व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा. . .

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा. . .

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा. . .

महिमा आणि तिचा पती राहुल या दोघांनी मिळून अनेक वर्षे यहोवाची पूर्णवेळ सेवा केली होती. * पण, त्यांना पहिले मूल झाल्यानंतर काही काळाने राहुल हळूहळू यहोवापासून दूर जाऊ लागला. कालांतराने, राहुल अनैतिक जीवन जगू लागला आणि त्यामुळे त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. महिमा म्हणते: “माझं जीवन उद्‌ध्वस्त झालं होतं. मी इतकी खचून गेले की काय करावं सुचेना.”

ज्योतीच्या लग्नानंतर थोड्याच काळाने, तिच्या पतीने एका वेगळ्या प्रकारे तिचा विश्‍वासघात केला. तो तिला मारहाण करू लागला. ज्योती म्हणते: “त्यानं पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला तेव्हा मला धक्काच बसला आणि खूप अपमानास्पद वाटलं. तो आधी मला मारायचा आणि मग माफी मागायचा. ही रोजचीच गोष्ट झाली होती. माफ करणं व विसरून जाणं हे माझं ख्रिस्ती कर्तव्य आहे असा मी विचार करायचे. घरच्या समस्येबद्दल इतरांजवळ—मंडळीतील वडिलांजवळसुद्धा—बोलणं त्याचा विश्‍वासघात करण्यासारखं आहे असं मला वाटायचं. मारहाण करणं आणि माफी मागणं हा प्रकार अनेक वर्षं सुरू होता. या सर्व काळात, तो माझ्यावर प्रेम करेल असं काहीतरी मी करू शकते असं मला वाटायचं. शेवटी, तो मला आणि आमच्या मुलीला टाकून गेला, तेव्हा मला वाटलं की माझेच प्रयत्न कमी पडले. आमचं लग्न टिकवून ठेवण्यासाठी मी आणखीही काही करायला हवं होतं.”

तुमच्या पतीने तुमचा विश्‍वासघात केला असल्यास कदाचित तुम्ही देखील महिमा आणि ज्योतीप्रमाणे भावनात्मक, आर्थिक आणि आध्यात्मिक समस्यांचा सामना करत असाल. किंवा तुम्ही एक पती असाल आणि तुमच्या पत्नीने तुमचा विश्‍वासघात केल्यामुळे तुम्हाला भावनिक त्रास होत असेल व तुम्ही इतर अडचणींना तोंड देत असाल. बायबलमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे, आज आपण ‘कठीण काळात’ जगत आहोत यात काहीही शंका नाही. या भविष्यवाणीवरून दिसून येते की या ‘शेवटल्या दिवसांत’ कुटुंबांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. आणि अनेक कुटुंबांमध्ये स्वाभाविक प्रेमाचा पूर्णपणे अभाव असेल. काही जण देवाची सेवा करत असल्याचा केवळ आव आणतील. (२ तीम. ३:१-५) अशा प्रकारच्या समस्यांचा सामना खऱ्‍या ख्रिश्‍चनांना देखील करावा लागतो. तेव्हा, तुमचा विश्‍वासघात झाला असेल, तर त्याचा धीराने सामना करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

स्वतःकडे यहोवाच्या नजरेतून पाहा

सर्वप्रथम, तुम्ही जिच्यावर प्रेम करता ती व्यक्‍ती इतक्या निर्दयीपणे तुमचे मन दुखावू शकते ही गोष्ट स्वीकारणे कदाचित तुम्हाला खूप कठीण जाईल. तिच्या चुकीच्या वर्तनाबद्दल कदाचित तुम्ही स्वतःला दोष देखील द्याल.

पण, परिपूर्ण मनुष्य असलेल्या येशूचा देखील विश्‍वासघात करण्यात आला होता हे आठवणीत ठेवा. त्याचा ज्याच्यावर भरवसा व प्रेम होते अशा एका व्यक्‍तीने त्याचा विश्‍वासघात केला होता. येशूने खूप विचारपूर्वक व प्रार्थनापूर्वक आपल्या जवळच्या सोबत्यांना म्हणजे प्रेषितांना निवडले होते. त्या वेळी सर्वच १२ जण यहोवाचे विश्‍वासू सेवक होते. त्यामुळे, यहूदा इस्कर्योत “द्रोही निघाला” तेव्हा नक्कीच येशूला खूप दुःख झाले असेल. (लूक ६:१२-१६) पण, यहूदाच्या कृत्यांसाठी यहोवाने येशूला जबाबदार धरले नाही.

हे खरे आहे की आज विवाहसोबत्यांपैकी कोणीही परिपूर्ण नाही. दोघांच्या हातून चुका या होतीलच. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून एका स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) यहोवाचे अनुकरण करून, विवाहसोबत्यांपैकी दोघांनीही एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी दाखवली पाहिजे.—१ पेत्र ४:८.

