व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तांबड्या मातीच्या बेटावर बायबल पोचते

तांबड्या मातीच्या बेटावर बायबल पोचते

तांबड्या मातीच्या बेटावर बायबल पोचते

आफ्रिकेच्या दक्षिणपूर्व किनारपट्टीपासून जवळजवळ ४०० किलोमीटर अंतरावर वसलेले मादागास्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. या बेटाचे रहिवासी अर्थात मलागासी लोक यहोवा या नावाशी फार पूर्वीपासून परिचित आहेत. कारण, देवाचे नाव असलेले मलागासी भाषेतील बायबल १७० पेक्षा जास्त वर्षांपासून उपलब्ध आहे. मलागासी भाषेत बायबल कशा प्रकारे उपलब्ध झाले हा अत्यंत चिकाटीने व समर्पित भावाने केलेल्या परिश्रमांचा अहवाल आहे.

मलागासी भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचे काम सर्वप्रथम मॉरिशियस या जवळच्याच बेटावर सुरू झाले. सन १८१३ मध्ये, मॉरिशियसचे ब्रिटिश गवर्नर सर रॉबर्ट फार्कुहर यांनी मलागासीत शुभवर्तमानांच्या भाषांतर प्रकल्पाला सुरुवात करून दिली. त्यांनी नंतर मादागास्करचे महाराज रॉडमा पहिले यांना लंडन मिशनरी सोसायटीच्या (एलएमएस) काही शिक्षकांना तांबड्या मातीच्या बेटावर अर्थात मादागास्कर बेटावर आमंत्रित करण्याचे प्रोत्साहन दिले.

ऑगस्ट १८, १८१८ रोजी डेव्हिड जोन्स आणि थॉमस बेवन हे इंग्लंडचे दोन मिशनरी मॉरिशियसहून मादागास्करच्या टोआमसिना या बंदर शहरात आले. त्यांना आढळले की, येथील लोक खूप धार्मिक वृत्तीचे होते आणि पूर्वजांच्या उपासनेला व पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना त्यांच्या जीवनात खूप महत्त्व होते. त्यांची भाषा मलायो-पॉलिनीशियन संस्कृतीत पाळेमुळे असलेली व अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती.

जोन्स आणि बेवन यांनी तेथे एक लहानशी शाळा उघडली. याच्या थोड्याच काळानंतर ते मॉरिशियसहून आपल्या बायका-मुलांना टोआमसिनाला घेऊन आले. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांचा संपूर्ण गट मलेरियाच्या तडाख्यात सापडला, आणि १८१८ सालच्या डिसेंबर महिन्यात जोन्सची पत्नी व मूल मलेरियामुळे दगावले. दोन महिन्यांनी या रोगाने बेवन कुटुंबाचाही बळी घेतला. त्या गटापैकी डेव्हिड जोन्स एकटाच काय तो वाचला.

या शोकांतिकेमुळे जोन्स हिंमत हरला नाही. मादागास्करच्या लोकांना देवाचे वचन उपलब्ध करून देण्याचा त्याचा दृढनिश्‍चय होता. आरोग्य सुधारण्यासाठी काही काळ मॉरिशियसला गेला असताना, त्याने मलागासी भाषा शिकण्याचे कठीण काम हाती घेतले. त्यानंतर लवकरच, त्याने योहानाच्या शुभवर्तमानाचे भाषांतर करण्याच्या कार्याला सुरुवात केली.

ऑक्टोबर १८२० मध्ये जोन्स मादागास्करला परत आला. लवकरच त्याने मादागास्करची राजधानी एंटनेनरीवो येथे एक नवीन मिशनरी शाळा सुरू केली. सुरुवातीला फारशा सोयीसवलती उपलब्ध नव्हत्या. पुस्तके, फळा, किंवा बाक असे काहीच नव्हते. पण, शाळेतील अभ्यासक्रम मात्र उत्तम होता आणि मुलेही शिकण्यास उत्सुक होती.

