व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे?

स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे?

स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे?

“स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.”—१ करिंथ. ११:३.

१, २. (क) मस्तकपद व अधीनता यांसंबंधी यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेविषयी प्रेषित पौलाने काय लिहिले? (ख) या लेखात कोणते प्रश्‍न विचारात घेतले जातील?

 “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे” आणि “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे,” असे प्रेषित पौलाने लिहिले. खरेतर, मस्तकपदाचा हा सुव्यवस्थित क्रम खुद्द यहोवाने घालून दिला आहे. (१ करिंथ. ११:३) याआधीच्या लेखात आपण पाहिले होते, की येशूने आपल्या मस्तकाच्या अर्थात यहोवा देवाच्या अधीन राहणे हा एक बहुमान असल्याचे मानले आणि असे करण्यात त्याला आनंद वाटला. तसेच, आपण हे देखील पाहिले होते, की पुरुषांचे मस्तक ख्रिस्त आहे. ख्रिस्त इतरांशी नेहमी प्रेमाने, दयाळूपणे व निःस्वार्थपणे वागला. मंडळीतील पुरुषांनी देखील इतरांशी आणि विशेषकरून आपापल्या पत्नीशी असे वागले पाहिजे.

पण, स्त्रियांबद्दल काय? त्यांचे मस्तक कोण आहे? पौलाने लिहिले: “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” या देवप्रेरित विधानाकडे स्त्रियांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे? एका ख्रिस्ती स्त्रीचा पती सत्यात नसला तरीसुद्धा तिने या तत्त्वाचे पालन करावे का? पुरुषाच्या मस्तकपदाला अधीनता दाखवण्याचा अर्थ, कुटुंबात काही निर्णय घेतले जातात तेव्हा स्त्रीने मूक राहावे म्हणजे तिने आपली मते व्यक्‍त करू नयेत असा होतो का? कशा प्रकारे एक स्त्री प्रशंसेस पात्र ठरू शकते?

‘त्याच्यासाठी मी साहाय्यक करीन’

३, ४. वैवाहिक जीवनात मस्तकपदाच्या तत्त्वाचे पालन करणे लाभदायक आहे असे का म्हणता येईल?

कुटुंबात मस्तकपदाची भूमिका कोण बजावेल हे खुद्द यहोवाने ठरवून दिले आहे. आदामाची निर्मिती केल्यानंतर यहोवा देवाने म्हटले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” देवाने हव्वेची निर्मिती केली तेव्हा आपल्याला एक सोबती व साहाय्यक लाभला आहे या कल्पनेने आदाम इतका भारावून गेला की त्याच्या तोंडून असे उद्‌गार निघाले: “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे.” (उत्प. २:१८-२४) आदाम आणि हव्वेपुढे परिपूर्ण मानवजातीचे मातापिता बनण्याचे अद्‌भुत भवितव्य होते. या सबंध मानवजातीला एका जगव्याप्त नंदनवनात सदासर्वकाळ आनंदी जीवन जगण्याची आशा होती.

आपल्या पहिल्या पालकांनी बंड केले तेव्हा एदेन बागेतील परिपूर्ण स्थिती नाहीशी झाली. (रोमकर ५:१२ वाचा.) पण, मस्तकपदासंबंधी देवाचा जो दृष्टिकोन होता त्यात कोणताही बदल झाला नाही. एक पती आपल्या मस्तकपदाची जबाबदारी उचितपणे पार पाडतो आणि पत्नी देखील त्याच्या मस्तकपदाला अधीनता दाखवते तेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते व त्यांना अनेक लाभ मिळतात. यहोवाचे मस्तकपद स्वीकारल्यामुळे येशूला जसे वाटले तसेच त्यांनाही वाटू शकते. मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी येशू ‘[यहोवासमोर] सर्वदा हर्ष पावत असे.’ (नीति. ८:३०) अर्थात, अपरिपूर्णतेमुळे कोणताही पुरुष परिपूर्ण मस्तक होऊ शकत नाही व कोणतीही स्त्री परिपूर्ण अधीनता दाखवू शकत नाही. पण, पती-पत्नी दोघेही मस्तकपदाच्या तत्त्वाचे पालन करण्याचा आपापल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करतात तेव्हा आजच्या काळातही ते सुखीसमाधानी वैवाहिक जीवन जगू शकतात.

५. विवाहसोबत्यांनी रोमकर १२:१० यात दिलेल्या सल्ल्याचे मनापासून पालन का केले पाहिजे?

वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी विवाहसोबत्यांनी बायबलमध्ये सर्व ख्रिश्‍चनांकरता दिलेल्या पुढील सल्ल्याचे पालन करणे अत्यावश्‍यक आहे: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोम. १२:१०) यासोबतच, पती-पत्नी दोघांनीही ‘एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू असण्याचा व एकमेकांना क्षमा करण्याचा’ कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.—इफिस. ४:३२.

विवाहसोबती सत्यात नसतो तेव्हा

६, ७. एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचा पती सत्यात नसतो तेव्हा देखील त्याला अधीनता दाखवल्याने कोणता चांगला परिणाम घडून येण्याची शक्यता असते?

तुमचा विवाहसोबती यहोवाचा सेवक नसल्यास काय? सहसा, पती सत्यात नसलेली कुटुंबे जास्त पाहायला मिळतात. अशा कुटुंबांत पत्नींनी आपल्या पतीशी कसे वागावे? याचे उत्तर बायबल आपल्याला देते: “स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”—१ पेत्र ३:१, २.

एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचा पती सत्यात नसला तरीसुद्धा तिने नेहमी त्याच्या अधीन राहावे असा सल्ला बायबल देते. त्यामुळे सत्यात नसलेला पती आपल्या पत्नीचे चांगले आचरण पाहून प्रभावित होऊ शकतो व कोणत्या गोष्टीमुळे ती आपल्याशी सभ्यपणे वागते याचा विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परिणामस्वरूप, तो आपल्या ख्रिस्ती पत्नीच्या विश्‍वासांचे परीक्षण करून सत्यातही येऊ शकतो.

८, ९. पत्नीच्या चांगल्या आचरणाचा सत्यात नसलेल्या तिच्या पतीवर सकारात्मक प्रभाव पडत नसेल तर तिने काय करावे?

पण, पत्नीच्या चांगल्या आचरणाचा सत्यात नसलेल्या तिच्या पतीवर सकारात्मक प्रभाव पडत नसेल तर तिने काय करावे? अशा वेळी तिला आपल्या पतीच्या अधीन राहणे कठीण वाटू शकते. पण, अशा परिस्थितीत देखील तिने नेहमी ख्रिस्ती गुण प्रदर्शित करावेत असे उत्तेजन बायबल तिला देते. उदाहरणार्थ, १ करिंथकर १३:४ मध्ये आपण असे वाचतो: “प्रीति सहनशील आहे.” तेव्हा, एका ख्रिस्ती पत्नीने सर्व प्रसंगी “पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून” व प्रेमळपणे वागून त्या परिस्थितीचा सामना करावा. (इफिस. ४:२) देवाच्या क्रियाशील शक्‍तीच्या अर्थात पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अगदी वाइटातल्या वाईट परिस्थितीतही ख्रिस्ती गुण प्रदर्शित करणे शक्य आहे.

पौलाने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३) देवाच्या आत्म्याच्या बळावर, एक ख्रिस्ती विवाहसोबती अशक्य वाटणाऱ्‍या गोष्टीही करू शकतो. उदाहरणार्थ, सत्यात नसलेला पती आपल्या पत्नीशी कठोरपणे वागतो तेव्हा त्याच्याशी जशास तसे वागण्याचा मोह तिला कदाचित आवरणार नाही. पण, बायबल सर्व ख्रिश्‍चनांना हा सल्ला देते: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. . . . कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (रोम. १२:१७-१९) तसेच, १ थेस्सलनीकाकर ५:१५ असा सल्ला देते: “कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा, आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.” आपल्याला स्वतःच्या बळावर शक्य झाले नसते ते सर्व, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने शक्य होऊ शकते. तेव्हा, आपल्याला आवश्‍यक ती मदत पुरवण्यासाठी पवित्र आत्म्याकरता देवाला प्रार्थना करणे योग्यच नाही का?

१०. लोकांनी येशूची निंदा केली, त्याला वाईट वागणूक दिली तेव्हा तो त्यांच्याशी कसा वागला?

१० ज्या लोकांनी येशूची निंदा केली, त्याला वाईट वागणूक दिली, अशांशी तो ज्या प्रकारे वागला त्याद्वारे त्याने आपल्यासाठी उल्लेखनीय उदाहरण मांडले आहे. १ पेत्र २:२३ म्हणते: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.” येशूच्या या उत्तम उदाहरणाचे आपण अनुकरण करावे असे उत्तेजन आपल्याला देण्यात येते. इतर लोक वाईट वागतात तेव्हा चिडू नका. तर “कनवाळू, नम्र मनाचे व्हा; वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका,” असे प्रोत्साहन सर्व ख्रिश्‍चनांना देण्यात आले आहे.—१ पेत्र ३:८, ९.

पत्नीची मूक भूमिका आहे का?

११. काही ख्रिस्ती स्त्रियांना कोणता मोठा विशेषाधिकार लाभेल?

११ स्त्रीने पतीच्या मस्तकपदाच्या अधीन राहावे याचा अर्थ कौटुंबिक बाबींसंबंधी किंवा इतर गोष्टींसंबंधी निर्णय घेतले जातात तेव्हा तिने आपली मते व्यक्‍त करू नयेत, मूक राहावे असा होतो का? मुळीच नाही. यहोवाने पुरुषांसोबतच स्त्रियांना देखील अनेक विशेषाधिकार दिले आहेत. उदाहरणार्थ, ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा १,४४,००० जणांना त्याच्या हाताखाली राजे व याजक म्हणून कार्य करण्याचा जो बहुमान लाभेल त्याचा विचार करा! या १,४४,००० जणांमध्ये स्त्रिया देखील आहेत. (गलती. ३:२६-२९) तर मग हे स्पष्टच आहे, की यहोवाच्या व्यवस्थेत स्त्रियांची मूक नव्हे, तर सक्रिय भूमिका आहे.

१२, १३. बायबलच्या काळात स्त्रियांनी देखील भविष्यवाद केला होता याचे एक उदाहरण द्या.

१२ उदाहरणार्थ, बायबलच्या काळात स्त्रियांनी भविष्यवाद केला होता. योएल २:२८, २९ मध्ये असे भाकीत करण्यात आले होते: “मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. . . . तुमचे दास व दासी यांवरहि त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.”

१३ सा.यु. ३३, पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेममधील एका माडीवरच्या खोलीत एकत्र जमलेल्या येशूच्या १२० शिष्यांमध्ये स्त्रिया देखील होत्या. उपस्थित असलेल्या त्या संपूर्ण समूहावर देवाने आपला आत्मा ओतला. म्हणूनच पेत्राने, योएल संदेष्ट्याच्या भविष्यवाणीचे शब्द स्त्री व पुरुष दोघांनाही लागू केले. पेत्राने म्हटले: “योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत ‘असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, . . . आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील.”—प्रे. कृत्ये २:१६-१८.

१४. पहिल्या शतकात, ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसार करण्यात स्त्रियांनी कोणती भूमिका बजावली?

१४ पहिल्या शतकात, ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसार करण्यातही स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी देवाच्या राज्याचा प्रचार केला व प्रचारासंबंधित कार्याला हातभार लावला. (लूक ८:१-३) उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने फीबी नावाच्या ख्रिस्ती बहिणीचा “किंख्रियातील मंडळीची सेविका” असा उल्लेख केला. याशिवाय, ज्यांनी पौलासोबत कार्य केले होते अशांना सलाम सांगताना त्याने अनेक विश्‍वासू स्त्रियांचा उल्लेख केला. त्यात त्याने: “प्रभूमध्ये श्रम करणाऱ्‍या त्रुफैना व त्रुफासा” यांचा उल्लेख केला. तसेच, “प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा तिने प्रभूमध्ये फार श्रम केले,” असेही त्याने म्हटले.—रोम. १६:१, १२.

१५. आज आपल्या काळात ख्रिस्ती विश्‍वासाचा प्रसार करण्यात स्त्रिया कोणती भूमिका बजावतात?

१५ आज आपल्या काळात, संबंध जगभरात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या ७० लाखांहून अधिक लोकांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. (मत्त. २४:१४) यांपैकी अनेक स्त्रिया पूर्ण-वेळचे सेवक, मिशनरी व बेथेल कुटुंबाचे सदस्य आहेत. आपल्या एका स्तोत्रात दाविदाने म्हटले: ‘प्रभु अनुज्ञा देतो; मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्‍या स्त्रियांची सेना मोठी आहे.’ (स्तो. ६८:११) आज हे शब्द किती खरे ठरले आहेत! सुवार्तेचा प्रचार करण्यात आणि यहोवाचा उद्देश साध्य करण्यात स्त्रिया जे काही योगदान करतात त्याची तो मनापासून कदर करतो. तेव्हा, ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या मस्तकपदाच्या अधीन राहावे अशी अपेक्षा यहोवा करत असला, तरी त्यांनी मूक अधीनता दाखवावी असा त्याचा अर्थ होत नाही.

दोन स्त्रिया ज्यांनी आपले मत व्यक्‍त केले

१६, १७. वैवाहिक जीवनात स्त्रियांची केवळ मूक भूमिका नसते हे सारेच्या उदाहरणावरून कसे दिसून येते?

१६ यहोवा स्वतः स्त्रियांना इतके विशेषाधिकार बहाल करतो तर मग कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी पतींनी आपापल्या पत्नीशी विचारविनिमय करू नये का? असे करणे नक्कीच सुज्ञपणाचे ठरेल. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांत पतींनी विचारले नसतानाही त्यांच्या पत्नींनी आपले मत व्यक्‍त केले किंवा काही कृती केली. याची दोन उदाहरणे विचारात घ्या.

१७ कुलपिता अब्राहामाची पत्नी सारा हिने त्याची दुसरी पत्नी व तिचा मुलगा यांना घरातून घालवून द्यावे असा त्याच्यामागे तगादा लावला कारण ते अनादराने वागत होते. ‘अब्राहामाला या गोष्टीचे फार वाईट वाटले.’ पण, यहोवाला तसे वाटले नाही. उलट यहोवाने अब्राहामाला म्हटले: “हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबधी तू वाईट वाटून घेऊ नको; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.” (उत्प. २१:८-१२) अब्राहामाने यहोवाची आज्ञा पाळून सारेचे म्हणणे ऐकले आणि तिच्या विनंतीनुसार केले.

१८. अबीगईलने स्वतःहून कोणते पाऊल उचलले?

१८ नाबालाची पत्नी, अबीगईल हिचाही विचार करा. दावीद आपला द्वेष करणाऱ्‍या शौल राजापासून पळ काढत होता तेव्हा त्याने नाबालाच्या कळपांजवळ तळ दिला. सुखसंपन्‍न नाबालाच्या मालमत्तेवर हात मारण्याऐवजी दाविदाने व त्याच्या माणसांनी मालमत्तेचे रक्षण केले. पण, नाबाल हा “कठोर व वाईट चालीचा होता” आणि दाविदाच्या माणसांवर तो “ओरडला.” शिवाय, तो “अधम” होता व ‘त्याच्याठायी मूर्खपणा होता.’ दाविदाच्या माणसांनी त्याला विनम्रपणे शिधासामग्री मागितली तेव्हा नाबालाने साफ नकार दिला. घडला प्रकार अबीगईलला कळला तेव्हा तिने काय केले? नाबालाला न सांगता तिने “त्वरेने दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधिलेले मांस, पाच मापे हुरडा, खिसमिसाचे शंभर घड आणि अंजिरांच्या दोनशे ढेपा ही सर्व घेऊन गाढवांवर लादली” आणि ही शिधासामग्री तिने दावीद व त्याच्या माणसांना दिली. अबीगईलने जे केले ते योग्य होते का? होय, पुढे घडलेल्या काही घटनांवरून तिने जे केले ते योग्य होते असे दिसून येते. बायबल म्हणते: “परमेश्‍वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यु पावला.” पुढे दाविदाने अबीगईलशी लग्न केले.—१ शमु. २५:३, १४-१९, २३-२५, ३८-४२.

प्रशंसेस पात्र असलेली स्त्री

१९, २०. एक स्त्री कोणत्या गोष्टीमुळे खऱ्‍या अर्थाने प्रशंसेस पात्र ठरते?

१९ यहोवाच्या मार्गांनुसार चालणाऱ्‍या पत्नीची बायबलमध्ये स्तुती करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, ‘सद्‌गुणी स्त्रीची’ प्रशंसा करताना नीतिसूत्राचे पुस्तक म्हणते: “तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेविते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करिते, अहित करीत नाही.” तसेच, “तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते, ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्‍न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराहि उठून तिची प्रशंसा” करतो.—नीति. ३१:१०-१२, २६-२८.

२० एक स्त्री कोणत्या गोष्टीमुळे खऱ्‍या अर्थाने प्रशंसेस पात्र ठरते? नीतिसूत्रे ३१:३० म्हणते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” यहोवाचे भय बाळगण्यामध्ये, देवाने घालून दिलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेचा मनापासून आदर करणे देखील सामील आहे. ज्याप्रमाणे “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे” आणि “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे” त्याचप्रमाणे “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.”—१ करिंथ. ११:३.

देवाकडून मिळालेल्या देणगीची कदर करा

२१, २२. (क) विवाहित ख्रिस्ती जोडप्यांजवळ विवाहाच्या देणगीबद्दल देवाचे आभार मानण्याची कोणती कारणे आहेत? (ख) अधिकार व मस्तकपद यांसंबंधी यहोवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा आपण आदर का केला पाहिजे? (पृष्ठ १७ वरील चौकट पाहा.)

२१ विवाहित ख्रिस्ती जोडप्यांजवळ देवाचे आभार मानण्याची असंख्य कारणे आहेत! ते एकमेकांच्या निकट सहवासात राहून आनंदी वैवाहिक जीवन जगू शकतात. विवाहाच्या उत्तम देणगीबद्दल ते विशेषकरून देवाचे आभारी असू शकतात कारण या सुंदर देणगीमुळेच त्यांना एकजुटीने यहोवाच्या मार्गांवर चालत राहण्याची संधी लाभते. (रूथ १:९; मीखा ६:८) विवाह व्यवस्थेची स्थापना करणारा खुद्द यहोवा देव असल्यामुळे सुखी वैवाहिक जीवनाचे नेमके रहस्य काय हे फक्‍त तोच जाणतो. तेव्हा, सदैव त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास, या संकटमय काळात जगत असतानासुद्धा “परमेश्‍वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग” होईल.—नहे. ८:१०.

२२ जो पती स्वतःप्रमाणे आपल्या पत्नीवर प्रेम करतो त्याला आपल्या मस्तकपदाची जबाबदारी कनवाळूपणे व समजुतदारपणे पार पाडणे शक्य होते. यामध्ये त्याची देवभीरू पत्नी त्याला सहकार्य करते, त्याचा मनापासून आदर करते तेव्हा ती देखील त्याचे खरे प्रेम मिळवते. सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या आदर्श विवाहामुळे आपला स्तुतीपात्र देव यहोवा याचा सन्मान होतो.

तुम्हाला आठवते का?

• मस्तकपद आणि अधीनता यांसंबंधी यहोवाने कोणती व्यवस्था लावून दिली आहे?

• विवाहसोबत्यांनी एकमेकांचा आदर का करावा?

• एका ख्रिस्ती पत्नीने सत्यात नसलेल्या आपल्या पतीशी कसे वागावे?

• कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी पतीने आपल्या पत्नीशी विचारविनिमय का करावा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चौकट]

अधिकारपदाचा आदर का करावा?

यहोवाने आत्मिक प्राणी आणि मानव यांच्यासाठी अधिकारपदाची व मस्तकपदाची व्यवस्था लावून दिली आहे. ही व्यवस्था त्यांच्या भल्यासाठी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आपल्या इच्छा-स्वातंत्र्याचा उपयोग करणे व देवाची एकजुटीने सेवा करणे शक्य होते.—स्तो. १३३:१.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी, येशू ख्रिस्ताचे अधिकारपद व मस्तकपद मान्य करते. (इफिस. १:२२, २३) सरतेशेवटी, यहोवाचे अधिकारपद मान्य करून “पुत्र आपणही ज्याने सर्व वस्तू आपल्या अधीन करून ठेवल्या त्याच्या अधीन होईल, यासाठी की, देव सर्वांमध्ये सर्व असावा.” (१ करिंथ. १५:२७, २८, पं.र.भा.) तेव्हा, देवाला समर्पित असलेल्या सर्व मानवांनी मंडळीत व कुटुंबात घालून दिलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेला सहकार्य करणे किती योग्य आहे! (१ करिंथ. ११:३; इब्री १३:१७) आपण असे करतो तेव्हा आपल्याला यहोवाची कृपापसंती व आशीर्वाद प्राप्त होतो.—यश. ४८:१७.

[१३ पानांवरील चित्र]

प्रार्थना एका पत्नीला ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्यास मदत करू शकते

[१५ पानांवरील चित्रे]

राज्याशी संबंधित कार्यांमध्ये स्त्रिया जे योगदान करतात त्याची यहोवा मनापासून कदर करतो