व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’

‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’

‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’

येशूने आपल्या अनुयायांना आधीच सांगितले होते: “तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे.” पण, असे सांगण्याअगोदर येशूने म्हटले: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको.” आजही सैतान देवाच्या लोकांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवून राज्य प्रचाराचे कार्य थांबवण्याचा प्रयत्न करतच आहे. त्यामुळे, काही देशांच्या सरकारांकडून खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ केला जाण्याची आपण अपेक्षा करू शकतो. (प्रकटी. २:१०; १२:१७) पण, येशूने सांगितल्याप्रमाणे आपण कशा प्रकारे सैतानाच्या कुयुक्‍तींचे ‘भय न धरता’ त्यांसाठी तयार राहू शकतो?

आपल्यापैकी बहुतेकांना केव्हा न केव्हा भीती वाटलीच असेल. तरीसुद्धा, देवाचे वचन आपल्याला आश्‍वासन देते की यहोवाच्या मदतीने आपण भीतीवर मात करू शकतो. ती कशी? विरोधाला तोंड देण्याकरता यहोवा आपल्याला अनेक मार्गांनी मदत करतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे सैतान व त्याचे साथीदार कोणते डावपेच वापरतात हे ओळखण्यास तो आपली मदत करतो. (२ करिंथ. २:११) हे समजून घेण्याकरता आपण बायबल इतिहासात घडलेल्या एका घटनेचे परीक्षण करू या. तसेच आपण काही विश्‍वासू बांधवांची उदाहरणे देखील पाहू, ज्यांनी आधुनिक काळात ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरला.’—इफिस. ६:११-१३.

एका देवभीरू राजाचा एका दुष्ट राजाशी सामना

सा.यु.पू. आठव्या शतकात अश्‍शूरचा दुष्ट राजा सन्हेरीब याने एकापाठोपाठ एक, कितीतरी राष्ट्रांवर विजय मिळवला. या विजयांमुळे त्याचा आत्मविश्‍वास अगदी शिगेला पोचला. आता त्याने देवाच्या लोकांकडे आणि त्यांची राजधानी असलेल्या जेरूसलेम शहराकडे आपले लक्ष वळवले, जेथे हिज्कीया हा देवभीरू राजा राज्य करत होता. (२ राजे १८:१-३, १३) अर्थात, पडद्याआड सैतान या सर्व घडामोडींचा फायदा घेत होता. त्यानेच आपले हेतू साध्य करण्यासाठी सन्हेरीबाला प्रवृत्त केले, जेणेकरून पृथ्वीवरून खरी उपासना कायमची नाहीशी होईल.—उत्प. ३:१५.

सन्हेरीबाने आपल्या काही प्रतिनिधींना जेरूसलेमला पाठवले आणि शहरातील रहिवाशांनी आपल्याला शरण यावे अशी मागणी केली. या प्रतिनिधींमध्ये रब-शाके हाही होता. तो राजाच्या वतीने बोलणारा मुख्य प्रवक्‍ता होता. * (२ राजे १८:१७) रब-शाकेचे लक्ष्य एकच होते. यहुद्यांचे धैर्य खचवून, युद्ध होण्याआधीच त्यांना माघार घेण्यास भाग पाडणे. यहुद्यांच्या मनात दहशत उत्पन्‍न करण्यासाठी त्याने कोणते मार्ग अवलंबले?

एकाकी तरीपण विश्‍वासू

रब-शाकेने हिज्कीयाच्या प्रतिनिधींना सांगितले: “हिज्कीयाला सांगा की राजाधिराज, अश्‍शूरचा राजा म्हणतो, ‘हा तुझा भरवसा कसला! पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल.’” (२ राजे १८:१९, २१) रब-शाकेने केलेला आरोप साफ खोटा होता कारण हिज्कीयाने मिसर म्हणजे इजिप्तशी मैत्री केलीच नव्हती. पण, असा आरोप करण्याद्वारे रब-शाके यहुद्यांच्या मनात हीच एक गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न करत होता: ‘कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. तुम्ही अगदी निराधार, एकटे आहात.’

त्याच प्रकारे, अलीकडच्या काळातही विरोधकांनी खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या मनात एकटे पडण्याची भीती निर्माण करून त्यांचे धैर्य खचवण्याचा प्रयत्न केला आहे. एका ख्रिस्ती बहिणीचे उदाहरण घ्या. तिला तिच्या विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्यात आले आणि कितीतरी वर्षे तिचा बंधुभगिनींशी कोणताच संपर्क नव्हता. पण याही परिस्थितीत भयभीत न होता विश्‍वासू राहण्यास तिला कशामुळे मदत मिळाली, याविषयी ती सांगते: “प्रार्थनेमुळे मी यहोवाच्या अगदी जवळ आले. . . . यशया ६६:२ यातील आश्‍वासन मला आठवलं. तिथं म्हटलं आहे, की “जो दीन व भग्नहृदय आहे” त्याला देव पाहतो. या जाणिवेमुळे मला खूप धैर्य व सांत्वन मिळालं.” त्याच प्रकारे, अनेक वर्षे एकांत कारावास भोगलेल्या एका बांधवाने म्हटले: “जर तुमचा देवासोबत अगदी जवळचा नातेसंबंध असेल, तर कोठडीच्या चार भिंतींच्या आडही तुम्ही आपल्यासाठी एक वेगळं विश्‍व निर्माण करू शकता, याची मला प्रचिती आली.” होय, यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध असल्यामुळेच या दोघा ख्रिश्‍चनांना एकांतवासातही तग धरून राहण्याची ताकद मिळाली. (स्तो. ९:९, १०) त्यांचा छळ करणाऱ्‍यांनी त्यांना कुटुंबीयांपासून, मित्रांपासून व इतर ख्रिस्ती बांधवांपासून वेगळे केले. पण, हे विरोधक आपल्याला यहोवापासून कधीही वेगळे करू शकणार नाहीत याची तुरुंगवासात असलेल्या या साक्षीदारांना पूर्ण खात्री होती.—रोम. ८:३५-३९.

तर मग, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अधिकाधिक दृढ करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेणे खरोखर किती महत्त्वाचे आहे! (याको. ४:८) आपण नेहमी स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘यहोवा मला कितपत खरा वाटतो? त्याचे शब्द मनात बाळगून मी दररोजच्या जीवनातील लहानमोठे निर्णय घेतो का?’ (लूक १६:१०) देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा आपण मनापासून प्रयत्न केल्यास आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. यिर्मया संदेष्ट्याने दुःखीकष्टी यहुद्यांच्या वतीने बोलताना असे म्हटले: “हे परमेश्‍वरा, अतिशयित खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. . . . मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास, ‘भिऊ नको.’”—विलाप. ३:५५-५७.

शंका निर्माण करूनही उपयोग झाला नाही

रब-शाकेने अतिशय धूर्तपणे बोलून यहुद्यांच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला: ‘ज्याची उच्च स्थाने व वेदी हिज्कीयाने काढून टाकली, तोच नव्हे का तो देव? परमेश्‍वरानेच मला सांगितले की या देशावर चढाई करून जा व याचा विध्वंस कर.’ (२ राजे १८:२२, २५) रब-शाकेने असा तर्क केला, की यहोवा आपल्या लोकांवर नाखुष असल्यामुळे तो त्यांच्यासाठी लढणार नाही. पण हे खरे नव्हते. हिज्कीया आणि जे यहुदी खऱ्‍या उपासनेकडे परत फिरले होते त्यांच्याविषयी यहोवा संतुष्ट होता.—२ राजे १८:३-७.

