व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो’

‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो’

‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो’

“आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.” —१ करिंथ. २:१०.

१. पौलाने १ करिंथकर २:१० यात पवित्र आत्म्याच्या कोणत्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि यासंदर्भात कोणते प्रश्‍न उद्‌भवू शकतात?

 यहोवाचा पवित्र आत्मा व त्याच्या कार्याबद्दल आपण किती कृतज्ञ असू शकतो! बायबलमध्ये पवित्र आत्म्याला कैवारी, दान, साक्ष देणारा आणि आपल्या वतीने विनंती करणारा असे म्हणण्यात आले आहे. (योहा. १४:१६; प्रे. कृत्ये २:३८; रोम. ८:१६, २६, २७) प्रेषित पौलाने पवित्र आत्म्याच्या आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला: “आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.” (१ करिंथ. २:१०) यहोवा त्याच्या सेवकांना गहन आध्यात्मिक सत्ये प्रकट करण्यासाठी पवित्र आत्म्याचा उपयोग करतो हे अगदी खरे आहे. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय यहोवाच्या उद्देशांबद्दल आपण कितपत समजू शकलो असतो? (१ करिंथकर २:९-१२ वाचा.) पण, यासंदर्भात अनेक प्रश्‍न आपल्या मनात येऊ शकतात: ‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा’ कशा प्रकारे शोध घेतो? सामान्य युगाच्या पहिल्या शतकात यहोवाने कोणाच्या मार्फत या गोष्टी प्रकट केल्या होत्या? आज पवित्र आत्मा कोणाद्वारे आणि कशा प्रकारे देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेत आहे?

२. पवित्र आत्म्याच्या कार्याचे कोणते दोन पैलू असणार होते?

पवित्र आत्म्याच्या कार्याचे दोन पैलू असतील असे येशूने सुचवले होते. त्याच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याने आपल्या प्रेषितांना सांगितले: “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी [“साहाय्यकर्ता,” NW] म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहा. १४:२६) त्याअर्थी, पवित्र आत्मा शिकवण्याचे आणि आठवण करून देण्याचे कार्य करेल असे येशूने सांगितले. शिकवण्याचे कार्य या अर्थाने, की तो पूर्वी न समजलेल्या गोष्टी समजून घेण्यास ख्रिस्ताच्या अनुयायांना मदत करणार होता. आणि त्यासोबतच, गतकाळात स्पष्ट करण्यात आलेल्या गोष्टी आठवणीत आणून त्यांचा योग्य प्रकारे अवलंब करण्यासही तो त्यांना मदत करणार होता.

पहिल्या शतकात

३. ‘देवाच्या गहन गोष्टी’ क्रमाक्रमाने स्पष्ट केल्या जातील हे येशूच्या कोणत्या शब्दांवरून दिसून आले?

येशूने स्वतः त्याच्या शिष्यांना अशा कितीतरी गोष्टी शिकवल्या, ज्या त्यांच्याकरता अगदी नवीन होत्या. पण, त्यांना अजूनही बरेच काही शिकायचे होते. येशूने प्रेषितांना म्हटले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत; तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.” (योहा. १६:१२, १३) अशा रीतीने येशूने दाखवले की पवित्र आत्म्याद्वारे गहन आध्यात्मिक सत्ये क्रमाक्रमाने स्पष्ट केली जातील.

४. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने कशा प्रकारे शिकवण्याचे व आठवण करून देण्याचे कार्य केले?

