व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमामध्ये एकजूट वार्षिक सभेचा अहवाल

प्रेमामध्ये एकजूट वार्षिक सभेचा अहवाल

प्रेमामध्ये एकजूट वार्षिक सभेचा अहवाल

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील जर्सी सिटीत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन गृहात ३ ऑक्टोबर २००९ रोजी सकाळी अतिशय उत्साहाचे वातावरण होते. त्या दिवशी संपन्‍न होणार असलेल्या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या १२५ व्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याकरता ५,००० हून अधिक जण तेथे आले होते. शिवाय, अमेरिकेतील तीन बेथेल गृहे, तसेच कॅनडा बेथेल गृह येथे आणखी हजारो जणांनी ऑडियो/व्हिडिओ प्रक्षेपणाद्वारे हा कार्यक्रम ऐकला व पाहिला. अशा रीतीने, यहोवावरील प्रेमामुळे एकजूट असलेल्या एकूण १३,२३५ जणांनी तीन तास चाललेल्या या सभेचा आनंद घेतला.

नियमन मंडळाचे सदस्य जेफ्री जॅकसन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळले. सुरुवातीला त्यांनी बेथेल सदस्यांच्या गायकसमूहाला आमंत्रित केले, ज्यांनी नव्या गीतपुस्तकातील काही गीते सादर केली. नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य डेव्हिड स्प्लेन यांनी या गायकसमूहाचे नेतृत्त्व केले. त्यांनी शुद्ध उपासनेत संगीताचे किती महत्त्व आहे यावर थोडक्यात चर्चा केली. सभेदरम्यान उपस्थितांना तीन नवी गीते गाण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळी आधी गायकसमूहाने गीत गायिले आणि त्यानंतर गायकसमूहासोबत सर्व उपस्थितांनी ते गायिले. गायकसमूहाचा वापर खास या सभेसाठीच करण्यात आला होता. मंडळीच्या सभांमध्ये किंवा विभागीय अथवा प्रांतीय अधिवेशनांत ही पद्धत वापरली जाऊ नये.

शाखा कार्यालयांचे अहवाल

पाहुणे म्हणून आलेल्या ५ शाखा समिती सदस्यांनी आपापल्या शाखा कार्यालयांचा अहवाल सादर केला. केनेथ लिटल यांनी सांगितले की लवकरच अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांसाठी नियतकालिकांची छपाई प्रामुख्याने कॅनडातच केली जाईल. यामुळे कॅनडाच्या शाखा कार्यालयाच्या उत्पादनात दहा पटीने वाढ होणार आहे. कामाचा हा भार सांभाळण्यासाठी नवीनच विकत घेतलेली प्रिंटिंग प्रेस दररोज दोन पाळ्यांमध्ये म्हणजे एकूण १६ तास चालवली जाईल.

रेनर थॉमसन यांनी डोमिनिकन प्रजासत्ताक येथील कार्याचा अहवाल दिला, तर ॲल्बर्ट ओली यांनी नायजीरिया येथील कार्याविषयी माहिती दिली. मोझंबिकहून आलेल्या एमील क्रिट्‌सिंगर यांनी सांगितले की अनेक दशके छळ सोसल्यानंतर १९९२ साली यहोवाच्या साक्षीदारांची या देशात अधिकृत नोंदणी झाली. या तिन्ही देशांत अलीकडे प्रचारकांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया शाखा कार्यालयाचे व्हिव्ह मॉरिट्‌झ यांनी त्यांच्या शाखेच्या देखरेखीखाली असलेल्या पूर्व तिमोर या देशातील घडामोडींविषयी सांगितले.

नियमन मंडळाच्या समित्या

१९७६ साली यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व कार्यहालचाली नियमन मंडळाच्या सहा समित्यांच्या देखरेखीखाली संघटित करण्यात आल्या. काही काळानंतर, दुसऱ्‍या मेंढरांपैकी काही सदस्यांना नियमन मंडळातील बांधवांचे साहाय्यक म्हणून नेमण्यात आले. सध्या असे २३ बांधव साहाय्यक म्हणून कार्य करत आहेत. यांपैकी सहा बांधवांची मुलाखत घेण्यात आली. पूर्ण वेळेच्या सेवेत या सर्व बांधवांनी मिळून एकूण ३४१ वर्षे, म्हणजे प्रत्येकाने सरासरी ५७ वर्षे घालवली आहेत.