आजही देवाच्या लोकांचा छळ करणारे मोठ्या धूर्तपणे, काही प्रमाणात खरी असलेली माहिती देऊन त्यांना विश्‍वासात घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या मनात शंका निर्माण करण्याच्या हेतूने हे विरोधक खरी माहिती देत असताना अतिशय चलाखीने खोट्या माहितीचीही त्यात भर घालतात. उदाहरणार्थ, तुरुंगात असलेल्या भाऊबहिणींना काही वेळा असे सांगण्यात आले आहे की त्यांच्या देशातील कार्याचे नेतृत्व करणाऱ्‍या एका बांधवाने विरोधकांशी हातमिळवणी केली आहे आणि त्याअर्थी त्यांनीही आपल्या विश्‍वासांचा त्याग केल्यास ते चुकीचे ठरणार नाही. पण, जे ख्रिस्ती दक्ष असतात ते अशा प्रकारच्या धूर्त तर्कांना बळी पडत नाहीत.

दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान एका ख्रिस्ती बहिणीला आलेला अनुभव लक्षात घ्या. तुरुंगात असताना तिला एका जबाबदार बांधवाचे लेखी बयान दाखवण्यात आले, ज्यात आपण आपल्या विश्‍वासाचा त्याग करत आहोत असे त्याने म्हटले होते. तेव्हा, चौकशी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याने या साक्षीदारावर तुला भरवसा नाही का, असे बहिणीला विचारले. बहिणीने उत्तर दिले: “तो शेवटी एक अपरिपूर्ण मनुष्य आहे.” पुढे तिने म्हटले की जोपर्यंत तो बायबलमधील तत्त्वांनुसार वागत होता तोपर्यंत देवाने आपल्या सेवेत त्याचा उपयोग करून घेतला. “पण आता तो बायबलमधील सत्य मानत नाही असे त्याच्या बयानावरून दिसते, त्यामुळे यापुढे तो माझा भाऊ नाही.” या विश्‍वासू बहिणीने सुज्ञपणे बायबलच्या पुढील सल्ल्याचे पालन केले: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—स्तो. १४६:३.

देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेणे आणि त्यातील मार्गदर्शनाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे केल्यास, परीक्षांमध्ये यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या आपल्या निर्धाराला कमकुवत करू शकतील अशा धूर्त विचारांना आपण बळी पडणार नाही. (इफिस. ४:१३, १४; इब्री ६:१९) म्हणूनच, आपण दररोजच्या बायबल वाचनाला व वैयक्‍तिक अभ्यासाला इतर कामांपेक्षा जास्त महत्त्व दिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला दबावाखाली असतानाही स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता विकसित करता येईल. (इब्री ४:१२) होय, देवाविषयी सखोल ज्ञान घेण्याची आणि आपला विश्‍वास मजबूत करण्याची हीच वेळ आहे. अनेक वर्षे एकांत कारावासात राहिलेल्या एका बांधवाने म्हटले: “मला सर्वांना हेच सांगावंसं वाटतं की आपल्याला पुरवल्या जाणाऱ्‍या सर्व आध्यात्मिक अन्‍नाची मनापासून कदर करा. ते पुढे आपल्याला केव्हा आणि कसं उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.” खरोखर, जर आज आपण देवाच्या वचनाचा आणि दास वर्गाने पुरवलेल्या प्रकाशनांचा काळजीपूर्वक अभ्यास केला, तर जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा पवित्र आत्मा, आपण शिकलेल्या गोष्टींची आपल्याला “आठवण करून देईल.”—योहा. १४:२६.

धमकी देणाऱ्‍यांपासून संरक्षण

रब-शाकेने यहुद्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “आता माझा धनी अश्‍शूरचा राजा याशी सामना करण्यास उभा राहा; तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो. माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील?” (२ राजे १८:२३, २४) मानवी दृष्टिकोनातून विचार केल्यास, शक्‍तिशाली अश्‍शूरी सेनेपुढे हिज्कीया व त्याच्या लोकांचे काहीएक चालणार नव्हते.

