व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’

मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’

मार्क ‘सेवेसाठी उपयोगी’

अंत्युखिया मंडळीत यापूर्वीही समस्या आल्या होत्या. पण पौल व बर्णबा यांच्यात झालेला मतभेद हा वेगळ्या स्वरूपाचा होता. हे दोन प्रेषित एका मिशनरी दौऱ्‍याची योजना आखीत असताना सोबत कोणाला न्यावे या प्रश्‍नावरून त्यांच्यात “कडाक्याचा वाद” झाला. (प्रे. कृत्ये १५:३९, पं.र.भा.) त्यानंतर ते दोघे विभक्‍त झाले आणि वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. ज्याच्यावरून त्यांच्यात हा मोठा वाद झाला होता तो तिसरा मिशनरी म्हणजे मार्क.

मार्क कोण होता? त्याच्यावरून दोन प्रेषितांमध्ये वाद होण्याचे कारण काय होते? त्या दोघांचीही इतकी ठाम मते का होती? पुढे जाऊन ही मते बदलली का? आणि मार्कच्या व्यक्‍तिमत्त्वातून कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत?

जेरूसलेमचा राहणारा

मार्क हा एका श्रीमंत यहुदी कुटुंबाचा होता असे दिसते. त्याचे बालपण जेरूसलेममध्ये गेले. त्याचा पहिल्यांदा उल्लेख येतो, तो सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासाच्या संदर्भात. सा.यु. ४४ च्या सुमारास हेरोद अग्रिप्पा पहिला याने प्रेषित पेत्राला तुरुंगात डांबले होते. यहोवाच्या दूताने चमत्कारिकपणे पेत्राची तुरुंगातून सुटका केल्यानंतर, तो “योहान, ज्याला मार्कहि म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते.”—प्रे. कृत्ये १२:१-१२. *

यावरून असे दिसते, की जेरूसलेम येथील मंडळीच्या सभा मार्कच्या आईच्या घरात होत असाव्यात. तेथे “बरेच लोक” एकत्र जमले होते, यावरून घर मोठे होते असे दिसते. पेत्राने “अंगणाच्या दरवाजाची दिंडी” ठोठावली तेव्हा मरीयेची दासी रुदा हिने दरवाजा उघडला. या माहितीवरून मरीया ही श्रीमंत होती असा अंदाज आपण बांधू शकतो. शिवाय, हे तिच्या पतीचे नव्हे तर तिचे घर होते असे म्हटले आहे. यावरून, ती कदाचित विधवा असावी आणि मार्क अद्याप वयाने लहान असावा असे दिसते.—प्रे. कृत्ये १२:१३, सुबोध भाषांतर.

प्रार्थनेकरता एकत्र जमलेल्यांमध्ये कदाचित मार्कही असावा. येशूच्या शिष्यांच्या, तसेच येशूच्या सेवाकार्यादरम्यान घडलेल्या घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या इतरांच्या सहवासात वावरण्याची त्याला संधी मिळाली. येशूला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून एक तरुण त्याच्या मागे चालला होता. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो ते तागाचे वस्र टाकून पळून गेला. हा तरुण खरेतर मार्कच असण्याची शक्यता आहे.—मार्क १४:५१, ५२.

मंडळीतील विशेषाधिकार

अनुभवी ख्रिश्‍चनांच्या सहवासाचा नक्कीच मार्कवर चांगला प्रभाव पडला. त्याने आध्यात्मिक रीत्या प्रगती केली आणि त्याची ही प्रगती जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांच्या नजरेतून सुटली नाही. सा.यु. ४६ च्या सुमारास, जेरूसलेममधील दुष्काळग्रस्त ख्रिश्‍चनांसाठी अंत्युखियातील बांधवांनी पुरवलेली ‘मदत’ पोचवण्यासाठी पौल व बर्णबा जेरूसलेमला गेले तेव्हा त्यांनी मार्कबद्दल वैयक्‍तिक आस्था दाखवली. ते अंत्युखियाला परतले तेव्हा त्यांनी मार्कलाही आपल्यासोबत आणले.—प्रे. कृत्ये ११:२७-३०; १२:२५.

