व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा

बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा

“हे प्रभू, मी विनवणी करितो की तू आपल्या ह्‍या सेवकाच्या प्रार्थनेकडे . . . कान दे.”—नहे. १:११.

१, २. बायबलमध्ये नमूद असलेल्या काही प्रार्थनांचे परीक्षण करणे आपल्याकरता लाभदायक का ठरेल?

प्रार्थना आणि बायबल अभ्यास या दोन्ही गोष्टी खऱ्‍या उपासनेचे प्रमुख भाग आहेत. (१ थेस्सलनी. ५:१७; २ तीम. ३:१६, १७) अर्थात, बायबल हे काही प्रार्थना पुस्तक नव्हे. तरीसुद्धा, त्यामध्ये कितीतरी प्रार्थना नमूद आहेत. यांपैकी अनेक प्रार्थना स्तोत्रसंहिता या पुस्तकात आढळतात.

बायबलचे वाचन किंवा अभ्यास करताना खास तुमच्या परिस्थितीला लागू होतील अशा प्रार्थना कदाचित तुम्हाला आढळतील. खरेतर, शास्त्रवचनांत नमूद असलेल्या प्रार्थनांतील शब्दांचा आपल्या प्रार्थनांमध्ये वापर केल्याने त्या अधिक अर्थपूर्ण बनतात. देवाच्या अनेक सेवकांनी मदतीसाठी त्याला कळकळीने प्रार्थना केली तेव्हा त्याने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांच्याकडून आणि त्यांच्या प्रार्थनांच्या आशयावरून तुम्ही काय शिकू शकता?

देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा व त्याचे पालन करा

३, ४. अब्राहामाच्या सेवकावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि यहोवाने ज्या प्रकारे त्याची मदत केली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला बायबलच्या अभ्यासातून समजेल. कुलपिता अब्राहामाने आपला मुलगा इसहाक याच्यासाठी खऱ्‍या देवाची उपासना करणारी वधू शोधण्यासाठी आपला सर्वात जुना सेवक, बहुधा अलियेजर याला मेसोपोटामियाला पाठवले, तेव्हा काय घडले याचा विचार करा. तेथे स्त्रिया विहिरीतून पाणी भरत असताना त्या सेवकाने अशी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, . . . असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो; यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे.”—उत्प. २४:१२-१४.

रिबकेने अब्राहामाच्या सेवकाच्या उंटांना पाणी पाजले, तेव्हा त्याच्या प्रार्थनेचे उत्तर त्याला मिळाले. नंतर, ती त्या सेवकाबरोबर कनान देशात आली व इसहाकाची प्रिय पत्नी बनली. अर्थातच, देवाने तुम्हाला एखादी विशेष खूण किंवा संकेत द्यावा अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. पण, तुम्ही देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालण्याचा निर्धार केला, तर जीवनात पावलोपावली तो तुमचे मार्गदर्शन करेल.—गलती. ५:१८.

प्रार्थनेमुळे चिंतेचा भार हलका होतो

५, ६. याकोब आणि एसाव यांची भेट होणार होती त्या वेळी याकोबाने केलेल्या प्रार्थनेतील लक्षवेधक गोष्ट कोणती?

प्रार्थनेमुळे आपल्या चिंतांचा भार हलका होऊ शकतो. याकोबाला आपल्या जुळ्या भावाकडून अर्थात एसावाकडून जिवाला धोका असल्याचे जाणवले, तेव्हा त्याने अशी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, . . . तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही; . . . मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करितो; मला भीति वाटते की तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकील. तू मला वचन दिले आहे की, मी तुझे निश्‍चित्‌ कल्याण करीन, आणि तुझी संतति समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”—उत्प. ३२:९-१२.

