व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘देवाचे वचन धैर्याने बोला’

‘देवाचे वचन धैर्याने बोला’

‘देवाचे वचन धैर्याने बोला’

‘ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.’—प्रे. कृत्ये ४:३१.

१, २. परिणामकारक रीतीने सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करणे का जरुरीचे आहे?

 येशूने आपल्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी शिष्यांना सांगितले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” मग पुनरुत्थान झाल्यावर, स्वर्गारोहण होण्याआधी त्याने आपल्या अनुयायांना ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्याची; [आणि] जे काही त्याने आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवण्याची’ आज्ञा दिली. त्याने त्यांना वचन दिले की “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्त. २४:१४; २६:१, २; २८:१९, २०.

तर अशा रीतीने, राज्याचा प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याची सुरुवात पहिल्या शतकात झाली. यहोवाचे साक्षीदार या नात्याने, आपण या कार्यात आवेशाने सहभाग घेतो. अतिशय महत्त्वाच्या अशा या जीवनदायी कार्याची तुलना दुसऱ्‍या कोणत्याच कार्याशी करता येत नाही. तेव्हा, हे सेवाकार्य परिणामकारक रीतीने करणे किती जरुरीचे आहे! या लेखात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे सेवाकार्यात धैर्याने देवाचे वचन घोषित करण्यास आपल्याला साहाय्य मिळते. शिवाय, यहोवाचा आत्मा कशा प्रकारे आपल्याला कुशलतेने शिकवण्यास व सातत्याने हे कार्य करत राहण्यास मदत करतो हे आपण पुढील दोन लेखांत पाहू.

आपल्याला धैर्याची गरज आहे

३. राज्याचा प्रचार करण्याच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी धैर्याची गरज का आहे?

देवाने आपल्यावर राज्याची घोषणा करण्याचे कार्य सोपवले आहे यापेक्षा मोठा सन्मान आपल्यासाठी कोणता असू शकतो! पण, हे कार्य करणे नेहमीच सोपे नसते. काही जण देवाच्या राज्याचा संदेश आनंदाने स्वीकारत असले, तरी बऱ्‍याच लोकांची मनोवृत्ती नोहाच्या काळातील लोकांसारखीच आहे. येशूने म्हटले की नोहाच्या काळातील लोकांनी त्याच्या प्रचाराकडे लक्ष दिले नाही. “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.” (मत्त. २४:३८, ३९) याशिवाय, आपली थट्टा व विरोध करणारेही लोक आहेत. (२ पेत्र ३:३) कधीकधी अधिकार पदावर असणारे, तर कधी शाळासोबती किंवा सहकर्मी आणि काही वेळा तर कुटुंबातील सदस्यसुद्धा आपला विरोध करतात. भरीस भर म्हणजे आपल्या स्वतःच्या दुर्बलता, जसे की बुजरेपणा किंवा नाकारले जाण्याची भीती. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला देवाचे वचन “उघडपणे” व “धैर्याने” सांगणे कठीण वाटू शकते. (इफिस. ६:१९, २०) पण, या कार्यात टिकून राहण्यासाठी धैर्याची अतिशय गरज आहे. तर मग, आपल्याला हे धैर्य कसे मिळवता येईल?

४. (क) धैर्य म्हणजे काय? (ख) प्रेषित पौलाला थेस्सलनीका येथील लोकांशी बोलण्याचे धैर्य कोठून मिळाले?

“धैर्य” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “रोखठोखपणा, मनमोकळेपणा, स्पष्टवक्‍तेपणा” असा होतो. “धाडस, आत्मविश्‍वास, . . . निर्भीडता” हे अर्थ देखील या शब्दात समाविष्ट आहेत. पण, धैर्याने बोलण्याचा अर्थ फटकळपणे किंवा इतरांच्या भावना दुखावतील अशा रीतीने बोलणे असा होत नाही. (कलस्सै. ४:६) धैर्याने बोलण्यासोबतच आपण सर्वांसोबत शांतीने राहू इच्छितो. (रोम. १२:१८) शिवाय, देवाच्या राज्याच्या संदेशाची घोषणा करताना, आपल्या बोलण्याने नकळत कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून धैर्य व विचारशीलता या दोन गोष्टींमध्ये संतुलन साधले पाहिजे. तेव्हा, धैर्य मिळवण्यासाठी आपण इतरही गुण संपादन करणे गरजेचे आहे आणि यासाठी बराच प्रयत्न करावा लागू शकतो. अशा प्रकारचे धैर्य हे आपोआप किंवा स्वबळावर विकसित करता येत नाही. प्रेषित पौल व त्याच्या सोबत्यांना फिलिप्पै येथे विरोध व अपमान सहन करावा लागला, तेव्हा थेस्सलनीका येथील लोकांशी बोलण्यासाठी त्यांना ‘धैर्य’ कोठून मिळाले? पौलाने लिहिल्याप्रमाणे, “देवाकडून” त्यांना हे धैर्य मिळाले. (१ थेस्सलनीकाकर २:२ वाचा.) त्याच प्रकारे, आज यहोवा देव आपल्या मनातील भीती दूर करून धैर्याने बोलण्यास आपलीही मदत करू शकतो.

५. पेत्र, योहान व इतर शिष्यांना यहोवाने कशा प्रकारे धैर्य दिले?

“अधिकारी, वडील व शास्त्री” यांनी प्रेषित पेत्र व योहान याना धमकावले तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा; कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” छळ थांबावा अशी प्रार्थना करण्याऐवजी त्यांनी व इतर बांधवांनी अशी विनंती केली: ‘हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.’ (प्रे. कृत्ये ४:५, १९, २०, २९, ३०) त्यांची ही विनंती यहोवाने मान्य केली का? (प्रेषितांची कृत्ये ४:३१ वाचा.) होय, यहोवाने आपल्या आत्म्याद्वारे त्यांना धैर्य एकवटण्यास साहाय्य केले. आज आपल्यालाही देवाचा आत्मा अशाच प्रकारे मदत करू शकतो. पण देवाचा आत्मा मिळावा आणि सेवाकार्यात त्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून आपल्याला काय करता येईल?

धैर्य मिळवणे

६, ७. देवाचा पवित्र आत्मा मिळवण्याचा एक सरळसोपा मार्ग कोणता? उदाहरणे द्या.

देवाचा पवित्र आत्मा मिळवण्याचा सर्वात सरळसोपा मार्ग म्हणजे त्यासाठी विनंती करणे. येशूने आपल्या श्रोत्यांना सांगितले: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) तेव्हा, आपण पवित्र आत्म्यासाठी सतत प्रार्थना केली पाहिजे. सेवाकार्य करण्याचे काही मार्ग, उदाहरणार्थ, रस्त्यावरील साक्षकार्य, अनौपचारिक साक्षकार्य किंवा व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्यास कदाचित आपल्याला भीती वाटत असेल. असे असल्यास, आपण यहोवाला प्रार्थना करून पवित्र आत्मा देण्याची व धैर्यवान होण्यास मदत करण्याची विनंती करू शकतो.—१ थेस्सलनी. ५:१७.

रोसा नावाच्या एका ख्रिस्ती स्त्रीने नेमके हेच केले. * एक दिवशी शाळेत तिच्यासोबत काम करणारी एक शिक्षिका, दुसऱ्‍या एका शाळेत मुलांशी करण्यात आलेल्या दुर्व्यवहाराबद्दल एक बातमी वाचत होती. ती बातमी वाचून त्या शिक्षिकेला इतका धक्का बसला की ती म्हणाली, “काय, चाललंय काय या जगात?” साक्ष देण्यासाठी समोर आलेली ही संधी रोसाला सोडायची नव्हती. पण, बोलायला सुरुवात करण्याचे धैर्य मिळवण्यासाठी तिने काय केले? रोसा सांगते, “मी यहोवाला प्रार्थना करून त्याच्या आत्म्याचं साहाय्य मागितलं.” परिणामस्वरूप, रोसा त्या शिक्षिकेला चांगल्या प्रकारे साक्ष देऊ शकली आणि पुन्हा या विषयावर संभाषण करण्याचीही तिने वेळ ठरवली. न्यूयॉर्क सिटी येथे राहणाऱ्‍या मीलानी नावाच्या एका पाच वर्षांच्या मुलीचाही अनुभव लक्षात घ्या. मीलानी म्हणते: “मी शाळेला जाण्याआधी आई व मी मिळून दररोज यहोवाला प्रार्थना करतो.” ते कशासाठी प्रार्थना करतात? मीलानीला शाळेत यहोवाची साक्षीदार या नात्याने खंबीर राहता यावे आणि आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना स्पष्टपणे सांगता यावे म्हणून तिला धैर्य देण्यासाठी ते यहोवाला प्रार्थना करतात! तिची आई सांगते, “यामुळे मीलानीला वाढदिवस व इतर सण आपण का साजरे करत नाही हे समजावून सांगणं आणि अशा प्रकारच्या सोहळ्यांपासून अलिप्त राहणं शक्य झालं आहे.” धैर्य मिळवण्यासाठी प्रार्थना किती प्रभावशाली आहे हेच या अनुभवांवरून दिसून येत नाही का?