जवळजवळ सात महिन्यांपर्यंत जोन्सने एकट्यानेच काम केले. त्यानंतर, त्याला मदत करण्यासाठी बेवनच्या जागी डेव्हिड ग्रिफथ्स नावाचा मिशनरी आला. या दोघांनी मलागासी भाषेत बायबलचे भाषांतर करण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

बायबल भाषांतराला सुरुवात होते

१८२० च्या दशकाच्या सुरुवातीला सुराबे ही मलागासी भाषेची एकुलती एक लिपी होती जिच्यात अरबी अक्षरांचा वापर केला जायचा. पण, केवळ काही मूठभर लोकांनाच ती वाचता येत होती. म्हणून, मिशनऱ्‍यांनी महाराज रॉडमा पहिले यांच्याशी चर्चा केल्यावर, महाराजांनी त्यांना सुराबे ऐवजी रोमन लिपी वापरण्याची परवानगी दिली.

सप्टेंबर १०, १८२३ रोजी भाषांतराच्या कामाला सुरुवात झाली. जोन्सने उत्पत्ति आणि मत्तयचे, तर ग्रिफथ्सने निर्गम आणि लूकचे भाषांतर करायला घेतले. दोघेही कमालीच्या उत्साहाने व जोमाने कार्य करत होते. एकीकडे भाषांतराचे बहुतेक काम स्वतःच करताना ते सकाळी व दुपारी शाळेतही शिकवायचे. तसेच, तीन वेगवेगळ्या भाषांत ते चर्चमध्ये प्रार्थना चालवायचे. अर्थात या सर्व कामांत त्यांनी नेहमी भाषांतराच्या कामालाच अव्वल स्थान दिले.

या दोन मिशनऱ्‍यांनी १२ विद्यार्थ्यांच्या मदतीने अवघ्या १८ महिन्यांत संपूर्ण ग्रीक शास्त्रवचनांचे आणि इब्री शास्त्रवचनांच्या बहुतेक पुस्तकांचे भाषांतर केले. पुढच्या वर्षी संपूर्ण बायबलचे प्राथमिक भाषांतर पूर्ण झाले. अर्थात, त्यात बऱ्‍याच सुधारणा करणे जरुरीचे होते. म्हणून, डेव्हिड जॉन्स आणि जोसेफ फ्रीमन या दोन भाषातज्ज्‌ञांना मदतीसाठी इंग्लंडहून पाठवण्यात आले.

अडथळ्यांना तोंड देणे

मलागासी भाषेत बायबलचे भाषांतर पूर्ण झाल्यावर एलएमएसने चार्ल्स हॉवन्डन यांना मादागास्करचे पहिले मुद्रण यंत्र बसवण्यास पाठवले. २१ नोव्हेंबर, १८२६ रोजी हॉवन्डन मादागास्करला पोचला. पण, मलेरिया झाल्यामुळे एका महिन्यातच तो मरण पावला. त्यामुळे मुद्रण यंत्र चालवण्यास कोणीच नव्हता. पुढील वर्षी, स्कॉटलंडहून जेम्स कॅमरन नावाचा एक कारागीर आला. त्याने यंत्राच्या सुट्या भागांत सापडलेल्या एका माहितीपत्रकाच्या साहाय्याने कसेबसे मुद्रण यंत्र बसवले. बराच खटाटोप केल्यानंतर शेवटी ४ डिसेंबर १८२७ रोजी उत्पत्ति अध्याय १ चा काही भाग छापण्यात कॅमरनला यश आले. *

जुलै २७, १८२८ रोजी रॉडमा पहिले यांचा मृत्यू झाल्यानंतर भाषांतराच्या कामात आणखी एक अडथळा निर्माण झाला. महाराज रॉडमा यांनी भाषांतर प्रकल्पाला मनापासून पाठिंबा दिला होता. डेव्हिड जोन्सने एकदा त्यांच्याविषयी असे म्हटले होते: “महाराज रॉडमा अत्यंत दयाळू व सौजन्यशील आहेत. ते शिक्षणाचे खंदे समर्थक आहेत. आपल्या प्रजेला आधुनिक कला-कौशल्यांचे शिक्षण मिळावे, यास ते सोन्यारुप्यापेक्षा जास्त महत्त्व देतात.” पण, महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रानावलोना पहिली हिने राज्यकारभार हाती घेतला. आणि, ती आपल्या पतीप्रमाणे भाषांतर कार्याला पाठिंबा देणार नाही हे लवकरच दिसून आले.

