व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बंधुप्रेमात वाढत जा

बंधुप्रेमात वाढत जा

बंधुप्रेमात वाढत जा

‘ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली, त्याप्रमाणे तुम्हीहि प्रीतीने चाला.’—इफिस. ५:२.

१. येशूने आपल्या अनुयायांच्या कोणत्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याकडे लक्ष वेधले?

यहोवाच्या साक्षीदारांना सबंध जगभरात, घरोघरी जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते. पण, ख्रिस्त येशूने आपल्या खऱ्‍या अनुयायांचे ओळखचिन्ह सांगताना ख्रिस्ती विश्‍वासाच्या एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधले. त्याने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहा. १३:३४, ३५.

२, ३. आपल्यातील बंधुप्रेम पाहून ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणाऱ्‍या लोकांच्या मनावर कोणता परिणाम होतो?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये जे प्रेम आहे, त्याच्या तोडीचे दुसरे कोणतेही उदाहरण जगात सापडणार नाही. ज्या प्रकारे एक चुंबक लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करते, त्याच प्रकारे यहोवाचे सेवक आपसातील प्रेमामुळे एकत्र येतात व यामुळे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित होतात. कॅमेरून येथील मार्सेलीनोचे उदाहरण पाहा. कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात त्याने आपली दृष्टी गमावली. या दुर्घटनेनंतर लोकांनी अशी अफवा पसरवली, की तो मंत्रतंत्र करत असल्यामुळे अंधळा झाला होता. त्याच्या चर्चच्या पाळकाने व इतर सदस्यांनी त्याचे सांत्वन करण्याऐवजी त्याला बहिष्कृत केले. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाने मार्सेलीनोला त्यांच्या सभेला येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. त्याला स्वतःचा आणखी अपमान करून घ्यायचा नव्हता.

पण, राज्य सभागृहात त्याला जो अनुभव आला त्यामुळे तो आश्‍चर्यचकित झाला. तेथे सर्वांनी मोठ्या उत्साहाने व प्रेमळपणे त्याचे स्वागत केले. तसेच बायबलमधील ज्या शिकवणींविषयी त्याला तेथे ऐकायला मिळाले त्यांमुळे त्याच्या मनाला खूप दिलासा मिळाला. तेव्हापासून तो सर्व सभांना उपस्थित राहू लागला, त्याने बायबलच्या ज्ञानात प्रगती केली आणि २००६ साली त्याचा बाप्तिस्मा झाला. आज तो आपल्या कुटुंबीयांना तसेच शेजाऱ्‍यांना बायबलमधील सत्याविषयी सांगतो. त्याने अनेक बायबल अभ्यास देखील सुरू केले आहेत. मार्सेलिनोची इच्छा आहे की देवाच्या लोकांत त्याला स्वतःला जे प्रेम अनुभवण्यास मिळाले, तेच प्रेम त्याच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तींनाही अनुभवायला मिळावे.

४. “प्रीतीने चाला” या पौलाच्या सल्ल्याकडे आपण गांभीर्याने लक्ष का दिले पाहिजे?

पण अनेकांना देवाच्या लोकांकडे आकर्षित करणारे हे बंधुप्रेम आपल्या सर्वांच्या योगदानाशिवाय शक्य नाही. उदाहरणार्थ, थंडीच्या दिवसांत शेकोटी पेटवली की ऊब घेण्यासाठी लोक आपोआपच त्या शेकोटीजवळ येतात. पण जर त्यांनी शेकोटीत सरपण घातले नाही तर लवकरच ती विझून जाईल. त्याच प्रकारे, आपण प्रत्येकाने ख्रिस्ती प्रेमाचे अनोखे बंधन आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ते कमकुवत होऊ शकते. तर मग, हे बंधन आणखी घट्ट होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? प्रेषित पौल याचे उत्तर देतो: “ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीहि प्रीतीने चाला.” (इफिस. ५:२) तेव्हा, आपण स्वतःला असा प्रश्‍न विचारला पाहिजे, की प्रीतीने चालत राहण्यासाठी मला काय करता येईल?

‘तुम्हीही आपली अंतःकरणे विशाल करा’

५, ६. पौलाने करिंथच्या ख्रिश्‍चनांना ‘अंतःकरणे विशाल करण्याचा’ आर्जव का केला?

करिंथच्या प्राचीन शहरात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने असे लिहिले: “अहो करिंथकरांनो, तुम्हाबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. संकुचित अंतःकरणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंतःकरणे संकुचित आहेत, आमचे नाही. तेव्हा तुम्हाला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीहि आमची परतफेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विशाल करा.” (२ करिंथ. ६:११-१३) पौलाने करिंथकरांना प्रीतीच्या बाबतीत आपली अंतःकरणे विशाल करण्याचा आर्जव का केला?

प्राचीन करिंथ शहरातील मंडळीची सुरुवात कशी झाली होती ते पाहा. सा.यु. ५० साली प्रेषित पौल करिंथ शहरात आला. सुरुवातीला त्याच्या प्रचार कार्यात बऱ्‍याच अडचणी आल्या. तरीसुद्धा, त्याने हार मानली नाही. परिणामस्वरूप, काही काळातच अनेकांनी ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार केला. या नव्या मंडळीला शिकवण्याच्या व बळकट करण्याच्या कार्यात पौलाने ‘दीड वर्षापर्यंत’ स्वतःला अक्षरशः झोकून दिले. यावरून, करिंथमधील बांधवांविषयी त्याला किती प्रेम होते हे दिसून येते. (प्रे. कृत्ये १८:५, ६, ९-११) त्याअर्थी, तेथील बांधवांनाही त्याच्याविषयी प्रेम व आदर वाटायला हवा होता. पण, त्याऐवजी या मंडळीतील काही जण त्याच्यापासून दूर गेले. कदाचित त्याने दिलेला सडेतोड सल्ला काहींना पटला नसावा. (१ करिंथ. ५:१-५; ६:१-१०) किंवा काहींनी ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांच्या’ खोट्या प्रचारावर विश्‍वास ठेवला असावा. (२ करिंथ. ११:५, ६) पण आपल्या सर्व बंधुभगिनींनी आपल्यावर मनापासून प्रेम करावे अशी पौलाची इच्छा होती. म्हणूनच त्याला व इतर सहउपासकांना जवळ करण्याद्वारे आपले ‘अंतःकरण विशाल करावे’ असा त्याने बांधवांना सल्ला दिला.

७. बंधुप्रेम दाखवण्याच्या बाबतीत आपण कशा प्रकारे आपली ‘अंतःकरणे विशाल करू’ शकतो?

आज आपल्याबाबत काय? बंधुप्रेम दाखवण्याच्या बाबतीत आपण कशा प्रकारे आपले ‘अंतःकरण विशाल करू’ शकतो? सारख्याच वयाचे किंवा सारख्याच सांस्कृतिक पार्श्‍वभूमीचे लोक सहसा एकमेकांकडे अगदी सहजासहजी आकर्षित होतात. तसेच, मनोरंजनाच्या बाबतीत एकसारख्या आवडीनिवडी असलेले सहसा एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवतात. पण जर सारख्या आवडीनिवडी किंवा पार्श्‍वभूमीमुळे आपण काही बांधवांच्या जवळ जाऊन इतरांपासून दूर राहात असू, तर मग आपण आपले ‘अंतःकरण विशाल करण्याची’ गरज आहे. आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘मला जे जवळचे वाटतात त्यांच्याव्यतिरिक्‍त मी इतरांसोबत सेवाकार्याला जाण्याचे किंवा इतर प्रसंगी वेळ घालवण्याचे टाळतो का? राज्य सभागृहात मी नव्यानेच सभांना येऊ लागलेल्यांशी जास्त बोलण्याचे टाळतो का? या लोकांना हळूहळू माझी मैत्री मिळवावी लागेल असा मी विचार करतो का? मी मंडळीतल्या वयस्कांसोबतच लहान मुलांशीही भेटून बोलतो का?’