८. धैर्य मिळवण्याच्या बाबतीत आपण यिर्मया संदेष्ट्यापासून काय शिकू शकतो?

त्याच प्रकारे, यिर्मया संदेष्ट्याला धैर्य मिळवण्यास कशामुळे साहाय्य मिळाले याचाही विचार करा. यहोवाने त्याला संदेष्टा म्हणून नेमले तेव्हा यिर्मयाने असे उत्तर दिले: “पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” (यिर्म. १:४-६) पण, नंतर यिर्मयाने देवाचे संदेश घोषित करण्याचे कार्य इतक्या चिकाटीने व प्रभावीपणे केले की सतत संकटाची घोषणा करणारा म्हणून लोक त्याला ओळखू लागले. (यिर्म. ३८:४) यिर्मया ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ यहोवाचे न्यायसंदेश धैर्याने घोषित करत राहिला. त्याच्या निडर व धैर्यवान प्रचारासाठी तो इस्राएलात इतका प्रसिद्ध होता की जवळजवळ ६०० वर्षांनंतर जेव्हा लोकांनी येशूला धैर्याने प्रचार करताना ऐकले तेव्हा यिर्मयाच जिवंत झाला आहे असा काहींचा ग्रह झाला. (मत्त. १६:१३, १४) सुरुवातीला संदेष्टा बनायला कचरणाऱ्‍या यिर्मयाने आपल्या बुजऱ्‍या स्वभावावर कशी मात केली? तो सांगतो: “माझ्या हाडांत कोंडलेला अग्नि जळत आहे असे [परमेश्‍वराचे वचन] माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्म. २०:९) होय, यहोवाच्या वचनाने यिर्मयावर शक्‍तिशाली प्रभाव पाडून त्याला यहोवाविषयी बोलण्यास प्रवृत्त केले.

९. यिर्मयाप्रमाणेच देवाच्या वचनाचा आपल्यावरही प्रभाव पडू शकतो असे का म्हणता येईल?

इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने म्हटले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) देवाच्या वचनाने ज्या प्रकारे यिर्मयावर प्रभाव पाडला त्याच प्रकारे ते आपल्यावरही शक्‍तिशाली प्रभाव पाडू शकते. बायबल लिहिण्यास जरी मानवांचा उपयोग करण्यात आला असला, तरी हा मानवांच्या बुद्धीने रचलेला ग्रंथ नसून देवाने प्रेरित केलेला ग्रंथ आहे हे लक्षात असू द्या. २ पेत्र १:२१ येथे आपण असे वाचतो: “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” आपण व्यक्‍तिशः बायबलचा अर्थपूर्ण अभ्यास करतो तेव्हा पवित्र आत्म्याने प्रेरित केलेला बायबलमधील संदेश आपल्या मनावर गहिरा प्रभाव पाडतो. (१ करिंथकर २:१० वाचा.) हा संदेश आपल्या मनात ‘कोंडलेल्या अग्निप्रमाणे’ होईल. आपण तो स्वतःजवळ ठेवू शकणार नाही तर इतरांना सांगण्यास प्रवृत्त होऊ.

१०, ११. (क) धैर्याने बोलता यावे म्हणून आपण कशा प्रकारे अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे? (ख) तुमच्या वैयक्‍तिक अभ्यासाचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही काय करायचे ठरवले आहे?

