व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडळीला बळकट करत राहा

मंडळीला बळकट करत राहा

मंडळीला बळकट करत राहा

“एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नति करा.”—१ थेस्सलनी. ५:११.

१. ख्रिस्ती मंडळीचे सदस्य असल्यामुळे कोणकोणते आशीर्वाद लाभतात, पण काहींना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल?

 ख्रिस्ती मंडळीचे सदस्य असणे हा खरोखरच किती मोठा बहुमान आहे! यामुळे तुम्ही यहोवाच्या जवळ येता. तसेच, मार्गदर्शनाकरता त्याच्या वचनावर अवलंबून राहिल्यामुळे ख्रिश्‍चनांकरता अनुचित असलेली जीवनशैली तुम्ही टाळता व त्याच्या अनिष्ट परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करता. याशिवाय, तुमच्या भल्याचा विचार करणारे कितीतरी खरे मित्रही तुम्हाला लाभतात. होय, ख्रिस्ती मंडळीचा भाग असल्यामुळे असे असंख्य आशीर्वाद अनुभवायला मिळतात. पण, मंडळीतील बरेच जण मात्र कोणत्या ना कोणत्या समस्येशी संघर्ष करत असतील. यांपैकी काहींना देवाच्या वचनातील गहन गोष्टी समजण्यास मदत हवी असेल. इतर काही जण आजाराने किंवा नैराश्‍याने ग्रस्त असतील किंवा आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे दुष्परिणाम ते सहन करत असतील. शिवाय, देवाला न मानणाऱ्‍या लोकांमध्ये आपल्या सर्वांनाच राहावे लागते.

२. आपल्या बांधवांना दुःखसंकटांचा सामना करावा लागतो तेव्हा आपण काय केले पाहिजे आणि का?

आपल्यापैकी कोणालाही, हालअपेष्टांना तोंड देणाऱ्‍या आपल्या बांधवांचे दुःख पाहवत नाही. प्रेषित पौलाने ख्रिस्ती मंडळीची तुलना मानवी शरीराशी करत म्हटले: “एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते.” (१ करिंथ. १२:१२, २६) म्हणूनच, दुःखसंकटांचा सामना करत असलेल्या आपल्या बंधुभगिनींच्या मदतीला आपण धावून आले पाहिजे. मंडळीतील सदस्यांनी आपल्या बांधवांना संकटांना तोंड देण्यास व त्यांवर मात करण्यास कशा प्रकारे मदत केली याची अनेक उदाहरणे बायबलमध्ये आढळतात. यांपैकी काहींचे आता आपण परीक्षण करू या. त्यांचे परीक्षण करत असताना संकटे सोसणाऱ्‍या बांधवांची मदत तुम्ही कशी करू शकता याचा विचार करा. तुमच्या बंधुभगिनींना यहोवाची सेवा करत राहण्यास साहाय्य करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, आणि असे करण्याद्वारे यहोवाच्या मंडळीला तुम्ही बळकट कसे करू शकता?

‘त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतले’

३, ४. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी कशा प्रकारे अपुल्लोची मदत केली?

अपुल्लो इफिसमध्ये राहायला आला त्याआधीपासूनच तो एक आवेशी सुवार्तिक होता. त्याच्याविषयी प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील वृत्तांत म्हणतो: “तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.” अपुल्लोला “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” घेतला जाणारा बाप्तिस्मा ठाऊक नव्हता. त्याअर्थी, त्याला सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या शिष्यांनी किंवा येशूच्या अनुयायांनी साक्ष दिली असावी. अपुल्लो एक आवेशी सुवार्तिक असला तरी काही महत्त्वाचे विषय त्याला अद्याप माहीत नव्हते. मग या विषयांची अचूक समज प्राप्त करण्यात सहविश्‍वासू बांधवांचा सहवास त्याला कसा साहाय्यक ठरला?—प्रे. कृत्ये १:४, ५; १८:२५; मत्त. २८:१९.

अक्विल्ला व प्रिस्किल्ला या ख्रिस्ती जोडप्याने अपुल्लो यास सभास्थानात धैर्याने बोलताना ऐकले तेव्हा त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलावून घेतले व देवाच्या मार्गांविषयी त्याला आणखी चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६ वाचा.) त्यांचे हे कृत्य नक्कीच प्रेमळपणाचे होते. अर्थात, अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी हे खूप विचारपूर्वक केले असावे. आपली टीका केली जात आहे असे अपुल्लोला वाटू न देता त्याला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी असे केले. अपुल्लोला सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीचा इतिहास माहीत नव्हता एवढेच. आणि अशा महत्त्वाच्या विषयाची माहिती या नवीन सोबत्यांनी त्याला दिल्याबद्दल त्याने नक्कीच त्यांचे खूप आभार मानले असावेत. या माहितीच्या बळावर अपुल्लोने अखया प्रांतातील आपल्या बांधवांना “फार साहाय्य” केले व जोरदार साक्ष दिली.—प्रे. कृत्ये १८:२७, २८.

