व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा

कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवा

“[परमेश्‍वराचा] आश्रय करणारे सारे हर्ष करोत; . . . ते सदा गजर करोत.”—स्तो. ५:११.

१, २. (क) आज कोणकोणत्या गोष्टींमुळे खूप दुःख सोसावे लागते? (ख) सर्व मानवांवर येणाऱ्‍या संकटांव्यतिरिक्‍त आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागते?

निरनिराळ्या संकटप्रसंगांचा सर्वसामान्य मानवजातीवर जितका परिणाम होतो तितकाच यहोवाच्या साक्षीदारांवरही होतो. देवाचे अनेक सेवक गुन्हेगारी, युद्धे व इतर स्वरूपाच्या अन्यायी कृत्यांना बळी पडले आहेत. तसेच, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्‌य, रोगराई व मृत्यू यांमुळेही अनेकांना खूप दुःख सोसावे लागले आहे. म्हणूनच, प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोम. ८:२२) याशिवाय, आपल्या अपरिपूर्णतेमुळे देखील आपल्याला अनेक दुःखद परिणाम भोगावे लागतात. यामुळे आपल्यालाही कदाचित प्राचीन काळातल्या दावीद राजाप्रमाणे वाटेल ज्याने म्हटले: “माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.”—स्तो. ३८:४.

सर्वसामान्य मानवजातीवर ओढवणाऱ्‍या संकटांव्यतिरिक्‍त खऱ्‍या ख्रिश्‍चनांना लाक्षणिक वधस्तंभही वाहावा लागतो. (लूक १४:२७) होय, येशूप्रमाणेच त्याच्या शिष्यांनाही छळ-विरोधाला तोंड द्यावे लागते. (मत्त. १०:२२, २३; योहा. १५:२०; १६:२) त्यामुळे, नव्या जगात मिळणाऱ्‍या आशीर्वादांची वाट पाहत असताना, ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यासाठी आपल्याला कडवा संघर्ष करावा लागेल व धीर धरावा लागेल.—मत्त. ७:१३, १४; लूक १३:२४.

३. देवाचे मन आनंदित करण्यासाठी दुःखमय जीवन जगणे आवश्‍यक नाही हे आपल्याला कशावरून समजते?

याचा अर्थ, खरे ख्रिस्ती अगदीच भकास, निरस स्वरूपाचे जीवन जगतात असा होतो का? अंत येईपर्यंत आपण नेहमी निराश, दुःखी मनोवृत्तीने जगावे का? असे मुळीच नाही. उलट, यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रतिज्ञांची पूर्णता होण्याची वाट पाहत असताना आपण आनंदी राहावे. बायबलमध्ये वारंवार, देवाचे खरे उपासक आनंदी असल्याचे वर्णन वाचायला मिळते. (यशया ६५:१३, १४ वाचा.) स्तोत्र ५:११ मध्ये असे म्हटले आहे: “[परमेश्‍वराचा] आश्रय करणारे सारे हर्ष करोत; . . . ते सदा गजर करोत.” होय, सध्याच्या संकटमय काळात राहत असतानासुद्धा देवाच्या सेवकांना अत्यंत आनंदाने व शांती-समाधानाने जीवन जगणे शक्य आहे. समस्यांना तोंड देत असतानाही आनंदी राहण्यास बायबल आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते याबद्दल आपण विचार करू या.

यहोवा—आनंदी देव

४. देवाच्या इच्छेविरुद्ध वागल्यास त्याला कसे वाटते?

यहोवाबद्दल विचार करा. तो सर्वशक्‍तिमान देव असल्यामुळे संपूर्ण विश्‍वावर त्याचाच अधिकार आहे. त्याला कशाचीच कमी नाही व कोणाचीच गरज नाही. पण, त्याच्याजवळ अफाट शक्‍ती-सामर्थ्य असूनही त्याच्या आत्मिक पुत्रांपैकी एकाने त्याच्याविरुद्ध बंड करून स्वतःला सैतान बनवले तेव्हा त्याला थोडेफार दुःख तर नक्कीच झाले असेल. पुढे यहोवाविरुद्ध बंड करण्यात इतर देवदूतांनीही सैतानाला साथ दिली तेव्हाही त्याचे मन दुखावले असेल. तसेच, यहोवाच्या निर्मितीकृत्यांपैकी सर्वोत्कृष्ट असलेले आदाम व हव्वा यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली तेव्हा त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याचीही कल्पना करा. शिवाय, तेव्हापासून आजपर्यंत आदाम व हव्वेच्या कोट्यवधी वंशजांनी यहोवाचे आधिपत्य झुगारले आहे.—रोम. ३:२३.

