व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कृपायुक्‍त बोलण्यामुळे नाती बहरतात

कृपायुक्‍त बोलण्यामुळे नाती बहरतात

कृपायुक्‍त बोलण्यामुळे नाती बहरतात

‘तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त असावे.’—कलस्सै. ४:६.

१, २. एका बांधवाच्या कृपायुक्‍त बोलण्यामुळे कोणता चांगला परिणाम घडून आला?

 एक बांधव आपला अनुभव सांगतो, “घरोघरचे प्रचार कार्य करताना एकदा मला एक मनुष्य भेटला जो माझ्याशी बोलताना इतका संतापला की त्याचे ओठ आणि सबंध शरीर अक्षरशः थरथरू लागले. मी शांतपणे बायबलच्या साहाय्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो आणखीनच भडकला. त्याची पत्नी आणि मुलंही मला भलंबुरं बोलू लागले. आता इथून काढता पाय घेणंच योग्य राहील हे ओळखून मी त्यांना म्हणालो, की मी एक शांतीचा संदेश देण्यासाठी आलो होतो आणि शांतीनंच तुमचा निरोप घेऊ इच्छितो. शेवटी, मी त्यांना गलतीकर ५:२२ आणि २३ ही वचनं दाखवली ज्यांत प्रीती, सौम्यता, इंद्रियदमन आणि शांती यांसारख्या गुणांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर मी तेथून निघालो.

“काही वेळानं पलीकडच्या रस्त्यावरील घरांना भेटी देताना मला हे कुटुंब त्यांच्या घराच्या समोरील पायऱ्‍यांवर बसलेलं दिसलं. त्यांनी मला हाक मारली. ‘आता पुन्हा कशाला बोलावत असतील?’ असा मी मनोमन विचार केला आणि त्यांच्याकडे गेलो. त्या माणसाच्या हातात थंड पाण्याचा जग होता. त्यानं मला प्यायला पाणी दिलं. मग माझ्याशी रागानं बोलल्याबद्दल माफी मागून, ‘तुमच्या विश्‍वासाची खरोखरच दाद द्यावी लागेल’ असं म्हणून त्यानं माझी प्रशंसा केली. आम्ही चांगल्या भावनेनं एकमेकांचा निरोप घेतला.”

३. इतरांच्या वागणुकीमुळे आपण रागावण्याचे का टाळले पाहिजे?

आज लोकांच्या जीवनात अनेक ताणतणाव आहेत. त्यामुळे साहजिकच दररोजच्या व्यवहारांत आणि सेवाकार्यातही आपल्याला अनेकदा रागावलेले, चिडलेले लोक भेटतात. हे आपण टाळू शकत नाही. पण, असे लोक भेटतात तेव्हा आपण मात्र त्यांच्याशी “सौम्यतेने व भीडस्तपणाने” वागणे अतिशय महत्त्वाचे आहे. (१ पेत्र ३:१५) सुरुवातीला सांगितलेल्या अनुभवात, घरमालकाने रागाच्या भरात दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे जर आपला बांधवही रागावला असता तर त्या मनुष्याच्या मनोवृत्तीत नंतर बदल झाला नसता. उलट, तो कदाचित आणखीनच चिडला असता. पण बांधवाने स्वतःवर नियंत्रण ठेवून आदरपूर्वक बोलल्यामुळे चांगला परिणाम घडून आला.

कृपायुक्‍त बोलणे म्हणजे काय?

४. इतरांशी विचारशीलपणे व प्रेमळपणे बोलणे का महत्त्वाचे आहे?

इतरांशी, मग ते मंडळीच्या बाहेरचे लोक असोत अथवा आतले, किंवा आपले स्वतःचे कुटुंबीय असोत, त्यांच्याशी व्यवहार करताना आपण प्रेषित पौलाच्या या सल्ल्याचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.” (कलस्सै. ४:६) अशा विचारशील व प्रेमळ बोलण्यामुळे इतरांशी सुसंवाद साधणे आणि शांतीपूर्ण संबंध टिकवून ठेवणे शक्य होते.

५. इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा काय अर्थ होत नाही? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधणे म्हणजे तुम्ही काय विचार करत आहात आणि तुम्हाला काय वाटत आहे हे लगेच बोलून टाकणे असे नाही. विशेषतः तुम्हाला राग आलेला असेल, तर तुम्ही असे करण्याचे टाळले पाहिजे. बायबल सांगते की रागाच्या भरात स्वतःवरचे नियंत्रण सुटणे हे मनोधैर्याचे नव्हे, तर दुबळेपणाचे लक्षण आहे. (नीतिसूत्रे २५:२८; २९:११ वाचा.) मोशे हा त्याच्या काळातील “सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” पण इस्राएल राष्ट्राच्या विद्रोही वृत्तीमुळे एकदा त्याचाही संयम सुटला आणि तो देवाचा गौरव करण्यास विसरला. आपल्याला नेमके कसे वाटते हे मोशेने अगदी स्पष्टपणे बोलून दाखवले खरे, पण यहोवाला त्याचे वागणे आवडले नाही. परिणामस्वरूप, ४० वर्षे इस्राएल लोकांचे नेतृत्व करूनही त्यांना प्रतिज्ञात देशात नेण्याचा मान मोशेला मिळाला नाही.—गण. १२:३; २०:१०, १२; स्तो. १०६:३२.

६. बोलताना तारतम्य बाळगण्याचा काय अर्थ होतो?

बोलताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे, तसेच कोठे, कसे बोलावे याचे तारतम्य ठेवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे असे बायबल सांगते. “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” (नीति. १०:१९; १७:२७) पण, तारतम्य ठेवणे म्हणजे स्वतःचे विचार कधी व्यक्‍तच न करणे असे नाही. तर, आपले बोलणे “कृपायुक्‍त” असले पाहिजे. म्हणजेच, इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, तर त्यांना सांत्वन मिळेल असे आपले बोलणे असले पाहिजे.नीतिसूत्रे १२:१८; १८:२१ वाचा.

“मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय”

७. आपण कशा प्रकारच्या भावना व्यक्‍त करू नये आणि का?

नोकरीच्या ठिकाणी किंवा सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांशी आदरपूर्वक व विचारशीलपणे बोलणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच मंडळीत व कुटुंबातही ते महत्त्वाचे आहे. मागचापुढचा विचार न करता राग व्यक्‍त केल्यामुळे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. (नीति. १८:६, ७) नकारात्मक भावना या आपल्या अपरिपूर्ण स्वभावामुळे उत्पन्‍न होत असल्या, तरी त्या काबूत ठेवणे जरुरीचे आहे. इतरांचा अपमान किंवा थट्टा करणे, त्यांना तुच्छ लेखणे किंवा द्वेषभावनेने त्यांच्याशी बोलणे हे चुकीचे आहे. (कलस्सै. ३:८; याको. १:२०) यामुळे चांगले नातेसंबंध उद्‌ध्वस्त होऊ शकतात, इतर लोकांसोबत आणि यहोवासोबतही. येशूने शिकवले: “जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, अरे वेडगळा, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या [“गेहेन्‍नातील अग्नीच्या,” NW] शिक्षेस पात्र होईल.”—मत्त. ५:२२.

८. आपल्या भावना व्यक्‍त करणे केव्हा आवश्‍यक असू शकते, पण आपण ते कशा प्रकारे केले पाहिजे?

पण, असेही प्रसंग येऊ शकतात जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी आपल्या भावना व विचार स्पष्टपणे व्यक्‍त करणे आवश्‍यक आहे असे आपल्याला वाटू शकते. कदाचित, एखाद्या बांधवाच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे तुम्हाला इतके वाईट वाटले असेल की त्याकडे नुसतेच दुर्लक्ष करून ते विसरून जाणे तुम्हाला शक्य नसेल. असे असले तरीसुद्धा आपल्या मनात द्वेषपूर्ण भावना घोळत राहू देऊ नका. (नीति. १९:११) त्याऐवजी, आपल्या भावनांवर नियंत्रण करा आणि मग ही समस्या सोडवण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचला. पौलाने लिहिले: “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” ती समस्या तुम्हाला सतत सतावत असल्यास उचित वेळ निवडून ती प्रेमळपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. (इफिसकर ४:२६, २७, ३१, ३२ वाचा.) कोणताही आडपडदा न ठेवता, स्पष्ट पण कृपायुक्‍त शब्दांत, समेट करण्याच्या हेतूने आपल्या भावाशी या समस्येबद्दल बोला.—लेवी. १९:१७; मत्त. १८:१५.

