व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’

‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’

‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’

“आत्मा व वधू ही म्हणतात, ‘ये!’ . . . आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.”—प्रकटी. २२:१७.

१, २. देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना आपल्या जीवनात कोणते स्थान मिळाले पाहिजे आणि का?

 देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना आपल्या जीवनात कोणते स्थान मिळाले पाहिजे? येशूने आपल्या अनुयायांना ‘पहिल्याने राज्य मिळविण्यास झटा’ असे प्रोत्साहन दिले. आणि असे केल्यास देव त्यांच्या गरजा भागवेल याचे त्याने त्यांना आश्‍वासन दिले. (मत्त. ६:२५-३३) त्याने देवाच्या राज्याची तुलना एका अतिशय मौल्यवान मोत्याशी केली. ते मोती इतके मौल्यवान होते की एका व्यापाऱ्‍याला ते सापडले, तेव्हा त्याने “जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.” (मत्त. १३:४५, ४६) आपणही राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देऊ नये का?

याआधीच्या दोन लेखांत आपण पाहिल्याप्रमाणे, साक्षकार्यात आपण धैर्याने बोलतो आणि देवाच्या वचनाचा कुशलतेने वापर करतो तेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपले मार्गदर्शन करत आहे हे त्यावरून दिसून येते. त्याच प्रकारे, राज्य प्रचाराच्या कार्यात नियमित रीत्या सहभाग घेण्यास आपल्याला प्रवृत्त करण्यातही पवित्र आत्म्याची महत्त्वाची भूमिका आहे. ती कशी, हे आता आपण पाहू या.

सर्वांकरता असलेले आमंत्रण!

३. सर्व मानवांना कोणते पाणी पिण्याचे आमंत्रण दिले जात आहे?

पवित्र आत्म्याद्वारे एक असे आमंत्रण देण्यात आले आहे, जे सर्व मानवांकरता खुले आहे. (प्रकटीकरण २२:१७ वाचा.) हे एका अतिशय खास प्रकारच्या पाण्याने आपली तहान भागवण्याकरता ‘येण्याचे’ आमंत्रण आहे. हे पाणी म्हणजे आपण पितो ते सर्वसाधारण पाणी नव्हे. अर्थात, पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पण, येशूने एका शोमरोनी स्त्रीला एका वेगळ्या प्रकारच्या पाण्याबद्दल सांगितले होते. एका विहिरीजवळ या स्त्रीशी बोलताना त्याने म्हटले: “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहा. ४:१४) त्याअर्थी, पवित्र आत्मा मानवांना जे पाणी पिण्याचे आमंत्रण देत आहे ते सार्वकालिक जीवन देणारे असाधारण पाणी आहे.

४. जीवनाच्या पाण्याची गरज कशामुळे निर्माण झाली आणि हे पाणी कशास सूचित करते?

पहिला मानव आदाम याने आपली पत्नी हव्वा हिच्यासोबत मिळून, त्यांना निर्माण करणाऱ्‍या यहोवा देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले, तेव्हा जीवनाच्या पाण्याची गरज निर्माण झाली. (उत्प. २:१६, १७; ३:१-६) ‘आदामाला जीवनाच्या झाडाला हात लावून त्याचेहि फळ काढून खाणे व सर्वकाळ जिवंत राहणे’ शक्य होऊ नये म्हणून पहिल्या मानवी जोडप्याला त्यांचे निवासस्थान असलेल्या एदेन बागेतून हाकलून देण्यात आले. (उत्प. ३:२२) आदाम हा मानवजातीचा पूर्वज असल्यामुळे त्याच्याद्वारे सर्व मानवांवर मृत्यू ओढवला. (रोम. ५:१२) जीवनाचे पाणी हे आज्ञाधारक मानवांना पाप व मृत्यू यांच्या दास्यातून सोडवून त्यांना पृथ्वीवरील नंदनवनात कधीही न संपणारे परिपूर्ण जीवन देण्यासाठी देवाने ज्या सर्व तरतुदी केल्या आहेत त्यांना सूचित करते. या सर्व तरतुदी येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या मूलभूत तरतुदीवर आधारित आहेत.—मत्त. २०:२८; योहा. ३:१६; १ योहा. ४:९, १०.

५. ‘या आणि जीवनाचे पाणी फुकट घ्या’ हे आमंत्रण देणारा मुळात कोण आहे? स्पष्ट करा.

‘या आणि जीवनाचे पाणी फुकट घ्या’ हे आमंत्रण मुळात कोण देतो? ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात सार्वकालिक जीवनाकरता असलेल्या सर्व तरतुदी मानवांना पूर्णार्थाने उपलब्ध होतील. त्या सर्व तरतुदींना ‘जीवनाच्या पाण्याच्या स्फटिकासारख्या नितळ नदीच्या’ रूपात चित्रित करण्यात आले आहे. ही नदी ‘देवाच्या व कोकऱ्‍याच्या राजासनातून निघून वाहते’ असे सांगण्यात आले आहे. (प्रकटी. २२:१) त्याअर्थी, जीवन देणारा यहोवा देवच जीवनाच्या पाण्याचा स्रोत आहे असे म्हणता येईल. (स्तो. ३६:९) तोच ‘कोकऱ्‍याच्या’ अर्थात येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे पाणी मानवांना उपलब्ध करून देतो. (योहा. १:२९) आदामाने देवाची आज्ञा न पाळल्यामुळे मानवजातीला झालेले सर्व नुकसान यहोवा या लाक्षणिक नदीच्या माध्यमाने नाहीसे करेल. त्याअर्थी, ‘या आणि जीवनाचे पाणी फुकट घ्या’ हे आमंत्रण खुद्द यहोवा देवच देतो.

६. ‘जीवनाच्या पाण्याची नदी’ वाहण्यास केव्हा सुरुवात होते?

‘जीवनाच्या पाण्याची नदी’ ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान पूर्णार्थाने वाहू लागेल हे खरे असले, तरी ती वाहण्यास सुरुवात मात्र ‘प्रभुच्या दिवसादरम्यान’ होते. हा प्रभुचा दिवस १९१४ साली “कोकरा” सिंहासनावर बसला तेव्हा सुरू झाला. (प्रकटी. १:१०) त्यामुळे, सार्वकालिक जीवनाकरता असलेल्या काही तरतुदी त्यानंतर उपलब्ध झाल्या. या तरतुदी देवाच्या वचनाशी अर्थात बायबलशी संबंधित आहेत, ज्यातील संदेशाला ‘जल’ म्हणण्यात आले आहे. (इफिस. ५:२६) जीवनाचे पाणी पिण्याचे अर्थात राज्याचा संदेश ऐकून त्याला प्रतिसाद देण्याचे आमंत्रण सर्वांकरता खुले आहे. पण, प्रभुच्या दिवसादरम्यान हे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवण्याचे काम प्रत्यक्षात कोण करत आहे?

“वधूम्हणते “ये!”

७. ‘प्रभुच्या दिवसादरम्यान’ जीवनाचे पाणी घेण्यास ‘येण्याचे’ आमंत्रण सर्वप्रथम कोणी दिले आणि कोणाला?

जीवनाचे पाणी घेण्यास ‘येण्याचे’ हे आमंत्रण सर्वप्रथम वधू वर्गाचे सदस्य म्हणजेच आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ती देतात. हे आमंत्रण ते कोणाला देतात? साहजिकच, वधू स्वतःलाच हे आमंत्रण देऊ शकत नाही. तर तिचे शब्द, ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईनंतर’ पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळवण्याची आशा असलेल्यांना संबोधलेले आहेत.प्रकटीकरण १६:१४, १६ वाचा.

८. अभिषिक्‍त ख्रिस्ती १९१८ पासूनच यहोवाचे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवत आहेत असे का म्हणता येईल?

ख्रिस्ताचे अभिषिक्‍त अनुयायी बऱ्‍याच काळापासून, अगदी १९१८ पासून हे आमंत्रण देत आहेत. त्या वर्षी, “आज जिवंत असणारे लाखो लोक कदाचित कधीही मरणार नाहीत” असे शीर्षक असलेल्या जाहीर भाषणाने, हर्मगिदोनानंतर कित्येकांना पृथ्वीवरील नंदनवनात जीवन मिळण्याची आशा असल्याचे स्पष्ट केले. १९२२ साली अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सीडर पॉईंट येथे झालेल्या अधिवेशनात बायबल विद्यार्थ्यांना ‘राजाची व त्याच्या राज्याची घोषणा करा’ असे एका भाषणात प्रोत्साहन देण्यात आले. या आवाहनामुळे वधू वर्गाच्या शेषजनांना अधिकाधिक लोकांना हे आमंत्रण देण्याची प्रेरणा मिळाली. १९२९ साली टेहळणी बुरूज, मार्च १५ च्या अंकात, प्रकटीकरण २२:१७ या मुख्य वचनावर आधारित, “हार्दिक आमंत्रण” नावाचा लेख प्रकाशित झाला. या लेखात असे म्हणण्यात आले होते: “विश्‍वासू शेषवर्ग [सर्वसमर्थ देवासोबत] मिळून ‘ये!’ असे हार्दिक आमंत्रण देत आहे. नीती व सत्याची आस धरणाऱ्‍यांना हा संदेश घोषित करणे गरजेचे आहे. आणि हा संदेश घोषित करण्याची हीच वेळ आहे.” वधू वर्ग आजही लोकांना हे आमंत्रण देत आहे.

“ऐकणाराहि म्हणो: ‘ये!’”

९, १०. ज्यांना ‘येण्याचे’ आमंत्रण मिळाले आहे त्यांना इतरांनाही हे आमंत्रण देण्याचे प्रोत्साहन कशा प्रकारे देण्यात आले?

ज्यांना जीवनाचे पाणी घेण्यास ‘येण्याचे’ आमंत्रण दिले जाते त्यांच्याविषयी काय? त्यांनी इतरांनाही हे आमंत्रण द्यावे असे प्रोत्साहन त्यांना दिले जाते. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज, ऑगस्ट १, १९३२ अंकातील पृष्ठ २३२ वर असे म्हणण्यात आले होते: “अभिषिक्‍तांनी ज्या कोणाला इच्छा असेल त्या प्रत्येकाला राज्याची सुवार्ता घोषित करण्यात सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्यावे. प्रभूचा संदेश घोषित करण्यासाठी एक व्यक्‍ती प्रभूच्या अभिषिक्‍त जनांपैकी असण्याची गरज नाही. यहोवाच्या साक्षीदारांसाठी ही अत्यंत सांत्वनदायक गोष्ट आहे की आता त्यांना अशा लोकांपर्यंत जीवनाचे पाणी पोचवण्याची संधी मिळाली आहे, ज्यांना हर्मगिदोनातून बचावून पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळेल.”

१० ऐकणाऱ्‍यांवर इतरांनाही आमंत्रण देण्याची जबाबदारी आहे यावर पुढे आणखी भर देण्यात आला. टेहळणी बुरूज, ऑगस्ट १५, १९३४ अंकातील पृष्ठ २४९ वर असे म्हणण्यात आले: “योनादाब वर्गाचे सदस्य यहोवाच्या अभिषिक्‍त साक्षीदारांपैकी नसले तरी त्यांनी येहू वर्गाच्या सदस्यांसोबत अर्थात अभिषिक्‍त जनांसोबत देवाच्या राज्याचा संदेश घोषित करण्यात सहभागी झाले पाहिजे.” १९३५ साली प्रकटीकरण ७:९-१७ यात वर्णन केलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाची’ ओळख स्पष्ट झाली. यामुळे देवाचे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवण्याच्या कार्याला प्रचंड वेग आला. तेव्हापासून, खऱ्‍या उपासकांच्या एका मोठ्या लोकसमुदायाने त्या आमंत्रणाला प्रतिसाद दिला आहे. त्यांची संख्या सध्या सत्तर लाखांवर असून सतत वाढतच आहे. राज्याचा संदेश ऐकून व त्याचा अर्थ समजून घेतल्यामुळे त्यांनी देवाला आपले जीवन समर्पित केले आहे व पाण्यात बाप्तिस्मा घेतला आहे. आणि आज ते इतरांनाही ‘जीवनाचे पाणी फुकट घेण्याचे’ आमंत्रण देण्याच्या कार्यात वधू वर्गाला सक्रियपणे साथ देत आहेत.

“आत्मा” म्हणतो, “ये!”

११. सा.यु. पहिल्या शतकात प्रचाराच्या कार्यात पवित्र आत्म्याची काय भूमिका होती?

११ नासरेथ येथील एका सभास्थानात उपदेश करताना, येशूने यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट उघडून त्यातून हा उतारा वाचून दाखवला: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्‍यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्‍वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.” मग येशूने हे शब्द आपल्याविषयीच असल्याचे सांगितले. तो म्हणाला: “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना, पूर्ण झाला आहे.” (लूक ४:१७-२१) स्वर्गात परत जाण्याअगोदर येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) पहिल्या शतकात प्रचाराच्या कार्यात पवित्र आत्म्याने अतिशय उल्लेखनीय भूमिका पार पाडली.

१२. आज देवाचे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवण्याच्या कार्यात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

१२ आज आपल्या काळात देवाचे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवण्यात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे? यहोवा खुद्द पवित्र आत्म्याचा उगम आहे. वधू वर्गाला त्याच्या वचनाचा, अर्थात बायबलचा अर्थ समजून घेता यावा म्हणून त्यांचे मन व अंतःकरण प्रज्वलित करण्यासाठी तो आपल्या आत्म्याचा उपयोग करतो. पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाची आशा असलेल्यांना देवाचे आमंत्रण देण्याकरता व बायबलमधील सत्यांचे स्पष्टीकरण देण्याकरता पवित्र आत्मा वधू वर्गाला प्रवृत्त करतो. जे हे आमंत्रण स्वीकारून येशू ख्रिस्ताचे शिष्य बनतात आणि इतरांनाही ते आमंत्रण देतात त्यांच्याविषयी काय? त्यांच्या बाबतीतही पवित्र आत्म्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा बाप्तिस्मा “पवित्र आत्म्याच्या नावाने” झाला असल्यामुळे ते या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारतात व त्याच्याच साहाय्यावर विसंबून राहतात. (मत्त. २८:१९) तसेच, अभिषिक्‍त जन व दिवसेंदिवस वाढत चाललेला मोठा लोकसमुदाय जो संदेश घोषित करतात त्याविषयीही विचार करा. हा संदेश बायबलवर आधारित आहे, जे देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले होते. त्याअर्थी, हे आमंत्रण पवित्र आत्म्याद्वारे देण्यात आले आहे आणि आपण साक्षकार्य करतो तेव्हा पवित्र आत्माच आपले मार्गदर्शन करत असतो असे म्हणता येईल. ही गोष्ट लक्षात घेतल्यामुळे लोकांना देवाचे आमंत्रण देण्याच्या कार्यात आपण जो सहभाग घेतो, त्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

ते “म्हणत राहतात: ‘ये!’”

१३. आत्मा व वधू “ये!” असे “म्हणत राहतात” यावरून काय सूचित होते?

१३ “ये!” असे “आत्मा व वधू” केवळ एकदाच म्हणत नाहीत. या ठिकाणी मूळ भाषेत वापरलेल्या क्रियापदावरून अखंड सुरू असलेल्या कृतीचा अर्थ सूचित होतो. हे लक्षात ठेवून, नवे जग भाषांतर असे म्हणते: “आत्मा व वधू म्हणत राहतात: ‘ये!’” यावरून देवाचे आमंत्रण नियमित स्वरूपाने दिले जाते हे सूचित होते. जे हे आमंत्रण ऐकून ते स्वीकारतात त्यांच्याविषयी काय? ते देखील, “ये!” असे म्हणतात. खऱ्‍या उपासकांचा मोठा लोकसमुदाय “अहोरात्र [देवाच्या] मंदिरात त्याची सेवा करितात” असे म्हणण्यात आले आहे. (प्रकटी. ७:९, १५) ‘अहोरात्र सेवा’ करतात याचा काय अर्थ होतो? (लूक २:३६, ३७; प्रेषितांची कृत्ये २०:३१; २ थेस्सलनीकाकर ३:८ वाचा.) वयोवृद्ध संदेष्ट्री हन्‍ना आणि प्रेषित पौल यांच्या उदाहरणांवरून दिसून येते की ‘अहोरात्र सेवा’ करणे यावरून सातत्याने व परिश्रमी वृत्तीने सेवाकार्यात सहभाग घेण्याचा अर्थ सूचित होतो.

१४, १५. सातत्याने उपासना करणे किती महत्त्वाचे आहे हे दानीएलाच्या उदाहरणावरून कशा प्रकारे दिसून येते?

१४ सातत्याने उपासना करणे किती महत्त्वाचे आहे हे दानीएल संदेष्ट्याच्या उदाहरणावरूनही दिसून येते. (दानीएल ६:४-१०, १६ वाचा.) दानीएलाचा ‘दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना करण्याचा नित्यक्रम’ होता. सिंहांच्या गुहेत टाकले जाण्याची धमकी देण्यात आली तरीसुद्धा दानीएलाने—एका महिन्यासाठीही—आपल्या उपासनेचा हा नित्यक्रम बदलला नाही. त्याने जे केले त्यावरून पाहणाऱ्‍यांना हे अगदी स्पष्टपणे दिसून आले की यहोवाच्या उपासनेपेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त महत्त्वाची नाही!—मत्त. ५:१६.

१५ दानीएलाने एक रात्र सिंहांच्या गुहेत घालवल्यानंतर राजा स्वतः तेथे गेला व ओरडून म्हणाला: “हे दानीएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करितोस त्याला सिंहांपासून तुला सोडविता आले आहे काय?” दानीएलाने लगेच राजाला उत्तर दिले: “महाराज, चिरायु असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत, त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाहि मी काही अपराध केला नाही.” देवाची “नित्य” उपासना केल्याबद्दल त्याने दानीएलाला आशीर्वाद दिला.—दानी. ६:१९-२२.

१६. दानीएलाच्या उदाहरणावरून सेवाकार्यात सहभाग घेण्यासंबंधी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारण्याची आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे?

१६ आपल्या उपासनेच्या नित्यक्रमात खंड पडू देण्याऐवजी दानीएल मृत्यू पत्करण्यास तयार झाला. आपल्याविषयी काय? देवाच्या राज्याची सुवार्ता सातत्याने घोषित करण्यासाठी आपण कोणते त्याग करत आहोत किंवा करण्यास तयार आहोत? नक्कीच, यहोवाबद्दल इतरांना न सांगता आपण एकही महिना जाऊ देऊ नये! किंबहुना, शक्य झाल्यास दर आठवडी सेवाकार्यात सहभागी होण्याचा आपण प्रयत्न करू नये का? आजारपणामुळे किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे आपण महिन्याभरात फक्‍त १५ मिनिटे साक्ष देऊ शकलो तरी आपण या कार्याचा अहवाल दिला पाहिजे. का? कारण, आत्मा व वधू यांच्यासोबत “ये!” असे म्हणत राहण्याची आपली इच्छा आहे. होय, राज्याचे नियमित प्रचारक राहण्यासाठी आपण होताहोईल तितके प्रयत्न करू इच्छितो.