५. खासकरून कोणत्या गोष्टींमुळे यहोवाचे मन दुखावले आहे?

सैतान अद्यापही देवाविरुद्ध विद्रोह करतच आहे. यहोवाने तब्बल ६,००० वर्षांपासून मूर्तीपूजक कृत्ये, अराजकता, खूनखराबा व अत्यंत नीच लैंगिक कृत्ये घडताना पाहिली आहेत. (उत्प. ६:५, ६, ११, १२) याशिवाय, त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या अपमानकारक लबाड्या व निंदा तो सहन करत आला आहे. काही वेळा तर त्याच्या खऱ्‍या उपासकांनी देखील त्याचे मन दुखावले आहे. अशाच एका प्रसंगाविषयी बोलताना बायबल म्हणते: “किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! किती वेळा तरी त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले! पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.” (स्तो. ७८:४०, ४१) देवाचे स्वतःचे लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात तेव्हा नक्कीच त्याच्या मनाला अत्यंत वेदना होतात. (यिर्म. ३:१-१०) तर, आपण पाहिल्याप्रमाणे आज अनेक वाईट गोष्टी घडतात आणि त्या घडतात तेव्हा यहोवाला खूप दुःख होते.यशया ६३:९, १० वाचा.

६. निराश करणाऱ्‍या परिस्थितींना देव कशा प्रकारे तोंड देतो?

पण, निराशेमुळे व भावना दुखावल्यामुळे यहोवा कार्य करायचे थांबत नाही. जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा तेव्हा यहोवाने लगेच निर्णायक पावले उचलून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली आहे. याशिवाय, ज्यांमुळे शेवटी त्याचा उद्देश पूर्ण होईल अशीही काही दीर्घकालीन पावले त्याने उचलली आहेत. यहोवाने ही सकारात्मक पावले उचलली असल्यामुळेच, तो त्या दिवसाची मोठ्या आनंदाने वाट पाहत आहे जेव्हा त्याचे सार्वभौमत्व कायमचे शाबीत केले जाईल आणि परिणामस्वरूप त्याच्या निष्ठावान उपासकांना अनेक आशीर्वाद लाभतील. (स्तो. १०४:३१) होय, यहोवाची इतकी बदनामी करण्यात आली असूनही, तो आनंदी देव आहे.—स्तो. १६:११.

७, ८. जीवनात समस्या येतात तेव्हा आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?

अर्थातच, आपण स्वतःची तुलना यहोवाशी करू शकत नाही. तरीसुद्धा, संकट प्रसंगांचा सामना करत असताना आपण यहोवाचे अनुकरण करू शकतो. जीवनात समस्या येतात तेव्हा थोडेफार निराश होणे स्वाभाविक आहे. पण, आपण त्याच मनःस्थितीत राहण्याची गरज नाही. आपल्याला यहोवाच्या प्रतिरूपात बनवण्यात आले असल्यामुळे आपल्याजवळ विचारशक्‍ती आणि व्यावहारिक बुद्धी आहे. यांच्या साह्‍याने आपण आपल्या समस्यांचे नीट परीक्षण करून शक्य होईल तेव्हा सकारात्मक पावले उचलू शकतो.

जीवनात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, अशा काही गोष्टी असतात ज्यांवर आपले अजिबात नियंत्रण नसते. अशा गोष्टींविषयी सतत चिंता करत राहिल्यास आपण आणखीनच निराश होऊ आणि खऱ्‍या उपासनेतील अनेक आनंददायक सुसंधी आपल्या हातून निसटून जातील. तेव्हा, एखादी समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडून होतील तितके प्रयत्न केल्यानंतर, त्याबद्दल चिंता करत न बसता अधिक फलदायी कार्यांवर आपण आपले लक्ष व शक्‍ती केंद्रित केली पाहिजे. पुढील बायबल अहवालांवरून हे आणखी स्पष्ट होते.

