व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा

तुमच्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा

तुमच्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा

मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा एक अतिशय उत्तम मार्ग म्हणजे त्यांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावायचा मनापासून प्रयत्न करणे. आणि हे किती आनंददायक असू शकते! लहानपणी आईवडील कशा प्रकारे आपल्याला गोष्टी वाचून दाखवायचे याच्या प्रेमळ आठवणी आजही काहींच्या मनात ताज्या आहेत. वाचन आनंददायक तर असतेच, शिवाय त्याचे अनेक फायदेही आहेत. ही गोष्ट देवाच्या सेवकांच्या बाबतीत अगदी खरी आहे, कारण आध्यात्मिक रीत्या प्रौढ होण्यासाठी बायबलचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एका ख्रिस्ती पालकाने म्हटले, की “वाचन आणि अभ्यास या गोष्टींना आम्ही सगळ्यात जास्त महत्त्व देतो.”

अभ्यासाच्या चांगल्या सवयींमुळे तुमच्या मुलांना देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे शक्य होईल. (स्तो. १:१-३, ६) तारण होण्यासाठी वाचायला येणे आवश्‍यक नसले, तरी वाचनाचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत असे बायबल सांगते. उदाहरणार्थ, प्रकटीकरण १:३ म्हणते: ‘या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा व ते ऐकणारे हे धन्य.’ याशिवाय, अभ्यासासाठी आवश्‍यक असलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे एकाग्रता. ती किती महत्त्वाची आहे हे प्रेषित पौलाने तीमथ्याला दिलेल्या प्रेरित सल्ल्यातून स्पष्ट दिसून येते: “ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यांत गढून जा.” का? म्हणजे “तुझी प्रगती सर्वांस दिसून” येईल.—१ तीम. ४:१५.

अर्थात, एखाद्या व्यक्‍तीला वाचन व अभ्यास करायला येतो म्हणजे त्यांपासून त्याला फायदा होईलच असे म्हणता येत नाही. अनेकांजवळ या क्षमता आहेत, पण त्यांचा ते फारसा उपयोग करत नाहीत. या उलट, ते कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवतात. तर मग, पालक आपल्या मुलांच्या मनात लाभदायक ज्ञानाची लालसा कशी उत्पन्‍न करू शकतात?

तुमचे प्रेम व उदाहरण महत्त्वाचे

अभ्यासाच्या वेळी प्रेमळ वातावरण असल्यास मुलांना अभ्यास हवाहवासा वाटू लागतो. ओअन आणि क्लॉडिआ हे ख्रिस्ती दांपत्य आपल्या दोन मुलांविषयी म्हणतात: “अभ्यासाची वेळ एक खास वेळ असल्यामुळे लहानपणी आमची मुलं त्याची आतुरतेनं वाट पाहायची. या प्रेमळ वातावरणात त्यांना अगदी सुरक्षित व निश्‍चिंत वाटायचं. अभ्यासाची वेळ म्हणजे सबंध कुटुंबानं मिळून खेळीमेळीच्या वातावरणात घालवलेला वेळ, असा विचार त्यांच्या मनात लहानपणापासून रुजला.” मुले मोठी होऊन तारुण्यात पदार्पण करतात तेव्हा त्यांच्यासमोर अनेक समस्या येऊ शकतात. पण, कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी प्रेमळ वातावरण असल्यास अभ्यासाविषयी त्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही. आज ओअन आणि क्लॉडिआ यांची दोन्ही मुले पायनियर सेवा करत आहेत आणि वाचनाची व अभ्यासाची जी गोडी त्यांना लहानपणी लावण्यात आली होती तिचा ते आजही लाभ घेत आहेत.

मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावण्याचा आणखी एक प्रभावशाली मार्ग म्हणजे उत्तम उदाहरण मांडणे. आपले आईवडील नेहमी वाचन व अभ्यास करतात हे मुले पाहतात तेव्हा ती देखील या गोष्टी सहजतेने करू लागतात. पण, वाचन करणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही आपल्या मुलांसमोर एक उत्तम आदर्श कसा मांडू शकता? त्यासाठी वाचनाप्रती असलेल्या तुमच्या मनोवृत्तीत कदाचित तुम्हाला बदल करावा लागेल. (रोम. २:२१) जर वाचनाला तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान दिले, तर याचा तुमच्या मुलांच्या अंतःकरणावर खोलवर परिणाम होईल. खासकरून बायबलचे वाचन करण्यासाठी, सभांची व कौटुंबिक अभ्यासाची तयारी करण्यासाठी तुम्ही मेहनत घेता हे पाहून या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे तुमच्या मुलांच्या मनात पक्के बसेल.

होय, तुमच्या मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तुमचे प्रेम आणि उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, मुलांना वाचन करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही कोणती व्यावहारिक पावले उचलू शकता?

प्रथम वाचनाची गोडी लावा

तुमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही कोणती महत्त्वाची पावले उचलू शकता? अगदी लहानपणापासून त्यांना पुस्तके द्या. एक ख्रिस्ती वडील ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी लहानपणापासूनच वाचनाची गोडी लावली होती ते असा सल्ला देतात: “तुमच्या मुलांच्या हातात पुस्तकं द्या, त्यांना ती चाळू द्या, हाताळू द्या. असं केल्यास पुस्तकं त्यांचे मित्र बनतील व मुलं आपल्या जीवनात त्यांना महत्त्व देतील.” अशा रीतीने, मुले वाचायला शिकण्याच्या आधीच, थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) आणि बायबल कथांचं माझं पुस्तक यांसारखी बायबलवर आधारित पुस्तके त्यांचे जिवलग सोबती बनतात. अशी पुस्तके मुलांसोबत वाचल्याने तुम्ही त्यांना केवळ भाषेच्याच नव्हे, तर ‘आध्यात्मिक गोष्टींच्या व शब्दांच्याही’ संपर्कात आणत असता.—१ करिंथ. २:१३.

नियमितपणे मोठ्याने वाचा. तुमच्या मुलांसह दररोज वाचन करण्याचा नित्यक्रम स्थापन करा. यामुळे शब्दांचे अचूक उच्चार, योग्य वाक्यरचना त्यांना समजतील आणि त्यांना वाचनाची सवय लागेल. पण, तुम्ही कशा प्रकारे वाचता हेही खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही उत्साही असाल तर तुमची मुले देखील उत्साह दाखवतील. किंबहुना, कधीकधी मुले एकच गोष्ट वारंवार वाचून दाखवण्याचा हट्ट करतील. त्यांचा हा हट्ट आवर्जून पूर्ण करा! काही काळानंतर, नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होईल. पण, त्यांना तुमच्यासोबत वाचनाला बसण्याची जबरदस्ती करू नका. याबाबतीत येशूने एक उत्तम उदाहरण मांडले. त्याने आपल्या श्रोत्यांच्या “ग्रहणशक्‍तीप्रमाणे” त्यांना शिकवले. (मार्क ४:३३) तुम्ही तुमच्या मुलांना जबरदस्ती केली नाही तर ते प्रत्येक वेळी वाचनाची आतुरतेने वाट पाहतील आणि मुलांना वाचनाची गोडी लावण्याच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

मुलांनाही बोलू द्या आणि वाचलेल्या गोष्टींची चर्चा करा. शब्दांची ओळख, त्यांचे अचूक उच्चार आणि अर्थ या गोष्टी मुले किती लवकर शिकतात हे पाहून तुम्हाला स्वतःलाच आश्‍चर्य वाटेल. वाचलेल्या गोष्टींवर चर्चा केल्याने मुले झपाट्याने प्रगती करू शकतात. चांगले वाचक बनण्यासाठी मुलांना मदत कशी केली जाऊ शकते या विषयावरील एक पुस्तक म्हणते, की संभाषणामुळे “मुलांच्या वाचनात पुढे जे शब्द येतील त्यांची ओळख होण्यास आणि त्यांचा अर्थ समजण्यास त्यांना मदत होते. मुलांची मने नवनवीन गोष्टी शिकून घेण्यास आसुसलेली असतात. त्यामुळे त्यांच्याशी संभाषण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि संभाषण जितके अर्थपूर्ण असेल . . . तितके चांगले.”

मुलांना तुमच्यासाठी वाचायला सांगा आणि प्रश्‍न विचारण्यास वाव द्या. तुम्ही स्वतःच प्रश्‍न उपस्थित करून त्यांची उत्तरे सुचवू शकता. असे केल्याने, पुस्तकांमधून माहिती मिळवली जाऊ शकते हे मुलांना समजते आणि आपण वाचत असलेल्या प्रत्येक शब्दाचा काही ना काही अर्थ असतो हेही त्यांना समजते. खासकरून, इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा अधिक अर्थपूर्ण असलेल्या देवाच्या वचनातून तुम्ही वाचता तेव्हा ही पद्धत उपयुक्‍त ठरते.—इब्री ४:१२.

पण, चांगले वाचन करण्याचे कौशल्य आत्मसात करणे सोपे नसते हे कधीही विसरू नका. त्यासाठी वेळ द्यावा लागतो व सराव करावा लागतो. * तेव्हा, मुलांची वाचनाची आवड वाढत असताना त्यांचे तोंडभरून कौतुक करा. असे केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळेल व वाचनाची गोडी लागेल.

अर्थपूर्ण व आनंददायक

मुलांना अभ्यास कसा करावा हे शिकवल्याने त्यांच्या वाचनाला एक उद्देश मिळतो. अभ्यास करण्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकून घेणे आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेणे गोवलेले असते. त्यासाठी माहितीची जुळवाजुळव करण्याची, ती आठवणीत ठेवण्याची व तिचा उपयोग करण्याची क्षमता आवश्‍यक असते. एकदा का मुले अभ्यास कसा करावा हे शिकली व अभ्यासलेल्या गोष्टी व्यावहारिक रीत्या किती उपयुक्‍त आहेत हे त्यांना समजले की त्यांना अभ्यास अर्थपूर्णच नव्हे तर आनंददायकही वाटू लागतो.—उप. १०:१०.

अभ्यासाची मूलभूत कौशल्ये शिकवा. कौटुंबिक उपासना करताना, दैनिक वचनाची चर्चा करताना व अशा इतर प्रसंगी, मुलांना अभ्यासाची मूलभूत कौशल्ये शिकवण्याच्या अनेक उत्तम संधी लाभतात. थोड्या वेळासाठी शांत बसणे आणि एखाद्या विशिष्ट विषयावर लक्ष लावणे यांमुळे अभ्यासासाठी आवश्‍यक असलेली एक महत्त्वपूर्ण गोष्ट अर्थात एकाग्रता मुले शिकतील. तसेच, तुमच्या मुलाने नुकतेच जे काही वाचले आणि त्या विषयावर त्याला आधीपासूनच जी माहिती आहे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे तुम्ही त्याला विचारू शकता. यामुळे माहितीची तुलना कशी करावी हे मूल शिकते. तुमच्या मुलीने नुकतीच जी माहिती वाचली तिचा सारांश स्वतःच्या शब्दांत मांडायला तुम्ही तिला सांगू शकता का? असे केल्याने त्या माहितीचा अर्थ समजून घेण्यास व ती आठवणीत ठेवण्यास तिला मदत होईल. उजळणी म्हणजे एखादा लेख वाचल्यानंतर त्यातील मुख्य मुद्दे पुन्हा दुसऱ्‍या शब्दांत व्यक्‍त करणे, ही देखील मुलांची स्मरणशक्‍ती वाढवण्याची एक चांगली पद्धत आहे. तसेच, अभ्यासाच्या वेळी किंवा मंडळीच्या संभांमध्ये संक्षिप्त नोंदी कशा घ्याव्यात हे लहान मुलांना देखील शिकवले जाऊ शकते. यामुळे लक्ष एकाग्र करण्यास त्यांना नक्कीच खूप मदत मिळेल. अशा साध्यासाध्या गोष्टींमुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना अभ्यासातले नावीन्य टिकवून ठेवणे व तो नेहमी अर्थपूर्ण ठेवणे शक्य होईल.

अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करा. खेळती हवा, पुरेसा प्रकाश, शांत व निवांत वातावरण असल्यास लक्ष एकाग्र करणे सोपे जाते. अर्थात, अभ्यासाकडे पालक स्वतः कोणत्या दृष्टिकोनाने पाहतात हे देखील खूप महत्त्वाचे आहे. एक आई म्हणते: “वाचन आणि अभ्यास या गोष्टी नियमितपणे व सातत्याने करण्यासाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांना सर्व काही नियोजित पद्धतीने करण्यास मदत मिळते. अमुक वेळी अमुक काम ठरल्याप्रमाणे केलेच पाहिजे हे ते शिकतात.” बरेच पालक अभ्यासाच्या वेळी दुसरी कुठलीच गोष्ट चालणार नाही असा कडक नियम आपल्या कुटुंबात लावतात. एका तज्ज्ञानुसार, मुलांना अभ्यास करण्याच्या चांगल्या सवयी लावण्याकरता ही पद्धत खूप लाभदायक ठरते.

अभ्यासाचे महत्त्व पटवून द्या. शेवटी, आपल्या दररोजच्या जीवनात अभ्यास किती उपयोगी पडू शकतो हे मुलांना पटवून द्या. शिकलेल्या गोष्टींचा व्यवहारात उपयोग केल्याने अभ्यास करण्यामागचा खरा उद्देश साध्य होतो. एक तरुण बांधव म्हणतो: “मी जे काही शिकतो त्याचा मला स्वतःला काहीच फायदा होणार नाही असं मला जाणवतं तेव्हा त्या गोष्टीचा अभ्यास मला करावासाच वाटत नाही. पण, एखादी गोष्ट शिकण्याचा मला काहीतरी फायदा होणार असेल तर मला त्याविषयी शिकून घेण्यास आवडतं.” अभ्यासामुळे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य होते असे मुलांना जाणवेल तेव्हा आपोआपच ते त्यात गढून जातील. मग, वाचनाप्रमाणेच अभ्यासाच्या वेळेचीही ते तितक्याच आतुरतेने वाट पाहू लागतील.

सर्वात मोठा फायदा

मुलांना वाचनाची गोडी लावण्याचे फायदे सांगावेत तितके कमीच. शाळेत व कामाच्या ठिकाणी यशस्वी होणे, निरनिराळी नाती जोपासता येणे, बाहेरच्या जगाशी व्यवहार करता येणे, तसेच पालक आणि मुले यांच्यात जवळचा नातेसंबंध जोडता येणे अशा कितीतरी फायद्यांचा येथे उल्लेख करता येईल. याशिवाय, वाचन आणि अभ्यासातून किती आनंद मिळतो हे वेगळे सांगायला नकोच!

सगळ्यात मुख्य म्हणजे, अभ्यासाच्या सवयीमुळे तुमच्या मुलांना आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करणे शक्य होईल. आध्यात्मिक सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्या मुलांच्या अंतःकरणात निर्माण करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना अभ्यासाची गोडी लावणे. (इफिस. ३:१८) अर्थात, पालक आपल्या मुलांना आणखी बरेच काही शिकवू शकतात. मुलांच्या भावी जीवनाकरता एक चांगला पाया रचण्यासाठी पालकांनी त्यांना वेळ दिल्यास व त्यांच्यामध्ये आस्था घेतल्यास पुढे आपली मुले यहोवाचे उपासक बनतील अशी आशा ते बाळगू शकतात. मुलांना अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावल्यामुळे देवासोबत एक चांगला नातेसंबंध जोडून तो टिकवून ठेवण्यास त्यांना मदत होते. तेव्हा, आपल्या मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावण्याचा प्रयत्न करत असताना यहोवाने तुमचे हे प्रयत्न आशीर्वादित करावेत अशी त्याला प्रार्थना करा.—नीति. २२:६.

[तळटीप]

^ परि. 14 अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना वाचन व अभ्यास करणे नक्कीच सोपे नसते. अशा मुलांना मदत करण्यासाठी पालक काय करू शकतात या विषयावरील माहितीकरता सावध राहा! मार्च ८, १९९७, पृष्ठे ३-१० पाहा.

[२६ पानांवरील चौकट/चित्रे]

वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी . . .

• मुलांना पुस्तके द्या

• त्यांना मोठ्याने वाचून दाखवा

• त्यांनाही बोलू द्या

• वाचलेल्या माहितीवर चर्चा करा

• मुलांना तुमच्याकरता वाचायला सांगा

• त्यांना प्रश्‍न विचारण्याचे प्रोत्साहन द्या

अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी . . .

• पालक या नात्याने चांगले उदाहरण मांडा

• तुमच्या मुलांना पुढील गोष्टी शिकवा . . .

○ एकाग्रता

○ तुलना

○ सारांश

○ उजळणी

○ नोंदी घेणे

• अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार करा

• अभ्यासाचे महत्त्व पटवून द्या