आजही छळ करणारे—विशेषतः त्यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असतो तेव्हा—अतिशय शक्‍तिशाली भासू शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करणारे नात्झी अधिकारी. त्यांनी देवाच्या सेवकांपैकी अनेकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वर्षे तुरुंगात घालवलेल्या आपल्या एका बांधवाने, त्याला कशा प्रकारे धमक्या दिल्या जायच्या याविषयी नंतर सांगितले. एकदा एका अधिकाऱ्‍याने त्याला विचारले: “पाहिलंस ना, तुझ्या भावाला कशा गोळ्या झाडण्यात आल्या? मग, तुझा काय विचार आहे?” त्याने उत्तर दिले: “मी यहोवाचा साक्षीदार आहे आणि पुढेही राहीन.” “मग चल आता तुझी पाळी,” असे म्हणून अधिकाऱ्‍याने त्यालाही गोळ्या घालण्याची धमकी दिली. पण बांधवाने समझोता केला नाही. शेवटी, अधिकाऱ्‍याने हार मानली. अशा धमकावण्यांना तोंड देण्यास बांधवाला कशामुळे मदत मिळाली? तो सांगतो: “मी यहोवाच्या नावावर भरवसा ठेवला.”—नीति. १८:१०.

यहोवावर आपला पूर्ण विश्‍वास असल्यास, आपण जणू एक मोठी ढाल हाती घेतो. आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला नुकसान पोचवण्यासाठी सैतान जी काही हत्यारे उपयोगात आणतो, त्यांपासून ही ढाल आपले संरक्षण करते. (इफिस. ६:१६) म्हणूनच, आपला विश्‍वास मजबूत करण्यास मदत करावी अशी आपण नेहमी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (लूक १७:५) तसेच, आपला विश्‍वास दृढ करण्यासाठी विश्‍वासू व बुद्धिमान दासाने केलेल्या सर्व तरतुदींचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आपल्याला धमकावले जाते, तेव्हा यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला दिलेले आश्‍वासन आठवणीत आणल्यास आपल्याला खूप मनोधैर्य मिळू शकते. यहेज्केलाला अतिशय अडेल वृत्तीच्या लोकांना संदेश सांगायचा होता. पण, यहोवाने त्याला सांगितले: “पाहा, मी तुझे मुख त्यांच्या मुखांविरुद्ध बळकट केले आहे, आणि त्यांच्या कपाळांविरुद्ध तुझे कपाळ कठीण केले आहे. मी तुझे कपाळ हिऱ्‍यासारखे गारेपेक्षा कठीण केले आहे.” (यहे. ३:८, ९, पं.र.भा.) हिरा ज्याप्रमाणे अतिशय कठीण असतो त्याचप्रमाणे, गरज पडल्यास यहोवा आपल्यालाही यहेज्केलासारखे अतिशय दृढ व बळकट बनवेल.

प्रलोभनांचा प्रतिकार करणे

विरोधकांना असे आढळले आहे की त्यांच्या इतर सर्व युक्त्या निकामी ठरल्यास, काहीतरी आमीष दाखवून एखाद्या व्यक्‍तीला आपल्या एकनिष्ठेशी तडजोड करण्यास भाग पाडले जाऊ शकते. रब-शाकेनेही यहुद्यांच्या बाबतीत हीच शक्कल लढवली. जेरूसलेममधील लोकांना त्याने म्हटले: “अश्‍शूरचा राजा म्हणतो: ‘मजशी सल्ला करा व मजकडे निघून या; . . . पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्‍नाचा व द्राक्षीच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यात तुम्हास नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही.’” (२ राजे १८:३१, ३२) शत्रूंनी वेढलेल्या शहरात अडकून पडलेल्या लोकांना ताजे अन्‍न व नवीन द्राक्षारस पिण्याचे आमीष किती आकर्षक वाटले असेल!

