मंडळीतील आपल्या स्थानाची मनापासून कदर करा
मंडळीतील आपल्या स्थानाची मनापासून कदर करा
“देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे.”—१ करिंथ. १२:१८.
१, २. (क) मंडळीतील प्रत्येक जण आपल्या स्थानाची कदर करू शकतो हे कशावरून दिसते? (ख) या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?
यहोवाने अगदी प्राचीन इस्राएलच्या काळापासूनच आपल्या उपासकांचे आध्यात्मिक रीत्या भरणपोषण करण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी मंडळीचा उपयोग केल्याचे आढळते. उदाहरणार्थ, इस्राएलांनी आय नगराचा पाडाव केल्यानंतर यहोशवाने ‘नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने इस्राएलांच्या सबंध मंडळीसमोर वाचून दाखविली.’—यहो. ८:३४, ३५.
२ सा.यु. पहिल्या शतकात प्रेषित पौलाने ख्रिस्ती वडील असलेल्या तीमथ्याला सांगितले, की ख्रिस्ती मंडळी ही ‘देवाचे घर’ असून “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. (१ तीम. ३:१५) आज सबंध जगभरात असलेला खऱ्या ख्रिश्चनांचा बंधुसमाज देवाच्या या ‘घराला’ सूचित करतो. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या प्रेरित पत्रात पौल मंडळीची तुलना मानवी शरीराशी करतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य वेगवेगळे असले तरी प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा आहे असे तो म्हणतो. पौलाने लिहिले: “देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे.” तो पुढे असेही म्हणतो, की “शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो.” (१ करिंथ. १२:१८, २३) तेव्हा, देवाच्या घराण्यात त्याच्या नीतिनियमांनुसार चालणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका ही दुसऱ्या विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीच्या भूमिकेपेक्षा चांगली किंवा वाईट आहे असे म्हणताच येणार नाही. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, इतकेच. तर मग, आपण कशा प्रकारे देवाच्या व्यवस्थेतील आपले स्थान ओळखून त्याची कदर करू शकतो? आपल्या या स्थानावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो? आणि आपली “प्रगती सर्वांस दिसून यावी” म्हणून आपल्याला काय करता येईल?—१ तीम. ४:१५.
आपल्या स्थानाची कदर कशी करता येईल?
३. मंडळीतील आपले स्थान ओळखण्याचा आणि आपल्याला त्याची कदर आहे हे दाखवण्याचा एक मार्ग कोणता?
३ मंडळीत आपले स्थान ओळखून आपल्याला त्याची मनापासून कदर आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे “विश्वासू व बुद्धिमान दासाला” आणि त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नियमन मंडळाला मनापासून सहकार्य करणे. (मत्तय २४:४५-४७ वाचा.) दास वर्गाकडून आपल्याला ज्या काही सूचना किंवा मार्गदर्शन मिळते त्यास आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो याचे आपण परीक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ आपला पेहराव, मनोरंजन तसेच इंटरनेटचा दुरुपयोग या विषयांवर आजपर्यंत अनेकदा अगदी सुस्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. आपल्या आध्यात्मिक संरक्षणासाठी दिलेल्या या सुज्ञ सल्ल्याचे आपण काळजीपूर्वक पालन करतो का? नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्याची जी सूचना देण्यात आली होती त्याविषयी काय? या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन आठवड्यातली एक संध्याकाळ आपण खास कौटुंबिक उपासनेसाठी राखून ठेवली आहे का? अविवाहित असल्यास आपण वैयक्तिक बायबल अभ्यास करण्यासाठी वेळ काढत आहोत का? दास वर्गाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे पालन केल्यास यहोवा नक्कीच वैयक्तिक रीत्या व कुटुंब या नात्याने आपल्याला अनेक आशीर्वाद देईल.
४. वैयक्तिक आवडीनिवडींबद्दल निर्णय घेताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
४ काही जण असे म्हणतील की मनोरंजन व पेहराव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, मंडळीतील आपल्या स्थानाची कदर करणाऱ्या समर्पित ख्रिस्ती व्यक्तीने कोणतेही निर्णय फक्त वैयक्तिक आवडीनिवडींच्या आधारावर घेऊ नयेत. तर देवाचे वचन, बायबल यातून त्याचा दृष्टिकोन काय आहे हे विशेषकरून विचारात घेतले पाहिजे. त्यातील संदेश ‘आपल्या पावलांकरिता दिव्यासारखा व आपल्या मार्गावर प्रकाशासारखा’ असला पाहिजे. (स्तो. ११९:१०५) जीवनात वैयक्तिक गोष्टींसंबंधी आपण जे काही निर्णय घेतो त्यांचा आपल्या सेवा कार्यावर, आपल्या बंधूभगिनींवर व बाहेरच्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा देखील विचार करणे सुज्ञतेचे ठरेल.—२ करिंथकर ६:३, ४ वाचा.
५. आपल्यात स्वैराचारी वृत्ती येऊ नये म्हणून आपण काळजी का घेतली पाहिजे?
५ “आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा” प्रभाव इतका व्यापक आहे की त्याची तुलना आपण श्वासोच्छ्वास करतो त्या हवेशी करता येईल. (इफिस. २:२) हा आत्मा आपल्याला असा विचार करण्यास भाग पाडू शकतो, की यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज नाही. आपण नक्कीच दियत्रफेसप्रमाणे होऊ इच्छित नाही, ज्याने प्रेषित योहानाने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा आदराने “स्वीकार” केला नाही. (३ योहा. ९, १०) अशी स्वैराचारी वृत्ती आपल्यात येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आध्यात्मिक अन्नाचा पुरवठा करण्यासाठी आज ज्या माध्यमाचा यहोवा उपयोग करत आहे त्याचा आपण कधीही शब्दाने किंवा कृतीने अनादर करू नये. (गण. १६:१-३) उलट, दास वर्गाला सहकार्य करण्याचा जो बहुमान आपल्याला लाभला आहे त्याची मनस्वी कदर केली पाहिजे. तसेच, आपल्या मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांच्या आज्ञेत राहून त्यांना अधीनता दाखवण्याचाही आपण प्रयत्न करू नये का?—इब्री लोकांस १३:७, १७ वाचा.
६. आपण आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा आढावा का घेतला पाहिजे?
६ मंडळीतील आपल्या स्थानाची आपल्याला कदर आहे हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा प्रामाणिकपणे आढावा घेऊन “आपल्या सेवेला मोठेपणा” देण्यासाठी व यहोवाचा सन्मान करण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करणे. (रोम. ११:१३) असे केल्यामुळे काहींना सामान्य पायनियर सेवा करणे शक्य झाले आहे. तर इतर काहींना मिशनरी सेवा, प्रवासी पर्यवेक्षक किंवा बेथेल कुटुंबाचे सदस्य या नात्याने खास स्वरूपाची पूर्ण-वेळची सेवा करणे शक्य झाले आहे. अनेक बंधूभगिनी राज्य सभागृह बांधकामात हातभार लावतात. यहोवाच्या लोकांपैकी बहुतेक जण आपापल्या कुटुंबांना आध्यात्मिक रीत्या सुदृढ ठेवण्याचा होईल तितका प्रयत्न करतात, तसेच आपल्या कुटुंबियांसह दर आठवडी सेवाकार्यातही उत्साहाने सहभाग घेतात. (कलस्सैकर ३:२३, २४ वाचा.) देवाची सेवा करण्यासाठी आपण स्वच्छेने पुढे येतो आणि आपल्या वैयक्तिक परिस्थितीनुसार जिवाभावाने त्याची सेवा करतो, तेव्हा ख्रिस्ती मंडळीत आपल्यालाही एक स्थान आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.
आपल्या स्थानावर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी
७. मंडळीतील आपल्या स्थानावर आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो ते स्पष्ट करा.
७ आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा प्रामाणिकपणे आढावा घेणे जरुरीचे आहे. कारण, मंडळीतील आपले स्थान किंवा भूमिका ही बऱ्याच प्रमाणात, आपल्या क्षमतेवर किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, मंडळीत एका बांधवाची भूमिका काही बाबतींत एका बहिणीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. याशिवाय, देवाच्या सेवेत आपण कितपत योगदान करू शकतो यावर आपले वय, आरोग्य व इतर गोष्टींचाही परिणाम होतो. नीतिसूत्रे २०:२९ म्हणते: “बल हे तरुणांस भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.” मंडळीतील तरुण लोक अंगमेहनतीची कामे मोठ्या उत्साहाने करू शकतात, तर वयोवृद्ध लोक आपली बुद्धी व अनुभव यांद्वारे मंडळीच्या प्रगतीला बराच हातभार लावतात. अर्थात, यहोवाच्या संघटनेत आपण जे काही साध्य करतो ते केवळ त्याच्या कृपेमुळेच शक्य होते हे देखील आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.—प्रे. कृत्ये १४:२६; रोम. १२:६-८.
८. मंडळीत आपण जे काही करतो त्याच्यावर इच्छेचा कितपत प्रभाव पडतो?
८ मंडळीतील आपल्या स्थानावर आणखी एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो. ती कोणती हे जाणून घेण्यासाठी दोन सख्ख्या बहिणींचे उदाहरण विचारात घ्या. दोघींनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. दोघींचीही परिस्थिती एकसारखीच आहे. शिवाय, त्या दोघींनाही शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामान्य पायनियर सेवा करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी आपल्या परीने होता होईल तितके प्रयत्न केले आहेत. पण, शिक्षण संपल्यानंतर त्यांपैकी एक पायनियर सेवा हाती घेते, तर दुसरी पूर्ण-वेळची नोकरी करू लागते. हा फरक कशामुळे? तर इच्छेमुळे. शेवटी, दोघींनीही आपापल्या इच्छेप्रमाणे मार्ग निवडला. आपल्यापैकी बहुतेकांच्या बाबतीत नेमके असेच होत नाही का? म्हणूनच, देवाच्या सेवेत आपण काय करू इच्छितो याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपल्याला देवाच्या सेवेतील आपला सहभाग आणखी वाढवता येईल का? यासाठी आपल्या परिस्थितीत थोडा फेरबदल करण्यास आपण तयार आहोत का?—२ करिंथ. ९:७.
९, १०. यहोवाच्या सेवेतील आपला सहभाग आणखी वाढवण्याची आपल्यात प्रेरणाच नसेल तर आपण काय केले पाहिजे?
९ पण, यहोवाच्या सेवेतील आपला सहभाग वाढवण्याची प्रेरणाच आपल्यात नसेल व मंडळीच्या कार्यांत फक्त नावापुरता सहभाग घेण्यातच आपल्याला समाधान वाटत असेल तर काय? पौलाने फिलिप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात म्हटले: “इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा [“तुमच्यामध्ये कार्य करणारा,” NW] तो देव आहे.” होय, यहोवा आपल्यामध्ये कार्य करून आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांवर प्रभाव पाडू शकतो.—फिलिप्पै. २:१३; ४:१३.
१० तर मग, देवाने त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा द्यावी अशी आपण त्याला विनंती करू नये का? प्राचीन काळातील दावीद राजानेसुद्धा हेच केले होते. त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो.” (स्तो. २५:४, ५) आपणही यहोवाला अशीच प्रार्थना केली पाहिजे. राज्यासंबंधित कार्याला हातभार लावण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो ते पाहून यहोवा देव आणि त्याचा पुत्र यांना किती आनंद होत असेल याचा आपण विचार केला पाहिजे. असे केल्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता दाटून येईल. (मत्त. २६:६-१०; लूक २१:१-४) या कृतज्ञ भावनेमुळे, आपल्याला यहोवाच्या सेवेत प्रगती करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून त्याला कळकळीची विनंती करण्यास आपण प्रवृत्त होऊ. आपली मनोवृत्ती कशी असावी हे यशया संदेष्ट्याच्या उदाहरणावरून आपल्याला समजते. “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” अशी यहोवाची वाणी त्याने ऐकली तेव्हा त्याने म्हटले: “हा मी आहे, मला पाठीव.”—यश. ६:८.
तुम्हाला प्रगती कशी करता येईल?
११. (क) यहोवाच्या संघटनेत जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी बांधवांची सध्या नितान्त गरज का आहे? (ख) सेवेचे विशेषाधिकार मिळवण्यास योग्य बनण्यासाठी एक बांधव काय करू शकतो?
११ सन २००८ च्या सेवा वर्षादरम्यान जगभरात २,८९,६७८ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. यावरून मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांची किती गरज आहे हे दिसून येते. ही गरज ओळखून एका बांधवाने कशी प्रतिक्रिया दाखवावी? सोप्या शब्दांत सांगायचे तर त्याने सेवा सेवक व वडील म्हणून नियुक्त होण्यास पात्र ठरण्यासाठी शास्त्रवचनांत घालून दिलेल्या अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९) एक बांधव कशा प्रकारे या अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो? सेवेत उत्साहाने सहभाग घेण्याद्वारे, मंडळीतील आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याद्वारे, ख्रिस्ती सभांमध्ये अर्थपूर्ण उत्तरे देण्याचा मनापासून प्रयत्न करण्याद्वारे आणि ख्रिस्ती बांधवांविषयी वैयक्तिक आस्था दाखवण्याद्वारे तो हे करू शकतो. असे करण्याद्वारे मंडळीतील आपल्या स्थानाची त्याला मनस्वी कदर असल्याचे तो दाखवतो.
१२. मंडळीतील तरुण बांधव कशा प्रकारे यहोवाच्या सेवेकरता आवेश दाखवू शकतात?
१२ मंडळीत प्रगती करण्यासाठी तरुण आणि विशेषकरून किशोरवयीन बांधव काय करू शकतात? बायबलचा अभ्यास करण्याद्वारे ते आपले “आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी” वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात. (कलस्सै. १:९) यासाठी देवाच्या वचनाचा नियमित व अर्थपूर्ण अभ्यास करणे तसेच मंडळीच्या सभांमध्ये उत्साहाने सहभाग घेणे नक्कीच साहाय्यक ठरेल. तसेच, पूर्ण-वेळ सेवेच्या ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारात’ प्रवेश करण्यास पात्र ठरण्याकरताही तरुण बांधव प्रयत्न करू शकतात. (१ करिंथ. १६:९) यहोवाच्या सेवेकरता स्वतःला वाहून घेतल्याने जीवन खऱ्या अर्थाने समाधानी बनते व अनेक आशीर्वादही लाभतात.—उपदेशक १२:१ वाचा.
१३, १४. मंडळीतील आपल्या स्थानाची बहिणींना कदर आहे हे त्या कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतात?
१३स्तोत्र ६८:११ म्हणते: “प्रभु अनुज्ञा देतो; मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना” आहे. ख्रिस्ती बहिणी ही भविष्यवाणी पूर्ण करण्याचा त्यांना जो बहुमान लाभला आहे त्याबद्दल मनस्वी कदर दाखवू शकतात. ते कसे? याचा सर्वात उल्लेखनीय मार्ग म्हणजे शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभाग घेणे. (मत्त. २८:१९, २०) तेव्हा, सेवा कार्यात उत्साहाने सहभाग घेण्याद्वारे आणि त्यासाठी त्याग करण्याची तयारी दाखवण्याद्वारे ख्रिस्ती बहिणी दाखवून देतात की मंडळीतील आपल्या भूमिकेची त्यांना कदर आहे.
१४ प्रेषित पौलाने तीताला असे लिहिले: “वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या . . . सुशिक्षण देणाऱ्या असाव्या; त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” (तीत २:३-५) खरेच, प्रौढ ख्रिस्ती बहिणी मंडळीवर किती सकारात्मक प्रभाव पाडतात! मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांचा आदर करण्याद्वारे, तसेच पेहराव व मनोरंजनाच्या बाबतीत सुज्ञपणे निर्णय घेण्याद्वारे त्या इतरांसाठी उत्तम उदाहरण तर मांडतातच, पण त्यासोबतच मंडळीतील आपल्या स्थानाची त्यांना मनस्वी कदर असल्याचेही त्या दाखवतात.
१५. एकटेपणावर मात करण्यासाठी एक अविवाहित बहीण काय करू शकते?
१५ कधीकधी एखाद्या अविवाहित बहिणीला, मंडळीत आपली भूमिका काय असा प्रश्न पडू शकतो. अशा अनुभवातून गेलेली एक बहीण म्हणते: “अविवाहित असल्यामुळे कधीकधी फार एकटं वाटतं.” यावर ती कशा प्रकारे मात करते असे विचारले असता ती म्हणते: “प्रार्थना आणि अभ्यास केल्यामुळे मला मंडळीतील माझ्या भूमिकेची पुन्हा एकदा जाणीव होते. यहोवा माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते. तसेच, मंडळीतील इतरांना मदत करण्याचाही मी प्रयत्न करते. यामुळे स्वतःचाच विचार करत बसण्याऐवजी मला इतरांचा विचार करण्यास मदत मिळते.” स्तोत्र ३२:८ या वचनानुसार यहोवाने दाविदाला म्हटले: “मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” यावरून दिसून येते, की यहोवाला आपल्या प्रत्येक सेवकाबद्दल—ज्यात अविवाहित बहिणीदेखील समाविष्ट आहेत—मनस्वी आस्था आहे आणि तो प्रत्येकाला मंडळीतील आपापले स्थान ओळखण्यास जरूर मदत करेल.
मंडळीतील आपले स्थान टिकवून ठेवा!
१६, १७. (क) यहोवाच्या संघटनेचा भाग बनण्याचे आमंत्रण स्वीकारणे हा आपल्या जीवनातील सर्वोत्तम निर्णय आहे असे का म्हणता येईल? (ख) यहोवाच्या संघटनेतील आपले स्थान आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?
१६ यहोवाने आपल्या प्रत्येक सेवकाला आपल्यासोबत नातेसंबंध जोडण्यास प्रेमळपणे आकृष्ट केले आहे. येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. ६:४४) विचार करा, जगभरातील कोट्यवधी लोकांपैकी खास आपल्याला यहोवाने आज त्याच्या मंडळीचा भाग होण्याचे वैयक्तिक आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण आयुष्यातील सगळ्यात उत्तम निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळाली आहे आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनले आहे. शिवाय, देवाच्या मंडळीत आपल्याला एक स्थान आहे ही जाणीव किती आनंद व समाधान देणारी आहे!
१७ स्तोत्रकर्त्याने म्हटले: ‘हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान मला प्रिय आहे.’ त्याने पुढे असेही म्हटले, की “माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.” (स्तो. २६:८, १२) यहोवाच्या संघटनेत आपल्या प्रत्येकाला एक स्थान आहे. देवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे आणि देवाच्या सेवेत व्यस्त राहण्याद्वारे यहोवाच्या संघटनेतील आपले मौल्यवान स्थान आपण टिकवून ठेवू शकतो.
तुम्हाला आठवते का?
• मंडळीत सर्व ख्रिश्चनांना एक स्थान आहे असे म्हणणे का योग्य आहे?
• देवाच्या संघटनेतील आपल्या स्थानाची आपल्याला कदर आहे हे आपण कशा प्रकारे दाखवतो?
• मंडळीतील आपल्या स्थानावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो?
• मंडळीतील आपल्या स्थानाबद्दल ख्रिस्ती तरुणांना आणि इतर प्रौढ व्यक्तींना कदर आहे हे ते कशा प्रकारे दाखवू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्रे]
मंडळीत सेवेचे विशेषाधिकार मिळवण्यासाठी बांधव काय करू शकतात?
[१७ पानांवरील चित्र]
बहिणींना मंडळीतील आपल्या स्थानाची कदर आहे हे त्या कशा प्रकारे दाखवू शकतात?