व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा

‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा

‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा

“आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.”—इफिस. ६:१७.

१, २. आणखी राज्य घोषकांची नितान्त गरज असल्यामुळे आपण काय केले पाहिजे?

 लोकसमुदायाला देवाच्या वचनाची किती गरज आहे हे ओळखून येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” पण, येशू एवढे बोलून थांबला नाही. तर त्यानंतर लगेच त्याने “आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून” त्यांना ‘कापणीच्या’ अर्थात प्रचाराच्या कामगिरीवर पाठवले. (मत्त. ९:३५-३८; १०:१, ५) पुढे हेच कार्य करण्यासाठी त्याने ‘आणखी सत्तर जणांस नेमून दोघे दोघे असे त्यांना’ पाठविले.—लूक १०:१, २, NW.

आज आपल्या काळातही अधिक राज्य घोषकांची नितान्त गरज आहे. २००९ च्या सेवा वर्षात जगभरात स्मारक विधीला उपस्थित असलेल्यांची संख्या १,८१,६८,३२३ इतकी होती. ही संख्या, यहोवाच्या साक्षीदारांच्या एकूण संख्येपेक्षा १ कोटीहून अधिक होती. खरोखर, शेते कापणीसाठी तयार आहेत यात कोणतीही शंका नाही. (योहा. ४:३४, ३५) तेव्हा, आणखी कामकरी पाठवावेत म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. पण, या प्रार्थनेनुसार आपण कृतीही केली पाहिजे. म्हणजेच, राज्य प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य हिरीरीने करत असताना आपण ते आणखी परिणामकारक रीतीने केले पाहिजे.—मत्त. २८:१९, २०; मार्क १३:१०.

३. अधिक प्रभावीपणे सेवाकार्य करण्यासाठी आपले साहाय्य करण्यात देवाचा आत्मा कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका निभावतो?

आधीच्या लेखात आपण पाहिले होते की कशा प्रकारे देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे आपण सेवाकार्यात “देवाचे वचन धैर्याने बोलू” शकतो. (प्रे. कृत्ये ४:३१) हाच आत्मा आपल्याला परिणामकारक रीतीने साक्षकार्य करण्यासही साहाय्य करू शकतो. अधिक प्रभावीपणे सेवाकार्य करण्याचा एक मार्ग म्हणजे यहोवाने पुरवलेल्या अतिशय उत्तम अवजाराचा अर्थात देवाचे लिखित वचन, बायबल याचा चांगल्या प्रकारे उपयोग करणे. ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे. (२ तीम. ३:१६) त्यातील संदेशाचा उगम खुद्द यहोवा देव आहे. म्हणूनच, सेवाकार्यात आपण शास्त्रवचनांचा कुशलतापूर्वक उपयोग करतो तेव्हा खरेतर आपण पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारत असतो. सेवाकार्यात बायबलचा कुशलतेने उपयोग कसा करता येईल हे पाहण्याआधी देवाचे वचन किती प्रभावशाली आहे हे आपण पाहू या.

‘देवाचे वचन सक्रिय आहे’

४. बायबलमधील संदेशामुळे एका व्यक्‍तीमध्ये कशा प्रकारे बदल घडून येऊ शकतो?

देवाचे वचन, बायबल नक्कीच खूप सक्रिय व प्रभावशाली आहे! (इब्री ४:१२) त्यातील संदेश लाक्षणिक अर्थाने सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारा असल्यामुळे तो एखाद्या तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे असे म्हणता येईल. बायबलमधील सत्य एका व्यक्‍तीच्या अंतर्मनाला, तिच्या भावभावनांना भिडते आणि ती खरोखर कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे उघड करते. हे सत्य एका व्यक्‍तीवर सक्रियपणे प्रभाव पाडून तिला जीवनात खऱ्‍या अर्थाने बदल करण्यास प्रवृत्त करते. (कलस्सैकर ३:१० वाचा.) खरोखर, देवाच्या वचनात लोकांचे जीवन बदलून टाकण्याची ताकद आहे!

५. बायबल कशा प्रकारे आपले मार्गदर्शन करू शकते आणि त्याचे कोणकोणते लाभ होऊ शकतात?

याशिवाय, बायबल अतुलनीय बुद्धीचा खजिना देखील आहे. या संकटमय, कठीण काळात जीवन कसे जगावे याविषयी उपयुक्‍त मार्गदर्शन ते पुरवते. देवाचे वचन आपल्या पावलांकरता दिव्यासारखे आहे, तसेच ते आपला पुढचा मार्गही प्रकाशमय करते. (स्तो. ११९:१०५) कोणत्या अर्थाने ते आपल्या पावलांकरता दिव्यासारखे आहे? जीवनातील निरनिराळ्या समस्यांचा सामना करण्यास, तसेच मित्र, मनोरंजन, नोकरी-व्यवसाय, पेहराव अशा असंख्य गोष्टींसंबंधी योग्य निर्णय घेण्यास देवाच्या वचनाची आपल्याला खूप मदत होते. (स्तो. ३७:२५; नीति. १३:२०; योहा. १५:१४; १ तीम. २:९) जीवनात देवाच्या वचनातील तत्त्वांचा अवलंब केल्यामुळे इतरांसोबतचे आपले नातेसंबंध सुधारतात. (मत्त. ७:१२; फिलिप्पै. २:३, ४) तसेच, देवाचे वचन आपला पुढील मार्गही प्रकाशमय करते. याचा अर्थ जीवनात आपण जे काही निर्णय घेतो त्यांचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करण्यास देवाचे वचन आपली मदत करते. (१ तीम. ६:९) भविष्यासंबंधी देवाचा काय उद्देश आहे हे देखील बायबलमध्ये भाकीत केले असल्यामुळे आपली जीवनशैली कशी असली पाहिजे याविषयी योग्य मार्गदर्शन ते आपल्याला पुरवते. (मत्त. ६:३३; १ योहा. २:१७, १८) देवाच्या तत्त्वांनुसार जीवन जगल्यामुळे एका व्यक्‍तीचे जीवन नक्कीच अर्थपूर्ण होऊ शकते!

६. आपल्या आध्यात्मिक लढ्यात बायबल एक प्रभावी शस्त्र आहे असे का म्हणता येईल?

तसेच, आपल्या आध्यात्मिक लढ्यातसुद्धा बायबल किती प्रभावी शस्त्र आहे याचा विचार करा! पौलाने देवाच्या वचनाला “आत्म्याची तरवार” म्हटले. (इफिसकर ६:१२, १७ वाचा.) आपण बायबलचा संदेश परिणामकारक रीतीने लोकांना सांगतो तेव्हा सैतानाच्या नियंत्रणातून त्यांची सुटका होऊ शकते. ही अशी तरवार आहे जी लोकांचे जीव घेत नाही, उलट ती लोकांना जीवनदान देत आहे. तेव्हा, ही तरवार कुशलतेने चालवण्याचा आपण प्रयत्न करू नये का?

देवाच्या वचनाचा नीट वापर करा

७. “आत्म्याची तरवार” चालवण्याचे कौशल्य आत्मसात करणे का जरुरीचे आहे?

एखाद्या सैनिकाने युद्धाची शस्त्रे वापरण्याचा सराव केला असेल व ती वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले असेल तरच तो युद्धात सफाईदारपणे ती चालवू शकेल. हीच गोष्ट, आध्यात्मिक लढ्यात “आत्म्याची तरवार” चालवण्याच्या बाबतीतही खरी आहे. म्हणूनच पौलाने लिहिले: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीम. २:१५.

८, ९. बायबलमध्ये जे काही सांगितले आहे त्याचा अचूक अर्थ समजण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते? याचे एक उदाहरण द्या.

