व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा

आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा

आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा

“आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलती. ५:१६.

१. पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणते दोन प्रकारचे बाप्तिस्मे झाले?

 येशूचे अनुयायी सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. ही घटना, त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाल्यानंतर घडली. त्यांना आत्म्याचे एक अद्‌भुत कृपादान प्राप्त झाले होते. (१ करिंथ. १२:४-१०) या कृपादानाचा आणि प्रेषित पेत्राने दिलेल्या भाषणाचा काय परिणाम झाला? अनेकांच्या “अंतःकरणास चुटपुट लागली.” त्यामुळे, पेत्राच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी पश्‍चात्ताप केला आणि बाप्तिस्मा घेतला. या घटनेच्या अहवालात असे म्हटले आहे: “ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.” (प्रे. कृत्ये २:२२, ३६-४१) येशूने सांगितल्याप्रमाणे नक्कीच त्यांचा पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्यात बाप्तिस्मा झाला असेल.—मत्त. २८:१९.

२, ३. (क) पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा होणे यात काय फरक आहे? (ख) आज खरे ख्रिस्ती बनणाऱ्‍या सर्वांनी पाण्यात बाप्तिस्मा घेणे का अत्यावश्‍यक आहे?

पण, पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा होणे यात काही फरक आहे का? होय. ज्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होतो त्यांचा देवाचे आत्म्याने अभिषिक्‍त पुत्र या नात्याने नव्याने जन्म होतो. (योहा. ३:३) देवाच्या स्वर्गीय राज्यात येशूसोबत राजे आणि सहयाजक होण्याकरता त्यांचा अभिषेक केला जातो आणि ते ख्रिस्ताच्या आध्यात्मिक शरीराचे भाग बनतात. (१ करिंथ. १२:१३; गलती. ३:२७; प्रकटी. २०:६) तेव्हा, ख्रिस्तासोबत सहवारस होण्याकरता पेन्टकॉस्टच्या दिवशी आणि त्यानंतर निरनिराळ्या व्यक्‍तींना निवडताना, यहोवाने त्यांना हा बाप्तिस्मा, अर्थात पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा दिला. (रोम. ८:१५-१७) पण, आज यहोवाच्या लोकांच्या संमेलनांत व अधिवेशनांत पवित्र आत्म्याच्या “नावाने” सहसा जो पाण्यात बाप्तिस्मा होतो त्याविषयी काय?

पाण्यातील बाप्तिस्मा हा खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी यहोवा देवाला केलेल्या पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे. ज्यांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे, त्यांच्या बाबतीत तर हे खरे आहेच. पण, आज ज्या लाखो स्त्रीपुरुषांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे त्यांच्याकरता देखील पाण्यातील बाप्तिस्मा एक आवश्‍यक पाऊल आहे. एखाद्या व्यक्‍तीची आशा कोणतीही असो, पण देवाची संमती मिळवण्याकरता त्या व्यक्‍तीने पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणे अत्यावश्‍यक आहे. हा बाप्तिस्मा घेणाऱ्‍या सर्व ख्रिश्‍चनांनी ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहावे’ अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. (गलतीकर ५:१६ वाचा.) तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करत आहात का?

‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा’ काय अर्थ होतो?

४. ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा’ काय अर्थ होतो?

‘आत्म्याच्या प्रेरणेने चालणे’ याचा अर्थ पवित्र आत्म्याला स्वतःवर कार्य करू देणे, आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव होऊ देणे. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपल्या दैनंदिन जीवनात पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारणे. गलतीकरांच्या ५ व्या अध्यायात पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली असण्याचा व त्याउलट शरीराच्या प्रभावाखाली असण्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट केले आहे.गलतीकर ५:१७, १८ वाचा.

५. पवित्र आत्म्याचा स्वतःवर प्रभाव होऊ दिल्यामुळे एक व्यक्‍ती कोणत्या कार्यांपासून दूर राहू शकते?

तुमच्यावर पवित्र आत्म्याचा प्रभाव असल्यास, तुम्ही आपोआपच शरीराच्या कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल. शरीराची कामे म्हणजे, “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मुर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा.” (गलती. ५:१९-२१) आत्म्याच्या प्रभावाखाली आल्यामुळे तुम्ही जणू ‘आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता.’ (रोम. ८:५, १३) असे केल्यामुळे तुम्हाला शारीरिक वासनांच्या आहारी जाण्याऐवजी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष लावण्यास व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार वागण्यास मदत मिळेल.

६. आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ प्रदर्शित करण्यासाठी कशाची गरज आहे हे उदाहरणाच्या साहाय्याने सांगा.

पवित्र आत्मा तुमच्यावर कार्य करतो तसतसे तुम्ही “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” अर्थात देवाला आवडणारे गुण प्रदर्शित करू लागता. (गलती. ५:२२, २३) अर्थात, हे सहजासहजी घडत नाही तर याकरता बरेच प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ: शेतकरी जमिनीची मशागत करतो. पण, सूर्यप्रकाश व पाणी देखील अत्यावश्‍यक आहे; त्याशिवाय शेतकरी पीक मिळण्याची अपेक्षा करू शकत नाही. आपण पवित्र आत्म्याची सूर्यप्रकाशाशी तुलना करू शकतो. आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्यासाठी पवित्र आत्मा अत्यावश्‍यक आहे. पण त्याच वेळी, शेतकऱ्‍याने परिश्रम न केल्यास काही हाती लागेल का? (नीति. १०:४) तेव्हा, तुम्ही आपल्या अंतःकरणाची कशा प्रकारे मशागत करता याचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यावरच पवित्र आत्म्याचे फळ तुमच्या जीवनात किती उत्तम रीत्या आणि किती प्रमाणात उत्पन्‍न होते हे अवलंबून आहे. तेव्हा स्वतःला हा प्रश्‍न विचारा, ‘मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याद्वारे त्याला माझ्या जीवनात फळ उत्पन्‍न करू देत आहे का?’

७. पवित्र आत्म्याचे फळ उत्पन्‍न करण्यासाठी अभ्यास व मनन करणे इतके महत्त्वाचे का आहे?

चांगले पीक मिळण्यासाठी पिकाला पाणी देणेही गरजेचे असते. आत्म्याचे फळ उत्पन्‍न करण्यासाठी तुम्हाला बायबलमध्ये सापडणारे आणि आज ख्रिस्ती मंडळीच्या माध्यमाने उपलब्ध करून दिले जाणारे सत्याचे पाणी मिळवणे गरजेचे आहे. (यश. ५५:१) कदाचित तुम्ही अनेक लोकांना हे सांगितले असेल की बायबल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे. (२ तीम. ३:१६) तसेच, विश्‍वासू व बुद्धिमान दास, शुद्ध पाण्याप्रमाणे असणारे बायबलमधील सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला मोलाची मदत पुरवतो. (मत्त. २४:४५-४७) याचा अर्थ स्पष्टच आहे. पवित्र आत्म्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडण्यासाठी आपण देवाच्या वचनाचे वाचन व त्यावर मनन केले पाहिजे. जर तुम्ही असे करत असाल, तर तुम्ही त्या प्रेषितांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करत आहात ज्यांनी आपल्याला मिळालेल्या माहितीचा “बारकाईने शोध केला.” विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, प्रतिज्ञात संतती व अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीबद्दलच्या आध्यात्मिक सत्याबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा देवदूतांनीही दाखवली आहे.१ पेत्र १:१०-१२ वाचा.

पवित्र आत्म्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडतो?

८. यहोवाचा आत्मा मिळावा म्हणून त्याला प्रार्थना करत राहणे का महत्त्वाचे आहे?

पण बायबलचा अभ्यास करणे व त्यावर मनन करणे इतकेच पुरेसे नाही. तुम्ही यहोवाला मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रार्थना करत राहिले पाहिजे. तो ‘आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्‍यापलीकडे आपल्यामध्ये अधिक्याने कार्य करावयास’ समर्थ आहे. (इफिस. ३:२०; लूक ११:१३) पण, “जर देव माझ्या ‘गरजा काय आहेत हे त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे,’ तर मग मी त्याला वारंवार प्रार्थना का करावी?” असे कोणी तुम्हाला विचारल्यास तुम्ही कसे उत्तर द्याल? (मत्त. ६:८) पहिली गोष्ट म्हणजे, पवित्र आत्मा देण्यासाठी तुम्ही प्रार्थना करता तेव्हा आपण यहोवावरच पूर्णपणे विसंबून आहोत हे तुम्ही दाखवता. उदाहरणार्थ, कोणी तुमच्याजवळ मदत मागायला आल्यास तुम्ही त्याला मदत करण्यासाठी तुमच्याकडून जे काही होईल ते कराल, नाही का? याचे एक कारण म्हणजे त्या व्यक्‍तीने तुम्हाला मदत मागितली आणि तुमच्यावर भरवसा दाखवला. (नीतिसूत्रे ३:२७ पडताळून पाहा.) त्याच प्रकारे, तुम्ही यहोवाचा आत्मा मिळावा म्हणून त्याला प्रार्थना करत राहता तेव्हा त्याला आनंद होतो आणि तो निश्‍चितच तुम्हाला त्याचा आत्मा देईल.—नीति. १५:८.

९. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने कशा प्रकारे आपल्यावर देवाच्या आत्म्याचा प्रभाव पडण्यास मदत मिळते?

देवाच्या आत्म्याचा प्रभाव आपल्यावर पडण्यासाठी ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने देखील महत्त्वाची भूमिका निभावतात. या सभांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांतील कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे केल्यामुळे तुम्हाला ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्यास मदत मिळते. (१ करिंथ. २:१०) सभांमध्ये नियमित स्वरूपाने उत्तरे देणेही लाभदायक आहे. मागील चार आठवड्यांतील सभांचा विचार करा. तुम्ही कितीदा या सभांमध्ये उत्तर देण्यासाठी व आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी हात वर केल्याचे तुम्हाला आठवते? या बाबतीत तुम्हाला काही प्रगती करण्याची गरज आहे का? असल्यास, पुढील आठवड्यांत तुम्ही काय करणार ते ठरवा. सभांमध्ये सहभाग घेण्याची तुमची उत्सुकता यहोवा पाहील आणि तुम्हाला त्याचा आत्मा देईल. यामुळे नक्कीच तुम्हाला सभांतून अधिक फायदा मिळवणे शक्य होईल.

१०. आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरता आपण इतरांना कोणते निमंत्रण दिले पाहिजे?

१० आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरता आपण प्रकटीकरण २२:१७ यातील आमंत्रणाला प्रतिसाद देणेही समाविष्ट आहे. त्या वचनात असे म्हटले आहे: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” पवित्र आत्मा अभिषिक्‍त वधू वर्गाच्या माध्यमाने आज जीवनाच्या पाण्याविषयी हे निमंत्रण लोकांना देत आहे. जर तुम्ही हे निमंत्रण स्वीकारले असेल तर इतरांनाही ते देण्याचा तुम्ही दृढनिश्‍चय केला आहे का? खरोखर, लोकांना जीवनदान देण्याच्या या कार्यात सहभागी होणे ही आपल्याकरता किती सन्मानाची गोष्ट आहे!

११, १२. प्रचाराच्या कार्यात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

११ आज हे अतिशय महत्त्वाचे कार्य पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने केले जात आहे. पहिल्या शतकात कशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या साहाय्याने मिशनरी कार्याकरता नवनवीन क्षेत्रे खुली करण्यात आली याविषयी आपण वाचतो. प्रेषित पौलाला व त्याच्या सोबत्यांना ‘आशिया प्रांतात वचन सांगण्यास पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाला’; तसेच पवित्र आत्म्याने त्यांना बिथुनियालाही जाऊ दिले नाही. या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापासून पवित्र आत्म्याने त्यांना नेमके कसे रोखले हे आपल्याला माहीत नाही. तरीपण, पवित्र आत्म्यानेच पौलाला युरोपातील विस्तृत क्षेत्रात जाण्याकरता मार्गदर्शित केले हे स्पष्ट आहे. त्याला एक दृष्टान्त झाला, ज्यात मासेदोनियातील एक मनुष्य मदत मागत असल्याचे त्याला दिसले.—प्रे. कृत्ये १६:६-१०.

१२ पहिल्या शतकाप्रमाणेच आजही यहोवाचा पवित्र आत्मा जगभरातील प्रचार कार्याचे मार्गदर्शन करत आहे. हे मार्गदर्शन देण्यासाठी आज चमत्कारिक दृष्टान्त दिले जात नाहीत. तर, यहोवा अभिषिक्‍त जनांना पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन देतो. तसेच, देवाचा आत्मा ख्रिस्ती बंधुभगिनींना प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात होताहोईल तितका सहभाग घेण्यास प्रवृत्त करतो. तुम्हीही नक्कीच या महत्त्वाच्या कार्यात सहभाग घेत असाल. या रोमांचक कार्यातील आपला सहभाग तुम्हाला वाढवता येईल का?

१३. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा तुम्ही कशा प्रकारे स्वीकार करू शकता? उदाहरण द्या.

१३ देवाच्या लोकांकरता पुरवलेल्या माहितीचे पालन करण्याद्वारे तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करू शकता. जपानमध्ये राहणाऱ्‍या मीहोको नावाच्या एका ख्रिस्ती तरुणीचे उदाहरण पाहा. एक नवीन पायनियर या नात्याने तिला लोकांची पुनर्भेट घेणे थोडे कठीण वाटायचे; आपल्याला लोकांचे लक्ष काबीज करता येत नाही असे तिला वाटायचे. त्याच दरम्यान, आमची राज्य सेवा यात थोडक्यात पुनर्भेटी कशा कराव्यात याबद्दल काही उपयोगी सूचना प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर समाधानी जीवनकसे मिळवता येईल? हे माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. जपानच्या क्षेत्रात हे माहितीपत्रक खूपच उपयुक्‍त ठरले. मीहोकोने हे माहितीपत्रक वापरण्यासंबंधी, विशेषतः थोडक्यात पुनर्भेटी करण्याविषयी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले. काही काळातच, तिला आढळले की एरवी ज्यांनी बायबल अभ्यासाला नकार दिला असता अशा लोकांसोबत अभ्यास सुरू करण्यात तिला यश आले. ती सांगते, “मला कितीतरी अभ्यास सुरू करता आले. कधीकधी तर एकाच वेळी १२ अभ्यास माझ्याजवळ होते. काहींना मला अक्षरशः वेटिंग लिस्टवर ठेवावं लागलं!” खरोखर, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता व यहोवाच्या सेवकांना देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे पालन करता तेव्हा तुम्हाला भरपूर उत्तम परिणाम प्राप्त होतात.

देवाच्या आत्म्यावर विसंबून राहा

१४, १५. (क) अपरिपूर्ण मानव आपल्या समर्पणाचे वचन कशा प्रकारे पूर्ण करू शकतात? (ख) सर्वात उत्तम मित्र तुम्हाला कसे मिळू शकतील?

१४ देवाने नियुक्‍त केलेला सेवक या नात्याने तुमच्यावर एक सेवाकार्य सोपवण्यात आले आहे. (रोम. १०:१४) ही जबाबदारी पार पाडण्यास आपण योग्य आहोत असे कदाचित तुम्हाला वाटत नसेल. पण, अभिषिक्‍तांच्या बाबतीत जे खरे आहे तेच तुमच्या बाबतीतही आहे. तुम्हाला हे कार्य करण्यास समर्थ करणारा देव आहे. (२ करिंथकर ३:५ वाचा.) आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केल्यास व देवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिल्यास तुम्ही नक्कीच आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करू शकता.

१५ अर्थात, परिपूर्ण देव यहोवा याला केलेल्या समर्पणाचे वचन पूर्ण करणे आपल्याला नेहमीच सोपे जात नाही, कारण शेवटी आपण अपरिपूर्ण मानव आहोत. एक समस्या म्हणजे, पूर्वी तुम्ही ज्यांच्यासोबत उठतबसत होता, ते कदाचित तुमची नवीन जीवनशैली पाहून बुचकळ्यात पडत असतील. कदाचित ते ‘तुमची निंदाही करतील.’ (१ पेत्र ४:४) तरीसुद्धा, तुम्हाला आता नवीन मित्र मिळाले आहेत हे विसरू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवा व येशू ख्रिस्त यांच्यासोबत तुम्हाला चांगला नातेसंबंध जोडणे शक्य झाले आहे. (याकोब २:२१-२३ वाचा.) तसेच, तुमच्या मंडळीतील बंधुभगिनींची चांगल्या प्रकारे ओळख करून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण ही मंडळी सबंध जगातील ‘बंधुवर्गाचा’ भाग आहे. (१ पेत्र २:१७; नीति. १७:१७) यहोवा आपल्या आत्म्याद्वारे तुम्हाला असे मित्र बनवण्यास मदत करेल, जे सतत तुमच्यावर चांगला प्रभाव पाडत राहतील.

१६. पौलाप्रमाणेच तुम्हीही ‘दुर्बलतेत संतोष’ का मानू शकता?

१६ मंडळीत चांगल्या मित्रांचा सहवास मिळाल्यावरही तुम्हाला दैनंदिन जीवनाच्या आव्हानांना तोंड देणे जड जाऊ शकते. कधीकधी समस्यांना तोंड देताना तुम्हाला अगदी थकूनभागून गेल्यासारखे वाटू शकते. आपल्या समस्यांना जणू अंतच नाही असे तुम्हाला वाटू शकते. अशा वेळी तुम्ही खासकरून यहोवाकडे वळले पाहिजे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर ४:७-१०; १२:१० वाचा.) मानवांच्या दुर्बलतेमुळे येणाऱ्‍या उणिवा, मग त्या कोणत्याही स्वरूपाच्या असल्या तरी त्या भरून काढण्यास देवाचा आत्मा समर्थ आहे हे पौलाला माहीत होते. तेव्हा, आपण दुर्बल आहोत आणि आपल्याला साहाय्याची गरज आहे असे जेव्हाही तुम्हाला वाटते तेव्हा देवाची कार्यशील शक्‍ती तुम्हाला बळ देऊ शकते हे आठवणीत असू द्या. पौलाने लिहिले की ‘दुर्बलतेतही’ त्याला “संतोष” वाटतो. अशक्‍तपणातच आपल्यावर पवित्र आत्मा कार्य करत असल्याची त्याला प्रचिती आली. हा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता!—रोम. १५:१३.

१७. तुमच्या इष्टस्थळी जात असताना पवित्र आत्मा तुम्हाला कशा प्रकारे साहाय्य करू शकतो?

१७ देवाला केलेल्या समर्पणानुसार जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याच्या आत्म्याची नितान्त गरज आहे. तुम्ही शिडाच्या नौकेचे नाविक आहात अशी कल्पना करा. तुमचे ध्येय आहे यहोवाची सर्वकाळ सेवा करणे. पवित्र आत्मा हा त्या वाऱ्‍यासारखा आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही आपल्या इष्टस्थळी पोचण्यासाठी नौकेला योग्य दिशेने गती देऊ शकता. सैतानाच्या जगातील आत्म्यामुळे तुमच्या नौकेची दिशाभूल व्हावी किंवा तिने समुद्रात हेलकावे खावेत असे तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. (१ करिंथ. २:१२) तेव्हा तुम्ही अनुकूल वारा कोणता हे ओळखून आपल्या नौकेला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. हा अनुकूल वारा म्हणजे पवित्र आत्मा. देवाच्या वचनाद्वारे व त्याच्या आत्म्याच्या निर्देशनानुसार कार्य करणाऱ्‍या त्याच्या संघटनेद्वारे पवित्र आत्मा तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शित करेल.

१८. तुम्ही कोणता दृढ संकल्प केला आहे आणि का?

१८ जर तुम्ही काही काळापासून यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करत असाल, तुम्हाला त्यांच्या सभांना जाण्यास व त्यांच्यासोबत सहवास राखण्यास आवडत असेल, पण अद्याप तुम्ही समर्पण करणे व बाप्तिस्मा घेणे ही महत्त्वाची पावले उचलली नसतील, तर स्वतःला हा प्रश्‍न विचारा, ‘ही पावले उचलण्यास मी का मागेपुढे पाहावे?’ आजच्या काळात यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका तुम्ही ओळखली असल्यास व तो कशा प्रकारे कार्य करत आहे हे तुम्हाला समजले असल्यास, तुम्हाला मिळालेल्या ज्ञानानुसार योग्य ती पावले उचला. यहोवा तुम्हाला विपुलतेने आशीर्वाद देईल. तो तुम्हाला उदारतेने त्याचा पवित्र आत्मा देईल. जर तुमचा अनेक वर्षांपूर्वी अथवा अनेक दशकांपूर्वी बाप्तिस्मा झाला असेल, तर पवित्र आत्म्याचा प्रभाव तुम्ही आपल्या जीवनात नक्कीच अनुभवला असेल. देव कशा प्रकारे आपल्या आत्म्याच्या साहाय्याने तुम्हाला बळ देतो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे. हेच तो पुढेही, होय, सर्वकाळ करू शकतो. तेव्हा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत राहण्याचा दृढ संकल्प करा.

तुम्हाला आठवते का?

• ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा’ काय अर्थ होतो?

• ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास’ तुम्हाला कशामुळे मदत मिळू शकते?

• तुम्ही कशा प्रकारे देवाला केलेल्या समर्पणानुसार जीवन जगू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

अंतःकरणाच्या जमिनीची मशागत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात

[१६, १७ पानांवरील चित्रे]

तुम्ही आपल्या जीवनावर देवाच्या आत्म्याचा प्रभाव पडू देत आहात का?