व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताचा खरा अनुयायी असल्याचे दाखवा

ख्रिस्ताचा खरा अनुयायी असल्याचे दाखवा

ख्रिस्ताचा खरा अनुयायी असल्याचे दाखवा

“प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.”—मत्त. ७:१७.

१, २. या शेवटल्या काळात, खरे व खोटे ख्रिस्ती यांच्यातला फरक स्पष्टपणे कसा दिसून येतो?

 आपण येशूचे अनुयायी आहोत असे जे नुसतेच म्हणतात त्यांच्यामधील व त्याच्या खऱ्‍या अनुयायांमधील फरक त्यांच्या फळांवरून म्हणजे त्यांच्या शिकवणींवरून आणि त्यांच्या आचरणावरून दिसून येईल असे येशूने म्हटले होते. (मत्त. ७:१५-१७, २०) खरोखर, लोक ज्या गोष्टी आपल्या मनात व अंतःकरणात भरतात त्या गोष्टींचा त्यांच्या वागणुकीवर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. (मत्त. १५:१८, १९) ज्यांचे भरणपोषण खोट्या शिकवणींवर झाले आहे ते “वाईट फळ” उत्पन्‍न करतात, पण ज्यांना आध्यात्मिक सत्य शिकवण्यात आले आहे ते “चांगले फळ” उत्पन्‍न करतात.

ही दोन प्रकारची फळे या शेवटल्या काळात स्पष्टपणे दिसून आली आहेत. (दानीएल १२:३, १० वाचा.) खोट्या ख्रिश्‍चनांचा देवाबद्दल चुकीचा दृष्टिकोन असून ते सुभक्‍तीचा केवळ आव आणतात. दुसरीकडे पाहता, ज्यांना देवाविषयी योग्य समज आहे ते त्याची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करतात. (योहा. ४:२४; २ तीम. ३:१-५) आपल्या जीवनात ते ख्रिस्ताच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काय म्हणता येईल? खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ओळखण्यासाठी पुढे दिलेल्या पाच चिन्हांबद्दल विचार करताना स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘माझे आचरण आणि मी जे शिकवतो ते देवाच्या वचनाशी पूर्णपणे जुळते का? मी ज्या प्रकारे वागतो-बोलतो त्यामुळे प्रामाणिक मनाचे लोक सत्याकडे आकर्षित होतात का?’

देवाच्या वचनानुसार आचरण करा

३. यहोवाचे मन कशामुळे आनंदित होते आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी यात कशाचा समावेश होतो?

येशूने म्हटले, “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” (मत्त. ७:२१) होय, यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी आपण ख्रिस्ती आहोत असे केवळ म्हणणे पुरेसे नाही, तर एका खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीप्रमाणे वागणे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ताचे खरे अनुयायी आपले संपूर्ण जीवनच अशा पद्धतीने जगतात. यात पैसा, नोकरी-व्यवसाय, करमणूक, जगातील चालीरिती, खास दिन व उत्सव, तसेच विवाह व इतर नातेसंबंध या सर्व गोष्टींविषयी असलेली त्यांची मनोवृत्तीही समाविष्ट आहे. पण, खोटे ख्रिस्ती मात्र या शेवटल्या काळात आणखीनच भ्रष्ट होत चाललेली जगाची विचारसरणी व जीवनशैली आत्मसात करतात.—स्तो. ९२:७.

४, ५. आपण मलाखी ३:१८ मध्ये असलेले यहोवाचे शब्द जीवनात कशा प्रकारे लागू करू शकतो?

म्हणून, संदेष्टा मलाखी याने लिहिले: “मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.” (मला. ३:१८) मलाखीच्या शब्दांवर मनन करताना स्वतःला विचारा: ‘मी जगातल्या लोकांसारखाच आहे का, की मी त्यांच्यापेक्षा वेगळा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते? शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी माझ्या सोबत्यांनी मला स्वीकारावे म्हणून मी त्यांच्यासारखाच होण्याचा प्रयत्न करतो का? की बायबलमधील तत्त्वांसंबंधी तडजोड करण्यास मी स्पष्टपणे नकार देतो आणि संधी मिळाल्यास हे बोलूनही दाखवतो?’ (१ पेत्र ३:१६ वाचा.) अर्थातच, आपण इतरांपेक्षा धार्मिक आहोत असे दाखवण्याची आपली इच्छा नाही, पण यहोवावर ज्यांचे प्रेम नाही व जे त्याची सेवा करत नाहीत त्यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे दिसून आले पाहिजे.

