व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सैतानाचे शासन यशस्वी ठरणारच नाही

सैतानाचे शासन यशस्वी ठरणारच नाही

सैतानाचे शासन यशस्वी ठरणारच नाही

“दुष्टाचे कल्याण होणार नाही.”—उप. ८:१३.

१. दुष्टांचा लवकरच न्यायनिवाडा केला जाईल हे जाणून आपल्याला दिलासा का मिळतो?

 आज न उद्या दुष्टांना देवाच्या न्यायासनासमोर उभे राहावेच लागेल. त्यांना आपल्या कृत्यांचा जाब द्यावाच लागेल. (नीति. ५:२२; उप. ८:१२, १३) जे नीतिमत्त्वाची आवड धरतात आणि ज्यांना दुष्टांकडून अन्याय व वाईट वागणूक सहन करावी लागलेली आहे त्यांना हे जाणून निश्‍चितच दिलासा मिळतो. ज्यांचा न्याय करण्यात येईल त्यांपैकी सर्वात प्रमुख दियाबल सैतान आहे कारण तोच सर्व दुष्टाईचा उगम आहे.—योहान ८:४४.

२. एदेन बागेत उठवलेल्या वादाचा निकाल लावण्यासाठी वेळ का द्यावा लागणार होता?

मानव इतिहासाच्या सुरुवातीला एदेन बागेत, गर्विष्ठपणाच्या भावनांनी पछाडलेल्या सैतानाने मानवांना यहोवाचे आधिपत्य झुगारून देण्यास प्रवृत्त केले. परिणामस्वरूप, आपले पहिले मातापिता यहोवाच्या न्याय्य अधिकाराविरुद्ध बंड करण्यात सैतानासोबत सामील झाले आणि अशा रीतीने देवाच्या नजरेत पापी बनले. (रोम. ५:१२-१४) यहोवाचा अनादर व त्याच्याविरुद्ध विद्रोह केल्यामुळे त्यांना कोणता दुष्परिणाम भोगावा लागेल याची यहोवाला आधीच कल्पना होती. पण, न टाळता येणारा हा परिणाम सर्व बुद्धिमान प्राण्यांपुढे उघड करणे आवश्‍यक होते. त्यामुळे, देवाच्या आधिपत्याविषयी उठवण्यात आलेला हा वाद मिटवण्यासाठी, तसेच, विद्रोह करणाऱ्‍यांनी केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा लागणार होता.

३. मानवी सरकारांबद्दल आपली भूमिका काय आहे?

देवाचे वर्चस्व नाकारल्यामुळे मानवांना स्वतःहूनच निरनिराळ्या प्रकारच्या शासनपद्धती स्थापन करणे भाग होते. रोममधील बांधवांना लिहिताना प्रेषित पौलाने अशा मानवी सरकारांना ‘वरिष्ठ अधिकारी’ म्हटले. पौलाच्या काळात, हे वरिष्ठ अधिकारी म्हणजे, सा.यु. ५४-६८ या काळात राज्य करणाऱ्‍या सम्राट नीरो याच्या वर्चस्वाखालील रोमी सरकार होते. पौलाने म्हटले की हे वरिष्ठ अधिकारी “देवाने नेमलेले आहेत.” (रोमकर १३:१, २ वाचा.) पौलाच्या म्हणण्याचा असा अर्थ होता का, की मानवी शासन देवाच्या शासनापेक्षा श्रेष्ठ आहे? मुळीच नाही. उलट, तो इतकेच सांगू इच्छित होता, की जोपर्यंत यहोवा मानवी शासन अस्तित्वात राहू देईल तोपर्यंत ख्रिश्‍चनांनी “देवाच्या व्यवस्थेस” आदर दाखवून या शासकांच्या अधीन राहिले पाहिजे.

अनर्थाकडे नेणारा मार्ग

४. मानवी शासन अयशस्वी ठरेल असे खातरीने का म्हणता येईल ते स्पष्ट करा.

