व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा

आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा

आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा

“माझे जू आपणावर घ्या . . . म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्त. ११:२९.

१. सीनाय पर्वतावर नियमशास्त्र देताना देवाने कोणती व्यवस्था केली व का?

 सीनाय पर्वतावर पहिल्यांदा नियमशास्त्र देण्यात आले तेव्हा साप्ताहिक शब्बाथाची व्यवस्थाही त्यात समाविष्ट होती. यहोवाने आपला प्रवक्‍ता मोशे याच्यामार्फत इस्राएल राष्ट्राला अशी आज्ञा दिली: “सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव ह्‍यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतति आणि उपरी ह्‍यांचा जीव ताजातवाना होईल.” (निर्ग. २३:१२) होय, नियमशास्त्राधीन असलेल्या लोकांविषयी यहोवाला मनस्वी काळजी असल्यामुळे आपल्या लोकांकरता विश्रांती घेण्यासाठी त्याने एक दिवस राखून ठेवण्याची प्रेमळ व्यवस्था केली ज्यामुळे ते ‘ताजेतवाने होतील.’

२. शब्बाथाच्या व्यवस्थेचे पालन केल्यामुळे इस्राएल लोकांना कोणता फायदा होत असे?

शब्बाथाचा दिवस केवळ आराम करण्याचा दिवस होता का? नाही, तर इस्राएल लोकांच्या उपासनेतील हा एक अविभाज्य भाग होता. शब्बाथाच्या या व्यवस्थेचे पालन केल्यामुळे इस्राएलमधील कुटुंबप्रमुखांना आपल्या परिवाराला, ‘न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्‍वराचा मार्ग आचरण्याचे’ शिक्षण देण्याची संधी मिळत असे. (उत्प. १८:१९) तसेच, शब्बाथाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांना व मित्रपरिवाराला एकत्र येऊन यहोवाच्या कार्यांवर मनन करण्याची व एकमेकांच्या सहवसाचा आनंद घेण्याचीही संधी मिळत असे. (यश. ५८:१३, १४) याहून महत्त्वाचे म्हणजे, शब्बाथाच्या या व्यवस्थेने येशूच्या हजार वर्षांच्या भविष्यातील राजवटीकडे संकेत केला जेव्हा सर्व मानवांना खऱ्‍या अर्थाने विसावा प्राप्त होईल. (रोम. ८:२१) पण, आपल्या काळाबद्दल काय? यहोवाच्या मार्गांचे पालन करण्याची इच्छा असणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असा विसावा कोठे व कसा मिळू शकतो?

बंधुभगिनींच्या सहवासात विसावा मिळवा

३. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे एकमेकांना आधार दिला आणि याचा काय परिणाम झाला?

ख्रिस्ती मंडळी ही “सत्याचा स्तंभ व पाया” आहे असे प्रेषित पौलाने म्हटले. (१ तीम. ३:१५) एकमेकांना उत्तेजन दिल्यामुळे व एकमेकांची उभारणी केल्यामुळे सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना खूप आधार मिळाला. (इफिस. ४:११, १२, १६) उदाहरणार्थ, पौल इफिसमध्ये असताना करिंथ मंडळीतील बांधवांनी त्याला दिलेल्या भेटीमुळे त्याला खूप उत्तेजन मिळाले. त्यांच्या भेटीचा त्याच्यावर किती चांगला परिणाम झाला याविषयी तो म्हणतो: ‘स्तेफना, फर्तुनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण त्यांनी माझ्या आत्म्यास हुरूप आणला आहे.’ (१ करिंथ. १६:१७, १८) तसेच, करिंथमधील बांधवांची सेवा करण्यासाठी तीत तेथे गेला तेव्हा पौलाने त्याच्याविषयी मंडळीला लिहिले: “तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.” (२ करिंथ. ७:१३) त्याचप्रमाणे आजही, यहोवाच्या साक्षीदारांना आपल्या बांधवांच्या उभारणीकारक सहवासात खऱ्‍या अर्थाने विसावा प्राप्त होतो.

४. ख्रिस्ती सभांमध्ये आपल्याला कशा प्रकारे विसावा मिळतो?

ख्रिस्ती सभांपासून किती आनंद मिळतो हे तुम्ही स्वतः अनुभवले असेल. तेथे आपल्याला “परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने . . . उत्तेजन प्राप्त” होते. (रोम. १:१२) मंडळीतील आपले बंधुभगिनी म्हणजे ज्यांना आपण अधूनमधून कधीतरी भेटतो, ज्यांच्याशी आपली केवळ तोंडओळख आहे अशा लोकांसारखे नाहीत. तर ते आपले खरे मित्र आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला मनापासून प्रेम आणि आदर वाटतो. त्यांच्यासोबत नियमितपणे ख्रिस्ती सभांमध्ये आपण एकत्र येतो तेव्हा आपल्याला मनस्वी आनंद व सांत्वन मिळते.—फिले. ७.

५. अधिवेशनांमध्ये व संमेलनांमध्ये आपण कशा प्रकारे एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो?

आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला ताजेतवाने करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपली वार्षिक अधिवेशने आणि संमेलने. अशा मोठ्या सभांमध्ये देवाचे वचन, बायबल यातील सत्याचे जीवनदायी पाणी तर आपल्याला मिळतेच. शिवाय, ‘आपली अंतःकरणे विशाल’ करण्याची अर्थात मोठ्या प्रमाणात आपल्या बंधुभगिनींच्या सहवासाचा आनंद घेण्याची संधीही आपल्याला मिळते. (२ करिंथ. ६:१२, १३) पण, आपला स्वभाव लाजाळू असेल किंवा स्वतःहून इतरांशी बोलणे आपल्याला कठीण वाटत असेल तर काय? आपल्या बंधुभगिनींशी ओळख करून घेण्याचा एक मार्ग म्हणजे अधिवेशनांमध्ये आपल्या बांधवांची मदत करण्यास पुढे येणे. एक बहीण, एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मदत केल्याचा आपला अनुभव सांगते: “माझे स्वतःचे कुटुंब आणि काही मूठभर मित्रमैत्रिणींशिवाय तेथे असलेल्या इतर कोणालाही मी ओळखत नव्हते. पण, अधिवेशनात साफसफाई करण्याच्या कामात सहभागी झाल्यामुळे कितीतरी बंधुभगिनींशी माझी ओळख झाली! त्यामुळे खरंच खूप मजा आली!”

६. सुटी आनंदात घालवण्याकरता तुम्ही कोणता बेत करू शकता?

इस्राएल लोक सणांच्या वेळी यहोवाची उपासना करण्यासाठी वर्षातून तीन वेळा जेरूसलेमला जायचे. (निर्ग. ३४:२३) त्यासाठी बरेचदा त्यांना आपली शेतीवाडी व उद्योग-व्यवसाय सोडून कितीतरी दिवस धुळकट रस्त्यांवरून पायी प्रवास करावा लागत असे. पण तेथे गेल्यानंतर, मंदिरात कशा प्रकारे ‘परमेश्‍वराची स्तुती केली’ जात आहे हे पाहून इस्राएलांना ‘मोठा आनंद’ होत असे. (२ इति. ३०:२१) त्याचप्रमाणे, यहोवाच्या अनेक सेवकांनी हे अनुभवले आहे, की आपल्या कुटुंबीयांसह जवळपास असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला अर्थात बेथेल गृहाला भेट दिल्याने मोठा आनंद होतो. तर मग, येत्या सुटीत आपल्या कुटुंबासह बेथेल गृहाला भेट देण्याचा बेत तुम्हाला करता येईल का?

७. (क) सामाजिक सोहळ्यांपासून कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? (ख) असे सोहळे नेहमी आठवणीत राहावेत व उभारणीकारक ठरावेत म्हणून काय करता येईल?

कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासह एकत्र आल्यानेसुद्धा एकमेकांना उत्तेजन मिळू शकते. बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटले: “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही.” (उप. २:२४) सामाजिक सोहळ्यांत एकत्र आल्याने आपल्याला केवळ उत्तेजनच मिळत नाही, तर आपल्या बंधुभगिनींशी आपली चांगली ओळख झाल्यामुळे आपल्यातील प्रेमाचे बंधन आणखीन मजबूत होते. अशा प्रसंगांच्या चांगल्या आठवणी नेहमी लक्षात राहाव्यात व त्यांपासून सर्वांना उभारणी मिळावी म्हणून त्यांवर योग्य देखरेख केली जाईल याची खात्री करण्यात यावी. खासकरून, मद्यपानाची व्यवस्था केलेली असते तेव्हा ही काळजी घेणे जरुरीचे आहे.

सेवाकार्यातून उत्तेजन मिळते

८, ९. (क) येशूने दिलेला संदेश, शास्त्री आणि परूशी यांच्या शिकवणींपेक्षा वेगळा कसा होता? (ख) इतरांना बायबलची सत्ये सांगितल्यामुळे आपल्या स्वतःला कोणता फायदा होतो?

येशूला आपल्या सेवाकार्याबद्दल ज्वलंत आवेश होता आणि तसा आवेश आपल्या शिष्यांनीही दाखवावा असे उत्तेजन त्याने दिले. ही गोष्ट येशूच्या पुढील शब्दांवरून स्पष्ट होते: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३७, ३८) येशूने दिलेला संदेश खूप दिलासादायक होता. ती खरोखरच “सुवार्ता” होती. (मत्त. ४:२३; २४:१४) परूश्‍यांनी लोकांवर लादलेल्या जुलमी नियमांपेक्षा येशूचा संदेश अगदीच वेगळा होता.—मत्तय २३:४, २३, २४ वाचा.

आपण इतरांना राज्याचा संदेश सांगतो तेव्हा त्यांना आध्यात्मिक उभारी मिळते, आणि त्याच वेळी आपल्या स्वतःच्या अंतःकरणात देखील बायबलची सत्ये खोलवर रुजवली जातात. म्हणूनच, स्तोत्रकर्त्याने उचितपणे असे म्हटले: “परमेशाचे स्तवन करा. कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे.” (स्तो. १४७:१) इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याद्वारे तुम्ही यहोवाची स्तुती करण्यातला आपला आनंद आणखी वाढवू शकता का?

१०. आपल्या सेवाकार्यातील यश क्षेत्रातील लोकांच्या सकारात्मक प्रतिसादावर अवलंबून आहे का? स्पष्ट करा.

१० हे खरे की काही क्षेत्रांतील लोक राज्याच्या सुवार्तेला चांगला प्रतिसाद देतात, तर इतर तितका चांगला प्रतिसाद देत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १८:१, ५-८ वाचा.) तुमच्या क्षेत्रातील लोक सुवार्तेला सकारात्मक प्रतिसाद देत नसतील तरी लोकांना सुवार्ता सांगण्याद्वारे तुम्ही जे काही चांगले साध्य करत आहात त्यावर आपले लक्ष केंद्रित करा. तुम्ही सातत्याने करत असलेले प्रयत्न कधीच व्यर्थ ठरणार नाहीत हे नेहमी लक्षात असू द्या. (१ करिंथ. १५:५८) शिवाय, लोकांच्या प्रतिक्रियेवरून आपल्या यशाचे मोजमाप होत नाही. यहोवा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना राज्याचा संदेश ऐकण्याची संधी अवश्‍य देईल याची खात्री आपण बाळगू शकतो.—योहा. ६:४४.

आनंददायक कौटुंबिक उपासना

११. यहोवाने ख्रिस्ती पालकांवर कोणती जबाबदारी सोपवली आहे आणि ते ती कशी पूर्ण करू शकतात?

११ आपल्या मुलाबाळांना यहोवाविषयी व त्याच्या मार्गांविषयीचे शिक्षण देण्याची जबाबदारी ख्रिस्ती पालकांवर सोपवण्यात आली आहे. (अनु. ११:१८, १९) तुम्ही पालक असल्यास, आपल्या मुलांना आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे शिक्षण देण्यासाठी तुम्ही एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का? ही गंभीर जबाबदारी पूर्ण करण्यास व आपल्या कुटुंबाच्या गरजा तृप्त करण्यास पालकांना मदत करण्यासाठी यहोवाने पुस्तके, मासिके, व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग यांद्वारे मुबलक प्रमाणात पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न पुरवले आहे.

१२, १३. (क) कौटुंबिक उपासनेसाठी एक संध्याकाळ राखून ठेवल्यामुळे कुटुंबांना कोणता फायदा होऊ शकतो? (ख) कौटुंबिक उपासनेतून सबंध कुटुंबाला आध्यात्मिक उभारी मिळावी म्हणून पालक काय करू शकतात?

१२ याशिवाय, विश्‍वासू व बुद्धिमान दासाने कौटुंबिक उपासनेसाठी एक संध्याकाळ राखून ठेवण्याची व्यवस्था केली आहे ज्यात सबंध कुटुंब मिळून दर आठवडी बायबलचा अभ्यास करू शकते. या व्यवस्थेमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे व यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध आणखी दृढ झाल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. पण, कौटुंबिक उपासनेतून सबंध कुटुंबाला आध्यात्मिक उभारी मिळावी म्हणून पालक काय करू शकतात?

१३ कौटुंबिक उपासनेची संध्याकाळ ही नीरस असावी किंवा या प्रसंगी सगळ्यांनी अगदी धीरगंभीर असावे असे नाही. शेवटी, आपण ‘एका आनंदी देवाची’ उपासना करतो आणि त्याची उपासना आपण आनंदाने करावी अशी त्याची इच्छा आहे. (१ तीम. १:११, NW; फिलिप्पै. ४:४) बायबलमध्ये दडलेल्या अनमोल सत्यांवर चर्चा करण्यासाठी एक अतिरिक्‍त संध्याकाळ मिळाल्याबद्दल आपण खरोखर कृतज्ञ आहोत. कौटुंबिक उपासना आनंददायक बनवण्यासाठी पालक आपल्या कल्पकतेचा व सर्जनशीलतेचा उपयोग करून आपल्या शिक्षण पद्धतींत निराळेपणा आणू शकतात. उदाहरणार्थ, ब्रॅन्डन नावाच्या एका दहा वर्षांच्या मुलाला साप खूप आवडत असल्यामुळे बायबलमध्ये सापाचा संबंध सैतानाशी जोडला आहे याचे त्याला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे “बायबलमध्ये सैतानाला साप का म्हटले आहे?” या विषयावर त्याच्या कुटुंबाने त्याला एक अहवाल तयार करण्यास सांगितले. काही कुटुंबे अधूनमधून बायबलवर आधारित नाटक बसवतात. यात कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकेक भूमिका घेऊन त्या पात्राचे संवाद बायबलमधून वाचतो किंवा मग ते त्या पात्रांचा अभिनय करतात. कौटुंबिक उपासनेत अशा पद्धतींचा उपयोग केल्याने शिकण्यातील मौज वाढते आणि त्याच वेळी मुलांनाही सहभागी झाल्याचा आनंद मिळतो. यामुळे बायबलची तत्त्वे मुलांच्या अंतःकरणात पक्की बसतात. *

भारावून टाकणाऱ्‍या गोष्टी टाळा

१४, १५. (क) कशा प्रकारे या शेवटल्या काळात ताणतणावात व असुरक्षिततेत वाढ झाली आहे? (ख) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आणखी कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते?

१४ या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात ताणतणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. बेरोजगारी आणि इतर आर्थिक संकटांमुळे लाखो लोक त्रस्त झाले आहेत. ज्यांच्याजवळ नोकरी आहे अशांना देखील असे वाटते, की ते कमवत असलेला सगळा पैसा जणू भोके पडलेल्या पिशवीत पडत आहे, ज्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवणे त्यांना अतिशय मुश्‍कील झाले आहे. (हाग्गय १:४-६ पडताळून पाहा.) दहशतवादाचा आणि समाजातील इतर दुष्ट शक्‍तींचा बीमोड करण्यात राजकीय व इतर नेते जवळजवळ अपयशी ठरले आहेत. तर अनेक जण स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातील उणिवांमुळे निराश झाले आहेत.—स्तो. ३८:४.

१५ सैतानाच्या या दुष्ट जगातील समस्यांपासून व दबावांपासून खरे ख्रिस्ती देखील सुटलेले नाहीत. (१ योहा. ५:१९) उलट काही वेळा, यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना आणखीनही काही विशिष्ट समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. येशूने म्हटले: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (योहा. १५:२०) पण, आपला “छळ” झाला तरी आपल्याला ‘टाकून देण्यात येत नाही.’ (२ करिंथ. ४:९, इझी टू रीड व्हर्शन) असे का म्हणता येईल?

१६. कोणती गोष्ट आपल्याला आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवण्यास मदत करू शकते?

१६ येशूने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्त. ११:२८) ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या तरतुदीवर पूर्ण विश्‍वास ठेवण्याद्वारे आपण जणू स्वतःला यहोवाच्या हातात सोपवून देतो. असे केल्यामुळे आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ प्राप्त होते. (२ करिंथ. ४:७) आपला “कैवारी” असलेल्या देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्यामुळे आपला विश्‍वास उल्लेखनीय रीत्या वाढतो जेणेकरून छळ-संकटांचा केवळ आपण सामनाच करू शकत नाही, तर त्यांचा सामना करत असताना आनंदी मनोवृत्ती देखील टिकवून ठेवू शकतो.—योहा. १४:२६; याको. १:२-४.

१७, १८. (क) जगाच्या कोणत्या मनोवृत्तीपासून आपण दूर राहिले पाहिजे? (ख) जीवनात सांसारिक सुखांना जास्त महत्त्व दिल्याने काय होण्याची शक्यता आहे?

१७ या जगाच्या सुखविलासी मनोवृत्तीपासून खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे. (इफिसकर २:२-५ वाचा.) असे न केल्यास “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी,” यांस आपण सहज बळी पडू शकतो. (१ योहा. २:१६) किंवा दैहिक वासनांच्या आहारी गेल्याने आनंद मिळतो असा आपला चुकीचा ग्रह होऊ शकतो. (रोम. ८:६) उदाहरणार्थ, काहींनी आपल्या वासना तृप्त करण्यासाठी ड्रग्ज, मद्य, पोर्नोग्राफी यांचा आधार घेतला आहे. तर काही जण धोकेदायक खेळांच्या किंवा नाना प्रकारच्या वाईट गोष्टींच्या आहारी गेले आहेत. ‘सैतानाच्या डावपेचांचा’ उद्देशच लोकांना विकृत आनंद देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा आहे.—इफिस. ६:११.

१८ अर्थात खाणे, पिणे किंवा मौजमजा या गोष्टी मर्यादित स्वरूपात करण्यात काहीच गैर नाही. पण, या गोष्टींना आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ इच्छित नाही. तेव्हा, योग्य संतुलन व संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खासकरून सध्याच्या काळाची निकड लक्षात घेता असे करणे महत्त्वाचे आहे. कारण भौतिक गोष्टींच्या ओढीमुळे आपण इतके भारावून जाऊ शकतो की ‘प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या ओळखीविषयी आपण निष्क्रिय व निष्फळ ठरू’ शकतो.—२ पेत्र १:८.

१९, २०. आपल्याला खऱ्‍या अर्थाने विसावा कसा मिळू शकतो?

१९ आपण आपली विचारसरणी यहोवाच्या नीती-नियमांच्या सुसंगततेत आणतो तेव्हा आपल्याला याची जाणीव होते की या जगातील सर्व सुखे क्षणभंगुर आहेत. या गोष्टीची जाणीव मोशेला झाली होती आणि आपल्यालाही झाली पाहिजे. (इब्री ११:२५) वास्तविक, आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केल्यानेच आपल्याला खऱ्‍या अर्थाने विसावा किंवा खरे व कायमस्वरूपी सुखसमाधान प्राप्त होऊ शकते.—मत्त. ५:६.

२० तेव्हा, आध्यात्मिक गोष्टींमधून आपण सतत विसावा मिळवत राहू या. आपण असे करतो तेव्हा ‘धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारतो.’ (तीत २:१२, १३) तर मग, येशूचे अधिकारपद व त्याच्यापासून मिळणारे मार्गदर्शन स्वीकारून त्याच्या जुवाखाली राहण्याचा आपण संकल्प करू या. असे केल्यानेच आपल्याला खरे सुखसमाधान व विसावा मिळेल!

[तळटीप]

^ परि. 13 कौटुंबिक उपासना अधिक रंजक व माहितीपूर्ण कशी करता येईल यावर अधिक माहितीसाठी आमची राज्य सेवा, जानेवारी १९९१, पृष्ठ १ पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• आज यहोवाच्या लोकांना विसावा कसा मिळू शकतो?

• सेवाकार्यात सहभाग घेतल्याने आपल्याला आणि आपला संदेश ऐकणाऱ्‍यांनाही उत्तेजन कसे मिळते?

• कौटुंबिक उपासनेतून सबंध कुटुंबाला आध्यात्मिक उभारी मिळावी म्हणून पालक काय करू शकतात?

• कोणत्या गोष्टी आपल्याला भारावून टाकू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्रे]

येशूचे जू आपणावर घेतल्याने आपल्याला अनेक मार्गांनी आनंद मिळतो