व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “सुखरूप” असावे हीच यहोवाची इच्छा

तुम्ही “सुखरूप” असावे हीच यहोवाची इच्छा

तुम्ही “सुखरूप” असावे हीच यहोवाची इच्छा

इतिहासातील सर्वात भयानक संकट मानवजातीवर येईल तेव्हा सर्वसमर्थ देव यहोवा याची संमती असलेले सर्व जण त्यातून सुखरूप बचावतील. देव स्वतः याची खातरी करेल. (योए. २:३२) पण, खरे पाहता मानवांनी सर्व संकटांपासून दूर राहावे, सुरक्षित राहावे असे यहोवाला नेहमीच वाटत आले आहे. ‘त्याच्याजवळ जीवनाचा झरा’ असल्यामुळे सर्व मानव त्याच्या दृष्टीत अतिशय अनमोल आहेत आणि त्यांचे संरक्षण केले जावे असे त्याला वाटते.—स्तो. ३६:९.

देवाच्या पुरातन काळातील सेवकांनी जीवनाबद्दल त्याच्या या दृष्टिकोनाचा आदर केला. उत्पत्ति ३३:१८ यात याकोब व त्याच्या कुटुंबाने कशा प्रकारे एक धोकेदायक प्रवास “सुखरूप” पार पाडला याविषयी आपण वाचतो. यहोवा आपले संरक्षण करेल याची अर्थातच याकोबाला खातरी होती. पण, त्याने आपल्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सर्वांचे संरक्षण करण्यासाठी काही व्यावहारिक पावले देखील उचलली होती. (उत्प. ३२:७, ८; ३३:१४, १५) तुम्हीसुद्धा बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याद्वारे स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकता. विशेषतः राज्य सभागृहांचे बांधकाम व अशा इतर प्रकल्पांवर काम करणारे तसेच संकटकालीन मदतकार्य पुरवणारे कशा प्रकारे याबाबतीत बायबलमधील तत्त्वांचा अवलंब करू शकतात याचा आपण विचार करू या.

मोशेच्या नियमशास्त्रात सुरक्षेला दिलेले महत्त्व

मोशेच्या नियमशास्त्रात देवाच्या लोकांचे संरक्षण करणे हे कायद्याने आवश्‍यक ठरवण्यात आले होते. उदाहरणार्थ, एखादा इस्राएली मनुष्य घर बांधत असल्यास, त्याने आपल्या घराच्या छताभोवती कठडा किंवा एक बसकी भिंत बांधणे आवश्‍यक होते. त्या काळी लोक बरेचदा घराच्या छतावर काही ना काही निमित्ताने जात असत. पण, अशा प्रकारचा कठडा बांधल्यामुळे छतावरून खाली पडण्यापासून त्यांचे संरक्षण होत असे. (१ शमु. ९:२६; मत्त. २४:१७) घर बांधणाऱ्‍या मनुष्याने या सुरक्षाविषयक नियमाचे पालन न केल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास, यहोवा त्या घरमालकाला यासाठी जबाबदार धरत असे.—अनु. २२:८.

एखाद्या मनुष्याच्या गुराढोरांनी कोणाला दुखापत केल्यास, नियमशास्त्रात यासंदर्भातही विशिष्ट कायदे होते. बैलाने शिंग मारल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, बैलाच्या मालकाने इतर लोकांच्या सुरक्षेसाठी त्या बैलाला जिवे मारावे असा नियम होता. त्याचे मांसही खाण्याची परवानगी नव्हती, शिवाय इतरांनाही खाद्य म्हणून त्याचे मांस विकण्याची मनाई होती. त्यामुळे बैलाला जिवे मारणे हे मालकासाठी खरेतर मोठे नुकसान होते. पण, बैलाने एखाद्या व्यक्‍तीला दुखापत केल्यावरही मालकाने त्याला आवरले नाही, तर काय? जर त्याच बैलाने नंतर एखाद्याला मारले आणि त्याचा मृत्यू झाला तर बैलाला आणि त्याच्या मालकालाही जिवे मारले जाईल असा कायदा होता. या कायद्यामुळे गुराढोरांच्या बाबतीत बेफिकीर वृत्तीला आळा बसत असे.—निर्ग. २१:२८, २९.

