तुम्ही यहोवाला आपला पिता मानता का?
तुम्ही यहोवाला आपला पिता मानता का?
‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा.’ येशूच्या शिष्यांपैकी एकाने अशी विनंती केली, तेव्हा त्याने असे उत्तर दिले: “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: ‘हे पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.’” (लूक ११:१, २) या ठिकाणी यहोवाला संबोधण्यासाठी येशू अनेक मोठमोठ्या पदव्यांचा वापर करू शकला असता, उदाहरणार्थ “सर्वसमर्थ देव,” “शिक्षक,” “उत्पन्नकर्ता,” “पुराणपुरुष,” किंवा “सनातन राजा.” (उत्प. ४९:२५; यश. ३०:२०; ४०:२८; दानी. ७:९; १ तीम. १:१७) पण, येशूने यांपैकी कोणत्याही पदवीचा वापर न करता, यहोवाला ‘पिता’ म्हणून संबोधले. त्याने असे का केले? कदाचित याद्वारे तो आपल्याला असे सांगू इच्छित असावा, की एक लहानसे मूल ज्या प्रकारे आपल्या प्रेमळ वडिलांजवळ निःसंकोचपणे जाते अगदी त्याच प्रकारे आपण या विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती असलेल्या यहोवा देवाजवळ आले पाहिजे.
पण, काही जणांना मात्र देवाकडे आपला पिता म्हणून बघणे फार कठीण वाटते. उदाहरणार्थ, अनिता * नावाची एक ख्रिस्ती बहीण कबूल करते, “माझ्या बाप्तिस्म्यानंतर कितीतरी वर्षांपर्यंत, यहोवा आपला पिता आहे, आपल्या अगदी जवळचा आहे असं मानून त्याला प्रार्थना करणं मला कठीण वाटायचं.” तिला हे इतके कठीण का वाटायचे? ती सांगते, “माझ्या जन्मदात्या पित्यानं एकदाही मला प्रेमानं वागवल्याचं मला आठवत नाही.”
या शेवटल्या कठीण दिवसांत, एका पित्याकडून मुलांना मिळाले पाहिजे असे स्वाभाविक प्रेम कमी होत चालल्याचे दिसते. (२ तीम. ३:१, ३) त्यामुळे अनितासारख्याच अनेकांना यहोवाला आपला पिता मानणे कठीण वाटते. असे असले तरीही, निराश होण्याची गरज नाही. कारण, यहोवा हा आपला प्रेमळ पिता आहे असा दृष्टिकोन बाळगण्याची आपल्याजवळ अनेक चांगली कारणे आहेत.
यहोवा—प्रेमळपणे आपल्या गरजा पुरवणारा
यहोवा आपला पिता आहे या दृष्टिकोनातून त्याच्याविषयी विचार करण्यासाठी, आधी आपण त्याला चांगल्या प्रकारे जाणून घेतले पाहिजे. येशूने म्हटले, “पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखीत नाही.” (मत्त. ११:२७) खरा देव, यहोवा याला जाणून घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे येशूने त्याच्याविषयी जे प्रकट केले त्यावर विचार करणे. तर मग, येशूने आपल्या पित्याबद्दल काय प्रकट केले?
आपल्याला जीवन देणारा यहोवाच आहे हे येशूने कबूल केले. त्याने म्हटले: “पित्यामुळे मी जगतो.” (योहा. ६:५७) आपणही आपल्या स्वर्गीय पित्यामुळेच अस्तित्वात आहोत. (स्तो. ३६:९; प्रे. कृत्ये १७:२८) पण, कोणत्या गोष्टीमुळे यहोवा इतरांना जीवन देण्यास प्रेरित झाला? त्याच्या प्रेमामुळेच त्याने असे केले नाही का? तेव्हा, जीवनाची ही अद्भुत देणगी दिल्याबद्दल आपण आपल्या स्वर्गीय पित्यावर नक्कीच प्रेम केले पाहिजे.
मानवजातीबद्दल देवाने ज्या सर्वात प्रभावी मार्गाने प्रेम व्यक्त केले तो म्हणजे त्यांच्या खंडणीकरता येशूचे बलिदान देण्याद्वारे. देवाच्या या प्रेमळ तरतुदीमुळे मानव पापी असतानाही त्यांना येशूच्या द्वारे यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडणे शक्य झाले आहे. (रोम. ५:१२; १ योहा. ४:९, १०) आणि यहोवा आपल्या सर्व प्रतिज्ञा पूर्ण करणारा असल्यामुळे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्या सर्वांना शेवटी “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” अनुभवायला मिळेल याची आपण खातरी बाळगू शकतो.—रोम. ८:२१.
