व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा!

“निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.”—स्तो. ११९:३७.

१. आपली दृष्टी किती महत्त्वपूर्ण आहे?

 आपली दृष्टी खरोखर किती अनमोल आहे! तिच्यामुळे सभोवतालच्या परिसरातील अगदी बारीकसारीक गोष्टी त्यांच्या विविध रंगछटांसह क्षणार्धात आपल्या डोळ्यांत भरतात. आपल्या दृष्टीमुळे आपण आपल्या प्रिय मित्रांना पाहू शकतो. तसेच, अचानक येणाऱ्‍या धोक्यांची चाहूल देखील दृष्टीमुळेच आपल्याला लागते. दृष्टीमुळे आपण सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो, सृष्टीतील अद्‌भुत कृत्यांची कदर करू शकतो व देवाच्या अस्तित्वाचा व त्याच्या वैभवाचा पुरावाही दृष्टीमुळेच आपल्याला मिळतो. (स्तो. ८:३, ४; १९:१, २; १०४:२४; रोम. १:२०) शिवाय, दृष्टी ही मनाशी संवाद साधणारे अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम असल्यामुळे यहोवाबद्दलचे ज्ञान संपादन करण्यात व त्यावरील आपला विश्‍वास मजबूत करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते.—यहो. १:८; स्तो. १:२, ३.

२. आपण जे काही पाहतो त्याबद्दल आपण काळजी का घेतली पाहिजे आणि स्तोत्रकर्त्याने देवाला केलेल्या विनवणीवरून आपल्याला काय शिकायला मिळते?

पण, आपण जे काही पाहतो त्यामुळे आपले नुकसानही होऊ शकते. आपल्या दृष्टीचा मनाशी इतका जवळचा संबंध आहे, की आपण डोळ्यांनी जे काही पाहतो त्यामुळे मनात इच्छा-आकांक्षा निर्माण होऊ शकतात किंवा त्या आणखी प्रबळ होऊ शकतात. शिवाय, आपण दियाबल सैतानाच्या शासनाधीन असलेल्या एका नीतिभ्रष्ट व सुखविलासी जगात राहत असल्यामुळे सहज बहकवू शकतील अशा दृश्‍यांचा किंवा माहितीचा आपल्यावर सतत भडिमार होत असतो. अशा दृश्‍यांवर व माहितीवर केवळ ओझरती नजर टाकली तरी त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. (१ योहा. ५:१९) म्हणून स्तोत्रकर्त्याने देवाला केलेल्या विनवणीचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. त्याने म्हटले: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.”—स्तो. ११९:३७.

डोळे कशा प्रकारे आपली दिशाभूल करू शकतात?

३-५. डोळ्यांची वासना आपल्यासाठी धोकेदायक ठरू शकते हे बायबलच्या कोणत्या अहवालांवरून स्पष्ट होते?

पहिली स्त्री हव्वा हिच्याबाबतीत काय घडले ते लक्षात घ्या. सैतानाने तिला असे सुचवले, की तिने “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” खाल्ले तर तिचे “डोळे उघडतील.” आपले डोळे “उघडतील” या विचाराने हव्वेच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे” तिला “दिसून आले” तेव्हा ते खाण्याची तिची इच्छा अधिकच प्रबळ झाली. लालसेने त्या झाडाकडे पाहत राहिल्यामुळे हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. तिचा पती, आदाम यानेही देवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळे सबंध मानवजातीवर विनाशकारी परिणाम ओढवले.—उत्प. २:१७; ३:२-६; रोम. ५:१२; याको. १:१४, १५.

नोहाच्या दिवसांत काही देवदूतांनी जे काही पाहिले त्याचा त्यांच्यावर देखील प्रभाव पडला. त्यांच्याविषयी उत्पत्ति ६:२ म्हणते: “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” मानवकन्यांकडे कामुक नजरेने पाहत राहिल्यामुळे या बंडखोर देवदूतांच्या मनात मानवांसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याची वासना उत्पन्‍न झाली. आणि त्यांच्या या संबंधांमुळे त्यांना झालेली मुले अतिशय हिंसक होती. त्या काळी पृथ्वीवर मानवांची दुष्टाई वाढल्यामुळे सबंध मानवजातीचा नाश करण्यात आला. या नाशातून केवळ नोहा व त्याचे कुटुंब बचावले.—उत्प. ६:४-७, ११, १२.