१० वैयक्‍तिक बायबल अभ्यासाचा आपल्यावर शक्‍तिशाली प्रभाव पडावा म्हणून आपण अशा रीतीने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्यातील संदेश आपल्या अंतःकरणापर्यंत पोचून आपल्या आंतरिक भावनांवर प्रभाव पाडेल. उदाहरणार्थ, यहेज्केल संदेष्ट्याला एक दृष्टान्त झाला ज्यात त्याला कठोर हृदयाच्या लोकांना उद्देशून एक अतिशय जळजळीत न्यायसंदेश असलेली गुंडाळी खाण्यास सांगण्यात आले. अर्थात, यहेज्केलाने हा संदेश पूर्णपणे ग्रहण करून, जणू त्यास आपल्या शरीराचा हिस्सा बनावायचा होता. असे केल्यामुळे हा संदेश सांगणे यहेज्केलाला मध खाण्यासारखे आनंददायक वाटणार होते.यहेज्केल २:८–३:४, ७-९ वाचा.

११ आपणही यहेज्केलासारख्याच परिस्थितीत आहोत. आज बऱ्‍याच लोकांना बायबल काय सांगते हे ऐकून घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे, देवाचे वचन सांगण्याच्या कार्यात टिकून राहायचे असेल तर आपण बायबलचा अभ्यास अशा रीतीने केला पाहिजे की जेणेकरून त्यातील संदेश आपल्याला पूर्णपणे आत्मसात करता येईल. जमेल तेव्हा व जमेल तसा नव्हे, तर नियमित रीत्या अभ्यास करण्याची आपण स्वतःला सवय लावली पाहिजे. आपलीही इच्छा त्या स्तोत्रकर्त्यासारखी असावी ज्याने एका स्तोत्रात असे म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.” (स्तो. १९:१४) खरोखर, आपण जे वाचतो त्यावर मनन करण्यासाठी वेळ काढणे किती महत्त्वाचे आहे! असे केल्यामुळे बायबलमधील सत्ये आपल्या अंतःकरणात खोलवर रुजतील. तेव्हा, आपण आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाचा दर्जा सुधारण्यास सतत प्रयत्नशील असले पाहिजे. *

१२. ख्रिस्ती सभा आपल्याला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यास कशी मदत करतात?

१२ यहोवाच्या पवित्र आत्म्याचे साहाय्य मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देण्यासाठी आपले एकत्र मिळणे न सोडणे.’ (इब्री १०:२४, २५) पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण ख्रिस्ती सभांना नियमित रीत्या उपस्थित राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे, सभेत लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि आपण जे शिकतो त्याचे पालन केले पाहिजे. शेवटी काही झाले तरी, यहोवाचा आत्मा आपल्याला मंडळीमार्फतच मार्गर्शन देतो, नाही का?प्रकटीकरण ३:६ वाचा.

धैर्य मिळवल्याने होणारे फायदे

१३. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी प्रचाराचे कार्य ज्या प्रकारे साध्य केले त्यावरून आपल्याला कोणता धडा मिळतो?

१३ पवित्र आत्मा विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍ती आहे आणि ही शक्‍ती मानवांना यहोवाच्या इच्छेनुसार वागण्यास समर्थ करू शकते. या शक्‍तीमुळेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी प्रचाराचे कार्य अतिशय मोठ्या प्रमाणावर साध्य केले. त्यांनी “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” देवाच्या राज्याच्या संदेशाची घोषणा केली. (कलस्सै. १:२३) खरे पाहता, त्यांच्यापैकी बहुतेक जण “निरक्षर व अज्ञानी” होते. त्याअर्थी, हे कार्य ते स्वतःच्या बळावर नव्हे, तर एका सामर्थ्यशाली शक्‍तीच्या साहाय्यानेच साध्य करू शकले हे अगदी स्पष्ट आहे.—प्रे. कृत्ये ४:१३.

१४. आत्म्यात आवेशी असण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करू शकते?

१४ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगल्यास आपल्याला धैर्याने सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. पवित्र आत्म्याकरता सतत प्रार्थना केल्याने, अर्थपूर्ण वैयक्‍तिक अभ्यास करण्यासाठी परिश्रम घेतल्याने, आपण जे वाचतो त्यावर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आणि नियमित रीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने आपल्याला “आत्म्यात उत्सुक” म्हणजेच आवेशी असण्यास साहाय्य मिळते. (रोम. १२:११) बायबलमध्ये ‘एक मोठा यहूदी वक्‍ता अपुल्लो’ याच्याविषयी असे म्हटले आहे: “तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे.” (प्रे. कृत्ये १८:२४, २५) आपल्यामध्ये “आत्म्याचा ज्वलंत आवेश” असल्यास आपण घरोघरचे आणि अनौपचारिक सेवाकार्य करताना अधिक धैर्य दाखवू शकतो.—रोम. १२:११, द बायबल—ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन.

१५. अधिक धैर्याने साक्षकार्य केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात?

१५ अधिक धैर्याने साक्षकार्य केल्याने आपल्यावर याचा चांगला प्रभाव पडतो. हे कार्य किती महत्त्वाचे आहे याची अधिक स्पष्टपणे जाणीव झाल्यामुळे त्याप्रती असलेला आपला दृष्टिकोन सुधारतो. तसेच, सेवाकार्यात आपल्याला चांगले परिणाम मिळतात तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि त्यामुळे आपला उत्साह अधिकच वाढतो. शिवाय, या शेवटल्या काळात प्रचार कार्य करणे किती निकडीचे आहे याची जाणीव झाल्यामुळे आपण जास्त आवेशाने त्यात सहभागी होतो.

१६. सेवाकार्यात आपला आवेश मंदावला असल्यास आपण काय केले पाहिजे?

१६ सेवाकार्यात आपला आवेश मंदावला आहे किंवा आपण पूर्वीइतके उत्साही नाही असे जाणवल्यास काय करावे? असे असल्यास, आपण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे. पौलाने लिहिले: “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथ. १३:५) स्वतःला हे प्रश्‍न विचारून पाहा: ‘मी आजही पूर्वीइतकाच आवेशी आहे का? पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता मी यहोवाला प्रार्थना करतो का? यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता मी त्याच्याच शक्‍तीवर अवलंबून राहतो हे माझ्या प्रार्थनांवरून दिसून येतं का? सेवाकार्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मी प्रार्थनेत कृतज्ञता व्यक्‍त करतो का? मला नियमित व अर्थपूर्ण वैयक्‍तिक अभ्यास करण्याची सवय आहे का? वाचलेल्या व ऐकलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी मी किती वेळ देतो? मंडळीच्या सभांमध्ये माझं किती लक्ष असतं?’ अशा प्रकारच्या प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे तुम्हाला कोठे सुधारणा करण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानुसार योग्य पावले उचलण्यास तुम्हाला मदत होईल.

धैर्य मिळवण्याकरता देवाच्या आत्म्याची मदत स्वीकारा

१७, १८. (क) आज प्रचाराचे कार्य किती प्रमाणात केले जात आहे? (ख) आपण कशा प्रकारे “पूर्ण धैर्याने” देवाच्या राज्याचा संदेश घोषित करू शकतो?

१७ येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) पहिल्या शतकात सुरू झालेले ते कार्य आज प्रचंड मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आज सत्तर लाखांपेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा जास्त देशांमध्ये देवाच्या राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यात दर वर्षी सुमारे १५० कोटी तास खर्च करत आहेत. भविष्यात पुन्हा कधीही केले जाणार नाही अशा या कार्यात उत्साही सहभाग घेणे हा खरोखर किती रोमांचक अनुभव आहे!

१८ पहिल्या शतकाप्रमाणेच, आजही जगभरातील प्रचाराचे कार्य देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. हे मार्गदर्शन स्वीकारल्यास, आपल्याला “पूर्ण धैर्याने” सेवाकार्य करणे शक्य होईल. (प्रे. कृत्ये २८:३१) तेव्हा, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारून आपण देवाच्या राज्याचा संदेश घोषित करत राहण्याचा निर्धार करू या!

[तळटीपा]

^ परि. 7 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 11 बायबल वाचनातून व वैयक्‍तिक अभ्यासातून जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला शिक्षणाचा लाभ घ्या, (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे २१-३२ वर असलेले, “वाचनाची सवय लावून घ्या” आणि “अभ्यास करण्याचे फायदे” हे अध्याय पाहा.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• देवाचे वचन बोलण्याकरता आपल्याला धैर्याची गरज का आहे?

• पहिल्या शतकातील शिष्यांना धैर्याने बोलण्यास कशामुळे साहाय्य मिळाले?

• आपण कशा प्रकारे धैर्य मिळवू शकतो?

• धैर्याने सेवाकार्य केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्र]

आईवडील आपल्या मुलांना धैर्य मिळवण्यास कसे साहाय्य करू शकतात?

[८ पानांवरील चित्रे]

सेवाकार्य करत असताना धैर्य मिळवण्यासाठी तुम्ही लगेच यहोवाला प्रार्थना करू शकता