मशीहा! देवाने पाठवलेला तारणकर्ता
मशीहा! देवाने पाठवलेला तारणकर्ता
“कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.”—१ करिंथ. १५:२२.
१, २. (क) येशूला भेटल्यावर अंद्रिया व फिलिप्प यांची प्रतिक्रिया काय होती? (ख) येशू हाच मशीहा असल्याचा पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या तुलनेत आपल्याजवळ जास्त पुरावा आहे असे आपण का म्हणू शकतो?
नासरेथकर येशू हाच देवाचा अभिषिक्त आहे याची खातरी पटल्यानंतर अंद्रियाने आपला भाऊ पेत्र यास म्हटले: “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे.” फिलिप्पालाही याची खातरी पटली होती, आणि त्यामुळे त्याने नथनेल या आपल्या मित्राची भेट घेऊन त्यास असे सांगितले: “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”—योहा. १:४०, ४१, ४५.
२ येशू हाच प्रतिज्ञात मशीहा अर्थात यहोवाने निवडलेला ‘तारणाचा उत्पादक’ आहे याची तुम्हाला पूर्णपणे खातरी पटली आहे का? (इब्री २:१०) येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांच्या तुलनेत, येशू हाच मशीहा आहे हे सिद्ध करणारे कितीतरी जास्त पुरावे आज आपल्याजवळ आहेत. येशूच्या जन्मापासून त्याच्या पुनरुत्थानापर्यंतची माहिती देताना देवाचे वचन, येशू हाच ख्रिस्त असल्याचा खातरीलायक पुरावा देते. (योहान २०:३०, ३१ वाचा.) शिवाय, पुनरुत्थानानंतर स्वर्गात गेल्यावरही तो मशीहा या नात्याने आपली भूमिका बजावतो असे बायबल स्पष्ट करते. (योहा. ६:४०; १ करिंथकर १५:२२ वाचा.) तेव्हा, बायबलमधून शिकलेल्या गोष्टींच्या आधारावर, तुम्हाला “मशीहा सापडला आहे” असे आज तुम्हीही म्हणू शकता. पण, सुरुवातीचे ते शिष्य आपल्याला मशीहा सापडला आहे या अचूक निष्कर्षावर कसे काय पोचले याविषयी सर्वप्रथम पाहू या.
मशीहाविषयीचे पवित्र “रहस्य” क्रमाक्रमाने प्रकट करण्यात आले
३, ४. (क) आम्हाला “मशीहा सापडला आहे” असे येशूचे पहिल्या शतकातील शिष्य कोणत्या आधारावर म्हणून शकले? (ख) मशीहाशी संबंधित सर्व भविष्यवाण्या केवळ येशूच पूर्ण करू शकत होता असे का म्हणता येईल?
३ येशू हाच मशीहा आहे हे पहिल्या शतकातील त्याचे अनुयायी इतक्या खातरीने का म्हणू शकले? यहोवाने काळाच्या ओघात क्रमाक्रमाने आपल्या संदेष्ट्यांद्वारे, भविष्यात येणार असलेल्या मशीहाला ओळखण्यासाठी काही चिन्हे दिली होती. एका बायबल विद्वानाने याची तुलना अनेक संगमरवरी तुकडे जोडून एक पुतळा तयार करण्याशी केली. अशी कल्पना करा की अनेक माणसे एका खोलीत प्रत्येकी एक संगमरवरी तुकडा घेऊन येतात. ही माणसे कधीही एकमेकांशी भेटलेली किंवा बोललेली नाहीत. त्यांनी आणलेले तुकडे जोडल्यावर एक संपूर्ण पुतळा तयार झाला, तर साहजिकच तुम्ही या निष्कर्षावर याल की हे नक्कीच योगायोगाने घडू शकत नाही. नक्कीच कोणीतरी पुतळ्याची आकृती काढली असेल, त्याचे मोजमाप निश्चित केले असेल आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा भाग पाठवला असेल. पुतळ्याच्या एकेका भागाप्रमाणेच, मशीहाविषयी करण्यात आलेली प्रत्येक भविष्यवाणी त्याच्याविषयी काही ना काही महत्त्वाची माहिती पुरवणार होती.