याच्या अनेक शतकांनंतर इस्राएल लोकांनी यरीहो शहरावर कब्जा केला तेव्हा त्या शहरातील काही वस्तू चोरण्यास आखान नावाच्या एका इस्राएली पुरुषाला त्याच्या डोळ्यांनी भुरळ घातली. इस्राएल लोकांनी त्या शहरातील काही विशिष्ट वस्तू यहोवाच्या भांडारात जमा कराव्यात व बाकीच्या सर्व नष्ट कराव्यात अशी आज्ञा देवाने त्यांना दिली होती. देवाने त्यांना अशी ताकीद दिली: “तुम्ही मात्र नाश करण्यास समर्पित केलेल्या वस्तूंपासून दूरच राहा. नाहीतर तुम्हाला मोह होऊन,” त्या शहरातील काही वस्तू तुम्ही घ्याल. आखानाने या आज्ञेचे उल्लंघन केले तेव्हा आय येथे इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांच्यापैकी अनेक जण मृत्यूमुखी पडले. आखानाचे कृत्य उघड केल्यानंतरच त्याने आपली चोरी कबूल केली. त्या वस्तू “मला दिसल्या तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या” असे त्याने म्हटले. डोळ्यांच्या वासनेमुळे आखानाला आपला जीव गमवावा लागला आणि त्यासोबतच “त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व” नष्ट झाले. (यहो. ६:१८, १९, NW; ७:१-२६) आखानाने, जे मना करण्यात आले होते त्याची लालसा मनात बाळगली.

स्वतःला शिस्त लावण्याची गरज

६, ७. आपल्याला मोहात पाडण्यासाठी सैतानाच्या डावपेचांपैकी सगळ्यात जास्त कशाचा उपयोग केला जातो, आणि आधुनिक जाहिरातदार याचा कसा उपयोग करतात?

हव्वा, अवज्ञाकारी देवदूत आणि आखान यांना मोहात पाडण्यासाठी ज्या मार्गाचा उपयोग करण्यात आला होता तोच मार्ग आज मानवजातीला मोहात पाडण्यासाठी उपयोगात आणला जात आहे. मानवांची दिशाभूल करण्यासाठी सैतान उपयोग करत असलेल्या सर्व ‘विचारांपैकी’ किंवा डावपेचांपैकी “डोळ्यांची वासना” ही सगळ्यात प्रभावशाली आहे. (२ करिंथ. २:११; १ योहा. २:१६) लोक आपल्या डोळ्यांनी जे काही पाहतात त्याचा त्यांच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडतो याची आधुनिक काळातील जाहिरातदारांना पूर्ण कल्पना आहे. एका यशस्वी युरोपियन विक्री तज्ज्ञाने म्हटले: “दृष्टी ही लोकांना मोहात पाडणारे सगळ्यात शक्‍तीशाली इंद्रिय आहे. इतर सर्व इंद्रियांवर प्रभाव पाडून जे योग्य आहे त्याच्या विरोधात पाऊल उचलण्यास लोकांना प्रवृत्त करण्याची त्यात ताकद आहे.”

म्हणूनच आपल्या वस्तू किंवा सेवांची जाहिरात करणारे आज अगदी चलाखीने तयार करण्यात आलेल्या दृश्‍यांचा आपल्यावर सतत मारा करतात याचे आपल्याला नवल वाटू नये. ही दृश्‍ये पाहून आपल्या मनावर इतका प्रभाव पडतो की त्या वस्तू किंवा सेवा प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आपल्या मनात निर्माण होते. जाहिरातींचा लोकांवर किती प्रभाव पडतो याचा अभ्यास करणाऱ्‍या अमेरिकेतील एका संशोधकाने म्हटले: “लोकांना केवळ माहिती देण्यासाठीच नव्हे, तर सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या मनात विशिष्ट भावना निर्माण करण्याच्या व त्यांना कृती करायला भाग पाडण्याच्या हेतूने” जाहिराती तयार केल्या जातात. यांपैकी सर्रास वापरला जाणारा एक प्रकार म्हणजे कामवासना उत्पन्‍न करणारी दृश्‍ये. तेव्हा, आपण डोळ्यांनी जे काही पाहतो व आपले अंतःकरण ज्या गोष्टींनी भरतो त्यावर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे!

८. आपल्या दृष्टीवर नियंत्रण ठेवण्याच्या गरजेवर बायबल कशा प्रकारे भर देते?

डोळ्यांची वासना व देहाची वासना यांचा खऱ्‍या ख्रिश्‍चनांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे आपण जे काही पाहतो व ज्याची मनोकामना करतो त्यांसंबंधी स्वतःला शिस्त लावण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते. (१ करिंथ. ९:२५, २७; १ योहान २:१५-१७ वाचा.) आपली दृष्टी व मनोकामना यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे याची नीतिमान पुरुष ईयोब याला जाणीव होती. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयो. ३१:१) एखाद्या स्त्रीला वाईट हेतूने स्पर्श करणे तर दूरच, पण तसा विचारसुद्धा तो आपल्या मनात घोळू देणार नव्हता. अनैतिक विचारांपासून आपण आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे यावर भर देताना येशूने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो [“पाहत राहतो,” NW] त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्त. ५:२८.

टाळण्याजोग्या निरर्थक गोष्टी

९. (क) इंटरनेटचा वापर करताना आपण विशेष सावधगिरी का बाळगली पाहिजे? (ख) पोर्नोग्राफीची एक झलकही कोणत्या दुष्परिणामांस कारणीभूत ठरू शकते?

हल्लीच्या जगात पोर्नोग्राफी (अश्‍लील चित्रे किंवा व्हिडिओ) ‘पाहत राहणे,’ खासकरून इंटरनेटवर, एक सर्वसामान्य गोष्ट बनत चालली आहे. आजकाल अशा अश्‍लील साइट्‌स आपल्याला शोधून काढाव्या लागत नाहीत. त्या अगदी सहजासहजी उपलब्ध होतात. ते कसे? मनाला भुरळ घालणारे चित्र असलेली एखादी जाहिरात एकाएकी कॉम्प्युटर स्क्रीनवर झळकू शकते. किंवा वरवर साधीशीच वाटणारी एखादी ई-मेल उघडल्यानंतर अचानक एखादे अश्‍लील चित्र स्क्रीनवर येऊ शकते. ते चित्र अशा रीतीने तयार केलेले असते की ते बंद करणे मुश्‍किल होऊ शकते. अशा चित्रावर एका व्यक्‍तीची ओझरती नजर जरी गेली तरी ती ई-मेल डिलिट करण्याआधीच त्या चित्राने तिच्या मनावर छाप पाडलेली असते. पोर्नोग्राफीची एक झलकही अनेक दुःखद परिणामांस कारणीभूत ठरू शकते. पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीचे मन तिला सतत दोष देऊ शकते आणि मनातून अश्‍लील दृश्‍ये पुसून टाकण्यासाठी तिला संघर्ष करावा लागू शकतो. याहीपेक्षा वाईट म्हणजे जी व्यक्‍ती जाणूनबुजून पोर्नोग्राफी ‘पाहत राहते’ तिने आपल्या मनातील अनैतिक इच्छांना अद्याप जिवे मारले नाही हेच दिसून येते.—इफिसकर ५:३, ४, १२ वाचा; कलस्सै. ३:५, ६.

१०. खासकरून मुले पोर्नोग्राफीच्या जाळ्यात सहज का खेचली जातात, आणि पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे त्यांच्यावर कोणते परिणाम होऊ शकतात?

१० मुले स्वभावाने फार जिज्ञासू असतात आणि त्यांच्या या जिज्ञासेमुळे ती सहज पोर्नोग्राफीच्या जाळ्यात खेचली जाऊ शकतात. असे झाल्यास, लैंगिकतेबद्दल त्यांच्या दृष्टिकोनावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. हे परिणाम किती व्यापक असतात याबद्दल एक अहवाल असे म्हणतो, की पोर्नोग्राफीमुळे लैंगिकतेसंबंधी मुलांच्या मनात विकृत दृष्टिकोन निर्माण होण्यापासून “निकोप, प्रेमळ नातेसंबंध जोपासणे अवघड जाणे; स्त्रियांविषयी अनुचित दृष्टिकोन उत्पन्‍न होणे; आणि पोर्नोग्राफीचे व्यसन लागण्यापर्यंत अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. पोर्नोग्राफीचे हे व्यसन मुलांच्या अभ्यासाच्या, मैत्रीच्या आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या आड येऊ शकते.” इतकेच नव्हे, तर यामुळे पुढे त्यांचे वैवाहिक जीवनही उद्‌ध्वस्त होऊ शकते.

११. पोर्नोग्राफी पाहणे किती धोकेदायक आहे याचे एक उदाहरण सांगा.

११ एक ख्रिस्ती बांधव सांगतो: “साक्षीदार बनण्यापूर्वी मला असलेल्या व्यसनांपैकी जे व्यसन सोडून देणं मला सगळ्यात कठीण गेलं ते म्हणजे पोर्नोग्राफी. आजही अधूनमधून विशिष्ट वासामुळे, विशिष्ट संगीत कानावर पडल्यामुळे, काहीतरी पाहिल्यामुळे किंवा अचानक मनात आलेल्या एखाद्या विचारामुळे ती दृश्‍ये माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. अशा भावनांशी मला दररोज झुंजावं लागतं.” आणखी एक बांधव आपल्या लहानपणाचा अनुभव आठवून सांगतो. आईवडील घरी नसताना, त्याने सत्यात नसलेल्या आपल्या वडिलांची अश्‍लील मासिके चाळली होती. त्याबद्दल तो लिहितो: “त्या चित्रांचा माझ्या बाल मनावर किती भयंकर परिणाम झाला! या गोष्टीला आज २५ वर्षे उलटून गेली असली तरी आजही त्यातली काही चित्रं काही केल्या माझ्या मनातून जात नाहीत. ती विसरण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी ती पुनःपुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येतात. त्यांच्याबद्दल विचार करायचं जरी मी टाळत असलो तरी मला दोषी वाटतं.” अशा दोषी भावनांचे ओझे टाळायचे असेल तर निरर्थक गोष्टी न पाहणेच सुज्ञतेचे ठरेल! पण, असे करणे एका व्यक्‍तीला कशामुळे शक्य होऊ शकते? त्यासाठी त्या व्यक्‍तीने ‘प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावण्याचा’ सतत प्रयत्न केला पाहिजे.—२ करिंथ. १०:५.

१२, १३. ख्रिश्‍चनांनी कोणत्या निरर्थक गोष्टी पाहण्याचे टाळले पाहिजे आणि का?

१२ आपण टाळली पाहिजे अशी आणखी एक “अनुचित” किंवा निरर्थक गोष्ट म्हणजे भौतिकवादाला किंवा भूतविद्येला उत्तेजन देणारे, तसेच हिंसाचार, रक्‍तपात किंवा खूनखराबा दाखवणारे मनोरंजन. (स्तोत्र १०१:३ वाचा.) घरात आपल्या मुलांनी काय पाहावे किंवा काय पाहू नये याबद्दल ख्रिस्ती पालक जे ठरवतात त्याविषयी त्यांना यहोवाला जाब द्यावा लागेल. अर्थात, कोणतीही खरी ख्रिस्ती व्यक्‍ती स्वतःला जाणूनबुजून भूतविद्येच्या जाळ्यात अडकवून घेणार नाही. तरीसुद्धा ज्या चित्रपटांमध्ये, टिव्ही मालिकांमध्ये, व्हीडिओ गेम्समध्ये, इतकेच नव्हे तर व्यंगचित्रे व मुलांची पुस्तके यांमध्ये ज्या गूढ, रहस्यमय गोष्टी दाखवल्या जातात त्यांबद्दल पालकांनी सावध असले पाहिजे.—नीति. २२:५.

१३ आपण तरुण असो अथवा वृद्ध, ज्यात हिंसक व रक्‍तपाताची भयानक दृश्‍ये अगदी रंगवून दाखवली जातात असे व्हीडिओ गेम्स पाहण्यात आपल्याला मुळीच रस वाटू नये. (स्तोत्र ११:५ वाचा.) यहोवा ज्या गोष्टींचा अव्हेर करतो अशा कोणत्याही गोष्टींवर आपण आपले मन केंद्रित करू नये. हे कधीही विसरू नका, की सैतान आपल्या विचारांवर प्रहार करत आहे. (२ करिंथ. ११:३) अगदी उचित समजले जाणारे मनोरंजन पाहण्यातही जास्त वेळ घालवल्यास कौटुंबिक उपासना, दैनिक बायबल वाचन आणि सभांची तयारी करण्यासाठी आपल्याजवळ वेळच उरणार नाही.—फिलिप्पै. १:९, १०.

येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करा

१४, १५. सैतानाने ख्रिस्तावर आणलेल्या तिसऱ्‍या परीक्षेबद्दल लक्षात घेण्याजोगी गोष्ट काय होती आणि तिचा प्रतिकार करणे येशूला कशामुळे शक्य झाले?

१४ दुःखाची गोष्ट म्हणजे सध्याच्या या दुष्ट जगात राहत असल्यामुळे काही निरर्थक गोष्टी पाहण्याचे आपण टाळू शकत नाही. येशूवरही अशा गोष्टींचा मारा करण्यात आला होता. देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून येशूला परावृत्त करण्यासाठी सैतानाने आपल्या तिसऱ्‍या प्रयत्नात येशूला “एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले.” (मत्त. ४:८) सैतानाने असे का केले? त्याला डोळ्यांच्या तीव्र अभिलाषेचा गैरफायदा घ्यायचा होता हे नक्की. जगातल्या सर्व राज्यांवर व त्यांच्या वैभवावर येशूने केवळ एक नजर टाकली असती, तरी जगात मानप्रतिष्ठा मिळवण्याच्या मोहाला तो बळी पडू शकला असता. पण, येशूची प्रतिक्रिया काय होती?

१५ मनाला भुरळ घालणाऱ्‍या सैतानाच्या या प्रस्तावावर येशूने लक्ष केंद्रित केले नाही. त्याने आपल्या मनात चुकीच्या इच्छा-अभिलाषा घोळू दिल्या नाहीत. आणि दियाबलाचा प्रस्ताव नाकारण्याआधी त्याला त्यावर विचार करण्याची गरज वाटली नाही. येशूने लगेच प्रतिक्रिया व्यक्‍त केली. त्याने सैतानाला असा हुकूम केला: “अरे सैताना, चालता हो.” (मत्त. ४:१०) येशूने यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर आपले लक्ष केंद्रित केले व देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या जीवनातील आपल्या उद्देशानुसार सैतानाला प्रत्युत्तर दिले. (इब्री १०:७) परिणामस्वरूप, सैतानाने रचलेला धूर्त कट येशूने यशस्वीपणे हाणून पाडला.

१६. सैतानाच्या प्रलोभनांचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणावरून कोणते धडे शिकू शकतो?

१६ येशूच्या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापैकी कोणीही सैतानाच्या डावपेचांपासून सुटलेला नाही. (मत्त. २४:२४) दुसरी गोष्ट, आपण डोळ्यांनी जे काही पाहतो त्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा-आकांक्षा अधिक प्रबळ होऊ शकतात. आणि यामुळे आपले एक तर भले होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकते. तिसरी गोष्ट, सैतान ‘डोळ्यांच्या वासनेचा’ शक्य तितका उपयोग करून आपल्याला बहकवण्याचा प्रयत्न करेल. (१ पेत्र ५:८) आणि चौथी गोष्ट म्हणजे आपणही सैतानाचा प्रतिकार करू शकतो. पण त्यासाठी आपण वेळीच पाऊल उचलले पाहिजे.—याको. ४:७; १ पेत्र २:२१.

आपला डोळा “निर्दोष” ठेवा

१७. एखादी निरर्थक गोष्ट आपल्यासमोर येण्याआधीच तिचा प्रतिकार कसा करावा याचा विचार करणे बुद्धिमानीचे का आहे?

१७ आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा निरर्थक गोष्टींपासून दूर राहण्याचे वचन आपण त्याला देतो. देवाच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची शपथ घेताना आपल्याही भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असतात: “तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो.” (स्तो. ११९:१०१) एखादे प्रलोभन आपल्यासमोर आल्यास आपण त्याचा प्रतिकार कशा प्रकारे करणार याचा आधीच विचार करणे बुद्धिमानीचे ठरेल. शास्त्रवचनांत ज्या गोष्टींची निंदा करण्यात आली आहे त्यांची आपल्याला स्पष्ट समज मिळाली आहे. शिवाय, सैतानाच्या डावपेचांचीही आपल्याला चांगली माहिती आहे. सैतानाने येशूला धोंड्याच्या भाकरी करण्यास केव्हा प्रलोभित केले होते? चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केल्यानंतर त्याला “भूक लागली” होती तेव्हा. (मत्त. ४:१-४) आपण केव्हा कमजोर असतो आणि प्रलोभनाला सहज बळी पडू शकतो हे सैतान चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची हीच वेळ आहे. याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका! आपल्या समर्पणाच्या वेळी आपण यहोवाला दिलेले वचन नेहमी लक्षात ठेवल्यास निरर्थक गोष्टींपासून दूर राहण्याचा आपला संकल्प आणखी दृढ होईल.—नीति. १:५; १९:२०.

१८, १९. (क) “निर्दोष” डोळा आणि “सदोष” डोळा यांतला फरक सांगा. (ख) सर्वोत्तम गोष्टींवर मनन करत राहणे का महत्त्वाचे आहे आणि याबाबतीत फिलिप्पैकर ४:८ आपल्याला कोणता सल्ला देते?

१८ डोळ्यांना भुरळ घालणाऱ्‍या असंख्य विकर्षणांचा आपल्याला दररोज सामना करावा लागतो आणि अशा विकर्षणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आपला डोळा “निर्दोष” ठेवण्याबद्दल येशूने दिलेल्या सल्ल्याचे कधी नव्हे इतके आज पालन करणे महत्त्वाचे आहे. (मत्त. ६:२२, २३) “निर्दोष” डोळा सर्वस्वी एकाच उद्देशावर अर्थात देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित असतो. याच्या अगदी उलट, “सदोष” डोळा धूर्त व लोभी असतो आणि निरर्थक गोष्टींकडे आकर्षित होतो.

१९ हे नेहमी लक्षात असू द्या, की आपण डोळ्यांनी जे काही पाहतो त्याचा आपल्या मनावर व अंतःकरणावर परिणाम होतो. म्हणूनच, ज्या गोष्टी सर्वोत्तम आहेत अशा गोष्टींवर मनन करत राहणे किती महत्त्वाचे आहे! (फिलिप्पैकर ४:८ वाचा.) तेव्हा, आपणही स्तोत्रकर्त्याप्रमाणे अशी प्रार्थना करत राहू या: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.” मग, त्या प्रार्थनेनुसार आपण कार्य करण्याचा प्रयत्न करू तेव्हा यहोवा “[त्याच्या] मार्गांत [आपल्याला] नवजीवन” देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.—स्तो. ११९:३७; इब्री १०:३६.

पुढील गोष्टींविषयी आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

• आपले डोळे, मन आणि अंतःकरण यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाविषयी.

• पोर्नोग्राफी पाहण्याच्या धोक्यांविषयी.

• आपला डोळा “निर्दोष” ठेवण्याच्या महत्त्वाविषयी.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

ख्रिश्‍चनांनी कोणत्या निरर्थक गोष्टी पाहण्याचे टाळले पाहिजे?