वाजवी दृष्टिकोन महत्त्वाचा

९. आपल्या समस्येबद्दल हन्‍नाने वाजवी दृष्टिकोन कसा बाळगला?

शमुवेल संदेष्ट्याची आई हन्‍ना हिचे उदाहरण पाहा. मूलबाळ होत नसल्यामुळे ती फार खिन्‍न होती. ती वांझ असल्यामुळे तिची थट्टा केली जायची, तिला टोमणे मारले जायचे. यामुळे कधीकधी तर ती इतकी व्यथित व्हायची की ती रडे व काहीच खात नसे. (१ शमु. १:२-७) असेच एकदा यहोवाच्या निवासमंडपात गेल्यानंतर, हन्‍नाचे “मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्‍वराची करुणा भाकून ढळढळा रडली.” (१ शमु. १:१०) हन्‍नाने यहोवाजवळ आपल्या मनोवेदना व्यक्‍त केल्यानंतर, प्रमुख याजक एली तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला: “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” (१ शमु. १:१७) या क्षणी, आपल्या हातात जे काही होते ते आपण केले आहे याची हन्‍नाला पूर्ण खातरी झाली. तिच्या वंध्यत्वाबद्दल ती काहीच करू शकत नव्हती. हन्‍नाने वाजवी दृष्टिकोन बाळगला. मग तिने “परत जाऊन अन्‍न सेवन केले, व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.”—१ शमु. १:१८.

१०. जी समस्या सोडवणे पौलाच्या हातात नव्हते त्या समस्येबद्दल त्याने कोणता वास्तविक दृष्टिकोन बाळगला?

१० प्रेषित पौलापुढेही एक समस्या आली तेव्हा त्यानेही असाच दृष्टिकोन बाळगला. तो कोणत्यातरी दुखण्याने पीडित होता. या दुखण्याला त्याने “शरीरात एक काटा” असे म्हटले. (२ करिंथ. १२:७) ही समस्या नेमकी काय होती हे सांगता येत नसले, तरी त्या समस्येपासून मुक्‍त होण्यासाठी त्याच्या परीने होईल तितके प्रयत्न त्याने केले. त्यासोबतच, तो यहोवाला प्रार्थना करत राहिला. आपल्या या समस्येबद्दल पौलाने कितीदा यहोवाला प्रार्थना केली? तीन वेळा. पौलाने तिसऱ्‍यांदा प्रार्थना केल्यानंतर देवाने त्याला प्रकट केले की त्याच्या ‘शरीरातला काटा’ चमत्कारिकपणे काढून टाकला जाणार नाही. पौलाने या वस्तुस्थितीचा स्वीकार केला आणि यहोवाची मनोभावे सेवा करण्यात स्वतःला झोकून दिले.२ करिंथकर १२:८-१० वाचा.

११. संकटांचा सामना करण्यासाठी कळकळीच्या प्रार्थना कशा प्रकारे आपली मदत करू शकतात?

११ याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला भेडसावणाऱ्‍या समस्यांविषयी आपण यहोवाला प्रार्थना करू नये. (स्तो. ८६:७) उलट, बायबल आपल्याला अशी विनवणी करते: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” अशा प्रकारच्या कळकळीच्या विनंत्यांचे व मागण्यांचे यहोवा कशा प्रकारे उत्तर देईल? बायबल पुढे म्हणते: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पै. ४:६, ७) यहोवाने आपली समस्या दूर केली नाही, तरी तो आपल्या मनाचे व विचारशक्‍तीचे रक्षण करण्याद्वारे आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकतो. प्रार्थना केल्यानंतर, एखाद्या गोष्टीची अवाजवी चिंता करणे किती घातक असू शकते याची जाणीव कदाचित आपल्याला होईल.

देवाच्या इच्छेनुरूप जगण्यात आनंद माना

१२. जास्त काळ निराशावस्थेत राहणे घातक का ठरू शकते?

