व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत!

जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत!

जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत!

“आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच [“यहोवाचेच,” NW] आहो.” —रोम. १४:८.

१. जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाबद्दल येशूने काय शिकवले?

 आपण जीवनाचा सर्वोत्तम मार्ग निवडावा असे यहोवाला वाटते. लोक वेगवेगळ्या मार्गांनी आपले जीवन जगतात, पण जीवनाचा केवळ एकच मार्ग सर्वोत्तम आहे. आणि तो म्हणजे देवाच्या वचनानुसार आपले जीवन व्यतीत करणे आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यापासून शिकणे. आपल्या जीवनाचा यापेक्षा चांगला उपयोग कोणता असू शकतो? येशूने आपल्या अनुयायांना आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करण्यास शिकवले आणि त्यांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली. (मत्त. २८:१९, २०; योहा. ४:२४) येशूच्या या आज्ञांचे पालन केल्याने आपण यहोवाचे मन तर आनंदित करतोच पण त्यासोबतच आपल्याला त्याचे अनेक आशीर्वादही लाभतात.

२. राज्य संदेशाप्रती पहिल्या शतकातील अनेकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली, आणि “तो मार्ग” अनुसरण्याचा काय अर्थ होतो?

“सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती” असलेले, ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेतात तेव्हा “जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत!” असे आपण त्यांना म्हणू शकतो. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) पहिल्या शतकात निरनिराळ्या देशांतील हजारो लोकांनी सत्याचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेण्याद्वारे देवाला आपले जीवन समर्पित केल्याचे जाहीर रीत्या व्यक्‍त केले. (प्रे. कृत्ये २:४१) त्या सुरुवातीच्या शिष्यांना “तो मार्ग अनुसरणारे” असे म्हणण्यात आले. (प्रे. कृत्ये ९:२; १९:२३) त्यांच्याविषयी असे म्हणणे योग्यच होते कारण ख्रिस्ताचे अनुयायी बनणारे येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवून आपल्या जीवनात त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करत होते.—१ पेत्र २:२१.

३. यहोवाचे लोक बाप्तिस्मा का घेतात आणि मागील दहा वर्षांत किती जणांचा बाप्तिस्मा झाला आहे?

या शेवटल्या काळात शिष्य बनवण्याच्या कार्याने प्रचंड वेग घेतला आहे. आज हे कार्य २३० पेक्षा जास्त देशांत केले जात आहे. मागील दहा वर्षांच्या काळात २७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी—दर आठवड्याला सरासरी ५,००० व्यक्‍तींनी—यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला केलेले समर्पण बाप्तिस्मा घेऊन जाहीर केले. बाप्तिस्मा घेण्यास एक व्यक्‍ती देवावर असलेल्या प्रेमामुळे, त्याच्या वचनातील सत्याचे ज्ञान घेतल्यामुळे व त्यावर विश्‍वास बसल्यामुळे प्रवृत्त होते. बाप्तिस्मा घेणे हे आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. कारण आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा यहोवा देवासोबत आपला एक जवळचा नातेसंबंध जोडला जातो. तसेच, यहोवाने पुरातन काळातील त्याच्या सेवकांना ज्या प्रकारे त्याच्या मार्गात चालण्यास मदत केली, त्याच प्रकारे तो आपल्यालाही त्याची विश्‍वासूपणे सेवा करण्यास मदत करेल याची खातरी असल्याचे आपण बाप्तिस्मा घेण्याद्वारे दाखवतो.—यश. ३०:२१.

का घ्यावा बाप्तिस्मा?

४, ५. बाप्तिस्मा घेतल्यामुळे मिळणारे काही आशीर्वाद व फायदे कोणते ते सांगा.