आपल्या आचरणात आणखी सुधार करावा लागेल असे तुम्हाला जाणवल्यास, त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करू शकता. तसेच, बायबल अभ्यास, प्रार्थना व सभांमध्ये नियमित उपस्थित राहण्याद्वारे आध्यात्मिक रीत्या आणखी दृढ होण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही जितके जास्त देवाच्या वचनानुसार वागता तितके जास्त तुम्हाला “चांगले फळ” व “[देवाचे] नाव पत्करणाऱ्‍या ओठांचे फळ” उत्पन्‍न करता येईल.—इब्री १३:१५.

देवाच्या राज्याचा प्रचार करा

६, ७. राज्य संदेशाच्या बाबतीत पाहिल्यास, खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये व खोट्या ख्रिश्‍चनांमध्ये कोणता फरक पाहायला मिळतो?

येशूने म्हटले: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) आपल्या सेवाकार्यात त्याने देवाच्या राज्यावर सर्वाधिक भर का दिला? त्याला माहीत होते की त्या राज्याचा राजा या नात्याने तो आणि पुनरुत्थान झालेले त्याचे आत्म्याने अभिषिक्‍त बांधव मानवजातीच्या दुःखाची मूळ कारणे अर्थात पाप आणि दियाबल सैतान यांना नाहीसे करतील. (रोम. ५:१२; प्रकटी. २०:१०) म्हणून, त्याने आपल्या अनुयायांना या जगाचा शेवट होईपर्यंत त्या राज्याची घोषणा करत राहण्याची आज्ञा दिली. (मत्त. २४:१४) जे लोक आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत असे नुसतेच म्हणतात ते या कार्यात भाग घेत नाहीत, खरेतर त्यांना हे जमणारच नाही. का? याची कमीतकमी तीन कारणे देता येतील: पहिले, त्यांना जे समजलेले नाही त्याबद्दल ते प्रचार करू शकत नाहीत. दुसरे, लोकांना राज्याचा संदेश सांगितल्यामुळे जी थट्टा व विरोध सहन करावा लागू शकतो त्यास तोंड देण्याइतकी नम्रता व धैर्य त्यांच्यापैकी बहुतेकांजवळ नाही. (मत्त. २४:९; १ पेत्र २:२३) आणि तिसरे कारण म्हणजे, खोट्या ख्रिश्‍चनांजवळ देवाचा आत्मा नाही.—योहा. १४:१६, १७.

दुसरीकडे पाहता, देवाचे राज्य काय आहे आणि ते राज्य काय साध्य करेल हे ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांना समजलेले आहे. शिवाय, ते आपल्या जीवनात राज्याशी संबंधित कार्यांना प्राधान्य देतात आणि यहोवाच्या आत्म्याच्या मदतीने जगभरात त्या राज्याची घोषणा करतात. (जख. ४:६) तुम्ही या कार्यात नियमितपणे भाग घेत आहात का? तुम्ही सेवाकार्यात आणखी सुधार करण्याचा प्रयत्न करत आहात का? उदाहरणार्थ, सेवाकार्यात जास्त भाग घेण्याद्वारे किंवा सेवाकार्यात जास्त परिणामकारक होण्याचा प्रयत्न करण्याद्वारे तुम्हाला असे करता येईल. काहींनी सेवाकार्यात बायबलचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याद्वारे आपल्या सेवाकार्याची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. तो नेहमी शास्त्रवचनांच्या आधारावरच युक्‍तिवाद करत असे.—इब्री ४:१२; प्रे. कृत्ये १७:२, ३.

८, ९. (क) क्षेत्र सेवेत बायबलचा वापर करण्याचे महत्त्व कोणत्या अनुभवांवरून स्पष्ट होते? (ख) देवाच्या वचनाचा वापर करण्यात आपण आणखी कुशल कसे होऊ शकतो?

घरोघरचे साक्षकार्य करताना एका बांधवाने एका कॅथलिक माणसाला दानीएल २:४४ वाचून दाखवले आणि देवाच्या राज्याद्वारे कशा प्रकारे खरी शांती व सुरक्षितता येईल हे स्पष्ट केले. त्या माणसाने म्हटले: “या वचनात काय सांगितलंय हे स्वतःच सांगण्याऐवजी तुम्ही बायबल उघडून मला ते दाखवलं ही गोष्ट मला खूप आवडली.” एका बांधवाने ग्रीक ऑर्थोडॉक्स धर्म मानणाऱ्‍या एका स्त्रीला बायबलमधून एक वचन वाचून दाखवले, तेव्हा तिने अनेक अर्थपूर्ण प्रश्‍न विचारले. या बांधवाने व त्याच्या पत्नीनेही बायबलमधून त्या स्त्रीच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. नंतर त्या स्त्रीने म्हटले: “मी तुमच्याशी बोलायला का तयार झाले, खरंच सांगू का? तुम्ही माझ्या घरी बायबल घेऊन आलात, आणि त्यातून वाचून दाखवलं म्हणून.”