प्रार्थना केल्यानंतर याकोबाने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आवश्‍यक पावले उचलली आणि त्याचा आपल्या भावाशी समेट झाला तेव्हा त्याला त्याच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले. (उत्प. ३३:१-४) याकोबाने देवाला केलेली ती विनवणी काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या लक्षात येईल, की त्याने केवळ मदतीसाठी याचना केली नाही. तर, प्रतिज्ञात संततीवर त्याचा विश्‍वास असल्याचेही त्याने व्यक्‍त केले आणि देवाच्या प्रेमळ दयेबद्दल आभार मानले. तुमच्याही मनात काही “भीति” आहे का? (२ करिंथ. ७:५) असल्यास, याकोबाची याचना तुम्हाला याची आठवण करून देईल की प्रार्थना केल्याने चिंतांचा भार कमी होऊ शकतो. पण, त्यासाठी प्रार्थनेत केवळ मागण्याच समाविष्ट नसाव्यात तर आपल्या शब्दांतून देवावरील आपला विश्‍वासही व्यक्‍त होणे गरजेचे आहे.

सुज्ञतेसाठी प्रार्थना करा

७. मोशेने यहोवाच्या मार्गांबद्दल ज्ञान मिळण्यासाठी का प्रार्थना केली?

यहोवाला आनंदित करण्याच्या तुमच्या इच्छेमुळे तुम्हाला सुज्ञतेसाठी प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. मोशेने देवाच्या मार्गांचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली. त्याने देवाला अशी विनंती केली: “पाहा, तू मला म्हणतोस की, ह्‍या लोकांना [इजिप्तमधून] घेऊन जा; . . . आता माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास, तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे . . . तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.” (निर्ग. ३३:१२, १३) मोशेला देवाच्या लोकांचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करता यावे म्हणून देवाने त्याला आपले मार्ग आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली. आणि अशा प्रकारे त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले.

८. पहिले राजे ३:७-१४ वर मनन केल्याने तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

दाविदानेही अशी प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव.” (स्तो. २५:४) दाविदाचा पुत्र शलमोन याने इस्राएलचा राज्यकारभार चालवण्याकरता सुबुद्धी देण्याची देवाला विनंती केली. शलमोनाच्या प्रार्थनेमुळे यहोवाला इतका आनंद झाला की त्याने त्याला सुबुद्धीसोबतच धनसंपत्ती व वैभवही दिले. (१ राजे ३:७-१४ वाचा.) मंडळीत तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्‍या तुम्हाला अतिशय कठीण वाटत असल्यास, सुबुद्धीसाठी प्रार्थना करा आणि नम्र मनोवृत्ती दाखवा. असे केल्यास, देव तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्यास मदत करेल व आपल्या जबाबदाऱ्‍या योग्य रीतीने व प्रेमळपणे पार पाडण्याची सुबुद्धी देईल.

मनापासून प्रार्थना करा

९, १०. मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी शलमोनाने प्रार्थनेत वारंवार केलेला मनाचा उल्लेख लक्षवेधक का आहे?

देवाने आपली प्रार्थना ऐकावी अशी आपली इच्छा असल्यास आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे. शलमोनाने सा.यु.पू. १०२६ मध्ये यहोवाच्या मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी जेरूसलेम येथे जमलेल्या लोकसमुदायासमोर कळकळीची प्रार्थना केली, जी १ राजे अध्याय ८ मध्ये नमूद आहे. कराराचा कोश परमपवित्रस्थानात ठेवण्यात आला आणि मंदिर यहोवाच्या मेघाने व्यापले तेव्हा शलमोनाने देवाची स्तुती केली.

१० शलमोनाच्या प्रार्थनेचे परीक्षण करा आणि त्याने किती वेळा या प्रार्थनेत मनाचा उल्लेख केला याची नोंद घ्या. एका व्यक्‍तीच्या मनात काय आहे हे केवळ यहोवालाच माहीत असल्याचे शलमोनाने मान्य केले. (१ राजे ८:३८, ३९) याच प्रार्थनेतून हेही दिसून येते की ‘देवाकडे जिवेभावे [मनापासून] वळणाऱ्‍या’ पापी व्यक्‍तीला यहोवा कधीही झिडकारणार नाही. देवाच्या लोकांच्या शत्रूंनी त्यांना बंदी बनवल्यास, त्यांनी पूर्ण मनाने केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकेल असे शलमोनाने म्हटले. (१ राजे ८:४८, ५८, ६१) म्हणूनच, तुम्ही देवाला संपूर्ण मनाने प्रार्थना केली पाहिजे.

स्तोत्रांचे परीक्षण केल्याने प्रार्थना कशा प्रकारे अर्थपूर्ण बनतील?

११, १२. काही काळासाठी देवाच्या मंदिरात जाता न आल्यामुळे एका लेव्याने ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्‍त केल्या त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

११ स्तोत्रांचे परीक्षण केल्याने आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनू शकतात आणि यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईपर्यंत धीर धरण्यास यामुळे आपल्याला मदत मिळेल. बंदिवासात असलेल्या एका लेव्याने कशा प्रकारे धीर धरला याचे उदाहरण पाहा. काही काळासाठी त्याला यहोवाच्या मंदिरात जाता आले नाही, तरी त्याने असे गायिले: “हे माझ्या जिवा, तू का खिन्‍न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करितो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.”—स्तो. ४२:५, ११; ४३:५.

१२ या लेव्याच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता? तुमच्या ख्रिस्ती विश्‍वासामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागल्यास आणि त्यामुळे काही काळासाठी तुम्हाला आपल्या सहख्रिस्ती बांधवांसोबत उपासनेसाठी एकत्र येणे शक्य नसल्यास, देव तुमच्या वतीने कार्य करेपर्यंत धीराने त्याची आशा बाळगा. (स्तो. ३७:५) गतकाळात तुम्हाला यहोवाच्या सेवेत आलेल्या आनंददायक अनुभवांवर मनन करा आणि आपल्या लोकांसोबत सहवास करण्याची तो तुम्हाला पुन्हा संधी देईपर्यंत ‘आशा धरता’ यावी म्हणून त्याला प्रार्थना करा.

विश्‍वासाने प्रार्थना करा

१३. याकोब १:५-८ मध्ये सांगितल्यानुसार, तुम्ही पूर्ण विश्‍वास बाळगून प्रार्थना का केली पाहिजे?

१३ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागत असले, तरी विश्‍वासाने प्रार्थना करा. देवाप्रती तुमची एकनिष्ठा अजमावणारा प्रसंग तुमच्यासमोर आल्यास, शिष्य याकोबाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करा. प्रार्थनेद्वारे यहोवाजवळ या आणि संकटावर मात करण्यासाठी तो आपल्याला जरूर बुद्धी देईल असा विश्‍वास बाळगा. (याकोब १:५-८ वाचा.) तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांची यहोवाला जाणीव आहे. आणि तो आपल्या आत्म्याद्वारे तुम्हाला मार्ग दाखवेल व तुमचे सांत्वन करेल. तेव्हा, “काही संशय न धरता” पूर्ण विश्‍वासाने देवाजवळ आपले मन मोकळे करा आणि त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन व त्याच्या वचनातील सल्ला स्वीकारा.

१४, १५. हन्‍नाने विश्‍वासाने प्रार्थना केली आणि त्यानुसार कार्य देखील केले असे का म्हणता येईल?