तुम्हीही कदाचित देवाविषयी ज्ञान घेऊन आपल्या जीवनात बदल केले असतील आणि आता कदाचित बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक असाल. ही प्रगती निश्‍चितच कौतुकास्पद आहे. पण, तुम्ही प्रार्थनेत देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला आहे का? बायबलच्या अभ्यासातून तुम्हाला नक्कीच हे समजले असेल की तुमचे जीवन केवळ स्वतःच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यावर किंवा पैसा कमवण्यावर नव्हे तर यहोवाची स्तुती करण्यावर केंद्रित असले पाहिजे. (स्तोत्र १४८:११-१३ वाचा; लूक १२:१५) पण, बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद व फायदे प्राप्त होतील?

एक समर्पित ख्रिस्ती या नात्याने तुमच्या जीवनाला सर्वात उदात्त असा उद्देश लाभेल. आपण देवाची इच्छा पूर्ण करत आहोत या जाणिवेने तुम्ही आनंदित व्हाल. (रोम. १२:१, २) यहोवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये शांती व विश्‍वास यांसारखे गुण उत्पन्‍न करेल. (गलती. ५:२२, २३) देव तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल आणि त्याच्या वचनानुसार जगण्याच्या तुमच्या प्रयत्नांना तो यश देईल. तुमचे सेवाकार्य आनंददायक ठरेल आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेल्या मार्गाने जीवन जगत असल्यामुळे सार्वकालिक जीवनाची तुमची आशा दिवसेंदिवस दृढ होईल. याव्यतिरिक्‍त, समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याद्वारे तुम्ही खरोखरच यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक होऊ इच्छिता हे तुम्ही दाखवाल.—यश. ४३:१०-१२.

६. आपल्या बाप्तिस्म्यावरून काय दिसून येते?

देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपण यहोवाचे आहोत, आपल्यावर त्याचीच मालकी आहे हे आपण दाखवतो. प्रेषित पौलाने लिहिले, “आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर यहोवाकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर यहोवाकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण यहोवाचेच आहोत.” (रोम. १४:७, ८, NW) देवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य देऊन त्याला व्यक्‍तिशः आपली कदर आहे हे दाखवले आहे. त्यामुळे आपण जेव्हा देवावरील प्रेमाने प्रेरित होऊन त्याची सेवा करण्याचा ठाम निर्णय घेतो तेव्हा आपण त्याचे मन आनंदित करतो. (नीति. २७:११) बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपण देवाला आपले जीवन समर्पित केल्याचे जाहीर करतो आणि यहोवाला आपण आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे हे जाहीर रीत्या कबूल करतो. यावरून आपण सार्वभौमत्त्वाच्या वादात देवाचा पक्ष घेतला असल्याचे दिसून येते. (प्रे. कृत्ये ५:२९, ३२) त्याच वेळी यहोवा देखील आपल्याला त्याचा पाठिंबा देतो. (स्तोत्र ११८:६ वाचा.) बाप्तिस्मा घेतल्यामुळे आता व भविष्यातही आपल्याला देवाच्या सेवेत आणखी बरेच आशीर्वाद मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

प्रेमळ बंधुसमाजाचा भाग बनण्याचा आशीर्वाद

७-९. (क) सर्व काही सोडून आपले अनुसरण करणाऱ्‍यांना येशूने कोणते आश्‍वासन दिले आहे? (ख) मार्क १०:२९, ३० मध्ये येशूने दिलेले वचन आज कशा प्रकारे पूर्ण होत आहे?

प्रेषित पेत्राने येशूला म्हटले: “पाहा! आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार?” (मत्त. १९:२७) पेत्राने व येशूच्या इतर शिष्यांनी स्वतःला राज्य प्रचाराच्या कार्याला वाहून घेण्याकरता जीवनात अनेक त्याग केले होते. त्यामुळे, आपल्याकरता भविष्यात काय राखून ठेवले आहे हे जाणून घेण्याची पेत्राला उत्सुकता होती. (मत्त. ४:१८-२२) मग, येशूने त्यांना कोणते आश्‍वासन दिले?

