व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला

परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला

परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला

ॲडा डेल्लो स्ट्रीटो यांच्याद्वारे कथित

आत्ताच माझं दैनिक वचन वहीत लिहून झालं. मी ३६ वर्षांचा आहे, पण या चार ओळी लिहायला मला दोन तास लागले. इतका वेळ का लागला? माझी आई तुम्हाला समजावून सांगेल.—जोएल

आम्हा दोघा पतीपत्नीचा १९६८ साली यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला. माझी पहिली दोन मुले, डेव्हीड व मार्क सुदृढ होती. यांच्यानंतर मला तिसरा मुलगा जोएल झाला. १९७३ साली, बेल्जियममधील ब्रुसेल्ल्सच्या दक्षिणेपासून सुमारे ६० किलोमीटर दूर असलेल्या बेन्श शहरातील एका इस्पितळात अपुऱ्‍या दिवसांच्या जोएलचा जन्म झाला. जन्माच्या वेळी त्याचं वजन फक्‍त एक किलो ७०० ग्रॅम होतं. प्रसूतीनंतर मी घरी गेले पण जोएलचं वजन वाढण्याकरता आम्हाला त्याला इस्पितळातच ठेवावं लागलं.

अनेक आठवडे होऊनही आमच्या मुलाच्या तब्येतीत सुधारणेचं काहीच चिन्ह दिसलं नाही तेव्हा माझे पती लुईजी आणि मी त्याला एका बालरोगतज्ज्ञाकडे घेऊन गेलो. जोएलला तपासून झाल्यावर, “जोएल त्याच्या भावांसारखा सुदृढ नाही,” असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ते खूप वेळ शांत राहिले. त्याक्षणी मला जाणवलं की माझ्या बाळाला काहीतरी गंभीर आजार झाला आहे. मग डॉक्टरांनी ह्‍यांना बाजूला नेऊन सांगितलं की, आमचं बाळ मतिमंद होईल, कारण त्याला डाऊन सिन्ड्रोम आहे.

डॉक्टरांनी केलेलं निदान ऐकून आम्ही निराश झालो. आम्ही दुसऱ्‍या एका तज्ज्ञांना भेटायला गेलो. त्यांनी तान्ह्या जोएलला जवळजवळ एक तास तपासलं. तपासताना ते आमच्याशी एक शब्दही बोलले नाहीत. हा एक तास आम्हा दोघांना एका युगासारखा वाटला. शेवटी डॉक्टरांनी वर पाहिलं आणि ते आम्हाला म्हणाले: “तुमच्या बाळाला तुमच्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे.” आणि मग अगदी प्रेमळ आवाजात ते पुढं म्हणाले: “पण जोएल तर आनंदी राहील, कारण त्याचे आईबाबा त्याच्यावर खूप प्रेम करतात!” डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला गहिवरून आलं. मी जोएलला कुशीत घेतलं आणि आम्ही घरी आलो. तो आता दोन महिन्यांचा झाला होता.

ख्रिस्ती सभा आणि सेवा यांमुळे आमचं धैर्य वाढतं

जोएलच्या आणखी तपासण्या झाल्या. त्यात दिसून आलं की त्याच्या हृदयात गंभीर दोष होता आणि त्याला गंभीर प्रकारचा मुडदूस होता. त्याच्या हृदयाचा आकार नेहमीपेक्षा मोठा असल्यामुळे त्याची फुफ्फुसं दबली जात होती व त्याला संसर्ग होण्याची शक्यता वाढली होती. तो चार महिन्यांचा झाला तेव्हा त्याला न्यूमोनिया झाला. यामुळे आम्हाला त्याला पुन्हा इस्पितळात न्यावं लागलं. तिथं त्याला इतर रुग्णांपासून वेगळं ठेवण्यात आलं. हा एवढासा जीव जगण्यासाठी कसा धडपडत आहे हे पाहून आमचं हृदय अगदी पिळवटून निघायचं. त्याला हातात घ्यावं, गोंजारावं, असं आम्हाला खूप वाटायचं. पण दहा आठवड्यांसाठी त्याला स्पर्शही करण्याची आम्हाला परवानगी नव्हती. लुईजी व मी, एकमेकांचे हात हातात घेऊन त्याच्याकडे बघत बसण्याव्यतिरिक्‍त व प्रार्थना करण्याव्यतिरिक्‍त काहीच करू शकत नव्हतो.

या सर्वातही, ६ व ३ वर्षांची आमची दोन मुलं डेव्हीड व मार्क यांना घेऊन आम्ही मंडळीच्या सभांना जाणं चालूच ठेवलं. आमच्यासाठी राज्य सभागृहात असणं हे यहोवाच्या प्रेमळ सान्‍निध्यात असण्यासारखं होतं. सभांमध्ये बंधुभगिनींच्या सहवासात असताना, आम्ही आमच्या मनावरचं ओझं यहोवावर सोपवू शकत होतो असं आम्हाला वाटायचं आणि आम्ही एक प्रकारची मनःशांती अनुभवायचो. (स्तो. ५५:२२) जोएलची काळजी घेणाऱ्‍या नर्सेसना देखील जाणवलं, की आम्ही ख्रिस्ती सभांना जात असल्यामुळे संतुलित होतो.

याच काळात मला क्षेत्र सेवेत जाण्याचं बळ मिळावं म्हणून देखील मी यहोवाला प्रार्थना करायचे. घरात रडत बसण्याऐवजी, आजारपण नसलेल्या देवाच्या नवीन जगाच्या वचनानं मला बळ मिळतं असा माझा का विश्‍वास आहे हे मला लोकांना जाऊन सांगायचं होतं. मी जेव्हा जेव्हा क्षेत्र सेवेत जायचे तेव्हा तेव्हा यहोवानं माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिल्याचं मला जाणवलं.

“हे तर आश्‍चर्यच आहे!”

जोएलला आम्ही ज्या दिवशी पुन्हा घरी आणलं तो दिवस खूप आनंदाचा होता. पण आमचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्‍याच दिवशी जोएलची तब्येत बिघडली आणि आम्ही त्याला पुन्हा दवाखान्यात नेलं. त्याला तपासल्यावर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, की “जोएल जास्तीत जास्त सहा महिने जगेल.” दोन महिन्यांनी, जोएल आठ महिन्यांचा झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच झालं. जोएलची तब्येत खालावू लागली. एक डॉक्टर आमच्या शेजारी बसून आम्हाला म्हणाले: “आमच्या हातात जितकं होतं तितकं आम्ही केलं. आता या वेळी फक्‍त यहोवाच त्याला मदत करू शकतो.”

दवाखान्यात मी जोएलच्या खोलीत गेले. मी पार खचून गेले होते, तरीपण मी त्याच्या बिछान्याच्या बाजूला बसून राहिले. मंडळीतल्या अनेक बहिणी रात्रीच्या वेळी माझ्याबरोबर दवाखान्यात राहायला यायच्या आणि लुईजी घरी आमच्या दोन मुलांची काळजी घ्यायचे. असाच एक आठवडा गेला. आणि अचानक जोएलला हृदय विकाराचा झटका आला. नर्सेस धावतच खोलीत आल्या, पण त्या काही करू शकल्या नाहीत. काही मिनिटांनंतर एकीनं हळू आवाजात म्हटलं, “बाळ गेलं.” माझा बांध फुटला व मी खोलीबाहेर रडतच आले. मी यहोवाला प्रार्थना करायचा प्रयत्न केला पण माझं दुःख बोलून दाखवण्यासाठी मला शब्दच फुटत नव्हते. अशीच १५ मिनिटं निघून गेली आणि अचानक एका नर्सनं मला आवाज देऊन म्हटलं, “नाही, तो परत श्‍वास घेतोय!” त्या नर्सनं माझा हात धरून म्हटलं: “या, तुम्ही स्वतःच बघा.” मी जेव्हा जोएलला पाहायला गेले तेव्हा खरंच त्याचं बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू झालं होतं! जोएल पुन्हा जिवंत झाल्याची बातमी वाऱ्‍यासारखी पसरली. दवाखान्यातले डॉक्टर, नर्सेस त्याला पाहायला आले आणि पुष्कळ जण, “हे तर आश्‍चर्यच आहे!” असं म्हणाले.

चौथ्या वर्षी पहिलं पाऊल

जोएलच्या सुरुवातीच्या काही वर्षांत त्याचे बालरोगतज्ज्ञ आम्हाला नेहमी म्हणायचे: “जोएलला तुम्ही खूप प्रेमानं वागवलं पाहिजे.” जोएलच्या जन्मानंतर मी व लुईजीनं स्वतः यहोवाच्या प्रेमळ काळजीचा अनुभव घेतला असल्यामुळे, तीच प्रेमळ काळजी आम्हाला जोएलला दाखवायची होती. जोएलला सर्व बाबतीत आमची मदत लागत असल्यामुळे त्याची आम्ही अशी प्रेमळ काळजी घेऊ शकलो.

जोएलच्या पहिल्या सात वर्षांत प्रत्येक वर्षी त्याची तब्येत बिघडत होती. ऑक्टोबर ते मार्च महिन्यांदरम्यान त्याला एकापाठोपाठ एक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि दवाखान्याच्या आमच्या वाऱ्‍या सुरू झाल्या. असं असलं तरी, आमची दोन मुलं डेव्हीड व मार्क यांच्याबरोबर मी शक्य तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे. आणि ते दोघंही जोएलला प्रगती करायला मदत करायचे. याचे परिणाम आश्‍चर्यकारक होते. जसं की, जोएल कधीच चालू शकणार नाही, असं पुष्कळ डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. पण एकदा, जोएल चार वर्षांचा होता तेव्हा आमचा मुलगा मार्क म्हणाला: “जोएल चल आईला दाखव बरं तू कसा चालतोस!” आणि खरंच, जोएलनं त्याचं पहिलं पाऊल टाकलं! मला तर विश्‍वासच बसेना. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आम्ही सर्वांनी मिळून अगदी मनापासून यहोवाचे आभार मानले. इतर वेळीसुद्धा जोएलनं थोडी जरी प्रगती केली तरी आम्ही त्याचं तोंडभर कौतुक करायचो.

बालपणापासून देवाच्या गोष्टी शिकवल्याचं फळ मिळालं

शक्य तितक्यांदा आम्ही जोएलला राज्य सभागृहातील सभांना घेऊन जायचो. रोगजंतूंपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही त्याला एका खास बाबागाडीत बसवायचो. बाबागाडीला पारदर्शक प्लास्किटचं आच्छादन होतं. या बाबागाडीतच त्याला बसून राहावं लागत असलं तरी जोएलला सभांना जायला आवडायचं.

मंडळीतले सर्व बंधुभगिनी आम्हाला खूप उत्तेजन द्यायचे. आम्हाला लागणारं प्रेम व मदत द्यायला ते तत्पर असायचे. एक बंधू आम्हाला नेहमी यशया ५९:१ मधील शब्दांची आठवण करून द्यायचे. तिथं म्हटलं आहे: “पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्‍वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.” या सांत्वनदायक शब्दांमुळे आम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकलो.

जोएल जसजसा मोठा होत गेला तसतसे आम्ही त्याला, यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास शिकवू लागलो. प्रत्येक प्रसंगी आम्ही यहोवाविषयी अशा प्रकारे बोलायचो ज्यामुळे त्याला आपल्या स्वर्गीय पित्याशी एक प्रेमळ नातेसंबंध जोडावासा वाटेल. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर आशीर्वाद द्यावा म्हणून आम्ही यहोवाला विनंती करायचो.

जोएल जेव्हा बारा-तेरा वर्षांचा झाला तेव्हा, त्याला भेटणाऱ्‍या लोकांना बायबलमधील सत्ये सांगण्यास आवडायचे हे पाहून आम्ही यहोवाचे आभार मानले. वयाच्या १४ व्या वर्षी त्याचं खूप मोठं ऑपरेशन झालं. यातून तो जेव्हा बरा होत होता तेव्हा एकदा त्यानं मला, “आई, मी माझ्या सर्जनला अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक देऊ?” असं जेव्हा विचारलं तेव्हा मला खूप आनंद झाला. काही वर्षांनंतर, जोएलचं आणखी एक ऑपरेशन झालं. यात त्याचं काही खरं नाही, असं आम्हाला पक्कं माहीत होतं. ऑपरेशनच्या आधी, जोएलबरोबर आम्ही तयार केलेलं एक पत्र जोएलनं त्याच्या डॉक्टरांना दिलं. या पत्रात रक्‍त संक्रमणाविषयी त्याचं काय मत होतं ते समजावून सांगितलेलं होतं. सर्जननं त्याला विचारलं: “तुला सर्व मान्य आहे?” जोएलनं अगदी ठामपणे, “हो डॉक्टर, मला मान्य आहे,” असं म्हटलं. आमच्या मुलाला त्याच्या निर्माणकर्त्यावर किती भरवसा आहे व त्याला संतुष्ट करण्याचा त्यानं किती ठाम निश्‍चय केला आहे हे पाहून आमचा ऊर अगदी भरून आला. दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्‍यांनी आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

जोएलनं आध्यात्मिक प्रगती केली

वयाच्या १७ व्या वर्षी जोएलनं यहोवाला आपलं जीवन समर्पित करून पाण्यात बाप्तिस्मा घेतला. तो दिवस आम्ही विसरू शकत नाही! जोएलला आध्यात्मिक प्रगती करताना पाहून आम्हा दोघांना खरंच खूप आनंद वाटतो. तेव्हापासून जोएलचं यहोवावरचं प्रेम आणि सत्याबद्दलचा आवेश कमी झालेला नाही. उलट त्याला भेटणाऱ्‍या सर्व लोकांना तो सांगत असतो, की “सत्यच माझं जीवन आहे!”

जोएल अठरा-एकोणीस वर्षांचा झाला तेव्हा तो लिहायला वाचायला शिकला. यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली. एक लहानसा शब्द जरी त्याला लिहायला जमले, की तो जणू त्याच्यासाठी एक विजयच होता. तेव्हापासून त्याने, रोज सकाळी शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातून दैनिक वचन वाचण्यास सुरुवात केली आहे. वचन वाचल्यानंतर तो ते वचन, त्याला खूप त्रास होत असतानाही आपल्या वहीत लिहून काढतो. आम्ही त्याच्या या वह्‍या जपून ठेवल्या आहेत.

सभा असतात त्या दिवशी जोएलला, दारात उभं राहून सभागृहात येणाऱ्‍यांचं स्वागत करायला आवडत असल्यामुळे, सर्वांनी राज्य सभागृहात लवकर गेलं पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. सभांमध्ये त्याला उत्तरं द्यायला आणि प्रात्यक्षिकांमध्ये भाग घ्यायला आवडतं. तो माईक फिरवण्याचं आणि इतरही छोटी-मोठी कामं करतो. त्याची तब्येत चांगली असली तर तो दर आठवडी आमच्याबरोबर प्रचार कार्यात येतो. २००७ साली मंडळीत जोएलला सेवा सेवक म्हणून नियुक्‍त केल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा तर आमच्या आनंदाला सीमाच उरली नाही. आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हा यहोवाचा किती प्रेमळ आशीर्वाद होता!

यहोवाच्या प्रेमळ मदतीचा आम्हाला अनुभव येतो

१९९९ साली आमच्यावर आणखी एक परीक्षा आली. बेफिकीरपणे गाडी चालवणाऱ्‍या एका चालकानं आमच्या कारला इतक्या जोरात धडक दिली की लुईजी अतिशय गंभीर रीत्या जखमी झाले. त्यांचा एक पाय कापावा लागला आणि त्यांच्या पाठीच्या कण्याची अनेक मोठमोठी ऑपरेशनं झाली. पुन्हा एकदा यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आम्हाला, तो आपल्या सेवकांना देत असलेल्या शक्‍तीचा प्रत्यय आला. (फिलिप्पै. ४:१३) लुईजी आता अपंग आहेत तरीपण आम्ही या नकारात्मक गोष्टीकडे बघण्याऐवजी सकारात्मक गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करतो. ते कामाला जाऊ शकत नसल्यामुळे त्यांना जोएलकडे लक्ष द्यायला जमतं. यामुळे मग मला अभ्यास, सभा, क्षेत्र सेवा यांसाठी वेळ मिळतो. कुटुंबाच्या व मंडळीच्या आध्यात्मिक गोष्टींकडे लुईजी अधिक लक्ष देऊ शकत असल्यामुळे ते अजूनही मंडळीत वडील वर्गाचे संयोजक म्हणून सेवा करत आहेत.

आमची परिस्थिती इतरांपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे आम्ही सर्व जण एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकतो. या सर्व वर्षांत आम्ही, समंजस असण्यास व आवश्‍यकतेपेक्षा जास्त गोष्टींची अपेक्षा न करण्यास शिकलो आहोत. आम्हाला उदास वाटतं तेव्हा आम्ही प्रार्थनेत यहोवाजवळ आमच्या भावना व्यक्‍त करतो. आमच्या मनाला आज एकच खंत आहे. आमची मुलं, डेव्हीड व मार्क मोठी झाली व घर सोडून गेली तेव्हा त्यांनी हळूहळू यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं. पण ते पुन्हा यहोवाकडे वळतील, अशी आम्हाला आशा आहे.—लूक १५:१७-२४.

या सर्व वर्षांत, यहोवा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं आम्ही अनुभवलं आहे आणि आम्हीसुद्धा आमच्यासमोर येणाऱ्‍या प्रत्येक आव्हानाच्या वेळी त्याच्यावर अवलंबून राहण्यास शिकलो आहोत. यशया ४१:१३ हे आमचं आवडतं वचन आहे. त्यात म्हटलं आहे: “मी परमेश्‍वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.” यहोवानं आपला हात घट्ट धरला आहे ही जाणीवच किती सांत्वन देणारी आहे. आम्ही पूर्ण आत्मविश्‍वासानं म्हणू शकतो, की परीक्षांमुळे यहोवावरील आमचा भरवसा आणखी वाढला आहे.

[१७ पानांवरील चित्रे]

जोएल आपली आई ॲडा हिच्याबरोबर

[१८ पानांवरील चित्र]

ॲडा, जोएल आणि लुईजी

[१९ पानांवरील चित्र]

राज्य सभागृहाच्या दारात उभं राहून सर्वांचं स्वागत करायला जोएलला आवडतं