८, ९. बंधुप्रेम वाढेल अशा प्रकारे एकमेकांचे स्वागत करण्यासाठी रोमकर १५:७ मध्ये नमूद असलेल्या पौलाच्या सल्ल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होईल?

पौलाने रोमकरांना लिहिलेले शब्द आपल्याला आपल्या बांधवांप्रती उचित दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. (रोमकर १५:७ वाचा.) या वचनात “स्वीकार” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “प्रेमळपणे व आतिथ्याने एखाद्याचा आपल्या सहवासात व मित्रपरिवारात स्वीकार करणे” असा होतो. बायबलच्या काळात एक आतिथ्यशील व्यक्‍ती आपल्या घरी आलेल्या मित्रांचे स्वागत करताना, त्यांना पाहून आपल्याला किती आनंद झाला आहे हे व्यक्‍त करत असे. लाक्षणिक रीत्या ख्रिस्ताने आपले अशाच प्रकारे स्वागत केले आहे आणि आपल्यालाही आपल्या सहविश्‍वासू बांधवांचे स्वागत करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे.

राज्य सभागृहात किंवा इतर ठिकाणी आपल्या बांधवांशी भेटताना-बोलताना, आपण अलीकडे ज्यांना भेटलो नाही किंवा ज्यांच्याशी बोललो नाही अशांकडे आपण विशेष लक्ष देऊ शकतो. काही मिनिटे त्यांच्यासोबत घालवण्यास काय हरकत आहे? मग पुढच्या सभेत हीच गोष्ट तुम्ही दुसऱ्‍या बांधवांच्या बाबतीत करू शकता. असे केल्यास, काही काळातच आपल्या सर्व बंधुभगिनींशी बोलणे आपल्याला शक्य होईल. एकाच दिवशी सर्वांशी बोलता आले नाही तरी काळजीचे कारण नाही. आणि एखाद्याशी प्रत्येक सभेत आपल्याला भेटून बोलता आले नाही तरी त्याने ही गोष्ट मनाला लावून घेण्याचे कारण नाही.

१०. मंडळीतील सर्वांजवळ कोणती उत्तम संधी आहे आणि आपण या संधीचा पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो?

१० इतरांना भेटल्यावर त्यांना अभिवादन करणे हे त्यांचे स्वागत करण्याचे पहिले पाऊल आहे. असे केल्यामुळे आपल्याला आनंददायक संभाषणे व टिकणारे मैत्रीसंबंध अनुभवणे शक्य होईल. उदाहरणार्थ, अधिवेशनांना, संमेलनांना उपस्थित राहणारे एकमेकांची ओळख करून घेतात व एकमेकांशी बोलतात तेव्हा ते पुन्हा भेटण्याची वाट पाहतात. तसेच, राज्य सभागृह बांधकाम व मदत कार्याच्या प्रकल्पांवर काम करणारे स्वयंसेवकही एकमेकांचे उत्तम गुण जवळून पाहायला मिळाल्यामुळे व सोबत मिळून काम करताना आलेल्या चांगल्या अनुभवांमुळे एकमेकांचे चांगले मित्र बनतात. खरोखर, यहोवाच्या संघटनेत चांगले मैत्रीसंबंध जोडण्याच्या अनेक संधी आहेत. आपण आपले ‘अंतःकरण विशाल केल्यास’ आपला मित्रपरिवार वाढेल आणि खऱ्‍या उपासनेत आपल्याला एकमेकांशी जोडणारे प्रीतीचे बंधन अधिकाधिक मजबूत होत जाईल.

इतरांना वेळ द्या

११. मार्क १०:१३-१६ मध्ये सांगितल्याप्रमाणे, येशूने कोणते उदाहरण मांडले?

