व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वडीलधाऱ्‍यांना मान का द्यावा?

वडीलधाऱ्‍यांना मान का द्यावा?

वडीलधाऱ्‍यांना मान का द्यावा?

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर जगातील सर्वाधिक छायाचित्रित केले जाणारे एक झाड आहे. याला लोन सायप्रस असे नाव पडले आहे. या झाडाचे वय सुमारे २५० वर्षे आहे असे म्हटले जाते. इतकी वर्षे तग धरून राहिल्यामुळे या सुंदर झाडाने निरनिराळ्या मार्गांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उदाहरणार्थ, या झाडाचे संरक्षण करण्यासाठी त्याला जाड तारांचा आधार देण्यात आला आहे व त्याच्या पायथ्याशी दगडी कठडा बांधण्यात आला आहे.

लोन सायप्रस हे झाड, विलक्षण चिकाटी दाखवणाऱ्‍या आपल्यातील वृद्धांची आपल्याला आठवण करून देते. सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे हे वृद्धजन एका उल्लेखनीय मार्गाने चिकाटी दाखवतात. शेवटल्या काळात ‘वृद्ध’ देखील बायबलचा संदेश सांगतील असे योएल संदेष्ट्याने भाकीत केले होते. (योए. २:२८-३२; प्रे. कृत्ये २:१६-२१) इतरांना ‘राज्याची सुवार्ता’ शिकण्यास मदत करण्यासाठी हे वयोवृद्ध जन मनापासून प्रयत्न करतात आणि या कार्यात ते अगणित तास खर्च करतात ही खरोखर उल्लेखनीय गोष्ट आहे! (मत्त. २४:१४) यांपैकी काही वृद्ध राज्य प्रचारक, अनेक वर्षे छळसंकटे सोसूनही टिकून राहिले आहेत. अनेक वर्षे तग धरून राहिल्यामुळे एका सामान्य सायप्रस झाडाची दखल घेऊन त्यास जाड तारांचा व दगडी कठड्याचा आधार दिला जातो, तर मग आपल्या मानसन्मानास पात्र असलेल्या आपल्यातील वयोवृद्ध लोकांची दखल घेणे किती जास्त महत्त्वाचे आहे!

यहोवा देवाने त्याच्या प्राचीन लोकांना अशी आज्ञा दिली होती: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृध्दाला मान दे.” (लेवी. १९:३२) आज यहोवाच्या सेवकांमध्ये अनेक दशकांपासून देवासोबत चालत असलेल्या कितीतरी विश्‍वासू जनांची उत्तम उदाहरणे पाहायला मिळतात. (मीखा ६:८) ते बायबल तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खऱ्‍या अर्थाने त्यांचे पिकलेले केस “शोभेचा मुकुट” ठरतात.—नीति. १६:३१.

प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला सल्ला दिला: “वडील माणसाला टाकून बोलू नको.” याउलट, त्याने वडील माणसांना “बापासमान” व “वडील स्त्रियांस मातासमान” मानायचे होते. (१ तीम. ५:१, २) त्याअर्थी तीमथ्याने, ज्यांचे केस पिकलेले आहेत त्यांच्यासमोर ‘उठून उभे राहायचे’ होते. यावरून हे स्पष्टच आहे, की आपल्या वागण्याबोलण्याद्वारे आपण वडीलधाऱ्‍यांचा आदर करावा अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो.

“तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना” असे रोमकर १२:१० म्हणते. मंडळीतील पर्यवेक्षक वृद्ध बंधुभगिनींचा आदर तर करतातच पण, आपण सर्वांनी देखील एकमेकांना आदर दाखवण्यात पुढाकार घेतला पाहिजे.

अर्थात, आईवडिलांची व आजीआजोबांची देखभाल करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने कुटुंबातल्या सदस्यांची आहे. लोन सायप्रस झाडाच्या बाबतीत पाहिल्यास, त्याचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी निरनिराळे मार्ग शोधून काढले आहेत आणि अजूनही त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. तेव्हा, आपणही वृद्ध होत चाललेल्या आपल्या आईवडिलांचा व आजीआजोबांचा मानसन्मान टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण त्यांचे म्हणणे शांतचित्ताने ऐकून घेतो तेव्हा आपण आपल्याच म्हणण्यावर अडून न राहता त्यांच्या भावनांचीही दखल घेतो.—नीति. २३:२२; १ तीम. ५:४.

आपल्यातील वृद्धजन यहोवाला खूप प्रिय आहेत. तो कधीच त्यांचा त्याग करणार नाही. (स्तो. ७१:१८) त्यांना त्याची विश्‍वासूपणे सेवा करता यावी म्हणून तो त्यांना बळ देतो. तेव्हा, आपणही वडीलधाऱ्‍यांना आधार व मान देत राहू या.

[७ पानांवरील चित्रे]

लोन सायप्रस झाडाला जशी आधाराची गरज आहे, तशीच वडीलधाऱ्‍यांशी मान-सन्मानाने वागण्याची गरज आहे

[चित्राचे श्रेय]

American Spirit Images/age fotostock