पण त्याच वेळी, “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवाला हिशेब देईल” हे देखील तितकेच खरे आहे. (रोम. १४:१२) ज्याला शिवीगाळ करण्याची किंवा मारहाण करण्याची सवय झाली असेल, त्या दोषी विवाहसोबत्यालाच याबद्दल यहोवाला जाब द्यावा लागेल. हिंसा व शिवीगाळ यांचा यहोवा धिक्कार करतो. त्यामुळे, आपल्या साथीदाराशी इतक्या निष्ठुरपणे व अनादराने वागण्याचे कोणतेही रास्त कारण नाही. (स्तो. ११:५; इफिस. ५:३३; कलस्सै. ३:६-८) खरेतर, एक ख्रिस्ती व्यक्‍ती सतत आणि अपश्‍चात्तापीपणे आपला क्रोध व्यक्‍त करते आणि सुधारणा करण्यास तयार नसते, तेव्हा तिला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केलेच पाहिजे. (गलती. ५:१९-२१; २ योहा. ९, १०) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना न शोभणाऱ्‍या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल वडिलांना सांगून आपण चूक करत आहोत असे निर्दोष विवाहसोबत्याला वाटण्याचे कारण नाही. खरेतर, अशा प्रकारच्या गैरवागणुकीला बळी पडलेल्या व्यक्‍तीबद्दल यहोवाला सहानुभूती वाटते.

एखादा विवाहसोबती व्यभिचार करतो तेव्हा तो केवळ निर्दोष सोबत्याविरुद्ध पाप करत नाही, तर यहोवाविरुद्ध देखील पाप करतो. (मत्त. १९:४-९; इब्री १३:४) यादरम्यान निर्दोष साथीदार बायबलमधील तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असल्यास, व्यभिचारी साथीदाराने केलेल्या विश्‍वासघाताबद्दल त्याने स्वतःला दोष देण्याची गरज नाही.

तुमच्या भावना यहोवा जाणतो हे आठवणीत ठेवा. तो स्वतःचे वर्णन इस्राएल राष्ट्राचा पती किंवा धनी असे करतो. आणि त्या राष्ट्राने आध्यात्मिक रीत्या व्यभिचार केल्यामुळे त्याला किती दुःख झाले होते हे दाखवणारे कितीतरी हृदयस्पर्शी वृत्तांत त्याच्या वचनात आढळतात. (यश. ५४:५, ६; यिर्म. ३:१, ६-१०) तुमच्या विवाहसाथीदाराच्या विश्‍वासघातामुळे तुमच्या डोळ्यांतून वाहणाऱ्‍या आसवांची यहोवाला पूर्ण जाणीव आहे ही खात्री बाळगा. (मला. २:१३, १४) तुम्हाला सांत्वनाची व प्रोत्साहनाची गरज आहे हे त्याला माहीत आहे.

यहोवा सांत्वन पुरवतो

यहोवा आज अनेक मार्गांनी सांत्वन पुरवतो. त्यांपैकी एक आहे ख्रिस्ती मंडळी. ज्योतीला अशाच प्रकारे सांत्वन मिळाले. ती आठवून सांगते: “मी खूप खचून गेले होते नेमके त्याच वेळी विभागीय पर्यवेक्षकांनी आमच्या मंडळीला भेट दिली. माझ्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असल्यामुळे मी किती दुःखी होते याची त्यांना कल्पना होती. त्यांनी १ करिंथकर ७:१५ यांसारख्या वचनांवर विचार करण्यास मला मदत केली. बायबलमधील वचनांमुळे आणि त्यांच्या प्रेमळ सल्ल्यामुळे माझी दोषभावना कमी झाली आणि मला मनःशांती मिळाली.” *

यहोवा ख्रिस्ती मंडळीद्वारे कशा प्रकारे व्यावहारिक मदत पुरवतो याचा आधी उल्लेख केलेल्या महिमाला देखील प्रत्यय आला. ती म्हणते, “माझ्या पतीला मुळीच पस्तावा नाही हे स्पष्ट झालं तेव्हा मी माझ्या मुलांना घेऊन दुसऱ्‍या शहरात राहायला गेले. तिथं पोचल्यावर, मला दोन खोल्या भाड्यानं मिळाल्या. दुसऱ्‍या दिवशी, अगदी हताशपणे मी सामानसुमान लावत होते, तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. मला वाटलं, जवळच राहणारी आमची घरमालकीण असावी. पण काय आश्‍चर्य, माझ्या आईसोबत जिने बायबलचा अभ्यास केला होता आणि आमच्या कुटुंबाला सत्य शिकण्यास मदत केली होती ती बहीण दारात उभी होती. खरंतर, ती मला नव्हे, तर माझ्या घरमालकिणीला भेटायला आली होती, जिच्यासोबत ती बायबलचा अभ्यास करत होती. तिला पाहून मला इतकं हायसं वाटलं की मला अक्षरशः भरून आलं. मी तिला घडला प्रकार सांगितला आणि आम्ही दोघीही रडलो. तिने लगेच, त्या दिवशी होणाऱ्‍या सभेस आम्हाला उपस्थित राहता यावे म्हणून व्यवस्था केली. मंडळीतील बंधुभगिनींनी आमचं स्वागत केलं, आणि मला आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून मंडळीतील वडिलांनी व्यावहारिक मार्गाने माझी मदत केली.”