तसेच, आपला स्वर्गीय पिता दररोज आपल्यावर “सूर्य उगवितो.” (मत्त. ५:४५) सूर्य उगवावा म्हणून प्रार्थना करण्याचा कधी आपण विचारसुद्धा करत नाही. तरीपण, सूर्यप्रकाश आपल्या जीवनाकरता अत्यावश्यक आहे व सूर्याची उबदार किरणे आपल्याला हवीहवीशी वाटतात! यासोबतच, आपल्या भौतिक गरजांविषयीही आपण त्याला विनंती करण्याआधीच तो जाणतो. खरोखरच, प्रेमळपणे आपल्या गरजा पुरवणारा या नात्याने आपला स्वर्गीय पिता अतुलनीय आहे. तेव्हा, तो किती मायेने त्याच्या सृष्टीची काळजी घेतो याचे निरीक्षण करून आपण त्याबद्दल कृतज्ञ मनोवृत्तीने मनन करू नये का?—मत्त. ६:८, २६.
आपला पिता—‘सांभाळ व रक्षण करणारा’
यशयाच्या भविष्यवाणीने देवाच्या प्राचीन काळातील लोकांना असे आश्वासन दिले: “पर्वत कुठल्याकुठे नाहीसे होतील, आणि टेकड्या हादरून जातील असेही क्वचित घडेल; परंतु तुझ्यावरचे माझे प्रेम यत्किंचितही कमी होणार नाही, किंवा तुझ्याशी मी केलेला शांततेचा करार भंग पावणार नाही. तुझा सांभाळ व रक्षण करणाऱ्या यहोवाचे हे बोल आहेत.” (यश. ५४:१०, द बायबल इन लिव्हिंग इंग्लिश) येशूने पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री यहोवाला प्रार्थनेत जे म्हटले होते, त्यावरून यहोवा खरोखर त्याच्या लोकांचा ‘सांभाळ व रक्षण करणारा’ देव आहे हे दिसून येते. आपल्या शिष्यांच्या संदर्भात येशूने देवाला अशी विनंती केली: “ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख.” (योहा. १७:११, १४) यहोवाने खरोखरच आजपर्यंत येशूच्या अनुयायांचा सांभाळ व रक्षण केले आहे.
आज यहोवा अनेक मार्गांनी सैतानाच्या डावपेचांपासून आपले रक्षण करतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे, तो ‘विश्वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्याला योग्य वेळी आध्यात्मिक अन्न पुरवतो. (मत्त. २४:४५) आध्यात्मिक बळ देणारे हे अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला “देवाची शस्त्रसामग्री धारण” करणे शक्य होते. उदाहरणार्थ, “विश्वासाची ढाल” आपल्याला ‘त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझविण्यास’ साहाय्य करते. (इफिस. ६:११, १६) देवावरील आपला विश्वास अनेक आध्यात्मिक धोक्यांपासून आपले संरक्षण करतो आणि यहोवा आपले रक्षण करण्यास समर्थ आहे यावर आपला भरवसा असल्याचे त्यावरून दिसून येते.
पृथ्वीवर असताना देवाचा पुत्र कशा प्रकारे वागला-बोलला याचे परीक्षण केल्यास आपला स्वर्गीय पिता किती कोमलतेने आपल्याशी व्यवहार करतो याबद्दल आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळते. मार्क १०:१३-१६ यातील वृत्तान्ताकडे लक्ष द्या. तेथे येशूने आपल्या शिष्यांना बोललेले हे शब्द वाचायला मिळतात: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या.” ती चिमुकली मुले त्याच्याजवळ येऊ लागली तेव्हा त्याने प्रेमाने त्यांना जवळ घेतले व त्यांना आशीर्वाद दिला. त्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद झळकला असेल याची कल्पना करा! येशूने एकदा म्हटले होते, “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” त्याअर्थी, यहोवालाही आपण त्याच्या जवळ यावे असे वाटते असा भरवसा आपण बाळगू शकतो.—योहा. १४:९.
यहोवा देव प्रेमाचा उगम आहे आणि त्याच्या प्रेमाला सीमाच नाही. आपल्या गरजा पुरवणारा आणि आपले रक्षण करणारा या नात्याने त्याची कोणाशीही तुलना करता येत नाही. आणि आपण त्याच्या जवळ यावे अशी त्याची इच्छा आहे. (याको. ४:८) खरोखर, यहोवाइतका चांगला पिता आणखी कोण असू शकेल?
यहोवाला पिता मानण्याचे फायदे!