४ तर मग, मशीहाशी संबंधित सर्व भविष्यवाण्या केवळ योगायोगाने एकाच व्यक्तीमध्ये पूर्ण होणे शक्य होते का? एका संशोधकाने म्हटले, की मशीहाविषयी करण्यात आलेल्या सर्व भविष्यवाण्या निव्वळ योगायोगाने एका व्यक्तीमध्ये पूर्ण होणे ही “अशक्य कोटीतील गोष्ट म्हणता येईल! सबंध इतिहासात येशूने आणि फक्त येशूनेच मशीहाविषयी केलेल्या सर्व भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण केल्या.”
५, ६. (क) सैतानाविरुद्ध न्यायदंड कशा प्रकारे बजावण्यात येईल? (ख) प्रतिज्ञा केलेल्या ‘संततीची’ वंशावळ देवाने कशा प्रकारे क्रमाक्रमाने प्रकट केली?
५ मशीहाशी संबंधित सर्व भविष्यवाण्या एका ‘रहस्यावर’ किंवा नवे जग भाषांतर यात म्हटल्यानुसार एका ‘पवित्र रहस्यावर’ केंद्रित आहेत. या पवित्र रहस्यात सबंध विश्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. (कलस्सै. १:२६, २७; उत्प. ३:१५) मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या खाईत लोटून देणाऱ्या दियाबल सैतानाविरुद्ध अर्थात, ‘जुनाट सापाविरुद्ध’ देवाने घोषित केलेला न्यायदंड या रहस्यात समाविष्ट होता. (प्रकटी. १२:९) हा न्यायदंड कशा प्रकारे बजावला जाणार होता? यहोवाने असे भाकीत केले की एका ‘स्त्रीद्वारे’ उत्पन्न होणारी “संतति” सैतानाचे डोके फोडेल. ही पूर्वभाकीत “संतति” सर्पाचे डोके चिरडून टाकेल आणि अशा रीतीने विद्रोह, रोगराई व मृत्यू या गोष्टींचे मूळ कारणच नाहीसे करेल. पण त्याआधी देवाच्या परवानगीने सैतान लाक्षणिक अर्थाने त्या स्त्रीच्या ‘संततीच्या’ टाचेवर घाव करेल.
६ ही प्रतिज्ञात “संतति” कोण असेल हे यहोवाने क्रमाक्रमाने प्रकट केले. देवाने अब्राहामाला असे वचन दिले: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.” (उत्प. २२:१८) मोशेने पूर्वभाकीत केले की देवाने ज्याच्याविषयी प्रतिज्ञा केली होती, तो मोशेपेक्षा श्रेष्ठ असा “एक संदेष्टा” असेल. (अनु. १८:१८, १९) दाविदाला आश्वासन देण्यात आले की मशीहा हा त्याच्या घराण्यातून येईल आणि त्याच्या सिंहासनावर बसून युगानुयुग राज्य करेल. नंतर अनेक संदेष्ट्यांनीही यास पुष्टी दिली.—२ शमु. ७:१२, १६; यिर्म. २३:५, ६.
येशू मशीहा असल्याचे पुरावे
७. येशू कशा प्रकारे देवाच्या ‘स्त्रीपासून’ उत्पन्न झाला?
७ प्रतिज्ञात “संतति” होण्याकरता देवाने स्वर्गातील आत्मिक प्राण्यांच्या आपल्या पत्नीसमान संघटनेतून आपल्या पुत्राला, अर्थात ज्याला त्याने सर्वप्रथम निर्माण केले होते, त्याला पाठवले. प्रतिज्ञात संततीची भूमिका पार पाडण्यासाठी देवाच्या या एकुलत्या एका पुत्राला स्वर्गीय जीवनापासून ‘स्वतःला रिक्त करून’ एक परिपूर्ण मनुष्य या नात्याने जन्म घेणे आवश्यक होते. (फिलिप्पै. २:५-७; योहा. १:१४) मरीयेवर पवित्र आत्म्याची ‘छाया झाल्यामुळेच’ तिला जन्मणाऱ्या पुत्राला “पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील” ही भविष्यवाणी पूर्ण होऊ शकली.—लूक १:३५.
८. येशूने पाण्यात बाप्तिस्मा घेण्याकरता स्वतःला सादर केले तेव्हा त्याने कशा प्रकारे मशीहाविषयी केलेली एक भविष्यवाणी पूर्ण केली?
८ मशीहाविषयी करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांनी येशू कोठे व कधी प्रकट होईल हे सूचित केले होते. पूर्वभाकीत केल्याप्रमाणे बेथलेहेममध्ये येशूचा जन्म झाला. (मीखा ५:२) पहिल्या शतकातील यहुद्यांच्या मशीहाबद्दल मोठमोठ्या अपेक्षा होत्या. मशीहाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांपैकी काहींनी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाविषयी असे विचारले: “हाच ख्रिस्त असेल काय?” पण योहानाने त्यांना असे उत्तर दिले: ‘जो माझ्यापेक्षा समर्थ आहे तो येत आहे.’ (लूक ३:१५, १६) सा.यु. २९ साली वयाच्या तिसाव्या वर्षी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यास आला. अशा रीतीने, शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांनुसार अगदी अचूक वेळी त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतःस सादर केले. (दानी. ९:२५) तेव्हापासून त्याने आपल्या अतिशय महत्त्वपूर्ण सेवाकार्याला असे म्हणून सुरुवात केली: “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे.”—मार्क १:१४, १५.
९. मशीहाविषयी सगळ्याच गोष्टी माहीत नसल्या तरी येशूच्या शिष्यांना कोणती खातरी होती?
९ पण लोकांना मशीहाविषयी ज्या अपेक्षा होत्या त्यांमध्ये काही फेरबदल करण्याची गरज होती. त्यांनी येशूला राजा म्हणून त्याचा जयजयकार केला यात काहीही गैर नव्हते, पण येशूचे राज्य हे भविष्यात सुरू होईल व तो पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गातून राज्य करेल हे मात्र लोकांना कालांतराने पूर्णपणे समजणार होते. (योहा. १२:१२-१६; १६:१२, १३; प्रे. कृत्ये २:३२-३६) पण, आपल्या शिष्यांना जेव्हा येशूने “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” असे विचारले तेव्हा प्रेषित पेत्राने मनात कोणतीही शंका न बाळगता उत्तर दिले: “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” (मत्त. १६:१३-१६) नंतर जेव्हा अनेक जण येशूच्या एका शिकवणीमुळे अडखळून त्याला सोडून गेले तेव्हाही पेत्राने अशाच प्रकारे उत्तर दिले.—योहान ६:६८, ६९ वाचा.
मशीहाचे ऐकणे
१०. लोकांनी आपल्या पुत्राचे ऐकावे यावर यहोवाने जोर का दिला?
१० स्वर्गात असताना देवाचा एकुलता एक पुत्र एक शक्तिशाली आत्मिक व्यक्ती होता. पृथ्वीवर असताना, येशू ‘पित्यापासून आलेला,’ त्याचा प्रतिनिधी होता. (योहा. १६:२७, २८) त्याने म्हटले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहा. ७:१६) येशूच्या रूपांतराच्या वेळी, तोच मशीहा आहे या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी यहोवाने अशी घोषणा केली: “ह्याचे तुम्ही ऐका.” (लूक ९:३५) याचा अर्थ, हा जो निवडलेला आहे त्याचे ऐका, त्याच्या आज्ञेत राहा. असे करण्याकरता विश्वास धरणे व चांगली कार्ये करणे आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी देवाला संतुष्ट करण्याकरता आणि सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत.—योहा. ३:१६, ३५, ३६.
११, १२. (क) पहिल्या शतकातील यहुद्यांनी कोणत्या कारणांमुळे येशू हाच मशीहा असल्याचे नाकारले? (ख) येशूवर कोणी विश्वास ठेवला?
११ येशू हाच मशीहा असल्याचे सिद्ध करणारे असंख्य पुरावे असूनही पहिल्या शतकातील यहुद्यांनी मशीहा म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. का? कारण मशीहाबद्दल त्यांच्या स्वतःच्या काही पूर्वधारणा होत्या. त्यांपैकी एक म्हणजे येणारा मशीहा एक राजकीय पुढारी असेल व तो रोमच्या जुलमापासून त्यांना मुक्ती देईल. (योहान १२:३४ वाचा.) त्यामुळे, भविष्यवाण्यांमध्ये सांगितल्यानुसार तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला व ज्याला शेवटी मारून टाकले जाईल अशा मशीहाला स्वीकारण्यास ते तयार नव्हते. (यश. ५३:३, ५) इतकेच काय, पण येशूच्या एकनिष्ठ शिष्यांपैकीही काही जणांची हे जाणून निराशा झाली की येशू यहुद्यांना अत्याचारी रोमन सरकारपासून मुक्त करण्यासाठी आलेला नाही. तरीसुद्धा, ते एकनिष्ठ राहिले आणि कालांतराने त्यांना अचूक समज प्राप्त झाली.—लूक २४:२१.