१७. यहोवाचे आमंत्रण इतरांना देण्याच्या कोणत्या संधींकडे आपण दुर्लक्ष करू नये?

१७ केवळ सेवाकार्यासाठी ठरवलेल्या वेळीच नव्हे तर जेव्हाही संधी मिळते तेव्हा आपण लोकांना यहोवाचे आमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर वेळी, उदाहरणार्थ खरेदी करताना, प्रवासाला जाताना, सुटीत एखाद्या नवीन ठिकाणाला भेट देताना, कामाच्या ठिकाणी किंवा शाळेला जाताना, तहानलेल्या लोकांना ‘येऊन जीवनाचे पाणी फुकट घेण्याचे’ आमंत्रण देणे हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे! अधिकाऱ्‍यांनी आपल्या कार्यावर प्रतिबंध लावले तरीसुद्धा आपण सावधगिरीने आपले प्रचाराचे कार्य सुरू ठेवतो. कदाचित, एखाद्या क्षेत्रात प्रत्येक घरी न जाता केवळ एखाददोन घरे करून दुसऱ्‍या क्षेत्रात निघून जाणे, किंवा अनौपचारिक साक्षकार्य जास्त प्रमाणात करणे यांसारख्या पर्यायांचा उपयोग करण्याद्वारे आपण आपले कार्य सुरू ठेवू शकतो.

“ये!” असे म्हणत राहा

१८, १९. देवाचा सहकारी होण्याच्या विशेषाधिकाराची तुम्हाला कदर आहे हे तुम्ही कसे दाखवता?

१८ आज आत्मा व वधू नऊ दशकांपेक्षा जास्त काळापासून जीवनाचे पाणी घेण्यास उत्सुक असलेल्यांना ‘येण्याचे’ आमंत्रण देत आहेत. त्यांचे हे रोमांचक आमंत्रण तुम्हाला मिळाले आहे का? तर मग तुम्ही हे आमंत्रण इतरांना द्यावे असे तुम्हाला प्रोत्साहन दिले जाते.

१९ यहोवाचे प्रेमळ आमंत्रण आणखी किती काळ लोकांना दिले जाईल हे आपल्याला माहीत नाही. पण स्वतः हे आमंत्रण स्वीकारल्यानंतर आपण इतरांनाही ते देतो, तेव्हा आपण खरेतर देवाचे सहकारी बनतो. (१ करिंथ. ३:६, ९) हा किती अद्‌भुत विशेषाधिकार आहे! तर मग, नियमित रीत्या प्रचार करण्याद्वारे आपण या विशेषाधिकाराबद्दल कदर असल्याचे दाखवू या आणि ‘नित्य देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करू या.’ (इब्री १३:१५) आपल्यापैकी पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले सर्व जण वधू वर्गासोबत “ये!” असे म्हणत राहू या. आणि जास्तीत जास्त लोकांनी जीवनाचे पाणी फुकट घ्यावे अशी सदिच्छा बाळगू या!

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• “ये!” असे आमंत्रण कोणाला दिले जाते?

• आमंत्रण देणारा मुळात यहोवा आहे असे का म्हणता येईल?

• देवाचे आमंत्रण लोकांपर्यंत पोचवण्यात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

• आपण साक्षकार्यात नियमित रीत्या सहभाग घेण्याचा का प्रयत्न केला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

“ये!” असे म्हणत राहा

१९१४

५,१०० प्रचारक

१९१८

कित्येकांना पृथ्वीवरील नंदनवनात जीवन मिळेल

१९२२

“राजाची व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा”

१९२९

विश्‍वासू शेषवर्ग “ये!” असे म्हणतो

१९३२

अभिषिक्‍तांव्यतिरिक्‍त इतरांनाही आमंत्रण दिले जाते

१९३४

योनादाब वर्गाला प्रचारात सहभागी होण्यास आमंत्रित केले जाते

१९३५

‘मोठ्या लोकसमुदायाची’ ओळख स्पष्ट होते

२००९

७३,१३,१७३ प्रचारक