व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका

यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका

यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका

“देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका, . . . तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा.”—इफिस. ४:३०.

१. यहोवाने लक्षावधी लोकांसाठी काय केले आहे, आणि त्यांचे काय कर्तव्य आहे?

 सध्याच्या संकटमय जगात राहणाऱ्‍या लाखो लोकांसाठी यहोवाने एक अतिशय विलक्षण गोष्ट केली आहे. ती म्हणजे, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राद्वारे अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना आपल्याजवळ येण्याची संधी दिली आहे. (योहा. ६:४४) तुम्ही देवाचे समर्पित सेवक असल्यास व आपल्या समर्पणानुसार जीवन जगत असल्यास त्या लक्षावधी लोकांपैकी तुम्ही देखील एक आहात. तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याच्या नावाने झाला आहे. त्याअर्थी त्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे हे तुमचे कर्तव्य आहे.—मत्त. २८:१९.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

आपण “आत्म्यासाठी पेरतो” आणि त्यामुळे आपण नवे व्यक्‍तिमत्त्व धारण करतो. (गलती. ६:८; इफिस. ४:१७-२४) असे असले तरी आपण देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नये असा सल्ला व ताकीद प्रेषित पौल आपल्याला देतो. (इफिसकर ४:२५-३२ वाचा.) त्याने दिलेल्या या सल्ल्याचे आता आपण बारकाईने परीक्षण करू या. देवाच्या आत्म्याला खिन्‍न करू नका असे पौलाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो? यहोवाला समर्पण केलेल्या व्यक्‍तीच्या हातूनही असे घडू शकते का? आपल्यामुळे यहोवाचा आत्मा खिन्‍न होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

पौलाच्या सल्ल्याचा अर्थ

३. इफिसकर ४:३० मधील शब्दांचा काय अर्थ होतो ते स्पष्ट करून सांगा.

आपण प्रथम इफिसकर ४:३० मधील पौलाच्या शब्दांकडे लक्ष देऊ. त्यात पौलाने म्हटले: “देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्‍तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा.” आपल्या बांधवांनी त्यांचा यहोवासोबत असलेला मौल्यवान नातेसंबंध धोक्यात घालू नये असे पौलाला मनापासून वाटत होते. कारण यहोवाच्या आत्म्याद्वारे त्यांना ‘खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्‍तीच्या दिवसापर्यंत मुद्रित’ करण्यात आले होते. देवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍या या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी देवाचा पवित्र आत्मा, भावी आशीर्वादांचा शिक्का किंवा “विसार” होता आणि आजही आहे. (२ करिंथ. १:२२) त्यांच्यावर शिक्का मारण्यात आला याचा अर्थ, ते देवाच्या मालकीचे असून त्यांना पुढे स्वर्गीय जीवनाचे प्रतिफळ मिळेल. ज्यांच्यावर शेवटचा शिक्का मारण्यात येतो त्यांची संख्या १,४४,००० इतकी आहे.—प्रकटी. ७:२-४.

४. देवाच्या आत्म्याला खिन्‍न न करण्याची खबरदारी आपण का बाळगली पाहिजे?

एक ख्रिस्ती व्यक्‍ती देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करते तेव्हा ती, तिच्या जीवनातील देवाच्या क्रियाशील शक्‍तीचा प्रभाव प्रथम काही प्रमाणात, आणि नंतर पूर्णपणेही गमावू शकते. असे घडण्याची शक्यता आहे ही गोष्ट दाविदाने बथशेबासोबत केलेल्या पापानंतर जे उद्‌गार काढले त्यांवरून सिद्ध होते. दाविदाने अगदी पश्‍चात्तापी अंतःकरणाने यहोवाला कळकळीची याचना केली: “तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” (स्तो. ५१:११) अभिषिक्‍त जनांपैकी जे ‘मरेपर्यंत विश्‍वासू राहतात’ केवळ अशांनाच स्वर्गातील अमर “जीवनाचा मुगूट” बहाल केला जातो. (प्रकटी. २:१०; १ करिंथ. १५:५३) तसेच, ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे अशा ख्रिश्‍चनांना देखील शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहण्यासाठी व ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर मिळणारे जीवनाचे प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी पवित्र आत्म्याची नितांत गरज आहे. (योहा. ३:३६; रोम. ५:८; ६:२३) तेव्हा, यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न न करण्याची खबरदारी आपण सर्वांनीच बाळगली पाहिजे.

ख्रिस्ती व्यक्‍तीकडून आत्मा कसा खिन्‍न होऊ शकतो?

५, ६. एका ख्रिस्ती व्यक्‍तीकडून यहोवाचा आत्मा कसा खिन्‍न होऊ शकतो?

देवाचे समर्पित सेवक असल्यामुळे आपल्याकडून पवित्र आत्मा खिन्‍न होऊ नये म्हणून आपण दक्षता घेऊ शकतो. पण, त्यासाठी आपण ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालले व जगले’ पाहिजे. कारण असे केल्याने आपण देहवासनांना बळी पडणार नाही व आपल्या जीवनात वाईट गुण प्रदर्शित करणार नाही. (गलती. ५:१६, २५, २६) पण, परिस्थिती बदलूही शकते. उदाहरणार्थ, देव कोणत्या प्रकारचे वर्तन अनुचित समजतो हे आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेल्या त्याच्या वचनात स्पष्टपणे सांगितले आहे. पण, अशा अनुचित वर्तनाकडे आपण अगदी नकळतपणे वाहवत जातो तेव्हा काही प्रमाणात आपल्याकडून देवाचा आत्मा खिन्‍न होण्याची शक्यता आहे.

आपण नेहमीच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या विरोधात कार्य केल्यास आपण आत्म्याला व त्याचा उगम असलेल्या यहोवाला खिन्‍न करतो. पण, इफिसकर ४:२५-३२ या वचनांचे परीक्षण केल्याने आपण कशा प्रकारचे आचरण राखले पाहिजे हे आपल्याला समजेल. तसेच, देवाच्या आत्म्याला खिन्‍न करण्याचे टाळणे आपल्याला शक्य होईल.

आत्म्याला खिन्‍न करण्याचे कसे टाळता येईल?

७, ८. आपले वागणेबोलणे नेहमी खरे का असले पाहिजे?

आपले वागणेबोलणे नेहमी खरे असले पाहिजे. इफिसकर ४:२५ मध्ये पौलाने म्हटले: “म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो.” आपण सर्व “एकमेकांचे अवयव” असल्यामुळे आपण एकच आहोत. तेव्हा, आपण केव्हाही धूर्तपणे वागू नये अथवा जाणूनबुजून आपल्या बांधवांची फसवणूक करू नये. कारण असे करणे त्यांच्याशी खोटे बोलण्यासारखेच आहे. आणि एक व्यक्‍ती सातत्याने असे वागते तेव्हा ती देवासोबतचा आपला नातेसंबंध गमावून बसते.—नीतिसूत्रे ३:३२ वाचा.

धूर्तपणे बोलल्यामुळे किंवा वागल्यामुळे मंडळीतील एकतेला तडा जाऊ शकतो. तेव्हा, आपण दानीएल संदेष्ट्यासारखे विश्‍वासू असले पाहिजे ज्याच्यामध्ये लोकांना कोणताही दोष आढळला नाही. (दानी. ६:४) तसेच, स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्या ख्रिश्‍चनांना पौलाने जो सल्ला दिला होता तो देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याने त्यांना म्हटले, की ‘ख्रिस्ताच्या शरीराचा’ प्रत्येक अवयव अर्थात प्रत्येक अभिषिक्‍त सदस्य इतर अभिषिक्‍त सदस्यांशी जुळलेला आहे. त्याअर्थी, येशूचे खरे अभिषिक्‍त अनुयायी या नात्याने त्यांनी ऐक्याने राहिले पाहिजे. (इफिस. ४:११, १२) आपल्याला पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची इच्छा असल्यास, आपणही एकमेकांशी नेहमी खरे बोलले पाहिजे. असे केल्याने, आपल्या विश्‍वव्यापी बंधुसमाजातील एकतेला आपण हातभार लावू.

९. इफिसकर ४:२६, २७ मधील सल्ल्याचे पालन करणे का महत्त्वाचे आहे?

