व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता अनुभवा

देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता अनुभवा

देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता अनुभवा

“मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन.”—स्तो. ३५:१८.

१-३. (क) काही ख्रिस्ती कशामुळे आध्यात्मिकदृष्ट्या धोकेदायक क्षेत्रात वाहवत जाऊ शकतात? (ख) देवाच्या लोकांना सुरक्षितता कोठे मिळू शकते?

 एकदा ज्यो आणि त्याची पत्नी, उष्णकटिबंधातील एका प्रवाळ बेटावर सुटीला गेलेले असताना समुद्रात पोहत होते. असंख्य रंगांचे व आकारांचे मासे व इतर समुद्री जीव पाहत पाहत ते किनाऱ्‍यापासून थोड्या दूरवर पोहत गेले. पण, थोड्या वेळाने जेव्हा समुद्राचा तळ दिसेनासा झाला आणि समुद्राचा अथांग विस्तार नजरेस पडला तेव्हा मात्र ज्योची पत्नी त्याला म्हणाली, “मला वाटतंय आपण फारच दूर आलोय.” ज्यो मात्र निश्‍चिंत होता. तो तिला म्हणाला “काही नाही होत. उगंच घाबरतेस तू.” पण थोड्याच वेळानंतर ज्योने आजूबाजूला पाहून विचार केला, ‘सगळे मासे अचानक कुठं गायब झाले?’ त्याचे कारण क्षणातच त्याच्या लक्षात आले आणि त्याच्या जिवाचा थरकाप उडाला. गर्द निळ्या पाण्यातून एक शार्क मासा सरळ त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला. ज्योने विचार केला, ‘झालं, आता आपलं काही खरं नाही.’ मग, फक्‍त काही फूट अंतरावर असताना शार्कने अचानक दिशा बदलली आणि तो समुद्रात दिसेनासा झाला.

सैतानाच्या जगातील आकर्षणे, जसे की करमणूक, नोकरी-व्यवसाय, निरनिराळ्या चैनीच्या वस्तू यांत एखादा ख्रिस्ती इतका गुरफटून जाऊ शकतो की आपण धोकेदायक क्षेत्रात वाहवत जात आहोत हे त्याच्या लक्षातही येत नाही. ख्रिस्ती वडील म्हणून सेवा करणारा ज्यो म्हणतो, “या अनुभवामुळे ख्रिस्ती मंडळीच्या निकट सहवासात राहणे किती महत्त्वाचे आहे याची मला जाणीव झाली. जेथे आपण सुरक्षित राहून आनंदही लुटू शकतो अशाच ठिकाणी पोहणे उत्तम!” आध्यात्मिकदृष्ट्या जेथे तुम्ही एकटे पडाल किंवा धोक्यात याल अशा धोक्याच्या क्षेत्रात कधीही वाहवत जाऊ नका. आणि आपण नकळत अशा धोक्याच्या क्षेत्रात आलो आहोत अशी जाणीव झाल्यास लगेच मागे वळा आणि ‘सुरक्षित क्षेत्रात’ परत या. नाहीतर, सैतान तुम्हाला सहज गिळंकृत करू शकतो.

सध्याचे हे जग ख्रिश्‍चनांकरता धोकेदायक आहे. (२ तीम. ३:१-५) सैतानाला माहीत आहे की त्याचा काळ आता थोडाच उरला आहे आणि त्यामुळे जे बेसावध असतात त्यांना गिळंकृत करण्यास तो अधिकच उत्सुक आहे. (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:१२, १७) पण, आपण निराधार नाही. यहोवाने आपल्या लोकांकरता आध्यात्मिक आश्रयस्थान अर्थात ख्रिस्ती मंडळीची तरतूद केली आहे.

४, ५. भविष्याबद्दल आज बऱ्‍याच लोकांच्या काय भावना आहेत आणि का?

