व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यास युवकांना मदत करणारे उपयुक्‍त साधन

निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यास युवकांना मदत करणारे उपयुक्‍त साधन

निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यास युवकांना मदत करणारे उपयुक्‍त साधन

शलमोन या बुद्धिमान पुरुषाने सुमारे ३,००० वर्षांपूर्वी लिहिले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उप. १२:१) याबाबतीत यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या युवकांना मदत करण्यासाठी आता आणखी एक उपयुक्‍त साधन उपलब्ध झाले आहे आणि ते म्हणजे, तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, खंड २ (इंग्रजी). जगभरात मे २००८ ते जानेवारी २००९ दरम्यान झालेल्या, “देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित” या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनांत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते.

सदर पुस्तकाच्या आतल्या पानावर नियमन मंडळाने युवकांना उद्देशून लिहिलेले एक पत्र आहे. पत्राचा काही भाग असा आहे: “आज तरुणांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या दबावांचा आणि प्रलोभनांचा सामना करण्यास तसेच जीवनात देवाच्या इच्छेच्या अनुरूप असलेले निर्णय घेण्यास या पुस्तकातील माहिती तुम्हाला उपयुक्‍त ठरेल अशी आमची मनःपूर्वक प्रार्थना आहे.”

आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवावे’ असे सर्वच ख्रिस्ती पालकांना वाटते आणि हे योग्यच आहे. (इफिस. ६:४) पण, किशोरावस्थेत असलेली अनेक मुले आत्मविश्‍वासाच्या अभावामुळे गोंधळलेल्या मनःस्थितीत असतात आणि कोणाच्या तरी मार्गदर्शनासाठी ती आसुसलेली असतात. पालकांनो, तुम्हालाही किशोरवयीन मुले असल्यास या पुस्तकाचा पुरेपूर लाभ घेण्यास तुम्ही त्यांची मदत कशी करू शकता? यासाठी काही मार्गदर्शक सूचना पुढे दिल्या आहेत.

स्वतःसाठी पुस्तकाची एक प्रत मिळवा आणि पुस्तकातील माहितीशी चांगल्या प्रकारे परिचित व्हा. यासाठी पुस्तकाचे केवळ वरवर वाचन करणे पुरेसे नाही. तर त्यात विचार कशा प्रकारे मांडण्यात आले आहेत ते लक्षात घ्या. अमुक एक गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे इतकेच हे पुस्तक युवकांना सांगत नाही. तर बऱ्‍यावाइटातला फरक करण्यास ते त्यांच्या ‘ज्ञानेंद्रियांना’ प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करते. (इब्री ५:१४) तसेच, जीवनात योग्य गोष्टींसाठी खंबीर भूमिका कशी घ्यावी यावरही हे पुस्तक व्यावहारिक सूचना पुरवते. उदाहरणार्थ, त्यातील १५ वा अध्याय (“मित्रांच्या दबावाचा मी प्रतिकार कसा करू शकतो?”) हा युवकांना एखादी चुकीची गोष्ट करण्याचा दबाव येतो तेव्हा केवळ नकार देऊन निघून जाण्यास सांगत नाही. तर अशा परिस्थितीत बायबलच्या तत्त्वांचा कसा उपयोग करावा तसेच ‘प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावे’ हे समजून घेण्यासही ते त्यांची मदत करते.—कलस्सै. ४:६.

वाचकाशी संवाद साधणाऱ्‍या भागांचा उपयोग करा. हे भाग खासकरून युवकांसाठी असले तरी तुम्हाला लागू होणाऱ्‍या विषयांसंबंधी तुमच्या स्वतःच्या पुस्तकात तुम्ही आपले मनोगत लिहिण्यास काय हरकत आहे? * उदाहरणार्थ, डेटिंगसंबंधी तुमचे विचार जाणून घेण्याकरता पृष्ठ १६ वर दोन प्रश्‍न दिले आहेत. हे प्रश्‍न विचारात घेताना, तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाचे होता तेव्हा तुम्हाला याविषयी कसे वाटायचे हे आठवण्याचा प्रयत्न करा. त्या वेळी तुम्ही या प्रश्‍नांची काय उत्तरे दिली असती ते दिलेल्या जागेत लिहा. त्यानंतर तुम्ही स्वतःला असे विचारू शकता: ‘कालांतरानं या विषयावरील माझ्या भावना कशा बदलल्या आहेत? मी तरुण होतो तेव्हापासून आतापर्यंत या विषयावर माझी समज कशा प्रकारे प्रगल्भ झाली आणि हे मला माझ्या मुलापर्यंत परिणामकारक रीत्या कसं पोचवता येईल?’