१२नीतिसूत्रे २४:१० मध्ये असे म्हटले आहे: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” आणखी एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “मनांतील खेदाने हृदय भंग पावते.” (नीति. १५:१३) आपल्या समस्यांमुळे काही ख्रिस्ती इतके खचून जातात की ते वैयक्‍तिक बायबल वाचन व मनन करण्याचे सोडून देतात. त्यांच्या प्रार्थनाही अगदी यांत्रिक बनतात व ते बांधवांपासून दूरदूर राहू लागतात. निश्‍चितच, दीर्घ काळापर्यंत निराशावस्थेत राहणे घातक ठरू शकते.—नीति. १८:१, १४.

१३. कोणती कार्ये आपल्याला निराशेवर मात करण्यास व आनंदी राहण्यास मदत करू शकतात?

१३ दुसरीकडे पाहता, आशावादी दृष्टिकोन बाळगल्याने जीवनात आनंद व समाधान देणाऱ्‍या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आपल्याला शक्य होईल. दाविदाने असे लिहिले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.” (स्तो. ४०:८) जीवनात समस्या येतात तेव्हा आपल्या उपासनेचा नित्यक्रम सोडून देण्याचा आपण विचारही करू नये. वास्तविक पाहता, निराशेवर मात करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्याला आनंद देणाऱ्‍या कार्यात स्वतःला झोकून देणे. बायबलचे नियमित वाचन केल्याने व त्यावर मनन केल्याने आपल्याला आनंद व समाधान लाभेल असे यहोवा म्हणतो. (स्तो. १:१, २; याको. १:२५) पवित्र शास्त्रवचनांतून तसेच ख्रिस्ती सभांमधून आपल्याला वाचायला व ऐकायला मिळणाऱ्‍या ‘मनोरम वचनांमुळे’ आपल्या मनाला उभारी मिळेल व आपल्याला सुखसमाधान लाभेल.—नीति. १२:२५; १६:२४, पं.र.भा.

१४. यहोवाकडून मिळालेल्या कोणत्या आश्‍वासनामुळे आज आपण आनंदी आहोत?

१४ देवाचे सेवक या नात्याने आपल्याजवळ आनंदी राहण्याची अनेक कारणे आहेत. आपले तारण करण्याची जी प्रतिज्ञा देवाने केली आहे ती आपल्या आनंदाचे एक मोठे कारण आहे. (स्तो. १३:५) आज आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला, तरीही जे देवाची मनोभावे सेवा करतात अशांना शेवटी तो प्रतिफळ देईल हे आपल्याला माहीत आहे. (उपदेशक ८:१२ वाचा.) हबक्कूक संदेष्ट्यालाही याविषयी भरवसा होता. म्हणूनच, त्याने हे सुरेख वर्णन केले: “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्‍न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यांतील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यांत गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्‍वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.”—हब. ३:१७, १८.

“ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी!”

१५, १६. भविष्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांची प्रतीक्षा करत असताना देवाकडून मिळालेल्या कोणत्या काही गोष्टींचा आपण आस्वाद घेऊ शकतो?

१५ यहोवाने जे सुंदर भवितव्य आपल्याकरता राखून ठेवले आहे त्याची प्रतीक्षा करत असतानाच तो सध्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला पुरवत आहे त्यांचा आपण आस्वाद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. बायबल म्हणते: “[मनुष्यांनी] हर्ष करावा आणि ते जिवंत राहतात तोपर्यंत त्यांनी चांगले ते करावे याहून त्यांना काही उत्तम नाही असे मी जाणतो. आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या सर्व भ्रमांत सुख भोगावे हे देवाचे दान आहे.” (उप. ३:१२, १३, पं.र.भा.) ‘चांगले ते करण्यात’ इतरांचे भले होईल किंवा त्यांना साहाय्य मिळेल असे काहीतरी करणे समाविष्ट आहे. येशूने म्हटले की घेण्यापेक्षा देणे यात जास्त आनंद आहे. त्यामुळे, आपल्या विवाहसोबत्यासाठी, मुलाबाळांसाठी, आईवडिलांसाठी व इतर आप्त जनांसाठी आपण चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला मनस्वी समाधान लाभते. (नीति. ३:२७) तसेच, आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींशी आपण प्रेमळ, आतिथ्यशील व क्षमाशील मनोवृत्तीने वागतो तेव्हा आपल्याला तर आनंद होतोच, पण यहोवालाही आनंद होतो. (गलती. ६:१०; कलस्सै. ३:१२-१४; १ पेत्र ४:८, ९) शिवाय, आपले सेवाकार्य निःस्वार्थ मनोवृत्तीने करणेही अतिशय समाधानदायक ठरते.

१६ वर उल्लेख केलेल्या उपदेशकाच्या शब्दांत खाणे, पिणे यांसारख्या जीवनात आनंद देणाऱ्‍या साध्यासाध्या गोष्टींचा उल्लेख आढळतो. होय, समस्यांचा सामना करत असतानासुद्धा, यहोवाने ज्या काही भौतिक वस्तू पुरवल्या आहेत त्यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो. याशिवाय, डोळ्यांचे पारणे फेडणारा सूर्यास्त, एखादा विलोभनीय देखावा, प्राण्यांचे गमतीदार खेळ किंवा निसर्गातील इतर विस्मयकारक गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. पण, अशा गोष्टीसुद्धा जीवनात रंग भरून जीवन आनंदी बनवू शकतात. या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा यहोवावरील आपले प्रेम आणखी गहिरे होते, कारण जीवनात सगळ्या चांगल्या गोष्टी देणारा तोच आहे.

१७. कोणत्या गोष्टींमुळे सध्याच्या संकटप्रसंगांतून आपली कायमची सुटका शक्य होईल आणि दरम्यान कशामुळे आपल्याला दिलासा मिळतो?

१७ यहोवावरील आपले प्रेम, त्याच्याप्रती आपली आज्ञाधारकता आणि खंडणी बलिदानावरील आपला विश्‍वास यांद्वारेच शेवटी आपल्याला अपरिपूर्ण जीवनामुळे ओढवणाऱ्‍या संकटप्रसंगांतून कायमची सुटका व सर्वकाळचे आनंदी जीवन प्राप्त होईल. (१ योहा. ५:३) दरम्यान, आपल्याला जे काही सहन करावे लागते याची यहोवाला पूर्ण कल्पना आहे या जाणिवेमुळे आपल्याला दिलासा मिळतो. दाविदाने लिहिले: “मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.” (स्तो. ३१:७) यहोवा आपल्यावरील अपार प्रेमामुळे प्रवृत्त होऊन सर्व प्रकारच्या संकटप्रसंगांतून आपली सुटका करेल.—स्तो. ३४:१९.

१८. देवाचे लोक नेहमी आनंदी का असले पाहिजेत?

१८ यहोवाच्या प्रतिज्ञा पूर्ण होण्याची वाट पाहत असताना, आपण आपल्या आनंदी देवाचे अनुकरण करू या. तसेच, नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊन आध्यात्मिक रीत्या निष्क्रिय न होण्याची आपण काळजी घेऊ या. जीवनात समस्या येतात तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी आपण आपल्या विचारशक्‍तीचा आणि व्यावहारिक बुद्धीचा उपयोग करू या. संकटांना तोंड देताना मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी, तसेच योग्य पावले उचलण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करेल. तेव्हा, त्याच्याकडून मिळणाऱ्‍या भौतिक, आध्यात्मिक अशा सर्व आशीर्वादांचा आपण मनस्वी आनंद घेऊ या. यहोवासोबत आपले घनिष्ठ नाते टिकवून ठेवण्याद्वारे आपण जीवनात आनंदी होऊ शकतो. कारण, “ज्या लोकांचा देव यहोवा आहे तेच सुखी आहेत!”—स्तो. १४४:१५, पं.र.भा.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• संकटांचा सामना करताना आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?

• संकटांचा सामना करण्यासाठी वाजवी दृष्टिकोन कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकतो?

• संकट काळातही आपण आनंदाने देवाच्या इच्छेनुरूप जीवन कसे व्यतीत करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्रे]

सध्या घडत असलेल्या वाईट गोष्टी पाहून यहोवाला खूप दुःख होते

[चित्राचे श्रेय]

© G.M.B. Akash/Panos Pictures

[१८ पानांवरील चित्रे]

यहोवाने आपल्याला आनंदी राहण्याचा मार्ग दाखवला आहे