व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

कोणत्या परिस्थितींत पुन्हा बाप्तिस्मा घेण्याचा विचार करता येईल?

विशिष्ट परिस्थितींत, एक व्यक्‍ती आपला बाप्तिस्मा खरोखरच उचित होता का याबद्दल विचार करून पुन्हा बाप्तिस्मा घेण्याचा विचार करू शकते. उदाहरणार्थ, बाप्तिस्म्याच्या वेळी एक व्यक्‍ती गुप्तपणे अशा प्रकारचे जीवन जगत असेल किंवा असे एखादे काम करत असेल जे बायबल तत्त्वांच्या विरोधात होते. जर तिचा उचितपणे बाप्तिस्मा झालेला असता तर अशा प्रकारच्या आचरणामुळे तिला मंडळीतून बहिष्कृत केले गेले असते. तर मग, गुप्तपणे अशा प्रकारचे जीवन जगणाऱ्‍या या व्यक्‍तीने देवाला आपले जीवन समर्पित करणे योग्य होते का? जर तिने बायबलच्या विरोधात असलेले आचरण सोडून दिले असते, तरच तिने यहोवाला केलेले समर्पण योग्य ठरले असते. तेव्हा, अशा प्रकारची गंभीर उणीव असताना बाप्तिस्मा घेतलेली व्यक्‍ती पुन्हा बाप्तिस्मा घेण्याविषयी विचार करू शकते.

बाप्तिस्म्याच्या वेळी कदाचित एक व्यक्‍ती वाईट काम करत नसेल, पण बाप्तिस्म्यानंतर तिने गंभीर स्वरूपाचे एखादे कृत्य केले असेल ज्यामुळे न्यायिक समिती स्थापन करावी लागली असेल. अशा व्यक्‍तीबद्दल काय? समजा या व्यक्‍तीने असा दावा केला की आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपण काय करत आहोत हे आपल्याला पूर्णपणे समजले नव्हते आणि त्यामुळे आपला बाप्तिस्मा खरोखर योग्य नव्हता. अशा व्यक्‍तीला भेटताना वडिलांनी तिचा बाप्तिस्मा योग्य नव्हता असे सुचवू नये. आणि तिने केलेले समर्पण व घेतलेला बाप्तिस्मा योग्य होता की नाही याबद्दल तिला काय वाटते हे विचारू नये. कारण, बाप्तिस्म्याच्या वेळी तिने बाप्तिस्म्याच्या गांभीर्याबद्दल बायबलवर आधारित भाषण ऐकले होते. तसेच, समर्पण व बाप्तिस्म्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची तिने होकारार्थी उत्तरे दिली होती. नंतर ती स्वेच्छेने बाप्तिस्म्याच्या ठिकाणी गेली व बाप्तिस्मा घेण्यासाठी तिने स्वतःला सादर केले. त्याअर्थी, त्या व्यक्‍तीला आपण काय करत आहोत याच्या गांभीर्याची पूर्णपणे जाणीव होती असे मानणे तर्कसंगत ठरेल. त्यामुळे मंडळीतील वडील तिच्याशी एक बाप्तिस्माप्राप्त व्यक्‍ती म्हणूनच व्यवहार करतील.

पण, त्या व्यक्‍तीने आपला बाप्तिस्मा योग्य नव्हता असा प्रश्‍न उपस्थित केल्यास, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) मार्च १, १९६०, पृष्ठे १५९ व १६०, आणि फेब्रुवारी १५, १९६४, पृष्ठे १२३ ते १२६ यातील माहितीकडे वडील तिचे लक्ष वेधू शकतात, जेथे पुन्हा बाप्तिस्मा घेण्याच्या विषयावर तपशीलवारपणे चर्चा करण्यात आली आहे. ही माहिती लक्षात घेतल्यानंतर, विशिष्ट परिस्थितींत (जसे की बाप्तिस्म्याच्या वेळी एका व्यक्‍तीला बायबलचे पुरेसे ज्ञान नसणे) एखाद्याने पुन्हा बाप्तिस्मा घेण्याचा विचार केल्यास ती एक वैयक्‍तिक बाब आहे.

इतरांसोबत एकाच घरात राहण्याच्या बाबतीत खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

प्रत्येकाला घराची गरज असते. पण, आज कित्येकांजवळ स्वतःचे घर नाही. आर्थिक परिस्थिती, आजारपण, किंवा इतर कारणांमुळे एकापेक्षा जास्त कुटुंबातील सदस्यांना एकाच घरात राहावे लागते. जगातील काही भागांत तर एकाच खोलीत कितीतरी नातेवाईक एकत्र राहतात.