मुलांना आपल्या भावना निःसंकोचपणे व्यक्‍त करण्याची मोकळीक द्या. वाचकाशी संवाद साधणारे पुस्तकातील भाग तुमच्या मुलांना आपल्या भावना व्यक्‍त करण्यास आणि दिलेल्या प्रश्‍नांची एकतर लिहून किंवा मनातल्या मनात उत्तरे देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. मुले आपल्या स्वतःच्या पुस्तकात काय लिहितात हे जाणून घेण्याचे नव्हे, तर त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचे पालकांचे उद्दिष्ट असले पाहिजे. पृष्ठ ३ वर दिलेल्या “पालकांसाठी सूचना” या भागात असे सुचवण्यात आले आहे: “तुमच्या तरुण मुलांना दिलखुलासपणे आपले विचार त्यांच्या पुस्तकात लिहिता यावेत म्हणून त्यांना मोकळीक द्या. काही काळानंतर कदाचित ते स्वतःहून तुमच्याशी या विषयांवर मनमोकळेपणे बोलतील.”

कौटुंबिक बायबल अभ्यासासाठी एक उत्तम साधन

तरुणांचे प्रश्‍न, खंड २, हे पुस्तक आपल्या कौटुंबिक उपासनेत उपयोग करण्याजोगे एक उत्तम साधन आहे. या पुस्तकात प्रत्येक परिच्छेदावर प्रश्‍न दिलेले नाहीत. मग आपल्या कौटुंबिक उपासनेत तुम्ही या पुस्तकाचा उपयोग कसा करू शकता? त्यासाठी तुम्ही अशी अभ्यास पद्धत अवलंबू शकता जी तुमच्या मुलांकरता सगळ्यात परिणामकारक ठरेल.

उदाहरणार्थ, काही कुटुंबांसाठी पृष्ठे १३२ आणि १३३ वरील “मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास सुसज्ज व्हा” या विषयाची चर्चा करताना सराव करणे लाभदायक ठरू शकते. तेथे दिलेला पहिला प्रश्‍न, तुमच्या मुलाला अथवा मुलीला कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड देणे सगळ्यात कठीण वाटते याचा विचार करण्यास प्रवृत्त करेल. तर दुसरा प्रश्‍न, हा दबाव जास्तकरून कोणत्या परिस्थितीत निर्माण होऊ शकतो याचा विचार करण्यास मदत करेल. मित्रांच्या दबावाला बळी पडल्यास काय परिणाम होऊ शकतात आणि प्रतिकार केल्यास काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केल्यानंतर, तुमच्या मुलाला अशी काही उत्तरे तयार करून ठेवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे ज्यांच्या साहाय्याने त्याला एकतर हा दबाव पचवून घेता येईल, तो दुसरीकडे वळवता येईल किंवा परतावून लावता येईल. तुमच्या मुलाला अथवा मुलीला आपल्या कल्पकतेचा उपयोग करून सहजतेने, आत्मविश्‍वासाने व ठामपणे देता येतील अशी उत्तरे तयार करण्यास मदत करा.—स्तो. ११९:४६.