११ आपण सर्व जण येशूसारखी मनमिळाऊ वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करू शकतो. येशूच्या शिष्यांनी त्याच्याजवळ आपल्या मुलांना आणणाऱ्‍या आईवडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” मग त्याने “त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” (मार्क १०:१३-१६) थोर शिक्षकाच्या या प्रेमळ वागणुकीमुळे त्या लहानग्यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा!

१२. कोणत्या गोष्टी संभाषणात बाधा निर्माण करू शकतात?

१२ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘मी इतरांसाठी वेळ देतो का की नेहमीच खूप कामात किंवा घाईत असल्याचे दाखवतो?’ काही सवयी मुळात वाईट नसल्या तरी त्या संभाषणात बाधा निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, चारचौघांत असताना आपण नेहमी मोबाईलवर बोलत असल्यास किंवा इयरफोन्स लावून काहीतरी ऐकत राहिल्यास, आपल्याला त्यांचा सहवास, त्यांची सोबत नकोशी वाटते असे त्यांना वाटू शकते. तसेच, हातात धरता येण्याजोग्या लहानशा कॉम्प्युटरवर काहीतरी पाहण्यात आपण गर्क आहोत असे लोकांना दिसल्यास आपल्याला त्यांच्याशी बोलण्यात काहीच रस नाही असा निष्कर्ष ते काढू शकतात. अर्थात “मौन धरण्याचा समय” असतो. पण आपण इतरांसोबत असतो तेव्हा सहसा तो “बोलण्याचा समय” असतो. (उप. ३:७) काही जण कदाचित म्हणतील, “मला शांतच राहायला आवडतं किंवा सकाळी-सकाळी मला कोणाशी बोलावंसं वाटत नाही.” पण आपली इच्छा नसतानाही आपण आपुलकीने इतरांशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण असे प्रेम दाखवत असतो, जे केवळ स्वतःचा “स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथ. १३:५.

१३. पौलाने तीमथ्याला ख्रिस्ती बंधुभगिनींविषयी कोणता दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला?

१३ वयाने लहान असलेल्या तीमथ्याला पौलाने मंडळीतील सर्वांबद्दल आदर बाळगण्याचा सल्ला दिला. (१ तीमथ्य ५:१, २ वाचा.) आपणही वयस्क बांधवांना आपल्या आईवडिलांप्रमाणे आणि लहानांना आपल्या भावंडांप्रमाणे, जणू ते आपल्याच आईवडिलांची मुले आहेत असे समजले पाहिजे. असा दृष्टिकोन बाळगल्यास आपल्या प्रिय भाऊबहिणींपैकी कोणालाही आपल्या सहवासात परक्यासारखे वाटणार नाही, उलट आपलेपणा जाणवेल.

१४. इतरांशी उभारणीकारक संभाषण केल्यामुळे कोणता फायदा होतो?

१४ आपण इतरांशी संभाषण करून त्यांना प्रोत्साहन देतो तेव्हा त्यांच्या आध्यात्मिक उन्‍नतीस हातभार लावतो व त्यांना भावनिक आधार देतो. एका शाखा कार्यालयात काम करणाऱ्‍या एका बांधवाने सांगितले की त्याने नुकतीच बेथेल सेवा सुरू केली होती, तेव्हा बऱ्‍याच वर्षांपासून बेथेलमध्ये सेवा करणारे अनेक जण वेळात वेळ काढून नियमितपणे त्याची विचारपूस करायचे. त्यांच्या उभारणीकारक शब्दांमुळे आपण खरोखरच बेथेल कुटुंबाचे सदस्य आहोत अशी भावना त्याच्या मनात रुजली. आज तो देखील इतर बेथेल सदस्यांशी बोलण्यासाठी वेळ काढून त्याला प्रोत्साहन देणाऱ्‍या त्या बांधवांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.

नम्रतेमुळे समस्या सोडवण्यास मदत होते

१५. ख्रिस्ती बांधवांमध्येही मतभेद होऊ शकतात हे कशावरून दिसते?

