व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजारी कुटुंबीयाची काळजी घेत असताना आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहा

आजारी कुटुंबीयाची काळजी घेत असताना आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहा

आजारी कुटुंबीयाची काळजी घेत असताना आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहा

किम नावाच्या एका साक्षीदार बहिणीच्या पाठीच्या कण्याजवळ एक गाठ आली होती. ती गाठ कर्करोगाची असल्याचे निदानानंतर समजले. * तिचे पती स्टीव म्हणतात: “शस्त्रक्रियेद्वारे ती गाठ काढून टाकल्यानंतर, तिच्यावर रेडिओथेरपी व केमोथेरपीचे उपचार करण्यात आले. याच्या दुष्परिणामांमुळे ती खूप अशक्‍त झाली. आणि तिच्या हालचाली खूप कमी झाल्या.”

या आजारामुळे आपल्या प्रिय पत्नीला खंगत जाताना पाहणे स्टीवसाठी किती वेदनादायक होते याची तुम्ही कल्पना करू शकता का? कदाचित तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्‍तीला गंभीर स्वरूपाचा आजार झाला असेल किंवा वयोमानामुळे तिची प्रकृती खालावली असेल. (उप. १२:१-७) असे असल्यास, त्या व्यक्‍तीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी, तुम्हाला स्वतःची देखील काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आध्यात्मिक रीत्या कमजोर झाल्यास, याचा तुमच्या भावनिक व शारीरिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होईल आणि त्यामुळे आजारी असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्‍तीची काळजी घेणे तुम्हाला शक्य होणार नाही. कुटुंबातील आजारी किंवा वृद्ध व्यक्‍तीची काळजी घेत असताना तुम्ही आध्यात्मिक संतुलन कशा प्रकारे टिकवून ठेवू शकता? आजारी असलेल्यांना आधार देण्याच्या बाबतीत ख्रिस्ती मंडळीतील इतर सदस्य काय करू शकतात?

कसे टिकवता येईल संतुलन?

आजारी असलेल्या प्रिय व्यक्‍तीची काळजी घेत असताना, स्वतःचे आध्यात्मिक संतुलन व शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आपल्या वेळेचा व शक्‍तीचा विचारपूर्वक उपयोग करणे गरजेचे आहे. नीतिसूत्रे ११:२ यात असे म्हटले आहे: “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” या विशिष्ट संदर्भात, “नम्र” या शब्दाचा अर्थ आपल्या मर्यादांची जाणीव बाळगणे असा होतो. तेव्हा, तुम्ही आपल्या आवाक्याबाहेर जाऊन तर श्रम घेत नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी, तुमच्या वेळापत्रकाचा आणि जबाबदाऱ्‍यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

स्टीव यांनी आपल्या जबाबदाऱ्‍यांवर पुनर्विचार करण्याद्वारे सुज्ञता व नम्रता दाखवली. नोकरी करण्यासोबतच, ते यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय मंडळीत वडील वर्गाचे संयोजक आणि सेवा पर्यवेक्षक या नात्याने सेवा करत होते. त्याशिवाय, ते आपल्या क्षेत्रातील इस्पितळ सल्लागार समितीचे सदस्य देखील होते. स्टीव म्हणतात: “मी किमकडे दुर्लक्ष करून आपल्या जबाबदाऱ्‍यांकडेच जास्त लक्ष पुरवत आहे अशी तक्रार तिने कधीच केली नाही. पण, मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करत आहे हे मला स्वतःलाच जाणवले.” स्टीव यांनी ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळली? ते म्हणतात: “प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर, संयोजक या नात्याने सेवा करण्याची आपली जबाबदारी त्यागण्याचा मी निर्णय घेतला. वडील या नात्याने मी अजूनही सेवा करत होतो, पण काही जबाबदाऱ्‍या इतरांवर सोपवल्याने, किमला हवा असलेला वेळ देणे व तिच्याकडे लक्ष पुरवणे मला शक्य झाले.”

कालांतराने, किमची प्रकृती थोडीफार सुधारल्यानंतर स्टीव आणि किम यांनी आपल्या परिस्थितीचा आढावा घेतला. किमच्या पाठिंब्यामुळे स्टीवला मंडळीतील पूर्वीच्या जबाबदाऱ्‍या पुन्हा एकदा स्वीकारणे शक्य झाले. स्टीव सांगतात: “किमच्या आजारामुळे आमच्यावर आलेल्या मर्यादांची जाणीव बाळगून काम करायला आम्ही दोघंही शिकलो आहोत. यहोवाने मला पुरवलेल्या मदतीसाठी आणि माझ्या पत्नीने आजारी असतानाही तक्रार न करता मला केलेल्या साहाय्याबद्दल मी खूप आभारी आहे.”

जेरी नावाचे एक प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी मरीया यांचेही उदाहरण विचारात घ्या. आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याकरता त्यांना आपल्या ध्येयांमध्ये थोडाफार बदल करावा लागला. मरीया म्हणते: “परदेशी क्षेत्रात मिशनरी सेवा करण्याचं आम्हा दोघांचं ध्येय होतं. पण, जेरी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी साहजिकच त्याच्यावर होती. त्यांची देखभाल करता यावी म्हणून आम्ही आयर्लंडमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे, जेरीचे वडील त्यांच्या मृत्यूआधी इस्पितळात असताना आम्हाला सतत त्यांच्याजवळ राहून त्यांची देखभाल करणं शक्य झालं. आता आम्ही दररोज जेरीच्या आईच्या संपर्कात असतो. शिवाय, आम्ही जवळपासच राहतो जेणेकरून त्यांना काही मदत हवी असल्यास ती आम्ही सहज पुरवू शकतो. जेरीच्या आई ज्या मंडळीत आहेत तेथील बांधवांनी देखील आम्हाला साहाय्य केलं, ज्यामुळे आम्हाला प्रवासी कार्यात टिकून राहणं शक्य झालं.”

इतर जण कशा प्रकारे मदत करू शकतात?

मंडळीतील वयोवृद्ध विधवांच्या कोणत्या भौतिक गरजा पूर्ण केल्या जाव्यात याबद्दल चर्चा करताना प्रेषित पौलाने असे लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” पौलाने सहख्रिस्ती बांधवांना अशी आठवण करून दिली की ते जे काही करतात ते “देवाच्या दृष्टीने मान्य” होण्याकरता त्यांनी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना आणि आजीआजोबांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. (१ तीम. ५:४, ८) तरीसुद्धा, मंडळीतील इतर जण देखील व्यावहारिक मार्गांनी साहाय्य पुरवू शकतात आणि त्यांनी तसे केलेही पाहिजे.

स्वीडनमध्ये राहणारे वयोवृद्ध पतीपत्नी हाकन आणि इंगर यांचेही उदाहरण लक्षात घ्या. हाकन म्हणतात: “माझ्या पत्नीला कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं तेव्हा आम्हा दोघांनाही धक्का बसला. इंगर आजपर्यंत निरोगी व सुदृढ होती. पण, आता आम्हाला उपचारासाठी दररोज इस्पितळात जावं लागत होतं आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळे ती दुर्बल होत चालली होती. या काळात इंगरला घरातच राहावं लागलं आणि तिची काळजी घेण्याकरता मला तिच्याजवळ राहणं आवश्‍यक होतं.” हाकन व इंगर यांना स्थानीय मंडळीने कशा प्रकारे मदत केली?

हाकन व इंगर यांना ख्रिस्ती सभांतील कार्यक्रम टेलिफोनवर ऐकता येतील अशी व्यवस्था मंडळीच्या वडिलांनी केली. यासोबतच, मंडळीतील बंधुभगिनी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचे आणि फोनवरून त्यांच्याशी बोलायचे. ते त्यांना पत्र लिहायचे, कार्ड्‌स पाठवायचे. हाकन म्हणतात: “आम्ही बंधुभगिनींचा आधार व यहोवाची मदत अनुभवली. आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी हा आधार अत्यावश्‍यक होता. आनंदाची गोष्ट म्हणजे, आता इंगरची प्रकृती सुधारली आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा राज्य सभागृहात ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणं शक्य झालं आहे.” ख्रिस्ती मंडळीचे सदस्य आजारी असलेल्यांना आणि वयोवृद्धांना होता होईल ती मदत पुरवतात, तेव्हा ते दाखवून देतात की ‘मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितात, आणि विपत्कालासाठी ते बंधु म्हणून निर्माण झालेले असतात.’—नीति. १७:१७.

यहोवा तुमच्या प्रयत्नांची कदर करतो

कुटुंबातील आजारी व्यक्‍तीची काळजी घेताना आपली दमछाक होऊ शकते हे खरे आहे. पण, दावीद राजाने लिहिल्याप्रमाणे, “जो दीनांची” म्हणजे आजारपणामुळे ज्यांची काळजी घेण्याची गरज आहे अशांची “चिंता वाहतो तो धन्य.”—स्तो. ४१:१.

आजारी असलेल्यांची काळजी घेणाऱ्‍यांना धन्य का म्हणता येईल? नीतिसूत्रे १९:१७ मध्ये असे म्हटले आहे: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” देवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या आपल्या आजारी सेवकांबद्दल तो खास काळजी व्यक्‍त करतो, आणि जे या आजारी लोकांची काळजी घेतात त्यांना अनेक आशीर्वाद देतो. आजारी असलेल्या व्यक्‍तीबद्दल स्तोत्रकर्त्या दाविदाने असे लिहिले: “तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्‍वर त्याला संभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलितोस.” (स्तो. ४१:३) आजारी व्यक्‍तीची काळजी घेणाऱ्‍यावर अचानक काही समस्या किंवा संकटे आली, तरी यहोवा नक्कीच त्याची मदत करेल अशी खातरी आपण बाळगू शकतो.

कुटुंबातील आजारी व्यक्‍तीची काळजी घेण्याकरता आपण जे काही करतो त्याची यहोवा देवाला जाणीव आहे आणि तो त्याची कदरही करतो हे जाणून घेणे किती आनंददायक आहे! अशा प्रकारची मदत पुरवण्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करावे लागत असले, तरी बायबलमधून आपल्याला आश्‍वासन मिळते की “अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.”—इब्री १३:१६.

[तळटीप]

^ परि. 2 नावे बदलण्यात आली आहेत.

[१८ पानांवरील चित्रे]

आध्यात्मिक संतुलन टिकवून ठेवा आणि इतरांची मदत स्वीकारा