येशूने सांगितल्यानुसार, “सत्याचा आत्मा” सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी आला. त्या दिवशी जेरूसलेममध्ये एकत्र जमलेल्या १२० ख्रिस्ती शिष्यांवर त्याचा वर्षाव झाला. लोकांनी त्या प्रसंगी ऐकलेल्या व पाहिलेल्या अनेक गोष्टींवरून याचा पुरावा मिळाला. (प्रे. कृत्ये १:४, ५, १५; २:१-४) शिष्य निरनिराळ्या भाषांतून ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ बोलू लागले. (प्रे. कृत्ये २:५-११) काहीतरी नवीन प्रकट केले जाण्याची आता वेळ आली होती. पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्याविषयी योएल संदेष्ट्याने पूर्वी भाकीत केले होते. (योए. २:२८-३२) पण योएलाची ती भविष्यवाणी अशा रीतीने पूर्ण होईल याची, ती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्‍यांपैकी कोणीही कल्पना केली नव्हती. तेव्हा, प्रेषित पेत्राने पुढाकार घेऊन त्यांना घडलेल्या गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला. (प्रेषितांची कृत्ये २:१४-१८ वाचा.) अशा रीतीने, शिष्यांनी नुकतीच अनुभवलेली घटना त्या प्राचीन भविष्यवाणीचीच पूर्णता होती हे स्पष्टपणे समजून घेण्यास पवित्र आत्म्याने पेत्राला मदत केली. असे करण्याद्वारे पवित्र आत्म्याने शिकवण्याचे कार्य केले. त्याच वेळी, पवित्र आत्म्याने आठवण करून देण्याचेही कार्य केले. कारण, पेत्राने केवळ योएलाचेच शब्द नव्हे, तर दाविदाच्या दोन स्तोत्रांतील शब्दही आपल्या भाषणात जसेच्या तसे घेतले. (स्तो. १६:८-११; ११०:१; प्रे. कृत्ये २:२५-२८, ३४, ३५) तेथे जमलेल्या लोकांनी ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या नक्कीच देवाच्या गहन गोष्टी होत्या.

५, ६. (क) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर नव्या कराराच्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे गरजेचे होते? (ख) हे प्रश्‍न कोणाद्वारे चर्चेसाठी पुढे आणण्यात आले आणि त्यांसंबंधी निर्णय कशा प्रकारे घेण्यात आले?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना अद्याप बऱ्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या. उदाहरणार्थ, पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून अंमलात आलेल्या नव्या कराराबद्दल अनेक प्रश्‍न होते. हा नवा करार फक्‍त यहुदी व यहुदी मतानुसारी यांच्यापुरताच मर्यादित होता का? की त्यात परराष्ट्रीय लोकांचाही समावेश होणार होता? त्यांनाही पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केले जाणार होते का? (प्रे. कृत्ये १०:४५) असे घडण्याकरता परराष्ट्रीय पुरुषांची आधी सुंता होणे आणि त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे आवश्‍यक होते का? (प्रे. कृत्ये १५:१, ५) हे महत्त्वाचे प्रश्‍न होते. आणि अशा या गहन गोष्टींचा शोध घेण्यासाठी यहोवाच्या आत्म्याची गरज होती. पण, यहोवाचा आत्मा कोणाच्याद्वारे कार्य करणार होता?

यांपैकी प्रत्येक प्रश्‍न जबाबदार बांधवांद्वारे चर्चेसाठी पुढे आणण्यात आला. सुंतेचा प्रश्‍न विचारात घेण्यासाठी झालेल्या नियमन मंडळाच्या सभेत पेत्र, पौल व बर्णबा उपस्थित होते. आणि त्यांनी बेसुनत परराष्ट्रीय लोकांशी यहोवाने कशा प्रकारे व्यवहार केला होता याविषयी वर्णन केले. (प्रे. कृत्ये १५:७-१२) या पुराव्याचे, तसेच इब्री शास्त्रवचनांतील माहितीचे परीक्षण केल्यानंतर नियमन मंडळाने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने एक निर्णय घेतला. नंतर त्यांनी या निर्णयाबाबत मंडळ्यांना पत्राद्वारे कळवले.प्रेषितांची कृत्ये १५:२५-३०; १६:४, ५ वाचा; इफिस. ३:५, ६.

७. गहन सत्ये कशी प्रकट करण्यात आली?

योहान, पेत्र, याकोब व पौल यांच्या देवप्रेरित लिखाणांद्वारे आणखी अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. पण ख्रिस्ती शास्त्रवचनांचे लिखाण पूर्ण झाल्यावर काही काळाने भविष्यवाणी करण्याचे आणि चमत्कारिक रीत्या देवाकडून संदेश मिळण्याचे दान संपुष्टात आले. (१ करिंथ. १३:८) पण, शिकवण्याचे व आठवण करून देण्याचे कार्य पवित्र आत्मा पुढेही करणार होता का? तो पुढेही ख्रिश्‍चनांना देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेण्यास साहाय्य करणार होता का? होय, तो पुढेही असे करणार होता हे भविष्यवाण्यांनी आधीच सूचित केले होते.

अंतसमयात

८, ९. अंतसमयात आध्यात्मिक ज्ञान मिळाल्यामुळे कोण ‘प्रकाशासारखे झळकणार’ होते?

अंतसमयाबद्दल बोलताना एका देवदूताने असे भाकीत केले: “जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्‍यांप्रमाणे चमकतील. . . . व ज्ञानवृद्धि होईल.” (दानी. १२:३, ४) सुज्ञ असणारे व प्रकाशासारखे झळकणारे हे लोक कोण असणार होते? याचा एक सुगावा येशूने दिलेल्या गहू व निदणाच्या दृष्टांतातून मिळतो. ‘युगाच्या समाप्तीविषयी’ सांगताना त्याने म्हटले: “तेव्हा नीतिमान्‌ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्त. १३:३९, ४३) निदणाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण करताना येशूने “नीतिमान” जन “राज्याचे पुत्र” अर्थात अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्याचे सांगितले.—मत्त. १३:३८.

सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘प्रकाशासारखे झळकणार’ होते का? एका अर्थाने या प्रश्‍नाचे होय असे उत्तर देता येईल. कारण प्रचार करण्यात, शिष्य बनवण्यात आणि सभांमध्ये एकमेकांना उत्तेजन देण्यात सर्वच ख्रिस्ती भाग घेणार होते. आणि अभिषिक्‍त जन यांबाबतीत इतरांपुढे आदर्श मांडणार होते. (जख. ८:२३) पण याशिवाय अंतसमयात गहन गोष्टींवरही प्रकाश टाकला जाणार होता. दानीएलाने लिहिलेली भविष्यवाणीसुद्धा अंतसमयापर्यंत “मुद्रित” करण्यात आली. (दानी. १२:९) मग या गहन गोष्टींचा शोध पवित्र आत्मा कशा प्रकारे आणि कोणाच्याद्वारे घेणार होता?

१०. (क) पवित्र आत्मा या शेवटल्या काळात कोणाच्याद्वारे गहन सत्ये प्रकट करत आहे? (ख) यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराविषयीची सत्ये कशा प्रकारे प्रकट करण्यात आली हे स्पष्ट करा.

१० आज एखाद्या आध्यात्मिक बाबीवर स्पष्टीकरण देण्याची वेळ येते, तेव्हा पूर्वी न समजलेली गहन सत्ये समजून घेण्यास पवित्र आत्मा ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ जबाबदार प्रतिनिधींना साहाय्य करतो, जे जागतिक मुख्यालयात कार्य करतात. (मत्त. २४:४५; १ करिंथ. २:१३) यानंतर, नियमन मंडळाचे सर्व सदस्य मिळून सुधारित स्पष्टीकरणांवर विचारविनिमय करतात. (प्रे. कृत्ये १५:६) त्यातून त्यांना जे शिकायला मिळते ते सर्वांच्या फायद्याकरता ते प्रकाशित करतात. (मत्त. १०:२७) कालांतराने, या माहितीवर आणखी स्पष्टीकरण देण्याची गरज उद्‌भवू शकते आणि असे घडल्यास ते प्रामाणिकपणे हे स्पष्टीकरण देतात.—“पवित्र आत्म्याने आध्यात्मिक मंदिराचा अर्थ कशा प्रकारे स्पष्ट केला?” या शीर्षकाची चौकट पाहा.

आज पवित्र आत्म्याच्या साहाय्याचा लाभ घेणे

११. देवाच्या गहन गोष्टी प्रकट करण्यात पवित्र आत्मा बजावत असलेल्या भूमिकेचा सर्वच विश्‍वासू ख्रिश्‍चनांना कशा प्रकारे लाभ होतो?

११ देवाच्या गहन गोष्टी प्रकट करण्यात पवित्र आत्मा बजावत असलेल्या भूमिकेचा सर्वच विश्‍वासू ख्रिश्‍चनांना लाभ होतो. आज पवित्र आत्म्याच्या साहाय्याने समजलेल्या गोष्टींचा पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणेच आपणही अभ्यास करतो आणि नंतर ही माहिती आठवणीत आणून तिचा अवलंब करतो. (लूक १२:११, १२) आपल्या प्रकाशनांतील गहन आध्यात्मिक सत्ये समजून घेण्यासाठी आपण खूप शिकलेले असण्याची गरज नाही. (प्रे. कृत्ये ४:१३) पण, देवाच्या गहन गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो? येथे काही गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत.

१२. पवित्र आत्मा मिळावा म्हणून आपण केव्हा प्रार्थना केली पाहिजे?

१२ पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करा. बायबलवर आधारित असलेल्या माहितीचे वाचन किंवा अभ्यास करण्याअगोदर पवित्र आत्म्याने आपले मार्गदर्शन करावे अशी आपण आधी प्रार्थना केली पाहिजे. आपण एकटेच असलो किंवा आपल्याजवळ फार कमी वेळ असला, तरीसुद्धा आपण असे केले पाहिजे. अशा नम्र विनंत्यांमुळे आपल्या स्वर्गीय पित्याचे हृदय नक्कीच आनंदित होईल. येशूने सांगितल्याप्रमाणे, आपण प्रामाणिकपणे विनंती केल्यास यहोवा आपल्याला उदारतेने पवित्र आत्मा देईल.—लूक ११:१३.

१३, १४. सभांची तयारी केल्यामुळे आपल्याला देवाच्या गहन गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कशी मदत होते?

१३ सभांची तयारी करा. दास वर्गाकडून आपल्याला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न मिळते. आपल्याकरता बायबलवर आधारित साहित्य पुरवण्याद्वारे आणि अभ्यासाच्या तसेच सभांच्या कार्यक्रमांची व्यवस्था करण्याद्वारे ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. सबंध ‘बंधुवर्गाला’ विशिष्ट माहिती विचारात घेण्यास सांगण्यामागे काही खास कारणे असतात ज्यांवर दास वर्गाने काळजीपूर्वक विचार केलेला असतो. (१ पेत्र २:१७; कलस्सै. ४:१६; यहू. ३) त्यामुळे, त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपण पवित्र आत्म्याशी सहकार्य करत असतो.—प्रकटी. २:२९.

१४ ख्रिस्ती सभांची तयारी करताना परिच्छेदांत उल्लेख केलेली शास्त्रवचने आपण उघडून पाहिली पाहिजेत. तसेच, प्रत्येक शास्त्रवचनाचा विषयाशी काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी असे केल्यास, हळूहळू आपल्याला बायबलमधील सत्ये अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतील. (प्रे. कृत्ये १७:११, १२) बायबलमधून वचने उघडून पाहिल्यामुळे आपल्या मनावर त्यांची छाप पडते आणि नंतर पवित्र आत्मा आपल्याला ही वचने आठवणीत आणण्यास साहाय्य करू शकतो. तसेच, प्रत्यक्ष बायबलच्या पानांवर जेव्हा आपण ते वचन पाहतो तेव्हा जणू आपल्या मनावर त्याची दृश्‍य प्रतिमा उमटते आणि यामुळे पुढे आपल्याला तो विशिष्ट उतारा बायबलमधून शोधून काढणे जास्त सोपे जाते.

१५. सर्व प्रकाशित साहित्य नियमित वाचण्याचा प्रयत्न आपण का केला पाहिजे आणि तुम्ही हे कसे करता?

१५ सर्वच साहित्य नियमित वाचा. प्रकाशित होणाऱ्‍या सर्वच साहित्याची आपल्या सभांमध्ये चर्चा केली जात नाही. पण, हे सर्वच साहित्य आपल्या फायद्याकरता तयार करण्यात आलेले असते. आपल्या नियतकालिकांचे अंक, जे सहसा आपण सेवाकार्यात लोकांना देतो तेसुद्धा आपल्याला मनात ठेवूनच तयार केलेले असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात, बरेचदा आपल्याला एखाद्या व्यक्‍तीसाठी किंवा कामासाठी वाट पाहत थांबावे लागते. अशा वेळी, जर आपण न वाचलेले किंवा अर्धवट वाचलेले एखादे प्रकाशन सोबत ठेवले तर या संधींचा आपण ते वाचण्यासाठी उपयोग करू शकतो. काही जण पायी चालत असताना किंवा गाडीतून प्रवास करताना आपल्या प्रकाशनांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात. काळजीपूर्वक संशोधन करून, पण, सर्वसामान्य वाचकांना आवडेल अशा पद्धतीने तयार केलेले हे सर्व साहित्य आध्यात्मिक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आपली मदत करू शकते.—हब. २:२.

१६. आपल्या मनात येणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे शोधून काढण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?

१६ मनन करा. बायबल किंवा त्यावर आधारित प्रकाशने वाचत असताना तुम्ही जे वाचत आहात त्यावर विचार करा. त्यात दिलेल्या मुद्द्‌यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याकडे लक्ष देऊन वाचत असताना तुमच्या मनात काही प्रश्‍न येऊ शकतात. अशा प्रश्‍नांची नोंद करून ठेवा आणि नंतर त्यांवर अधिक माहिती शोधून काढण्याचा प्रयत्न करा. आपली जिज्ञासा जागृत करणाऱ्‍या विषयांचे आपण काळजीपूर्वक परीक्षण करतो तेव्हा सहसा आपण सगळ्यात सखोल अभ्यास करतो. असा अभ्यास करताना जी माहिती व ज्ञान आपण साठवतो ते एखाद्या अनमोल खजिन्यासारखे असते. नंतर गरज पडते तेव्हा आपण ही माहिती आठवणीत आणून तिचा उपयोग करू शकतो.—मत्त. १३:५२.

१७. तुम्ही कौटुंबिक अथवा वैयक्‍तिक अभ्यास केव्हा व कसा करता?

१७ कौटुंबिक उपासनेसाठी निश्‍चित वेळ ठरवा. नियमन मंडळाने आपल्या सर्वांना दर आठवड्यातील एक संध्याकाळ किंवा दुसरी एखादी वेळ वैयक्‍तिक किंवा कौटुंबिक अभ्यासासाठी राखून ठेवण्याचे प्रोत्साहन दिले आहे. सभांच्या वेळांमध्ये झालेल्या फेरबदलामुळे आपल्याला या सल्ल्याचे पालन करणे शक्य झाले आहे. तुम्ही आपल्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी कोणते साहित्य विचारात घेता? काही जण बायबलचे वाचन करतात व त्यांच्या मनात ज्या वचनांबद्दल प्रश्‍न येतात त्यांवर संशोधन करून त्यावरील नोंदी ते आपल्या बायबलवर थोडक्यात लिहून घेतात. अनेक कुटुंबे अभ्यास केलेल्या साहित्याचे आपल्या कुटुंबात कशा प्रकारे पालन करता येईल यावर चर्चा करतात. काही कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या विशिष्ट गरजा लक्षात ठेवून, किंवा कुटुंबातील सदस्यांनी एखाद्या विषयावर अथवा प्रश्‍नावर चर्चा करण्याचे सुचवले असल्यास त्यानुसार साहित्य निवडतात. कालांतराने, तुम्हाला कौटुंबिक उपासनेत चर्चा करण्याजोगे आणखी काही विषय नक्कीच सुचतील. *

१८. देवाच्या वचनातील गहन सत्यांचा अभ्यास करण्यापासून आपण का मागे हटू नये?

१८ पवित्र आत्मा साहाय्यकर्ता म्हणून कार्य करेल असे येशूने म्हटले होते. त्यामुळे आपण कधीही देवाच्या वचनातील गहन सत्यांचा अभ्यास करण्यापासून मागे हटू नये. या सत्यांचा अतिशय बहुमोल अशा ‘देवाच्या ज्ञानात’ समावेश होतो आणि आपल्याला त्यांचा शोध घेण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. (नीतिसूत्रे २:१-५ वाचा.) ही सत्ये समजून घेतल्यामुळे, ‘देवावर प्रीती करणाऱ्‍यांसाठी त्याने सिद्ध केलेल्या’ गोष्टींबद्दल आपल्याला बरेच काही कळते. आणि आपण यहोवाच्या वचनाचे अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा जितका प्रयत्न करू तितकेच पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करेल, “कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.”—१ करिंथ. २:९, १०.

[तळटीप]

^ परि. 17 आमची राज्य सेवा, ऑक्टोबर २००८ अंकातील पृष्ठ ८ वरील माहितीही पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• पवित्र आत्मा ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेण्यास आपल्याला ज्या प्रकारे साहाय्य करतो त्याचे कोणते दोन पैलू आहेत?

• पहिल्या शतकात पवित्र आत्म्याने कोणाच्याद्वारे गहन सत्ये प्रकट केली?

• आपल्या काळात आध्यात्मिक सत्ये स्पष्ट करण्यासाठी पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो?

• पवित्र आत्म्याच्या साहाय्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चौकट]

पवित्र आत्म्याने आध्यात्मिक मंदिराचा अर्थ कशा प्रकारे स्पष्ट केला?

पहिल्या शतकादरम्यान प्रकट करण्यात आलेल्या ‘देवाच्या गहन गोष्टींपैकी’ एक म्हणजे, निवासमंडप आणि नंतर बांधण्यात आलेली मंदिरे, ही खरेतर भविष्यातील एका अधिक महान आध्यात्मिक वास्तवतेची पूर्वझलक होती. पौलाने या वास्तवतेला ‘माणसाने नव्हे तर प्रभुने घातलेला खरा मंडप’ म्हटले. (इब्री ८:२) तो एका महान आध्यात्मिक मंदिराविषयी बोलत होता. हे मंदिर देवाची उपासना करण्यासाठी, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे व याजकपदामुळे शक्य झालेल्या एका व्यवस्थेला सूचित करते.

सा.यु. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला आणि एक परिपूर्ण बलिदान देण्याकरता यहोवाने त्याचा स्वीकार केला तेव्हा हा ‘खरा मंडप’ अस्तित्वात आला. (इब्री १०:५-१०) येशूचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने आध्यात्मिक मंदिराच्या परमपवित्रस्थानात प्रवेश केला आणि “देवासमोर” आपल्या बलिदानाचे मोल सादर केले.—इब्री ९:११, १२, २४.

दुसऱ्‍या एका ठिकाणी प्रेषित पौलाने अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होत’ आहेत असे म्हटले. (इफिस. २:२०-२२) हे मंदिर आणि त्याने इब्री लोकांस नंतर लिहिलेल्या पत्रात वर्णन केलेला ‘खरा मंडप’ एकच असणार होते का? कितीतरी दशके यहोवाच्या सेवकांना असेच वाटत होते. त्यांचे असे मानणे होते, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना यहोवाच्या स्वर्गीय मंदिराच्या इमारतीतील “शिला” बनण्याकरता पृथ्वीवर तयार केले जात आहे.—१ पेत्र २:५, NW.

पण, १९७१ साल सुरू होण्याच्या सुमारास दास वर्गातील जबाबदार सदस्यांना जाणीव होऊ लागली, की पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेले मंदिर हे यहोवाचे महान अध्यात्मिक मंदिर असू शकत नाही. ‘खरा मंडप’ हा पुनरुत्थित अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून बनलेला असता, तर प्रभूच्या उपस्थितीदरम्यान त्यांचे पुनरुत्थान होण्यास सुरुवात झाल्यानंतर ते पहिल्यांदा अस्तित्वात आले असते. (१ थेस्सलनी. ४:१५-१७) पण निवासमंडपाच्या संदर्भात पौलाने असे लिहिले: “तो मंडप वर्तमानकाळी दृष्टांतरूप आहे.”—इब्री ९:९.

या व इतर शास्त्रवचनांची काळजीपूर्वक तुलना केल्यानंतर हे स्पष्ट झाले, की आध्यात्मिक मंदिराचे बांधकाम सध्या चाललेले नाही. तसेच, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्या मंदिराच्या इमारतीतील “शिला” बनण्याकरता पृथ्वीवर तयार केले जात आहे असेही म्हटले जाऊ शकत नाही. खरे पाहता, अभिषिक्‍त ख्रिस्ती आध्यात्मिक मंदिराच्या अंगणात आणि पवित्रस्थानात दररोज देवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करण्याद्वारे त्याची सेवा करत आहेत.—इब्री १३:१५.

[२३ पानांवरील चित्र]

‘देवाच्या गहन गोष्टी’ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो?