकडून व त्याच्या पुत्राकडून आपण काय शिकू शकतो?

• हसतमुखाने लोकांना अभिवादन केल्याने ख्रिस्ती या नात्याने आपल्याविषयी काय दिसून येते?

• सौजन्याने वागल्याने सेवा कार्यात चांगले परिणाम प्राप्त करण्यास कशा प्रकारे साहाय्य होईल?

• सभ्यपणे वागण्याबद्दल आपल्या मुलांना शिकवण्यात आईवडिलांची काय भूमिका आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चौकट]

हसतमुखाने संभाषण सुरू करा

एखाद्या अनोळखी व्यक्‍तीसोबत बोलण्यास लोक इतक्या सहजासहजी तयार होत नाहीत. पण, देवावर व आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार, इतरांना बायबलमधील सत्यांविषयी सांगण्याकरता चांगल्या प्रकारे संभाषण करण्यास शिकून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतात. या बाबतीत सुधारणा करण्यास कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल?

फिलिप्पैकर २:४ मध्ये एक महत्त्वाचे तत्त्व दिले आहे. तेथे असे म्हटले आहे: “तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” हे शब्द लक्षात ठेवून असा विचार करा: ज्या व्यक्‍तीला तुम्ही कधीच भेटला नाहीत, तिच्यासाठी तुम्ही अगदीच अनोळखी असता. मग, तिच्या मनात तुमच्याविषयी असलेली भीती, शंका तुम्ही कशी दूर करू शकता? हसतमुखाने अभिवादन करणे साहाय्यक ठरू शकते. पण, आणखीही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

तुम्ही एखाद्या व्यक्‍तीशी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कदाचित तुम्ही तिच्या विचारप्रक्रियेत अडथळा निर्माण केला असेल. त्या व्यक्‍तीच्या मनात काय चालले आहे याबद्दल जराही कदर न बाळगता तुम्ही आपले विचार सांगण्याचा प्रयत्न केल्यास, ती व्यक्‍ती कदाचित तुमचे ऐकून घेण्यास तयार होणार नाही. म्हणून, तिच्या मनात कोणते विचार असतील हे जाणून घेणे शक्य झाल्यास, त्या आधारावर तुम्हाला तिच्यासोबत संभाषण सुरू करता येईल का? येशू शोमरोनातील एका विहिरीजवळ एका स्त्रीला भेटला तेव्हा त्याने हेच केले. (योहा. ४:७-२६) ती स्त्री विहिरीतून पाणी काढण्याविषयी विचार करत होती. याच गोष्टीचा आधार घेऊन येशूने तिच्याशी संभाषण सुरू केले आणि लवकरच आपली चर्चा आध्यात्मिक गोष्टींकडे वळवली.

[२६ पानांवरील चित्रे]

इतरांशी मैत्रीपूर्ण असल्याने, आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे साक्ष देता येईल

[२८ पानांवरील चित्र]

सभ्यपणे वागणे नेहमीच योग्य आहे