१२ येशूला प्रतिज्ञात मशीहा म्हणून लोकांनी स्वीकारले नाही याचे आणखी एक कारण म्हणजे अनेकांना त्याच्या शिकवणी स्वीकारणे कठीण वाटले. येशूने शिकवले, की देवाच्या राज्यात प्रवेश करण्याकरता एका व्यक्तीला ‘आत्मत्याग करावा लागेल,’ येशूचा देह ‘खावा लागेल’ व त्याचे रक्त ‘प्यावे लागेल,’ ‘नव्याने जन्मावे लागेल’ आणि ‘जगापासून’ अलिप्त राहावे लागेल. (मार्क ८:३४; योहा. ३:३; ६:५३; १७:१४, १६) या गोष्टींचे पालन करणे त्या काळच्या गर्विष्ठ, श्रीमंत व ढोंगी लोकांना अतिशय कठीण वाटले. पण, नम्र मनोवृत्तीच्या यहुद्यांनी व काही शोमरोन्यांनी येशूचा मशीहा म्हणून स्वीकार केला. त्यांनी म्हटले: “हा खचित जगाचा तारणारा आहे.”—योहा. ४:२५, २६, ४१, ४२; ७:३१.
१३. कशा प्रकारे लाक्षणिक रीत्या येशूच्या टाचेला घाव करण्यात आला?
१३ मुख्य याजक आपल्याला दोषी ठरवतील, विदेशी लोक आपल्याला वधस्तंभाला खिळतील, पण, तिसऱ्या दिवशी आपले पुनरुत्थान होईल या सर्व गोष्टी येशूने आधीच सांगितल्या होत्या. (मत्त. २०:१७-१९) यहुदी न्यायसभेसमोर, तू “ख्रिस्त, देवाचा पुत्र” आहेस का, असे विचारले असता येशूने होकार दिला, तेव्हा तो देवाची निंदा करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. (मत्त. २६:६३-६६) खरे पाहता, ‘मरणदंड भोगण्यासारखा’ कोणताही दोष पिलाताला त्याच्यात आढळला नाही. पण, यहुद्यांनी त्याच्यावर राजद्रोहाचाही आरोप लावला असल्यामुळे शेवटी पिलाताने “येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले.” (लूक २३:१३-१५, २५) अशा रीतीने, येशूला देवाने पाठवले असल्याचा भरपूर पुरावा असूनही यहुद्यांनी त्याला “नाकारले” आणि “जीवनाच्या अधिपतीला” जिवे मारण्याचा कट रचला. (प्रे. कृत्ये ३:१३-१५) सा.यु. ३३ सालच्या वल्हांडणाच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि अशा रीतीने भाकीत केल्याप्रमाणे मशीहाचा “वध” करण्यात आला. (दानी. ९:२६, २७; प्रे. कृत्ये २:२२, २३) हा वेदनादायी मृत्यू येशूने सोसला तेव्हा उत्पत्ति ३:१५ येथे भाकीत करण्यात आल्याप्रमाणे त्याच्या ‘टाचेला’ घाव करण्यात आला.
मशीहाला मरण का सोसावे लागले?
१४, १५. (क) कोणत्या दोन कारणांमुळे यहोवाने येशूला मरण सोसू दिले? (ख) येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने काय केले?