हाच अहवाल मार्कच्या शुभवर्तमानातही वाचायला मिळतो. तेथे, येशूने आपले शिष्य एका आध्यात्मिक बंधुसमाजाचा भाग असतील असे सूचित केले. त्याने म्हटले: “ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.” (मार्क १०:२९, ३०) येशूने दिलेल्या या आश्‍वासनानुसार पहिल्या शतकात लुदिया, अक्विल्ला, प्रिस्किल्ला व गायस यांसारख्या ख्रिश्‍चनांनी आपल्या बांधवांकरता आपली “घरे” उपलब्ध करून दिली आणि ते त्यांच्यासाठी ‘भाऊ, बहिणी व आया’ असे बनले.—प्रे. कृत्ये १६:१४, १५; १८:२-४; ३ योहा. १, ५-८.

येशूच्या शब्दांची आज मोठ्या प्रमाणात पूर्णता होताना दिसते. आजही त्याच्या अनेक अनुयायांनी देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांसाठी “शेतवाडी” अर्थात आपल्या नोकऱ्‍या व व्यवसाय सोडून दिले आहेत. यांत मिशनरी, बेथेल कुटुंबातील सदस्य, आंतरराष्ट्रीय सेवक व त्यांच्यासारख्या इतर बांधवांचा समावेश आहे. अनेक बंधुभगिनींनी देवाच्या सेवेकरता अधिक वेळ मिळावा म्हणून आपली जीवनशैली साधी बनवण्याच्या उद्देशाने राहती घरे सोडून दिली आहेत. या बांधवांचे अनुभव ऐकताना, यहोवाने त्या सर्वांची किती प्रेमळपणे काळजी घेतली आणि त्यांच्या सेवेतून त्यांना किती समाधान मिळाले हे जाणून आपल्याला खूप आनंद होतो. (प्रे. कृत्ये २०:३५) त्यांच्याप्रमाणेच जगभरातील ख्रिस्ती बंधुसमाजातील, बाप्तिस्मा घेतलेले यहोवाचे सर्वच सेवक, ‘[देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटल्यामुळे’ अनेक आशीर्वाद अनुभवू शकतात.—मत्त. ६:३३.

“गुप्त स्थली” सुरक्षित

१०, ११. ‘परात्पराचे गुप्त स्थल’ काय आहे आणि आपल्याला त्यात प्रवेश कसा मिळू शकतो?

१० समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला आणखी एक अद्‌भुत आशीर्वाद प्राप्त होतो. आणि तो म्हणजे, “परात्पराच्या गुप्त स्थली” वसण्याचा विशेषाधिकार. (स्तोत्र ९१:१ वाचा.) लाक्षणिक अर्थाने, हे गुप्त स्थल आध्यात्मिक दृष्टीने धोकेदायक ठरू शकणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून संरक्षण देणारे एक सुरक्षित स्थान किंवा स्थिती आहे. हे एक ‘गुप्त स्थल’ आहे असे म्हणता येते कारण आध्यात्मिक दृष्टिकोन नसलेल्या व देवावर भरवसा नसलेल्या लोकांना हे स्थान काय आहे हे समजू शकत नाही. आपण देवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून जीवन जगतो आणि त्याच्यावर संपूर्ण भरवसा ठेवून चालतो तेव्हा आपणही जणू स्तोत्रकर्त्याप्रमाणे असे म्हणतो: “परमेश्‍वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो.” (स्तो. ९१:२) होय, यहोवा देव आपले आश्रयस्थान बनतो. (स्तो. ९१:९) आपल्याला यापेक्षा आणखी जास्त काय हवे आहे?

११ यहोवाच्या “गुप्त स्थली” प्रवेश मिळण्याचा आणखी एक अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाला त्याच्यासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडण्याचा सुहक्क प्राप्त होतो. आपण समर्पण करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपल्याला हा सुहक्क मिळतो. त्यानंतर, आपण बायबल अभ्यास व मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे तसेच, देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करण्याद्वारे त्याच्यासोबतचा हा नातेसंबंध दिवसेंदिवस आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करत राहतो. (याको. ४:८) यहोवा देवासोबत ज्याचा सर्वात जवळचा नातेसंबंध आहे तो म्हणजे येशू. त्याचा यहोवावर असलेला भरवसा सर्वात कठीण परिस्थितीतही डगमगला नाही. (योहा. ८:२९) तेव्हा, आपणही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. आपली समर्पणाची शपथ पूर्ण करण्यासाठी आपले साहाय्य करण्यास तो इच्छुक व समर्थ आहे याबद्दल आपण कोणतीही शंका बाळगू नये. (उप. ५:४) देवाने आपल्या लोकांकरता ज्या सर्व आध्यात्मिक तरतुदी केल्या आहेत त्यांवरून आपण अगदी खातरीने म्हणू शकतो की त्याचे खरोखरच आपल्यावर प्रेम आहे आणि त्याची सेवा करण्यात आपण यशस्वी व्हावे अशी त्याची मनःपूर्वक इच्छा आहे.

आपल्याला लाभलेल्या आध्यात्मिक नंदनवनाची कदर करा

१२, १३. (क) आध्यात्मिक नंदनवन काय आहे? (ख) आपण कशा प्रकारे नव्या लोकांना मदत करू शकतो?

१२ समर्पण व बाप्तिस्मा यांमुळे एका आध्यात्मिक नंदनवनात राहण्याचीही संधी आपल्यासाठी खुली होते. हे आध्यात्मिक नंदनवन म्हणजे यहोवा देवासोबत व एकमेकांसोबत शांतीचे संबंध असलेल्या सहविश्‍वासू बांधवांमधील सलोख्याचे व ऐक्याचे वातावरण. (स्तो. २९:११; यश. ५४:१३) आपल्याला लाभलेल्या या आध्यात्मिक नंदनवनाची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. खासकरून आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत या आध्यात्मिक नंदनवनाची झलक मिळते, जेथे कित्येक देशांचे, वर्णांचे व भाषांचे बंधुभगिनी एकत्र येऊन शांती, ऐक्य व बंधुप्रेम यांचा आस्वाद घेतात.

१३ आजच्या जगातील दुःखदायक परिस्थिती लक्षात घेतल्यावर, आध्यात्मिक नंदनवनाबद्दल आपली कदर आणखीनच वाढते. (यशया ६५:१३, १४ वाचा.) देवाच्या राज्याचा संदेश घोषित करण्याद्वारे आपल्याला इतरांनाही या आध्यात्मिक नंदनवनात येण्यास आमंत्रित करण्याची सुसंधी आहे. त्याच प्रकारे, अलीकडेच मंडळीत सामील झाल्यामुळे ज्यांना सेवाकार्यात परिणामकारक होण्याकरता साहाय्याची गरज आहे, त्यांनाही मदत करणे हा आपल्याकरता एक विशेषाधिकार आहे. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी ज्या प्रकारे अपुल्लो याला “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला,” त्याच प्रकारे मंडळीतील वडिलांच्या मार्गदर्शनानुसार आपल्यालाही नवीन लोकांना साहाय्य करण्याचा आशीर्वाद लाभू शकतो.—प्रे. कृत्ये १८:२४-२६.

येशूपासून शिकत राहा

१४, १५. येशूपासून शिकत राहण्याची कोणती चांगली कारणे आपल्याजवळ आहेत?

१४ येशूपासून शिकत राहण्याची आपल्याकडे अनेक चांगली कारणे आहेत. पृथ्वीवर मानव म्हणून येण्याआधी येशू कितीतरी युगे आपल्या पित्याच्या सहवासात राहून कार्य करत होता. (नीति. ८:२२, ३०) देवाची सेवा करणे आणि सत्याबद्दल साक्ष देणे हाच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे याची त्याला पक्की खातरी होती. (योहा. १८:३७) इतर कोणत्याही मार्गाने आपल्या जीवनाचा उपयोग करणे हे स्वार्थीपणाचे व अदूरदर्शीपणाचे ठरेल हे त्याला माहीत होते. अर्थात, आपल्याला अतिशय कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागेल आणि शेवटी जिवे मारले जाईल याचीही त्याला जाणीव होती. (मत्त. २०:१८, १९; इब्री ४:१५) तरीसुद्धा, तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला आणि अशा रीतीने त्याने आपल्याकरता एक उत्तम उदाहरण मांडले.

१५ येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर थोड्याच काळानंतर सैतानाने त्याच्यापुढे प्रलोभने आणून त्याला जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर चालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, येशू त्याच्या कुयुक्त्यांना बळी पडला नाही. (मत्त. ४:१-११) यावरून आपण हे शिकतो, की सैतानाने कोणतीही प्रलोभने आणली तरीसुद्धा आपण यहोवाला विश्‍वासू राहू शकतो. विशेषतः बाप्तिस्मा घेण्याच्या विचारात असलेल्या किंवा नुकताच बाप्तिस्मा झालेल्या नवीन व्यक्‍तींसमोर सैतान निरनिराळे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. (१ पेत्र ५:८) कधीकधी चांगल्या हेतूनेच, पण चुकीची माहिती मिळाल्यामुळे कुटुंबातील सदस्यच आपला विरोध करू शकतात. पण, अशा प्रकारच्या परीक्षा आपल्यासमोर येतात तेव्हा त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना किंवा आपल्या विश्‍वासांविषयी त्यांना सांगताना आदर व विचारशीलता यांसारखे उत्तम ख्रिस्ती गुण दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. (१ पेत्र ३:१५) अशा प्रकारच्या अनुभवांमुळे, जे आपले ऐकून घेतात त्यांच्यावर याचा चांगला परिणाम होऊ शकतो.—१ तीम. ४:१६.

जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर टिकून राहा

१६, १७. (क) जीवन प्राप्त करण्यासाठी अनुवाद ३०:१९, २० मध्ये कोणत्या तीन मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत? (ख) येशू, योहान व पौल यांनी मोशेच्या शब्दांना कशा प्रकारे दुजोरा दिला?

१६ येशू पृथ्वीवर येण्याच्या जवळजवळ १,५०० वर्षांपूर्वी मोशेने त्या काळात इस्राएल लोकांसमोर असलेला जीवनाचा सर्वोत्तम मार्ग निवडण्याचे त्यांना आवाहन केले. त्याने म्हटले: “आकाश व पृथ्वी ह्‍यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.” (अनु. ३०:१९, २०) इस्राएल लोक देवाला विश्‍वासू राहिले नाहीत. पण, जीवन प्राप्त करण्याकरता मोशेने सांगितलेल्या तीन मूलभूत गोष्टी आजही बदललेल्या नाहीत. येशूने व इतरांनीही या गोष्टींचा उल्लेख केला.

१७ यांपैकी पहिली गोष्ट म्हणजे, ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर आपण प्रीति केली पाहिजे.’ देवाच्या नीतिमान मार्गांनुसार कार्य करण्याद्वारे आपण देवाबद्दल असलेली प्रीती व्यक्‍त करतो. (मत्त. २२:३७) दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवाच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे ‘आपण त्याची वाणी ऐकली पाहिजे.’ (१ योहा. ५:३) यासाठी आपण ख्रिस्ती सभांना नियमित रीत्या उपस्थित राहिले पाहिजे, जेथे बायबलविषयी चर्चा केली जाते. (इब्री १०:२३-२५) तिसरी गोष्ट म्हणजे, ‘आपण परमेश्‍वराला धरून राहिले पाहिजे.’ म्हणजेच, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपण नेहमी देवावर विश्‍वास ठेवून त्याच्या पुत्राचे अनुकरण करत राहिले पाहिजे.—२ करिंथ. ४:१६-१८.