१५ प्राचीन फिलिप्पै शहरात राहणाऱ्‍या युवदीया व सुंतुखे या दोन ख्रिस्ती बहिणींमध्ये कसल्यातरी कारणावरून मतभेद निर्माण झाला होता, जो सोडवणे त्यांना तितके सोपे गेले नाही. (फिलिप्पै. ४:२, ३) तसेच, पौल व बर्णबा यांच्यात झालेला कडाक्याचा वाद बांधवांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि या वादामुळे पौल व बर्णबा काही काळ एकमेकांपासून वेगळे झाले. (प्रे. कृत्ये १५:३७-३९) बायबलमधील या अहवालांवरून दिसून येते की खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कधी मतभेद होणारच नाहीत असे म्हणता येत नाही. पण हे मतभेद सोडवण्यासाठी व आपसांत समेट करण्यासाठी यहोवा आपल्याला मार्गदर्शन पुरवतो. अर्थात, यासोबतच तो आपल्याकडूनही काही अपेक्षा करतो.

१६, १७. (क) वैयक्‍तिक मतभेद मिटवण्यासाठी नम्रता का महत्त्वाची आहे? (ख) एसावाला भेटल्यावर याकोबाने जे केले त्यावरून नम्रतेचे महत्त्व कशा प्रकारे दिसून येते?

१६ तुम्ही आपल्या मित्रासोबत कारने कोठेतरी जायला निघाला आहात अशी कल्पना करा. सर्वप्रथम तुम्हाला चावी लावून कारचे इंजिन सुरू करावे लागेल. त्याच प्रकारे, आपसांत निर्माण होणारे वाद मिटवण्यासाठीही एक गुरुकिल्ली आहे. ती म्हणजे नम्रता. (याकोब ४:१० वाचा.) ही गुरुकिल्ली वापरल्यास आपसांत मतभेद झालेल्या व्यक्‍तींना बायबलच्या तत्त्वांचे पालन करणे शक्य होते. पुढे दिलेल्या बायबलमधील एका उदाहरणावरून हे दिसून येते.

१७ आपला ज्येष्ठत्वाचा हक्क जुळ्या भावाला, याकोबाला मिळाल्यामुळे एसाव त्याच्यावर अतिशय क्रोधित होऊन त्याच्या जिवावर उठला होता. आता जवळजवळ वीस वर्षांनंतर ते दोघे पुन्हा भेटणार होते. त्यामुळे, “याकोब फार भ्याला व चिंतेत पडला.” एसाव नक्कीच आपल्यावर हल्ला करेल असे त्याला वाटत होते. पण, एसावाला भेटल्यावर त्याने जे केले त्याची एसावाने कल्पनाही केली नव्हती. त्याने आपल्या भावाला पाहून “भूमीपर्यंत लवून नमन केले.” पुढे काय झाले? “एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्यास आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.” एक मोठे संकट टळले होते. एसावाच्या मनात वैमनस्याची भावना असली, तरी याकोबाच्या नम्रतेमुळे ती नाहीशी झाली होती.—उत्प. २७:४१; ३२:३-८; ३३:३, ४.

१८, १९. (क) वैयक्‍तिक मतभेद होतात तेव्हा बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणे का गरजेचे आहे? (ख) दुसऱ्‍या व्यक्‍तीने सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही तरीसुद्धा आपण हार का मानू नये?

१८ मतभेद मिटवण्याबद्दल बायबलमध्ये अत्यंत उपयुक्‍त सल्ला देण्यात आला आहे. (मत्त. ५:२३, २४; १८:१५-१७; इफिस. ४:२६, २७) * पण, जोपर्यंत आपण या सल्ल्याचे नम्रपणे पालन करणार नाही तोपर्यंत समेट करणे आपल्याला कठीण वाटेल. नम्रतेची गुरुकिल्ली आपल्याही हातात असताना, आधी दुसऱ्‍या व्यक्‍तीने नम्रता दाखवावी अशी आपण अपेक्षा केल्यास समस्या सुटणार नाही.