५. आज हजारो राज्य प्रचारक प्रेमळपणे कोणती मदत करतात आणि याचा सहसा काय परिणाम दिसून येतो?

ख्रिस्ती मंडळीतील अनेकांना इतरांनी बायबल समजण्यास मदत केली आहे आणि अशांबद्दल त्यांना मनस्वी कृतज्ञता वाटते. या विद्यार्थी-शिक्षक नातेसंबंधांतून कितीतरी अतूट मैत्रीसंबंध निर्माण झाले आहेत. बरेचदा, लोकांना बायबलमधील सत्ये समजण्यास मदत करण्यासाठी कित्येक महिने नियमितपणे त्यांच्याशी संभाषण करणे जरुरीचे असते. पण, हे त्याग करण्यास राज्य प्रचारक मागेपुढे पाहत नाहीत. कारण हा जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे याची त्यांना जाणीव असते. (योहा. १७:३) सरतेशेवटी, लोक सत्य शिकून घेतात, त्यानुसार जीवन जगतात व यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपले जीवन वेचतात हे पाहून आपल्याला किती आनंद होतो!

‘ते त्याला नावाजीत होते’

६, ७. (क) पौलाने आपला प्रवासी सोबती म्हणून तीमथ्याची निवड का केली? (ख) पौलाच्या सहवासामुळे तीमथ्याने कितपत प्रगती केली?

आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी प्रेषित पौल आणि सीला यांनी लुस्त्राला भेट दिली तेव्हा तीमथ्य नावाचा एक तरुण त्यांना भेटला. त्या वेळी तीमथ्य एकोणीस-वीस वर्षांचा असावा. “त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधु नावाजीत होते.” तीमथ्याची आई युनीके आणि आजी लोईस समर्पित ख्रिस्ती होत्या. त्याचे वडील मात्र ख्रिस्ती नव्हते. (२ तीम. १:५) काही वर्षांपूर्वी पौलाने पहिल्यांदा या ठिकाणी भेट दिली तेव्हा त्याची व या कुटुंबाची ओळख झाली असावी. पण, या वेळी मात्र पौलाने तीमथ्याबद्दल खास आस्था दाखवली, कारण तो इतरांपेक्षा वेगळा असल्याचे पौलाला दिसून आले. त्यामुळे स्थानिक वडील वर्गाच्या संमतीने तीमथ्य मिशनरी कार्यात पौलाचा साहाय्यक बनला.—प्रेषितांची कृत्ये १६:१-३ वाचा.

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या या सोबत्याकडून तीमथ्याला बरेच काही शिकण्यासारखे होते. पौलाच्या सहवासात राहून त्याने इतकी प्रगती केली की पौल मोठ्या आत्मविश्‍वासाने त्याला मंडळ्यांना भेटी देण्यास व आपला प्रतिनिधी या नात्याने सेवा करण्यास पाठवू शकला. पंधराएक वर्षे पौलाच्या सहवासात राहिल्यामुळे कमी अनुभव असलेल्या व कदाचित स्वभावाने बुजरा असलेल्या या तरुणाने एक उत्तम पर्यवेक्षक बनण्याइतपत प्रगती केली.—फिलिप्पै. २:१९-२२; १ तीम. १:३.

८, ९. मंडळीतील सदस्य तरुणांना कसे प्रोत्साहन देऊ शकतात? याचे एक उदाहरण द्या.

आज ख्रिस्ती मंडळीत असलेल्या अनेक तरुण स्त्री-पुरुषांमध्ये खूप काही करण्याची क्षमता आहे. त्यांना मंडळीतील आध्यात्मिक मनोवृत्तीच्या सोबत्यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले तर हे तरुण आध्यात्मिक प्रगती करून यहोवाच्या संघटनेत मोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळण्यास पुढे येऊ शकतात. तुमच्या स्वतःच्या मंडळीचाच विचार करा! तुमच्या मंडळीत, तीमथ्याप्रमाणेच सेवा करण्यास इच्छुक असलेले तरुण आहेत का? अशांना तुम्ही मदत केली व त्यांना उत्तेजन दिले तर पुढे ते पायनियर, बेथेल सदस्य, मिशनरी किंवा प्रवासी पर्यवेक्षक होऊ शकतात. मग, अशी ध्येये गाठण्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता?

मार्टिन नावाचा एक बांधव गेल्या २० वर्षांपासून बेथेलमध्ये सेवा करत आहे. तब्बल ३० वर्षांपूर्वी, एका विभागीय पर्यवेक्षकांसोबत क्षेत्र सेवा करत असताना त्यांनी त्याच्याबद्दल किती आत्मीयता दाखवली होती याची मोठ्या कृतज्ञतेने तो आठवण करतो. तरुण असताना विभागीय पर्यवेक्षकांनी स्वतः बेथेलमध्ये सेवा केली होती आणि त्याविषयी ते मार्टिनशी भरभरून बोलले होते. त्यांच्यासारखेच मार्टिननेसुद्धा यहोवाच्या संघटनेत सेवा करण्याच्या शक्यतेवर विचार करावा असे प्रोत्साहन त्यांनी त्याला दिले होते. मार्टिनला असे वाटते, की त्याने पुढे जे निर्णय घेतले ते या अविस्मरणीय संभाषणामुळेच. कोण जाणे, तुमच्या तरुण मित्रांसोबत आध्यात्मिक ध्येये राखण्याबद्दल तुम्ही केलेल्या संभाषणाचा पुढे कोणता चागंला परिणाम होईल!

“जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या”

१०. एपफ्रदीताला कसे वाटले व का?

१० एपफ्रदीताने, ख्रिस्ती विश्‍वासासाठी तुरुंगात असलेल्या प्रेषित पौलाला भेटण्याकरता फिलिप्पै ते रोम असा लांबचा, थकवून टाकणारा प्रवास केला. तो फिलिप्पैकरांचा जासूद या नात्याने पौलाला भेटायला गेला व सोबत फिलिप्पैकरांनी पौलासाठी पाठवलेल्या वस्तू घेऊन गेला. इतकेच नव्हे, तर या कठीण प्रसंगी पौलासोबत राहून त्याला आवश्‍यक मदत करण्याचाही त्याचा बेत होता. पण, रोममध्ये असताना एपफ्रदीत इतका आजारी पडला की तो “खरोखर मरणोन्मुख झाला होता.” आपल्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी निभावण्यात आपण अपयशी ठरलो या विचाराने तो निराश झाला.—फिलिप्पै. २:२५-२७.

११. (क) मंडळीतील काहींना नैराश्‍याने ग्रासले असल्यास आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये? (ख) एपफ्रदीताला मदत करण्यासाठी काय करण्यात यावे असे पौलाने म्हटले?

११ आज अनेक लोक जीवनातील निरनिराळ्या दबावांमुळे नैराश्‍याला बळी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार जगातील ५ जणांपैकी १ जण आयुष्यात कधी ना कधी नैराश्‍याला बळी पडतो. याला यहोवाचे उपासक देखील अपवाद नाहीत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासंबंधी समस्या, आरोग्य समस्या, अपयशामुळे येणारे नैराश्‍य किंवा इतर काही कारणांमुळे एक व्यक्‍ती अतिशय खचून जाऊ शकते. निराश झालेल्या एपफ्रदीताला मदत करण्यासाठी फिलिप्पैकर मंडळीतील बांधव काय करू शकत होते? पौलाने लिहिले: “प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा; कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.”—फिलिप्पै. २:२९, ३०.

१२. निराश झालेल्या बांधवांचे कशा प्रकारे सांत्वन केले जाऊ शकते?

१२ आपण देखील मंडळीतील निरुत्साही किंवा निराश झालेल्या बांधवांना दिलासा दिला पाहिजे. यहोवाच्या सेवेत त्यांनी जे काही केले आहे त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यासारखे नक्कीच काही ना काही असू शकते. उदाहरणार्थ, सत्यात येण्यासाठी किंवा पूर्ण-वेळची सेवा करण्यासाठी त्यांनी कदाचित आपल्या जीवनात मोठे बदल केले असतील. त्याबद्दल आपण मनापासून त्यांची कदर करतो आणि यहोवाला देखील त्यांची तितकीच कदर वाटते याचे आश्‍वासन आपण त्यांना देऊ शकतो. हे विश्‍वासू बांधव, वाढत्या वयामुळे किंवा ढासळत्या आरोग्यामुळे पूर्वीइतकी यहोवाची सेवा करू शकत नसले, तरी इतकी वर्षे विश्‍वासूपणे त्याची सेवा केल्याबद्दल ते आपल्या आदरास पात्र आहेत. बांधवांच्या निराशेचे कारण काहीही असो, यहोवा आपल्या सर्व विश्‍वासू सेवकांना असा सल्ला देतो: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनी. ५:१४.

“त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे”

१३, १४. (क) करिंथच्या ख्रिस्ती मंडळीने कोणते कडक पाऊल उचलले आणि का? (ख) पाप करणाऱ्‍या मनुष्याला मंडळीतून बहिष्कृत केल्याचा काय परिणाम झाला?

१३ पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत एक समस्या निर्माण झाली होती. त्या मंडळीतील एक पुरुष जारकर्म करत होता व त्याबद्दल त्याला काहीएक वाटत नव्हते. त्याच्या या दुराचरणामुळे मंडळीची शुद्धता तर धोक्यात आलीच होती, शिवाय ख्रिस्ती नसलेल्या लोकांनासुद्धा त्याचे हे आचरण धक्केदायक वाटले होते. म्हणूनच, अशा मनुष्याला मंडळीतून घालवून देण्यात यावे असा उचित सल्ला पौलाने दिला.—१ करिंथ. ५:१, ७, ११-१३.

१४ या ताडनाचा नक्कीच चांगला परिणाम झाला. मंडळीचे दूषित होण्यापासून संरक्षण झाले. शिवाय, त्या पापी मनुष्याला आपली चूक कळून आली व त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला. त्याला खरोखर पस्तावा झाला आहे हे त्याच्या कार्यांवरून सिद्ध झाले तेव्हा मंडळीत त्याचा बंधू म्हणून स्वीकार करण्यात यावा असे पौलाने त्या मंडळीला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात सुचवले. पण, इतकेच पुरेसे नव्हते. पौलाने मंडळीला असेही सुचवले की, त्यांनी “[त्या पश्‍चात्तापी मनुष्याला] क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाही तर तो दुःखसागरात बुडून जावयाचा.”२ करिंथकर २:५-८ वाचा.

१५. आपल्या चुकीबद्दल पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व मंडळीत पुनर्स्थापित केलेल्या व्यक्‍तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?

१५ या वृत्तांतावरून आपण काय शिकू शकतो? एखाद्या व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत करावे लागते तेव्हा नक्कीच आपल्याला खूप दुःख होते. तिने केलेल्या चुकीमुळे कदाचित देवाच्या नावाचा अवमान झाला असेल किंवा ख्रिस्ती मंडळीचे चांगले नाव कलंकित झाले असेल. तिने कदाचित आपल्याविरुद्ध देखील पाप केले असेल. असे असले, तरी त्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेले वडील, देवाच्या वचनाला अनुसरून त्या पश्‍चात्तापी व्यक्‍तीचा मंडळीत पुन्हा स्वीकार करण्याचा निर्णय घेतात तेव्हा यहोवाने त्या व्यक्‍तीला क्षमा केली आहे हे सूचित होते. (मत्त. १८:१७-२०) मग आपणसुद्धा त्या व्यक्‍तीला क्षमा करू नये का? अशा व्यक्‍तीशी कठोरपणे वागून त्याला क्षमा करण्यास नाकारण्याचा अर्थ यहोवाचा विरोध करण्यासारखे आहे. तेव्हा, मंडळीत शांती व एकतेची भावना वाढीस लावण्याच्या तसेच यहोवाची स्वीकृती प्राप्त करण्याच्या हेतूने, मनापासून पश्‍चात्ताप केलेल्या व मंडळीत पुनर्स्थापित करण्यात आलेल्या व्यक्‍तीवर ‘आपली प्रीती असल्याची खातरी करून देणे’ उचित ठरणार नाही का?—मत्त. ६:१४, १५; लूक १५:७.

“तो सेवेसाठी मला उपयोगी आहे”

१६. मार्कामुळे पौलाचे मन का दुखावले होते?

१६ आणखी एक बायबल वृत्तांत दाखवून देतो, की ज्यांनी आपले मन दुखावले आहे अशांविषयी आपण मनात नकारार्थी भावना बाळगू नये. उदाहरणार्थ, बायबलमध्ये ज्याला मार्कही म्हटले आहे त्या योहानाने प्रेषित पौलाचे मन खूप दुखावले होते. ते कसे? पौल आणि बर्णबा आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यावर निघाले तेव्हा त्यांची मदत करण्यासाठी मार्कही त्यांच्यासोबत गेला. पण, प्रवासात एका ठिकाणी योहान मार्क मध्येच आपल्या सोबत्यांना सोडून घरी परतला. त्याने असे का केले असावे याचे नेमके कारण बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण, त्याच्या या निर्णयामुळे पौलाचे मन इतके दुखावले होते, की आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याची योजना आखताना मार्काला आपल्यासोबत घ्यावे की नाही यावरून पौल आणि बर्णबा यांच्यात वाद झाला. पहिल्या दौऱ्‍याच्या वेळी जे काही घडले होते ते लक्षात घेता मार्काने आपल्यासोबत येऊ नये असे पौलाचे मत होते.प्रेषितांची कृत्ये १३:१-५, १३; १५:३७, ३८ वाचा.

१७, १८. पौल आणि मार्क यांच्यातील मतभेद मिटला होता हे कशावरून दिसून येते आणि त्यापासून आपण काय शिकू शकतो?

१७ पौलाने आपल्याला नाकारले या विचाराने मार्क मुळीच खचून गेला नाही. पुढे जे काही घडले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. मार्काने दुसऱ्‍या क्षेत्रात बर्णबासोबत आपले मिशनरी कार्य चालू ठेवले. (प्रे. कृत्ये १५:३९) याच्या काही वर्षांनंतर पौलाने त्याच्याबद्दल जे काही म्हटले त्यावरून तो किती विश्‍वासू व भरवशालायक होता हे सिद्ध होते. रोममध्ये तुरुंगात असताना पौलाने तीमथ्याला पत्र लिहून आपल्याकडे बोलावून घेतले. त्याच पत्रात पौलाने म्हटले: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.” (२ तीम. ४:११) होय, पौलाच्या दृष्टीने मार्काने नक्कीच उत्तम प्रगती केली होती.

१८ या वृत्तांतावरून आपण एक धडा शिकू शकतो. मार्काने आपल्यामध्ये एका उत्तम मिशनऱ्‍याचे गुण विकसित केले होते. सुरुवातीला पौलाने आपल्याला नाकारले म्हणून तो अडखळला नाही. पौल आणि मार्क दोघेही आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ होते आणि त्यांनी कटू भावनांना आपल्या मनात घर करू दिले नाही. उलट, मार्क आपल्यासाठी एक उत्तम साहाय्यक होऊ शकतो हे पौलाने नंतर ओळखले. तर मग, बांधव आपसांतील मतभेद मिटवतात व समस्या नाहीशा होतात तेव्हा झाले गेले विसरून स्वतः आध्यात्मिक प्रगती करत राहणे व इतरांनाही प्रगती करण्यास मदत करणेच केव्हाही योग्य ठरणार नाही का? इतरांमधील चांगले गुण ओळखल्याने नक्कीच मंडळी बळकट होते.

मंडळीतील तुमची भूमिका

१९. एकमेकांना मदत करण्यासाठी मंडळीतील सर्व सदस्य काय करू शकतात?

१९ या ‘कठीण काळात’ राहत असताना तुम्हाला मंडळीतील बंधुभगिनींच्या मदतीची व त्यांनाही तुमच्या मदतीची गरज आहे. (२ तीम. ३:१) कधीकधी, एखादी समस्या यशस्वीपणे सोडवण्यासाठी नेमके काय करावे हे कदाचित एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला माहीत नसेल. पण, ती समस्या सोडवण्याचा नेमका मार्ग यहोवाला माहीत आहे. आणि याबाबतीत योग्य पाऊल उचलण्यास त्यांना मदत करण्यासाठी तो मंडळीतील निरनिराळ्या सदस्यांचा, तुमचा देखील उपयोग करू शकतो. (यश. ३०:२०, २१; ३२:१, २) तेव्हा, पौलाने दिलेल्या सल्ल्याचे मनापासून पालन करा! त्याने म्हटले: “एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नति करा; असे तुम्ही करीतच आहा.”—१ थेस्सलनी. ५:११.

तुमचे उत्तर काय असेल?

• ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांना एकमेकांच्या आधाराची गरज का आहे?

• तुम्ही इतरांना कोणकोणत्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकता?

• आपल्याला मंडळीतील सदस्यांच्या मदतीची गरज का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

एखादा ख्रिस्ती बांधव कठीण समस्येचा सामना करत असल्यास आपण त्याला आधार देऊ शकतो

[१२ पानांवरील चित्र]

आज ख्रिस्ती मंडळीतील अनेक तरुण स्त्री-पुरुषांमध्ये खूप काही करण्याची क्षमता आहे