वरवर वाचन करणाऱ्‍याला कदाचित वाटेल, की पौल, बर्णबा व मार्क यांच्यामध्ये केवळ आध्यात्मिक बांधवांत असतो तेवढाच संबंध होता आणि मार्कला केवळ त्याच्या उत्तम गुणांमुळेच निवडण्यात आले होते. पण, पौलाच्या एका पत्रातून आपल्याला कळते की मार्क हा बर्णबाचा नातलग होता. (कलस्सै. ४:१०) ही माहिती मार्कच्या संदर्भात घडलेल्या पुढील घटना समजण्यास आपली मदत करू शकते.

साधारण एका वर्षानंतर पवित्र आत्म्याने पौल व बर्णबा यांना मिशनरी दौऱ्‍यावर जाण्यास मार्गदर्शित केले. त्यानुसार, ते अंत्युखियाहून कुप्रास गेले. योहान मार्क हाही त्यांच्यासोबत या दौऱ्‍यावर “सहाय्यक” म्हणून गेला. (प्रे. कृत्ये १३:२-५) प्रेषितांना आध्यात्मिक गोष्टींत पूर्णपणे लक्ष घालता यावे म्हणून, प्रवासाशी संबंधित इतर लहानमोठी कामे कदाचित मार्कने सांभाळली असावीत.

पौल, बर्णबा व मार्क यांनी कुप्रात अनेक ठिकाणी जाऊन प्रचाराचे कार्य केले. मग, ते आशिया मायनरला गेले. या ठिकाणी आल्यावर योहान मार्कने घेतलेल्या एका निर्णयामुळे पौलाची त्याच्याविषयी घोर निराशा झाली. अहवालात असे सांगितले आहे, की ते पिर्गा येथे आले तेव्हा “योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला.” (प्रे. कृत्ये १३:१३) मार्कने असे का केले हे मात्र सांगितलेले नाही.

याच्या दोनएक वर्षांनंतर पौल, बर्णबा व मार्क पुन्हा अंत्युखियात होते. पौल व बर्णबा आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यात साध्य केलेल्या कार्याची प्रगती पाहण्याकरता आता दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याची योजना आखीत होते. बर्णबाला आपला नातलग मार्क याला सोबत घेण्याची इच्छा होती. पण, मागच्या वेळी मार्क त्यांना मध्येच सोडून गेल्यामुळे त्याला पुन्हा सोबत घेण्याची कल्पना पौलाला मुळीच पसंत पडली नाही. याच गोष्टीवरून, लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे पौल व बर्णबा यांच्यात कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर, बर्णबा मार्कला घेऊन आपल्या मूळ देशी अर्थात कुप्रास गेला, तर पौल सूरियाकडे निघून गेला. (प्रे. कृत्ये १५:३६-४१) पहिल्या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी मार्कने घेतलेल्या निर्णयाकडे पाहण्याचा पौल व बर्णबा यांचा दृष्टिकोन अगदीच वेगळा होता हे या घटनेवरून स्पष्ट झाले.

समेट

साहजिकच, मार्कला या घटनेमुळे खूप वाईट वाटले असावे. तरीसुद्धा, तो ख्रिस्ती सेवेत विश्‍वासूपणे टिकून राहिला. पौलापासून विभक्‍त झाल्याच्या घटनेनंतर सुमारे ११-१२ वर्षे उलटल्यावर, सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासात मार्कचा पुन्हा उल्लेख आढळतो. आणि तो देखील आपण अपेक्षा करणार नाही अशा व्यक्‍तीसोबत, अर्थात पौलासोबत!

सा.यु. ६०-६१ दरम्यान रोममध्ये बंदिवासात असताना पौलाने अनेक पत्रे लिहिली, जी आज पवित्र शास्त्रवचनांचा भाग बनली आहेत. यांपैकी कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने असे लिहिले: “माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाहि तुम्हाला सलाम सांगतो, (त्याच्या विषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा) . . . हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.”—कलस्सै. ४:१०, ११.

किती मोठा बदल! एके काळी जो पौलाच्या नजरेतून उतरला होता तोच मार्क आज पुन्हा एकदा त्याचा प्रिय सहकारी बनला होता. पौलाने कलस्सैकरांना, मार्क त्यांच्याकडे येण्याची शक्यता असल्याचे कळवले होते. मार्क खरोखरच त्यांच्याकडे गेल्यास, तो पौलाच्या प्रतिनिधीची भूमिका बजावणार होता.

अनेक वर्षांपूर्वी जे घडले होते, त्यात पौलाने मार्कविषयी आवश्‍यकतेपेक्षा जास्तच टीकात्मक भूमिका घेतली होती का? की मार्कला खरोखरच ताडनाची गरज होती? की काही प्रमाणात या दोन्ही गोष्टी खऱ्‍या होत्या? काहीही असो, पौल व मार्क यांचा पुन्हा समेट झाला यावरून ते दोघेही आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होते हे सिद्ध झाले. झाले गेले विसरून ते पुन्हा एकदा सोबत मिळून कार्य करू लागले. एखाद्या ख्रिस्ती बांधवासोबत मतभेद झालेल्यांसाठी हे किती अनुकरणीय उदाहरण आहे!

मार्कने केलेला प्रवास

मार्कने निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या भेटींविषयी वाचताना, त्याने बराच प्रवास केल्याचे दिसून येते. मूळचा तो जेरूसलेमचा होता, पण नंतर अंत्युखियाला राहायला गेला. तेथून तो समुद्रावाटे कुप्र व पिर्गा येथे गेला. मग तो रोमला गेला. तेथून पौल त्याला कलस्सैला पाठवण्याच्या विचारात होता असे आपण वाचतो. पण एवढ्यावरच त्याचा प्रवास संपत नाही!

प्रेषित पेत्राने आपले पहिले पत्र सा.यु. ६२-६४ च्या सुमारास लिहिले होते. त्याने या पत्रात लिहिले: ‘बाबेलातील मंडळी तुम्हाला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाहि सलाम सांगतो.’ (१ पेत्र ५:१३) त्याअर्थी, पेत्र जो अनेक वर्षांपूर्वी मार्कच्या आईच्या घरात ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायचा, तो बॅबिलोनला गेला तेव्हा मार्कही त्याच्यासोबत सेवा करण्यास बॅबिलोनला गेला होता.

सा.यु. ६५ च्या सुमारास जेव्हा पौल दुसऱ्‍यांदा रोममध्ये बंदिवान होता तेव्हा त्याने तीमथ्याला इफिसाहून बोलावून घेण्यासाठी पत्र लिहिले. पत्रात पौलाने असेही लिहिले: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये.” (२ तीम. ४:११) याचा अर्थ मार्क त्या वेळी इफिसात होता. आणि पौलाच्या आदेशानुसार तो तीमथ्यासोबत रोमला गेला असेल याची आपण खातरी बाळगू शकतो. त्या काळात प्रवास करणे सोपे नव्हते. तरीसुद्धा, ख्रिस्ती सेवेकरता मार्कने निरनिराळ्या ठिकाणी स्वखुषीने प्रवास केला.

आणखी एक मोठा विशेषाधिकार

मार्कला लाभलेला एक मोठा विशेषाधिकार म्हणजे यहोवाने त्याला चार शुभवर्तमानांपैकी एक लिहिण्याकरता प्रेरित केले. दुसऱ्‍या शुभवर्तमानात कोठेही लेखकाचे नाव आढळत नसले, तरी परंपरागत मतांनुसार मार्कनेच हे शुभवर्तमान लिहिले असून यात नमूद असलेली माहिती त्याला पेत्राकडून प्राप्त झाली होती. खरेतर, मार्कने जे काही लिहिले त्यापैकी जवळजवळ सर्व गोष्टींचा पेत्र एक प्रत्यक्ष साक्षीदार होता.

मार्कच्या शुभवर्तमानाच्या अभ्यासकांचे असे मानणे आहे की त्याने हे शुभवर्तमान यहुदीतर वाचकांना मनात ठेवून लिहिले होते. त्याने अनेक यहुदी प्रथांविषयी उपयुक्‍त स्पष्टीकरणे पुरवली. (मार्क ७:३; १४:१२; १५:४२) यहुदीतर वाचकांना समजणार नाहीत अशा अरामी भाषेतील शब्दांचे त्याने भाषांतर केले. (मार्क ३:१७; ५:४१; ७:११, ३४; १५:२२, ३४) त्याने अनेक लॅटिन शब्द वापरले आणि ग्रीक भाषेतील परिचित शब्द देखील स्पष्ट करण्यासाठी लॅटिन शब्दांचा वापर केला. यहुदी नाण्यांचे रोमी चलनातील मूल्य त्याने सांगितले. (मार्क १२:४२) या सर्वावरून मार्कने त्याचे शुभवर्तमान रोममध्ये लिहिले हे बऱ्‍याच काळापासून मानले गेलेले मत खरे असल्याचे दिसून येते.

“सेवेसाठी मला उपयोगी आहे”

रोममध्ये मार्कने फक्‍त शुभवर्तमान लिहिण्याचेच काम केले नाही. पौलाने तीमथ्याला काय सांगितले होते हे तुम्हाला आठवत असेल: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये.” कशासाठी? “कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे” असे पौलाने म्हटले.—२ तीम. ४:११.

कालक्रमानुसार पाहिल्यास हा शास्त्रवचनांत मार्कचा शेवटला उल्लेख आहे. पण यातून आपल्याला त्याच्याविषयी बरेच काही कळते. मार्कच्या सबंध ख्रिस्ती सेवेत त्याला कोठेही प्रेषित, नेतृत्व करणारा किंवा संदेष्टा म्हणण्यात आलेले नाही. तो एक सेवक होता. अर्थात इतरांची सेवाचाकरी करणारा किंवा इतरांना साहाय्य करणारा. आणि या घडीला, म्हणजे पौलाच्या मृत्यूला थोडाच काळ उरला असताना मार्कचे साहाय्य प्रेषित पौलाला नक्कीच उपयोगी ठरणार होते.

मार्कविषयीची तुटक माहिती जोडल्यावर आपल्यासमोर एका अशा मनुष्याचे चित्र उभे राहते, जो सुवार्तेच्या प्रचारासाठी आवेशी होता, जगभरातील क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करण्यास तयार होता आणि ज्याने इतरांची सेवा करण्यात आनंद मानला. खरोखर, ख्रिस्ती सेवेत टिकून राहिल्यामुळे मार्कला किती समाधानदायक विशेषाधिकार लाभले!

मार्कप्रमाणेच, देवाचे सेवक या नात्याने आपण देखील देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याविषयी निश्‍चयी वृत्ती दाखवतो. आपल्यापैकी काही जण सुवार्तेच्या प्रसारासाठी मार्कसारखे इतर ठिकाणी जातात, आणि काहीतर दुसऱ्‍या देशातही राहायला जातात. अशा प्रकारे स्थलांतर करणे सर्वांनाच शक्य नसले, तरी आपण सर्वच जण मार्कचे एका महत्त्वाच्या बाबतीत अनुकरण करू शकतो. ज्याप्रमाणे तो आपल्या ख्रिस्ती बांधवांची सेवा करण्याकरता खपला त्याचप्रमाणे आपणही आपल्या बांधवांना देवाच्या सेवेत टिकून राहता यावे म्हणून व्यावहारिक मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास आपल्याला यहोवाचे अनेक आशीर्वाद मिळत राहतील यात शंका नाही.—नीति. ३:२७; १०:२२; गलती. ६:२.

[तळटीप]

^ परि. 5 मार्क राहत होता त्या काळात लोकांमध्ये स्वतःच्या मूळ नावासोबत आणखी एक हिब्रू किंवा परकीय भाषेचे नाव जोडण्याची प्रथा होती. मार्कचे यहुदी नाव योहानान (मराठीत, योहान) होते. त्याचे लॅटिन भाषेतील टोपणनाव मार्कूस किंवा मार्क असे होते.—प्रे. कृत्ये १२:२५.

[८ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मार्कने भेट दिलेली काही शहरे

रोम

इफिस

कलस्सै

पिर्गा

अंत्युखिया (सूरियातील)

कुप्र

भूमध्य समुद्र

जेरूसलेम

बॅबिलोन