व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवा मूर्तिपूजेचा निषेध करतो. मग, अहरोनाने सोन्याचे वासरू बनवले तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा का केली नाही?

निर्गमच्या ३२ व्या अध्यायातील अहवालानुसार, अहरोनाने सोन्याचे वासरू बनवले तेव्हा त्याने मूर्तिपूजेबद्दलचा देवाचा नियम मोडला. (निर्ग. २०:३-५) परिणामस्वरूप, “परमेश्‍वर अहरोनावर इतका रागावला होता की, तो त्याचा नाश करणार होता; त्या प्रसंगी त्याच्यासाठीहि [मोशेने] प्रार्थना केली.” (अनु. ९:१९, २०) नीतिमान पुरुष मोशेने अहरोनासाठी केलेली प्रार्थना “फार प्रबळ” ठरली असे म्हणता येईल का? (याको. ५:१६) होय, मोशेने केलेल्या विनंतीमुळे व कमीत कमी आणखी दोन कारणांमुळे यहोवाने मोशेच्या प्रार्थनेचे उत्तर दिले व अहरोनाला शिक्षा केली नाही असे दिसते.

यांपैकी एक कारण म्हणजे अहरोनाने अनेक वर्षे विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली होती. यहोवाने मोशेला फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्याची आज्ञा दिली, तेव्हा मोशेच्या वतीने बोलण्यासाठी यहोवाने अहरोनाला त्याच्यासोबत जाण्यास नियुक्‍त केले. (निर्ग. ४:१०-१६) हे दोघे पुरुष आज्ञाधारकपणे अनेकदा इजिप्तच्या राजाकडे गेले. असे करताना त्यांना कठोर मनाच्या फारोचा सामना करावा लागला. असे असले तरी, इजिप्तमध्ये असताना अहरोनाने यहोवाची एकनिष्ठेने व अढळपणे सेवा केली.—निर्ग. ४:२१.

तसेच, अहरोनाने सोन्याचे वासरू बनवण्याअगोदर ज्या घटना घडल्या त्याही लक्षात घ्या. मोशे ४० दिवस सीनाय पर्वतावर होता. “मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले” तेव्हा त्यांनी अहरोनाला त्यांच्यासाठी एक मूर्ती बनवण्याची गळ घातली. अहरोनाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक सोन्याचे वासरू बनवले. (निर्ग. ३२:१-६) पण, यानंतर अहरोनाने जे काही केले त्यावरून असे दिसते की त्याचा खरेतर या मूर्तिपूजेला मनापासून पाठिंबा नव्हता. त्याने बहुधा लोकांच्या दबावाला बळी पडून ती मूर्ती बनवली होती. मोशेने मूर्तिपूजेचा हा विषय निकालात काढायचे ठरवले तेव्हा लेवी वंशाच्या सर्व लोकांसह अहरोन खंबीरपणे यहोवाच्या बाजूने उभा राहिला. पण, मूर्तिपूजेसाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या तीन हजार लोकांना जिवे मारण्यात आले.—निर्ग. ३२:२५-२९.

त्यानंतर मोशेने लोकांना म्हटले: “तुम्ही हे घोर पातक केले आहे.” (निर्ग. ३२:३०) त्याअर्थी, या अपराधासाठी अहरोन एकटाच जबाबदार नव्हता. आणि यहोवाच्या अपार दयेचा केवळ त्यालाच नव्हे तर इतर लोकांनाही फायदा झाला.

सोन्याचे वासरू बनवण्याच्या या घटनेनंतर यहोवाने महायाजक म्हणून अहरोनाला नियुक्‍त करण्याची आज्ञा दिली. देवाने मोशेला म्हटले: “अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक या नात्याने माझी सेवा करील.” (निर्ग. ४०:१२, १३) यावरून स्पष्ट होते की यहोवाने अहरोनाच्या दुर्बलतेबद्दल त्याला क्षमा केली होती. मुळात, अहरोन बंडखोर मूर्तिपूजक नव्हे, तर खऱ्‍या उपासनेचा खंदा समर्थक होता.