सध्याच्या जगात खऱ्‍या अर्थाने शारीरिक व भावनिक सुरक्षा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. गुन्हेगारी, हिंसाचार, वाढती महागाई, तसेच पर्यावरणाच्या समस्यांमुळे बऱ्‍याच लोकांना जीवन सुरक्षित वाटत नाही. शिवाय, म्हातारपण व आजार यांपासून कोणीही सुटलेला नाही. आणि ज्यांच्याजवळ नोकरी, घरदार, पैसाअडका व चांगले आरोग्य आहे त्यांनाही बऱ्‍याचदा याची जाणीव असते की कोणत्याही क्षणी या गोष्टी त्यांच्या हातून जाऊ शकतात.

त्याच प्रकारे, बऱ्‍याच जणांसाठी भावनिक सुरक्षाही एक स्वप्न ठरले आहे. वैवाहिक, कौटुंबिक जीवनात शांतीसमाधान मिळेल अशी अपेक्षा करणाऱ्‍या अनेकांच्या पदरी निराशाच आली आहे. आध्यात्मिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, चांगले मार्गदर्शन मिळवण्याच्या आशेने चर्चला जाणाऱ्‍या अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मार्गदर्शन मिळण्याऐवजी उलट ते अधिकच गोंधळात पडले आहेत. कारण, त्यांचे धार्मिक पुढारी स्वतःच गैरकृत्ये करतात आणि बायबलचा आधार नसलेल्या गोष्टी शिकवतात. यामुळे विज्ञान, माणुसकी यांसारख्या गोष्टींवर भरवसा ठेवण्याशिवाय बहुतेक लोकांजवळ कोणताही पर्याय उरलेला नाही. म्हणूनच, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेले लोक आज आपल्याला पावलापावलावर भेटतात. आणि बरेच लोक तर भविष्याबद्दल जास्त खोलात जाऊन विचारच करू इच्छित नाहीत.

६, ७. (क) जे देवाची सेवा करतात आणि जे करत नाहीत त्यांच्या दृष्टिकोनांत जमीनअस्मानाचा फरक का आहे? (ख) आता आपण काय पाहणार आहोत?

जे ख्रिस्ती मंडळीचे सदस्य आहेत आणि जे नाहीत त्यांच्या दृष्टिकोनात खरोखर जमीनअस्मानाचा फरक आहे! इतर लोकांप्रमाणे आपल्यालाही आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले, तरी यहोवाचे लोक या नात्याने आपली प्रतिक्रिया त्यांच्यापेक्षा फारच वेगळी असते. (यशया ६५:१३, १४; मलाखी ३:१८ वाचा.) का? कारण मानवजातीची आज अशी अवस्था का झाली आहे याविषयी बायबलमध्ये आपल्याला समाधानदायक स्पष्टीकरण सापडते. तसेच, जीवनातील आव्हानांना व समस्यांना तोंड देण्याकरता आपल्याजवळ उत्तम मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यामुळे, आपण भविष्याबद्दल अवाजवी चिंता करत नाही. यहोवाचे उपासक या नात्याने, अनेक चुकीच्या व बायबलवर आधारित नसलेल्या अनैतिक आचारविचारांपासून व त्यांच्या दुष्परिणामांपासून आपले संरक्षण होते. परिणामस्वरूप, इतरांच्या तुलनेत ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांना एक अनोखी शांती अनुभवता येते.—यश. ४८:१७, १८; फिलिप्पै. ४:६, ७.

यहोवाची सेवा करणाऱ्‍यांना कशा प्रकारे सुरक्षितता लाभते याबद्दल विचार करण्यास काही उदाहरणे आपल्याला मदत करू शकतात. ही उदाहरणे आपल्या स्वतःच्या विचारसरणीचे व आचरणाचे परीक्षण करायला आपल्याला प्रवृत्त करतील. तसेच, देवाने जे मार्गदर्शन आपल्या संरक्षणाकरता दिले आहे त्याचे आपल्याला अधिक पूर्णपणे पालन करता येईल का, याचाही विचार करण्यास ही उदाहरणे आपली मदत करतील.—यश. ३०:२१.

“माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते”

८. यहोवाच्या सेवकांना नेहमीच काय करावे लागले आहे?

मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच, ज्यांनी यहोवाची सेवा करण्याचे व त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचे निवडले त्यांनी असे न करणाऱ्‍यांशी घनिष्ठ संबंध ठेवण्याचे टाळले. यहोवाने आधीच सांगितले होते, की त्याचे उपासक आणि सैतानाचे अनुयायी यांच्यात वैर असेल. (उत्प. ३:१५) देवाचे लोक त्याच्या तत्त्वांचे गांभीर्याने पालन करत असल्यामुळे त्यांच्या सभोवती असलेल्या इतर लोकांपेक्षा त्यांची वागणूक वेगळी होती. (योहा. १७:१५, १६; १ योहा. २:१५-१७) अशी भूमिका घेणे त्यांना नेहमीच सोपे गेले नाही. आणि यामुळे काही वेळा तर यहोवाच्या सेवकांपैकीही काही जणांनी, स्वार्थत्यागी जीवन जगण्यात खरोखरच शहाणपण आहे का याबद्दल शंका व्यक्‍त केली.

९. स्तोत्र ७३ च्या लेखकाला कशा प्रकारच्या भावनांना तोंड द्यावे लागले होते याचे वर्णन करा.

आपण जीवनात खरोखरच योग्य निर्णय घेतले आहेत का, याबद्दल साशंक झालेल्यांपैकी एक जण ७३ व्या स्तोत्राचा लेखक होता, जो कदाचित आसाफाचा वंशज असावा. या स्तोत्रकर्त्याला असा प्रश्‍न पडला होता, की जे दुष्ट कामे करतात ते सहसा जीवनात यशस्वी, आनंदी व समृद्ध आहेत असे भासते, आणि जे देवाची सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांना मात्र अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागतात, असे का?स्तोत्र ७३:१-१३ वाचा.

१०. स्तोत्रकर्त्याने उपस्थित केलेले प्रश्‍न तुम्हाला का महत्त्वाचे वाटतात?

१० या स्तोत्रकर्त्याला जे प्रश्‍न सतावत होते त्या प्रकारचे प्रश्‍न कधीकधी तुमच्याही मनात येतात का? येत असल्यास, याबद्दल अवाजवी प्रमाणात दोषभावना बाळगण्याची गरज नाही. किंवा, आपला विश्‍वास डगमगत आहे असा विचार करण्याचीही गरज नाही. खरे पाहता, यहोवाच्या अनेक सेवकांच्या मनात, इतकेच काय तर बायबलमधील पुस्तके लिहिण्याकरता यहोवाने ज्यांचा वापर केला अशाही काही जणांच्या मनात या स्वरूपाचे विचार आले होते. (ईयो. २१:७-१३; स्तो. ३७:१; यिर्म. १२:१; हब. १:१-४, १३) मुळात, यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍या सर्वांनी या प्रश्‍नाला तोंड देणे आणि त्याचे उत्तर मिळवणे अत्यावश्‍यक आहे: देवाची सेवा करणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे हा खरोखरच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे का? हा प्रश्‍न खरे तर एदेन बागेत सैतानाने उठवलेल्या वादाशी संबंधित आहे. देवाला सबंध विश्‍वावर आधिपत्य करण्याचा अधिकार आहे किंवा नाही या मूळ प्रश्‍नाशी तो निगडीत आहे. (उत्प. ३:४, ५) आणि म्हणूनच, ७३ व्या स्तोत्राच्या लेखकाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर आपण सर्वांनी विचार केलाच पाहिजे. जे दुष्ट कामे करूनही आरामात राहतात अशा लोकांचा आपण हेवा करावा का? यहोवाची सेवा करण्याचे सोडून देऊन आपण या दुष्ट लोकांचे अनुकरण करावे का? आपण असे करावे हीच सैतानाची इच्छा आहे.

११, १२. (क) स्तोत्रकर्त्याने कशा प्रकारे आपल्या शंकांवर मात केली आणि यावरून आपण काय शिकतो? (ख) स्तोत्रकर्ता ज्या निष्कर्षावर पोचला त्या निष्कर्षावर पोचण्यास तुम्हाला कोणत्या गोष्टीने मदत केली आहे?

११ मग स्तोत्रकर्त्याला त्याच्या शंकांवर मात करण्यास कशामुळे मदत मिळाली? तो कबूल करतो की त्याचे पाय धार्मिकतेच्या मार्गातून बहकणार होते. पण, जेव्हा त्याने “देवाच्या पवित्रस्थानात” प्रवेश केला, म्हणजेच देवाच्या निवासमंडपात किंवा मंदिरात जाऊन आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या सहवासात देवाच्या उद्देशाविषयी मनन केले तेव्हा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे पालटला. दुष्टांचे अनुकरण करण्यात काहीही अर्थ नाही हे त्याला स्पष्टपणे कळून चुकले. त्याला जाणीव झाली, की दुष्टांच्या अनैतिक आचरणामुळे व त्यांनी जीवनात घेतलेल्या अयोग्य निर्णयांमुळे जणू ते “निसरड्या जागांवर” उभे असतात. त्याने ओळखले की यहोवाला सोडून अनीती करणारे आज न उद्या, “एका क्षणात” नाश पावतील, पण जे यहोवाची सेवा करतात त्यांना तो नेहमी साहाय्य व आधार देईल. (स्तोत्र ७३:१६-१९, २७, २८ वाचा.) हे विधान किती खरे आहे हे नक्कीच तुमच्या पाहण्यात आले असेल. देवाचे नियम धाब्यावर बसवून केवळ स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जगणे हे अनेकांना योग्य आणि आकर्षक वाटू शकते, पण अशा आचरणाचे दुष्परिणाम अटळ आहेत.—गलती. ६:७-९.

१२ स्तोत्रकर्त्याच्या अनुभवावरून आपल्याला आणखी काय शिकण्यास मिळते? त्याला देवाच्या लोकांमध्ये गेल्यावरच सुरक्षितता व सुबुद्धी मिळाली. यहोवाच्या उपासनेच्या ठिकाणी गेल्यावरच त्याला सुस्पष्टपणे व योग्य प्रकारे विचार करणे शक्य झाले. आजही ख्रिस्ती मंडळीच्या सभांमध्येच आपल्याला सुज्ञ सल्ला देणारे सोबती भेटतात आणि बोधकारक आध्यात्मिक अन्‍न मिळते. म्हणूनच तर, यहोवाने आपल्या सेवकांना ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याची आज्ञा दिली आहे. येथेच त्यांना प्रोत्साहन आणि सुबुद्धीने वागण्याची प्रेरणा मिळते.—यश. ३२:१, २; इब्री १०:२४, २५.

विचारपूर्वक सोबती निवडा

१३-१५. (क) दीनाला कोणता अनुभव आला आणि यावरून कोणती गोष्ट स्पष्ट होते? (ख) ख्रिस्ती बांधवांच्या संगतीमुळे कशा प्रकारे आपले संरक्षण होते?

१३ यहोवाची उपासना न करणाऱ्‍यांची सोबत धरल्यामुळे जे संकटात सापडले त्यांपैकी याकोबाची मुलगी दीना हिचे उदाहरण लक्षात घेता येईल. उत्पत्तिच्या अहवालात असे सांगितले आहे की तिचे कुटुंब जेथे राहत होते तेथील कनानी तरुणींशी भेटायला-बोलायला ती सहसा जात असे. कनानी लोक यहोवाच्या उपासकांप्रमाणे उच्च नैतिक दर्जे पाळत नव्हते. उलट, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की कनानी लोकांच्या आचारविचारांमुळे त्यांच्या राष्ट्रात मूर्तिपूजा, अनैतिकता, उपासनेतील अतिशय घृणास्पद लैंगिक रीतिरिवाज आणि हिंसाचार यांसारख्या गोष्टींना ऊत आला होता. (निर्ग. २३:२३; लेवी. १८:२-२५; अनु. १८:९-१२) अशा लोकांची संगत धरल्यामुळे दीनाला किती वाईट परिणाम भोगावे लागले हे तुम्हाला आठवतच असेल.

१४ शखेम नावाचा एक कनानी मनुष्य, ज्याचा “मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता,” त्याची नजर दीनावर पडली आणि “तो तिला घेऊन गेला व तिजपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.” (उत्प. ३४:१, २, १९) किती दुःखाची गोष्ट! तुम्हाला काय वाटते, आपल्यासोबत असे काही घडेल याची दीनाने कल्पना तरी केली असेल का? कदाचित तिला तेथील तरुणांशी फक्‍त मैत्री करायची असेल आणि ते तरुण तितके काही वाईट नाहीत, ते आपले काही नुकसान करणार नाहीत असे कदाचित तिला वाटले असेल. पण दीनाचा तो ग्रह अगदी चुकीचा निघाला.

१५ या अहवालातून आपल्याला कोणता धडा मिळतो? हाच, की देवाची उपासना न करणाऱ्‍यांसोबत जर आपले उठणेबसणे असेल तर याचे कोणतेही दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत असा विचार करणे अगदीच चुकीचे ठरेल. बायबल सांगते की “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथ. १५:३३) दुसरीकडे पाहता, ज्यांचे तुमच्यासारखेच विश्‍वास व उच्च नैतिक दर्जे आहेत आणि जे तुमच्यासारखेच यहोवावर मनापासून प्रेम करतात त्यांची संगत धरल्याने तुमचे संरक्षण होईल. हे चांगले सोबती नेहमी तुम्हाला सुबुद्धीने वागण्याचे प्रोत्साहन देतील.—नीति. १३:२०.

‘तुम्ही धुतलेले असे झाला’

१६. प्रेषित पौलाने करिंथ येथील मंडळीतील काही जणांविषयी काय म्हटले?

१६ ख्रिस्ती मंडळीने कित्येकांना त्यांच्या पूर्वीच्या अशुद्ध सवयींपासून मुक्‍त होऊन स्वतःला शुद्ध करण्यास साहाय्य केले आहे. प्रेषित पौलाने करिंथ येथील मंडळीला पहिले पत्र लिहिले तेव्हा तेथील ख्रिश्‍चनांना देवाच्या दर्जांनुसार जीवन जगण्यासाठी कोणकोणते बदल करावे लागले याविषयी त्याने उल्लेख केला. त्यांच्यापैकी काही जण पूर्वी व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी, समलिंगी, चोर, मद्यपी इत्यादी होते. पण पौलाने त्यांना सांगितले, की ‘तुम्ही धुतलेले असे झाला.’१ करिंथकर ६:९-११ वाचा.

१७. बायबलमधील स्तरांनुसार जगल्याने कशा प्रकारे अनेकांचे जीवन बदलले आहे?

१७ ज्यांचा देवावर विश्‍वास नसतो त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करणारी कोणतीही नैतिक तत्त्वे नसतात. ते आपला मार्ग स्वतः निवडतात किंवा प्राचीन करिंथमधील बांधव ख्रिस्ती बनण्याअगोदर जसे होते त्यांच्यासारखे हे लोक देखील इतर सर्व लोकांप्रमाणे स्वैराचारी जीवन जगतात. त्यांच्या जीवनाला कोणतीही दिशा नसते. (इफिस. ४:१४) पण, देवाच्या वचनाचे व त्याच्या उद्देशाचे अचूक ज्ञान एका व्यक्‍तीचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. बायबलमधील या ज्ञानाचा जे अवलंब करतात त्यांचे जीवन सुधारते. (कलस्सै. ३:५-१०; इब्री ४:१२) आज ख्रिस्ती मंडळीचे सदस्य असणाऱ्‍यांपैकी बरेच जण तुम्हाला सांगू शकतील की कशा प्रकारे यहोवाच्या धार्मिक स्तरांबद्दल शिकण्याआधी व त्यांचा स्वीकार करण्याआधी ते नैतिकदृष्ट्या स्वैराचारी जीवन जगत होते. पण, तेव्हा ते जीवनात आनंदी व समाधानी नव्हते. त्यांनी देवाच्या लोकांसोबत सहवास राखण्यास व बायबलमधील तत्त्वांनुसार जीवनात आचरण करण्यास सुरुवात केली तेव्हा कोठे त्यांना मनःशांती लाभली.

१८. एका तरुण व्यक्‍तीला कोणता अनुभव आला आणि त्यावरून काय सिद्ध होते?