अर्थातच, आपली प्रकाशनेही महत्त्वाची आहेत आणि क्षेत्र सेवेत आपण ती अवश्‍य सादर करावीत. पण, बायबल हे आपले सर्वात महत्त्वाचे अवजार आहे. तेव्हा, यापूर्वी जर तुम्ही क्षेत्र सेवेत नियमितपणे बायबलचा वापर करत आला नसाल, तर यापुढे तुम्हाला हे ध्येय ठेवता येईल का? देवाचे राज्य काय आहे आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्‍या विशिष्ट समस्या ते कशा प्रकारे सोडवेल हे स्पष्ट करणाऱ्‍या काही मुख्य वचनांची निवड करा. आणि घरोघरचे सेवाकार्य करत असताना ती वाचून दाखवण्यास तयार असा.

अभिमानाने देवाचे नाव धारण करा

१०, ११. देवाचे नाव वापरण्याच्या बाबतीत, येशूची मनोवृत्ती व त्याचे अनुयायी असण्याचा दावा करणाऱ्‍या अनेकांची मनोवृत्ती यात काय फरक आहे?

१० “तुम्ही माझे साक्षी आहा आणि मीच देव आहे, असे यहोवा म्हणतो.” (यश. ४३:१२, पं.र.भा.) यहोवाचा सर्वात मुख्य साक्षीदार असलेल्या येशू ख्रिस्ताने, देवाचे नाव धारण करणे आणि ते नाव इतरांना कळवणे ही एक सन्मानाची गोष्ट असल्याचे मानले. (निर्गम ३:१५; योहान १७:६; इब्री लोकांस २:१२ वाचा.) खरेतर, येशूने आपल्या पित्याच्या नावाची घोषणा केल्यामुळेच त्याला “विश्‍वसनीय साक्षी” म्हणण्यात आले.—प्रकटी. १:५; मत्त. ६:९.

११ या उलट, देवाचे व त्याच्या पुत्राचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्‍यांनी देवाच्या नावाबद्दल लज्जास्पद मनोवृत्ती दाखवली आहे. त्यांनी तर त्यांच्या बायबल आवृत्तींमधून देवाचे नावच काढून टाकले आहे. कॅथलिक बिशपना अलीकडेच पाठवण्यात आलेल्या एका पत्रातूनही अशाच प्रकारची मनोवृत्ती दिसून येते. उपासनेत “यहवह (YHWH) या चार अक्षरांच्या स्वरूपात असलेल्या देवाच्या नावाचा वापर करू नये व त्याचा उच्चारही करू नये,” असे निर्देशन या पत्रातून देण्यात आले. * अशी विचारसरणी किती निंदनीय आहे!

१२. यहोवा या नावाशी निगडीत असलेली त्याच्या सेवकांची ओळख १९३१ साली कशा प्रकारे अधिकच स्पष्ट झाली?

१२ ख्रिस्ताचे व “मोठ्या साक्षीरूपी” मेघाप्रमाणे त्याच्या आधी अस्तित्वात असलेल्या देवाच्या सेवकांचे अनुकरण करून आज खरे ख्रिस्ती अभिमानाने देवाच्या नावाचा वापर करतात. (इब्री १२:१) खरेतर, १९३१ साली, देवाच्या सेवकांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले, तेव्हा यहोवा या नावाशी निगडीत असलेली त्यांची ओळख अधिकच स्पष्ट झाली. (यशया ४३:१०-१२ वाचा.) अशा प्रकारे, एका अतिशय खास अर्थाने ख्रिस्ताचे खरे अनुयायी ‘[देवाचे] नाव देण्यात आलेले’ लोक बनले.—प्रे. कृत्ये १५:१४, १७.

१३. आपण धारण केलेल्या खास नावाच्या लायक ठरण्याकरता आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो?

१३ आपण धारण केलेल्या खास नावाच्या लायक ठरण्याकरता आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो? यासाठी आपण देवाबद्दल विश्‍वासूपणे साक्ष दिली पाहिजे. पौलाने असे लिहिले: “जो कोणी प्रभुचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील?” (रोम. १०:१३-१५) देवाबद्दल साक्ष देण्यासोबतच, आपल्या निर्माणकर्त्याची बदनामी करणाऱ्‍या नरकाग्नीसारख्या खोट्या धार्मिक शिकवणींचा आपण कुशलतेने पर्दाफाश केला पाहिजे. कारण, अशा शिकवणींतून आपला प्रेमळ देव सैतानासारखा क्रूर असल्याचे शिकवण्यात येते.—यिर्म. ७:३१; १ योहा. ४:८; मार्क ९:१७-२७ पडताळून पाहा.

१४. देवाचे नाव पहिल्यांदा ऐकल्यावर काही लोकांची प्रतिक्रिया काय होती?

१४ आपल्या स्वर्गातील पित्याचे नाव धारण करण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? हे पवित्र नाव जाणून घेण्यासाठी तुम्ही इतरांनाही मदत करता का? यहोवाच्या साक्षीदारांना देवाचे नाव माहीत असल्याचे फ्रान्समधील पॅरिस शहरात राहणाऱ्‍या एका स्त्रीला कळले. त्यामुळे, साक्षीदारांपैकी एका बहिणीची भेट होताच तिने स्वतःच्या बायबलमधून देवाचे नाव दाखवण्याची त्या बहिणीला विनंती केली. बायबलमधून स्तोत्र ८३:१८ वाचून ती कमालीची प्रभावित झाली. तिने बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता ती दुसऱ्‍या एका देशात विश्‍वासूपणे देवाची सेवा करत आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्‍या एका कॅथलिक स्त्रीने बायबलमध्ये पहिल्यांदा देवाचे नाव पाहिले तेव्हा तिला इतका आनंद झाला की तिला अश्रू आवरले नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून ती नियमित पायनियर सेवा करत आहे. अलीकडेच, जमेकातील एका स्त्रीला तेथील साक्षीदारांनी तिच्या बायबलमधून देवाचे नाव दाखवले तेव्हा तिच्याही डोळ्यांत आनंदाश्रू आले. म्हणून, देवाचे नाव धारण करण्याचा अभिमान बाळगा आणि येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून या अनमोल नावाविषयी सर्वांना सांगा.

“जगावर . . . प्रीति करू नका”

१५, १६. या जगाबद्दल खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय आहे, आणि आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१५ “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही.” (१ योहा. २:१५) हे जग व या जगाचा आत्मा यहोवाचा व त्याच्या पवित्र आत्म्याचा विरोध करतात. म्हणून, ख्रिस्ताचे खरे अनुयायी या जगाचे भाग होण्याचे फक्‍त टाळत नाहीत, तर त्याचा मनापासून धिक्कार करतात. कारण, शिष्य याकोबाने लिहिल्याप्रमाणे, त्यांना माहीत आहे की “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.”—याको. ४:४.

१६ आपल्यापुढे असंख्य प्रलोभने आणणाऱ्‍या या जगात याकोबाच्या सल्ल्याचे पालन करणे आव्हानात्मक असू शकते. (२ तीम. ४:१०) म्हणून येशूने आपल्या अनुयायांसाठी अशी प्रार्थना केली: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहा. १७:१५, १६) स्वतःला विचारा: ‘जगाचा भाग न होण्याचा मी मनःपूर्वक प्रयत्न करतो का? बायबलशी सुसंगत नसलेल्या, तसेच जे खोट्या धर्मांतून आलेले नसले, तरी ज्यांतून जगाचा आत्मा अगदी स्पष्टपणे दिसून येतो अशा सणावारांविषयी व चालीरितींविषयी माझी भूमिका इतर लोकांना माहीत आहे का?’—२ करिंथ. ६:१७; १ पेत्र ४:३, ४.

१७. यहोवाचा पक्ष घेण्यास प्रामाणिक मनाचे लोक कोणत्या गोष्टीमुळे प्रवृत्त होऊ शकतात?

१७ हे खरे आहे की आपण बायबलमधील शिकवणींनुसार जगत असल्यामुळे जगातले बहुतेक लोक आपल्याबद्दल पसंती दर्शवणार नाहीत. पण, यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांच्या मनात कुतूहल निर्माण होऊ शकते. आपला विश्‍वास शास्त्रवचनांवर आधारित आहे आणि आपण बायबलमधील शिकवणींनुसार जगतो हे प्रामाणिक मनाचे लोक पाहतात, तेव्हा ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जणू असे म्हणण्यास प्रवृत्त होऊ शकतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.

खरे ख्रिस्ती प्रेम दाखवा

१८. यहोवाबद्दल व शेजाऱ्‍यांबद्दल प्रेम दाखवण्यात काय समाविष्ट आहे?

१८ येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर” आणि “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्त. २२:३७, ३९) हे प्रेम (ग्रीक भाषेत अगापे) नैतिकतेवर आधारित असते. ते कर्तव्य, योग्य व अयोग्य यासंबंधीची तत्त्वे आणि उचितपणा लक्षात घेऊन व्यक्‍त केले जाते. पण त्यात भावनांचा अजिबातच समावेश नसतो असे नाही. तर, या प्रकारचे प्रेमही उत्कटतेने व मनापासून दाखवले जाऊ शकते. (१ पेत्र १:२२) हे प्रेम स्वार्थीपणाच्या अगदी उलट आहे, कारण हे निःस्वार्थ शब्दांतून व कृतींतून प्रदर्शित होते.१ करिंथकर १३:४-७ वाचा.

१९, २०. ख्रिस्ती प्रेमात किती ताकद आहे हे दाखवणारे काही अनुभव सांगा.

१९ प्रेम देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारा एक गुण असल्यामुळे, इतर लोक जे करू शकत नाहीत ते करण्यास हे प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांना साहाय्य करते. उदाहरणार्थ, प्रेमामुळेच त्यांना वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय भेदभावांवर मात करणे शक्य झाले आहे. (योहान १३:३४, ३५ वाचा; गलती. ५:२२) मेंढरांसमान लोक हे प्रेम व्यक्‍त होताना पाहतात, तेव्हा ते त्यांच्या काळजाला भिडते. उदाहरणार्थ, इझरायलमध्ये एक यहुदी तरुण पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेला, तेव्हा तेथे यहुदी व अरब बांधव सोबत मिळून यहोवाची उपासना करत असल्याचे पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. परिणामस्वरूप, तो नियमितपणे सभांना उपस्थित राहू लागला व त्याने बायबल अभ्यास स्वीकारला. तुम्ही देखील आपल्या बांधवांबद्दल मनापासून प्रेम व्यक्‍त करता का? आणि राज्य सभागृहात येणाऱ्‍या नवीन लोकांचे, मग त्यांचा देश, वर्ण किंवा समाजातील स्थान काहीही असो, तुम्ही मनापासून स्वागत करण्याचा प्रयत्न करता का?

२० खरे ख्रिस्ती या नात्याने आपण सर्वांबद्दल प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतो. एल साल्वाडॉरमध्ये एक तरुण साक्षीदार बहीण, ८७ वर्षांच्या एका कॅथलिक स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास करायची. ती स्त्री आपल्या चर्चला अगदी एकनिष्ठ होती. एक दिवस ती आजारी पडल्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यातून घरी परतल्यावर, साक्षीदार तिला भेटायला गेले आणि तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. असे जवळजवळ महिनाभर चालले. पण, तिच्या चर्चमधून कोणीही तिला भेटायला आले नाही. परिणाम? तिने घरातील सर्व मूर्ती काढून टाकल्या, चर्चला राजीनामा दिला आणि पुन्हा बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. होय, खऱ्‍या ख्रिस्ती प्रेमात खूप ताकद आहे. कधीकधी शब्दांनी जितका गहिरा प्रभाव अंतःकरणावर पडू शकत नाही तितका प्रभाव ख्रिस्ती प्रेमामुळे पडतो!

२१. आपण आपले भविष्य कशा प्रकारे सुरक्षित करू शकतो?

२१ लवकरच, ख्रिस्ती असल्याचा खोटा दावा करणाऱ्‍यांना येशू असे म्हणेल: “मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्त. ७:२३) म्हणून आपण पित्याचा व त्याच्या पुत्राचा सन्मान करणारे फळ उत्पन्‍न करू या. येशूने म्हटले: “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले.” (मत्त. ७:२४) होय, आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी असल्याचे दाखवून दिल्यास, आपल्याला देवाची संमती प्राप्त होईल आणि खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे आपले भविष्य सुरक्षित होईल!

[तळटीप]

^ परि. 11 काही आधुनिक कॅथलिक प्रकाशनांत, उदाहरणार्थ, मराठी कॉमन लँग्वेज बायबल यात देवाच्या नावाच्या चार इब्री भाषेतील अक्षरांचे “याहवे” असे भाषांतर करण्यात आले आहे.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ताचे खरे अनुयायी खोट्या ख्रिश्‍चनांपेक्षा कशा प्रकारे वेगळे आहेत?

• खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख करून देणारी काही ‘फळे’ कोणती आहेत ते सांगा.

• ख्रिस्ती गुण विकसित करण्यासाठी तुम्हाला कोणती ध्येये ठेवता येतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

क्षेत्र सेवेत तुम्ही नियमितपणे बायबलचा वापर करता का?

[१५ पानांवरील चित्र]

बायबलशी सुसंगत नसलेल्या सणावारांविषयी तुमची भूमिका इतर लोकांना माहीत आहे का?