इतर जण मदत करू शकतात

खरेतर, ख्रिस्ती मंडळीतील सर्वच जण अनेक मार्गांनी व्यावहारिक मदत पुरवू शकतात. उदाहरणार्थ, महिमाला आता नोकरी करणे भाग होते. त्यामुळे, मंडळीतील एका कुटुंबाने तिची मुले शाळेतून घरी आल्यावर त्यांची काळजी घेण्याची तयारी दाखवली.

महिमा सांगते, “बंधुभगिनी मला व माझ्या मुलांना आपल्यासोबत क्षेत्र सेवेला घेऊन जातात तेव्हा मला मनापासून कृतज्ञता वाटते.” मंडळीचे सदस्य अशा प्रकारची व्यावहारिक मदत पुरवण्याद्वारे, ‘एकमेकांची ओझी वाहण्यास’ साहाय्य करतात व असे करण्याद्वारे खरेतर ते “ख्रिस्ताचा नियम” पूर्ण करतात.—गलती. ६:२.

जे इतरांच्या अपराधांमुळे त्रास सहन करत आहेत ते अशा व्यावहारिक मदतीची मनापासून कदर करतात. मोनिकाच्या पतीने तिला टाकून दिले, शिवाय १५,००० डॉलरचे (जवळजवळ ७,००,००० रुपये) क्रेडिट-कार्डचे कर्ज आणि चार मुलांना वाढवण्याची जबाबदारीही तो तिच्यावर टाकून गेला. ती म्हणते: “माझ्या मंडळीतील बंधुभगिनी खूप प्रेमळ होते. त्यांच्या आधाराविना माझं काय झालं असतं याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मला वाटतं यहोवानं मला सर्वात प्रेमळ बांधवांचा आधार दिला, ज्यांनी माझ्या मुलांची खूप मदत केली. त्यांच्या मदतीमुळे माझी मुलं आध्यात्मिक रीत्या प्रौढ बनली हे पाहण्याचा आनंद मला लाभला. मला सल्ल्याची गरज होती, तेव्हा वडिलांनी मला मदत केली. कोणाजवळ माझ्या भावना व्यक्‍त कराव्यात असं मला वाटलं, तेव्हा त्यांनी माझं ऐकून घेतलं.”—मार्क १०:२९, ३०.

अर्थात, काही वेळा एखाद्याच्या वाईट अनुभवाबद्दल स्वतःहून उल्लेख न करणेच उत्तम असते आणि प्रेमळ मित्र ही गोष्ट ओळखतात. (उप. ३:७) महिमा म्हणते: “मी मंडळीतील बहिणींसोबत माझ्या समस्यांबद्दल न बोलता, जास्तकरून प्रचार कार्याबद्दल, आमच्या बायबल अभ्यासांबद्दल, आमच्या मुलांबद्दल बोलायचे. त्यांनी मला माझा गतकाळ विसरून एक नवीन सुरुवात करण्यासाठी मदत केली याबद्दल मी खूप आभारी आहे.”

बदला घेण्याचा मोह टाळा

आपल्या विवाहसोबत्याच्या अपराधांबद्दल स्वतःला जबाबदार धरणाऱ्‍यांपैकी कदाचित तुम्ही नसाल. पण, त्याच्या अपराधांमुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल तुमच्या मनात कदाचित खूप राग असेल. अशा नकारात्मक भावनांना आपल्या मनात घर करू दिल्यास, यहोवाला विश्‍वासू राहण्याचा तुमचा निर्धार कमजोर होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमचा विश्‍वासघात केल्याबद्दल तुम्हाला कदाचित आपल्या साथीदाराला धडा शिकवण्याचा मोह होऊ शकतो.

अशा प्रकारच्या बदल्याच्या भावना तुमच्या मनात निर्माण होत आहेत असे तुम्हाला वाटल्यास, तुम्ही यहोशवा व कालेब यांच्या उदाहरणावर मनन करू शकता. प्रतिज्ञात देश हेरण्याकरता या विश्‍वासू पुरुषांनी आपला जीव धोक्यात घातला होता. त्यांच्यासोबत गेलेल्या इतर हेरांचा विश्‍वास कमकुवत होता आणि त्यांनी लोकांना यहोवाच्या आज्ञेचे पालन करण्यापासून परावृत्त केले. यहोशवा व कालेब यांनी इस्राएल राष्ट्राला यहोवाला विश्‍वासू राहण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इस्राएल लोकांपैकी काहींनी त्यांना दगडमार करण्याचाही विचार केला. (गण. १३:२५–१४:१०) इस्राएल लोकांच्या कृत्यांमुळे यहोशवा व कालेब यांना स्वतःची काहीएक चूक नसतानाही, ४० वर्षे रानात भटकत राहावे लागले.

यहोशवा व कालेब हे कदाचित निराश झाले असतील, पण आपल्या बांधवांच्या अपराधांमुळे ते कटू बनले नाहीत. उलट, त्यांनी यहोवाची सेवा करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ४० वर्षे रानात घालवल्यानंतर, शेवटी लेव्यांसोबत त्यांनाही त्या पिढीतून बचावण्याचे व प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याचे प्रतिफळ मिळाले.—गण. १४:२८-३०; यहो. १४:६-१२.

तुमच्या साथीदाराच्या विश्‍वासघाताचा प्रभाव तुमच्या मनावर कदाचित दीर्घ काळापर्यंत राहू शकतो. विवाहबंधन संपुष्टात आले, तरी तुम्हाला पुढेही भावनिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण, नकारात्मक भावनांच्या आहारी जाऊ नका. त्याऐवजी, हे लक्षात असू द्या की जे जाणूनबुजून यहोवाच्या स्तरांची उपेक्षा करतात त्यांच्याशी कशा प्रकारे व्यवहार केला पाहिजे हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. अविश्‍वासू इस्राएल लोकांच्या बाबतीत जे घडले त्यावरून हे सिद्ध होते.—इब्री १०:३०, ३१; १३:४.

तुम्ही दुःखातून सावरू शकता

नकारात्मक विचारांनी भारावून जाण्याऐवजी, आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्याचा प्रयत्न करा. ज्योती म्हणते, “टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांचे रेकॉर्डिंग ऐकल्याने मला दुःखातून सावरण्यास मदत मिळाली. सभांमधूनही मला खूप बळ मिळालं. सभांमध्ये उत्सुकतेने सहभाग घेतल्याने मला सतत माझ्या समस्यांबद्दलच विचार करण्याचं टाळता आलं. प्रचार कार्यामुळे देखील मला अशाच प्रकारे फायदा झाला. यहोवावर भरवसा ठेवण्यास इतरांना साहाय्य केल्याने, माझा स्वतःचा विश्‍वास मजबूत झाला. आणि बायबल विद्यार्थ्यांमध्ये आस्था घेतल्याने, ज्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर मन लावणं मला शक्य झालं.”

याआधी उल्लेख करण्यात आलेली मोनिका म्हणते: “सभांना नियमितपणे हजर राहिल्याने आणि क्षेत्र सेवेत होता होईल तितका सहभाग घेतल्याने, मला माझ्या दुःखाचा सामना करणं शक्य झालं. मी आणि माझी मुलं एकमेकांच्या जास्त जवळ आलो आहोत. आणि मंडळीतल्या सदस्यांसोबतही आमची जास्त जवळीक निर्माण झाली आहे. माझ्यासोबत जे घडले त्यामुळे मला स्वतःच्या उणिवांची जाणीव झाली आहे. माझ्यावर परीक्षा आली खरी, पण यहोवाच्या मदतीने मी यशस्वीपणे या परीक्षेला तोंड देत आहे.”

अशा प्रकारच्या परीक्षांना तुम्ही देखील यशस्वीपणे तोंड देऊ शकता. तुमच्या साथीदाराच्या विश्‍वासघातामुळे तुम्ही भावनात्मक त्रासातून जात असला, तरी पौलाने दिलेल्या देवप्रेरित सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलती. ६:९.

[तळटीपा]

^ परि. 2 काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 13 विभक्‍त होणे आणि घटस्फोट याबद्दल बायबलमध्ये काय म्हटले आहे याच्या तपशीलवार माहितीसाठी देवाच्या प्रेमात टिकून राहा, या पुस्तकातील पृष्ठे १४२-१४८, २५१-२५३ पाहा.

[३१ पानांवरील चित्र]

विवाहसोबत्याच्या विश्‍वासघातामुळे एकटे पडलेले, क्षेत्र सेवेत जाण्यासाठी केलेल्या साहाय्याची कदर करतात