१९४३ साली बेथेलला आलेल्या डॉन ॲडम्स यांनी सांगितले की संयोजक समिती (कोऑर्डिनेटर्स कमिटी) ही इतर पाच समित्यांच्या संयोजकांची बनलेली आहे. पाचही समित्या एकमेकांसोबत सुरळीतपणे कार्य करतील याची ही संयोजक समिती काळजी घेते. आणीबाणीचे प्रसंग, छळ, न्यायालयीन खटले तसेच जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांवर प्रभाव पाडणाऱ्‍या इतर निकडीच्या परिस्थितींत ही समिती आवश्‍यक पावले उचलते.

डॅन मॉल्चन यांनी कर्मचारी समितीच्या (पर्सनेल कमिटी) कार्याची माहिती दिली. ही समिती जगभरातील १९,८५१ बेथेल सदस्यांच्या आध्यात्मिक व शारीरिक गरजांची काळजी घेते. प्रकाशन समिती (पब्लिशिंग कमिटी) कशा प्रकारे शाखा कार्यालयांसाठी साहित्यसामग्री खरेदी करण्याच्या कामावर देखरेख करते यावर डेव्हिड सिंक्लेअर यांनी प्रकाश टाकला. यानंतर, जवळजवळ ६० वर्षांपासून बेथेलमध्ये सेवा करत असलेल्या रॉबर्ट वॉलन यांनी सेवा समितीविषयी (सर्व्हिस कमिटी) माहिती दिली. ही समिती यहोवाच्या साक्षीदारांच्या, क्षेत्रातील व मंडळ्यांमधील कार्यांची देखरेख करते. विल्यम मॅलनफॉन्ट यांनी अधिवेशनाचे कार्यक्रम तयार करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्‍या शिक्षण समितीविषयी (टीचिंग कमिटी) सांगितले. शेवटी, जॉन विस्चक यांनी आपल्या प्रकाशनांतील मजकूर काळजीपूर्वक तयार करण्यात लेखन समितीची (रायटिंग कमिटी) काय भूमिका आहे ते समजावून सांगितले. *

२०१० सालचे वार्षिक वचन प्रेमावर लक्ष केंद्रित करते

पुढील तीन भाषणे नियमन मंडळाच्या सदस्यांनी दिली. सर्वप्रथम गेरिट लॉश यांनी “इतरांनी आपल्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटते का?” या विषयावर भाषण दिले. इतरांचे प्रेम मिळावे ही मानवांची एक मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण झाल्यास आपले जीवन अधिक आनंददायक व तृप्तीदायक बनते. खरेतर प्रेमामुळेच आपण आज अस्तित्वात आहोत कारण निःस्वार्थ प्रेमाने प्रेरित होऊनच यहोवाने आपली निर्मिती केली. आपण प्रचार करतो आणि लोकांना देवाबद्दल शिकवतो ते देखील यहोवाबद्दल मनःपूर्वक प्रेम असल्यामुळेच.

बायबलमधील तत्त्वांवर आधारित असलेले प्रेम हे फक्‍त आपल्या शेजाऱ्‍यांपुरतेच मर्यादित नाही. तर, आपल्या शत्रूंवरही आपण प्रेम केले पाहिजे. (मत्त. ५:४३-४५) येशूने आपल्याकरता किती छळ सोसला याकडे वक्त्यांनी लक्ष वेधले. त्याला फटके मारण्यात आले, लोकांनी त्याची थट्टा केली, ते त्याच्यावर थुंकले आणि शेवटी त्यांनी त्याला वधस्तंभाला खिळले. पण इतके होऊनही येशूला वधस्तंभाला खिळणाऱ्‍या शिपायांसाठी त्याने प्रार्थना केली. यावर मनन केल्यावर आपण येशूवर अधिकच प्रेम करण्यास प्रवृत्त होत नाही का? यानंतर बंधू लॉश यांनी सन २०१० चे वार्षिक वचन घोषित केले: १ करिंथकर १३:७, ८, NW, ‘प्रेम सर्वकाही सहन करते. प्रेमाचा कधीही अंत होत नाही.’ आपल्याला फक्‍त सर्वकाळ जगण्याचीच आशा नाही तर सर्वकाळ प्रेम करत राहण्याची व ते अनुभवण्याचीही आशा आहे.

तुमची “टाकी” रिकामी झाली आहे का?

सॅम्युल हर्ड यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका उदाहरणाने केली. कल्पना करा की तुम्ही एका मित्रासोबत त्याच्या गाडीतून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी जायला निघाला आहात. गाडीत मित्राच्या शेजारी बसलेले असताना तुमची नजर इंधनाच्या काट्यावर पडते आणि गाडीतले पेट्रोल जवळजवळ संपले आहे असे तुमच्या लक्षात येते. तुम्ही लगेच तुमच्या मित्राला हे सांगता, पण तो तुम्हाला म्हणतो की काळजी करण्याची गरज नाही, अजून कमीतकमी चार लिटर पेट्रोल गाडीत नक्कीच असेल. पण लवकरच, ज्याची तुम्हाला भीती होती तेच घडते, गाडीतले पेट्रोल संपते. ‘रिकाम्या टाकीवर’ गाडी चालवून रस्त्यात मधेच कोठेतरी अडकून पडण्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा टाकी पूर्ण भरलेली असल्यास तुम्ही किती निश्‍चिंत होऊन गाडी चालवू शकाल! आध्यात्मिकदृष्ट्या आपली टाकीही यहोवाच्या ज्ञानाने नेहमी भरलेली असली पाहिजे.

यासाठी वेळोवेळी आपली टाकी भरून घेणे गरजेचे आहे. आणि हे आपण चार मार्गांनी करू शकतो. सर्वप्रथम, वैयक्‍तिक अभ्यास करण्याद्वारे, अर्थात दररोज बायबल वाचून त्याचे चांगले ज्ञान मिळवण्याद्वारे. पण, फक्‍त वरवर वाचणे पुरेसे नाही. तर, आपण जे वाचतो ते नीट समजूनही घेतले पाहिजे. दुसरा मार्ग म्हणजे कौटुंबिक उपासनेसाठी राखून ठेवलेल्या खास संध्येचा पुरेपूर लाभ घेणे. दर आठवडी आपण आपली टाकी पूर्णपणे भरून घेतो का, की फक्‍त थोडेसेच इंधन त्यात टाकतो? तिसरा मार्ग म्हणजे, मंडळीतील अभ्यास व सभांना उपस्थित राहणे. आणि चौथा मार्ग म्हणजे यहोवाच्या मार्गांविषयी कोणत्याही व्यत्ययाशिवाय, शांतपणे विचार करण्यासाठी वेळ काढणे. स्तोत्र १४३:५ म्हणते: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.”

‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील’

जॉन बार यांनी तिसरे आणि शेवटचे भाषण दिले. त्यात त्यांनी येशूने दिलेल्या गहू व निदणाच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण केले. (मत्त. १३:२४-३०, ३८, ४३) या दृष्टान्तात ‘कापणीच्या’ काळाबद्दल सांगितले आहे, ज्यादरम्यान ‘राज्याच्या पुत्रांना’ गोळा केले जाते आणि निदण जाळून टाकण्यासाठी गव्हापासून वेगळे केले जाते.

बंधू बार यांनी स्पष्ट केले की हे गोळा केले जाणे सर्वकाळ चालणार नाही. त्यांनी मत्तय २४:३४ चा उल्लेख केला ज्यात असे म्हटले आहे: “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” पुढील विधान त्यांनी दोन वेळा वाचून दाखवले: “येशूच्या म्हणण्याचा असा अर्थ होता, की १९१४ साली शेवटल्या काळाचे चिन्ह दिसण्यास सुरुवात झाली तेव्हा हयात असलेल्या अभिषिक्‍त जनांचे समकालीन, ज्यांपैकी काहींचा कदाचित त्यांच्या नंतर जन्म झाला असेल, पण जे त्यांच्या जीवनकाळात त्यांच्यासोबत हयात होते असे इतर अभिषिक्‍त जन मोठ्या संकटाची सुरुवात पाहतील.” “ही पिढी” किती मोठी असेल हे आपण अचूकपणे सांगू शकत नसलो, तरी अभिषिक्‍त जनांच्या या दोन समकालीन गटांचा तिच्यात समावेश होतो. अभिषिक्‍त जन वेगवेगळ्या वयोगटांतले असले, तरीसुद्धा येशूने सांगितलेल्या पिढीत समाविष्ट असलेल्या या दोन गटांतील अभिषिक्‍त जन शेवटल्या काळात निदान काही काळ सोबत राहतात. १९१४ साली चिन्ह दिसण्यास सुरुवात झाली तेव्हा ज्यांनी ते ओळखले होते, त्या वयस्क अभिषिक्‍त जनांपेक्षा वयाने कमी असलेल्या त्यांच्या समकालीन अभिषिक्‍त जनांपैकी सर्वांचा मृत्यू होण्याअगोदर मोठे संकट सुरू होईल हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो!

‘राज्याचे पुत्र’ आपल्या स्वर्गीय प्रतिफळाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण आपण सर्वांनी शेवटपर्यंत विश्‍वासू राहून देवाच्या सेवेत ज्वलंत आवेश टिकवून ठेवला पाहिजे. आपल्या काळात “गहू” गोळा केला जात असताना, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची किती अद्‌भुत सुसंधी आपल्याला लाभली आहे!

समाप्तीच्या गीतानंतर, शेवटली प्रार्थना नियमन मंडळाचे थिओडोर जॅरझ यांनी केली. आणि अशा रीतीने वार्षिक सभेच्या या अत्यंत उभारणीकारक कार्यक्रमाची सांगता झाली!

[तळटीप]

^ परि. 10 नियमन मंडळाच्या सहा समित्यांच्या कार्याविषयी माहितीकरता टेहळणी बुरूज मे १५, २००८ अंकातील पृष्ठ २९ पाहा.

[५ पानांवरील मथळा]

वडिलांकरता प्रशाला

वार्षिक सभेत, नियमन मंडळाचे सदस्य ॲन्थनी मॉरिस यांनी मंडळीच्या वडिलांकरता असलेला खास प्रशिक्षणाचा कार्यक्रम पुढेही सुरू राहणार असल्याची घोषणा केली. सन २००८ च्या सुरुवातीला अमेरिकेतील वडिलांकरता न्यू यॉर्क येथील पॅटरसनच्या शैक्षणिक केंद्रात एक प्रशाला सुरू करण्यात आली होती. वार्षिक सभेच्या वेळी या प्रशालेचा ७२ वा वर्ग नुकताच संपला होता आणि तोपर्यंत ६,७२० वडिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला होता. पण, अजूनही बरेच काम बाकी आहे. एकट्या अमेरिकेतच ८६,००० पेक्षा जास्त वडील आहेत. म्हणूनच, नियमन मंडळाने ७ डिसेंबर २००९ पासून न्यू यॉर्क येथील ब्रुकलिनमध्ये अशीच आणखी एक प्रशाला सुरू करण्याच्या योजनेला संमती दिली.

या योजनेनुसार सर्वप्रथम चार प्रवासी पर्यवेक्षकांना प्रशिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी पॅटरसन येथे खास प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यानंतर त्यांना प्रशालेत शिकवण्यासाठी ब्रुकलिनला पाठवले जाणार होते आणि त्यांच्या जागी आणखी चार प्रवासी पर्यवेक्षकांना प्रशिक्षित केले जाणार होते. मग हे चार बांधव ब्रुकलिनमधील प्रशालेत जाऊन शिकवणार होते आणि पहिले चार जण संमेलन गृहांत व राज्य सभागृहांत भरवल्या जाणाऱ्‍या प्रशालांत शिकवण्यास जाणार होते. अमेरिकेत इंग्रजीमधून दर आठवडी सहा प्रशालांमध्ये शिकवायला एकूण १२ प्रशिक्षक तयार होईपर्यंत हे चालू राहणार होते. यानंतर स्पॅनिश भाषेतून शिकवण्याकरता चार प्रशिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार होते. ही प्रशाला सध्याच्या राज्य सेवा प्रशालेची जागा घेणार नाही. या नव्या प्रशालेचा उद्देश वडिलांना आध्यात्मिक रीत्या अधिक मजबूत करण्याचा आहे. २०११ च्या सेवा वर्षापासून सबंध जगभरातील शाखा कार्यालये, संमेलन गृहांत व राज्य सभागृहांत ही प्रशाला सुरू करतील.

[४ पानांवरील चित्रे]

वार्षिक सभेची सुरुवात “यहोवाचे गुणगान करा” (इंग्रजी) या नव्या गीत पुस्तकातील एका गीताच्या गायनाने झाली