१४ एलकाना नावाच्या एका लेवी पुरुषाच्या दोन पत्नींपैकी एक हन्‍ना हिने पूर्ण विश्‍वासाने प्रार्थना केली आणि त्यानुसार कार्य देखील केले. एलकानाची दुसरी बायको, पनिन्‍ना हिला अनेक मुलेबाळे होती. त्यामुळे ती पुत्रहीन हन्‍नाला नेहमी घालूनपाडून बोलत असे. देवाच्या निवासमंडपात हन्‍नाने नवस केला की तिला मुलगा झाल्यास, ती त्यास देवाला समर्पित करेल. ती प्रार्थना करत असताना तिचे ओठ थरथरत असल्यामुळे, ती दारूच्या नशेत आहे असे मुख्य याजक एली याला वाटले. पण, वास्तविकता लक्षात आल्यावर त्याने म्हटले: “इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” आपल्या प्रार्थनेचे देव नेमके कशा प्रकारे उत्तर देईल हे हन्‍नाला माहीत नव्हते, तरी तो अवश्‍य उत्तर देईल असा तिला विश्‍वास होता. त्यामुळे, “तिचा चेहरा उदास राहिला नाही.”—१ शमु. १:९-१८.

१५ शमुवेल जन्मल्यावर व त्याचे दूध सुटल्यावर, हन्‍नाने त्याला यहोवाची सेवा करण्यास निवासमंडपात नेले. (१ शमु. १:१९-२८) तुम्ही हन्‍नाच्या प्रार्थनेवर मनन करण्यासाठी वेळ काढल्यास, तुम्हालाही अधिक अर्थपूर्ण रीत्या प्रार्थना करण्यास मदत मिळेल. आणि यहोवा आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल या विश्‍वासाने प्रार्थना केल्यास, मन विषण्ण करणाऱ्‍या समस्येवरही मात करणे शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल.—१ शमु. २:१-१०.

१६, १७. नहेम्याने विश्‍वासाने प्रार्थना करून त्यानुसार कार्य केल्यामुळे काय घडले?

१६ सा.यु.पू. पाचव्या शतकातील नीतिमान पुरुष नहेम्या याने विश्‍वासाने प्रार्थना केली आणि त्यानुसार कार्य देखील केले. त्याने देवाला अशी याचना केली: “हे प्रभू, मी विनवणी करितो की तू आपल्या ह्‍या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्‍या मनुष्याची त्याजवर कृपादृष्टि होईल असे कर.” ‘हा मनुष्य’ कोण होता? तो पर्शियन राजा अर्तहशश्‍त होता, ज्याच्या दरबारात नहेम्या प्यालेबरदार होता.—नहे. १:११.

१७ बॅबिलोनच्या बंदिवासातून सुटलेले यहुदी “मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटहि पडला आहे,” हे नहेम्याला समजल्यापासून तो कितीतरी दिवस विश्‍वासाने प्रार्थना करत राहिला. (नहे. १:३, ४) नहेम्याने अपेक्षा देखील केली नव्हती, अशा रीतीने देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. अर्तहशश्‍त राजाने त्याला जेरूसलेमला जाऊन पडलेले तट पुन्हा बांधण्याची परवानगी दिली. (नहे. २:१-८) काही काळातच, तटाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. नहेम्याच्या प्रार्थना खऱ्‍या उपासनेवर केंद्रित असल्यामुळे आणि त्याने पूर्ण विश्‍वासाने प्रार्थना केल्यामुळे देवाने त्या ऐकल्या. तुमच्याही प्रार्थना अशाच असतात का?

उपकारस्तुती करण्यास विसरू नका

१८, १९. कोणत्या कारणांमुळे यहोवाच्या सेवकांनी त्याची उपकारस्तुती केली पाहिजे?

१८ प्रार्थनेत यहोवाची स्तुती करण्यास व त्याचे आभार मानण्यास विसरू नका. आपल्याजवळ यहोवाची उपकारस्तुती करण्याची असंख्य कारणे आहेत. दावीद यहोवाच्या राज्याधिकाराचा महिमा करण्यास उत्सुक होता. (स्तोत्र १४५:१०-१३ वाचा.) तुम्हाला यहोवाच्या राज्याची घोषणा करण्याच्या विशेषाधिकाराबद्दल कदर आहे हे तुमच्या प्रार्थनांतून दिसून येते का? ख्रिस्ती सभांसाठी, संमेलनांसाठी आणि अधिवेशनांसाठीही तुम्ही कृतज्ञ आहात हे मनःपूर्वक प्रार्थनेतून व्यक्‍त करण्यास तुम्हाला स्तोत्रकर्त्यांच्या शब्दांतून मदत मिळेल.—स्तो. २७:४; १२२:१.

१९ देवासोबत असलेल्या तुमच्या मौल्यवान नातेसंबंधाबद्दल तुम्ही कृतज्ञ असल्यास, स्तोत्रांमध्ये व्यक्‍त केलेल्या भावनांप्रमाणे तुम्हाला मनापासून प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळेल: “हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन; कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. हे देवा, आकाशाहून तू उन्‍नत हो; तुझे गौरव सर्व पृथ्वीभर होवो.” (स्तो. ५७:९-११) किती प्रोत्साहनदायक शब्द! स्तोत्रांमधील अशा हृदयस्पर्शी शब्दांमुळे तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडून त्या नक्कीच अधिक अर्थपूर्ण होतील, असे तुम्हाला वाटत नाही का?

आपल्या विनंत्या आदरपूर्वक देवाला कळवा

२०. मरीयेने देवाप्रती आपली भक्‍ती कशा प्रकारे व्यक्‍त केली?

२० तुमच्या प्रार्थनांतून देवाप्रती तुम्हाला आदर असल्याचे दिसून आले पाहिजे. मरीया ही मशीहाची आई होणार हे तिला समजल्यावर तिने उद्‌गारलेले आदरयुक्‍त शब्द, आणि हन्‍नाने शमुवेलाला देवाच्या निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित केले, तेव्हा तिने बोललेले शब्द जवळजवळ सारखेच होते. देवाबद्दल मरीयेला किती आदर होता हे तिच्या पुढील शब्दांतून दिसून येते: “माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे.” (लूक १:४६, ४७) देवभीरू मरीयेला मशीहा येशूची आई होण्यासाठी निवडण्यात आले यात काही नवल आहे का? मरीयेप्रमाणे तुम्हीसुद्धा आदरपूर्वक आपल्या भावना व्यक्‍त करून आपल्या प्रार्थनेचा दर्जा वाढवू शकता का?

२१. येशूने पूर्ण विश्‍वासाने आदरपूर्वक प्रार्थना केली हे कसे दिसून येते?

२१ येशूने पूर्ण विश्‍वासाने आदरपूर्वक देवाला प्रार्थना केली. उदाहरणार्थ, लाजराला पुनरुत्थित करण्याआधी, “येशूने दृष्टि वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो; मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस.” (योहा. ११:४१, ४२) तुमच्या प्रार्थनांतून अशा प्रकारचा आदर व विश्‍वास दिसून येतो का? येशूने आदरपूर्वक केलेल्या आदर्श प्रार्थनेचे परीक्षण केल्यास दिसून येईल, की यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण, त्याचे राज्य येणे आणि त्याची इच्छा पूर्ण होणे हे त्या प्रार्थनेतील काही मुख्य विषय आहेत. (मत्त. ६:९, १०) आता तुमच्या स्वतःच्या प्रार्थनांचा विचार करा. यहोवाचे राज्य येणे, त्याची इच्छा पूर्ण होणे आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण यांविषयी तुम्हाला मनस्वी आस्था असल्याचे तुमच्या प्रार्थनांतून दिसून येते का? तसे दिसून येणे अतिशय महत्त्वाचे आहे.

२२. यहोवा तुम्हाला राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी लागणारे धैर्य पुरवेल ही खातरी तुम्ही का बाळगू शकता?

२२ छळामुळे किंवा इतर परीक्षांमुळे, बरेचदा आपण धैर्याने यहोवाची सेवा करत राहण्यास मदत करण्याची त्याला विनंती करतो. ‘येशूच्या नावाने शिकवू नका,’ असे यहुदी उच्च न्यायालयाने पेत्र व योहान यांना बजावले, तेव्हा त्या प्रेषितांनी तसे करण्यास धैर्याने नकार दिला. (प्रे. कृत्ये ४:१८-२०) त्यांना सोडण्यात आल्यावर, घडलेली सर्व हकीगत त्यांनी आपल्या ख्रिस्ती बांधवांना सांगितली. तेव्हा, उपस्थित असलेल्या सर्वांनी देवाच्या वचनाबद्दल धैर्याने बोलता यावे म्हणून देवाला याचना केली. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! ते सर्व जण “पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” (प्रेषितांची कृत्ये ४:२४-३१ वाचा.) परिणामस्वरूप, अनेक लोक यहोवाचे उपासक बनले. अशाच प्रकारे तुम्हालाही प्रार्थनेमुळे राज्याची सुवार्ता धैर्याने सांगण्यासाठी बळ मिळेल.

आपल्या प्रार्थना अधिकाधिक अर्थपूर्ण बनवण्यास प्रयत्नशील असा

२३, २४. (क) बायबल अभ्यासामुळे तुमच्या प्रार्थना आणखी अर्थपूर्ण होऊ शकतात हे दाखवणारी इतर उदाहरणे सांगा. (ख) आपल्या प्रार्थना अधिकाधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुम्ही काय कराल?

२३ बायबलचे वाचन व अभ्यास यांमुळे तुमच्या प्रार्थना अधिकाधिक अर्थपूर्ण बनू शकतात याची आणखी बरीच उदाहरणे देता येतील. उदाहरणार्थ, योनाप्रमाणे “तारण परमेश्‍वरापासून होते,” असे तुम्ही आपल्या प्रार्थनेत म्हणू शकता. (योना २:१-१०) एखाद्या गंभीर पापामुळे तुम्ही अस्वस्थ असाल आणि तुम्ही त्याबद्दल मंडळीतील वडिलांची मदत घेतली असेल, तर दाविदाने स्तोत्रात आपल्या भावना व्यक्‍त केल्याप्रमाणे, तुम्हीही वैयक्‍तिक प्रार्थनेत पश्‍चात्ताप व्यक्‍त करू शकता. (स्तो. ५१:१-१२) काही प्रार्थनांमध्ये तुम्ही यिर्मयाप्रमाणे यहोवाची स्तुती करू शकता. (यिर्म. ३२:१६-१९) तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल, तर वैयक्‍तिक विनंत्यांसोबतच एज्रा अध्याय ९ मध्ये असलेल्या प्रार्थनेचे परीक्षण केल्यास, “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याद्वारे देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचा तुमचा निर्धार आणखी पक्का होऊ शकतो.—१ करिंथ. ७:३९; एज्रा ९:६, १०-१५.

२४ तेव्हा, बायबलचे वाचन व अभ्यास करत राहा आणि त्यात शोध करत राहा. आपल्या प्रार्थनांमध्ये समावेश करता येतील अशा मुद्द्‌यांची नोंद घ्या. प्रार्थनेत यहोवाला विनंत्या करताना व त्याची उपकारस्तुती करताना तुम्हाला या मुद्द्‌यांचा उपयोग करता येईल. बायबल अभ्यास करण्याद्वारे आपल्या प्रार्थना अधिकाधिक अर्थपूर्ण बनवून तुम्ही निश्‍चितच यहोवा देवाच्या आणखी जवळ याल.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपण देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करून त्याचे पालन का केले पाहिजे?

• सुज्ञता प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करण्यास आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली पाहिजे?

• स्तोत्रसंहितेत नमूद असलेल्या प्रार्थनांमुळे तुमच्या प्रार्थना कशा प्रकारे अधिक अर्थपूर्ण बनू शकतात?

• आपण पूर्ण आदराने व विश्‍वासाने प्रार्थना का केली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

अब्राहामाच्या सेवकाप्रमाणे, तुम्ही देखील देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता का?

[१० पानांवरील चित्र]

कौटुंबिक उपासनेमुळे तुमच्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनतात