व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

ख्रिस्ती सभेत, संमेलनात किंवा अधिवेशनात बायबल आधारित भाषणांचा संकेत भाषेत अनुवाद करणाऱ्‍या भगिनींनी डोक्यावर आच्छादन घेणे योग्य आहे का?

सहसा पती किंवा मंडळीतील बांधव पार पाडतात अशा जबाबदाऱ्‍या जेव्हा एक ख्रिस्ती स्त्री पार पाडते तेव्हा तिने डोक्यावर आच्छादन घेतले पाहिजे. हे प्रेषित पौलाने सांगितलेल्या पुढील तत्त्वाशी सुसंगत आहे. पौलाने म्हटले, की “जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करिते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते” कारण “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथ. ११:३-१०) ख्रिस्ती स्त्री आपल्या डोक्यावर शालीन व साजेसे आच्छादन घेते तेव्हा ख्रिस्ती मंडळीतील ईश्‍वरशासित व्यवस्थेप्रती ती आपली अधीनता व्यक्‍त करते.—१ तीम. २:११, १२. *

पण, एखादा बांधव देत असलेल्या भाषणाचा जेव्हा एक भगिनी संकेत भाषेत अनुवाद करते तेव्हा काय? ही भगिनी केवळ वक्त्याने सांगितलेली माहिती दुसऱ्‍या भाषेत व्यक्‍त करण्याचे माध्यम असते. त्याअर्थी, ती स्वतः शिकवत नसते तर भाषण देणाऱ्‍या बंधूचे बोलणे ती संकेत भाषेत व्यक्‍त करत असते. पण, संकेत भाषेतून अनुवाद करणे हे इतर भाषांतील अनुवादापेक्षा फारच वेगळे आहे. इतर भाषांतून अनुवाद केला जातो तेव्हा श्रोते अनुवादकाचे बोलणे ऐकत असले, तरीही ते वक्त्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकतात. शिवाय, संकेत भाषेच्या तुलनेत बहिणी इतर भाषांतून अनुवाद करतात तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्यावरच जाण्याचे तसे काही कारण नसते. कधीकधी तर त्या बसूनही अनुवाद करू शकतात किंवा उभ्या असल्यास श्रोत्यांऐवजी वक्त्याकडे पाहून बोलू शकतात. त्यामुळे इतर भाषेत अनुवाद करणाऱ्‍या बहिणीने डोक्यावर आच्छादन घेणे जरुरीचे नाही.

पण, संकेत भाषेत भाषणांचा अनुवाद करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे बरेचदा अनुवाद करणाऱ्‍या व्यक्‍तीवर अधिक लक्ष केंद्रित होते. सहसा संकेत भाषेत अनुवाद करणाऱ्‍या व्यक्‍तीला एका मोठ्या पडद्यावर दाखवले जाते. तर, प्रत्यक्ष भाषण देणारा कदाचित श्रोत्यांना दिसतसुद्धा नसेल. त्यामुळे संकेत भाषेत अनुवाद करणाऱ्‍या भगिनीने डोक्यावर आच्छादन घेणे योग्य ठरेल. असे करण्याद्वारे, आपली भूमिका दुय्यम आहे हे स्वीकारत असल्याचे तिला दाखवता येईल.

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतील भागांचा, प्रात्यक्षिकांचा, तसेच मंडळीचा बायबल अभ्यास, सेवा सभा व टेहळणी बुरूज अभ्यास यांतील उत्तरांचा संकेत भाषेत अनुवाद करताना ही नवीन सूचना कशी लागू करता येईल? या भागांचा संकेत भाषेत अनुवाद करणाऱ्‍या भगिनीनेही डोक्यावर आच्छादन घ्यावे का? काही परिस्थितींत, ती भगिनी स्वतः सभा चालवत नाही हे सर्वांना अगदी स्पष्टच असल्यामुळे तिने डोक्यावर आच्छादन घेणे गरजेचे नाही असे दिसते. उदाहरणार्थ, श्रोत्यांनी दिलेल्या उत्तरांचा, भगिनींनी सादर केलेल्या भाषणांचा किंवा प्रात्यक्षिकांचा अनुवाद करत असताना तिने डोक्यावर आच्छादन घेणे जरुरीचे नाही. पण, या सभांमध्ये बांधवांच्या भाषणांचा अनुवाद करताना, टेहळणी बुरूज अभ्यास किंवा मंडळीचा बायबल अभ्यास चालवणाऱ्‍या बांधवासाठी अनुवाद करताना किंवा पुढे उभे राहून गीतांचे संकेत करताना तिने डोक्यावर आच्छादन घेतले पाहिजे. एकाच सभेत भगिनीला कदाचित बांधवांसाठी, भगिनींसाठी, मुलांसाठी तसेच वडिलांसाठी अनुवादकाचे काम करावे लागू शकते. त्यामुळे, पूर्णच सभेदरम्यान तिने डोक्यावर आच्छादन घेणे सोयीचे ठरेल.

[तळटीप]

^ परि. 3 ख्रिस्ती स्त्रियांनी कोणकोणत्या परिस्थितींत डोक्यावर आच्छादन घ्यावे, याविषयी सविस्तर माहितीकरता देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २०९ ते २१२ पाहा.