सेवाकार्य करताना ‘सत्याचे वचन नीट सांगण्यास’ कोणती गोष्ट आपली मदत करू शकेल? बायबलमधील संदेश इतरांना समजावून सांगण्याआधी आपण स्वतः तो स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे. त्यासाठी एखाद्या शास्त्रवचनाचा किंवा उताऱ्‍याचा संदर्भ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक शब्दकोश “संदर्भ” या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतो: “एखाद्या शब्दाचा, वाक्याचा किंवा मजकुराचा संदर्भ म्हणजे त्याच्या आधी व नंतर येणारे आणि त्याचा अर्थ स्पष्ट करणारे शब्द, वाक्य किंवा मजकूर.”

बायबलमधील एखादा उतारा अचूकपणे समजून घेण्यासाठी त्याची मागची-पुढची माहिती विचारात घेणे आवश्‍यक आहे. याचे एक उदाहरण म्हणून पौलाने गलतीकर ५:१३ मध्ये जे काही म्हटले ते विचारात घ्या. त्याने म्हटले: “बंधुजनहो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.” या ठिकाणी पौल कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता? तो पाप व मृत्यूच्या दास्यातून किंवा खोट्या शिकवणींच्या गुलामगिरीतून मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता का, की आणखी कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता? या वचनाच्या संदर्भावरून लक्षात येते की पौल “नियमशास्त्राच्या शापापासून” मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता. (गलती. ३:१३, १९-२४; ४:१-५) तो एका नव्या स्वातंत्र्याबद्दल अर्थात ख्रिस्ताचे अनुयायी झाल्यामुळे मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता. ज्यांना या स्वातंत्र्याचा अचूक अर्थ समजला होता त्यांनी प्रेमाने प्रवृत्त होऊन एकमेकांची सेवा केली. पण, ज्यांच्यात प्रेमाचा अभाव होता ते वादविवाद व भांडणतंटा करत राहिले.—गलती. ५:१५.

१०. शास्त्रवचनांचा अचूक अर्थ समजून घेण्यासाठी कोणत्या स्वरूपाची माहिती आपण विचारात घेतली पाहिजे आणि आपल्याला ती कशी प्राप्त करता येईल?

१० “संदर्भ” या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. कधीकधी “संदर्भ” या शब्दासाठी “पार्श्‍वभूमी, परिस्थिती, . . . प्रसंग” हे पर्यायी शब्द वापरले जातात. बायबलमधील एखाद्या वचनाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या वचनाची पार्श्‍वभूमी म्हणजे बायबलच्या अमुक एका पुस्तकाचा लेखक कोण आहे, ते केव्हा लिहिण्यात आले व कोणत्या परिस्थितीत त्याचे लिखाण झाले अशी सर्व माहिती आपण विचारात घेतली पाहिजे. तसेच, ते पुस्तक का लिहिण्यात आले होते आणि शक्य असल्यास ते लिहिण्यात आले त्या काळातील सामाजिक, नैतिक आणि धार्मिक प्रथा काय होत्या हेसुद्धा लक्षात घेणे फायदेकारक ठरेल. *

११. सेवाकार्यात शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

११ ‘सत्याचे वचन नीट सांगण्यासाठी’ शास्त्रवचनांचे अचूक स्पष्टीकरण देण्यासोबतच आपण एक काळजी घेतली पाहिजे. आपण केव्हाही लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी बायबलचा उपयोग करू नये. दियाबलाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूने केले त्याप्रमाणे सत्याचे समर्थन करण्यासाठी आपणही शास्त्रवचनांचा उपयोग करू शकतो. पण, लोकांना धाक दाखवून त्यांच्यावर आपले विश्‍वास लादण्यासाठी आपण बायबलचा उपयोग करू नये. (अनु. ६:१६; ८:३; १०:२०; मत्त. ४:४, ७, १०) तर प्रेषित पेत्राने दिलेल्या सल्ल्याचे आपण अनुसरण केले पाहिजे: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.”—१ पेत्र ३:१५.

१२, १३. बायबलच्या साहाय्याने ‘तटबंदीसमान’ असलेल्या कोणत्या गोष्टी जमीनदोस्त करणे शक्य होते? उदाहरण द्या.