सुसंवादाकरता एक उपयुक्‍त साधन

तरुणांचे प्रश्‍न, खंड २, हे पुस्तक युवकांना आपल्या आईवडिलांशी संवाद साधण्याचे प्रोत्साहन देते. उदाहरणार्थ, “आई किंवा बाबांशी सेक्सविषयी कसे बोलू?” (पृष्ठे ६३-६४) आणि “आपल्या पालकांशी बोला!” (पृष्ठ १८९) या चौकटींमध्ये, मुलांना आईवडिलांशी बोलायला संकोच वाटतो अशा विषयांवर मनमोकळेपणाने कसे बोलता येईल यासंबंधी काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत. एका १३ वर्षांच्या मुलीने लिहिले: “या पुस्तकामुळं मला माझ्या मनात घोळत असलेल्या, इतकंच नव्हे तर मी केलेल्या गोष्टींविषयी देखील आईवडिलांशी बोलण्याची हिम्मत मिळाली.”

हे पुस्तक इतर मार्गांनीही सुसंवादाला वाव देते. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी “काय वाटतं तुम्हाला?” असे शीर्षक असलेली चौकट दिलेली आहे. या चौकटीचा केवळ उजळणी करण्यासाठीच नव्हे, तर कौटुंबिक चर्चेसाठी देखील उपयोग केला जाऊ शकतो. तसेच, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी “माझा निर्धार!” ही चौकट देखील दिलेली आहे. या चौकटीमुळे, मुलांना त्या अध्यायातून जे काही शिकायला मिळाले त्याचा ते व्यावहारिक रीत्या कोणत्या खास मार्गांनी उपयोग करू शकतात हे लिहून काढण्याचे प्रोत्साहन मिळते. याशिवाय, “माझा निर्धार!” या चौकटीत शेवटी असे विधान करण्यात आले आहे: “याविषयी मला आईबाबांकडून हे जाणून घ्यायला आवडेल की . . . ” यामुळे उपयुक्‍त सल्ल्यासाठी मुलांना आपल्या आईवडिलांची मदत घेण्याचे प्रोत्साहन मिळेल.

मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा!

पालक या नात्याने आपल्या मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचे तुमचे उद्दिष्ट आहे. असे करण्यासाठी तरुणांचे प्रश्‍न, खंड २, हे पुस्तक तुमची मदत करू शकते. एका पित्याने आपल्या मुलीशी मनमोकळा संवाद कसा साधला हे विचारात घ्या.

“आमची काही आवडती ठिकाणं आहेत जिथं मी आणि रिबेका पायीच किंवा गाडीनं फिरायला जातो. मला वाटतं, अशा मोकळ्या वातावरणात ती आपोआप मनातलं बोलू लागते.

“सगळ्यात आधी आम्ही या पुस्तकातलं नियमन मंडळानं लिहिलेलं पत्र आणि ‘पालकांसाठी सूचना’ हे विचारात घेतलं. मला तिला याची जाणीव करून द्यायची होती की ती आपल्या पुस्तकात जे काही लिहील ते मी मुळीच पाहणार नाही. तेव्हा, पृष्ठ ३ वर सांगितल्याप्रमाणे, ती आपल्या पुस्तकात अगदी निःसंकोचपणे मनातलं लिहू शकते.

“पुस्तकातल्या कोणत्या अध्यायांवर चर्चा करायची व त्यांपैकी प्रथम कोणत्या अध्यायावर रिबेकाला चर्चा करायला आवडेल हे मी तिला ठरवू दिलं. आणि तिनं सर्वप्रथम निवडलेल्या अध्यायांपैकी एक होता, ‘मी इलेक्ट्रॉनिक गेम्स खेळावेत का?’ ती हा अध्याय निवडेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं! पण, तिनं तो अध्याय निवडण्यामागे एक कारण होतं. तिच्या मित्रमैत्रिणींपैकी अनेक जण एक भयानक स्वरूपाचा खेळ खेळत होते. त्यात चित्रित केलेल्या हिंसेची व अश्‍लील भाषेची मला काहीएक कल्पना नव्हती! पण, पृष्ठ २५१ वरील “माझा निर्धार!” या चौकटीची चर्चा करत असताना या सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्या चौकटीतल्या माहितीची चर्चा केल्यामुळं आणखी एक फायदा झाला. असा हिंसक स्वरूपाचा खेळ खेळण्याची कोणी गळ घातलीच तर त्याला कसं उत्तर द्यायचं याची तयारी करण्यास रिबेकाला मदत मिळाली.

“आता तर स्थिती अशी आहे की रिबेका आपल्या पुस्तकात जे काही लिहिते त्याविषयी ती स्वतःच मला सांगते. अभ्यासादरम्यान आम्ही दोघं खूप खूप बोलतो. आम्ही आळीपाळीनं वाचतो आणि त्यानंतर पुस्तकातल्या चित्रांपासून चौकटीपर्यंत सर्व गोष्टींवर तिला खूप काही बोलायचं असतं. यामुळं, मी तिच्या वयाचा असताना दिवस कसे होते याविषयी तिला सांगायची मला संधी मिळते. आणि मग आजकालची परिस्थिती कशी आहे याविषयी ती मला सांगते. तिला मनातलं अगदी सगळं बोलायची इच्छा असते!”

हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा अनेक पालकांना खूप आनंद झाला. नियमन मंडळाची हीच सदिच्छा आहे की तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, खंड २ हे पुस्तक जगभरातील सर्व ख्रिस्ती कुटुंबांसाठी एक वरदान ठरेल. या पुस्तकामुळे सर्वांनाच आणि विशेषतः आमच्या प्रिय तरुणांना ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहण्यास मदत मिळो.—गलती. ५:१६.

[तळटीप]

^ परि. 6 वाचकाशी संवाद साधणारे या पुस्तकातील काही भाग सर्व वयोगटातील लोकांना लागू होतात. उदाहरणार्थ, “रागावर ताबा मिळवा” ही पृष्ठ २२१ वर दिलेली चौकट तुमच्या मुलांइतकीच तुम्हालाही लाभदायक ठरू शकते. तसेच, “मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास सुसज्ज व्हा” (पृष्ठे १३२-१३३), “माझं महिन्याचं बजेट” (पृष्ठ १६३), आणि “माझी ध्येयं” (पृष्ठ ३१४) हे विषय देखील सर्वांनाच लाभदायक ठरू शकतात.

[३० पानांवरील चौकट]

काही तरुणांचे मनोगत

“हे पुस्तक, हातात पेन्सिल घेऊन, अगदी निवांतपणे विचार करत वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्याची रचना खासगी डायरीसारखी करण्यात आली आहे. त्यामुळं हे पुस्तक वाचताना जीवनाचा सर्वोत्तम मार्ग निवडण्याच्या उद्देशानं, अंतर्मुख होऊन मनन करण्यास वाव मिळतो.”—निकोला.

“माझ्यावर डेटिंग करण्याचा खूप दबाव येतो. काही वेळा तर मनात चांगले हेतू असलेल्या लोकांकडूनसुद्धा माझ्यावर असा दबाव येतो. पण, या पुस्तकाचा पहिला भाग वाचल्यावर माझी खातरी पटली की कोणी काहीही म्हणो, पण अजून मी डेटिंग करण्यासाठी तयार नाही.”—कट्रीना.

“‘तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचा विचार करत आहात का?’ या चौकटीतील माहिती वाचल्यामुळं मला माझ्या बाप्तिस्म्याबद्दल अधिक गांभीर्यानं विचार करण्यास मदत मिळाली. तसंच, मी किती अर्थपूर्ण व नियमितपणे बायबल अभ्यास व प्रार्थना करते याचं पुन्हा परीक्षण करण्याची मला प्रेरणा मिळाली.”—ॲश्‍ली.

“माझे आईवडील यहोवाचे साक्षीदार असले आणि त्यांनी लहानपणापासून माझ्यावर चांगले संस्कार केले असले, तरी जीवनात कोणती पावलं उचलावीत याविषयी स्वतः विचार करण्यास या पुस्तकानं मला भाग पाडलं आहे. शिवाय, या पुस्तकानं मला आईबाबांशी मनमोकळेपणे बोलण्यासही मदत केली.”—झॅमीरा.

[३१ पानांवरील चित्र]

पालकांनो, या पुस्तकातील माहितीशी चांगल्या प्रकारे परिचित व्हा

[३२ पानांवरील चित्र]

आपल्या मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोचण्याचे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे