व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा उद्देश साध्य करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका

यहोवाचा उद्देश साध्य करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका

यहोवाचा उद्देश साध्य करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका

“त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; . . . ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” —यश. ५५:११.

१. योजना आणि उद्देश यांतील फरक काय ते सांगा.

 अशी कल्पना करा की दोन माणसे आहेत आणि ते दोघेही कारने प्रवास करण्याचा बेत करत आहेत. त्यांपैकी एक जण आपल्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी एक ठराविक मार्ग आखतो. तर दुसऱ्‍याला कोठे जायचे हे अचूक माहीत आहे, पण तिथपर्यंत पोहचण्याचे अनेक पर्यायी मार्गही त्याच्या लक्षात आहेत. गरजेनुसार आपला मार्ग बदलण्याची त्याची तयारी असते. एका अर्थी, या दोघा मनुष्यांनी अवलंबिलेल्या दोन वेगवेगळ्या पद्धतींवरून, योजना करणे आणि उद्देश किंवा संकल्प करणे यात फरक आहे हे दिसून येते. योजना करणे म्हणजे एक निश्‍चित मार्ग आखणे. तर उद्देश किंवा संकल्प करताना एखाद्या व्यक्‍तीच्या मनात एक विशिष्ट ध्येय असते, पण ते साध्य करण्याचा एकच विशिष्ट मार्ग त्याच्या मनात असेल असे नाही.

२, ३. (क) यहोवाचा मूळ उद्देश काय आहे आणि आदाम व हव्वेने पाप केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी यहोवाने कोणते पाऊल उचलले? (ख) देवाचा उद्देश व हा उद्देश तो कशा रीतीने पूर्ण करत आहे हे लक्षात ठेवून जीवन व्यतीत करणे का महत्त्वाचे आहे?

यहोवासुद्धा एका ठराविक योजनेनुसार नव्हे, तर क्रमाक्रमाने उलगडत जाणाऱ्‍या दीर्घ पल्ल्याच्या उद्देशानुसार आपली इच्छा पूर्ण करतो. (इफिस. ३:११) देवाचा हा उद्देश मानवजातीच्या व पृथ्वीच्या संबंधी त्याने केलेल्या मूळ संकल्पाशी अर्थात परिपूर्ण मानवांना सदासर्वकाळ शांतीसुखाने पृथ्वीवर राहता यावे म्हणून पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात करण्याच्या संकल्पाशी संबंधित आहे. (उत्प. १:२८) आदाम आणि हव्वेने पाप केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी यहोवाने लगेच पाऊल उचलून आपला मूळ उद्देश पूर्ण करण्याची व्यवस्था केली. (उत्पत्ति ३:१५ वाचा.) यहोवाने ठरवले की त्याची लाक्षणिक स्त्री एका ‘संततीला’ किंवा पुत्राला जन्म देईल आणि ही संतती सरतेशेवटी, आदाम आणि हव्वेला पाप करण्यास फूस लावणाऱ्‍या सैतानाचा नाश करेल व त्याच्यामुळे झालेले सर्व नुकसान भरून काढेल.—इब्री २:१४; १ योहा. ३:८.

देवाने प्रकट केलेला उद्देश पूर्ण करण्यापासून विश्‍वातील कोणतीही शक्‍ती त्याला रोखू शकत नाही. (यश. ४६:९-११) असे का म्हणता येईल? कारण यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात त्याचा पवित्र आत्मा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत ही अदम्य शक्‍ती गोवलेली असल्यामुळे त्याचा उद्देश कधीही ‘विफल होणार नाही’ असे खातरीने म्हणता येईल. (यश. ५५:१०, ११) देवाचा उद्देश व तो हा उद्देश कशा रीतीने पूर्ण करत आहे हे लक्षात ठेवून जीवन व्यतीत करणे महत्त्वाचे आहे. कारण या उद्देशाच्या पूर्णतेवरच आपले भावी जीवन अवलंबून आहे. याशिवाय, यहोवा कशा प्रकारे पवित्र आत्म्याचा उपयोग करतो हे पाहून आपला विश्‍वासही मजबूत होतो. तेव्हा, देवाचा उद्देश पूर्ण करण्यात पवित्र आत्म्याच्या भूतकाळातील, वर्तमानकाळातील व भविष्यातील भूमिकेबद्दल आपण पाहू या.

पवित्र आत्म्याने गतकाळात बजावलेली भूमिका

४. यहोवाने कशा प्रकारे क्रमाक्रमाने आपला उद्देश प्रकट केला?

प्राचीन काळी, यहोवाने क्रमाक्रमाने आपला उद्देश प्रकट केला. सुरुवातीला प्रतिज्ञात संततीची ओळख हे एक “पवित्र रहस्य” होते. (१ करिंथ. २:७, NW) सुमारे २,००० वर्षांनंतरच यहोवाने पुन्हा एकदा संततीचा उल्लेख केला. (उत्पत्ति १२:७; २२:१५-१८ वाचा.) यहोवाने अब्राहामाला एक अभिवचन दिले ज्याची पुढे मोठ्या प्रमाणात पूर्णता होणार होती. “तुझ्या संततीच्या द्वारे” असे जे अब्राहामाला सांगण्यात आले होते त्यावरून, ही संतती मानव म्हणून अब्राहामाच्या वंशातून येणार होती हे अगदी स्पष्ट झाले. देवाने ही गोष्ट प्रकट केली तेव्हा सैतान नक्कीच मोठ्या आस्थेने पाहत होता असे आपण म्हणू शकतो. अब्राहामाची वंशावळ नष्ट किंवा दूषित करण्यास आणि अशा रीतीने देवाचा उद्देश हाणून पाडण्यास तो साहजिकच अतिशय उत्सुक होता. पण, असे होणे मुळीच शक्य नव्हते. कारण देवाचा अदृश्‍य आत्मा कार्य करत होता. तो कसा?

५, ६. ज्या वंशावळीतून संतती येणार होती त्यातील व्यक्‍तींचे रक्षण करण्यासाठी यहोवाने कशा प्रकारे आपल्या आत्म्याचा उपयोग केला?

ज्या वंशावळीतून संतती येणार होती त्यातील व्यक्‍तींचे रक्षण करण्यासाठी यहोवाने आपल्या आत्म्याचा उपयोग केला. यहोवाने अब्रामास (अब्राहामास) म्हटले: “मी तुझी ढाल आहे.” (उत्प. १५:१) हे काही पोकळ अभिवचन नव्हते. उदाहरणार्थ, सा.यु.पू. १९१९ च्या सुमारास अब्राहाम व सारा काही काळ गरार या ठिकाणी राहायला गेले त्या वेळी जे काही घडले ते लक्षात घ्या. सारा ही अब्राहामाची पत्नी आहे हे गरारचा राजा अबीमलेख याला माहीत नसल्यामुळे तिला आपली पत्नी बनवून घेण्याच्या हेतूने त्याने माणसे पाठवून तिला राजवाड्यात आणले. सारेने अब्राहामाच्या संततीला जन्म देऊ नये म्हणून सैतानानेच हे घडवून आणले असावे का? बायबल याविषयी काहीही सांगत नाही. पण, ते हे जरूर सांगते की त्या घटनेत यहोवाने हस्तक्षेप केला. त्याने स्वप्नाद्वारे अबीमलेखास सारेला स्पर्श न करण्याची ताकीद दिली.—उत्प. २०:१-१८.

या एकाच प्रसंगी यहोवाने त्यांचे रक्षण केले नव्हते. तर आणखी कितीतरी प्रसंगी त्याने अब्राहामाची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. (उत्प. १२:१४-२०; १४:१३-२०; २६:२६-२९) म्हणूनच, अब्राहाम व त्याच्या वंशजांविषयी स्तोत्रकर्ता म्हणू शकला: “[यहोवाने] कोणत्याहि मनुष्याला त्यांस उपद्रव करू दिला नाही, त्यांच्याकरिता त्याने राजांचाहि निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्‍तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”—स्तो. १०५:१४, १५.

७. यहोवाने कोणकोणत्या मार्गांनी इस्राएल राष्ट्राचे रक्षण केले?

प्रतिज्ञात संततीचा ज्यात जन्म होणार होता त्या प्राचीन इस्राएल राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी यहोवाने आपल्या आत्म्याचा उपयोग केला. आपल्या आत्म्याद्वारे यहोवाने इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र दिले ज्यामुळे खरी उपासना टिकून राहिली आणि यहुदी लोकांचे आध्यात्मिक, नैतिक व शारीरिक दृष्टीने संरक्षण झाले. (निर्ग. ३१:१८; २ करिंथ. ३:३) शास्त्यांच्या काळात, इस्राएल लोकांची शत्रूंपासून सुटका करण्यासाठी यहोवाने काही पुरुषांना आपल्या आत्म्याद्वारे बलिष्ठ केले. (शास्ते ३:९, १०) पुढे अब्राहामाच्या संततीचा प्रमुख भाग असलेल्या येशूच्या जन्मापर्यंतच्या अनेक शतकांदरम्यान देखील जेरूसलेम, तेथील मंदिर व बेथलेहेम या ठिकाणांचे रक्षण करण्यात पवित्र आत्म्याने महत्त्वाची भूमिका बजावली असावी. येशूसंदर्भात करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांची पूर्णता होण्यात ही सर्व ठिकाणे अत्यंत महत्त्वाची होती.

८. येशूच्या जीवनात व सेवाकार्यात पवित्र आत्म्याने थेटपणे कार्य केले हे कशावरून दिसून येते?

येशूच्या जीवनात व सेवाकार्यात पवित्र आत्म्याने थेटपणे कार्य केले. कुमारी मरीयेच्या गर्भात पवित्र आत्म्याने असे काहीतरी साध्य केले जे त्या आधीही कधी घडले नव्हते व आजपर्यंतही घडले नाही. पवित्र आत्म्याने एका अपरिपूर्ण स्त्रीच्या पोटी एका परिपूर्ण पुत्राचा—ज्याच्यावर मृत्यूदंड नव्हता—जन्म घडवून आणला. (लूक १:२६-३१, ३४, ३५) पुढे येशू लहान असताना त्याचा अकाली मृत्यू होण्यापासून आत्म्याने त्याला वाचवले. (मत्त. २:७, ८, १२, १३) येशू सुमारे ३० वर्षांचा होता तेव्हा देवाने पवित्र आत्म्याद्वारे त्याचा अभिषेक केला. असे करण्याद्वारे देवाने त्याला दाविदाचा वारस होण्यास नियुक्‍त केले आणि प्रचार कार्य करण्याची नेमणूक दिली. (लूक १:३२, ३३; ४:१६-२१) तसेच, रोग्यांना बरे करणे, लोकसमुदायाला जेवू घालणे व मृतांना जिवंत करणे यांसारखे चमत्कार करण्याची शक्‍तीही पवित्र आत्म्याने येशूला दिली. येशूच्या राजवटीत आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील याची पूर्वझलक दाखवणारी ही महान कृत्ये होती.

९, १०. (क) पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्मा असल्याचे कसे दिसून आले? (ख) सा.यु. पहिल्या शतकात यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेतील कोणत्या महत्त्वाच्या घडामोडीवर प्रकाश टाकण्यात आला?

सा.यु. पेन्टेकॉस्टपासून यहोवाने अब्राहामाच्या संततीचा दुय्यम भाग बनणाऱ्‍यांचा अभिषेक करण्यास पवित्र आत्म्याचा उपयोग केला. यांपैकी अनेक जण अब्राहामाच्या वंशातले नव्हते. (रोम. ८:१५-१७; गलती. ३:२९) पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांवरही पवित्र आत्मा कार्य करत असल्याचे दिसून आले. कारण आत्म्याने त्यांना आवेशाने प्रचार करण्याची व अद्‌भुत कृत्ये करण्याची शक्‍ती दिली. (प्रे. कृत्ये १:८; २:१-४; १ करिंथ. १२:७-११) या चमत्कारिक देणग्यांद्वारे पवित्र आत्म्याने यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेतील एका महत्त्वाच्या घडामोडीवर प्रकाश टाकला. यापुढे यहोवा, जेरूसलेमच्या मंदिरात शतकानुशतके केल्या जाणाऱ्‍या उपासनेचा स्वीकार करणार नव्हता. कारण त्याची कृपादृष्टी आता नव्याने स्थापित झालेल्या ख्रिस्ती मंडळीवर होती. तेव्हापासून, आपला उद्देश साध्य करण्यासाठी यहोवा याच अभिषिक्‍त मंडळीचा उपयोग करत आहे.

१० आपला उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी यहोवाने प्राचीन काळी ज्या अनेक मार्गांनी पवित्र आत्म्याचा उपयोग केला त्यांपैकी संरक्षण करणे, शक्‍ती देणे व अभिषेक करणे हे केवळ काही मार्ग आहेत. आज आपल्या काळाबाबत काय? आज यहोवा कशा प्रकारे आपला उद्देश साध्य करण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करतो? हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण असे केल्यानेच आपण आत्म्याच्या सुसंगततेत कार्य करू शकतो. तेव्हा, आपल्या काळात यहोवा ज्या अनेक मार्गांनी पवित्र आत्म्याचा उपयोग करतो त्यांपैकी चार मार्गांची आपण चर्चा करू या.

पवित्र आत्मा सध्या बजावत असलेली भूमिका

११. आज पवित्र आत्मा देवाच्या लोकांना शुद्ध राहण्यास मदत करतो हे कशावरून दिसून येते आणि तुम्ही पवित्र आत्म्याशी सहकार्य करत आहात हे कसे दाखवू शकता?

११ पहिला मार्ग म्हणजे आज पवित्र आत्मा देवाच्या लोकांना शुद्ध राहण्यास मदत करतो. यहोवाच्या उद्देशात सामील असलेल्यांनी नैतिकदृष्ट्या शुद्ध असले पाहिजे. (१ करिंथकर ६:९-११ वाचा.) सत्यात येण्यापूर्वी काही जण जारकर्म, व्यभिचार व समलैंगिकता यांसारखी अनैतिक कृत्ये करत होती. अशी कृत्ये करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या वासना सहसा खूप खोलवर रुजलेल्या असतात. (याको. १:१४, १५) पण, हे लोक आता “धुतलेले” आहेत. म्हणजेच देवाला आनंदित करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनात आवश्‍यक बदल केले आहेत. देवावर प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍तीला चुकीच्या अभिलाषा कार्यात उतरवण्याच्या प्रबळ इच्छेवर मात करण्यास कोणती गोष्ट मदत करते? १ करिंथकर ६:११ मध्ये सांगितल्यानुसार ‘आपल्या देवाचा आत्मा.’ तुम्ही नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या जीवनावर पवित्र आत्म्याचा शक्‍तिशाली प्रभाव पडण्यास तुम्ही वाव देता.

१२. (क) यहेज्केलाच्या दृष्टान्तानुसार यहोवा कशा प्रकारे आपल्या संघटनेचे मार्गदर्शन करतो? (ख) तुम्ही कसे दाखवून देऊ शकता, की तुम्ही आत्म्याच्या सुसंगततेत कार्य करत आहात?

१२ दुसरा मार्ग म्हणजे, यहोवाला योग्य वाटेल त्या दिशेने तो आपल्या संघटनेचे मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करतो. यहेज्केलाने पाहिलेल्या दृष्टान्तात, यहोवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग एका स्वर्गीय रथाने सूचित केलेला आहे. यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात हा रथ सातत्याने पुढे वाटचाल करत आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या मार्गात येऊ शकत नाही. पण, कोणती गोष्ट या रथास एका विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते? अर्थातच पवित्र आत्मा. (यहे. १:२०, २१) हे लक्षात असू द्या, की यहोवाच्या संघटनेचे दोन भाग आहेत. एक स्वर्गात आणि एक पृथ्वीवर. जर संघटनेचा स्वर्गीय भाग पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतो तर साहाजिकच पृथ्वीवरील भागानेसुद्धा त्याच आत्म्याच्या साहाय्याने कार्य केले पाहिजे. त्यामुळे, देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्ही स्वीकारता व त्याचे विश्‍वासूपणे पालन करता तेव्हा हेच दाखवून देता की तुम्ही यहोवाच्या स्वर्गीय रथासोबत वाटचाल करत आहात व त्याच्या पवित्र आत्म्याच्या सुसंगततेत कार्य करत आहात.—इब्री १३:१७.

१३, १४. (क) येशूने उल्लेख केलेली “ही पिढी” कोणास सूचित करते? (ख) बायबलमधील सत्ये प्रकाशात आणण्यात पवित्र आत्म्याची महत्त्वाची भूमिका आहे हे दाखवणारे उदाहरण द्या. (“बायबलमधील सत्यांसंबंधी अलीकडे मिळालेली सुधारित स्पष्टीकरणे तुमच्या लक्षात आहेत का?” ही चौकट पाहा)

१३ तिसरा मार्ग म्हणजे बायबलमधील सत्ये प्रकाशात आणण्यात पवित्र आत्मा महत्त्वाची भूमिका बजावतो. (नीति. ४:१८) बायबलमधील सत्ये क्रमाक्रमाने प्रकाशात आणण्याचे एक प्रमुख माध्यम म्हणून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ फार पूर्वीपासून या नियतकालिकाचा उपयोग केला आहे. (मत्त. २४:४५) उदाहरणार्थ, येशूने उल्लेख केलेली “ही पिढी” कोणास सूचित करते याविषयीची आपली समज विचारात घ्या. (मत्तय २४:३२-३४ वाचा.) येशू कोणत्या पिढीविषयी बोलत होता? “ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?” असे शीर्षक असलेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे, येशूने पिढी असे जे म्हटले होते ते दुष्ट लोकांच्या संदर्भात नव्हे, तर आपल्या शिष्यांच्या संदर्भात म्हटले होते, ज्यांचा लवकरच पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक होणार होता. * पहिल्या शतकात व आपल्या काळातही येशूचे हे अभिषिक्‍त अनुयायी त्याने सांगितलेले चिन्ह पाहून त्याचा अर्थ, म्हणजेच तो “जवळ, दाराशीच, आहे” हे ओळखणार होते.

१४ या स्पष्टीकरणाचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? “ही पिढी” किती मोठी असेल हे आपण अचूकपणे सांगू शकत नसलो तरी “पिढी” या शब्दाशी संबंधित असलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे: पिढी हा शब्द सहसा एका विशिष्ट कालावधीदरम्यान हयात असलेल्या वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांना सूचित करतो; ही पिढी सहसा खूप मोठी नसते; आणि तिचा अंत होईल हे निश्‍चित असते. (निर्ग. १:६) तर मग, ‘या पिढीबद्दल’ येशूने जे काही म्हटले त्याचा आपण काय अर्थ घ्यावा? येशूच्या म्हणण्याचा असा अर्थ होता, की १९१४ साली शेवटल्या काळाचे चिन्ह दिसण्यास सुरुवात झाली तेव्हा हयात असलेल्या अभिषिक्‍त जनांचे समकालीन, ज्यांपैकी काहींचा कदाचित त्यांच्या नंतर जन्म झाला असेल, पण जे त्यांच्या जीवनकाळात त्यांच्यासोबत हयात होते असे इतर अभिषिक्‍त जन मोठ्या संकटाची सुरुवात पाहतील. त्या पिढीची सुरुवात झाली व तिचा अंतही नक्कीच होणार. येशूने दिलेल्या चिन्हाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या पूर्णतेवरून, मोठे संकट जवळ असावे हे स्पष्ट आहे. तेव्हा, काळाची निकड लक्षात घेऊन व सतत जागृत राहून तुम्ही दाखवता की बायबलमधील सत्यांसंबंधी मिळणारी सुधारित समज तुम्ही स्वीकारता व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचे पालन करता.—मार्क १३:३७.

१५. सुवार्तेचा प्रचार करण्यास पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला शक्‍ती देतो?

१५ चौथा मार्ग म्हणजे, पवित्र आत्मा आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याची शक्‍ती देतो. (प्रे. कृत्ये १:८) त्याशिवाय सबंध जगभरात सुवार्तेचा प्रचार करणे कसे शक्य झाले असते? विचार करा. एके काळी अतिशय बुजऱ्‍या स्वभावामुळे किंवा भीतीमुळे ‘घरोघरचे प्रचार कार्य करणे मला कधीच जमणार नाही!’ असा तुम्ही विचार केला असेल. पण, आज त्याच कार्यात मोठ्या उत्साहाने तुम्ही सहभाग घेता. * यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांपैकी अनेकांनी छळ-विरोध होत असतानाही आपले प्रचार कार्य चालू ठेवले. केवळ देवाचा पवित्र आत्माच आपल्यासमोर येणारे मोठमोठे अडथळे पार करण्यास व स्वतःच्या बळावर केव्हाही शक्य झाले नसते ते करण्याची शक्‍ती आपल्याला देतो. (मीखा ३:८; मत्त. १७:२०) प्रचाराच्या कार्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन तुम्ही पवित्र आत्म्याशी सहकार्य करत असल्याचे दाखवता.

पवित्र आत्म्याची भविष्यातील भूमिका

१६. मोठ्या संकटादरम्यान यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करेल याची आपण खातरी का बाळगू शकतो?

१६ यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्याकरता भविष्यात पवित्र आत्म्याचा उल्लेखनीय मार्गांनी उपयोग करेल. प्रथम, यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण कसे करेल याचा विचार करा. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, प्राचीन काळी यहोवाने काही व्यक्‍तींचे व इस्राएल राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी आपल्या आत्म्याचा उपयोग केला होता. तेव्हा, येणाऱ्‍या मोठ्या संकटातून आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी तो याच आत्म्याचा उपयोग करेल असे आपण खातरीने म्हणू शकतो. त्या वेळी यहोवा नेमके कशा प्रकारे आपले संरक्षण करेल याविषयी अंदाज बांधण्याची गरज नाही. उलट, यहोवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांकडे तो कधीच दुर्लक्ष करणार नाही व ते कोठेही असले तरीही आपल्या पवित्र आत्म्याद्वारे तो त्यांचे संरक्षण करेल या खातरीने आपण भविष्याकडे पाहू शकतो.—२ इति. १६:९; स्तो. १३९:७-१२.

१७. नवीन जगात यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा कशा प्रकारे उपयोग करेल?

१७ येणाऱ्‍या नवीन जगात यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा कशा रीतीने उपयोग करेल? त्या वेळी जी नवी पुस्तके उघडली जातील ती तयार करण्यात पवित्र आत्म्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. (प्रकटी. २०:१२) या पुस्तकांमध्ये कोणती माहिती असेल? हजार वर्षांच्या काळादरम्यान यहोवाच्या आपल्याबद्दल ज्या अपेक्षा असतील त्यांची सविस्तर माहिती त्यांत असेल. या अपेक्षा काय असतील हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे का? नक्कीच त्या नवीन जगाची आपण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत. पृथ्वी व मानवजातीसंबंधी असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा पवित्र आत्म्याचा उपयोग करेल तेव्हा जीवन किती आनंदमय असेल याची आज आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही.

१८. तुम्ही काय करण्याचा दृढनिश्‍चय केला आहे?

१८ आपण कधीही विसरू नये की, क्रमाक्रमाने उलगडत जाणारा यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल. कारण तो साध्य करण्यासाठी यहोवा विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍तीचा उपयोग करतो. देवाच्या या उद्देशात तुम्हीही सामील आहात. तेव्हा, पवित्र आत्म्याच्या साहाय्यासाठी यहोवाला प्रार्थना करत राहण्याचा व त्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत राहण्याचा दृढनिश्‍चय करा. (लूक ११:१३) मग, यहोवाने मानवांसाठी उद्देशिलेले जीवन अर्थात नंदनवन पृथ्वीवर अनंतकाळचे जीवन जगण्याची आशा तुम्ही करू शकता.

[तळटीपा]

^ परि. 13 टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २००८, पृष्ठे २१-२५ पाहा.

^ परि. 15 आपल्या बुजऱ्‍या स्वभावावर मात करून सेवाकार्यात उत्साहाने सहभाग घेतलेल्या एकाचे उदाहरण टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९३, पृष्ठ ३१ वर पाहा.

तुम्हाला आठवते का?

• आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाने प्राचीन काळी पवित्र आत्म्याचा कशा प्रकारे उपयोग केला?

• आज यहोवा आपल्या आत्म्याचा कसा उपयोग करत आहे?

• आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा भविष्यात कशा प्रकारे पवित्र आत्म्याचा उपयोग करेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चौकट]

“बायबलमधील सत्यांसंबंधी अलीकडे मिळालेली सुधारित स्पष्टीकरणे तुमच्या लक्षात आहेत का?”

आजही यहोवा बायबलच्या सत्यांसंबंधी सुधारित समज प्रकट करत आहे. आजपर्यंत टेहळणी बुरूज अंकांत प्रकाशित झालेली काही सुधारित स्पष्टीकरणे कोणती आहेत?

▪ येशूने सांगितलेल्या खमिराच्या दृष्टान्तावरून आध्यात्मिक वाढीसंबंधी कोणती गोष्ट स्पष्ट होते? (मत्त. १३:३३)—जुलै १५, २००८, पृष्ठे १९-२०.

▪ यहोवाची उपासना “आत्म्याने” करण्याचा काय अर्थ होतो? (योहा. ४:२४)—जुलै १५, २००२, पृष्ठ १५.

▪ मोठा लोकसमुदाय मंदिराच्या कोणत्या अंगणात सेवा करतो? (प्रकटी. ७:१५)—मे १, २००२, पृष्ठे ३०-३१.

▪ शेरडे व मेंढरे यांना केव्हा वेगळे केले जाते? (मत्त. २५:३१-३३)—ऑक्टोबर १५, १९९५, पृष्ठे १८-२८.