१२ आपण सत्याचे वचन नीट सांगितल्यास काय परिणाम होऊ शकतो? (२ करिंथकर १०:४, ५ वाचा.) बायबलमधील सत्यामुळे ‘तटबंदीसमान’ असलेल्या गोष्टी जमीनदोस्त करणे शक्य होते, उदाहरणार्थ, खोटे सिद्धान्त, घातक चालीरीती आणि ज्यांतून अपरिपूर्ण मानवांची बुद्धी दिसून येते असे तत्त्वज्ञान. तसेच, ‘देवविषयक ज्ञानाविरुद्ध उभारलेले’ विचार उलथून पाडण्यासाठीही आपण बायबलचा उपयोग करू शकतो. याशिवाय, बायबलमधील सत्यानुसार लोकांना आपल्या विचारसरणीत बदल करण्यास त्यांची मदत करण्याकरता देखील बायबलचा उपयोग केला जाऊ शकतो.

१३ भारतात राहणाऱ्‍या ९३ वर्षांच्या एका स्त्रीचेच उदाहरण घ्या. तिच्या मनावर बालपणापासूनच पुनर्जन्माची शिकवण बिंबवण्यात आली होती. परदेशात राहणाऱ्‍या तिच्या मुलाने तिच्यासोबत पत्राद्वारे बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा यहोवाविषयी व त्याच्या प्रतिज्ञांविषयी ती जे काही शिकत होती ते तिने आनंदाने स्वीकारले. पण, मृतांच्या अवस्थेबद्दल तिच्या मुलाने तिला सांगितले तेव्हा मात्र तिने विरोध केला. कारण पुनर्जन्माची शिकवण तिच्या मनात अगदी खोलवर रुजली होती. तिने म्हटले: “तुमच्या शास्त्रातली ही शिकवण मला मुळीच पटत नाही. आत्मा अमर असतो असं सर्वच धर्म शिकवतात. आजवर मी हाच विश्‍वास करत आले आहे, की शरीर नश्‍वर असतं, पण आत्मा ८४,००,००० वेळा वेगवेगळे शरीर धारण करून जन्म घेतो. हे खोटं कसं असू शकतं? बाकीचे सगळे धर्म चुकीचं शिकवतात का?” तटबंदीप्रमाणे मनात पक्क्या बसलेल्या अशा शिकवणीचा बायबलच्या साहाय्याने बीमोड करणे शक्य आहे का? बायबलचा उपयोग करून या विषयावर अधिक चर्चा केल्यावर काही आठवड्यांनंतर त्या स्त्रीने असे लिहिले: “आता कुठं मला मृत लोकांच्या अवस्थेबद्दलचं सत्य समजू लागलं आहे. पुनरुत्थान होईल तेव्हा आपल्या मृत प्रिय जनांना आपण भेटू या कल्पनेनं मला खूप आनंद होतो. खरंच, देवाचं राज्य लवकर यावं.”

बायबलच्या साहाय्याने खातरी पटवून द्या

१४. खातरी पटवून देणे याचा काय अर्थ होतो?

१४ सेवाकार्यात बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्याचा अर्थ केवळ शास्त्रवचने उद्धृत करणे इतकाच होत नाही. बायबल म्हणते की पौलाने साक्ष देताना शास्त्रवचनांची “खातरी” किंवा ‘प्रमाण पटवून’ दिले. आपणही तेच केले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १९:८, ९; २८:२३ वाचा.) ‘पटवून देणे’ याचा अर्थ एखाद्याचे “मन वळवणे” असा होतो. एका व्यक्‍तीला एखादी गोष्ट पटवून दिली जाते तेव्हा तिला “इतकी खातरी होते की त्या गोष्टीवर तिचा विश्‍वास बसतो.” आपणही एका व्यक्‍तीला बायबलची एखादी शिकवण पटवून देतो तेव्हा खरेतर त्या शिकवणीवर विश्‍वास ठेवण्याइतपत तिचे मन वळवत असतो. पण, असे करण्यात यशस्वी होण्यासाठी आपण जे काही सांगतो ते तंतोतंत खरे आहे याची समोरच्या व्यक्‍तीला खातरी पटवून देणे जरुरीचे आहे. त्यासाठी काही मार्ग पुढे सुचवण्यात आले आहेत.

१५. लोकांच्या मनात बायबलविषयी आदर निर्माण होईल अशा रीतीने तुम्ही त्याकडे त्यांचे लक्ष कसे वेधू शकता?

१५ बायबलविषयी आदर निर्माण होईल अशा रीतीने त्याकडे लक्ष वेधा. सेवाकार्यात एखाद्या विषयावर चर्चा करत असताना तुम्ही एखादे शास्त्रवचन दाखवता तेव्हा त्या विषयावर देवाचा दृष्टिकोन जाणून घेण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, घरमालकाला एखादा प्रश्‍न विचारल्यावर व त्यावर त्याचे उत्तर जाणून घेतल्यावर तुम्ही असे म्हणू शकता, ‘या विषयासंबंधी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे आपण पाहू या.’ किंवा तुम्ही असेही विचारू शकता, ‘याविषयी देव काय सांगतो?’ सेवाकार्यात शास्त्रवचने दाखवताना या पद्धतीचा वापर केल्याने बायबल हे देवाचे वचन आहे हे लोकांना समजण्यास मदत होते, तसेच त्याबद्दल त्यांच्या मनात गाढ आदर निर्माण होतो. असे करणे खासकरून तेव्हा जरुरीचे असते जेव्हा एखाद्या व्यक्‍तीचा देवावर विश्‍वास असतो, पण बायबल नेमके काय शिकवते याविषयी तिला फारशी माहिती नसते.—स्तो. १९:७-१०.

१६. शास्त्रवचनांचे चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१६ शास्त्रवचने केवळ वाचू नका; तर त्यांचे स्पष्टीकरणही द्या. लोकांना शिकवताना त्यांना ‘स्पष्टीकरण करून पटवून देण्याची’ पौलाची प्रथा होती. (प्रे. कृत्ये १७:३, सुबोध भाषांतर) एकाच शास्त्रवचनात सहसा अनेक मुद्दे असतात. तेव्हा, तुम्ही ज्या विषयावर चर्चा करत आहात त्याच्याशी संबंधित शब्दांकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. तुम्हाला हे कसे करता येईल? एकतर वचनातून योग्य शब्द निवडून ते पुन्हा दुसऱ्‍या शब्दांत मांडा किंवा मग घरमालकाला ते ओळखता यावेत म्हणून उचित प्रश्‍न विचारा. मग, वचनातील तेवढा भाग समजावून सांगा. असे केल्यानंतर सदर वचन त्या व्यक्‍तीला कसे लागू होते हे जाणून घेण्यास तिला मदत करा.

१७. लोकांची खातरी पटेल अशा रीतीने तुम्ही शास्त्रवचनांतून तर्कवाद कसा करू शकता?

१७ खातरी पटेल अशा रीतीने शास्त्रवचनांतून तर्क करा. मनःपूर्वक आर्जव करण्यासोबतच सुस्पष्ट तर्कवादाचा उपयोग करून पौलाने खातरी पटेल अशा रीतीने “शास्त्रावरून वादविवाद केला.” (प्रे. कृत्ये १७:२, ४) पौलाप्रमाणेच तुम्हीही लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे ते ‘बाहेर काढण्यासाठी’ तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्था आहे हे दाखवणारे प्रश्‍न त्यांना विचारा. (नीति. २०:५) असे करताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. सुस्पष्ट व मुद्देसूदपणे त्यांच्याशी तर्क करा आणि सबळ पुरावे सादर करा. तुम्ही जे काही सांगता ते सर्वस्वी देवाच्या वचनावर आधारित असले पाहिजे. एका पाठोपाठ एक अनेक वचने दाखवण्यापेक्षा केवळ एकच वचन घेऊन त्याचा अर्थ समजावून सांगणे व उदाहरणाच्या साहाय्याने मुद्दा आणखी स्पष्ट करणे केव्हाही चांगले. बायबलव्यतिरिक्‍त इतर विश्‍वसनीय लिखाणांतील पुरावे सादर केल्यानेही तुमचे ‘बोलणे अधिक पटण्याजोगे’ होऊ शकते. (नीति. १६:२३, मराठी कॉमन लँग्वेज) काही वेळा, एखाद्या विषयावर संशोधन करून त्यावर अधिक माहिती सादर केली जाऊ शकते. या आधी उल्लेख केलेल्या ९३ वर्षांच्या स्त्रीला हे समजून घेणे आवश्‍यक होते, की अमर आत्म्याची शिकवण इतकी प्रचलित का आहे. या शिकवणीचा उगम कोठून झाला आणि कशा प्रकारे तिचा इतर अनेक धर्मांत प्रसार झाला हे समजल्यानंतर सदर विषयावर बायबल जे काही शिकवते ते तिला शेवटी पटले. *

बायबलचा कुशलतेने उपयोग करत राहा

१८, १९. आपण “आत्म्याची तरवार” कुशलतेने चालवण्याचा सतत प्रयत्न का केला पाहिजे?

१८ “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे” असे बायबल म्हणते. दुष्ट लोक दिवसेंदिवस अधिकाधिक दुष्ट होत चालले आहेत. (१ करिंथ. ७:३१; २ तीम. ३:१३) तेव्हा, ‘आत्म्याची तरवार म्हणजे देवाच्या वचनाचा’ उपयोग करून ‘तटबंदीसमान’ असलेल्या गोष्टी जमीनदोस्त करत राहणे अत्यंत जरुरीचे आहे.

१९ आज आपल्याजवळ देवाचे वचन, बायबल आहे याबद्दल आपण किती आनंदी आहोत! त्यातील प्रभावी संदेशाच्या साहाय्याने आपण खोट्या शिकवणींचे समूळ उच्चाटन करू शकतो, तसेच प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांपर्यंतही पोचू शकतो. बायबलच्या शक्‍तिशाली संदेशापुढे तटबंदीसमान असलेली कोणतीही गोष्ट टिकाव धरू शकत नाही. तेव्हा, देवाकडून मिळालेल्या राज्य प्रचाराच्या कार्यात आत्म्याची तरवार कुशलतेने चालवण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू या.

[तळटीपा]

^ परि. 10 बायबलच्या पुस्तकांची पार्श्‍वभूमी सांगणारी अनेक उत्कृष्ट प्रकाशने आहेत, जसे की “प्रत्येक शास्त्रवचन ईश्‍वरप्रेरित व लाभदायक” (इंग्रजी), शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) आणि टेहळणी बुरूज नियतकालिकातील “यहोवाचे वचन सजीव आहे” यांसारखे लेख.

^ परि. 17 बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ६ व ७, तसेच पृष्ठ २०८ वर दिलेले परिशिष्ट पाहा.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• देवाचे वचन किती शक्‍तिशाली आहे?

• आपण ‘सत्याचे वचन नीट’ कसे सांगू शकतो?

• बायबलमधील संदेशाचा ‘तटबंदीसमान’ असलेल्या गोष्टींवर काय परिणाम होऊ शकतो?

• सेवाकार्यात खातरी पटवून देण्याचे कौशल्य तुम्हाला कसे वाढवता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चौकट/चित्र]

बायबलच्या साहाय्याने खातरी पटवून देण्यासाठी

▪ लोकांच्या मनात बायबलविषयी आदर निर्माण करा

▪ शास्त्रवचने समजावून सांगा

▪ अंतःकरणापर्यंत पोचण्यासाठी खातरी पटेल अशा रीतीने तर्कवाद करा

[११ पानांवरील चित्र]

“आत्म्याची तरवार” कुशलतेने चालवण्यास शिका