व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा’

‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा’

‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा’

“तुम्ही मला ‘गुरु’ व ‘प्रभु’ असे संबोधिता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच.” (योहा. १३:१३) येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले तेव्हा तो शिक्षक या नात्याने आपल्या भूमिकेवर भर देत होता. नंतर, स्वर्गात जाण्याच्या थोड्या वेळाआधी त्याने आपल्या शिष्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. (मत्त. २८:१९, २०) पुढे प्रेषित पौलानेही देवाच्या वचनाचे शिक्षक असण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्याने ख्रिस्ती वडील असलेल्या तीमथ्याला असा सल्ला दिला: “वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव. . . . तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.”—१ तीम. ४:१३-१५.

तेव्हाप्रमाणेच आजही, शिकवणे किंवा शिक्षण देणे हे आपल्या क्षेत्र सेवेचे व ख्रिस्ती सभांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर मग, आपण कशा प्रकारे सतत आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकतो? आणि असे केल्याने देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने प्रगती करण्यास आपल्याला कशा प्रकारे मदत होईल?

थोर शिक्षकाचे अनुकरण करा

येशूची शिकवण्याची पद्धत त्याच्या श्रोत्यांना भावली. नासरेथमधील सभास्थानात उपस्थित असलेल्यांवर त्याच्या शब्दांचा कसा प्रभाव पडला याकडे लक्ष द्या. शुभवर्तमान लिहिणाऱ्‍या लूकने असे म्हटले: “सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्‍चर्य करू लागले.” (लूक ४:२२) येशूच्या शिष्यांनी प्रचार कार्य करताना आपल्या गुरूचे अनुकरण केले. आणि प्रेषित पौलाने तर आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथ. ११:१) शिकवण्याच्या बाबतीत येशूच्या पद्धतींचे अनुकरण केल्यामुळेच, पौल “चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात” अतिशय परिणामकारक ठरला.—प्रे. कृत्ये २०:२०.

“बाजारांत” शिकवणे

चार लोकांत शिकवण्याच्या पौलाच्या कौशल्याचे एक उल्लेखनीय उदाहरण प्रेषितांची कृत्ये पुस्तकाच्या १७ व्या अध्यायात सापडते. तो ग्रीसमधील अथेनैला गेला असताना जे घडले त्याविषयी तेथे आपण वाचतो. त्या शहरात पौलाची नजर जेथे कोठे गेली—रस्त्यांवर, बाजारांत—तेथे सगळीकडे त्याला मूर्तीच मूर्ती दिसल्या. हे पाहून तो अतिशय अस्वस्थ झाला. तरीसुद्धा, त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले. आणि तो ‘सभास्थानात आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालू [“तर्कवितर्क करू,” NW] लागला.’ (प्रे. कृत्ये १७:१६, १७) आज आपल्याकरता किती उत्तम उदाहरण! सर्व पार्श्‍वभूमींच्या लोकांशी आपण दोषी ठरवण्याच्या सुरात नव्हे, तर आदरपूर्वक बोलल्यास त्यांना आपले ऐकून घेणे व शेवटी खोट्या धर्माच्या बंधनातून मुक्‍त होणे शक्य होईल.—प्रे. कृत्ये १०:३४, ३५; प्रकटी. १८:४.

पौलाला बाजारात जे लोक भेटले त्यांच्याशी बोलणे इतके सोपे नव्हते. त्यांच्यापैकी काही तत्त्वज्ञानी होते ज्यांची मते पौल प्रचार करत असलेल्या सत्यांच्या विरोधात होती. ते पौलाशी वाद करू लागले तेव्हा त्यांनी व्यक्‍त केलेल्या मतांची त्याने नक्कीच दखल घेतली. काहींनी त्याला “बडबड्या” (शब्दशः “दाणे वेचणारा”) म्हटले. तर इतरांनी, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो” असे म्हटले.—प्रे. कृत्ये १७:१८.

पण, पौलाने त्यांचे अपमानास्पद बोलणे मनाला लावून घेतले नाही. त्याउलट, त्याच्या शिकवणींचा खुलासा करण्यास त्याला सांगण्यात आले, तेव्हा लगेच या संधीचा फायदा घेऊन त्याने एक माहितीपूर्ण भाषण दिले ज्यातून त्याचे शिकवण्याचे कौशल्य दिसून आले. (प्रे. कृत्ये १७:१९-२२; १ पेत्र ३:१५) आता आपण त्याने दिलेल्या भाषणाचे तपशीलवार परीक्षण करू या आणि आपले शिकवण्याचे कौशल्य आणखी सुधारण्यासाठी मदत करतील असे धडे शिकू या.

श्रोत्यांना आवडतील असे विषय निवडा

पौलाने म्हटले: “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण . . . तुमच्या पूज्य वस्तु पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करितो.”—प्रे. कृत्ये १७:२२, २३.

पौलाचे आपल्या सभोवताली असलेल्या गोष्टींकडे बारीक लक्ष होते. त्याने लक्षपूर्वक जे काही पाहिले त्यावरून त्याला आपल्या श्रोत्यांबद्दल खूप काही जाणून घेता आले. आपणही बारकाईने लक्ष दिल्यास घरमालकाबद्दल थोडेफार जाणून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, अंगणातील खेळण्यांवरून किंवा दारावर असलेल्या चिन्हांवरून आपल्याला बरेच काही समजते. घरमालकाच्या परिस्थितीची थोडीफार कल्पना आल्यास, काय बोलावे केवळ हेच नव्हे, तर ते कशा प्रकारे व्यक्‍त करावे हे देखील विचारपूर्वक ठरवणे आपल्याला शक्य होईल.—कलस्सै. ४:६.

पौलाने आपल्या श्रोत्यांना दोषी ठरवले नाही. पण, अथेनैच्या लोकांची भक्‍ती यथार्थ ज्ञानावर आधारित नव्हती हे त्याला दिसून आले. खऱ्‍या देवाची उपासना करणे कसे शक्य आहे हे पौलाने अगदी स्पष्टपणे त्यांना दाखवून दिले. (१ करिंथ. १४:८) तर मग, आपण राज्याच्या सुवार्तेची घोषणा करतो तेव्हा सर्वांना समजेल अशा प्रकारे व सकारात्मक रीतीने बोलणे किती महत्त्वाचे आहे!

व्यवहारकुशल असा आणि भेदभाव करू नका

पौलाने पुढे असे म्हटले: “ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही; आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेहि नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.”—प्रे. कृत्ये १७:२४, २५.

आपल्याला जीवन देणारा यहोवा आहे याकडे आपल्या श्रोत्यांचे लक्ष वेधताना पौलाने कुशलतेने यहोवाचा उल्लेख “स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु” असे केले. तेव्हा, विभिन्‍न धार्मिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमीच्या प्रामाणिक मनाच्या लोकांना, जीवन यहोवा देवाकडूनच मिळते हे समजण्यास मदत करणे किती मोठा सुहक्क आहे!—स्तो. ३६:९.

पौलाने आणखी असे म्हटले: “आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून . . . त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रे. कृत्ये १७:२६, २७.

आपण ज्या प्रकारे लोकांना शिकवतो त्यावरून, आपण कशा प्रकारच्या देवाची उपासना करतो हे त्यांना दाखवू शकतो. यहोवा कोणताही भेदभाव न करता, सर्व राष्ट्रांतील लोकांना ‘चाचपडत चाचपडत त्याला प्राप्त करून घेण्याची’ अनुमती देतो. त्याचप्रमाणे आपणही, आपल्याला भेटणाऱ्‍या सर्वांशी कोणताही भेदभाव न बाळगता बोलतो. एक सृष्टिकर्ता आहे असा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे त्यांना सदासर्वकाळचे आशीर्वाद मिळू शकतात. (याको. ४:८) पण, देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणाऱ्‍या लोकांना आपण कशा प्रकारे मदत करतो? याबाबतीत आपण पौलाचे अनुकरण करतो. त्याने पुढे काय म्हटले त्याकडे लक्ष द्या.

“आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो. तसेच तुमच्या कवींपैकीहि कित्येकांनी म्हटले आहे की, ‘आपण वास्तविक त्याचा वंश आहो.’ तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्‍यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.”—प्रे. कृत्ये १७:२८, २९.

आपल्या बोलण्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पौलाने अथेनैच्या लोकांना परिचित असलेल्या व ते मान देत असलेल्या कवींच्या शब्दांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आपणही, आपले श्रोते सहज स्वीकारतील अशा गोष्टींवर चर्चा करू शकतो. उदाहरणार्थ, इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात पौलाने वापरलेले रूपक आजही तितकेच प्रभावशाली आहे: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री ३:४) घरमालकांना या साध्याशा उदाहरणावर तर्क करण्यास प्रवृत्त केल्याने आपण जे सांगतो ते सत्य असल्याची त्यांची खात्री पटण्यास मदत होऊ शकते. परिणामकारक रीत्या शिकवण्याच्या बाबतीत पौलाच्या भाषणातील आणखी एका वैशिष्ट्याकडे लक्ष द्या. आणि ते म्हणजे श्रोत्यांना प्रेरणा देणे.

सध्याच्या काळाचे महत्त्व पटवून द्या

पौलाने म्हटले: “अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करितो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.”—प्रे. कृत्ये १७:३०, ३१.

देवाने तात्पुरत्या काळासाठी दुष्टाई राहू दिल्यामुळे आपल्या मनात खरोखर काय आहे हे त्याला दाखवण्याची आपल्या सर्वांनाच संधी मिळाली आहे. त्यामुळे, लोकांशी बोलताना त्यांना सध्याच्या काळाचे महत्त्व पटवून देणे अत्यंत आवश्‍यक आहे. तसेच, फार लवकर येणार असलेल्या देवाच्या नवीन शासनाद्वारे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल, ऐकणाऱ्‍यांना पटेल अशा प्रकारे बोलणेही जरुरीचे आहे.—२ तीम. ३:१-५.

भिन्‍न-भिन्‍न प्रतिक्रिया

“तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ‘ह्‍याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.’ इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्‍वास ठेवला.”—प्रे. कृत्ये १७:३२-३४.

आपण शिकवत असलेल्या गोष्टींना काही जण लगेच प्रतिसाद देतील. तर, इतरांना आपले बोलणे पटण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. पण, आपण सोप्या व स्पष्ट शब्दांत सांगितलेल्या सत्यांमुळे केवळ एका व्यक्‍तीला जरी यहोवाबद्दल यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यास मदत झाली, तरी देव त्याच्या पुत्राकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी आपला वापर करत आहे याबद्दल आपण किती आभारी असू शकतो!—योहा. ६:४४.

शिकण्यासारखे धडे

आपण पौलाच्या भाषणावर मनन करतो तेव्हा, बायबलमधील सत्ये इतरांना कशा प्रकारे समजावून सांगावीत याबद्दल बरेच काही शिकू शकतो. मंडळीत जाहीर भाषण देण्याचा विशेषाधिकार आपल्याला लाभला असल्यास, नवीन लोक सहजतेने समजू शकतील व बायबल सत्यांचा स्वीकार करतील अशा शब्दांचा कुशलतेने वापर करण्याद्वारे आपण पौलाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. ही सत्ये आपण स्पष्ट शब्दांत सादर करू इच्छितो, पण आपल्या शब्दांमुळे सभेत उपस्थित असलेल्या एखाद्या नवीन व्यक्‍तीचे मन दुःखावणार नाही याचीही आपण काळजी घेऊ. त्याच वेळी, सार्वजनिक प्रचार कार्यात आपण लोकांची खात्री पटेल अशा प्रकारे कुशलतेने बोलण्याचा प्रयत्न करतो. असे करण्याद्वारे, ‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवण्याच्या’ पौलाने दिलेल्या सल्ल्याचे आपण खऱ्‍या अर्थाने पालन करतो.

[३० पानांवरील चित्र]

पौलाने स्पष्ट व सरळसोप्या पद्धतीने आणि इतरांच्या भावना लक्षात घेऊन शिकवले

[३१ पानांवरील चित्र]

आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्या भावना विचारात घेण्याद्वारे आपण पौलाचे अनुकरण करतो