१४ दोन महत्त्वाच्या कारणांमुळे यहोवाने येशूला मरण सोसू दिले. पहिले कारण म्हणजे, येशू मृत्यूपर्यंत देवाला विश्वासू राहिल्यामुळे ‘पवित्र रहस्यात’ गोवलेली एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली. सैतानाने अगदी टोकाची परीक्षा आणली, तरीसुद्धा एक परिपूर्ण मनुष्य शेवटपर्यंत “सुभक्तीने” चालून देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करू शकतो हे येशूने अगदी पूर्णपणे सिद्ध करून दाखवले. (१ तीम. ३:१६) दुसरे कारण म्हणजे, ‘मनुष्याचा पुत्र पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला.’ (मत्त. २०:२८) या समतुल्य ‘खंडणीमुळे’ आदामाच्या संततीला वारशाने मिळालेल्या पापाची भरपाई करण्यात आली आणि त्यामुळे देवाने पाठवलेला तारणकर्ता म्हणून येशूचा स्वीकार करणाऱ्यांकरता सार्वकालिक जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.—१ तीम. २:५, ६.
१५ तीन दिवस कबरेत राहिल्यानंतर ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले. आपण खरोखरच मृतांतून उठलो आहोत हे दाखवण्यासाठी ४० दिवसांपर्यंत येशू निरनिराळ्या प्रसंगी त्याच्या शिष्यांना दिसला आणि त्याने त्यांना पुढील सूचना दिल्या. (प्रे. कृत्ये १:३-५) यानंतर, आपल्या अमूल्य बलिदानाचे मोल यहोवापुढे सादर करण्यासाठी आणि मशीही राजा या नात्याने राज्य करण्याच्या नियुक्त वेळेची वाट पाहण्यासाठी तो स्वर्गात गेला. दरम्यान, त्याला आणखी पुष्कळ काही करायचे होते.
मशीहा या नात्याने कार्य तडीस नेणे
१६, १७. स्वर्गात गेल्यानंतर मशीहा या नात्याने येशू काय काय करतो हे स्पष्ट करा.
१६ येशूचे पुनरुत्थान झाले तेव्हापासून आतापर्यंतच्या अनेक शतकांत तो ख्रिस्ती मंडळीवर राजा म्हणून राज्य करत आला आहे आणि यादरम्यान मंडळीतील कार्यावर त्याने विश्वासूपणे देखरेख केली आहे. (कलस्सै. १:१३) देवाच्या नियुक्त वेळी तो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने आपल्या अधिकाराचा वापर करण्यास सुरुवात करेल. बायबलमधील भविष्यवाण्यांवरून व जगातील घडामोडींवरून स्पष्टपणे दिसून येते की १९१४ सालापासून एक राजा या नात्याने येशूच्या उपस्थितीची तसेच ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळाची सुरुवात झाली. (मत्त. २४:३; प्रकटी. ११:१५) त्याच्या थोड्याच काळानंतर येशू व त्याच्या नेतृत्वाखाली पवित्र देवदूतांनी सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर घालवले.—प्रकटी. १२:७-१०.
१७ येशूने सा.यु. २९ मध्ये सुरू केलेले प्रचाराचे व शिकवण्याचे कार्य आता संपुष्टात येणार आहे. लवकरच तो सर्व जिवितांचा न्याय करेल. मग, यहोवाने पाठवलेला तारणकर्ता म्हणून त्याचा स्वीकार करणाऱ्या मेंढरांसमान लोकांना तो ‘जगाच्या स्थापनेपासून त्यांच्याकरता सिद्ध केलेल्या राज्याचे वतन घेण्यास’ सांगेल. (मत्त. २५:३१-३४, ४१) येशूच्या नेतृत्वाखाली त्याचे स्वर्गीय सैन्य सर्व दुष्टाईचा अंत करेल तेव्हा जे येशूला राजा म्हणून स्वीकारत नाहीत ते नाश पावतील. मग, येशू सैतानाला बांधून त्याला व त्याच्या दुरात्म्यांना “अथांग डोहात” टाकून देईल.—प्रकटी. १९:११-१४; २०:१-३.
१८, १९. मशीहा या नात्याने येशू आपली भूमिका पार पाडताना काय साध्य करेल आणि त्यामुळे आज्ञाधारक मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील?
१८ येशूच्या हजार वर्षांच्या राज्यशासनात तो “अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति” या त्याला देण्यात आलेल्या सर्व उपाधी अगदी सुयोग्य असल्याचे सिद्ध करेल. (यश. ९:६, ७) त्याच्या राज्यात सर्व मानव, तसेच पुनरुत्थान झालेले देखील परिपूर्ण बनतील. (योहा. ५:२६-२९) नम्र मनोवृत्तीच्या मानवांना मशीहा “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल” व आज्ञाधारक मानवांना यहोवासोबत शांतीपूर्ण नातेसंबंध जोडण्यास मदत करेल. (प्रकटीकरण ७:१६, १७ वाचा.) शेवटल्या परीक्षेनंतर सैतान व त्याच्या दुरात्म्यांसह, देवाचा विरोध करणाऱ्या सर्वांना “अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात [येईल].” अशा रीतीने, ‘सापाचे’ डोके कायमचे चिरडून टाकले जाईल.—प्रकटी. २०:१०.
१९ मशीहाची भूमिका येशू खरोखर किती विस्मयकारकतेने व चोखपणे निभावतो! लवकरच, पापापासून मुक्त झालेली मानवजात नंदनवन पृथ्वीला व्यापून टाकेल आणि सर्वकाळ परिपूर्ण आरोग्य व आनंददायी जीवनाचा उपभोग घेईल. यहोवाच्या पवित्र नावावर आलेला कलंक कायमचा मिटवून टाकला जाईल आणि संपूर्ण विश्वावर आधिपत्य करण्याचा अधिकार केवळ त्यालाच आहे हे कायमचे शाबीत केले जाईल. देवाच्या अभिषिक्ताचे जे ऐकतात त्यांना लवकरच किती अद्भुत भवितव्य लाभणार आहे!
तुम्हाला मशीहा सापडला आहे का?
२०, २१. तुम्ही इतरांना मशीहाविषयी का सांगावे?
२० सन १९१४ पासून आपण ख्रिस्ताच्या पारूसीया अर्थात उपस्थितीच्या काळात राहत आहोत. देवाच्या राज्याचा राजा या नात्याने त्याची उपस्थिती अदृश्य असली, तरीसुद्धा भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवरून ती सध्या सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (प्रकटी. ६:२-८) अर्थात, पहिल्या शतकातील यहुद्यांप्रमाणेच आजही बहुतेक लोक मशीहाची उपस्थिती सुरू आहे हे दाखवणाऱ्या पुराव्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना देखील राजकीय समस्यांपासून सुटका देऊ शकेल किंवा निदान जो राजकारणाच्या माध्यमाने बदल घडवून आणेल असा नेता हवा आहे. तुम्हाला मात्र हे कळाले आहे की येशू सध्या देवाच्या राज्याचा राजा या नात्याने शासन करत आहे. हे जाणून तुम्ही रोमांचित झाला नाही का? नक्कीच, पहिल्या शतकातील शिष्यांप्रमाणे तुम्हीही असे म्हणण्यास प्रवृत्त झाला असाल की ‘आम्हाला मशीहा सापडला आहे.’
२१ तर मग, इतरांशी सत्याविषयी बोलताना तुम्ही मशीहा या नात्याने येशूच्या भूमिकेवर विशेष भर देता का? असे केल्यास, त्याने तुमच्याकरता जे काही केले आहे, आज तो तुमच्याकरता जे काही करत आहे आणि भविष्यातही करणार आहे त्याबद्दल तुमची कृतज्ञता नक्कीच वाढेल. अंद्रिया व फिलिप्प यांच्यासारखेच कदाचित तुम्हीही आपल्या नातेवाइकांना व मित्रांना याआधी मशीहाविषयी सांगितले असेल. पण, येशू ख्रिस्त हाच मशीहा, अर्थात देवाने पाठवलेला तारणकर्ता आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा उत्साहाने त्यांना सांगता येईल का?
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• पहिल्या शतकातील शिष्यांनी मशीहाला कसे ओळखले?
• कोणत्या दोन महत्त्वपूर्ण कारणांसाठी येशूने मरण सोसले?
• मशीहा या नात्याने आपली भूमिका पार पाडत असताना येशू पुढे आणखी काय करणार आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२१ पानांवरील चित्रे]
येशू हाच प्रतिज्ञा केलेला मशीहा आहे हे पहिल्या शतकातील लोक कसे ओळखू शकत होते?
[२३ पानांवरील चित्र]
इतरांशी बोलताना मशीहा या नात्याने येशूच्या भूमिकेवर तुम्ही विशेष भर देता का?