व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुरुवातीचा ख्रिस्ती धर्म आणि रोमन देवदेवता

सुरुवातीचा ख्रिस्ती धर्म आणि रोमन देवदेवता

सुरुवातीचा ख्रिस्ती धर्म आणि रोमन देवदेवता

बिथिनीआचा राज्यपाल, प्लिनी धाकटा याने रोमन सम्राट ट्रेजन याला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले: “ख्रिस्ती असल्याचा आरोप असलेल्यांविरुद्ध मी हे धोरण अवलंबिले आहे: प्रथम, ते ख्रिस्ती आहेत का, असे मी त्यांना विचारतो. त्यांनी तसे कबूल केल्यावर त्यांना शिक्षेचा धाक दाखवून आणखी दोनतीन वेळा तोच प्रश्‍न विचारतो. ते जर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर मी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावतो.” दुसरीकडे पाहता, जे ख्रिस्ताचा धिक्कार करण्याद्वारे आणि सम्राटाच्या पुतळ्याची तसेच प्लिनीने राजवाड्यात आणलेल्या देवदेवतांच्या मूर्तींची उपासना करण्याद्वारे ख्रिस्ती धर्मावरील आपल्या विश्‍वासाचा त्याग करतात, त्यांच्याबद्दल तो लिहितो: “अशांना सोडून देणे मला योग्य वाटते.”

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी रोमन सम्राटाची व रोमच्या निरनिराळ्या देवदेवतांची उपासना करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला. पण, सबंध रोमन साम्राज्यातील इतर धर्मांबाबत काय? रोममध्ये कोणकोणत्या देवदेवतांची भक्‍ती केली जायची आणि त्यांच्याकडे पाहण्याचा रोमन लोकांचा दृष्टिकोन काय होता? रोमच्या दैवतांना बलिदान देण्यास नकार दिल्यामुळे ख्रिश्‍चनांचा छळ का करण्यात आला? या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यास, आज आपल्यासमोर निष्ठेची परीक्षा पाहणारे प्रसंग येतात तेव्हा त्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत मिळेल.

रोमन साम्राज्यातील धर्म

रोमन साम्राज्यातील भाषा व संस्कृती जितकी वैविध्यपूर्ण होती, तितकीच निरनिराळी व बहुसंख्य त्यांची दैवतेही होती. यहुदी धर्म हा रोमन लोकांना परकीय वाटत असला तरी त्यांनी त्यास रेलिग्यो लिकिटॉ अर्थात एक अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली व त्याचे संरक्षण केले. दिवसातून दोन वेळा जेरूसलेमच्या मंदिरात सीझरसाठी (कैसरासाठी) व रोमन राज्यासाठी दोन कोकरे व एक बैल अर्पण केला जायचा. या बलिदानांमुळे एक देव प्रसन्‍न होतो की अनेक याची रोमन लोकांना पर्वा नव्हती. पण, ही बलिदाने रोमन राज्याप्रती यहुदी लोकांच्या निष्ठेचे प्रतिक होती आणि त्यामुळे रोमन लोकांच्या दृष्टीने ती महत्त्वाची होती.

रोमच्या स्थानिक धर्म पंथांमध्ये निरनिराळ्या स्वरूपाची मूर्तीपूजा प्रचलित होती. ग्रीक दंतकथा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या होत्या आणि शकुन पाहणे, भविष्य सांगणे यांसारख्या गोष्टी सर्वसामान्य बनल्या होत्या. पूर्वेकडील तथाकथित गूढवादी धर्मांनी आपल्या भक्‍तांना अमर जीवनाची, देवाकडून संदेश मिळण्याची आणि गूढ विधींद्वारे देवाच्या सान्‍निध्यात येण्याची शाश्‍वती दिली. या धर्मांचा संपूर्ण रोमन साम्राज्यात प्रसार झाला. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांत इजिप्तचा देव सेरापिस व आयसिस देवी, सिरियाची मत्स्यदेवता आटारगाटिस आणि पर्शियाचा सूर्यदेव मिथ्र या देवीदेवतांचे पंथ खूप प्रचलित होते.

ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या मूर्तीपूजक वातावरणाचे स्पष्ट चित्रण बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आढळते. उदाहरणार्थ, सायप्रसच्या रोमन सुभेदाराचे एका यहुदी जादूगाराशी जवळचे संबंध होते. (प्रे. कृत्ये १३:६, ७) लुस्त्रातील लोकांना पौल व बर्णबा हे जूस व हर्मीस नावाचे ग्रीक देव असल्याचे वाटले. (प्रे. कृत्ये १४:११-१३, पं.र.भा.) फिलिप्पै येथे असताना भविष्य सांगणारी एक मुलगी पौलाला आढळली. (प्रे. कृत्ये १६:१६-१८) तर अथेन्सचे लोक ‘सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहेत’ असे पौलाने म्हटले. याच शहरात, “अज्ञात देवाला” ही अक्षरे लिहिलेली वेदीही पौलाला आढळली. (प्रे. कृत्ये १७:२२, २३) इफिसचे रहिवासी “अर्तमी देवीचे” उपासक होते. (प्रे. कृत्ये १९:१, २३, २४, ३४) मिलिता बेटावर असताना पौलाला सर्पदंश होऊनही कोणतीही इजा झाली नाही हे पाहून तो कोणी देव आहे असा लोकांनी निष्कर्ष काढला. (प्रे. कृत्ये २८:३-६) अशा मूर्तिपूजक वातावरणाचा खऱ्‍या उपासनेवर परिणाम होऊ नये म्हणून ख्रिश्‍चनांनी सावध राहणे फार जरुरीचे होते.

रोमन धर्म

रोमन साम्राज्याचा विस्तार होऊ लागला तसतशी त्यांनी नवनवीन दैवते स्वीकारली. त्यांच्या मते ही दैवते म्हणजे ते आधीपासूनच उपासना करत आलेल्या दैवतांची केवळ वेगवेगळी रूपे होती. रोमी लोकांनी पराभूत राष्ट्रांतील परकीय पंथांना नाहीसे करण्याऐवजी त्यांचा स्वीकार केला व त्यांना आपल्यात सामावून घेतले. अशा प्रकारे, रोमच्या बहुविध संस्कृतीप्रमाणेच त्यांचे धर्मही बहुविध झाले. आपल्या भक्‍तांनी केवळ एकाच देवाची उपासना करावी असा रोमी धर्मांचा आग्रह नव्हता. ते एकाच वेळी निरनिराळ्या देवदेवतांची उपासना करू शकत होते.

रोमच्या मूळ दैवतांपैकी सगळ्यात श्रेष्ठ समजला जाणारा देव म्हणजे ज्यूपिटर, ज्याला ऑप्टिमस मॅक्झिमस अर्थात सर्वश्रेष्ठ व सर्वोत्कृष्ट असेही म्हटले जायचे. हा देव वारा, पाऊस, वीज आणि मेघगर्जना यांतून प्रकट होतो असे मानले जायचे. ज्यूपिटरची बहीण व पत्नी ज्यूनो ही चंद्रदेवता असून स्त्रीजीवनाच्या सर्व अंगोपांगांशी तिचा घनिष्ठ संबंध असल्याचे समजले जायचे. त्यांची कन्या मिनर्व्हा ही हस्तकला, व्यवसाय, ललितकला व युद्ध यांची देवता होती.

रोमच्या देवदेवतांची यादी जणू न संपणारी होती. लॅरीस आणि पेनेटीस या कुटुंबदेवता होत्या. व्हेस्टा ही अग्निदेवता होती. जानस ही दोन तोंडे असलेली प्रारंभांची देवता होती. प्रत्येक व्यवसायाचे एक खास दैवत होते. इतकेच नव्हे, तर अमूर्त कल्पनांसाठी देखील रोमी लोकांची खास दैवते होती. उदाहरणार्थ, शांतीचे रक्षण करणारी पॅक्स देवता, आरोग्याची साल्यूस देवता, सभ्यतेची व चारित्र्याची देवता प्यूडीकिट्या, निष्ठेची देवता फाइडेस, शौर्याचे दैवत व्हर्च्यूस आणि सुखविलासाची देवता व्हॉलूप्टास. आपल्या सार्वजनिक व खासगी जीवनात जे काही घडते ते देवदेवतांच्या इच्छेनुसारच घडते असे रोमन लोकांचे मानणे होते. म्हणून, हाती घेतलेले कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी त्या कार्याच्या विशिष्ट दैवताला प्रार्थना विधींद्वारे, बलिदाने देण्याद्वारे व त्याच्या नावाने सण साजरे करण्याद्वारे प्रसन्‍न करणे जरुरीचे होते.

दैवतांची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी रोमन लोक शकुन पाहायचे. यांपैकी सगळ्यात मुख्य प्रथा म्हणजे बळी दिलेल्या पशूंच्या आंतरिक अवयवांचे परीक्षण करणे. हाती घेतलेल्या विशिष्ट कामाला देवांची संमती आहे की नाही हे यज्ञपशूच्या अवयवांचे स्वरूप पाहून ठरवले जायचे.

इ.स.पू. दुसऱ्‍या शतकाच्या अखेरपर्यंत रोमन लोकांची अशी समजूत झाली होती की त्यांची प्रमुख दैवते व ग्रीक देवसमूहातील काही दैवते ही एकच आहेत. जसे की ज्यूपिटर आणि जूस, ज्यूनो आणि हेरा इत्यादी. याशिवाय, ग्रीक दैवतांशी जुळलेल्या दंतकथाही रोमन लोकांनी स्वीकारल्या होत्या. या दंतकथांनी ग्रीक दैवतांचा गौरव करणे तर दूरच राहो, पण त्यांच्यातही मानवांसारखे दोष व दुर्गुण आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला. उदाहरणार्थ, जूस हा देव बलात्कार करणारा व बालसंभोगी असल्याचे चित्रित केले जायचे. आणि त्याचे मर्त्य मानवांसोबत व अलौकिक व्यक्‍तींशी लैंगिक संबंध असल्याचे म्हटले जायचे. रोमच्या देवदेवतांची अशी लज्जास्पद कृत्ये त्यांच्या प्राचीन नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित केली जायची आणि सहसा त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळायचा. अशा रीतीने या दैवतांच्या उपासकांनाही अशी हिणकस कृत्ये करण्याची जणू परवानगीच मिळायची.

पण, सगळ्याच सुशिक्षित लोकांनी या दंतकथांचा शब्दशः अर्थ घेतला नाही. काहींच्या मते त्या केवळ रूपककथा होत्या. म्हणूनच कदाचित पंतय पिलाताने “सत्य काय आहे?” असा प्रश्‍न विचारला असावा. (योहा. १८:३८) या सुप्रसिद्ध प्रश्‍नावरून “त्या काळच्या सुशिक्षित लोकांची मानसिकता लक्षात येते, अर्थात अशा गोष्टींची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे हा विचार व्यक्‍त होतो.”

सम्राट उपासना

ऑगस्टसच्या शासनकाळात (इ.स.पू. २७ ते इ.स. १४) सम्राटाची उपासना करण्याची प्रथा जन्मास आली. खासकरून पूर्वेकडील ग्रीक भाषिक प्रांतांच्या लोकांना ऑगस्टसबद्दल मनस्वी कृतज्ञता वाटत होती. याचे कारण युद्धाच्या प्रदीर्घ काळानंतर त्याने सुखशांतीचा व भरभराटीचा काळ प्रस्थापित केला होता. चिरस्थायी सुरक्षेची हमी देऊ शकेल अशी राजकीय सत्ता लोकांना हवी होती. त्यांना अशी एक यंत्रणा हवी होती जी समाजातील धार्मिक भेदभाव नाहीसे करू शकेल, राष्ट्रभक्‍तीला चेतना देऊ शकेल आणि संपूर्ण जगाला एका ‘मसीहाच्या’ वर्चस्वाखाली एकत्रित करू शकेल. या सर्व कारणांमुळे सम्राटाला देवाचा दर्जा देण्यात आला.

ऑगस्टस जिवंत होता तोपर्यंत त्याने स्वतःला देव म्हणवून घेण्याचे नाकारले असले, तरी रोमचे प्रतिक असलेल्या रोमा डेआ या देवीची उपासना केली जावी असा त्याचा आग्रह होता. ऑगस्टसच्या मृत्यूनंतर मात्र लोकांनी त्याला देवाचा दर्जा दिला. अशा रीतीने धार्मिक भावना व देशभक्‍ती, साम्राज्याचे केंद्रस्थान असलेल्या रोमवर व त्याच्या शासकांवर केंद्रित झाली. सम्राटाची उपासना करण्याची प्रथा लवकरच सर्व प्रांतांत प्रसरली आणि हा राज्याप्रती आदर व निष्ठा दाखवण्याचा एक मार्ग बनला.

लोकांनी आपल्याला देव मानावे अशी हक्काची मागणी करणारा डमिशन सम्राट (इ.स.  ८१ ते ९६) हा पहिला रोमन शासक होता. त्याच्या शासनकाळापर्यंत ख्रिश्‍चन आणि यहुदी यांच्यातला फरक रोमन लोकांना समजला होता आणि या नव्या पंथाचा ते विरोध करू लागले. बहुधा डमिशनच्या राजवटीतच “येशूविषयीची साक्ष” दिल्यामुळे प्रेषित योहानाला पात्म नावाच्या बेटावर हद्दपार करण्यात आले होते.—प्रकटी. १:९.

बंदिवासात असताना योहानाने प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले. त्यात तो अंतिपा नावाच्या एका ख्रिश्‍चनाचा उल्लेख करतो ज्याला सम्राटाच्या उपासनेचे प्रमुख केंद्र असलेल्या पर्गममध्ये जिवे मारण्यात आले. (प्रकटी. २:१२, १३) ख्रिश्‍चनांनी राजधर्माच्या विधी पाळाव्यात असा दबाव सरकारकडून त्यांच्यावर आणला जाण्यास एव्हाना सुरुवात झाली असावी. हे खरे असो अगर नसो, पण बिथिनीआतील ख्रिश्‍चनांनी या धर्मविधी पाळल्याच पाहिजेत अशी मागणी इ.स. ११२ पासून प्लिनी त्यांच्याकडून करू लागला होता. हे त्याने ट्रेजनला लिहिलेल्या पत्रावरून सूचित होते ज्याचा उल्लेख या लेखाच्या सुरुवातीला करण्यात आला आहे.

प्लिनीने अवलंबलेल्या धोरणाबद्दल ट्रेजनने त्याची प्रशंसा केली आणि रोमच्या देवदेवतांची उपासना करण्यास नकार देणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना ठार मारण्यात यावे असा हुकूम जारी केला. पण, ट्रेजनने असेही म्हटले: “जर एक व्यक्‍ती ख्रिश्‍चन असल्याचे नाकारत असेल व रोमन दैवतांची उपासना करून ही गोष्ट सिद्ध करत असेल तर तिने पश्‍चात्ताप केल्यावर तिला (पूर्वीचे सर्व आरोप रद्द करून) माफ करण्यात यावे.”

एक धर्म आपल्या सदस्यांकडून फक्‍त एकाच देवाची उपासना करण्याची अपेक्षा करू शकतो ही कल्पना रोमन लोक पचवूच शकत नव्हते. रोमची दैवते तर अशी अपेक्षा करत नव्हते, मग ख्रिश्‍चनांच्या देवाने अशी अपेक्षा का करावी? त्यांच्या मते, रोमन दैवतांची पूजा करणे हे केवळ राजकीय व्यवस्थेला मान्यता दर्शवण्याचे द्योतक होते. तेव्हा, त्यांची उपासना करण्यास नकार देण्याचा अर्थ राजद्रोह करण्यासारखे होते. पण, रोमच्या दैवतांची उपासना करण्यास बहुतेक ख्रिश्‍चनांना भाग पाडण्यात प्लिनीला यश आले नाही. कारण त्यांच्या दृष्टीने असे करणे यहोवाचा विश्‍वासघात करण्यासारखे होते. सुरुवातीच्या कितीतरी ख्रिश्‍चनांनी, सम्राटाची उपासना करून मूर्तिपूजा करण्याऐवजी मरण पत्करले.

या माहितीचा आज आपण विचार का करावा? काही देशांमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय चिन्हांपुढे नमन करावे अशी अपेक्षा केली जाते. ख्रिस्ती या नात्याने आपण सरकारांच्या अधिकारपदाचा अवश्‍य आदर करतो. (रोम. १३:१) पण, राष्ट्रध्वजांशी संबंधित समारंभांचा प्रश्‍न येतो तेव्हा मात्र यहोवा देव आपल्याकडून अपेक्षित असलेली एकनिष्ठ भक्‍ती आपण त्याला देतो. तसेच, “मूर्तिपूजेपासून दूर पळा” व “[आपणास] मूर्तींपासून दूर राखा” या त्याच्या सल्ल्याचे आपण पालन करतो. (१ करिंथ. १०:१४; १ योहा. ५:२१; नहू. १:२) येशूने म्हटले: “यहोवा तुझा देव यालाच केवळ नमन कर व त्याचीच पवित्र सेवा कर.” (लूक ४:८, NW) तेव्हा, आपण केवळ आपल्या देवाची उपासना करत राहू या.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

खरे ख्रिस्ती केवळ यहोवाची उपासना करतात

[३ पानांवरील चित्रे]

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी सम्राटाची किंवा देवदेवतांच्या मूर्तींची उपासना करण्यास नकार दिला

सम्राट डमिशन

जूस

[चित्राचे श्रेय]

Emperor Domitian: Todd Bolen/Bible Places.com; Zeus: Photograph by Todd Bolen/Bible Places.com, taken at Archaeological Museum of Istanbul

[४ पानांवरील चित्र]

इफिसमधील ख्रिश्‍चनांनी, लोकप्रिय अर्तमी देवीची उपासना करण्याचे नाकारले.—प्रे. कृत्ये १९:२३-४१