९. एखाद्या समस्येविषयी चर्चा करण्याअगोदर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे का महत्त्वाचे आहे?

अर्थात, समस्येविषयी चर्चा करण्यासाठी योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:१, ७) तसेच, “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.” (नीति. १५:२८) तेव्हा, समस्यांबद्दल बोलण्याअगोदर काही काळ जाऊ देणे योग्य ठरेल. आपल्या मनात अजूनही खूप राग असताना समस्येवर चर्चा केल्यास ती आणखीच बिघडू शकते. अर्थात, खूप जास्त काळ जाऊ देणेही शहाणपणाचे ठरणार नाही.

प्रेमळ कृत्यांमुळे नातेसंबंध सुधारतात

१०. प्रेमळ कृत्यांमुळे कशा प्रकारे नातेसंबंध सुधारतात?

१० कृपायुक्‍त शब्दांत बोलल्यामुळे आणि स्पष्टपणे विचार व्यक्‍त करण्याद्वारे सुसंवाद साधल्यामुळे चांगले नातेसंबंध जोडणे व ते टिकवून ठेवणे शक्य होते. खरेतर, इतरांसोबत नातेसंबंध सुधारण्याचा आपण जितका प्रयत्न करतो, तितकेच त्यांच्याशी सुसंवाद साधणे आपल्याला सोपे जाऊ शकते. प्रामाणिक मनाने केलेल्या प्रेमळ कृत्यांमुळे, जसे की, संधी मिळाल्यास कोणाला साहाय्य करणे, मनापासून एखादी भेटवस्तू देणे, आदरातिथ्य करणे, यांमुळे दिलखुलासपणे संवाद साधण्याचा मार्ग मोकळा होतो. अशा प्रेमळ कृत्यांमुळे जणू आपण दुसऱ्‍यांच्या मस्तकावर ‘निखाऱ्‍यांची रास करतो’ आणि यामुळे त्यांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याशी चर्चा करणे आपल्याला सोपे जाऊ शकते.—रोम. १२:२०, २१.

११. याकोबाने एसावासोबत आपला नातेसंबंध सुधारण्यासाठी काय केले आणि याचा काय परिणाम झाला?

११ प्राचीन काळात याकोबाने ही गोष्ट ओळखली होती. त्याचा जुळा भाऊ एसाव त्याच्यावर इतका क्रोधित झाला की एसाव आपल्याला जिवे मारेल या भीतीने याकोबाने त्याच्यापासून पळ काढला. कित्येक वर्षे उलटल्यावर याकोब परत आला. एसाव आपल्या ४०० माणसांना घेऊन त्याला भेटायला निघाला. याकोबाने यहोवाला मदतीची याचना केली. त्यानंतर त्याने एसावासाठी अनेक गुराढोरांची भेट पाठवली. याचा चांगला परिणाम घडून आला. कारण दोघे भाऊ एकमेकांना भेटले तोपर्यंत एसावाच्या मनोवृत्तीत बदल झाला होता. आणि त्याने धावत जाऊन याकोबाला मिठी मारली.—उत्प. २७:४१-४४; ३२:६, ११, १३-१५; ३३:४, १०.

कृपायुक्‍त बोलण्याने इतरांचे मनोबल वाढवा

१२. आपल्या बांधवांशी बोलताना आपण कृपायुक्‍त शब्दांचा वापर का केला पाहिजे?

१२ ख्रिस्ती, इतर मानवांची नव्हे तर देवाची सेवा करतात. असे असले, तरीसुद्धा इतरांनी आपली प्रशंसा करावी, आपल्याविषयी पसंती दर्शवावी असे स्वाभाविकपणे सर्वांनाच वाटते. आपण आपल्या बांधवांशी प्रेमळपणे व विचारशीलपणे बोलतो तेव्हा जीवनातील ताणतणावांमुळे त्यांच्यावर आलेला भार हलका होऊ शकतो. दुसरीकडे पाहता, कठोर शब्दांत टीका केल्यामुळे हा भार आणखीनच असह्‍य होऊ शकतो. अशा कठोर शब्दांमुळे, आपण यहोवाच्या नजरेतून पडलो आहोत की काय असेही त्यांना वाटू शकते. म्हणूनच, आपल्या बोलण्याद्वारे आपण प्रामाणिकपणे इतरांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच’ आपण बोलले पाहिजे, जेणेकरून ‘ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त होईल.’—इफिस. ४:२९.

१३. (क) इतरांना मार्गदर्शन देताना आणि (ख) पत्रव्यवहार करताना वडिलांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१३ विशेषतः मंडळीतील वडिलांनी “सौम्य वृत्तीचे” असले पाहिजे आणि त्यांनी कळपाशी कोमलतेने व्यवहार केला पाहिजे. (१ थेस्सलनी. २:७, ८) इतरांना, अगदी ज्यांची ‘विरोध’ करण्याची प्रवृत्ती आहे अशांनाही सल्ला किंवा मार्गदर्शन देणे आवश्‍यक असते, तेव्हा ते “सौम्यतेने” देण्याची वडील काळजी घेतात. (२ तीम. २:२४, २५) तसेच, दुसऱ्‍या मंडळीच्या वडील वर्गाशी अथवा शाखा कार्यालयाशी पत्रव्यवहार करतानाही वडिलांनी आदरयुक्‍त भाषेचा उपयोग करणे गरजेचे आहे. मत्तय ७:१२ यातील तत्त्व ध्यानात ठेवून त्यांनी प्रेमळ व विचारशील असले पाहिजे.

कुटुंबात प्रेमळपणे व विचारशीलपणे बोलणे

१४. पौलाने पतींना कोणता सल्ला दिला आणि का?

१४ आपल्या शब्दांचा, चेहऱ्‍यावरील हावभावांचा किंवा शरीराच्या हालचालींचा इतरांवर किती परिणाम होतो याची कधीकधी आपल्याला जाणीव नसते. उदाहरणार्थ, काही पुरुषांना त्यांच्या शब्दांचा स्त्रियांच्या मनावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो याची कल्पना नसते. एका बहिणीने म्हटले, “माझे पती रागावल्यावर माझ्याशी आवाज चढवून बोलतात तेव्हा मला अक्षरशः भीती वाटते.” कठोर शब्दांचा पुरुषापेक्षा स्त्रीच्या मनावर जास्त परिणाम होतो आणि बऱ्‍याच काळापर्यंत ती ते विसरू शकत नाही. (लूक २:१९) विशेषतः तिचे ज्याच्यावर प्रेम असते आणि ज्याच्याबद्दल तिच्या मनात आदर असतो त्याचे शब्द तिच्या मनाला खूप लागतात. पौलाने पतींना असा सल्ला दिला: “आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.”—कलस्सै. ३:१९.

१५. पतीने आपल्या पत्नीशी कोमलतेने व्यवहार का केला पाहिजे हे उदाहरणाच्या साहाय्याने सांगा.

१५ पतीने आपल्या पत्नीशी कोमलतेने, ती “अधिक नाजूक व्यक्‍ति” आहे असे समजून व्यवहार का केला पाहिजे यासंदर्भात एका अनुभवी विवाहित बांधवाने एक उदाहरण दिले. ते म्हणाले, “एखादी मौल्यवान आणि नाजूक काचेची फुलदाणी अतिशय सांभाळून हाताळावी लागते, जास्त दाब दिल्यास तिला तडा जाऊ शकतो. आणि एकदा तडा गेल्यावर तो भरून काढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो दिसतोच. त्याचप्रमाणे, पती आपल्या पत्नीशी निष्ठुरतेने बोलल्यास तिच्या भावना दुखावू शकतात आणि यामुळे त्यांच्या नातेसंबंधाला कायमचा तडा जाऊ शकतो.”१ पेत्र ३:७ वाचा.

१६. पत्नी कशा प्रकारे आपल्या कुटुंबावर उभारणीकारक प्रभाव पाडू शकते?

१६ पुरुषांचेही मनोबल त्यांच्या पत्नीच्या व इतरांच्या बोलण्याने एकतर वाढू शकते किंवा खचू शकते. पती जिच्यावर ‘भरवसा ठेवू’ शकतो अशी “सुज्ञ पत्नी,” आपल्या भावनांची त्याने कदर करावी अशी केवळ अपेक्षा करत नाही, तर ती स्वतःसुद्धा त्याच्या भावनांची कदर करते. (नीति. १९:१४; ३१:११) खरे पाहता, एका पत्नीच्या वागणुकीचा तिच्या कुटुंबावर बराच प्रभाव पडू शकतो, मग तो चांगला असो अथवा वाईट. “सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.”—नीति. १४:१.

१७. (क) मुलांनी आपल्या आईवडिलांशी कशा प्रकारे बोलावे? (ख) वयाने मोठे असलेल्यांनी लहानांशी कसे बोलावे आणि का?

१७ त्याच प्रकारे, आईवडील व मुले यांचेही एकमेकांशी बोलणे “कृपायुक्‍त” असले पाहिजे. (मत्त. १५:४) मुलांशी विचारशीलपणे बोलल्यास आपण त्यांना ‘चिरडीस आणण्याचे’ टाळू शकतो. (कलस्सै. ३:२१; इफिस. ६:४) मुलांची एखादी चूक सुधारण्याची गरज असते तेव्हासुद्धा, आईवडिलांच्या किंवा मंडळीतील वडिलांच्या बोलण्यावरून, ते कधीच सुधरणार नाहीत, किंवा त्यांच्याविषयी आपण आशा सोडून दिली आहे असे मुलांना वाटायला नको. नाहीतर, तेसुद्धा निराश होऊन प्रयत्न करायचे सोडून देतील. याउलट, आईवडील व मंडळीतील वडील मुलांच्या भावनांचा आदर करून त्यांच्याशी बोलले तर ते किती चांगले राहील! असे केल्यास, मुलांना आपली चूक सुधारून देवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवणे सोपे जाईल. मिळालेल्या सल्ल्याचा शब्द न्‌ शब्द आठवणीत राहिला नाही, तरी तो सल्ला देणारे आपल्याशी कशा प्रकारे बोलले हे त्यांना कायम आठवणीत राहील.

आपल्या तोंडून चांगल्याच गोष्टी निघोत

१८. आपण मनातून रागाच्या भावना कशा प्रकारे काढून टाकू शकतो?

१८ आपल्याला किती राग आला आहे हे चेहऱ्‍यावर न आणणे म्हणजे रागावर नियंत्रण करणे नाही. आपण आपल्या मनातील राग फक्‍त दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये. कारण, मनात रागाच्या भावना खदखदत असताना वरवर शांत असण्याचा दिखावा केल्याने मनावर ताण येतो. असे करणे म्हणजे कारच्या ब्रेकवर आणि ॲक्सेलरेटरवर एकाच वेळी पाय ठेवण्यासारखे आहे. असे केल्यामुळे कारच्या इंजिनवर जास्त ताण येऊन गाडीला नुकसान पोचू शकते. तेव्हा, मनात राग कोंडून ठेवून नंतर कधीतरी त्याचा उद्रेक होऊ देऊ नका. त्याऐवजी, रागाच्या भावना मनातून काढून टाकण्यास मदत करावी अशी यहोवाला प्रार्थना करा. यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास आपल्या मनाचे व अंतःकरणाचे रूपांतर करण्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याची मदत स्वीकारा.रोमकर १२:२; इफिसकर ४:२३, २४ वाचा.

१९. तणावपूर्ण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आपण कोणती पावले उचलू शकतो?

१९ व्यावहारिक पावले उचला. एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीत, तुमचा पारा चढत आहे असे जाणवले, तर शक्य असल्यास तेथून निघून जा. असे केल्यामुळे तुम्हाला आपले मन शांत करायला वेळ मिळेल. (नीति. १७:१४) दुसरीकडे पाहता, तुम्ही ज्याच्याशी बोलत आहात त्याला राग येत आहे असे दिसल्यास, त्याच्याशी प्रेमळपणे बोलण्याचा विशेष प्रयत्न करा. आठवणीत असू द्या: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीति. १५:१) एखादे खोचक विधान अगदी नरम आवाजात बोलले तरी त्यामुळे आगीत तेल ओतण्यासारखेच होईल. (नीति. २६:२१) म्हणूनच, तुमच्या आत्मसंयमाची परीक्षा पाहणारा प्रसंग उद्‌भवतो तेव्हा ‘बोलावयास धीमे, रागास मंद’ असा. तुमच्या तोंडून वाईट नव्हेत, तर चांगल्याच गोष्टी निघाव्यात म्हणून यहोवाच्या आत्म्याचे साहाय्य मागा.—याको. १:१९.

मनापासून क्षमा करणे

२०, २१. इतरांना क्षमा करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल आणि आपण असे का केले पाहिजे?

२० दुःखाची गोष्ट म्हणजे, जिभेवर पूर्णपणे नियंत्रण करणे आपल्यापैकी कोणालाच शक्य नाही. (याको. ३:२) त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मंडळीतील आपले प्रिय भाऊ व बहिणी बरेचदा आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करूनही, आपले मन दुखावेल असे काहीतरी नकळत बोलून बसतील. अशा वेळी, लगेच त्यांच्यावर रागावण्याऐवजी ते असे का बोलले असावेत किंवा वागले असावेत याचा शांतपणे विचार करा. (उपदेशक ७:८, ९ वाचा.) कदाचित ते तणावामुळे, भीतीमुळे, बरे वाटत नसल्यामुळे किंवा दुसऱ्‍या एखाद्या समस्येमुळे असे वागले किंवा बोलले असावेत का?

२१ अर्थात, अशी कारणे असल्यास रागाचा उद्रेक झाला तरी काही गैर नाही, असे येथे सुचवायचे नाही. पण, ही कारणे लक्षात घेतल्यास, काही जण कधीकधी अयोग्य प्रकारे का वागतात किंवा बोलतात हे समजून घेणे आणि त्यांना क्षमा करणे आपल्याला सोपे जाईल. कधी न कधी आपल्यापैकी प्रत्येकानेच शब्दांद्वारे किंवा कृतीद्वारे इतरांचे मन दुखावले असेल आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला क्षमा करावी अशी आपण अपेक्षा करतो. (उप. ७:२१, २२) येशूने सांगितले होते की देवाने आपल्याला क्षमा करावी म्हणून आधी आपण इतरांना क्षमा केलीच पाहिजे. (मत्त. ६:१४, १५; १८:२१, २२, ३५) म्हणूनच, आपण क्षमा मागण्यास आणि क्षमा करण्यास तत्पर असले पाहिजे. असे केल्यामुळे आपल्याला कुटुंबात आणि मंडळीत “पूर्णता करणारे बंधन” अर्थात प्रेमाचे बंधन टिकवून ठेवणे शक्य होईल.—कलस्सै. ३:१४.

२२. आपले बोलणे कृपायुक्‍त असावे म्हणून प्रयत्न करणे का फायद्याचे आहे?

२२ सध्याच्या क्रोधाविष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येतो, तसतसे आपला आनंद व एकता टिकवून ठेवणे कठीण होत जाईल. देवाच्या वचनातील उपयुक्‍त तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपल्याला इतरांचे वाईट नव्हे, तर चांगले करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करणे शक्य होईल. मंडळीत व कुटुंबात आपल्याला इतरांसोबत शांतीपूर्ण नातेसंबंधांचा आनंद घेता येईल आणि आपल्या चांगल्या उदाहरणामुळे आपला “आनंदी देव” यहोवा याच्याबद्दल इतर लोकांना उत्तम साक्ष मिळू शकेल.—१ तीम. १:११, NW.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• समस्यांविषयी चर्चा करण्याकरता योग्य वेळ निवडणे का महत्त्वाचे आहे?

• कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी बोलणे नेहमी “कृपायुक्‍त” का असले पाहिजे?

• आपल्या बोलण्याने इतरांचे मन दुखावण्याचे आपण कसे टाळू शकतो?

• इतरांना क्षमा करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्रे]

आपल्या भावना शांत होऊ द्या आणि मग योग्य वेळ निवडून समस्येविषयी चर्चा करा

[२३ पानांवरील चित्र]

पतीने नेहमी आपल्या पत्नीशी कोमलतेने बोलले पाहिजे