तुरुंगात असलेल्या एका मिशनरी बांधवाचा निर्धार कमकुवत करण्यासाठी एकदा अशाच आमिषाचा उपयोग करण्यात आला होता. त्या बांधवाला असे सांगण्यात आले होते की त्याला शांतपणे विचार करता यावा म्हणून “सुंदर बगीचा” असलेल्या एका “छानशा घरात” सहा महिन्यांसाठी त्याला नेले जाईल. पण, बांधव आध्यात्मिक रीत्या जागरूक राहिल्यामुळे त्याने ख्रिस्ती तत्त्वांशी हातमिळवणी केली नाही. त्याला असे करणे कशामुळे शक्य झाले? त्याने नंतर सांगितले: “देवाच्या राज्याची आशा ही माझ्यासाठी अगदी खरी होती. . . . देवाच्या राज्याविषयीच्या ज्ञानाने मला ताकद दिली. मला त्याविषयी पूर्ण खात्री होती, क्षणभरही कधी माझ्या मनात त्याविषयी शंका आली नाही. त्यामुळे, मी दृढ राहू शकलो.”

आपल्याला देवाचे राज्य कितपत खरे वाटते? कुलप्रमुख अब्राहाम, प्रेषित पौल, तसेच स्वतः येशू देखील, देवाचे राज्य त्यांच्यासाठी अगदी खरे असल्यामुळेच खडतर परीक्षांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकले. (फिलिप्पै. ३:१३, १४; इब्री ११:८-१०; १२:२) आपणही देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्राधान्य दिले आणि त्याचे चिरकालिक आशीर्वाद नेहमी डोळ्यांपुढे ठेवले तर आपल्यासमोर असलेल्या परीक्षांतून तात्पुरत्या काळासाठी सुटका मिळवण्याच्या मोहाचा प्रतिकार करणे आपल्यालाही शक्य होईल.—२ करिंथ. ४:१६-१८.

यहोवा आपल्याला कधीही विसरणार नाही

रब-शाकेने यहुद्यांना घाबरवण्याचा इतका प्रयत्न केला, तरीसुद्धा हिज्कीया व त्याच्या राज्यातील लोकांचा यहोवावरील भरवसा मुळीच डगमगला नाही. (२ राजे १९:१५, १९; यश. ३७:५-७) त्यांनी यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली आणि यहोवाने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले. त्याने आपल्या एका देवदूताला पाठवले, ज्याने एका रात्रीत अश्‍शूरी सैन्याच्या छावणीतील १,८५,००० सैनिकांना ठार मारले. सन्हेरीबाची इतकी लाजिरवाणी स्थिती झाली की लगेच दुसऱ्‍या दिवशी तो उरल्यासुरल्या सैन्यासोबत आपली राजधानी असलेल्या निनवेला परत गेला.—२ राजे १९:३५, ३६.

यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो कधीही विसरत नाही हे या घटनेवरून स्पष्ट होते. परीक्षांना तोंड देतानाही विश्‍वासात दृढ राहणाऱ्‍या आधुनिक काळातील आपल्या बांधवांच्या उदाहरणांवरून दिसून येते, की यहोवा आजही बदललेला नाही. म्हणूनच, आपला स्वर्गीय पिता आपल्याला असे आश्‍वासन देतो: “मी परमेश्‍वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.”—यश. ४१:१३.

[तळटीप]

^ परि. 6 “रब-शाके” ही प्रमुख अश्‍शूरी अधिकाऱ्‍याची पदवी होती. या वृत्तांतात त्या मनुष्याचे वैयक्‍तिक नाव दिलेले नाही.

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवा त्याच्या वचनात ३० पेक्षा जास्त वेळा स्वतः आपल्या सेवकांना म्हणतो: “भिऊ नका”

[१२ पानांवरील चित्र]

रब-शाकेचे डावपेच हे आज देवाच्या लोकांचे शत्रू वापरत असलेल्या डावपेचांसारखेच होते असे का म्हणता येईल?

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवासोबत आपला घनिष्ठ नातेसंबंध असल्यास परीक्षांना तोंड देतानाही आपण विश्‍वासात टिकून राहू शकतो