व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हारान एक गजबजलेले प्राचीन शहर

हारान एक गजबजलेले प्राचीन शहर

हारान एक गजबजलेले प्राचीन शहर

हारानच्या नुसत्या उल्लेखानेसुद्धा बायबलची माहिती असलेल्यांना कुलपिता अब्राहामाची आठवण होते. ऊरपासून कनान देशापर्यंत प्रवास करत असताना अब्राहाम व त्याची पत्नी सारा, त्याचे वडील तेरह व पुतण्या लोट यांनी हारानमध्ये मुक्काम केला होता. तिथे असताना अब्राहामाने भरपूर धनसंपत्ती मिळवली. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर, खऱ्‍या देवाने प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे तो निघून गेला. (उत्प. ११:३१, ३२; १२:४, ५; प्रे. कृत्ये ७:२-४) नंतर, अब्राहामाने इसहाकासाठी वधू शोधण्याकरता आपल्या सर्वात जुन्या सेवकाला हारान किंवा त्याच्या आसपासच्या भागात पाठवले. अब्राहामाचा नातू याकोबही अनेक वर्षे हारानमध्ये राहिला होता.—उत्प. २४:१-४, १०; २७:४२-४५; २८:१, २, १०.

अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदाचा राजा हिज्कीया याला एका धमकीवजा संदेश पाठवला. त्यात त्याने अश्‍शूरच्या राजांनी जिंकलेल्या ‘राष्ट्रांमध्ये’ हारानचा उल्लेख केला होता. या ठिकाणी उल्लेखलेले “हारान” केवळ त्या शहरालाच नव्हे तर सभोवतालच्या प्रांतालाही सूचित करते. (२ राजे १९:११, १२) यहेज्केलाच्या भविष्यवाणीत हारान हे सोरबरोबर व्यापार करणाऱ्‍या प्रमुख शहरांपैकी एक असल्याचा उल्लेख आढळतो. यावरून हारान व्यवसायाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे समजते.—यहे. २७:१, २, २३.

आज हारान पूर्व तुर्कस्थानातील शॉनलीउर्फाजवळ असलेले फक्‍त एक लहानसे शहर आहे. पण, एके काळी हारान हे खरोखरच एक गजबजाटीचे शहर होते. आजही बायबलमधील आपल्या मूळ नावांनी ओळखल्या जाणाऱ्‍या थोड्याफार प्राचीन वसाहतींपैकी हारान हे एक आहे. हारानु या अश्‍शूरी शब्दाचा अर्थ “मार्ग” किंवा “काफिल्यांचा मार्ग” असा होऊ शकतो. यावरून हारान हे मोठ्या शहरांना जोडणाऱ्‍या प्रमुख व्यापारी मार्गांवर वसलेले होते असे कळते. हारानमध्ये उत्खननात सापडलेल्या लेखांवरून समजते की बॅबिलोनचा राजा नबोनायडस याची आई हारानमधील सीन नावाच्या चंद्रदेवतेच्या मंदिरात प्रमुख पुजारीण होती. नंतर नबोनायडसने या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हटले जाते. त्यानंतर, अनेक साम्राज्ये आली नी गेली, पण हारान मात्र तसेच राहिले.

प्राचीन हारानपेक्षा आजचे हारान खूप वेगळे आहे. काही विशिष्ट कालावधींदरम्यान प्राचीन हारान अत्यंत प्रगत व महत्त्वपूर्ण शहर होते. पण, हे प्राचीन शहर जेथे होते तेथे आज केवळ काही घुमटाकार छतांची घरे पाहायला मिळतात. त्याच्या सभोवताली प्राचीन संस्कृतींचे अवशेष पाहायला मिळतात. निकटच्या भविष्यात देव निर्माण करणार असलेल्या नवीन जगात, हारानमध्ये एके काळी राहिलेल्या अनेक लोकांचे पुनरुत्थान होईल. त्यात अब्राहाम, सारा, लोट हेसुद्धा असतील. त्या वेळी हारान या गजबजलेल्या प्राचीन शहराविषयी ते आपल्याला बरेच काही सांगू शकतील.

[२० पानांवरील चित्र]

हारानचे अवशेष

[२० पानांवरील चित्र]

घुमटाकार छतांची घरे

[२० पानांवरील चित्र]

आधुनिक हारानचे विस्तृत दृश्‍य