१८ याउलट, गतकाळात ज्यांनी ख्रिस्ती मंडळीच्या ‘सुरक्षित क्षेत्रापासून’ दूर जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्यापैकी काही जणांना आज त्या निर्णयाबद्दल खूप पस्तावा होत आहे. एक बहीण, जिला आपण तान्या म्हणू, सांगते की ती लहानपणापासूनच “सत्याच्या संपर्कात होती.” पण १६ वर्षांची असताना ती “जगातील आकर्षणांच्या मागे लागून” ख्रिस्ती मंडळीपासून दूर गेली. यामुळे तिला अनेक दुष्परिणाम भोगावे लागले, ज्यांपैकी नको असलेली गर्भावस्था आणि गर्भपात हे देखील होते. आता ती म्हणते: “मंडळीला सोडून गेल्यावर जी तीन वर्षं मी बाहेर घालवली त्यांत मला अतिशय वाईट अनुभव आले, ज्यांच्या दुःखद आठवणी काही केल्या माझ्या मनातून पुसल्या जात नाहीत. मी माझ्या पोटच्या बाळाचा जीव घेतला ही गोष्ट मला अजूनही रात्रंदिवस सतावते. . . . जगातली मौजमजा ‘चाखण्यासाठी’ निदान काही काळ तरी बाहेर जावे असा विचार करणाऱ्‍या सर्व तरुणांना मी कळकळीने विनंती करते की ‘असं मुळीच करू नका!’ सुरुवातीला ही मौजमजा फार हवीहवीशी वाटते, पण नंतरचे दुष्परिणाम अतिशय विषारी असतात. हे जग आपल्याला दुःखाशिवाय आणखी काहीही देऊ शकत नाही. मी अनुभवानं बोलतेय, मी ते सारं चाखलंय. तेव्हा, यहोवाच्या संघटनेतच राहा! आनंदी होण्याचा दुसरा कोणताही मार्ग जगात नाही.”

१९, २०. ख्रिस्ती मंडळीत कोणती सुरक्षितता अनुभवता येते आणि कशी?

१९ ख्रिस्ती मंडळीचे सुरक्षित वातावरण सोडून दिल्यास तुमचे जीवन कसे असेल याची कल्पना करा. सत्य स्वीकारण्याआधी आपण किती निरर्थक जीवन जगत होतो हे आठवल्यावर, पुढे आपले काय झाले असते या विचाराने आज अनेकांच्या अंगावर काटा येतो. (योहा. ६:६८, ६९) तुम्ही ख्रिस्ती बंधुभगिनींच्या निकट सहवासात राहिल्यास, सैतानाच्या जगात अगदी सर्वसामान्य असलेल्या अनेक समस्यांपासून तुम्हाला पुढेही सुरक्षितता अनुभवता येईल. बांधवांसोबत सहवास राखल्यामुळे व मंडळीच्या सभांमध्ये नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे, यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगण्यातच सुज्ञता आहे याची तुम्हाला सतत आठवण करून दिली जाईल आणि या स्तरांनुसार जगण्याचे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. स्तोत्रकर्त्याप्रमाणे ‘मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करण्याची’ ही व अशी अनेक कारणे तुमच्याजवळ आहेत.—स्तो. ३५:१८.

२० अर्थात, सर्वच ख्रिश्‍चनांना कधीकधी या ना त्या कारणामुळे अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते, जेव्हा ख्रिस्ती निष्ठा टिकवून ठेवणे त्यांना अवघड वाटते. अशा प्रसंगी त्यांना केवळ कोणीतरी योग्य दिशा दाखवणे गरजेचे असते. अशा परिस्थितीला तोंड देणाऱ्‍या बांधवांना मदत करण्यासाठी तुम्ही आणि मंडळीतील सर्वच जण काय करू शकतात? तुम्ही कशा प्रकारे तुमच्या बांधवांचे ‘सांत्वन व उन्‍नती’ करू शकता याबद्दल पुढील लेखात परीक्षण केले जाईल.—१ थेस्सलनी. ५:११.

तुमचे उत्तर काय असेल?

स्तोत्र ७३ लिहिणाऱ्‍या लेखकाच्या अनुभवांवरून आपण काय शिकू शकतो?

• दीनाच्या अनुभवावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

• ख्रिस्ती मंडळीत तुम्हाला सुरक्षितता का अनुभवता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्रे]

सुरक्षित क्षेत्रातच पोहणे उत्तम; मंडळीच्या निकट सहवासात राहा!