यासोबतच, नियमशास्त्राने लोकांना हत्यारांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे प्रोत्साहन दिले. बरेच इस्राएली इंधनासाठी लागणारे लाकूड कुऱ्‍हाडीने तोडायचे. एखाद्या वेळी अचानक कुऱ्‍हाड दांड्यातून निसटल्यामुळे जवळ उभ्या असलेल्या एखाद्या मनुष्याचा जीव गेल्यास लाकूड तोडणाऱ्‍या मनुष्याला शरणपुरात पळून जावे लागे. तेथे त्याला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहणे भाग होते. यामुळे, अनवधानाने एखाद्याची हत्या करणाऱ्‍या मनुष्याला कितीतरी वर्षे आपल्या कुटुंबीयांपासून व घरापासून दूर राहावे लागत होते. या व्यवस्थेमुळे यहोवाच्या नजरेत जीवन किती पवित्र आहे याची इस्राएल लोकांना जाणीव करून देण्यात आली. जीवनाबद्दल देवाच्या दृष्टिकोनाचा आदर करणारा मनुष्य आपली हत्यारे चांगल्या स्थितीत ठेवण्याची आणि कोणाला दुखापत होणार नाही अशा प्रकारे त्यांचा वापर करण्याची खबरदारी घेत असे.—गण. ३५:२५; अनु. १९:४-६.

अशा प्रकारचे कायदे स्थापित करण्याद्वारे यहोवाने हे स्पष्ट केले की आपल्या लोकांनी घरात आणि बाहेर कोणतीही कामे करताना सुरक्षिततेची जाणीव ठेवावी अशी आपली इच्छा आहे. कोणाच्या हातून दुसऱ्‍याचा जीव गेला किंवा त्याला दुखापत झाली, मग हे जाणूनबुजून नसले, तरीसुद्धा त्या मनुष्याला याविषयी यहोवाला हिशेब द्यावा लागायचा. सुरक्षिततेविषयी यहोवाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. (मला. ३:६) आजही त्याची इच्छा आहे की लोकांनी स्वतःला किंवा इतरांना दुखापत करू नये. विशेषतः आपण यहोवाच्या खऱ्‍या उपासनेकरता समर्पित असलेल्या इमारतींचे बांधकाम करतो किंवा त्यांच्या दुरुस्तीचे काम करतो तेव्हा ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

बांधकाम प्रकल्पांवर काम करताना सुरक्षा

राज्य सभागृहांचे, संमेलन गृहांचे व शाखा कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्तीचे काम करणे यास आपण मोठ्या सन्मानाची गोष्ट समजतो. संकटकालीन मदतकार्य पुरवण्याच्या बाबतीतही आपला हाच दृष्टिकोन आहे. यांपैकी कोणत्याही प्रकल्पावर, आपण अतिशय निपुणतेने आपले काम पार पाडले पाहिजे. कारण, अगदी साधीसोपी कामे असली तरी, ती योग्य प्रकारे न केल्यास आपल्यासाठी आणि इतरांसाठीही ते अपायकारक ठरू शकते. (उप. १०:९) नेहमी सुरक्षेची जाणीव ठेवून काम करण्याची स्वतःला सवय लावून घेतल्याने आपण अनेक अपघात टाळू शकतो.

बायबल म्हणते: “बल हे तरुणांस भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.” (नीति. २०:२९) जड कामे करण्यासाठी तरुणांचे बल कामी येते. पण, बांधकामाच्या व संबंधित क्षेत्रांत दांडगा अनुभव असलेले पिकल्या केसांचे कारागीर, कौशल्याची व कलाकुसरीची कामे आपल्या हातांच्या व अवजारांच्या साहाय्याने अतिशय निपुणतेने करतात. शिवाय, या वयस्क कारागिरांनीही आपल्या तारुण्यात अनेक जड कामे पार पाडली आहेत. जर तुम्ही एक नवीन स्वयंसेवक असाल तर अनुभवी कामगार कशा प्रकारे काम करतात याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा. तुम्हाला शिकण्याची उत्सुकता असल्यास बांधकामाच्या क्षेत्रात निपुण असलेले बांधव तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकवतील. यांपैकी एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे धोकेदायक साहित्य कसे हाताळावे आणि जड ओझी कशा प्रकारे उचलावीत. या महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेतल्यास तुम्हाला परिणामकारक व सुरक्षित रीत्या आणि आनंदाने काम करता येईल.

बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्‍यांनी नेहमी चौकस असले पाहिजे. कारण, तेथे सतत बदल होत असतात. जेथे पूर्वी पक्की जमीन होती तेथे काही वेळानंतर खड्डा खोदलेला असू शकतो. किंवा, एका ठिकाणी ठेवलेली शिडी, फळी किंवा रंगाचा डबा कोणीतरी अचानक दुसरीकडे नेऊन ठेवू शकतो. तुमचे लक्ष नसल्यास तुम्हाला सहज दुखापत होऊ शकते. सुरक्षेच्या नियमांनुसार, बांधकामाच्या साइटवर काम करणाऱ्‍यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी विशिष्ट प्रकारचा पोशाख घालणे आवश्‍यक आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी घालण्याचा चष्मा, कठीण पृष्ठभागाची टोपी, आणि काम करताना घालण्याचे खास प्रकारचे बूट वापरल्यामुळे बांधकामाच्या साइटवर तुमचे अनेक धोक्यांपासून संरक्षण होऊ शकते. अर्थातच, हे सर्व साहित्य चांगल्या स्थितीत असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तरच तुमचे संरक्षण होऊ शकते.

अनेक हत्यारे वापरायला अगदी सोपी आहेत असे वाटत असले, तरी त्यांचा सुरक्षित रीत्या व निपुणतेने वापर करण्यासाठी प्रशिक्षण व सराव अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला लागणारे एखादे हत्यार तुम्ही पूर्वी वापरलेले नसेल, तर कामाची देखरेख करणाऱ्‍या बांधवाला याविषयी सांगा. ते तुम्हाला आवश्‍यक प्रशिक्षण दिले जाण्याची व्यवस्था करतील. विनम्र मनोवृत्ती, म्हणजेच स्वतःच्या मर्यादा कबूल करण्याची वृत्ती बाळगणे केव्हाही चांगले. खरेतर, बांधकामाच्या साइटवर स्वतःला व इतरांनाही आपल्यामुळे काही दुखापत होऊ नये असे वाटत असल्यास अशी विनम्र मनोवृत्ती बाळगणे अत्यावश्‍यक आहे.—नीति. ११:२.

बांधकामाच्या ठिकाणी बहुतेक अपघात उंचावरून खाली पडल्यामुळे होतात. तेव्हा, शिड्यांवर किंवा परांचीवर (स्कॅफोल्डिंगवर) चढण्याअगोदर सर्व साहित्य सुरक्षित रीत्या बांधलेले किंवा बसवलेले आहे आणि ते साहित्य चांगल्या स्थितीत आहे याची खातरी करावी. परांचीवर उभे राहून किंवा छतावर काम करत असताना खाली पडू नये म्हणून व्यक्‍तीच्या शरीराला बांधण्याचे खास पट्टे असलेली साधनसामग्री (सेफ्टी हार्नेस) कदाचित तुम्हाला वापरावी लागू शकते किंवा सुरक्षेसाठी खास कठडा उभारण्याची गरज असू शकते. उंच ठिकाणी काम करण्याच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्‍न असल्यास कामाची देखरेख करणाऱ्‍या बांधवाला तुम्ही ते विचारू शकता. *

जगभरात यहोवाच्या सेवकांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतशी खऱ्‍या उपासनेच्या वाढीकरता राज्य सभागृहे व इतर इमारती बांधण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सभागृहांच्या बांधकामाच्या ठिकाणी किंवा अशा प्रकारच्या इतर प्रकल्पांची देखरेख करणाऱ्‍या बांधवांवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्‍या यहोवाच्या अनमोल मेंढरांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. (यश. ३२:१, २) जर तुम्हाला एखाद्या बांधकामाच्या प्रकल्पात आपल्या बंधुभगिनींचे मार्गदर्शन करण्याचा विशेषाधिकार लाभला असेल, तर सुरक्षेचे महत्त्व कधीही नजरेआड होऊ देऊ नका. बांधकामाची साइट नेहमी स्वच्छ व सुव्यवस्थित राहील याची काळजी घ्या. ज्यांना काही गोष्टींची आठवण करून दिली जाण्याची गरज आहे त्यांना प्रेमळपणे, पण स्पष्टपणे आवश्‍यक सूचना द्या. कमी वयाच्या किंवा अनुभव नसलेल्या कामगारांना जास्त धोक्याच्या क्षेत्रांत प्रवेश करू देऊ नका. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्‍या कामगारांना कोणत्या धोक्यांना तोंड द्यावे लागू शकते याचा आधीच विचार करा आणि त्यांना सुरक्षित रीत्या काम करण्यासाठी सुसज्ज होण्यास मदत करा. कोणत्याही दुखापतींशिवाय प्रकल्प पार पाडणे हे आपले उद्दिष्ट आहे हे कधीही विसरू नका.

प्रेमाची भूमिका

राज्य सभागृहे व खऱ्‍या उपासनेकरता वापरल्या जाणाऱ्‍या इतर इमारतींचे बांधकाम करताना दुर्घटना होण्याचा धोका असतो. म्हणूनच, अशा प्रकल्पांत सहभाग घेणाऱ्‍या सर्वांनी अतिशय सावधगिरीने काम केले पाहिजे. बायबल तत्त्वांचा आदर केल्याने, कामासाठी दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने आणि उत्तम निर्णयशक्‍ती दाखवल्याने तुम्ही स्वतः दुर्घटना टाळू शकता आणि इतरांना तुमच्यामुळे इजा होणार नाही याचीही खातरी करू शकता.

सुरक्षेबद्दल जागरूक राहण्यामागचा आपला मूळ हेतू काय आहे? तर, प्रेम. होय, यहोवावर आपले प्रेम असल्यामुळे, ज्या प्रकारे तो जीवनाबद्दल आदर दाखवतो त्या प्रकारे आपणही दाखवू इच्छितो. तसेच, इतरांबद्दल प्रेम असल्यामुळे आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे अपाय होणार नाही याची आपण खबरदारी घेतो. (मत्त. २२:३७-३९) तेव्हा, आपल्या बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्‍यांनी “सुखरूप” राहावे म्हणून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू या.

[तळटीप]

^ परि. 14 “शिड्यांवर चढून काम करताना घ्यावयाची काळजी” ही पृष्ठ ३० वरील चौकट पाहावी.

[३० पानांवरील चौकट/चित्र]

शिड्यांवर चढून काम करताना घ्यावयाची काळजी

अमेरिकेत अलीकडेच एका वर्षभरात १,६०,००० कामगारांना शिडीवरून खाली पडल्यामुळे दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. शिवाय, अशा दुर्घटनांमध्ये जवळजवळ १५० जण ठार झाले. तुम्ही जगातल्या कोणत्याही भागात राहत व काम करत असला, तरीसुद्धा शिडीवरून खाली पडण्याची दुर्घटना तुम्हाला टाळता यावी म्हणून काही मार्गदर्शक सूचना येथे देत आहोत.

◇ स्थिर नसलेली, हलणारी किंवा तुटलेली शिडी वापरू नये आणि अशी शिडी दुरुस्त करण्याचाही प्रयत्न करू नये. ती मोडीत काढावी.

◇ सर्व शिड्यांची विशिष्ट प्रमाणात भार वाहण्याची क्षमता असते. तुमचे वजन आणि तुम्ही जे अवजार किंवा साहित्य घेऊन शिडीवर चढाल त्याचे वजन मिळून शिडीच्या क्षमतेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.

◇ शिडी सपाट व मजबूत पृष्ठभागावर ठेवावी. अस्थिर पृष्ठभागावर, उदाहरणार्थ तात्पुरत्या उभारलेल्या कठड्यावर अथवा पालथ्या केलेल्या बादल्यांवर किंवा खोक्यांवर शिडी ठेवून कधीही तिच्यावर चढू नये.

◇ शिडीवर चढताना किंवा उतरताना तुमचे तोंड नेहमी शिडीकडे असले पाहिजे.

◇ कोणत्याही शिडीच्या सर्वात वरच्या दोन पायऱ्‍यांवर कधीही उभे राहू अथवा बसू नये.

◇ एखाद्या छतावर किंवा पृष्ठभागावर चढण्याउतरण्यासाठी शिडी वापरताना, ज्या छताला किंवा पृष्ठभागाला शिडी टेकवली आहे त्यापेक्षा ती तीन फूट वरपर्यंत असली पाहिजे. शिडीचे पाय घसरू नयेत म्हणून ते कशालातरी बांधावेत किंवा शिडीसमोर एक फळी घट्ट बसवावी. हे शक्य नसल्यास, तुम्ही शिडीवर चढून काम करत असताना कोणालातरी ती धरून ठेवण्यास सांगावे. शिडीचे वरचे टोक एका बाजूला घसरू नये म्हणून ते पक्के बांधून ठेवावे.

◇ बसून किंवा उभे राहून काम करण्यासाठी फळ्यांचा वापर करताना या फळ्यांना शिड्यांच्या पायऱ्‍यांचा आधार देऊ नये.

◇ उंचावर चढून काम करताना तुम्ही हात किंवा पाय लांबवल्यास शिडी डगमगू शकते. तेव्हा अशा प्रकारे हात किंवा पाय लांब करून कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचे असेल त्याच्या अगदी जवळ शिडी असली पाहिजे. यासाठी जितक्यांदा शिडी हलवावी लागेल तितक्यांदा ती हलवावी.

◇ बंद दारासमोर शिडी ठेवून काम करायचे असल्यास, दारावर धोक्याची सूचना देणारा फलक लावावा आणि दाराला कुलूप लावावे. कुलूप लावणे शक्य नसल्यास, दारातून जाऊ इच्छिणाऱ्‍यांना सावध करण्यासाठी दाराजवळ कोणालातरी उभे करावे.

◇ दोघा जणांनी उभे राहून काम करण्यासाठी खास तयार केलेली शिडी नसल्यास शिडीवर केवळ एकाच व्यक्‍तीला चढू द्यावे. *

[तळटीप]

^ परि. 33 शिड्या वापरण्यासंबंधी आणखी काही सूचनांची यादी सावध राहा!, सप्टेंबर ८, १९९९, पृष्ठे २६-२८ वर दिलेली आहे.

[२९ पानांवरील चित्र]

मोशेच्या नियमशास्त्रानुसार छताभोवती कठडा बांधणे आवश्‍यक होते