व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा

आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा

आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा

एका कुशल कसरतपटूला अगदी सफाईदारपणे व चापल्याने शरीराच्या हालचाली करताना पाहणे किती आनंददायक असते! बायबल ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन देते की एक कसरतपटू ज्या प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करतो, त्याच प्रकारे त्यांनी आपली विचारशक्‍ती प्रशिक्षित केली पाहिजे.

प्रेषित पौलाने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात असे म्हटले: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना [“समजशक्‍ती,” NW] वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव [एका कसरतपटूप्रमाणे] झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.” (इब्री ५:१४) कसरतपटू ज्याप्रमाणे आपले स्नायू बळकट करण्यासाठी कसरत करतो, त्याचप्रमाणे इब्री ख्रिश्‍चनांनी आपली विचारशक्‍ती प्रशिक्षित केली पाहिजे असा सल्ला पौलाने त्यांना का दिला होता? आज आपण आपली समजशक्‍ती कशा प्रकारे प्रशिक्षित करू शकतो?

“तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता”

येशू कशा प्रकारे “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक” आहे हे स्पष्ट करताना पौलाने लिहिले: “ह्‍याविषयी [येशूविषयी] आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे; ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहा. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्‍न चालत नाही, असे तुम्ही झाला आहा.”—इब्री ५:१०-१२.

यावरून असे दिसते की पहिल्या शतकात, ख्रिश्‍चन बनलेल्या यहुद्यांपैकी काहींनी आपली समजशक्‍ती वाढवून आध्यात्मिक उन्‍नती केली नव्हती. उदाहरणार्थ, नियमशास्त्र आणि सुंता यावर जे सुधारित स्पष्टीकरण देण्यात आले होते ते स्वीकारणे त्यांना फार कठीण वाटले. (प्रे. कृत्ये १५:१, २, २७-२९; गलती. २:११-१४; ६:१२, १३) काहींना साप्ताहिक शब्बाथ आणि वार्षिक प्रायश्‍चित्ताचा दिवस यांसंबधी पूर्वापार चालत आलेल्या प्रथा सोडून देणे अवघड वाटले. (कलस्सै. २:१६, १७; इब्री ९:१-१४) म्हणूनच, पौलाने त्यांना चांगले व वाईट यांतील फरक समजून घेण्यासाठी आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करण्याचे प्रोत्साहन दिले आणि ‘प्रौढतेप्रत जाण्यास’ सांगितले. (इब्री ६:१, २) त्याचा सल्ला ऐकून काहींना, ते आपल्या विचारशक्‍तीचा वापर कशा प्रकारे करत आहेत याचे परीक्षण करण्याची आणि आध्यात्मिक प्रगती करण्याची नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. आज आपल्याबद्दल काय?

समजशक्‍ती प्रशिक्षित करा

आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ बनण्याच्या उद्देशाने आपण आपली समजशक्‍ती कशा प्रकारे प्रशिक्षित करू शकतो? पौलाने म्हटले, “वहिवाटीने.” ज्याप्रमाणे, दिसण्यास सुंदर पण करायला अवघड असलेल्या हालचाली करण्यासाठी एक कसरतपटू व्यायामाद्वारे आपले स्नायू व शरीर बळकट करतो, त्याचप्रमाणे आपणही चांगले व वाईट यांतील फरक समजून घेण्यासाठी आपली विचारशक्‍ती प्रशिक्षित केली पाहिजे.

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचाराचे रोगनिदान साहाय्यक प्राध्यापक जॉन रेटी म्हणतात: “व्यायाम हा तुमच्या मेंदूसाठी सगळ्यात उत्तम आहे.” जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठातील, सेंटर ऑन एजिंग, हेल्थ आणि ह्‍युमॅनिटीजचे संचालक जीन कोहेन यांच्यानुसार, “मेंदूला ताण दिल्याने मेंदूतील पेशींना नवीन डेंड्राइट्‌स (पेशीचा फांदीसारखा दिसणारा भाग) फुटतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात सिनॅप्सेस किंवा संपर्क बिंदू तयार होतात.”

तेव्हा, आपण आपली विचारशक्‍ती प्रशिक्षित करून देवाच्या वचनाच्या ज्ञानात वाढत जाणे सुज्ञपणाचे ठरेल. असे केल्याने, देवाच्या ‘परिपूर्ण इच्छेनुसार’ वागण्यास आपण अधिक सुसज्ज होऊ.—रोम. १२:१, २.

‘जड अन्‍नाची’ लालसा विकसित करा

‘प्रौढतेप्रत जाण्याची’ आपली इच्छा असल्यास, आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारण्याची गरज आहे: ‘बायबल सत्यांविषयीची माझी समज दिवसेंदिवस वाढत आहे का? मी आध्यात्मिक रीत्या प्रौढ आहे असे इतरांना माझ्याबद्दल वाटते का?’ बाळ लहान असते तेव्हा त्याची आई मोठ्या आनंदाने त्याला दूध व शिशू आहार भरवत असते. पण, मोठे झाल्यानंतरही मूल जड अन्‍न न घेता हाच आहार घेत असेल तर त्याच्या आईला किती चिंता वाटेल याचा विचार करा. त्याच प्रकारे, आपण ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो, ते समर्पण व बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करतात तेव्हा आपल्यालाही नक्कीच आनंद होतो. पण, त्यानंतर त्यांनी प्रगती करण्याची काहीच लक्षणे दाखवली नाही तर आपल्याला कसे वाटेल? खरोखरच खूप वाईट वाटेल. (१ करिंथ. ३:१-४) नुकताच बाप्तिस्मा घेतलेल्या आपल्या विद्यार्थ्याने प्रगती करून कालांतराने स्वतः शिक्षक व्हावे अशी त्याच्या शिक्षकाची इच्छा असते.

आपल्या समजशक्‍तीचा उपयोग करून एखाद्या गोष्टीबद्दल तर्क करण्यासाठी मनन करण्याची गरज असते आणि त्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे. (स्तो. १:१-३) तेव्हा, टीव्ही पाहणे किंवा डोक्याला जास्त ताण देण्याची गरज पडत नाही अशा प्रकारचे छंद जोपासणे यांसारख्या विकर्षणांना आपण चांगल्या गोष्टींवर मनन करण्याच्या आड येऊ देऊ नये. आपली विचारशक्‍ती वाढवण्यासाठी बायबलचा, तसेच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ मिळणाऱ्‍या प्रकाशनांचा अभ्यास करण्याची लालसा उत्पन्‍न करणे व ती तृप्त करणे अत्यावश्‍यक आहे. (मत्त. २४:४५-४७) नियमितपणे वैयक्‍तिक बायबल वाचन करण्याव्यतिरिक्‍त आपण कौटुंबिक उपासनेसाठी व बायबलच्या निरनिराळ्या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी देखील वेळ काढला पाहिजे.

मेक्सिकोतील केरोनीमो नावाचे एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणतात की टेहळणी बुरूजचा प्रत्येक अंक हाती पडताच ते त्याचा अभ्यास करतात. आपल्या पत्नीसोबत अभ्यास करण्यासाठी देखील ते वेळ काढतात. केरोनीमो म्हणतात, “दोघं मिळून दररोज बायबलचं वाचन करण्याची आमची सवय आहे, आणि अभ्यासासाठी आम्ही ‘उत्तम देश’ (इंग्रजी) माहितीपत्रकासारख्या साहित्यांचा उपयोग करतो.” रोनल्ड नावाचा एक ख्रिस्ती म्हणतो की मंडळीच्या वाचनासाठी बायबलचा नेमून दिलेला भाग तो नेहमी वाचतो. त्याने वैयक्‍तिक अभ्यासासाठी दीर्घ पल्ल्याचे एक-दोन उपक्रम देखील हाती घेतले आहेत. “या उपक्रमांमुळे मी पुढच्या अभ्यासाची उत्सुकतेने वाट पाहतो,” असे रोनल्ड म्हणतो.

आपल्याबद्दल काय? बायबल अभ्यास करण्यासाठी आणि देवाच्या वचनावर मनन करण्यासाठी आपण पुरेसा वेळ देत आहोत का? आपण आपली विचारशक्‍ती प्रशिक्षित करून शास्त्रवचनांवर आधारित तत्त्वांनुसार निर्णय घेण्याच्या बाबतीत अनुभव प्राप्त करत आहोत का? (नीति. २:१-७) तर मग, चांगले व वाईट यांतील फरक समजून घेण्यास ज्यांना आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करण्याचे ज्ञान व बुद्धी मिळाली आहे अशा आध्यात्मिक प्रौढांसारखे बनण्याचे ध्येय आपण ठेवू या!

[२३ पानांवरील चित्र]

आपण आपली विचारशक्‍ती “वहिवाटीने” प्रशिक्षित करतो