राणीने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्याच्या थोड्याच काळानंतर, इंग्लंडहून आलेल्या एका पाहुण्याने भाषांतर कार्याबद्दल राणीशी बोलण्याची परवानगी मागितली. पण राणीने सरळसरळ नकार दिला. आणखी एकदा, मिशनऱ्‍यांनी राणीला सांगितले की अद्याप आम्हाला लोकांना पुष्कळ काही शिकवायचे आहे, जसे की ग्रीक आणि इब्री भाषा. तेव्हा तिने म्हटले: “इब्री आणि ग्रीकशी मला काही घेणं-देणं नाही. पण काहीतरी उपयोगी, जसं की साबण तयार करणं यासारखं काहीतरी तुम्ही माझ्या लोकांना शिकवणार असाल तर मला तुमच्याशी बोलायला आवडेल.” मलागासी बायबलचे काम पूर्ण होण्याआधीच आपल्याला देश सोडून जावे लागण्याची शक्यता आहे हे ओळखून, कॅमरनने राणीच्या सूचनेबद्दल विचार करण्यासाठी आठवडाभराची मुदत मागितली.

पुढील आठवड्यात, कॅमरनने स्थानिक सामग्रीचा वापर करून बनवलेल्या साबणाच्या दोन लहान वड्या राणीला भेट म्हणून पाठवल्या. मिशनरी कारागिरांद्वारे केलेल्या या आणि अशा इतर सामाजिक कार्यांमुळे राणी खुष झाली. आणि अशा रीतीने, इब्री शास्त्रवचनांची काही पुस्तके वगळता बायबलच्या इतर पुस्तकांच्या छपाईचे काम करण्यासाठी मिशनऱ्‍यांना पुरेसा वेळ मिळाला.

आधी आश्‍चर्याचा धक्का, मग निराशा

राणीने सुरुवातीला मिशनऱ्‍यांना धुडकावून लावले होते. पण, मे १८३१ मध्ये तिने असा एक हुकूम जारी केला ज्यामुळे मिशनऱ्‍यांना आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. तिने आपल्या प्रजेला बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची परवानगी दिली! पण, लवकरच हा निर्णय बदलण्यात आला. ए हिस्टरी ऑफ मॅडगास्कर या पुस्तकानुसार, “बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांची संख्या वाढल्यामुळे राजदरबारातील रूढीवादी गट धास्तावले. प्रभूभोजनाचे सेवन करणे हे ब्रिटिश राज्याला निष्ठा दाखवण्याचे वचन घेण्यासारखे आहे असे म्हणून त्यांनी राणीचे कान भरले.” अशा प्रकारे, ख्रिस्ती बाप्तिस्म्याची परवानगी दिल्याच्या सहा महिन्यांनंतर १८३१ च्या शेवटी ती रद्द करण्यात आली.

राणीची ही अनिर्णायक वृत्ती, आणि दरबारातील परंपरावादी लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे मिशनऱ्‍यांनी मुद्रणाचे काम आटोपते घेतले. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर आधीच पूर्ण झाले होते, आणि त्याच्या हजारो प्रतींचे वितरणही करण्यात आले होते. पण, मार्च १, १८३५ रोजी आणखी एक अडथळा निर्माण झाला. त्या दिवशी राणीने ख्रिस्ती धर्म अवैध असल्याचे घोषित केले आणि सर्व ख्रिस्ती प्रकाशने अधिकाऱ्‍यांच्या सुपूर्त करण्याचे फरमान सोडले.

या फरमानामुळे स्थानिक मलागासी लोकांना मुद्रण प्रकल्पावर काम करण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे, मूठभर मिशनऱ्‍यांनी काम संपवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, आणि शेवटी जून १८३५ मध्ये संपूर्ण बायबल प्रसिद्ध करण्यात आले. अशा प्रकारे, मलागासी बायबल अस्तित्वात आले!

ख्रिस्ती धर्मावर बंदी असल्यामुळे, या नवीन बायबलच्या प्रती लवकरात लवकर वितरित करण्यात आल्या, आणि ७० प्रती, नष्ट केल्या जाऊ नयेत म्हणून जमिनीत लपवून ठेवण्यात आल्या. हे सारे अगदी योग्य वेळी घडले, कारण एका वर्षाच्या आत दोन मिशनऱ्‍यांना वगळता, बाकी सर्वांना तेथून जावे लागले. पण, तांबड्या मातीच्या बेटावर देवाच्या वचनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती.

बायबलबद्दल मलागासी लोकांचे प्रेम

स्वतःच्या भाषेत देवाचे वचन वाचणे शक्य झाल्यामुळे मादागास्करच्या लोकांना किती आनंद झाला! अर्थात, या भाषांतरात बऱ्‍याच चुका असून भाषाही आता काहीशी जुनाट वाटते. तरीही, ज्यांच्याकडे बायबल नाही असे घर मादागास्करमध्ये अभावानेच आढळेल. अनेक मलागासी लोक नियमितपणे बायबल वाचतात. या भाषांतराची एक खासीयत म्हणजे इब्री शास्त्रवचनांत यहोवा या नावाचा मुक्‍तपणे वापर करण्यात आला आहे. मूळ प्रतींमध्ये, ग्रीक शास्त्रवचनांतही देवाचे नाव पाहायला मिळते. आणि त्यामुळे बहुतेक मलागासी लोक देवाच्या नावाशी परिचित आहेत.

ख्रिस्ती शास्त्रवचनांच्या पहिल्या प्रती हातात आल्यावर मलागासी लोकांना किती आनंद झाला हे पाहून मुद्रण यंत्र चालवणारा बेकर याने असे उद्‌गार काढले: “मी भविष्यवाणी वगैरे करत नाही. पण, मला नाही वाटत की या देशातून देवाचे वचन काढून टाकण्यात कोणालाही यश येईल!” त्याचे शब्द अगदी खरे ठरले आहेत. मलेरिया असो, कठीण भाषा शिकण्याचे आव्हान असो किंवा राणीचे प्रतिकूल कायदे असोत, कोणतीही गोष्ट मादागास्करमध्ये देवाच्या वचनाचा प्रसार रोखू शकली नाही.

आता तर स्थिती आणखी सुधारली आहे. ती कशी? २००८ मध्ये संपूर्ण बायबलचे नवे जग भाषांतर मलागासी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले. हे भाषांतर प्रगतीच्या दिशेने उचललेले खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण त्यातील भाषा आधुनिक आणि समजण्यास सोपी आहे. त्यामुळे, तांबड्या मातीच्या बेटावर देवाच्या वचनाला आता आणखी अढळ स्थान प्राप्त झाले आहे.—यश. ४०:८.

[तळटीप]

^ परि. 14 मलागासी भाषेत सर्वप्रथम छापण्यात आलेले बायबलचे काही भाग म्हणजे दहा आज्ञा आणि प्रभूची प्रार्थना. एप्रिल/मे १८२६ च्या सुमारास मॉरिशियसमध्ये हे साहित्य छापण्यात आले होते. पण, याच्या प्रती केवळ महाराज रॉडमा यांच्या कुटुंबाला आणि काही मोजक्याच सरकारी अधिकाऱ्‍यांना देण्यात आल्या होत्या.

[३१ पानांवरील चित्र]

मलागासी भाषेतील “नवे जग भाषांतर” यहोवा देवाच्या नावाला सन्मान देते