आपला प्रेमळ व करुणामय स्वर्गीय पिता या नात्याने यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात! (नीति. ३:५, ६) येशूलाही आपल्या पित्यावर संपूर्ण मनाने भरवसा ठेवल्यामुळे अनेक फायदे मिळाले. त्याने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो.” (योहा. ८:१६, ईझी टू रीड व्हर्शन) यहोवा आपल्या पाठीशी आहे याची येशूला सर्व परिस्थितीत खातरी होती. उदाहरणार्थ, त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला पित्याचे हे प्रेमळ व दिलासादायक शब्द ऐकण्यास मिळाले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१५-१७) आणि त्याच्या मृत्यूच्या काही क्षणांआधी त्याने मोठ्याने असे म्हटले: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) त्या शेवटच्या क्षणांतही येशूचा त्याच्या पित्यावरील भरवसा जराही कमी झालेला नव्हता.
आपल्याबाबतीतही हीच गोष्ट खरी ठरू शकते. यहोवा आपल्या पाठीशी असताना आपल्याला कशाची भीती? (स्तो. ११८:६) सुरुवातीला उल्लेख केलेली अनिता पूर्वी जीवनातील समस्या स्वतःच्याच बळावर सोडवण्याचा प्रयत्न करायची. पण मग तिने येशूचे जीवन व त्याचे सेवाकार्य याविषयी, आणि विशेषतः त्याच्या स्वर्गीय पित्यासोबतच्या त्याच्या घनिष्ठ नातेसंबंधाविषयी सखोल अभ्यास करायचे ठरवले. याचा काय परिणाम झाला? अनिता म्हणते, “एक पिता काय असतो आणि त्याच्यावर पूर्णपणे आपला भार टाकण्याचा काय अर्थ होतो हे मला समजू लागलं.” ती पुढे म्हणते, “मला खरी मनःशांती आणि आनंद अनुभवता आला. खरंच आपल्याला कुठल्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही.”
यहोवाकडे आपला पिता म्हणून पाहण्याचे आणखी कोणते फायदे आहेत? मुले सहसा आपल्या आईवडिलांवर प्रेम करतात आणि त्यांना आवडेल अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात. देवाच्या पुत्रानेही पित्यावर प्रेम असल्यामुळे ‘जे त्याला आवडते ते सर्वदा केले.’ (योहा. ८:२९) त्याच प्रकारे, आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे आपल्याला सुज्ञपणे वागण्याची आणि इतरांना त्याच्याबद्दल सांगण्याद्वारे त्याचे “स्तवन” करण्याची प्रेरणा मिळेल.—मत्त. ११:२५; योहा. ५:१९.
आपला पिता ‘आपला उजवा हात धरतो’
आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याकरता एक “कैवारी” किंवा साहाय्य करणारा देखील पुरवला आहे. अर्थात, पवित्र आत्मा. येशूने म्हटले, “तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.” (योहा. १४:१५-१७; १६:१२, १३) देवाचा पवित्र आत्मा आपल्याला आपल्या पित्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत करू शकतो. तो आपल्याला “तटबंदी” जमीनदोस्त करण्यास, अर्थात आपल्या मनात असलेले पूर्वग्रह, चुकीच्या धारणा, अयोग्य दृष्टिकोन यांवर मात करून, ‘प्रत्येक कल्पना [किंवा, विचार] अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवायला’ लावण्यास मदत करतो. (२ करिंथ. १०:४, ५) म्हणूनच, आपण पवित्र आत्मा देण्याची यहोवाकडे विनंती केली पाहिजे आणि हा भरवसा बाळगला पाहिजे की ‘स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.’ (लूक ११:१३) तसेच, पवित्र आत्म्याने आपल्याला दिवसेंदिवस यहोवाच्या जवळ येण्यास मदत करावी म्हणूनही प्रार्थना करणे योग्य आहे.
एक लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून चालते तेव्हा त्याला अगदी सुरक्षित वाटते. त्याला कशाचीच काळजी किंवा भीती वाटत नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने यहोवाला आपला पिता मानले तर तुम्ही या सांत्वनदायक शब्दांविषयी पूर्ण खातरी बाळगू शकता: “मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.” (यश. ४१:१३) तुम्हाला देवाबरोबर सदासर्वकाळ ‘चालण्याचा’ अद्भुत सुहक्क मिळू शकतो. (मीखा ६:८) तेव्हा, यहोवाला आपला पिता मानून त्याच्या इच्छेप्रमाणे चालत राहा. असे केल्यास, तुम्हाला त्याचे प्रेम आणि जीवनात खरा आनंद व सुरक्षिततेची भावना अनुभवता येईल.
[तळटीप]
^ परि. 3 नाव बदलण्यात आले आहे.