१८. (क) टेहळणी बुरूज यात १९१४ साली सत्याबद्दल कशा प्रकारे वर्णन करण्यात आले होते? (ख) आज सत्याच्या प्रकाशाबद्दल आपल्या भावना कशा असल्या पाहिजेत?

१८ बायबलमधील सत्यानुसार चालत राहणे हा खरोखर आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे! १९१४ मध्ये टेहळणी बुरूज यात हे अतिशय उल्लेखनीय विधान करण्यात आले होते: “आपण खरोखरच धन्य व आनंदित लोक आहोत, नाही का? आपला देव विश्‍वासू आहे, नाही का? जर कोणास बायबलमधील सत्यापेक्षा चांगले काही सापडले असेल, तर त्याने त्याचा स्वीकार करावा. जर भविष्यात तुम्हापैकी कोणास यापेक्षा चांगले काही सापडले तर तुम्ही आम्हासही त्याविषयी सांगाल अशी आम्ही आशा बाळगतो. देवाच्या वचनात सापडलेल्या सत्यापेक्षा चांगले, किंवा तितकी उंची गाठू शकेल असे काहीही आमच्या तरी माहितीत नाही. . . . खऱ्‍या देवाविषयीचे सुस्पष्ट ज्ञान मिळाल्यामुळे आमच्या अंतःकरणात व जीवनात आम्ही जी शांती, जो आनंद व जे आशीर्वाद अनुभवले आहेत त्यांचे वर्णन शब्दांत करता येणे केवळ अशक्य आहे. देवाची बुद्धी, न्याय, सामर्थ्य व प्रीती यांविषयीच्या सत्याचे ज्ञान आमच्या बुद्धीला पटले आहे आणि आमच्या अंतःकरणाला भावले आहे. आम्हाला आणखी शोध घेण्याची गरज वाटत नाही. या सत्याविषयी अधिकाधिक स्पष्टपणे जाणून घ्यावे इतकीच आमची मनस्वी इच्छा आहे.” (टेहळणी बुरूज (इंग्रजी), डिसेंबर १५, १९१४, पृष्ठे ३७७-३७८) आजही आपल्याला देवाकडील ज्ञानाबद्दल व सत्याबद्दल तितकीच कृतज्ञता वाटते. किंबहुना, आपण ‘परमेश्‍वराच्या प्रकाशात चालत’ आहोत याबद्दल आज आपण अधिकच आनंदी असले पाहिजे.—यश. २:५; स्तो. ४३:३; नीति. ४:१८.

१९. बाप्तिस्मा घेण्यास पात्र असलेल्यांनी विलंब न लावता बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?

१९ तुम्हाला यहोवाच्या ‘प्रकाशात चालण्याची’ इच्छा असेल, पण अद्याप तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेतला नसेल, तर विलंब लावू नका. बाप्तिस्मा घेण्याकरता बायबलनुसार ज्या काही अटी आहेत त्या पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. कारण देवाने व ख्रिस्ताने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा हा एक खास मार्ग आहे. भौतिक दृष्टीने तुमच्याजवळ असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट, अर्थात तुमचे जीवन यहोवाला अर्पण करा. तुम्ही येशूचे अनुकरण करण्याद्वारे देवाची इच्छा पूर्ण करू इच्छिता हे दाखवा. (२ करिंथ. ५:१४, १५) हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे!

तुमचे उत्तर काय असेल?

• आपल्या बाप्तिस्म्यावरून काय सूचित होते?

• देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?

• येशूपासून शिकणे इतके महत्त्वाचे का आहे?

• जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर टिकून राहण्यासाठी आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

तुमच्या बाप्तिस्म्यावरून तुम्ही जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाची निवड केली आहे हे दिसून येते

[२६ पानांवरील चित्रे]

तुम्ही “गुप्त स्थली” आश्रय घेतला आहे का?