मासेदोनियात येऊन साहाय्य करण्याचे आवाहन तुम्ही स्वीकारू शकाल का?
मासेदोनियात येऊन साहाय्य करण्याचे आवाहन तुम्ही स्वीकारू शकाल का?
पौल आशिया मायनरमधील त्रोवस या बंदर शहरात असताना त्याला एक दृष्टान्त झाला. दृष्टान्तात मासेदोनियाच्या एका मनुष्याने त्याला अशी विनंती केली: “इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.” हा दृष्टान्त पाहताच, मासेदोनियातील लोकांना ‘सुवार्ता सांगावयास देवाने आपल्याला बोलावले आहे असा अनुमान’ पौलाने आणि त्याच्या सहप्रवाशांनी काढला. याचा परिणाम काय झाला? मासेदोनियातील फिलिप्पै या प्रमुख शहरात राहणाऱ्या लुदियाने व तिच्या सबंध घराण्याने ख्रिस्ती विश्वासाचा स्वीकार केला. यांच्या पाठोपाठ या रोमी प्रांतातील इतरांनी देखील ख्रिस्ती विश्वासाचा स्वीकार केला.—प्रे. कृत्ये १६:९-१५.
असाच आवेश आज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये देखील दिसून येतो. अनेकांनी राज्य प्रचारकांची नितान्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी स्वेच्छेने आणि स्वखर्चाने स्थलांतर केले आहे. उदाहरणार्थ, कॅनडाच्या लीसा या ख्रिस्ती बहिणीला आपल्या जीवनात सेवाकार्याला अधिक महत्त्व द्यायची इच्छा होती. त्यामुळे ती केनियाला राहायला गेली. मूळचे कॅनडाचे रहिवासी असलेले ट्रेवर व एमिली देखील सेवाकार्य वाढवण्याच्या उद्देशाने मलावीला जाऊन स्थायिक झाले. तर पॉल व मॅगी यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर या सुसंधीचा फायदा घेऊन यहोवाच्या सेवेतील सहभाग आणखीन वाढवण्याच्या उद्देशाने पूर्व आफ्रिकेला स्थलांतर केले. तुमच्यामध्येही अशी आत्मत्यागी वृत्ती आहे का? तुम्हालासुद्धा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करता येईल का? आणि तुमची अशी इच्छा असल्यास बायबलची कोणती तत्त्वे व व्यावहारिक मार्गदर्शन तुम्हाला साहाय्यक ठरू शकेल?
स्वतःचे परीक्षण करा
स्वतःचे परीक्षण करताना विचारात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे तुमचा हेतू. सर्वात मोठी आज्ञा कोणती हे सांगताना मत्त. २२:३६-३९; २८:१९, २०) परक्या देशात जाऊन सेवा करण्यासाठी सहसा बरीच मेहनत व आत्मत्याग करावा लागतो. पण, याकडे केवळ एक साहसी उपक्रम म्हणून पाहू नये. नवीन ठिकाणी जाऊन सेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला प्रेमामुळे मिळाली पाहिजे. सध्या नामिबियामध्ये सेवा करत असलेले नेदरलँड्झचे रेम्को आणि सूझाना म्हणतात: “केवळ प्रेमामुळे आम्ही आजपर्यंत टिकून आहोत.”
येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” नवीन ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी देवावरील प्रेमामुळे आणि शिष्य बनवण्याची कामगिरी पूर्ण करण्याच्या इच्छेमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. येशूने पुढे म्हटले: “हिच्यासारखी दुसरी [आज्ञा] ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.’” शेजाऱ्यांवर आपले प्रेम असल्यास त्यांना मदत करण्याची आपल्याला मनस्वी इच्छा असेल. (नामिबियात विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करणाऱ्या बंधू विलीने म्हटले: “जे बंधुभगिनी परदेशी क्षेत्रात टिकून आहेत, ते स्थानीय बांधव आपली काळजी घेतील या अपेक्षेनं आले नव्हते. तर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करण्याच्या, प्रचार कार्यात त्यांना मदत करण्याच्या इच्छेनं ते आले होते.”
आपल्या हेतूंचे परीक्षण केल्यावर स्वतःला विचारा: ‘परदेशी क्षेत्रात उपयोगी पडेल असा काही अनुभव माझ्याजवळ आहे का? मी सेवाकार्यात परिणामकारक आहे का? मला कोणकोणत्या भाषा बोलायला येतात? एखादी नवीन भाषा शिकून घेण्याची माझी तयारी आहे का?’ याविषयी आपल्या कुटुंबाशी प्रामाणिकपणे चर्चा करा. मंडळीतील वडिलांचा सल्ला घ्या. आणि मुख्य म्हणजे याविषयी यहोवाला प्रार्थना करा. अशा प्रकारे स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण केल्याने तुम्ही खरोखरच परदेशी क्षेत्रात जाऊन सेवा करू शकाल का व तसे करण्याचा तुमचा पक्का निर्धार आहे का हे पाहण्यास तुम्हाला मदत मिळेल.—“आपल्या परिस्थितीचे परीक्षण करा” ही चौकट पाहा.
सेवा कोठे करावी?
पौलाला मासेदोनियात जाण्याविषयी एका दृष्टान्ताद्वारे सांगण्यात आले होते. आज यहोवा अशा अलौकिक मार्गांनी आपले मार्गदर्शन करत नसला, तरी सदर नियतकालिकाद्वारे व इतर प्रकाशनांद्वारे प्रचारकांची नितान्त गरज असलेल्या अनेक क्षेत्रांविषयी देवाच्या लोकांना माहिती मिळते. तर प्रथम अशा स्थानांची यादी करा. एखादी नवीन भाषा शिकून घेणे कदाचित तुम्हाला शक्य नसेल किंवा नवीन देशात जास्त काळ राहण्याचा तुमचा इरादा नसेल. असे असल्यास, तुम्हाला बोलता येत असलेली भाषा प्रामुख्याने बोलली जाते अशा एखाद्या देशात स्थलांतर करण्याचा तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर व्हिसा मिळवण्याच्या अटी, त्या देशातील वाहतूक सेवा, सुरक्षा, सर्वसाधारण राहणीमान आणि हवामान या गोष्टींची माहिती काढा. तुमच्याआधी ज्यांनी अशा प्रकारचे स्थलांतर केले आहे अशांशी बोलल्याने देखील तुम्हाला बरीच उपयुक्त माहिती मिळू शकेल. या सर्व गोष्टी करत असताना नेहमी प्रार्थनाशील मनोवृत्ती बाळगा. हे लक्षात घ्या, की पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना ‘आशिया प्रांतात वचन सांगण्यास पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाला’ होता. त्यांनी बिथुनियास जाण्याचा प्रयत्न केला, तरी “येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही.” त्याचप्रमाणे, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सगळ्यात परिणामकारक योगदान करता येईल हे ठरवण्याकरता कदाचित काही वेळ लागू शकतो.—प्रे. कृत्ये १६:६-१०.
एव्हाना तुमच्या परिस्थितीला अनुरूप असणारे काही पर्याय तुमच्या लक्षात आले असतील. परदेशी क्षेत्रात जाऊन सेवा करण्याचा तुमचा विचार असल्यास याविषयी त्या देशांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पत्र लिहून कळवा. तुमच्याजवळ सध्या असलेले व पूर्वी मिळालेले सेवेचे विशेषाधिकार पत्रात नमूद करा. तसेच, त्या देशातील राहणीमान, निवासाची व्यवस्था, आरोग्य सेवा आणि नोकरीच्या संधी याविषयी काही खास प्रश्न असल्यास त्यांचाही पत्रात समावेश करा. मग, हे पत्र तुमच्या मंडळीच्या सेवा समितीला द्या. या पत्रासोबत सेवा समिती एक शिफारस पत्र जोडून तुम्ही सांगितलेल्या शाखा कार्यालयांना ते पाठवून देईल. तुमच्या पत्रांची उत्तरे मिळाल्यावर, तुम्ही सर्वात परिणामकारक योगदान कोठे देऊ शकाल हे तुम्हाला ठरवता येईल.
विली, ज्यांचा आधी उल्लेख करण्यात आला त्यांच्या पाहण्यात आले आहे, की “नवीन ठिकाणी जाऊन सेवा करण्यात यशस्वी ठरलेल्यांनी प्रथम त्या देशात जाऊन अशा काही ठिकाणांना भेट दिली जेथे व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांना आनंदाने सेवा करता येईल. एका जोडप्याच्या लक्षात आले, की शहरापासून दूर, अगदी दुर्गम भागात राहणे त्यांच्यासाठी फार गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे ते एका लहानशा शहरात स्थायिक झाले जेथे प्रचारकांची गरज तर होतीच, पण जेथे त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आनंदाने सेवा करणेही शक्य होणार होते.”
नवीन आव्हानांना तोंड देणे
घरापासून दूर, अनोळखी देशात राहायला गेल्यावर तुमच्यापुढे काही ना काही अडचणी तर येतीलच. याआधी ज्या बहिणीचा उल्लेख केला आहे ती लीसा म्हणते: “एकटेपणा कधीकधी खायला उठतो.” यावर ती कशा प्रकारे मात करते? नवीन क्षेत्रातील स्थानिक मंडळीच्या सहवासात राहणे तिच्याकरता साहाय्यक ठरले आहे. तिने नवीन मंडळीतील सगळ्यांची नावे आठवणीत ठेवण्याचा निश्चय केला. यासाठी ती सभांना लवकर यायची आणि सभा संपल्यानंतरही बंधुभगिनींशी बोलण्याकरता काही वेळ थांबायची. लीसाने अनेकांसोबत
क्षेत्र सेवेत काम केले, अनेकांना आपल्या घरी बोलावले व नवनवीन बंधुभगिनींशी मैत्री केली. ती म्हणते: “मला जे काही त्याग करावे लागले त्यांचा मला जरासुद्धा पस्तावा नाही. यहोवानं मला भरपूर आशीर्वाद दिले आहेत.”मुले मोठी झाल्यानंतर पॉल व मॅगी यांनी परदेशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ज्या घरात ते तब्बल ३० वर्षे राहिले होते ते त्यांना सोडावे लागले. पॉल म्हणतात: “वस्तू देऊन टाकणं आम्हाला वाटलं तितकं कठीण नव्हतं. पण घरच्यांना सोडून जाणं आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतकं जड गेलं. विमानात बसल्यावर आम्ही रड रड रडलो. मनात लगेच विचार आला, ‘नाही, आपल्याला हे जमणारच नाही.’ पण, आम्ही यहोवावर भरवसा ठेवला. नवनवीन मित्र जोडल्याने अनोळखी क्षेत्रातील सेवेत टिकून राहण्याचा तुमचा निर्धार आणखीन पक्का होतो.”
नामिबियाची अधिकृत भाषा इंग्रजी असल्यामुळे कॅनडाचे ग्रेग आणि क्रिस्टल यांनी त्या देशात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. पण, नंतर त्यांच्या लक्षात आले की तिथली स्थानिक भाषा शिकून घेणे फार उपयोगी पडेल. ते म्हणतात: “काही वेळा आम्ही खचून जायचो. पण, तिथली भाषा शिकून घेतल्यानंतरच आम्हाला त्यांच्या संस्कृतीची खरी ओळख घडली. स्थानिक बांधवांबरोबर मिळूनमिसळून राहिल्यामुळे नवीन परिसराशी जुळवून घेणं आम्हाला शक्य झालं.”
अशा विनम्र व उत्सुक मनोवृत्तीचा स्थानिक बंधुभगिनींवरही सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आयर्लंडमध्ये लहानाची मोठी झालेली जेनी, तिच्या देशात स्थलांतर केलेल्या काही कुटुंबांच्या प्रेमळ आठवणी सांगते. ती म्हणते: “तेच सहसा आतिथ्य करण्यात पुढे असायचे. ते सेवा करवून घ्यायला नव्हे, तर खऱ्या अर्थाने सेवा करायला आले होते. त्यांचा आवेश व आनंद पाहून माझ्याही मनात, जास्त गरज असलेल्या एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली.” जेनी आज आपल्या पतीसह गँबियामध्ये मिशनरी सेवा करत आहे.
“परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो”
मासेदोनियातील पौलाची सेवा खरोखरच किती समाधानदायक ठरली! सुमारे दहा वर्षांनंतर त्याने फिलिप्पै येथील बांधवांना लिहिले: “मला तुमची आठवण होते तेव्हा प्रत्येक वेळी मी माझ्या देवाची उपकारस्तुती करतो.”—फिलिप्पै. १:३, पं.र.भा.
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचे आमंत्रण मिळण्याआधी मलावीमध्ये सेवा करत असलेले ट्रेवर व एमिली देखील अशाच भावना व्यक्त करतात. ते म्हणतात: “आपण योग्य निर्णय घेतला का असा प्रश्न कधीकधी आमच्या मनात यायचा, पण आम्ही आनंदी होतो. आमचा आपसातील नातेसंबंध आणखी दृढ झाला आणि आमच्या सेवेवर यहोवाचा आशीर्वाद असल्याचं आम्ही अनुभवलं.” याआधी उल्लेख केलेले ग्रेग आणि क्रिस्टल म्हणतात: “आम्ही जे करत आहोत त्यात आम्ही पूर्ण समाधानी आहोत, दुसरं काही करण्याचा आम्ही विचारही करू इच्छित नाही.”
सगळ्यांनाच परदेशात जाऊन सेवा करणे शक्य होणार नाही हे मान्य आहे. काहींसाठी कदाचित आपल्याच देशात अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणे जास्त उपयुक्त ठरेल. तर, इतर जण आसपासच्या मंडळ्यांमध्ये जाऊन सेवा करण्याचे ध्येय ठेवू शकतात. शेवटी, यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. (कलस्सै. ३:२३) असे केल्यास, पुढील ईश्वरप्रेरित शब्द तुमच्या बाबतीतही खरे ठरतील: “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीति. १०:२२.
[५ पानांवरील चौकट/चित्र]
आपल्या परिस्थितीचे परीक्षण करा
परदेशात जाऊन सेवा करणे आपल्याला जमेल की नाही याचे परीक्षण करताना स्वतःला पुढील प्रश्न विचारा आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून हे शक्य होईल का याचा प्रामाणिकपणे व प्रार्थनापूर्वक विचार करा. याबाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी टेहळणी बुरूज व सावध राहा! यांतील जुन्या अंकांतील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.
• मी आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्ती आहे का?—“सौख्य मिळवण्याच्या योजना” (टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९७, पृष्ठ ६)
• मी सेवा कार्यात परिणामकारक आहे का?—“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे” (टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, २००२, पृष्ठ १०)
• घरच्यांना व मित्रमैत्रिणींना सोडून राहणे मला जमेल का?—“देवाच्या सेवेत असताना घरच्या ओढीचा सामना करणे” (टेहळणी बुरूज मे १५, १९९४, पृष्ठ २८)
• एखादी नवीन भाषा मी शिकू शकेन का?—“तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!” (सावध राहा! एप्रिल २००७, पृष्ठ १२)
• दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे आर्थिकदृष्ट्या मला जमेल का?—“परदेशात सेवा करायला तुम्हाला आवडेल का?” (टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९९, पृष्ठ २३)
[६ पानांवरील चित्र]
विनम्र व उत्सुक मनोवृत्तीचा स्थानिक बंधुभगिनींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो
[७ पानांवरील चित्र]
जे इतरांची सेवा करण्याच्या हेतूने येतात तेच सहसा यशस्वी ठरतात