जगभरातील ख्रिस्ती मंडळीच्या सर्व सदस्यांकरता कोणत्या प्रकारची राहण्याची व्यवस्था योग्य आहे यासंबंधीच्या नियमांची लांबलचक यादी पुरवणे ही यहोवाच्या संघटनेची जबाबदारी नाही. आपली राहण्याची व्यवस्था देवाला स्वीकारयोग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी ख्रिश्‍चनांनी बायबलची तत्त्वे विचारात घ्यावीत असे त्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांपैकी काही तत्त्वे कोणती आहेत?

विचारात घेण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांचा आपल्यावर व देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर होणारा परिणाम. हे लोक कोण आहेत? ते यहोवाचे उपासक आहेत का? ते बायबलच्या स्तरांनुसार आचरण करतात का? प्रेषित पौलाने लिहिले: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.”—१ करिंथ. १५:३३.

बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यहोवा जारकर्म व व्यभिचार यांचा निषेध करतो. (इब्री १३:४) त्यामुळे, अविवाहित विरुद्धलिंगी व्यक्‍ती पती-पत्नी असल्याप्रमाणे राहू शकतील अशा प्रकारची राहण्याची व्यवस्था निश्‍चितच यहोवाला मान्य असू शकत नाही. ज्या ठिकाणी अनैतिक आचरण खपवून घेतले जाते अशा ठिकाणी एक खरी ख्रिस्ती व्यक्‍ती कधीच राहू इच्छिणार नाही.

शिवाय, देवाची संमती मिळवू इच्छिणाऱ्‍या सर्वांना “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असे बायबल आर्जवते. (१ करिंथ. ६:१८) म्हणून, ज्यामुळे अनैतिक आचरण करण्याचा मोह होऊ शकेल अशा प्रकारची कोणतीही राहण्याची व्यवस्था टाळणे ख्रिश्‍चनांकरता सुज्ञपणाचे ठरेल. उदाहरणार्थ, अशा एका परिस्थितीचा विचार करा, जेथे अनेक ख्रिस्ती एकाच घरात राहतात. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे अनैतिक वर्तनाला प्रोत्साहन देणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे का? इतर जण घरात नसल्यामुळे, एकमेकांशी विवाहित नसलेल्या दोन व्यक्‍तीच केवळ घरात आहेत असा प्रसंग उद्‌भवल्यास काय? त्याचप्रमाणे, एकमेकांबद्दल आकर्षण असलेल्या अविवाहित व्यक्‍ती देखील एकाच घरात राहणे नैतिक रीत्या घातक ठरू शकते. अशा प्रकारचे प्रसंग टाळणेच सुज्ञतेचे ठरेल.

तसेच, घटस्फोट झाल्यानंतरही जोडप्याने एकाच घरात राहणे अयोग्य ठरेल. कारण, एकमेकांच्या सहवासाची सवय असल्यामुळे ते अनैतिक आचरणास सहज बळी पडू शकतात.—नीति. २२:३.

लक्षात घेण्याजोगी एक शेवटची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या निर्णयांबद्दल समाजाचा दृष्टिकोन. एखादी राहण्याची व्यवस्था एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या दृष्टीत कदाचित योग्य असेल; पण जर त्याविषयी चारचौघांत उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता असेल, तर त्याबद्दल पुनर्विचार करणे गरजेचे आहे. यहोवाच्या नावावर कलंक येईल असे काहीही आपण करू इच्छित नाही. याबाबतीत पौलाने असे म्हटले: “यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्‍यांच्यापैकी कोणालाहि अडखळविणारे होऊ नका; तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीहि करा.”—१ करिंथ. १०:३२, ३३.

यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार जे आचरण करू इच्छितात त्यांना योग्य प्रकारची राहण्याची व्यवस्था मिळणे कदाचित सोपे जाणार नाही. पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत” राहिले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे काहीही अनुचित प्रकार घडत नाही याची त्यांनी खातरी केली पाहिजे. (इफिस. ५:५, १०) याबाबतीत मार्गदर्शनाकरता त्यांनी देवाला प्रार्थना केली पाहिजे आणि एकमेकांच्या शारीरिक व नैतिक हिताचे रक्षण होईल आणि त्याचबरोबर यहोवाच्या पवित्र नावाला कलंक लागणार नाही यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे.