व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या

आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या

आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या

“प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथ. १५:५८.

१. येशूने आपल्या शिष्यांना कोणते आमंत्रण दिले?

 सामान्य युग ३० च्या अखेरीस, शोमरोनच्या प्रदेशातून प्रवास करत असताना, येशू विश्रांती घेण्यासाठी सूखार नावाच्या नगराजवळ एका विहिरीपाशी थांबला. तेथे त्याने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” (योहा. ४:३५) येशू येथे खरोखरच्या कापणीविषयी नव्हे, तर आध्यात्मिक कापणीविषयी म्हणजे पुढे जे त्याचे अनुयायी बनणार होते अशा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना गोळा करण्याच्या कार्याविषयी बोलत होता. तो खरेतर, या कापणीच्या कार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्या शिष्यांना देत होता. काम खूप होते, पण वेळ अत्यंत कमी होता आणि या कमी वेळात त्यांना आपले काम उरकायचे होते!

२, ३. (क) आज आपण कापणीच्या काळात जगत आहोत हे कशावरून सूचित होते? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या विशिष्ट कापणीबद्दल येशूने जे म्हटले त्याचा आज आपल्या काळाकरता खास अर्थ आहे. जगातील मानवजातीचे शेत ‘कापणीसाठी पांढरे होऊन चुकले आहे.’ दरवर्षी, लाखो लोकांना जीवनदायक सत्ये शिकण्याचे आमंत्रण दिले जाते आणि हजारो नवीन शिष्यांचा बाप्तिस्मा होतो. आज आपल्याला, पिकाचा धनी म्हणजे यहोवा देव याच्या देखरेखीखाली आजवरच्या सगळ्यात मोठ्या कापणीच्या कार्यात सहभाग घेण्याचा विशेषाधिकार लाभला आहे. तर मग, या कापणीच्या कार्यात तुम्ही “अधिकाधिक” भाग घेत आहात का?—१ करिंथ. १५:५८.

पृथ्वीवरील आपल्या साडेतीन वर्षांच्या सेवेदरम्यान, येशूने आपल्या शिष्यांना कापणीच्या कार्याकरता तयार केले. या काळादरम्यान त्याने आपल्या शिष्यांना अनेक महत्त्वपूर्ण धडे शिकवले. त्यांपैकी तीन धड्यांबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. प्रत्येक धडा एका विशिष्ट गुणावर प्रकाश टाकतो. आज आपण शिष्य गोळा करण्याच्या कार्यात होता होईल तितके करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे गुण आपल्याला खूप उपयुक्‍त ठरतील. आता आपण एकेक करून या गुणांचा विचार करू या.

नम्रता अत्यावश्‍यक

४. नम्रतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी येशूने कोणते उदाहरण दिले?

डोळ्यांपुढे हे चित्र उभे करा: आपल्यापैकी सर्वात मोठा कोण या विषयावरून शिष्यांमध्ये नुकताच वाद झाला आहे. त्यांच्या चेहऱ्‍यांवर बहुधा अजूनही एकमेकांबद्दल संशय व द्वेषभावना दिसत आहे. म्हणून, येशू एका लहान मुलाला बोलावून त्यांच्यामध्ये उभे करतो. त्या लहान मुलाकडे त्यांचे लक्ष वेधून तो म्हणतो: “जो कोणी स्वतःला ह्‍या बाळकासारखे नम्र करितो [किंवा, “लहान करतो,” बाईंगटन भाषांतर] तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:१-४ वाचा.) जगातील लोक सहसा अधिकार, पैसा आणि प्रतिष्ठा यांवरून एका व्यक्‍तीचे मोल ठरवतात. पण, शिष्यांनी अशा प्रकारे विचार न करता, स्वतःला इतरांच्या नजरेत ‘लहान करण्यावरच’ आपला मोठेपणा अवलंबून आहे हे समजून घेणे आवश्‍यक होते. त्यांनी खरी नम्रता दाखवली तरच यहोवा त्यांना आशीर्वाद देणार होता व आपल्या सेवेत त्यांचा वापर करणार होता.

५, ६. कापणीच्या कार्यात पूर्णपणे सहभाग घेण्यासाठी तुम्ही नम्र का असले पाहिजे? उदाहरण द्या.

आजही, जगातील पुष्कळ लोक अधिकार, पैसा, व प्रतिष्ठा मिळवण्यातच आपले उभे आयुष्य खर्च करतात. त्यामुळे, आध्यात्मिक गोष्टींकरता त्यांच्याजवळ अगदीच थोडा वेळ असतो किंवा नसतोच. (मत्त. १३:२२) त्या उलट, यहोवाचे लोक इतरांच्या नजरेत स्वतःला ‘लहान करण्यात’ आनंद मानतात जेणेकरून त्यांना पिकाच्या धन्याकडून आशीर्वाद व संमती प्राप्त होईल.—मत्त. ६:२४; २ करिंथ. ११:७; फिलिप्पै. ३:८.

दक्षिण अमेरिकेतील एका मंडळीत वडील या नात्याने सेवा करणाऱ्‍या फ्रान्सीस्कू यांच्या उदाहरणावर विचार करा. तरुण असताना, पायनियर सेवा करण्यासाठी त्यांनी विद्यापीठातील शिक्षण सोडून दिले. ते आठवून सांगतात, “नंतर, माझं लग्न ठरलं तेव्हा मी मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकलो असतो ज्यामुळे आम्हा दोघांना आरामदायी जीवन जगता आलं असतं. पण, आम्ही अगदी साधंसुधं जीवन जगण्याचा आणि पूर्णवेळची सेवा करत राहण्याचा निर्णय घेतला. नंतर, आम्हाला मुलं झाली आणि जबाबदाऱ्‍या वाढल्या. असं असलं, तरी साधं जीवन जगण्याच्या आमच्या निर्णयावर ठाम राहण्यास यहोवानं आम्हाला मदत केली.” फ्रान्सीस्कू शेवटी म्हणतात: “आज ३० पेक्षा जास्त वर्षांपासून, मी मंडळीत वडील या नात्यानं सेवा करत आहे याचा मला खूप आनंद होतो. यासोबतच, अनेक खास जबाबदाऱ्‍या हाताळण्याची संधीही मला मिळाली. साधंसुधं जीवन जगण्याच्या आमच्या निर्णयाची आम्हाला कधीही खंत वाटली नाही.”

७. रोमकर १२:१६ यातील सल्ला तुम्ही कशा प्रकारे लागू करण्याचे ठरवले आहे?

तुम्ही जगातील ‘मोठमोठ्या गोष्टींना’ नाकारून साधीसुधी कामे करण्याची तयारी दाखवल्यास तुम्हाला देखील कापणीच्या कार्यात अनेक आशीर्वाद व विशेषाधिकार मिळू शकतात.—रोम. १२:१६; मत्त. ४:१९, २०; लूक १८:२८-३०.

मेहनती वृत्तीमुळे आशीर्वाद लाभतात

८, ९. (क) येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांताचा सारांश सांगा. (ख) हा दृष्टांत खासकरून कोणासाठी प्रोत्साहनदायक ठरू शकतो?

कापणीच्या कार्यात पूर्णपणे सहभाग घेण्यासाठी आवश्‍यक असलेला आणखी एक गुण म्हणजे मेहनती वृत्ती बाळगणे. येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांतातून हे दिसून येते. * हा दृष्टांत परदेशी जाणाऱ्‍या एका मनुष्याबद्दल आहे जो आपल्या तीन दासांवर आपली मालमत्ता सोपवतो. तो पहिल्या दासाला पाच हजार रुपये, दुसऱ्‍या दासाला दोन हजार रुपये आणि तिसऱ्‍या दासाला एक हजार रुपये देतो. आपला धनी परदेशी गेल्यावर, पहिल्या व दुसऱ्‍या दासाने मेहनती वृत्ती दाखवून त्यांना मिळालेल्या रुपयांवर लगेच “व्यापार केला.” त्या उलट, तिसरा दास “आळशी” होता. त्याने त्याला मिळालेले रुपये जमिनीत लपवून ठेवले. धनी परदेशातून परत आल्यावर त्याने पहिल्या दोन दासांची ‘पुष्कळांवर नेमणूक करण्याद्वारे’ त्यांना त्यांच्या कामाचे प्रतिफळ दिले. पण, तिसऱ्‍या दासाला दिलेले रुपये त्याने परत घेतले व त्याला आपल्या घरातून हाकलून दिले.—मत्त. २५:१४-३०.

तुम्ही येशूच्या दृष्टांतातील परिश्रमी दासांचे अनुकरण करू इच्छिता आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात होता होईल तितका सहभाग घेऊ इच्छिता यात काहीच शंका नाही. पण, तुमच्या परिस्थितीमुळे जास्तीत जास्त सहभाग घेणे तुम्हाला अगदीच मुश्‍कील होत असेल तर काय? कदाचित कठीण आर्थिक परिस्थितीमुळे, आपल्या कुटुंबाचे भरण-पोषण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागत असेल. किंवा वाढत्या वयोमानामुळे कदाचित तुमच्यामध्ये पूर्वीइतका उत्साह नसेल किंवा तुमची प्रकृती तितकी चांगली नसेल. असे असल्यास, रुपयांच्या दृष्टांतात तुमच्याकरता एक प्रोत्साहनदायक संदेश आहे.

१०. रुपयांच्या दृष्टांतातील धन्याने कशा प्रकारे समजुतदारपणा दाखवला, आणि हे तुम्हाला प्रोत्साहनदायक का वाटते?

१० आपल्या प्रत्येक दासाची वेगवेगळी क्षमता आहे हे दृष्टांतातील धन्याने ओळखले याकडे लक्ष द्या. त्याने प्रत्येक दासाला “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले” त्यावरून हे दिसून येते. (मत्त. २५:१५) अपेक्षा केल्याप्रमाणे, दुसऱ्‍या दासाच्या तुलनेत पहिल्या दासाने अर्थातच जास्त कमाई केली. असे असले, तरी धन्याने दोन्ही दासांना ‘भले व विश्‍वासू’ म्हणून त्या दोघांनी केलेल्या परिश्रमाची दखल घेतली व त्यांना सारखेच प्रतिफळ दिले. (मत्त. २५:२१, २३) त्याचप्रमाणे, पिकाचा धनी असलेला यहोवा देव देखील हे जाणतो की त्याच्या सेवेत तुम्ही जे काही करू शकता त्याच्यावर तुमच्या परिस्थितीचा प्रभाव पडतो. तेव्हा, त्याची सेवा करण्यासाठी तुम्ही मनापासून करत असलेल्या प्रयत्नांची तो आवर्जून दखल घेईल व त्यानुसार तुम्हाला प्रतिफळ देईल.—मार्क १४:३-९; लूक २१:१-४ वाचा.

११. कठीण परिस्थितीतही मेहनती वृत्ती बाळगल्याने अनेक आशीर्वाद मिळतात हे दाखवणारे उदाहरण द्या.

११ देवाच्या सेवेत परिश्रमी वृत्ती बाळगणे हे जीवनातील अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसते, हे ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या सेलमीरा नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीच्या उदाहरणावरून दिसून येते. वीस वर्षांपूर्वी, सेलमीराचा पती लुटारूंच्या हल्ल्यात मारला गेला होता. त्यामुळे, तीन मुलींना वाढवण्याची जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन पडली. मोलकरणीचे काम करणाऱ्‍या सेलमीराला जास्त वेळ काम करावे लागायचे. कामाला जाण्यासाठी तिला शहरातील खचाखच भरलेल्या गाड्यांमधून प्रवास करावा लागायचा. यामुळे ती खूप थकून जायची. जीवनात इतके अडथळे असूनही, तिने आपल्या कामाचे नियोजन अशा प्रकारे केले की ज्यामुळे तिला नियमित पायनियर सेवा करणे शक्य झाले. नंतर, तिच्या दोन मुलीही तिच्यासोबत पायनियर सेवा करू लागल्या. ती म्हणते: “आजवर मी २० पेक्षा जास्त लोकांसोबत बायबलचा अभ्यास केला आहे आणि ते जणू माझ्या ‘कुटुंबाचे’ सदस्यच बनले आहेत. आजही, मी त्यांच्या प्रेमाचा व मैत्रीचा आनंद अनुभवत आहे. हा एक असा खजिना आहे जो पैशाने विकत घेता येत नाही.” पिकाच्या धन्याने नक्कीच सेलमीराच्या परिश्रमी वृत्तीचे तिला प्रतिफळ दिले!

१२. प्रचार कार्यात आपण मेहनती वृत्ती कशी दाखवू शकतो?

१२ तुमच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला सेवा कार्यात जास्त वेळ घालवता येत नसला, तरीसुद्धा सेवा कार्यात जास्त परिणामकारक होण्याद्वारे कापणीच्या कार्यातील तुमचा सहभाग वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. साप्ताहिक सेवा सभेत सांगितल्या जाणाऱ्‍या व्यावहारिक सूचनांचे काळजीपूर्वक पालन केल्याने, तुम्हाला प्रचार कार्याकरता उपयोगी असलेली कौशल्ये आणखी चांगल्या प्रकारे विकसित करता येतील आणि साक्ष देण्याच्या नवनवीन पद्धतींचा वापर करता येईल. (२ तीम. २:१५) तसेच, शक्य असल्यास, तुम्ही कमी महत्त्वाची कामे नंतर करू शकता किंवा ती पूर्णपणे टाळू शकता, जेणेकरून तुम्हाला क्षेत्र सेवेसाठी मंडळीने केलेल्या व्यवस्थेत नियमित रीत्या सहभाग घेता येईल.—कलस्सै. ४:५.

१३. मेहनती वृत्ती विकसित करण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे?

१३ देवाबद्दल आपल्या मनात प्रेम व कृतज्ञता असेल, तर त्याच्या सेवेत जास्त मेहनत करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल हे लक्षात असू द्या. (स्तो. ४०:८) येशूच्या दृष्टांतातील तिसऱ्‍या दासाला आपल्या धन्याची भीती वाटली, कारण त्याच्या मते त्याचा धनी अवाजवी अपेक्षा करणारा व कठोर होता. त्यामुळे, धन्याची मालमत्ता आणखी वाढवण्याऐवजी, त्याला मिळालेले रुपये त्याने जमिनीत लपवून ठेवले. आपल्याला अशा प्रकारचा कामचुकारपणा टाळायचा असल्यास, आपण पिकाचा धनी यहोवा याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध विकसित केला पाहिजे व तो टिकवून ठेवला पाहिजे. तेव्हा प्रेम, सहनशीलता आणि दया यांसारख्या त्याच्या आकर्षक गुणांचा अभ्यास करण्यासाठी आणि मनन करण्यासाठी वेळ काढा. असे केल्यास, देवाच्या सेवेत होता होईल तितके करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल.—लूक ६:४५; फिलिप्पै. १:९-११.

“तुम्ही पवित्र असा”

१४. कापणीच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्‍यांनी कोणती महत्त्वपूर्ण अपेक्षा पूर्ण केली पाहिजे?

१४ आपल्या पृथ्वीवरील सेवकांसंबंधी देवाची इच्छा काय आहे हे प्रेषित पेत्र इब्री शास्त्रवचनांतील शब्द उद्धृत करून सांगतो. तो म्हणतो: “तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१५, १६; लेवी. १९:२; अनु. १८:१३) या विधानावरून स्पष्ट होते, की कापणीच्या कामगारांनी नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध असले पाहिजे. ही एक महत्त्वपूर्ण अपेक्षा असून त्यासाठी स्वतःला लाक्षणिक अर्थाने शुद्ध ठेवण्याकरता पावले उचलणे जरुरीचे आहे. कोणती गोष्ट असे करण्यास आपली मदत करू शकते? अर्थात, देवाच्या वचनातील सत्य.

१५. देवाच्या वचनातील सत्यात काय करण्याचे सामर्थ्य आहे?

१५ देवाच्या वचनातील सत्याची तुलना शुद्ध करणाऱ्‍या पाण्याशी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने असे लिहिले की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी, ख्रिस्तासाठी तयार केलेल्या निष्कलंक वधूप्रमाणे देवाच्या नजरेत शुद्ध आहे. आपली वधू “पवित्र व निर्दोष असावी” म्हणून ख्रिस्ताने तिला “वचनाद्वारे जलस्नानाने” स्वच्छ केले. (इफिस. ५:२५-२७) यापूर्वी, खुद्द येशूने देखील देवाच्या वचनातील शुद्ध करण्याच्या सामर्थ्याचा उल्लेख केला होता. आपल्या शिष्यांशी बोलताना त्याने म्हटले: “जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा.” (योहा. १५:३) यावरून स्पष्ट होते, की देवाच्या वचनात नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. आपण स्वतःला देवाच्या वचनातील सत्याद्वारे अशा प्रकारे शुद्ध केले तरच देव आपल्या उपासनेचा स्वीकार करेल.

१६. आपण स्वतःला आध्यात्मिक व नैतिक रीत्या कशा प्रकारे शुद्ध ठेवू शकतो?

१६ म्हणूनच, आध्यात्मिक कापणीचे कामगार बनण्यासाठी आपण सर्वात प्रथम नैतिक व आध्यात्मिक रीत्या दूषित करणाऱ्‍या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून नाहीशा केल्या पाहिजे. होय, कापणीचे कामगार या नात्याने आपल्याला लाभलेला विशेषाधिकार टिकवून ठेवण्यासाठी यहोवाच्या उच्च नैतिक व आध्यात्मिक स्तरांचे पालन करण्याच्या बाबतीत आपण आदर्श मांडला पाहिजे. (१ पेत्र १:१४-१६ वाचा.) ज्या प्रकारे आपण आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे सतत लक्ष देतो, त्याच प्रकारे आपण निरंतर स्वतःला नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध ठेवण्यासाठी देवाच्या वचनातील सत्याचा प्रभाव आपल्यावर होऊ दिला पाहिजे. यात बायबलचे वाचन करणे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे समाविष्ट आहे. तसेच, देवाकडून मिळणाऱ्‍या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. असे केल्याने, आपल्या पापपूर्ण प्रवृत्तींविरुद्ध लढा देणे व या जगातील दूषित प्रभावांचा प्रतिकार करणे आपल्याला शक्य होईल. (स्तो. ११९:९; याको. १:२१-२५.) होय, देवाच्या वचनातील सत्याद्वारे आपले गंभीर पापही ‘धुतले’ जाऊ शकतात ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे!—१ करिंथ. ६:९-११.

१७. आपली शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी आपण बायबलमधील कोणत्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे?

१७ तुम्ही देवाच्या वचनातील सत्यात असलेल्या शुद्ध करणाऱ्‍या सामर्थ्याचा आपल्यावर प्रभाव होऊ देता का? उदाहरणार्थ, जगातील हिणकस मनोरंजनाच्या धोक्यांपासून सावध राहण्याची ताकीद दिली जाते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? (स्तो. १०१:३) जे बायबलमधील सत्यावर विश्‍वास ठेवत नाहीत अशा शाळासोबत्यांबरोबर व सहकाऱ्‍यांबरोबर अनावश्‍यक मैत्री करण्याचे तुम्ही टाळता का? (१ करिंथ. १५:३३) ज्यांमुळे तुम्ही यहोवाच्या नजरेत अशुद्ध ठरू शकता अशा वैयक्‍तिक दुर्बलतांवर मात करण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करता का? (कलस्सै. ३:५) तुम्ही स्वतःला जगातील राजनैतिक विवादांपासून आणि राष्ट्रभक्‍तीला चालना देणाऱ्‍या स्पर्धात्मक खेळांपासून दूर ठेवता का?—याको. ४:४.

१८. नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध असल्याने कापणीच्या कार्यात फलदायक होण्यास आपल्याला कशा प्रकारे साहाय्य मिळेल?

१८ अशा प्रकारच्या गोष्टींच्या बाबतीत दिल्या जाणाऱ्‍या सल्ल्याचे विश्‍वासूपणे पालन केल्याने उत्तम परिणाम मिळतील. आपल्या अभिषिक्‍त शिष्यांची तुलना द्राक्षवेलीच्या फांद्यांशी करत येशूने म्हटले: “माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा [माझा पिता] काढून टाकतो; आणि फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.” (योहा. १५:२) तुम्ही स्वतःला बायबलमधील सत्यात असलेल्या शुद्ध करणाऱ्‍या प्रभावाच्या अधीन करता, तेव्हा तुम्ही देखील आणखी जास्त फलदायक ठराल.

आता व भविष्यातही मिळणारे आशीर्वाद

१९. कापणीचे कामगार या नात्याने येशूच्या शिष्यांना कशा प्रकारे आशीर्वाद मिळाले?

१९ ज्या विश्‍वासू शिष्यांनी येशूकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग केला, त्यांना नंतर सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्ष देण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळाले. (प्रे. कृत्ये १:८) पुढे ते नियमन मंडळाचे सदस्य, मिशनरी, आणि प्रवासी वडील या नात्याने सेवा करू लागले आणि “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार करण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. (कलस्सै. १:२३) यामुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले व त्यांचे कार्य इतरांसाठी देखील अतिशय आनंददायक ठरले!

२०. (क) आध्यात्मिक कापणीच्या कार्यात पूर्णपणे सहभाग घेतल्याने तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत? (ख) तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

२० होय, नम्रता व मेहनती वृत्ती दाखवल्याने आणि देवाच्या वचनातील उच्च स्तरांचे पालन केल्याने, सध्याच्या काळात सुरू असलेल्या महान आध्यात्मिक कापणीच्या कार्यात आपल्याला पूर्णपणे व अर्थपूर्ण रीत्या सहभाग घेता येईल. आज अनेक लोक या जगातील भौतिकवादी व सुखविलासी जीवनशैलीमुळे उत्पन्‍न होणारे दुःख व निराशा यांनी त्रस्त आहेत. पण, आपण मात्र खरा आनंद व समाधान अनुभवत आहोत. (स्तो. १२६:६) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘प्रभूमध्ये आपले श्रम व्यर्थ नाहीत.’ (१ करिंथ. १५:५८) पिकाचा धनी यहोवा देव, आपल्याला आपल्या कार्यासाठी व आपण त्याच्या नावाबद्दल दाखवलेल्या प्रेमासाठी सदासर्वकाळ आशीर्वाद देत राहील.—इब्री ६:१०-१२.

[तळटीप]

^ परि. 8 रुपयांचा दृष्टांत, प्रामुख्याने येशू आपल्या अभिषिक्‍त अनुयायांशी कशा प्रकारे व्यवहार करतो याबद्दल असला, तरी यातील तत्त्वे सर्वच ख्रिश्‍चनांना लागू होतात.

तुम्हाला आठवते का?

तुम्ही कापणीच्या कार्यात पूर्णपणे सहभाग घेण्याचा प्रयत्न करत असताना . . .

• नम्रता दाखवणे का अत्यावश्‍यक आहे?

• मेहनती वृत्ती कशी विकसित करू शकता व ती कशी टिकवून ठेवू शकता?

• नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहणे का महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

नम्रता आपल्याला राज्याशी संबंधित कार्यांवर लक्ष केंद्रित करता येईल असे साधे जीवन जगण्यास साहाय्य करेल