व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रागावर नियंत्रण ठेवण्याद्वारे ‘वाइटाला जिंका’

रागावर नियंत्रण ठेवण्याद्वारे ‘वाइटाला जिंका’

रागावर नियंत्रण ठेवण्याद्वारे ‘वाइटाला जिंका’

‘प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंका.’—रोम. १२:१९, २१.

१, २. काही साक्षीदारांनी कोणते चांगले उदाहरण मांडले?

 एका शाखा कार्यालयाच्या समर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चौतीस यहोवाचे साक्षीदार विमानाने प्रवास करत होते. पण मधेच विमानात काही यांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे जेथे इंधन भरण्यासाठी केवळ एक तास थांबायचे होते, तेथे चक्क ४४ तास थांबावे लागले, तेही अशा एका दुर्गम भागातील विमातळावर जेथे खाण्यापिण्याच्या किंवा स्वच्छतेच्या पुरेशा सोयी नव्हत्या. यामुळे बहुतेक प्रवासी संतापले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्‍यांना त्यांनी धमकी दिली. पण, यहोवाचे साक्षीदार मात्र शांत राहिले.

अखेरीस, साक्षीदार समर्पण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले आणि त्यांना कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाला उपस्थित राहता आले. ते इतके दमलेले असले, तरी स्थानिक बंधुभगिनींच्या सहवासाचा आनंद घेता यावा म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर बराच वेळ ते थांबून राहिले. नंतर, त्यांना कळाले की त्यांनी विमानतळावर दाखवलेला धीर आणि आत्मसंयम लोकांच्या नजरेतून सुटला नव्हता. कारण, त्याच विमानातून प्रवास करणाऱ्‍या एका प्रवाशाने त्या विमान कंपनीला सांगितले, “विमानात ते ३४ ख्रिस्ती नसते, तर विमानतळावर नक्कीच दंगा उसळला असता.”

क्रोधाने भरलेल्या जगात राहणे

३, ४. (क) हिंसक क्रोधाचा इतिहास किती जुना आहे आणि याचा मानवांवर काय परिणाम झाला आहे? (ख) काइनाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे शक्य होते का? स्पष्ट करा.

या दुष्ट जगात राहत असताना जीवनातील दबावांमुळे लोक क्रोधित होऊ शकतात. (उप. ७:७) बरेचदा, याची परिणती द्वेषभावनेत आणि उघड हिंसक कृत्यांत होते. देशांतर्गत किंवा देशादेशांमध्ये युद्धे होतात; कौटुंबिक तणावांमुळे अनेक घरांत भांडणतंटे होतात. या क्रोधाचा आणि हिंसेचा इतिहास फार जुना आहे. आदाम आणि हव्वा यांचा पहिला पुत्र काइन याने द्वेषभावनेने प्रवृत्त होऊन रागाच्या भरात आपला धाकटा भाऊ हाबेल याला ठार केले. यहोवाने काइनाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आर्जवले होते आणि त्याने तसे केल्यास त्याला आशीर्वाद देण्याचेही वचन दिले होते, तरीही काइनाने हे घोर कृत्य केले.उत्पत्ति ४:६-८ वाचा.

वारशाने मिळालेल्या पापामुळे काइन अपरिपूर्ण असला, तरीसुद्धा त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य होते. त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणूनच, त्याने जे हिंसक कृत्य केले त्याच्यासाठी सर्वस्वी तोच जबाबदार होता. आपणही अपरिपूर्ण असल्यामुळे, राग आणि रागाच्या भरात केली जाणारी कृत्ये टाळणे आपल्याला सोपे जात नाही. या ‘कठीण काळातील’ इतर गंभीर समस्या यात आणखीनच भर घालतात. (२ तीम. ३:१) उदाहरणार्थ, आर्थिक संकटांमुळे आपल्या भावनांवरही परिणाम होऊ शकतो. पोलीस खात्याचे व सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की रागाच्या भरात होणाऱ्‍या कृत्यांमध्ये तसेच घरगुती हिंसेत होणारी वाढ यांचा आर्थिक अरिष्टांशी फार जवळचा संबंध आहे.

५, ६. क्रोधासंबंधी जगाच्या कोणत्या प्रवृत्तीचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो?

शिवाय, आपल्या संपर्कात येणारे बरेच लोक “स्वार्थी,” “गर्विष्ठ,” आणि “क्रूर” देखील आहेत. अशा वाईट प्रवृत्तींचा आपल्यावर अगदी सहजासहजी प्रभाव पडून आपणही क्रोधित होऊ शकतो. (२ तीम. ३:२-५) खरेतर, चित्रपटांतून आणि टीव्ही क्रार्यक्रमांतून बरेचदा हे दाखवले जाते की बदला घेणे ही पराक्रमाची गोष्ट आहे आणि समस्या सोडवण्यासाठी हिंसेचा अवलंब करणे स्वाभाविक व उचित आहे. बहुतेक कथानकांची रचना अशा रीतीने केलेली असते की चित्रपटातला नायक केव्हा एकदाचा खलनायकाला अद्दल घडवून त्याचा खातमा करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसलेले असतात.

अशा दृश्‍यांतून देवाच्या मार्गांना नव्हे, तर ‘जगाच्या आत्म्याला’ व जगाचा क्रोधाविष्ट शासक सैतान याच्या मार्गांना चालना मिळते. (१ करिंथ. २:१२; इफिस. २:२; प्रकटी. १२:१२) हा आत्मा दैहिक वासनांना खतपाणी घालतो आणि तो सर्वस्वी देवाच्या आत्म्याच्या व त्या आत्म्याच्या प्रतिफळाच्या विरोधात आहे. वास्तवात, एखाद्याने आपल्याला कितीही क्रोधित केले तरी त्याच्याशी आपण केव्हाही जशास तसे वागू नये ही खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची एक मूलभूत शिकवण आहे. (मत्तय ५:३९, ४४, ४५ वाचा.) तर मग, येशूने दिलेल्या शिकवणीचा आपण पूर्णपणे अवलंब कसा करू शकतो?

चांगली व वाईट उदाहरणे

७. शिमोन आणि लेवी यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तेव्हा काय घडले?

बायबलमध्ये, रागावर नियंत्रण ठेवण्यासंबंधी विपुल मार्गदर्शन सापडते. तसेच, रागावर नियंत्रण ठेवल्याने व नियंत्रण न ठेवल्याने कोणते परिणाम घडू शकतात याची अनेक व्यावहारिक उदाहरणे बायबलमध्ये आहेत. आपली बहीण दीना हिला भ्रष्ट केल्याबद्दल शखेमाचा बदला घेणारे याकोबाचे पुत्र शिमोन आणि लेवी यांच्या बाबतीत काय घडले होते याकडे लक्ष द्या. दीनासोबत जे घडले त्याबद्दल “त्यांस मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले.” (उत्प. ३४:७) नंतर, याकोबाच्या इतर मुलांनी शखेम शहरावर हल्ला केला, त्यातील सर्व काही लुटले आणि स्त्रियांना व बालकांना बंदी बनवले. त्यांनी हे सर्व केवळ दीनामुळे केले नव्हते, तर बहुधा आपल्या प्रतिष्ठेमुळे, अर्थात समाजात आपण तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही या विचाराने केले असावे. त्यांच्या मते शखेमाने त्यांचा व त्यांचा पिता याकोब याचा अपमान केला होता. पण, त्यांच्या या कृत्याबद्दल याकोबाला कसे वाटले?

८. बदला घेण्याबद्दल शिमोन व लेवी यांच्या वृत्तांतातून काय दिसून येते?

दीनासोबत जे घडले त्यामुळे याकोबाचे मन नक्कीच खूप दुखावले असेल. तरीसुद्धा, आपल्या मुलांनी सूडभावनेने पेटून जे कृत्य केले होते त्याचा त्याने धिक्कार केला. पण, शिमोन आणि लेवी यांनी मात्र आपण जे केले ते योग्यच होते असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले: “त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्‍येप्रमाणे व्यवहार करावा की काय?” (उत्प. ३४:३१) पण, एवढ्यावरच ही गोष्ट संपली नाही. कारण, त्यांचे हे कृत्य खुद्द यहोवाला देखील आवडले नाही. याच्या अनेक वर्षांनी, याकोबाने असे पूर्वभाकीत केले की शिमोन व लेवी यांनी संतप्त होऊन केलेल्या हिंसक कृत्यामुळे त्यांच्या वंशजांची इस्राएलच्या कुळांमध्ये पांगापांग होईल. (उत्पत्ति ४९:५-७ वाचा.) होय, त्यांच्या अनियंत्रित रागामुळे ते देवाच्या व त्यांच्या पित्याच्या नजरेतून उतरले.

९. कोणत्या प्रसंगी दाविदाचे आपल्या रागावरील नियंत्रण जवळजवळ सुटणारच होते?

पण, दावीद राजाच्या बाबतीत वेगळेच घडले. सूड उगवण्याच्या अनेक संधी त्याच्यासमोर आल्या होत्या; तरी त्याने तसे केले नाही. (१ शमु. २४:३-७) पण, एके प्रसंगी मात्र त्याचा आपल्या रागावरील ताबा सुटणारच होता. दाविदाच्या माणसांनी नाबाल नावाच्या एका धनवान मनुष्याच्या कळपांचे व मेंढपाळांचे संरक्षण केले होते. तरी, तो त्यांच्यावर ओरडला व त्यांना बरेवाईट बोलला. खासकरून आपल्या माणसांचा नाबालाने अपमान केल्याबद्दल दाविदाला वाईट वाटले असावे आणि म्हणून रागाच्या भरात त्याने सूड उगवण्याचे ठरवले. दावीद आणि त्याची माणसे नाबाल व त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यास जात असताना, एका तरुणाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला घडला प्रकार सांगितला आणि लगेच पाऊल उचलण्याची विनंती केली. त्यावर अबीगईल ताबडतोब अनेक भेटवस्तू घेऊन दाविदाला भेटायला गेली. नाबालाच्या उद्धटपणाबद्दल तिने नम्रपणे क्षमा मागितली आणि दावीद यहोवाचे भय मानणारा असल्यामुळे त्या आधारावर तिने गयावया केली. आपल्या हातून किती मोठी चूक झाली असती हे दाविदाच्या लक्षात आले आणि त्याने म्हटले: ‘तू धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्‍तपात करण्यापासून आवरिले आहे.’—१ शमु. २५:२-३५.

ख्रिस्ती मनोवृत्ती

१०. सूड घेण्याच्या बाबतीत ख्रिश्‍चनांची मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

१० शिमोन व लेवी यांच्या बाबतीत, तसेच दावीद व अबीगईल यांच्यात जे घडले त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की अनियंत्रित राग व हिंसा यांचा यहोवा धिक्कार करतो आणि शांती स्थापित करण्याच्या प्रयत्नांवर तो आशीर्वाद देतो. पौलाने लिहिले: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो. उलटपक्षी, ‘तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्‍यांची रास करिशील.’ वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्‍याने वाइटाला जिंक.”—रोम. १२:१८-२१. *

११. एक बहीण रागावर नियंत्रण करण्यास कशा प्रकारे शिकली?

११ या सल्ल्याचे आपणही पालन करू शकतो. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती बहिणीने आपल्या नवीन मॅनेजरबद्दल मंडळीतील एका वडिलांजवळ तक्रार केली. तिची मॅनेजर अन्यायी व कठोर असल्याचे तिने सांगितले. तिच्या स्वभावाला संतापून ही बहीण नोकरी सोडून देण्याचा विचार करत होती. पण, वडिलांनी तिला रागाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला. वडिलांनी ताडले की मॅनेजरच्या वाईट वागणुकीला बहिणीने संतप्त प्रतिक्रिया दाखवल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. (तीत ३:१-३) वडिलांनी बहिणीला याची जाणीव करून दिली की पुढे तिला दुसरी नोकरी मिळाली, तरी कठोर वागणुकीला ती ज्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवते त्यात तिला बदल करावाच लागेल. त्यांनी तिला येशूच्या सल्ल्याचे पालन करण्यास सांगितले. म्हणजे, मॅनेजरने ज्या प्रकारे तिच्याशी वागावे असे तिला वाटते, त्याच प्रकारे तिने मॅनेजरशी वागावे. (लूक ६:३१ वाचा.) त्यावर, बहिणीने प्रयत्न करून पाहण्याचे ठरवले. याचा परिणाम काय झाला? काही काळाने, मॅनेजरची मनोवृत्ती नरमली आणि तिने बहिणीच्या कामाबद्दल तिचे आभारही मानले.

१२. आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत काही मतभेद झाल्यास त्याचे आपल्याला अधिकच वाईट का वाटू शकते?

१२ ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरील लोकांसोबत अशा प्रकारचे मतभेद होतात तेव्हा याचे आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. सैतानाच्या जगात बरेचदा आपल्याला अन्यायाला तोंड द्यावे लागते आणि दुष्ट हेतूने लोक आपल्याला चिथावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण त्यांच्या या चिथावणीला बळी न पडण्यासाठी संघर्ष केला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. (स्तो. ३७:१-११; उप. ८:१२, १३; १२:१३, १४) पण, आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींसोबत आपले मतभेद होतात तेव्हा मात्र आपल्याला खूप दुःख होते. एका बहिणीने आठवून सांगितले: “मी सत्याबद्दल शिकत होते तेव्हा, यहोवाचे लोक परिपूर्ण नाहीत या वस्तुस्थितीचा स्वीकार करणे मला खूप कठीण गेले.” आपण एका निर्दयी, निष्ठुर जगातून बाहेर आलो, ते या आशेने की मंडळीतील सर्व जण एकमेकांशी प्रेमळपणे वागतील. त्यामुळे, एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती आणि खासकरून मंडळीत जबाबदाऱ्‍या हाताळणारी व्यक्‍ती आपल्याशी अविचारीपणे किंवा ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभणार नाही अशा पद्धतीने वागते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटू शकते किंवा रागही येऊ शकतो. ‘यहोवाच्या लोकांमध्येसुद्धा असं होतं का?’ असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो. खरेतर, अशा गोष्टी प्रेषितांच्या काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमध्ये देखील घडल्या होत्या. (गलती. २:११-१४; ५:१५; याको. ३:१४, १५) ख्रिस्ती मंडळीत आपल्याशी कोणी अशा प्रकारे वागतो तेव्हा आपण काय करावे?

१३. आपण आपसांतील मतभेद का व कसे मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१३ आताच उल्लेख केलेली बहीण म्हणते: “जो कोणी माझ्याशी वाईट वागतो त्याच्यासाठी मी प्रार्थना करते. आणि याचा नेहमीच फायदा होतो.” आपण आधी पाहिल्याप्रमाणे, आपला छळ करणाऱ्‍यांसाठी आपण प्रार्थना करावी अशी शिकवण येशूने आपल्याला दिली. (मत्त. ५:४४) तर मग, आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींसाठी आपण प्रार्थना करू नये का? ज्याप्रमाणे एका पित्याला, आपल्या मुलांनी एकमेकांवर प्रेम करावे असे वाटते, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील आपल्या सर्व सेवकांनी मिळून मिसळून राहावे असे यहोवाला वाटते. आपण सर्व सदासर्वकाळ शांतीसुखाने एकत्र राहू त्या काळाची आपण वाट पाहत आहोत. आणि त्यासाठी यहोवा आतापासूनच आपल्याला तालीम देत आहे. त्याचे महान कार्य पूर्ण करण्यात आपण एकमेकांशी सहयोग करावा अशी त्याची इच्छा आहे. तेव्हा, आपण आपसांतील मतभेद एकतर मिटवून टाकू या किंवा अपराधाकडे दुर्लक्ष करून आपल्यातील एकी टिकवून ठेवू या. (नीतिसूत्रे १९:११ वाचा.) समस्या निर्माण होतात तेव्हा बांधवांपासून फटकून राहण्याऐवजी आपण त्यांना देवाच्या लोकांमध्ये, यहोवाच्या ‘सर्वकालच्या बाहूंमध्ये’ सुरक्षित राहण्यास मदत केली पाहिजे.—अनु. ३३:२७, पं.र.भा.

सर्वांशी सौम्यतेने वागल्याने चांगले परिणाम घडून येतात

१४. आपल्यात फुटी पाडण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांवर आपण कशी मात करू शकतो?

१४ सुवार्तेचा प्रसार करण्यापासून आपल्याला रोखण्यासाठी सैतान आणि त्याचे दुरात्मे आनंदी कुटुंबांतील व मंडळ्यांतील शांती भंग करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे शांती भंग केल्याने किती नुकसान होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे ते असे करतात. (मत्त. १२:२५) त्यांच्या या दुष्ट प्रभावाचा प्रतिकार करत असताना आपण पौलाने दिलेल्या पुढील सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे. (२ तीम. २:२४) हे कधीही विसरू नका, की “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर . . . दुरात्म्यांबरोबर आहे.” त्यामुळे, या लढाईत विजयी होण्यासाठी आपण आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण केली पाहिजे ज्यात ‘शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवणे’ देखील समाविष्ट आहे.—इफिस. ६:१२-१८.

१५. ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरून आपल्यावर हल्ले केले जातात तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असावी?

१५ यहोवाचे शत्रू मंडळीच्या बाहेरून देखील त्याच्या शांतीप्रिय लोकांवर जोरदार हल्ले चढवतात. या शत्रुंपैकी काही जण यहोवाच्या साक्षीदारांवर शारीरिक हल्ले करतात. तर, इतर जण प्रसार माध्यमांतून किंवा कोर्टकचेऱ्‍यांमध्ये आपली निंदा करतात. आपल्या अनुयायांना अशी वागणूक दिली जाईल हे येशूने त्यांना आधीच सांगितले होते. (मत्त. ५:११, १२) मग, अशा वागणुकीला आपली प्रतिक्रिया काय असावी? आपल्या बोलण्याद्वारे किंवा वागणुकीद्वारे आपण केव्हाही “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू” नये.—रोम. १२:१७; १ पेत्र ३:१६ वाचा.

१६, १७. एका मंडळीसमोर कोणती मोठी समस्या निर्माण झाली होती?

१६ दियाबलाने आपला कितीही छळ किंवा विरोध केला तरी ‘बऱ्‍याने वाइटाला जिंकल्याने’ आपण इतरांना चांगली साक्ष देऊ शकतो. याचे एक उदाहरण विचारात घ्या. प्रशांत महासागरातील एका बेटावर असलेल्या एका मंडळीने स्मारक विधी साजरा करण्यासाठी एक सभागृह भाड्याने घेतले होते. तेथील चर्च अधिकाऱ्‍यांना याची कुणकुण लागताच त्यांनी आपल्या चर्चच्या सर्व सदस्यांना, स्मारक विधी साजरा होणार होता नेमक्या त्याच वेळी एका प्रार्थना विधीसाठी त्याच सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. पण, चर्च अधिकाऱ्‍यांनी ते सभागृह ठरलेल्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांसाठी रिकामे करावे असा मुख्य पोलीस अधिकाऱ्‍याने त्यांना हुकूम दिला. पण, स्मारक विधी साजरा करण्याची वेळ आली तेव्हा सभागृह चर्च सदस्यांनी भरून गेले आणि त्यांनी आपला प्रार्थना विधी सुरू केला.

१७ पोलीस जबरीने त्यांना बाहेर काढण्याच्या विचारात होते तेव्हा चर्चचा अध्यक्ष साक्षीदारांपैकी एका वडिलांकडे येऊन म्हणाला: “आज तुमचा काही खास कार्यक्रम होता का?” आपल्या बांधवाने त्याला स्मारक विधीविषयी सांगितले तेव्हा तो म्हणाला: “अरेरे, मला तर माहीतच नव्हतं!” त्याच वेळी एका पोलिसाने आश्‍चर्याने त्याला म्हटले: “पण आज सकाळीच तर आम्ही तुम्हाला याची कल्पना दिली होती!” त्यावर तो बांधवाला अगदी उपरोधिकपणे म्हणाला: “आता तुम्ही काय करणार? सभागृह तर पूर्ण भरले आहे. तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला बाहेर हुसकावून लावणार का?” यहोवाचे साक्षीदार इतरांचा छळ करतात असे चित्र उभे करण्यासाठी त्याने सर्वकाही अगदी चलाखीने योजले होते! आपल्या बांधवांनी ही समस्या कशी हाताळली?

१८. बांधवांनी एक कठीण परिस्थिती कशा प्रकारे हाताळली आणि त्याचा परिणाम काय झाला?

१८ साक्षीदारांनी आणखी अर्धा तास थांबण्याची तयारी दाखवली, तेवढ्या वेळात चर्चच्या लोकांनी आपला प्रार्थना विधी संपवावा व त्यानंतर आम्ही स्मारक विधी साजरा करू असे सुचवले. पण, चर्चची प्रार्थना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चालली. चर्चचे लोक तेथून निघून गेल्यावर स्मारक विधीला सुरुवात झाली. दुसऱ्‍या दिवशी, या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्‍यांची एक खास बैठक बोलावण्यात आली. सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर, त्या घटनेसाठी साक्षीदार नव्हे, तर चर्चचा अध्यक्षच जबाबदार असल्याचे घोषित करण्यास त्यांनी चर्चला बाध्य केले. तसेच, अशी कठीण परिस्थिती संयमाने हाताळल्याबद्दल त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांचेही आभार मानले. अशा रीतीने ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याच्या’ साक्षीदारांच्या प्रयत्नांमुळे चांगला परिणाम घडून आला.

१९. शांतीपूर्ण संबंधांना आणखी कोणती गोष्ट हातभार लावू शकते?

१९ शांतीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कृपायुक्‍त बोलणे. कृपायुक्‍त बोलण्याचा काय अर्थ होतो आणि आपण इतरांशी प्रेमळपणे व विचारशीलतेने कसे बोलू शकतो याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल.

[तळटीप]

^ परि. 10 “निखाऱ्‍यांची रास” हा शब्दप्रयोग धातू शुद्ध करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्‍या एका प्राचीन पद्धतीला सूचित करतो. या पद्धतीत धातू वितळण्यासाठी त्याच्या वर व खाली जळते निखारे ठेवले जात असत. यामुळे त्यातील अशुद्ध घटक नाहीसे होऊन शुद्ध धातू प्राप्त केला जात असे. आपल्यासोबत जे कठोरपणे वागतात त्यांच्याशी आपण प्रेमळपणे वागतो तेव्हा त्यांच्या स्वभावात नरमाई येऊन त्यांच्यातील चांगले गुण दिसून येतात.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आज जगातील लोक इतके क्रोधाविष्ट का आहेत?

• रागावर नियंत्रण करण्याचे व न करण्याचे परिणाम बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येतात?

• आपल्या बंधुभगिनींपैकी कोणी आपले मन दुखावल्यास आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

• मंडळीच्या बाहेरील लोकांकडून आपल्यावर हल्ले होतात तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

शिमोन आणि लेवी रागाच्या भरात भयंकर कृत्य करून बसले

[१८ पानांवरील चित्रे]

इतरांशी प्रेमळपणे वागल्याने त्यांची मनोवृत्ती नरमू शकते