१९ मतभेद सोडवण्यासाठी प्रयत्न करूनही काही कारणास्तव सुरुवातीला ते निष्फळ ठरल्यास आपण हार मानू नये. दुसऱ्‍या व्यक्‍तीला स्वतःच्या भावनांचे परीक्षण करण्यास कदाचित काही वेळ लागू शकतो. योसेफाच्या भावांनी त्याचा विश्‍वासघात केला होता. बऱ्‍याच काळानंतर त्यांची भेट झाली, तोपर्यंत योसेफ इजिप्तचा प्रधान मंत्री बनला होता. इतक्या काळानंतर शेवटी त्यांचा हृदयपालट झाला व त्यांनी क्षमेची याचना केली. योसेफाने त्यांना क्षमा केली आणि याकोबाच्या पुत्रांपासून एक मोठे राष्ट्र बनले ज्यास यहोवाचे नाव धारण करण्याचा बहुमान मिळाला. (उत्प. ५०:१५-२१) आपल्या बंधुभगिनींसोबत शांतीचे संबंध राखल्यामुळे आपण मंडळीतील एकता व आनंद टिकवून ठेवण्यास हातभार लावतो.कलस्सैकर ३:१२-१४ वाचा.

आपण “कृतीने व सत्याने” प्रीती करत राहू या

२०, २१. येशूने प्रेषितांचे पाय धुतले, यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

२० येशूने आपल्या मृत्यूच्या थोड्याच काळाआधी प्रेषितांना असे सांगितले: “जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीहि करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.” (योहा. १३:१५) त्याने नुकतेच आपल्या १२ शिष्यांचे पाय धुतले होते. येशूने जे केले तो केवळ एक रिवाज किंवा दयाळू कृत्य नव्हते. पाय धुण्याविषयीचा अहवाल नमूद करण्याआधी योहानाने असे लिहिले: “जगातील स्वकीयांवर [येशूचे] जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.” (योहा. १३:१) त्याअर्थी, शिष्यांबद्दल असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन येशूने त्यांचे पाय धुतले. असे करण्याद्वारे त्याने त्यांच्यासाठी एक अशी सेवा केली जी त्या काळी सहसा दास करत असत. आता येशूप्रमाणे त्यांनीही एकमेकांसाठी अशीच प्रेमळ कृत्ये करायची होती. होय, आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींबद्दल असलेल्या मनःपूर्वक प्रेमाने आपल्याला त्या सर्वांबद्दल आस्था व काळजी व्यक्‍त करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

२१ देवाच्या पुत्राने ज्यांचे पाय धुतले होते, त्यांच्यापैकी एक असलेल्या प्रेषित पेत्राला येशूच्या कृत्याचा खरा अर्थ उमगला होता. त्याने लिहिले: “निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति करा.” (१ पेत्र १:२२) प्रेषित योहान, ज्याचे पाय देखील प्रभू येशूने धुतले होते, त्याने असे लिहिले: “मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” (१ योहा. ३:१८) तेव्हा, आपले बंधुप्रेम कृतींतून व्यक्‍त करण्यास आपली अंतःकरणे आपल्याला सदैव प्रवृत्त करत राहोत.

[तळटीप]

^ परि. 18 आमची राज्य सेवा, जुलै २००७ अंकातील पुरवणी पाहा.

तुम्हाला आठवते का?

• एकमेकांप्रती प्रेम दाखवण्यास आपण कशा प्रकारे आपले ‘अंतःकरण विशाल’ करू शकतो?

• इतरांना वेळ देणे आपल्याला कशामुळे शक्य होईल?

• समस्या सोडवण्यात नम्रतेची काय भूमिका आहे?

• बांधवांबद्दल काळजी व्यक्‍त करण्यास कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती बांधवांचे मनापासून स्वागत करा

[२३ पानांवरील चित्र]

इतरांना वेळ देण्याची संधी मिळाल्यास ती गमावू नका