व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा

मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा

मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उप. १२:१.

१. इस्राएलातील लहान मुलांना कोणते आमंत्रण देण्यात आले होते?

 सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी, यहोवाचा संदेष्टा असलेला मोशे याने इस्राएलातील याजकांना आणि वडीलजनांना अशी आज्ञा दिली: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . ह्‍यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरतील आणि ह्‍या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.” (अनु. ३१:१२) उपासनेकरता कोणाकोणाला एकत्र येण्यास सांगितले होते याकडे लक्ष द्या: पुरुष, स्त्रिया आणि बालके यांना. होय, लहान मुलांनाही यहोवाचे ऐकण्यास, त्याच्यापासून शिकण्यास आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास सांगण्यात आले होते.

२. सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीतील मुलांबद्दल यहोवाने कशा प्रकारे आस्था व्यक्‍त केली?

पहिल्या शतकातही यहोवाने ख्रिस्ती मंडळीतील मुलांबद्दल आस्था व्यक्‍त केली. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रांपैकी काही पत्रांत, खास मुलांना उद्देशून मार्गदर्शन देण्यास यहोवाने त्याला प्रेरित केले. (इफिसकर ६:१; कलस्सैकर ३:२० वाचा.) ज्या ख्रिस्ती मुलांनी या सल्ल्याचे पालन केले त्यांची आपल्या प्रिय स्वर्गीय पित्याबद्दलची कदर आणखी वाढली आणि त्यांना अनेक आशीर्वादही लाभले.

३. आज मुले देवाची सेवा करण्याची आपली इच्छा कशा प्रकारे व्यक्‍त करतात?

यहोवाची उपासना करण्यास एकत्र येण्याकरता मुलांना आजही आमंत्रण देण्यात आले आहे का? हो! म्हणूनच, जगभरातील देवाच्या सेवकांपैकी असलेली अनेक मुले पौलाच्या पुढील सल्ल्याचे मनापासून पालन करत असल्याचे पाहून देवाच्या लोकांना खरोखरच खूप आनंद होतो. पौलाने म्हटले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री १०:२४, २५) आज अनेक मुले आपल्या पालकांसोबत मिळून देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतात. (मत्त. २४:१४) तसेच, यहोवाप्रती असलेले आपले मनस्वी प्रेम व्यक्‍त करण्यासाठी, दरवर्षी हजारो मुले बाप्तिस्मा घेण्यासाठी स्वतःला सादर करतात आणि ख्रिस्ताचे शिष्य बनल्यामुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवतात.—मत्त. १६:२४; मार्क १०:२९, ३०.

आमंत्रण स्वीकारण्याची हीच वेळ

४. देवाची सेवा करण्याचे आमंत्रण मुले केव्हा स्वीकारू शकतात?

उपदेशक १२:१ यात असे म्हटले आहे: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” मुलांनो, तुम्हाला काय वाटते? यहोवाची उपासना व त्याची सेवा करण्याचे हे हार्दिक आमंत्रण स्वीकारण्याकरता तुमचे वय किती असले पाहिजे? त्यासाठी तुम्ही नेमके किती वर्षांचे असले पाहिजे हे शास्त्रवचनांत सांगितलेले नाही. तेव्हा, यहोवाचे ऐकण्याकरता आणि त्याची सेवा करण्याकरता आपण फारच लहान आहोत असा विचार करून माघार घेऊ नका. तुमचे वय कितीही असो, विलंब न करता तुम्ही हे आमंत्रण स्वीकारावे असे तुम्हाला प्रोत्साहन दिले जाते.

५. आपल्या मुलांच्या आध्यात्मिक उन्‍नतीला पालक कशा प्रकारे हातभार लावू शकतात?

तुमच्यापैकी अनेकांच्या आध्यात्मिक उन्‍नतीत तुमच्या आईचा किंवा वडिलांचा अथवा दोघांचाही हातभार असेल. त्याअर्थी, तुमची स्थिती बायबल काळातील तीमथ्यासारखीच आहे. तो बालक होता तेव्हा, त्याची आई युनीके आणि त्याची आजी लोईस यांनी त्याला पवित्र शास्त्राची शिकवण दिली होती. (२ तीम. ३:१४, १५) त्याच प्रकारे, तुमचे आईवडीलही तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे, तुम्हाला मंडळीच्या सभांना व मोठ्या संमेलनांना नेण्याद्वारे आणि क्षेत्र सेवेत आपल्यासोबत घेऊन जाण्याद्वारे तुम्हाला प्रशिक्षण देतात. खरेतर, तुम्हाला देवाचे मार्ग शिकवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी खुद्द यहोवाकडून तुमच्या आईवडिलांना मिळालेली आहे. तेव्हा, त्यांना तुमच्याबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमाची व आस्थेची तुम्ही कदर करता का?—नीति. २३:२२.

६. (क) स्तोत्र ११०:३ नुसार, कोणत्या प्रकारच्या उपासनेमुळे यहोवाचे मन आनंदित होते? (ख) आपण आता कशाचे परीक्षण करणार आहोत?

तरीसुद्धा, तुम्ही मुले जसजशी मोठी होत जाता, तसतसे तीमथ्याप्रमाणे “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे [“याची तुम्ही स्वतः खातरी करून घ्यावी,” NW]” अशी अपेक्षा यहोवा तुमच्याकडून करतो. (रोम. १२:२) असे केल्यास, मंडळीच्या कार्यांत केवळ तुमच्या पालकांची इच्छा आहे म्हणून तुम्ही सहभाग घेणार नाही. तर, देवाची इच्छा पूर्ण करण्याची तुमची स्वतःची इच्छा असल्यामुळे तुम्ही त्यात सहभाग घ्याल. तुम्ही स्वेच्छेने यहोवाची सेवा केल्यास, त्याचे मन आनंदित होईल. (स्तो. ११०:३) तर मग, यहोवाचे ऐकण्याची आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याची तुमची इच्छा तुम्ही आणखी दृढ करू इच्छिता हे तुम्ही कसे दाखवू शकता? याचे तीन महत्त्वपूर्ण मार्ग आहेत ज्यांची आपण चर्चा करणार आहोत. हे तीन मार्ग अभ्यास, प्रार्थना, आणि आचरण यांवर आधारित आहेत. एकेक करून आपण त्यांचे परीक्षण करू या.

यहोवाला एक खरी व्यक्‍ती म्हणून ओळखा

७. शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले, आणि त्याला हे कसे शक्य झाले?

यहोवाची सेवा करण्याची तुमची इच्छा तुम्ही आणखी दृढ करू इच्छिता हे दाखवण्याचा पहिला मार्ग म्हणजे दररोज बायबल वाचणे. देवाचे वचन नियमितपणे वाचण्याद्वारे तुम्ही आपली आध्यात्मिक गरज तृप्त करू शकता आणि बायबलचे अनमोल ज्ञान प्राप्त करू शकता. (मत्त. ५:३) याबाबतीत येशूने उत्तम उदाहरण मांडले. तो १२ वर्षांचा असताना, एकदा मंदिरात “गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्‍न करताना” त्याच्या आईवडिलांना सापडला. (लूक २:४४-४६) येशूने लहान वयातच, शास्त्रवचनांबद्दल व ते समजून घेण्याबद्दल लालसा विकसित केली होती. त्याला हे कसे शक्य झाले? यात त्याची आई मरीया आणि त्याचा पिता योसेफ यांनी महत्त्वाची भूमिका निभावली यात शंका नाही. ते देवाचे सेवक होते आणि त्यामुळे येशूला त्यांनी अगदी बालपणापासून देवाविषयीचे शिक्षण दिले होते.—मत्त. १:१८-२०; लूक २:४१, ५१.

८. (क) आईवडिलांनी आपल्या मुलांच्या अंतःकरणात देवाच्या वचनाबद्दल प्रेम केव्हा विकसित केले पाहिजे? (ख) बालपणापासून मुलांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्व पटवून देणारे एक उदाहरण सांगा.

त्याचप्रमाणे आजही, आपल्या मुलांच्या अंतःकरणात अगदी बालपणापासून बायबल सत्याबद्दल ओढ निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे याची देवभीरू पालकांना जाणीव आहे. (अनु. ६:६-९) रूबी नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीने, तिचा पहिला मुलगा जोसेफ याच्या जन्मानंतर नेमके हेच केले. ती दररोज त्याला बायबल कथांचं माझं पुस्तक याच्यातून कथा वाचून दाखवायची. तो थोडा मोठा झाल्यावर, तिने त्याला बायबलमधील अनेक वचने तोंडपाठ करायला मदत केली. या सर्व प्रशिक्षणाचा जोसेफला काही फायदा झाला का? नक्कीच झाला. त्याने बोलायला सुरुवात केली, तेव्हा तो बायबलच्या कितीतरी कथा स्वतःच्या शब्दांत सांगू शकत होता. आणि अवघ्या पाच वर्षांचा असताना, त्याने ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपले पहिले भाषण दिले.

९. बायबल वाचणे आणि त्यावर मनन करणे महत्त्वाचे का आहे?

मुलांनो, आध्यात्मिक रीत्या आणखी उन्‍नती करण्याकरता तुम्ही दररोज बायबल वाचण्याची स्वतःला सवय लावली पाहिजे आणि तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यानंतर व पुढे प्रौढावस्थेतही ही सवय कायम ठेवली पाहिजे. (स्तो. ७१:१७) बायबल वाचनामुळे तुम्हाला आध्यात्मिक रीत्या उन्‍नती करण्यास मदत होईल असे का म्हणता येईल? येशूने आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेत काय म्हटले याकडे लक्ष द्या: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला . . . त्यांनी ओळखावे.” (योहा. १७:३) होय, तुम्ही जितके अधिक यहोवाबद्दल शिकून घ्याल, तितकी अधिक तो एक खरी व्यक्‍ती असल्याची तुम्हाला जाणीव होईल आणि त्याच्याबद्दलचे तुमचे प्रेम आणखी गहिरे होईल. (इब्री ११:२७) म्हणून, प्रत्येक वेळी तुम्ही बायबल वाचता, तेव्हा यहोवाबद्दल आणखी जास्त शिकण्याकरता मिळालेल्या त्या संधीचा उपयोग करा. स्वतःला असे विचारा: ‘एक व्यक्‍ती म्हणून यहोवाबद्दल हा वृत्तांत मला काय शिकवतो? बायबलच्या या उताऱ्‍यातून देवाचे माझ्यावरील प्रेम व काळजी कशी दिसून येते?’ अशा प्रश्‍नांवर मनन करण्यासाठी वेळ काढल्याने, यहोवा कशा प्रकारे विचार करतो, त्याच्या भावना काय आहेत आणि तुमच्याकडून तो काय अपेक्षितो हे जाणून घ्यायला तुम्हाला मदत होईल. (नीतिसूत्रे २:१-५ वाचा.) तरुण तीमथ्याप्रमाणेच, तुम्ही शास्त्रवचनांतून जे शिकता त्याची तुम्हाला ‘खातरी होईल’ आणि स्वेच्छेने यहोवाची उपासना करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल.—२ तीम. ३:१४.

प्रार्थनेमुळे यहोवावरील तुमचे प्रेम आणखी गहिरे कसे होते?

१०, ११. यहोवाची सेवा करण्याची तुमची इच्छा आणखी दृढ करण्यात प्रार्थना कशी साहाय्यक ठरते?

१० मनापासून यहोवाची सेवा करण्याची तुमची इच्छा आणखी दृढ करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे प्रार्थना. स्तोत्र ६५:२ यात आपल्याला असे वाचायला मिळते: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.” आपले खास लोक होण्याकरता देवाने इस्राएल लोकांशी करार केला त्या काळादरम्यानही, देवाच्या मंदिरात येणारे गैरइस्राएल लोक त्याला प्रार्थना करू शकत होते. (१ राजे ८:४१, ४२) होय, देव पक्षपाती नाही. जे त्याच्या आज्ञांचे पालन करतात, ते भरवसा बाळगू शकतात की तो त्यांच्या प्रार्थना जरूर ऐकेल. (नीति. १५:८) तेव्हा, “सर्व मानवजाति” असे जे म्हटले आहे, त्यात नक्कीच तुम्हा मुलांचाही समावेश होतो.

११ खरी मैत्री सुसंवादावर आधारित असते हे तुम्हाला माहीतच आहे. सहसा तुम्ही तुमच्या जिवलग मित्राजवळ तुमचे विचार, चिंता-विवंचना आणि भावना व्यक्‍त करता. त्याचप्रमाणे, तुम्ही मनापासून प्रार्थना करता तेव्हा खरे तर तुम्ही आपल्या महान निर्माणकर्त्याशी बोलत असता. (फिलिप्पै. ४:६, ७) म्हणूनच, आपल्या प्रेमळ पालकांजवळ किंवा आपल्या जिवाभावाच्या मित्राजवळ तुम्ही जसे आपले मन मोकळे करता, तसेच यहोवाशी बोलताना आपल्या आंतरिक भावना व्यक्‍त करा. तुम्ही ज्या प्रकारे प्रार्थना करता आणि यहोवाबद्दल तुम्हाला जे काही वाटते यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. यहोवासोबत तुमची मैत्री जितकी घनिष्ठ होत जाईल, तितक्याच तुमच्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल.

