जागरूक असल्यामुळे चांगले परिणाम पदरी पडतात
जागरूक असल्यामुळे चांगले परिणाम पदरी पडतात
तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या प्रचाराच्या संधींचा फायदा घेण्यास तुम्ही जागरूक असता का? अशा संधीचा फायदा घेण्यात फिनलंडमधील तुर्कू या ऐतिहासिक बंदर शहरात राहणारे आपले ख्रिस्ती बांधव जागरूक होते आणि याचे चांगले परिणाम त्यांनी अनुभवले.
काही दिवसांपूर्वी, तुर्कूमधील आपल्या बांधवांच्या लक्षात आले की आशिया खंडातून काही लोक, जहाज बांधण्याचे काम जेथे केले जाते तेथे एका अवाढव्य जहाजावरचे काम पूर्ण करण्यासाठी आले होते. नंतर, हे विदेशी कामगार कोणत्या हॉटेल्समध्ये राहतात याची माहिती एका बांधवाने काढली. बांधवाला हेही समजले की दररोज पहाटे या कामगारांना त्यांच्या हॉटेल्सवरून बसने त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचवले जायचे. बांधवाने ताबडतोब तुर्कूतील इंग्रजी भाषिक मंडळीतील बांधवांना याची माहिती दिली.
आपल्या क्षेत्रात आलेल्या या विदेश्यांमुळे राज्याचा संदेश सांगण्याची एक नवीन संधी उपलब्ध झाल्याचे मंडळीतील वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे या लोकांना प्रचार करण्यासाठी वडिलांनी काही खास योजना केल्या. त्याच आठवडी रविवारच्या दिवशी दहा प्रचारक सकाळी सात वाजता बसस्टॉपवर पोहचले. सुरुवातीला त्यांना कोणीच दिसले नाही. ‘आपल्याला यायला उशीर झाला का? ते तुर्कू सोडून निघून गेलेत की काय?’ असा बांधवांच्या मनात विचार आला. पण, मग कामाचे कपडे घातलेला एक कामगार तेथे आला. त्याच्या पाठोपाठ आणखीन एक आला. असे करत करत अनेक जण आले. थोड्याच वेळात कामगारांचा एक मोठा घोळका बसस्टॉपवर जमला. प्रचारकांनी वेळ न दवडता लगेच प्रचार करायला सुरुवात केली व त्यांना इंग्रजी भाषेतील प्रकाशने दिली. सर्व कामगारांना बसेसमध्ये जागा मिळण्यास जवळजवळ एक तास लागल्यामुळे बांधवांना जास्तीत जास्त लोकांशी बोलणे शक्य झाले. बसस्टॉपवरून बसेस कामगारांना घेऊन निघाल्या तोपर्यंत बांधवांनी त्यांना १२६ पुस्तिका आणि ३२९ मासिके सादर केली होती.
या चांगल्या परिणामांमुळे उत्साहित होऊन बांधवांनी पुढील आठवडी विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान पुन्हा तोच प्रयत्न केला. त्या दिवशी पाऊस पडत असूनसुद्धा विभागीय पर्यवेक्षकांनी सकाळी साडेसहा वाजता क्षेत्र सेवेची सभा घेतली. त्यानंतर २४ प्रचारक बसस्टॉपकडे निघाले. या वेळी मात्र त्यांनी टगालोग भाषेतही साहित्य सोबत घेतले, कारण या विदेश्यांमध्ये अनेक जण फिलिपाईन्सचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्या दिवशी सकाळी बसेस बंदराकडे निघण्याआधी प्रचारकांनी त्यांना ७ पुस्तके, ६९ पुस्तिका आणि ४७९ मासिके दिली. या खास मोहिमेत सहभाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल त्या बंधुभगिनींना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!
हे कामगार आपापल्या मायदेशी परतण्याआधी बांधव त्यांच्यापैकी अनेकांना त्यांच्या हॉटेल्सवर जाऊन भेटले व राज्याच्या संदेशाविषयी त्यांना अधिक माहिती दिली. याआधीही इतर ठिकाणी साक्षीदारांनी आपल्याला भेट दिल्याचे काही कामगारांनी सांगितले. फिनलंडमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान बांधवांनी स्वतःहून त्यांची भेट घेतल्याबद्दल या कामगारांनी त्यांचे आभार मानले.
तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात एकाएकी निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यास तुम्ही देखील जागरूक असता का? निरनिराळ्या संस्कृतींच्या, वंशांच्या लोकांना राज्याचा संदेश सांगण्यास तुम्ही पुढाकार घेता का? असल्यास तुर्कूतील आपल्या बांधवांप्रमाणेच तुमच्याही पदरी अनेक चांगले परिणाम पडतील.
[३२ पानांवरील नकाशा/चित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
फिनलंड
हेलसिंकी
तुर्कू