असे असले तरी, सैतानाच्या प्रभावाखालील मानवी शासन अयशस्वी ठरेल हे आपण खातरीने म्हणू शकतो. का? कारण पहिली गोष्ट म्हणजे, मानव देवाच्या मार्गदर्शनानुसार, त्याच्या बुद्धीवर अवलंबून राहून शासन करत नाहीत. परिपूर्ण बुद्धी केवळ यहोवाजवळ आहे. त्यामुळे, यशस्वी रीत्या शासन कसे करावे याविषयी विश्‍वासार्ह मार्गदर्शन केवळ तोच देऊ शकतो. (यिर्म. ८:९; रोम. १६:२७) यहोवा हा वारंवार चुका करून धडे शिकणाऱ्‍या मानवांसारखा नाही. कोणत्याही परिस्थितीत सर्वात उत्तम मार्ग कोणता हे त्याला ठाऊक असते. त्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनाचे पालन न करणारी सरकारे निकामी ठरतील हे अपेक्षितच आहे. या एका मुख्य कारणासोबतच आणखी एक कारण म्हणजे मानवी सरकारांच्या माध्यमाने शासन करण्यामागे सैतानाचा मुळात एक दुष्ट हेतू होता. आणि म्हणूनच, त्याचे शासन यशस्वी होणार नाही हे आधीपासूनच ठरलेले होते.

५, ६. सैतान कशामुळे यहोवाच्या विरोधात उभा राहिला?

एखादे कार्य यशस्वी ठरूच शकत नाही हे माहीत असल्यास सहसा कोणताही शहाणा माणूस त्यात पडणार नाही. आणि जर हे माहीत असूनही एखाद्याने ते कार्य हाती घेण्याचा अट्टहास केला तर लवकरच त्याला आपली चूक कबूल करावी लागेल. सर्वसमर्थ सृष्टिकर्त्याच्या विरोधात उभा राहणारा कोणीही यशस्वी होऊच शकत नाही हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध करून दाखवले आहे. (नीतिसूत्रे २१:३० वाचा.) पण, सैतानाने मात्र गर्विष्ठ व अहंकारी भावनांच्या आहारी जाऊन यहोवाविरुद्ध बंड केला. आणि अशा प्रकारे त्याने जाणूनबुजून असा मार्ग निवडला ज्याचा परिणाम अनर्थाशिवाय आणखी काहीच असू शकत नव्हता.

सैतानाची अहंकारी वृत्ती कालांतराने बॅबिलोनच्या एका राजाच्या मनोवृत्तीतून प्रतिबिंबित झाली. त्या गर्विष्ठ राजाने असे म्हटले: “मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन; मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन.” (यश. १४:१३-१५) त्या अविचारी राजाचे मनसुबे धुळीस मिळाले आणि बॅबिलोनच्या राजघराण्याचा लज्जास्पद अंत झाला. त्याच प्रकारे लवकरच सैतानाचा व त्याच्या जगाचाही पूर्णपणे पराजय होईल.

देवाने परवानगी का दिली?

७, ८. यहोवाने तात्पुरत्या काळासाठी दुष्टाईला परवानगी दिल्यामुळे मानवांना कोणते फायदे झाले आहेत?

मानवांनी सैतानाची बाजू घेतल्यास व देवापासून स्वतंत्र होऊन शासन केल्यास ते कधीही यशस्वी होणार नाहीत हे माहीत असताना यहोवाने त्यांना असे करण्याची परवानगीच का दिली, असा कदाचित काही जण विचार करतील. अर्थात, सर्वसमर्थ असल्यामुळे यहोवा निश्‍चितच त्यांना असे करण्यापासून रोखू शकला असता. (निर्ग. ६:३) पण त्याने असे केले नाही. त्याच्याजवळ असलेल्या अफाट बुद्धीमुळे त्याने ओळखले की दीर्घ पल्ल्याचा विचार करता, मानवाच्या विद्रोहात तात्पुरत्या काळासाठी हस्तक्षेप न करणेच सर्वात उत्तम ठरेल. यामुळे, शेवटी यहोवा एक नीतिमान व प्रेमळ शासक असल्याचे कायमचे सिद्ध केले जाईल आणि देवाला विश्‍वासू राहणाऱ्‍या लोकांना त्याच्या या निर्णयामुळे फायदा होईल हे यहोवाला माहीत होते.

मानवांनी सैतानाच्या फूसलावणीला जुमानले नसते आणि देवाच्या शासनाचा अव्हेर करण्यास नकार दिला असता तर मानवजातीला आजपर्यंत इतके दुःख व कष्ट सोसावे लागले नसते! पण, मानवांना देवापासून स्वतंत्र होऊन शासन चालवण्याची परवानगी देण्याच्या यहोवाच्या निर्णयामुळे काही फायदे देखील झाले आहेत. या निर्णयामुळे, देवाच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यात व त्याच्यावर भरवसा ठेवण्यातच शहाणपण आहे हे सत्य न्यायप्रिय लोकांच्या मनात खोलवर रुजले आहे. गेल्या अनेक शतकांत, मानवांनी निरनिराळ्या प्रकारच्या शासनपद्धती अजमावून पाहिल्या. पण त्यांपैकी कोणतीही शासनपद्धती आदर्श ठरलेली नाही. या वस्तुस्थितीमुळे यहोवाचेच शासन सर्वात उत्तम आहे यावर देवाच्या सेवकांचा भरवसा आणखी मजबूत झाला आहे. हे खरे आहे, की सैतानाचे दुष्ट शासन अस्तित्वात राहू दिल्यामुळे सर्वसामान्य मानवजातीला व जे विश्‍वासूपणे देवाची उपासना करतात त्यांना देखील अनेक प्रकारे दुःख सोसावे लागले. तरीपण, यहोवाने तात्पुरत्या काळासाठी दुष्टाईला दिलेली परवानगी त्याच्या या विश्‍वासू सेवकांसाठी काही दृष्टींनी लाभदायक ठरली आहे.

सैतानाच्या विद्रोहामुळे यहोवाचा गौरव

९, १०. सैतानाच्या शासनामुळे कशा प्रकारे यहोवाचा गौरव होतो ते सांगा.

मानवांना सैतानाच्या प्रभावाखाली शासन करण्याची परवानगी दिल्यामुळे यहोवाच्या शासनाचे महत्त्व कमी झाले आहे का? मुळीच नाही. खरे पाहता याच्या उलटच घडले आहे! यिर्मयाने देवाच्या प्रेरणेने लिहिल्याप्रमाणे, मानव देवापासून स्वतंत्र होऊन शासन करण्यास असमर्थ आहे हे आजवरच्या इतिहासाने दाखवून दिले आहे. (यिर्मया १०:२३ वाचा.) शिवाय, सैतानाच्या विद्रोहामुळे यहोवाला आपले अप्रतिम गुण अधिक उल्लेखनीय प्रकारे प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. असे का म्हणता येईल?

१० सैतानाच्या शासनामुळे घडलेले भयंकर परिणाम आज आपण सर्वत्र पाहू शकतो. या पार्श्‍वभूमीवर यहोवाचे परिपूर्ण गुण आपल्याला अधिकच स्पष्टपणे दिसतात. यामुळे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांच्या मनात त्याच्याविषयी असलेला आदर कैकपटीने वाढला आहे. हा कदाचित विरोधाभास वाटेल, पण सैतानाच्या शासनपद्धतीमुळे खरे तर देवाचा गौरवच झाला आहे. यहोवाच्या आधिपत्याविषयी सैतानाने वाद उपस्थित केला तेव्हा यहोवाने ती परिस्थिती किती उत्कृष्ट रीत्या हाताळली हे यामुळे सर्वांसमोर आले आहे. ही गोष्ट आणखी स्पष्टपणे समजून घेण्याकरता आपण आता थोडक्यात यहोवाच्या काही गुणांविषयी चर्चा करू या. आणि सैतानाच्या दुष्ट शासनामुळे यहोवा कशा प्रकारे हे गुण आणखी उल्लेखनीय रीत्या प्रदर्शित करण्यास प्रवृत्त झाला हे आपण पाहू या.

११. यहोवाने मानवांबद्दल प्रेम कशा प्रकारे प्रदर्शित केले?

११ प्रेम. बायबल आपल्याला सांगते की “देव प्रीति आहे.” (१ योहा. ४:८) खरेतर, प्रेमामुळेच देवाने मानवांची निर्मिती केली. शिवाय, आपल्याला ज्या अद्‌भुत व विस्मयकारक रीतीने निर्माण करण्यात आले आहे त्यावरूनही देवाच्या प्रेमाची प्रचिती येते. यहोवाने प्रेमळपणे मानवांना एक सुंदर निवासस्थान दिले आणि आनंदी जीवनाकरता आवश्‍यक असणारे सर्व काही पुरवले. (उत्प. १:२९-३१; २:८, ९; स्तो. १३९:१४-१६) पण, मानव कुटुंबात दुष्टतेचा शिरकाव झाल्यावर, यहोवाने आपले प्रेम काही नवीन मार्गांनी व्यक्‍त केले. ते कसे? याचे उत्तर प्रेषित योहानाने उद्धृत केलेल्या येशूच्या शब्दांतून मिळते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) आपल्या एकुलत्या एका पुत्राला देवाने पापी लोकांच्या खंडणीकरता पृथ्वीवर पाठवले. मानवजातीबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याचा यापेक्षा उल्लेखनीय मार्ग कोणता असू शकत होता? (योहा. १५:१३) देवाने या अद्‌भुत मार्गाने आपले प्रेम व्यक्‍त करण्याद्वारे मानवांसमोर एक आदर्श ठेवला. देवाने व येशूने दाखवलेले निःस्वार्थ प्रेम त्यांनीही आपल्या दररोजच्या जीवनात प्रदर्शित करावे हे त्यांना यावरून शिकायला मिळाले.—योहा. १७:२५, २६.

१२. यहोवाचे सामर्थ्य कोणकोणत्या मार्गांनी दिसून येते?

१२ सामर्थ्य. केवळ ‘सर्वसमर्थ देवाजवळ’ जीवनाची निर्मिती करण्याची शक्‍ती आहे. (प्रकटी. ११:१७; स्तो. ३६:९) जन्माच्या वेळी मनुष्याचे जीवन एका कोऱ्‍या कागदाप्रमाणे असते. पण मृत्यू होईपर्यंत या कोऱ्‍या कागदावर आयुष्यात घेतलेल्या अनेक निर्णयांची, कार्यांची व अनुभवांची नोंद झालेली असते. त्या व्यक्‍तीने घेतलेले निर्णय, केलेली कार्ये व तिला आलेले अनुभव तिला स्वतःची अशी एक खास ओळख देतात आणि त्या व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्त्व घडवतात. ही सर्व माहिती यहोवा आपल्या स्मृतीमध्ये संग्रहित करू शकतो. योग्य वेळी, तो त्या व्यक्‍तीला पुन्हा जिवंत करून तिची खास ओळख व व्यक्‍तिमत्त्व तिला परत देऊ शकतो. (योहा. ५:२८, २९) मृत्यू हा खरेतर यहोवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हता. पण मानवांवर मरण ओढवल्यामुळे यहोवाला हे दाखवण्याची संधी मिळाली, की त्याचे सामर्थ्य फक्‍त जिवंत लोकांपुरतेच मर्यादित नसून मृतांनाही पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. यहोवा खरोखरच ‘सर्वसमर्थ देव’ आहे.

१३. येशूच्या बलिदानावरून यहोवाचा परिपूर्ण न्याय कशा प्रकारे दिसून आला?

१३ न्याय. यहोवा खोटे बोलत नाही. तसेच, तो कधीही अन्यायाने वागत नाही. (अनु. ३२:४; तीत १:२) तो नेहमी सत्याच्या व न्यायाच्या सर्वोच्च आदर्शांना जडून राहतो. विशिष्ट परिस्थिती त्याच्या फायद्याची नाही असे भासत असले, तरीही तो याबाबतीत कधी समझोता करत नाही. (रोम. ८:३२) येशूला देवाची निंदा करणारा गुन्हेगार ठरवून वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा यहोवाला आपल्या परमप्रिय पुत्राच्या यातना बघून किती दुःख झाले असेल याची कल्पना करा! तरीपण, अपरिपूर्ण मानवांबद्दल असलेल्या प्रेमापोटी यहोवाने ती दुःखदायक घटना घडू दिली. त्याच्या न्यायाच्या सर्वश्रेष्ठ आदर्शांना जडून राहण्याकरता त्याने असे केले. (रोमकर ५:१८-२१ वाचा.) अन्यायाने भरलेल्या जगात यहोवाला हे दाखवण्याची संधी मिळाली की तो न्यायप्रियतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

१४, १५. कोणकोणत्या मार्गांनी यहोवाची सर्वश्रेष्ठ बुद्धी व त्याची सहनशीलता दिसून आली आहे?

१४ बुद्धी. आदाम व हव्वा यांनी पाप केल्यावर लगेच, या विद्रोहामुळे घडणारे सर्व दुष्परिणाम आपण कशा प्रकारे नाहीसे करू हे यहोवाने प्रकट केले. (उत्प. ३:१५) यहोवाने ज्या प्रकारे तत्परतेने पाऊल उचलले, तसेच, काळाच्या ओघात या उद्देशाविषयी तो ज्या प्रकारे आपल्या सेवकांना क्रमाक्रमाने माहिती प्रकट करत गेला त्यावरून त्याची बुद्धी आणखीनच उल्लेखनीय रीत्या प्रदर्शित झाली. (रोम. ११:३३) कोणतीही गोष्ट देवाला आपला उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. सध्याच्या जगात सगळीकडे अनैतिकता, युद्धे, असमंजसपणा, विद्रोह, क्रूरता, पक्षपात व ढोंगीपणा दिसून येतो. अशा या जगात मानवांना खरी बुद्धी काय आहे हे दाखवण्याच्या अनेक संधी यहोवाला मिळाल्या आहेत. शिष्य याकोबाने म्हटले: “वरून येणारे ज्ञान [“बुद्धी,” NW] हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.”—याको. ३:१७.

१५ धीर आणि सहनशीलता. अपरिपूर्ण, पापी व वारंवार चुका करणाऱ्‍या मानवांशी व्यवहार करावा लागल्यामुळेच यहोवाचे धीर व सहनशीलता यांसारखे गुण अधिकच स्पष्टपणे प्रकट होऊ शकले. अन्यथा ते इतक्या प्रकर्षाने दिसून आले नसते. शिवाय, हे गुण यहोवा हजारो वर्षांपासून दाखवत आला आहे. त्यामुळे, हे अद्‌भुत गुण त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात पुरेपूर प्रमाणात आहेत हे दिसून येते. प्रेषित पेत्राने म्हटल्याप्रमाणे आपण ‘आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजावे.’ यहोवाच्या सहनशीलतेमुळेच आपल्याला तारण मिळणे शक्य झाले आहे आणि यासाठी आपण अतिशय कृतज्ञ असले पाहिजे.—२ पेत्र ३:९, १५.

१६. यहोवा क्षमाशील आहे ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट का आहे?

१६ क्षमाशीलता. आपण सर्व अपरिपूर्ण आहोत आणि आपल्याकडून बरेचदा चुका होतात. (याको. ३:२; १ योहा. १:८, ९) पण, यहोवा “भरपूर” प्रमाणात क्षमा करण्यास तयार आहे याबद्दल आपण त्याचे किती उपकार मानले पाहिजेत! (यश. ५५:७) आणखी एक गोष्ट लक्षात घ्या: अपरिपूर्ण पापीजन या नात्याने आपला जन्म झाला असल्यामुळे, आपण यहोवाकडून आपल्या चुकांची क्षमा मिळण्याचा मनस्वी आनंद अनुभवू शकतो. (स्तो. ५१:५, ९, १७) यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वातील हा प्रेमळ गुण स्वतः अनुभवायला मिळाल्यामुळे त्याच्याबद्दल असलेले आपले प्रेम अधिकच वाढते आणि इतरांशी वागताना यहोवाच्या या गुणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.कलस्सैकर ३:१३ वाचा.

हे जग कशामुळे रोगग्रस्त झाले आहे?

१७, १८. सैतानाची शासनपद्धती कशा प्रकारे अपयशी ठरली आहे?

१७ सैतानाच्या शासनपद्धतीमुळे अस्तित्वात आलेली त्याची सबंध जागतिक यंत्रणा आजपर्यंत वारंवार अयशस्वी ठरली आहे. १९९१ साली द युरोपियन या दैनिकात असे म्हणण्यात आले: “हे जग रोगग्रस्त आहे का? हो, निश्‍चितच. पण देवाच्या कोपामुळे नव्हे तर त्यात राहणाऱ्‍या लोकांमुळे.” किती खरे आहेत हे शब्द! सैतानाच्या बहकाव्यात येऊन आपले पहिले मातापिता आदाम व हव्वा यांनी यहोवाचे वर्चस्व नाकारून मानवी शासन निवडले. अशा रीतीने त्यांनी अशी एक शासनपद्धती स्वीकारली जी कालांतराने निश्‍चितच अयशस्वी ठरणार होती. सबंध जगातील लोकांना अनुभवावे लागत असलेले दुःख व कष्ट हे मानवी शासनाला एका जीवघेण्या रोगाने ग्रासल्याचे लक्षण आहे.

१८ सैतानाची शासनपद्धती स्वार्थी वृत्तीला बढावा देते. पण, यहोवाची शासनपद्धती मात्र प्रेमावर आधारित आहे. आणि स्वार्थी वृत्ती कधीही प्रेमावर मात करू शकत नाही. सैतानाचे शासन स्थैर्य, आनंद, किंवा सुरक्षितता देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे यहोवाचेच शासन श्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे! आधुनिक काळात याचा काही पुरावा देता येईल का? हो निश्‍चितच. याविषयी आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

खालील वचने वाचल्यावर शासनाविषयी आपल्याला काय शिकायला मिळाले?

रोमकर १३:१, २.

नीतिसूत्रे २१:३०.

यिर्मया १०:२३.

कलस्सैकर ३:१३.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्रे]

सैतानाच्या शासनपद्धतीमुळे मानवजातीला कधीही फायदा झालेला नाही

[चित्राचे श्रेय]

U.S. Army photo

WHO photo by P. Almasy

[२६ पानांवरील चित्र]

यहोवाजवळ मृतांनाही जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे

[२७ पानांवरील चित्र]

यहोवाने आपल्या पुत्राचे बलिदान दिले तेव्हा त्याचे प्रेम व न्याय दिसून आला