१२. (क) अर्थपूर्ण प्रार्थनेत केवळ शब्दांनाच महत्त्व नसते असे का म्हणता येईल? (ख) यहोवा तुमच्या अधिक जवळ आहे ही जाणीव होण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

१२ पण, हे नेहमी लक्षात असू द्या की अर्थपूर्ण प्रार्थनेत केवळ शब्दांनाच नव्हे, तर तुमच्या मनातल्या भावनांनाही महत्त्व असते. तेव्हा, प्रार्थना करताना तुम्हाला यहोवाबद्दल वाटणारे मनस्वी प्रेम, गाढ आदर आणि त्याच्यावर तुम्ही किती विसंबून आहात हे व्यक्‍त करा. यहोवा तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देतो हे तुम्हाला जाणवते तेव्हा पूर्वी कधी नव्हे इतके तुम्हाला व्यक्‍तीशः हे अनुभवायला मिळेल की “जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे.” (स्तो. १४५:१८) होय, यहोवा नक्कीच तुमच्या अधिक जवळ येईल आणि दियाबलाचा प्रतिकार करण्यास व जीवनात योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला बळ देईल.—याकोब ४:७, ८ वाचा.

१३. (क) यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडल्यामुळे एका बहिणीला कसा फायदा झाला? (ख) यहोवासोबत मैत्री केल्याने मित्रांच्या दबावाचा सामना करण्यास तुम्हाला कशी मदत मिळते?

१३ शेरी नावाच्या एका बहिणीला यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडल्यामुळे कशा प्रकारे बळ मिळाले याचा विचार करा. अभ्यासात हुशार असल्यामुळे व एक उत्तम खेळाडूही असल्यामुळे शाळेत असताना तिला अनेक बक्षिसे मिळाली होती. शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेता यावे म्हणून तिला शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याविषयी शेरी म्हणते: “ही अतिशय आकर्षक संधी होती. शिवाय, मी ही संधी हुकवू नये म्हणून शाळेतले प्रशिक्षक व इतर विद्यार्थीही मला खूप गळ घालत होते.” पण, शेरीला याची जाणीव होती, की तिने जर उच्च शिक्षण घेण्याचा विचार केला तर अभ्यासात व खेळाची तयारी करण्यातच तिचा बराचसा वेळ जाईल आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी तिच्याकडे वेळच उरणार नाही. मग शेरीने काय केले? ती म्हणते: “यहोवाला प्रार्थना केल्यानंतर मी ती शिष्यवृत्ती नाकारली आणि सामान्य पायनियर सेवा सुरू केली.” आज सामान्य पायनियर म्हणून तिला पाच वर्षे झाली आहेत. ती म्हणते: “मी जो निर्णय घेतला त्याचा मला मुळीच पस्तावा होत नाही. यहोवाच्या दृष्टीनं मी योग्यच निर्णय घेतला या जाणिवेनं मला खूप आनंद होतो. खरोखर तुम्ही जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास इतर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३३.

चांगल्या आचरणावरून तुमचे “मन शुद्ध” असल्याचे दिसून येते

१४. यहोवाच्या नजरेत तुमचे उत्तम आचरण महत्त्वाचे का आहे?

१४ तुम्ही स्वेच्छेने यहोवाची सेवा करत आहात हे दाखवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे तुमचे आचरण. जी मुले नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतात अशांना यहोवा आशीर्वादित करतो. (स्तोत्र २४:३-५ वाचा.) शमुवेल लहान होता तेव्हा महायाजक एली याच्या मुलांच्या अनैतिक आचरणाचे अनुकरण करणे त्याने कटाक्षाने टाळले. शमुवेलाचे उत्तम आचरण देवाच्या व लोकांच्या नजरेतून सुटले नाही. त्याच्याविषयी बायबलचा अहवाल म्हणतो: “इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्‍वर व मानव त्याच्यावर प्रसन्‍न होते.”—१ शमु. २:२६.

१५. उत्तम आचरण ठेवण्याची काही कारणे काय आहेत?

१५ आज आपण अशा एका जगात राहत आहोत जिथे आपल्या सभोवतालची माणसे स्वतःवर प्रेम करणारी, गर्विष्ठ, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी अशी आहेत. पौलाने उल्लेखिलेल्या लक्षणांपैकी ही केवळ काही लक्षणे आहेत. (२ तीम. ३:१-५) अशा दुष्ट जगात राहत असताना उत्तम आचरण राखणे साहजिकच तुम्हाला सोपे जाणार नाही. पण, जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या नजरेत योग्य ते करता आणि चुकीच्या आचरणात सहभागी होण्यास नकार देता तेव्हा तेव्हा यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयात त्याचा पक्ष घेत असल्याचे तुम्ही दाखवून देता. (ईयो. २:३, ४) तसेच, “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन” या यहोवाच्या मनःपूर्वक आमंत्रणाला प्रतिसाद दिल्याचे समाधानही तुम्हाला मिळते. (नीति. २७:११) याशिवाय, तुम्ही यहोवाचे मन आनंदित करत आहात या जाणिवेमुळे त्याची सेवा करण्याची तुमची इच्छा अधिकच दृढ होईल.

१६. एक बहिणीने कशा रीतीने यहोवाचे मन आनंदित केले?

१६ कॅरल नावाची एक किशोरवयीन ख्रिस्ती बहीण शाळेत असताना नेहमी बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायची. आणि तिचे हे उत्तम आचरण इतरांच्याही लक्षात आले. ते कसे? आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकामुळे, सणवार साजरे करण्यात व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांत ती सहभाग घेत नसल्यामुळे तिचे वर्गसोबती नेहमी तिची थट्टा करायचे. यामुळे कधीकधी आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगण्याची संधी तिला मिळायची. पुढे अनेक वर्षांनंतर कॅरलला शाळेतल्या एका मैत्रिणीकडून एक कार्ड मिळाले. त्यात तिने लिहिले होते: “तुला भेटून तुझे आभार मानण्याची माझी खूप खूप इच्छा होती. एक ख्रिस्ती युवक या नात्यानं तुझं आचरण आणि सणवार साजरे करण्याच्या बाबतीत तू घेतलेली धाडसी भूमिका कायम माझ्या लक्षात राहिली. मला भेटलेल्या यहोवाच्या साक्षीदारांपैकी तूच पहिली होतीस.” कॅरलच्या उत्तम उदाहरणाचा तिच्या मैत्रिणीवर इतका प्रभाव पडला होता की तिने नंतर बायबलचा अभ्यास सुरू केला. तिने कॅरलला पाठवलेल्या कार्डमध्ये लिहिले की ४० पेक्षा अधिक वर्षांपासून ती एक बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहे! कॅरलप्रमाणेच आज तुम्ही मुले धैर्याने बायबलच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हीसुद्धा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना यहोवाविषयीचे ज्ञान घेण्यास प्रेरित करू शकता.

यहोवाची स्तुती करणारी मुले

१७, १८. (क) तुमच्या मंडळीतील लहान मुलांबद्दल तुम्हाला कसे वाटते? (ख) देवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या मुलांसमोर कोणते भवितव्य आहे?

१७ यहोवाच्या जगव्याप्त संघटनेत उत्साहाने त्याची सेवा करणाऱ्‍या हजारो मुलांना पाहून आपल्या सर्वांनाच किती आनंद होतो! दररोज बायबलचे वाचन करण्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे आणि देवाच्या इच्छेनुसार आचरण राखण्याचा प्रयत्न करण्याद्वारे ही मुले यहोवाची उपासना करण्याची आपली इच्छा अधिक दृढ करतात. अशा आदर्श मुलांना पाहून त्यांच्या पालकांना व यहोवाच्या सर्व उपासकांना नक्कीच खूप आनंद होतो.—नीति. २३:२४, २५.

१८ भविष्यात देवाच्या प्रतिज्ञात नवीन जगात प्रवेश करणाऱ्‍या लोकांमध्ये विश्‍वासू मुले देखील असतील. (प्रकटी. ७:९, १४) यहोवाबद्दल त्यांना वाटणारी कदर दिवसेंदिवस वाढत जाईल तसतसे ते असंख्य आशीर्वाद अनुभवतील व सदासर्वकाळ त्याची स्तुती करण्याची संधी त्यांना लाभेल.—स्तो. १४८:१२, १३.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आज लहान मुले कशा प्रकारे खऱ्‍या उपासनेत सहभाग घेऊ शकतात?

• बायबल वाचनातून फायदा घेण्यासाठी वाचलेल्या गोष्टींवर मनन करणे का अत्यावश्‍यक आहे?

• यहोवाच्या जवळ येण्यासाठी प्रार्थना कशा प्रकारे तुम्हाला साहाय्यक ठरते?

• एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या चांगल्या आचरणामुळे काय साध्य होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्र]

तुम्हाला दररोज बायबल वाचण्याची सवय आहे का?