दियाबलाला आपले आध्यात्मिक नुकसान करण्याची संधी मिळू नये म्हणून आपण त्याचा विरोध केला पाहिजे. (याको. ४:७) पवित्र आत्मा आपल्याला सैतानाचा प्रतिकार करण्यास साहाय्य करतो. उदाहरणार्थ, आपल्या रागावर ताबा ठेवल्याने सैतानाचा प्रतिकार करणे आपल्याला शक्य होईल. पौलाने म्हटले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) काही वाजवी कारणामुळे आपल्याला कधी राग आलाच तर लगेच मनातल्या मनात प्रार्थना केल्याने आपल्याला ‘शांत वृत्ती’ बाळगण्यास अर्थात रागाच्या भरात अनुचितपणे वागून देवाच्या आत्म्याला खिन्‍न करण्याऐवजी संयम राखण्यास मदत मिळेल. (नीति. १७:२७) तेव्हा, मनात राग बाळगण्याद्वारे आपण केव्हाही सैतानाला आपल्या हातून काही गैरकृत्य घडवून आणण्याची संधी देऊ नये. (स्तो. ३७:८, ९) सैतानाचा प्रतिकार करण्याचा एक मार्ग म्हणजे येशूने दिलेल्या सल्ल्यानुसार लवकरात लवकर आपसातील मतभेद मिटवून टाकणे.—मत्त. ५:२३, २४; १८:१५-१७.

१०, ११. आपण चोरी का करू नये किंवा अप्रामाणिकपणे का वागू नये?

१० आपण चोरी करण्याच्या किंवा अप्रामाणिकपणे वागण्याच्या मोहाला बळी पडू नये. चोरीविषयी बोलताना पौलाने लिहिले: “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.” (इफिस. ४:२८) एक समर्पित ख्रिस्ती व्यक्‍ती चोरी करते तेव्हा खरेतर ती “देवाच्या नामाची निंदा” करून त्याचे नाव कलंकित करते. (नीति. ३०:७-९) आपण गरीब आहोत, तेव्हा चोरी करण्यात काहीच गैर नाही असे मुळीच समजू नये. देवावर व आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करणारे लोक चोरी करणे योग्य आहे असे कधीही मानणार नाहीत.—मार्क १२:२८-३१.

११ आपण काय करू नये इतकेच पौल आपल्याला सांगत नाही. तर आपण काय केले पाहिजे हे देखील तो आपल्याला सांगतो. आपण आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जगण्याचा व चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करता यावे, तसेच “गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून” आपण स्वतः कष्ट करू. (१ तीम. ५:८) गरिबांची मदत करण्यासाठी येशूने व त्याच्या प्रेषितांनी देखील काही निधी राखून ठेवला होता. पण, येशूचा विश्‍वासघात करणाऱ्‍या यहूदा इस्कर्योतने त्यातील काही पैसे चोरले. (योहा. १२:४-६) तो नक्कीच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जगत नव्हता. आपण मात्र देवाच्या मार्गदर्शनानुसार जगण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पौलाप्रमाणे आपणही ‘सर्व बाबतीत चांगले वागले’ पाहिजे. (इब्री १३:१८) आपण असे वागतो तेव्हा यहोवाच्या आत्म्याला खिन्‍न करण्याचे टाळतो.

आत्म्याला खिन्‍न न करण्याचे इतर मार्ग

१२, १३. (क) इफिसकर ४:२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे कशा प्रकारचे बोलणे आपण टाळले पाहिजे? (ख) आपले बोलणे नेहमी कसे असले पाहिजे?

१२ आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. पौलाने म्हटले: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिस. ४:२९) पुन्हा एकदा पौल आपल्याला, काय करू नये एवढेच सांगत नाही, तर काय केले पाहिजे हे देखील सांगतो. देवाच्या आत्म्याचा प्रभाव आपल्यावर असेल तर आपण इतरांशी अशा प्रकारे बोलू ज्यामुळे त्यांची उन्‍नती होईल व त्याद्वारे त्यांना कृपादान प्राप्त होईल. तसेच, आपल्या मुखातून कसलेच “कुजके भाषण” निघू नये. “कुजके” या शब्दासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द सडलेली फळे, मासे किंवा मांस यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. असे नासलेले अन्‍नपदार्थ पाहून आपल्याला किळस वाटते तितकेच किळसवाणे, यहोवाच्या दृष्टीने वाईट असलेले बोलणे आपल्याला वाटले पाहिजे.

१३ आपले बोलणे नेहमी “मिठाने रुचकर केल्यासारखे” म्हणजे सभ्य व प्रेमळ असले पाहिजे. (कलस्सै. ३:८-१०; ४:६) आपल्या बोलण्यावरून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे लोकांच्या लगेच लक्षात आले पाहिजे. तेव्हा, इतरांची ‘उन्‍नती’ होईल अशा प्रकारे बोलण्याद्वारे आपण त्यांची मदत करू या. आणि आपल्या भावना देखील स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असल्या पाहिजेत, ज्याने म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.”—स्तो. १९:१४.

१४. इफिसकर ४:३०, ३१ या वचनांनुसार आपण कोणत्या गोष्टींना आपल्या जीवनात थारा देऊ नये?

१४ कडूपण, क्रोध, निंदानालस्ती व दुष्टाई या गोष्टींना आपण आपल्या जीवनात थारा देऊ नये. देवाच्या आत्म्याला खिन्‍न न करण्याची ताकीद दिल्यानंतर पौलाने म्हटले: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिस. ४:३०, ३१) आपण सर्व अपरिपूर्ण आहोत, त्यामुळे आपल्या आचारविचारांवर ताबा ठेवण्यासाठी आपण सर्वांनीच पराकाष्ठेचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनात आपण ‘कडूपण, संताप व क्रोध’ या गोष्टींना थारा दिल्यास आपल्याकडून देवाचा आत्मा खिन्‍न होऊ शकतो. तसेच, इतरांनी आपल्याविरुद्ध काही वाईट केल्यास आपण त्याचा हिशोब ठेवतो, मनात अढी बाळगतो किंवा आपले मन दुखावणाऱ्‍याशी समेट करण्यास तयार नसतो, तेव्हा देखील आपण आत्म्याला खिन्‍न करतो. बायबलच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची नुसती सुरुवात जरी आपण केली, तरी आत्म्याच्या विरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करणारी लक्षणे आपल्यात निर्माण होऊन त्याचे भयंकर परिणाम कदाचित आपल्याला पुढे भोगावे लागतील.

१५. कोणी आपले काही वाईट केल्यास आपण काय केले पाहिजे?

१५ आपण नेहमी उपकारी, कनवाळू व क्षमाशील असले पाहिजे. याविषयी लिहिताना पौलाने म्हटले: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिस. ४:३२) एखाद्याने आपले मन खूप दुखावले असले तरी देवासारखाच मनाचा मोठेपणा दाखवून आपण त्याला क्षमा करू या. (लूक ११:४) समजा, मंडळीतील एखाद्या बांधवाने आपल्या पाठीमागे आपल्याविषयी काही भलेबुरे बोलले आहे. तो विषय मिटवण्यासाठी आपण त्याच्याशी जाऊन बोलतो. त्याने आपल्याविषयी जे काही बोलले आहे त्याबद्दल त्याला खूप पस्तावा होतो व घडल्या प्रकाराबद्दल तो आपल्याला क्षमा मागतो. आपणही त्याला क्षमा करतो. पण, एवढेच पुरेसे नाही. लेवीय १९:१८ आपल्याला सल्ला देते: “सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर; मी परमेश्‍वर आहे.”

सावधगिरी बाळगणे अत्यावश्‍यक

१६. यहोवाचा आत्मा खिन्‍न होऊ नये म्हणून आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करावे लागू शकतात याचे एक उदाहरण द्या.

१६ आपण एकटे असतो तेव्हा देखील देवाचे मन दुखावले जाईल असे कृत्य करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादा बांधव खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता योग्य नसलेले संगीत ऐकत असेल. काही काळानंतर मात्र, “विश्‍वासू व बुद्धिमान दास” ख्रिस्ती प्रकाशनांतून देत असलेल्या बायबल आधारित सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्याचे मन त्याला खाऊ लागते. (मत्त. २४:४५) याबद्दल तो कदाचित प्रार्थना करेल आणि इफिसकर ४:३० मधील पौलाच्या शब्दांवर विचार करेल. देवाच्या आत्म्याला खिन्‍न न करण्याच्या त्याच्या निश्‍चयामुळे अशा प्रकारचे संगीत पुन्हा न ऐकण्याचा तो ठाम निर्धार करतो. त्याने हे प्रयत्न केल्याबद्दल यहोवा नक्कीच त्याला आशीर्वाद देईल. तेव्हा, देवाच्या आत्म्याला खिन्‍न न करण्याची आपण नेहमी खबरदारी बाळगू या.

१७. आपण सावधगिरी बाळगली नाही व नियमितपणे प्रार्थना केली नाही तर काय होण्याची शक्यता आहे?

१७ आपण खबरदारी बाळगली नाही व नियमितपणे प्रार्थना केली नाही तर एखादे अशुद्ध किंवा अनुचित कृत्य करण्याच्या मोहाला आपण सहज बळी पडून देवाच्या आत्म्याला खिन्‍न करू शकतो. पवित्र आत्मा आपल्या स्वर्गीय पित्याचे व्यक्‍तिमत्त्व प्रदर्शित करणारे गुण उत्पन्‍न करत असल्यामुळे, आपण पवित्र आत्म्याला खिन्‍न करतो तेव्हा खरेतर, आपण यहोवाला खिन्‍न किंवा दुःखी करत असतो. आणि आपल्यापैकी कोणीही हा दोष स्वतःवर ओढवून घेऊ इच्छिणार नाही. (इफिस. ४:३०) पहिल्या शतकातील यहुदी शास्त्र्यांनी, येशूने केलेल्या चमत्कारांचे श्रेय सैतानाला देण्याचे पाप केले होते. (मार्क ३:२२-३० वाचा.) ख्रिस्ताच्या या शत्रूंनी “पवित्र आत्म्याची निंदा” केली आणि परिणामस्वरूप अक्षम्य पाप केले. आपल्या हातून असे कदापि होऊ नये!

१८. आपण अक्षम्य पाप केले नाही हे आपल्याला कसे ठरवता येईल?

१८ अक्षम्य पाप करण्याचा विचारसुद्धा आपण मनात आणू इच्छित नसल्यामुळे, आत्म्याला खिन्‍न करण्याच्या बाबतीत पौलाने जी ताकीद दिली होती ती आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे. पण, आपल्या हातून गंभीर स्वरूपाचे पाप घडल्यास काय? आपण मनापासून पश्‍चात्ताप केला असेल आणि मंडळीतील वडिलांची मदत घेतली असेल, तर देवाने आपल्याला क्षमा केली आहे व आपण पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केलेले नाही असे आपण मानू शकतो. आणि देवाच्या आत्म्याला कोणत्याही प्रकारे पुन्हा खिन्‍न करण्याचे टाळण्यास देखील देव आपल्याला मदत करेल.

१९, २०. (क) आपण कोणत्या काही गोष्टी टाळल्या पाहिजेत? (ख) आपण काय करण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे?

१९ देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्या लोकांमध्ये प्रेम, आनंद व एकता यांसारख्या गुणांना प्रोत्साहन देतो. (स्तो. १३३:१-३) तेव्हा, एखाद्याचे नुकसान करण्याच्या हेतूने चहाडी करण्याचे किंवा मंडळीत पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केलेल्या वडिलांचा अपमान होईल अशा प्रकारे त्यांच्याविषयी बोलण्याचे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. (प्रे. कृत्ये २०:२८; यहू. ८) त्याऐवजी आपल्या बंधुभगिनींमध्ये एकतेची व आदराची भावना रुजवण्यास आपण प्रयत्नशील असले पाहिजे. ख्रिस्ती मंडळीत आपापले गट निर्माण करून आपण केव्हाही गटबाजीला चालना देऊ नये. पौलाने लिहिले: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करितो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—१ करिंथ. १:१०.

२० आपल्याकडून यहोवाचा पवित्र आत्मा खिन्‍न होऊ नये म्हणून आपली मदत करण्यास तो सदैव तयार आहे व समर्थही आहे. तेव्हा, पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी आपण सतत प्रार्थना करण्याचा व त्यास खिन्‍न न करण्याचा निश्‍चय करू या. नेहमी ‘आत्म्यासाठी पेरत राहून’ आपण आता आणि पुढेही, सदासर्वकाळ मनापासून त्याचे मार्गदर्शन स्वीकारत राहू या.

तुमचे उत्तर काय असेल?

• देवाच्या आत्म्याला खिन्‍न करण्याचा काय अर्थ होतो?

• यहोवाला समर्पित असलेल्या व्यक्‍तीकडूनही देवाचा आत्मा खिन्‍न कसा होऊ शकतो?

• आपण कोणत्या मार्गांनी पवित्र आत्म्याला खिन्‍न करण्याचे टाळू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३० पानांवरील चित्र]

आपसातील मतभेद लवकरात लवकर मिटवा

[३१ पानांवरील चित्र]

तुमचे बोलणे यांपैकी कोणत्या फळांसारखे आहे?